जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/52. प्रकरण दाखल दिनांक – 26/02/2009. प्रकरण निकाल दिनांक – 24/06/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. पूंजाजी पि. गोविंद कवाने वय, 50 वर्षे, धंदा शेती, रा.धानोरा (रुई) ता. हदगांव जि. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मार्फत उप अभिंयता,कार्यालय हदगांव ता. हदगांव जि. नांदेड. गैरअर्जदार 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मार्फत अधिक्षक अभिंयता, कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.सुनिल जाधव गैरअर्जदारा तर्फे - अड.विवेक नांदेडकर निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे गैरअर्जदार कंपनीचे लाभार्थी ग्राहक आहेत. त्यांचा ग्राहक क्र.560050000091 असा आहे. सदरील विज कनेक्शन अर्जदाराचे मयत काकाचे नांवाने आहे. परंतु तेच बिलाचा भरणा करीत असतात व कनेक्शनचा लाभ घेत आहेत. एकंञित कूटूंब असताना सदरील कनेक्शन हे शेत गट नंबर 293 यासाठी घेतलेले आहे. अर्जदार यांचे वारस म्हणून मुगाजी मुंजाजी कवाने यांचेकडून जमिन आलेली आहे. अर्जदाराने 2 ते 3 वेळा तोंडी गैरअर्जदार यांना विनंती केली की, कनेक्शन माझे नांवावर करुन दया परंतु त्यांनी तूम्ही बिल भरीत रहा असे सांगितले. दि.6.5.2008 रोजी दूपारी गणेशलाल मोहनलाल बलदवा यांचे शेत गट नंबर 292 मधून विदयूत वाहक तार गेलेली आहे. विदयूत वाहीनीतील दोषामूळे व तारांतील घर्षनामूळे आगीचे गोळे निर्माण होऊन गणेशलाल बलदवा यांच्या झोपडयावर व ऊसावर पडल्यामूळे त्यांचा ऊस जळत गेल्यामूळे सदरील आग शेजारी असलेले अर्जदार पुंजाजी गोविंद कवाने यांच्या शेत गट नंबर 293 मधील ऊसाला आग लागली व त्यामूळे त्यांचा एक हेक्अर जमिनीवरील ऊस जळून खाक झाला त्यामूळे त्यांचे रु.1,00,000/- चे नूकसान झाले. या बददल दि..6.5.2008 रोजी तक्रार केल्यावर पोलिसांनी गून्हा रजिस्ट्रर नंबर 07/08 दि.9.5.2008 रोजी नोंदविला. प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन जळालेल्या ऊसाचा पंचनामा केला. अर्जदार यांनी विदयूत निरीक्षक कार्यालय यांनाही कळविले त्यांनी त्यावर अभिप्राय दिला आहे. गैरअर्जदार यांचे कार्यालयात लेखी अर्ज देऊनही आजपर्यत जळालेल्या ऊसाची नूकसान भरपाई अर्जदारास न दिल्यामूळे अर्जदार ही तक्रार दाखल करावी लागली. यासाठी दि.9.1.2009 रोजी वकिलामार्फत नोंदणीकृत पोस्टाने नोटीसही पाठविली आहे. अर्जदाराची मागणी आहे की, ऊसा बददल नूकसान भरपाई म्हणून रु.1,25,000/- व त्यावर 12 टक्के व्याज त्यांना गैरअर्जदार यांचेकडून दयावे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराला तक्रार दाखल करण्यास कायदेशीर अधिकार नाही. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक नाही. म्हणून केलेली तक्रार खारीज करावी. अर्जदाराने मा. मंचासमोर महत्वाची माहीती लपवून ठेवली. अर्जदार हे लाभार्थी आहेत हे म्हणणे खोटे आहे. ग्राहक क्र.560050000091 हे त्यांचे नांवाने आहे हे सर्वस्वी खोटे आहे. सदरील कनेक्शन हे अर्जदाराच्या मयत काकांचे नांवाने आहे. यांचा अर्थ अर्जदारांशी कोणताही संबंध नाही. अर्जदार हे बिल भरतात व कनेक्शनचा लाभ घेतात हे म्हणणे खोटे आहे व त्यांचे एकञित कूटूंब आहे हे ही म्हणणे खोटे आहे.अर्जदाराने गैरअर्जदारांना कनेक्शन त्यांचे नांवावर करुन दया असे म्हटल्यावर, बील भरीत रहा हे सांगितले हे म्हणणे खोटे आहे. हदगांव येथे उप अभिंयता या दर्जाचे पद नाही. त्यामूळे तशी विनंती अर्जदाराने केली त्यांचा प्रश्न उदभवत नाही. दि.6.5.2008 रोजी गणेशलाल बलदवा यांचे शेत गट नंबर 292 मधून विदयूत वाहक तार गेलेली आहे हे म्हणणे खोटे आहे. त्यांचे शेतीला आग लागली हे ही म्हणणे खोटे आहे. मंडळ अधिकारी हदगांव यांनी दि.1.5.2008 रोजी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. गट नंबर 293 चा पंचनामा केला यांची माहीती गैरअर्जदार यांना नाही. विदयूत निरीक्षक यांनी अभिप्राय यामध्ये गैरअर्जदार यांचा दोष नाही. ऊस हे असे पिक आहे ते पूर्णतः कधीही जळून जात नाही. जळालेला ऊस देखील कारखाना विकत घेतो व त्यांचा मोबदला ही देतो. अर्जदार यांचा अर्ज खोटा असून तो खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदारह हे ग्राहक होतात काय ? नाही. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात सूरुवातीसच गट नंबर 293 मध्हये 2 हेक्टर 98आर ही जमिन त्यांना वारस म्हणून त्यांचे काकाकडून म्हणजे मुगाजी मुंजाजी कवाने यांचेकडून आलेली आहे असे म्हटले आहे. परंतु 7/12 चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, जमिन अजूनही अर्जदाराचे काका मुगाजी मुंजाजी कवाने यांचे नांवानेच आहे व विजेचे बिल पाहिले असता यामध्ये ग्राहक क्र.560050000091 हे मुगाजी मुंजाजी कवाने यांचे नावांनेच आहे. यांचा अर्थ 7/12 व विज बिल हे अर्जदार यांचे काकाचेच नांवाने अजूनही आहे. संरपंचाने दिलेले वारसा हक्क प्रमाणपञ यावर मुंगाजी मुंजाजी कवाने रा. धानोरा यांचा मृत्यू दि.26.8.1996 झालेला असून त्यांना अपत्य नाही. त्यामूळे त्यांचे वारसदार म्हणुन पुंजाजी गोविंद कवाने हे आहे असे म्हटले आहे परंतु या वारसा प्रमाणपञावर संरपंच व ग्रामसेवक यांनी कोणत्या तारखेला प्रमाणपञ दिले यांचा उल्लेख केलेला नाही. त्यामूळे हे प्रमाणपञ कार्यालयात नोंदणी करुन दिले का वरचेवर दिले या बददल संशय निर्माण होतो. तसेच 1998पासून आजपर्यत अर्जदारने 7/12 ला त्यांचे नांवाने जमिन का करुन घेतली नाही तसेच विजेचे बिल ही त्यांचे नांवाने का करुन घेण्यात आले नाही या बददलचा संशयास्पद प्रश्न शिल्लक राहतो. त्यांला त्यांनी समर्पक उत्तर दिलेले नाही. मग आता ऊस जळाल्यानंतर या गोष्टीची गरज त्यांना पडली असावी. त्यामूळे उपलब्ध पूरावा हे पूरेसे नाहीत व सबळ पुराव्यानुसार अर्जदार हे ग्राहक ही होत नाहीत. त्यामूळे ग्राहक संरक्षण कायदा,1986 कलम 2(1)(ड) नुसार अर्जदार हे ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात असे स्पष्ट म्हटले आहे की, त्यांचे बाजूचे शेत गट नंबर 292 जे की गणेशलाल बलदावा यांचे नांवाने आहे व त्यांचे शेतातून विज वाहीनीच्या दोषामूळे घर्षन होऊन आगीचे गोळे निर्माण होऊन झोपडी व ऊसाला आग लागली व ती आग अर्जदाराच्या बाजूच्या शेतात लागली व त्यांचाही ऊस जळाला. गैरअर्जदार यांचे विजेच्या तारा या अर्जदार यांचे शेतावरुन गेलेल्या आहेत हे स्पष्ट आहे व अर्जदाराच्या शेताला आग जरी लागली असली तरी ती बाजूच्या शेतामूळे लागलेली आहे. गैरअर्जदार विज कंपनी ही त्यांची चूक असेल तर त्यांचे ग्राहकास नूकसान भरपाई देते. या प्रकरणात अर्जदार यांचे शेत हे बाजूस आहे व ते गैरअर्जदार कंपनीचे ग्राहक ही नाहीत. म्हणून त्यांना नूकसान भरपाई मिळणार नाही. नूकसान भरपाई न दिल्या कारणाने गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी होणार नाही. अर्जदारांनी आग लागल्या बददलचा पोलिस पंचनामा, एफ.आय.आर., विदयूत निरिक्षकचा अहवाल, तलाठयाचा अहवाल इत्यादी कागदपञ दाखल केलेली असली तरी ते आता बघण्याची आवश्यकता नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |