जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/28 प्रकरण दाखल तारीख - 27/01/2009 प्रकरण निकाल तारीख – 06/04/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य सयद माजीद अली पि.सयद मुमताज अली, वय वर्षे 45, व्यवसाय शेती, अर्जदार. रा. गनिमपुरा नांदेड. ह.मु.मौजे शेवडी (बा) ता.लोहा जि.नांदेड. विरुध्द. 1. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गैरअर्जदार. विद्युत भवन, नांदेड. 2. सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, लोहा, ता.लोहा जि.नांदेड. 3. कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सोनखेड, ता.लोहा जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एम.व्ही माळाकोळीकर. गैरअर्जदार - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या अनुचित प्रकाराबद्यल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात, त्यांची मौजे शेवडी (बा) ता.लोहा जि.नांदेड येथे गट क्र.587 एक हेक्टर 21 आर नोंदणीकृत विक्रीखत क्र.1669 द्वारे शेत जमीनीचे मालक आहेत. तसेच अर्जदाराची पत्नी मैमुना कौसर यांचे नांवे खरेदीखत क्र.663 दि.30/03/2000 द्वारे एक हेक्टर 69 आर शेत जमीन कमलाकर विनायकराव पांडे यांचेकडुन खरेदी केलेले आहे, असे एकत्रित शेत जमीन सात एकर 10 गुंठे जमीन ही पाईप लाईनसह खरेदी केलेली आहे. गैरअर्जदार यांचेकडुन रब्बी हंगामात पिक घेण्याच्या उद्येशाने पाटबंधारे विभाग नांदेड यांचेकडून नाहरकत प्रमाणपत्र घेऊन विज पुरवठा देण्याबद्यल दि.01/12/2008 रोजी अर्ज केला. गैरअर्जदार यांचे शर्ती व नियमानुसार त्यांनी दिलेले कोटेशन क्र.28757 रु.5,750/- दि.16/12/2008 रोजी जमा केले. यासोबत टेस्ट रिपोर्ट, विज संच मांडणी अहवाल दाखल करण्यात आला आहे. गैरअर्जदारांनी विज पुरवठा करुन दिल्यानंतर शेतात गहु व भुईमुग बियाणे पेरुन त्याला खत देण्यात आले ते सर्व झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास बोलावुन एक पत्र दिले त्यात दि.17/01/2009 च्या पत्राद्वारे असे सुचीत केले की, कमलाकर विनायकराव पांडे यांचे ग्राहक क्र. एजी 563000164261 ला 7.5 एच.पी. चा कनेक्शन दिले होते, ती थकबाकी आहे, ती थकबाकी भरल्या शिवाय त्यांना नविन कनेक्शन देता येत नाही. गैरअर्जदारांच्या पत्रानुसार थकबाकी ही कमलाकर पांडे यांचे नांवाने आहे, त्यांचे आणखी इतर दुसरे एक शेत जमीन व राहत्या घरात सदर थकबाकी ही गैरअर्जदार त्यांच्याकडुन वसुल करुन घेऊ शकतात व तसे न करता त्यांच्याच पत्नीच्या अर्जावरुन अर्जदार यांना नियमानुसार दिलेला विज पुरवठा तोडण्याचा पत्र दिलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास नियमानुसार विज पुरवठा दिलेला आहे तेंव्हा वसुली पोटी गैरअर्जदार यांच्याकडुन विज पुरवठा खंडीत करण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी गैरअर्जदार यांना प्रतिबंधीत करावा व वसुलीसाठी अर्जदार यांना त्रास देऊ नये अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदारांचा अर्ज खोटा असुन अर्जदार हे त्यांचे ग्राहकच नाहीत अद्याप गैरअर्जदारांनी त्यांना विज पुरवठा दिलेला नाही. अर्जदारांनी त्यांच्या पत्नीच्या नांवाने एक हेक्टर 69 आर जमीन खरेदीचा जो उल्लेख केलेला आहे ती जमीन कमलाकर विनायकराव पांडे यांचेकडुन खरेदी केलेली आहे व ती पाईप लाईनसह खरेदी केलेली आहे, या विषयी गैरअर्जदारांना काहीही माहीती नाही. सदरील जमीनीवर भली मोठी थकबाकी पुर्वी पासुन आहे ती भरल्या शिवाय विज पुरवठा देता येत नाही. अर्जदाराला विजेची जोडणी देण्यात आलेली नाही. अर्जदारांनी गहु, भुईमुग पिकाची पेरणी आटपली हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदाराला पत्र दिले व त्यांनी दि.20/01/2009 रोजी सर्व पुरावे सादर करुन त्याची पोहच घेतली हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. अर्जदारास गैरअर्जदार क्र. 3 यांनी दि.17/01/2009 ला दिलेल्या पत्राशी काहीही संबंध जरी नसला तरी कमलाकर विनायकराव पांडे यांच्यावर थकबाकी आहे. त्यामुळे अर्जदाराचे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार कमलाकर विनायकराव पांडे यांचे आणखी एक शेत जमीन आहे हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. मौजे शेवडी ता.लोहा येथील गट क्र.587 या शेतामध्ये गैरअर्जदार कंपनीने कमलाकर विनायकराव पांडे यांना ग्राहक क्र.563000164261 याद्वारे विज जोडणी दिली होती त्याचा ते सतत वापर करीत आहेत व ते थकबाकी रक्कम भरण्यात आलेली नाही. अर्जदारांनी परिच्छेद क्र. 1 मध्ये शेताची खरेदी 1997 मध्ये केल्याचे म्हटलेले आहे व आजमितीस 2009 चालु आहे. सोबत विजेचे बिल दाखल केलेले आहे, त्यात असे दिसते की, दि.18/12/2003 नंतर विजेची जोडणीवर कोणतीही रक्कम भरण्यात आलेली नाही. बारा वर्षे ज्यांनी विजेचा वापर केला त्यांनी सोयीस्कर विज बिलाची रक्कम न भरता सदर विज बिल भरमसाठ रक्कमेचे होऊ दिले व त्यानंतर ही विज बिलाची थकीत रक्कम बुडवावी या हेतुने नवीन विजेची जोडणी मागण्याचा प्रयत्न केला. विज नियमांक मंडळाच्या सेवा शेतीमधील नियम 10.5 मध्ये ज्या इमारतीमध्ये अथवा जागेत पुर्वीच्या विज जोडणीची थकबाकीची रक्कम असेल ती रक्कम भरल्या शिवाय नविन विजेची जोडणी मागण्यास किंवा इतर कोणासही विजेची जोडणी देता येत नाही. तसे अर्जदार यांना दि.17/01/2009 रोजीच्या पत्रान्वये कळविलेले आहे. म्हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील अनुचित प्रकार सिध्द होतो काय ? नाही 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी त्यांच्या तक्रारअर्जात उल्लेख केल्याप्रमाणे गट क्र.587 मधील एक हेक्टर 21 आर जमीन दि.10/07/1997 रोजी विक्रीखत क्र.1669 अन्वये कमलाकर विनायक पांडे यांच्याकडेन विकत घेतलेली आहे तसेच दि.30/03/2000 रोजी एक हेक्टर 69 आर शेत जमीन त्यांची पत्नी मैमुना कौसर यांच्या नांवाने खरेदीखत क्र.663 द्वारे पाईप लाईनसह खरेदी केलेली आहे. 1997 पासुन ते 2008 पर्यंत अर्जदार यांनी गैरअर्जदार कंपनीकडे कुठल्या प्रकारची विद्युत पुरवठा देण्याबद्यल अर्ज केलेला नाही व यानंतर एकदम दि.01/12/2008 रोजी रब्बी हंगाम घेण्यासाठी त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केला. यानुसार गैरअर्जदारांनी दिलेले कोटेशन क्र.28757 दि.16/12/2008 रोजी रु.5,750/- जमा केले व सोबत टेस्ट रिपोर्ट व आवश्यक ती कागदपत्र जमा केली. कोटेशन भरुन अर्जदार ग्राहक जरी झाले असले तरी गैरअर्जदारांचे मते त्यांना अद्यापही विद्युत पुरवठा देण्यात आलेले नाही, या विषयी दि.17/01/2009 रोजी सर्व्हे नंबर 587 शेवडी त्यामध्ये कमलाकर पांडे यांना एजी ग्राहक क्र.563000164261 द्वारे 7.5 एच.पी.चा कनेक्शन देण्यात आलेले होते व ते अद्यापही चालु आहे व कमलाकर पांडे यांचेवर साधारणतः रु.1,31,870/- थकबाकी आहे व ही थकबाकीची रक्कम भरल्या शिवाय नवीन विद्युत पुरवठा देण्यात येत नाही असे पत्र गैरअर्जदार यांनी दिलेली आहे. वरील सर्व कागदपत्र या प्रकरणांत दाखल आहे. खरेदीखतामध्ये असे उल्लेख केलेला आहे की, या शेत जमीनीवर जे काही थकबाकी, वारस, तंटे उदभवतील व मागील झालेल्या कारणांसाठी शेत विकणारे हे जबाबदार राहतील. सर्व्हे नंबरवर थकबाकी असेल व कमलाकर पांडे यांच्या नांवावर थकबाकी असेल तर अर्जदारांनी कमलाकर पांडे यांना पक्षकार करणे आवश्यक होते व या थकबाकीची रक्कम त्यांना मागता आली असती परंतु अर्जदाराने मागील कुठल्याही बाबींचा उल्लेख न करता सरळसरळ नविन कनेक्शन गैरअर्जदारांना मागीतलेले आहे त्या सर्व्हे नंबरवर आधीचा विद्युत पुरवठा गैरअर्जदार कंपनीने केलेला आहे तरी थकबाकीची रक्कम गैरअर्जदार त्याच नंबरवर वसुल करु शकतात शिवाय नवीन विद्युत पुरवठा देण्यासाठी त्यांना ही मागील थकबाकी बेबाक झाल्या शिवाय करता येणार नाही. गैरअर्जदारांनी आपल्या युक्तीवादात असे म्हटले आहे की, अर्जदार यांनी कमलाकर पांडे यांचेकडुन विकत घेतलेली शेत जमीन 1997 व 2000 रोजी फेरफार होऊन त्यांच्या नांवावर झाली असतांना त्यांनी आजपर्यंत गैरअर्जदाराकडे नवीन विद्युत पुरवठा मागीतलेली नाही. विक्रीखत पाहीले असता व अर्जदाराचा अर्ज पाहीले असता त्यामध्ये पाईपसह लाईन जमीन विकत घेतलेले स्पष्ट म्हटलेले आहे तेंव्हा जमीन भीजवनीची व बागायतीची आहे व आजपर्यंत अर्जदारांनी बागायती पिक कसे घेतले हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, कमलाकर विनायक पांडे यांचे नांवाने मिळालेला विद्युत पुरवठा आजही चालु आहे या म्हणण्याला पुष्टी मिळाते. अर्जदार जरी म्हणत असेल की, त्यांना नवीन विद्युत पुरवठा गैरअर्जदारांनी दिलेले आहे या त्यांच्या म्हणण्याला कुठलाही आधार किंवा पुरावा नाही, म्हणुन त्यांच्या म्हणण्याला ग्राहय धरता येत नाही. अर्जदारांना आधीच्या विद्युत पुरवठयासाठी आजपर्यंत बिल देण्यात आलेले आहे व 2003 पर्यंत ही बिले भरली गेलेली आहेत. 2003 नंतर आजपर्यंत त्यावर थकबाकी आहे. जमीन 1997 रोजी अर्जदाराने जरी विकत घेतली असले तरी 2003 पर्यंत ही बिले कोणी भरली त्यामुळे अर्जदाराने विद्युत कंपनीच्या नियमाप्रमाणे ही पुर्ण थकबाकी भरावीच लागेल. जर 1997 व 2000 पुर्वीची काही बाकी व काही बोजा खरेदीखतावर असेल तर अशा प्रकारची वसुली ही शेत विकणारे कमलाकर विनायक पांडे यांच्याकडुन अर्जदाराला वेगळा दावा दाखल करता येईल. गैरअर्जदारांनी अर्जदारांना पत्र लिहुन ही जुनी थकबाकी मागीतलेली आहे, त्यांनी केलेली कृती आम्ही योग्य ठरवीत आहोत. अर्जदार हे कमलाकर विनायक पांडे यांच्या नांवावर असलेल्या जुनाच विद्युत पुरवठा आजही वापरत आहेत असे दिसुन येते. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |