जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १००/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २६/०६/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २८/०१/२०१४
वसंतीबाई मदनलाल शर्मा
वय – ७० वर्षे, धंदा – काहीनाही
राहणार – के ५१/६, चंपाबाग, ता.जि.धुळे-०१
संपर्क क्र.९२२६६९९७९६० ................ तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या.,
म.उप कार्यकारी अभियंता सो.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या.,
उपविभाग, साक्री रोड ता.जि. धुळे ............ सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.किरणकुमार लोहार)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.वाय.एल. जाधव)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
१. सामनेवाला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तक्रारदार यांना अवाजवी बिल देवून सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत दाखल केलीआहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी सामनेवाला (महावितरण) यांचेकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक ०८००१०२५१३४० आहे. तक्रारदार यांनी वीज आकार देयकाप्रमाणे नियमित विज बिलांचा भरणा केलेला आहे.
३. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे ओ की, सामनेवाला यांनी एप्रिल २०१० मध्ये तक्रारदारचे जुने मीटर काढून त्याऐवजी नवीन मीटर बसवले. त्यानंतर जुलै, ऑगस्ट मध्ये मिटरमध्ये बिघाड झाल्याने ते सदोष रिडींग दाखवत असल्याचे दिसून आलेने त्यांनी सामनेवाला यांना माहिती दिली असता, सामनेवाला यांचे कर्मचारी यांनी तक्रारदार यांचेकडे येवून तशी खात्री केली, परंतु नवीन मिटर शिल्लक नसल्याचे सांगून नविन मिटर लावेपावेतो. तक्रारदारकडील विजेचा वापर, बिलांच्या आधारे सरासरी युनिट वापरनुसार वीज बिल देयके अदा होतील असे सांगितले. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी मिटर रिडींग फॉल्टी नमूद करून युनिट वापर १०२ प्रमाणे विज देयके दिली. तक्रारदारने नविन दुरूस्त मिटर बसवून देण्यासाठी वेळोवेळी विनंती करूनही सामनेवाला यांनी त्याची दखल घेतली नाही.
४. त्यानंतर सामनेवाला यांनी एप्रिल २०१२ चे वीज बिल देयकात युनिट वापर ४६२९ नमूद करून अंतीम मुदतीत रू.४९,३४०/- चे विज बिल अदा केलेले आहे. सदरचे जास्तीचे, जाचक व अन्यायकारक आणि बेकायदेशिर विज बिल रद्द होवून मिळावे यासाठी तक्रारदारने सामनेवाला यांचेकडे दि.१६/०५/२०१२ रोजी लेखी अर्ज देवूनही सामनेवाला यांनी त्याची दखल घेतलेली नाही. याउलट अन्यायकारक रक्कम वसुलीसाठी तक्रारदारचे विरूध्द कार्यवाही करत आहेत. सामनेवाला यांच्या वागणुकीमुळे तक्रारदारला मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचे नुकसानभरपाईसाठी रू.२५,०००/- ची त्यांनी मागणी केली आहे.
५. तक्रारदार यांनी शेवटी सामनेवाला यांनी दिलेले एप्रिल-१२ चे वीज बिल देयक रद्द व्हावे. तक्रारदारला नवीन दुरूस्त वीज बिल देयक देण्यात यावे. मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रू.२५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
६. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्ठयार्थ नि.२ वर शपथपत्र, तसेच नि.४ वरील यादीसोबत नि.४/१ वर मार्च २०१२ चे वीज बिल, नि.४/२ वर एप्रिल २०१२ चे वीज बिल, नि.४/३ वर तक्रार अर्ज, नि.४/४ वर वीज कंपनीचे Acknowledge, नि.१०/१ वर मे २०१२ चे वीज बिल, नि.१०/२ वर वीज कंपनीचे Acknowledge, नि.१०/३ वर तक्रार अर्ज, नि.१०/४ वर जून-१२ चे वीज बिल, नि.१०/५ वर तक्रार अर्ज, नि.१०/६ वर वीज कंपनीचे Acknowledge, नि.१०/७ वर सामनेवाला यांची नोटीस, नि.१७/२ वर सामनेवाला यांचे पत्र, नि.१७/३ वर फेब्रुवारी २०१३ चे वीज बिल, नि.२०/१ वर जुलै २०१२ चे वीज बिल, नि.२०/२ वर तक्रार अर्ज, नि.२०/३ वर व नि.२०/४ वर सामनेवाला यांचे Acknowledge, नि.२०/५, नि.२०/८, नि.२०/११, नि.२०/१८, नि.२०/२० वर तक्रारी अर्ज, नि.२०/६, नि.२०/७, नि.२०/९, नि.२०/१९, नि.२०/२१, नि.२०/२२ वर सामनेवाला यांचे Acknowledge, नि.२०/१० वर जानेवारी २०१३ चे वीज बिल, नि.२०/१२ वर सुधारित बिल, नि.२०/१३ वर व नि.२०/१४ वर सामनेवाला यांचे पत्र, नि.२०/१५ वर फेब्रुवारी-१३ चे वीज बिल, नि.२०/१६ वर सामनेवाला यांची नोटीस, नि.२०/१७ वर सप्टेंबर २०१२ चे वीज बिल, नि.२०/२३ वर मीटर तपासणी अहवाल, नि.२०/२४ वर वीज बिल, नि.२०/२५ वर पैसे भरल्याची पावती, नि.२०/२६ वर मार्च २०१३ चे वीज बिल, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
७. सामनेवाला महावितरणने आपला खुलासा नि.१३ वर दाखल करून तक्रारदारची तक्रार खोटी, चुकीची व बेकायदेशीर असून तक्रारीस अधिकार क्षेत्राची बाधा येत आहे. म्हणून ती रद्द होणेस पात्र आहे. असे म्हटले आहे.
८. महावितरणचे पुढे असे म्हणणे आहे की, मीटरवरील वाचनच न घेता आल्याने वादातील कालावधीचे अॅव्हरेजबिल अदा करण्यात आले. वाचन उपलब्ध होताच बिल झालेले अॅव्हरेज वाचन वजा केले व दरमहाचे रिडींग प्रस्तुत टेरिफप्रमाणे बिल देण्यात आले ते योग्य व बरोबर आहे. दंडात्मक कारवाई म्हणून बिल नसून कालावधीत वीज वापराचेच बिल दिलेले आहे. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करावी अशी विनंती केली आहे.
९. तक्रारदार यांची तक्रार, महावितरणाचा खुलासा व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता व युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे का ? होय
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास
पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे
३. आदेश काय ? खालीलप्रमाणे
विवेचन
१०. मुद्दा क्र.१ - तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी महावितरणाकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे व त्याची बिले ते वेळोवेळी भरत आहेत. सामनेवाला यांनी एप्रिल २०१० मध्ये तक्रारदारचे जुने मिटर काढून त्याऐवजी नवीन मिटर बसवले. त्यानंतर जुलै, ऑगस्ट मध्ये मिटरमध्ये बिघाड झाल्याने सदोष रिडींग दाखवत असल्याचे दिसून आल्याने तक्रारदारने सामनेवाला यांना माहिती दिली. सामनेवाला यांचे कर्मचारी यांनी खात्री केल्यानंतर नवीन मिटर शिल्लक नसल्याचे सांगून नवीन मिटर लावेपावेतो तक्रारदारचा वीज वापर व बिलांच्या आधारे सरासरी युनिट वापरनुसार वीज बिल देयके अदा होतील असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी मिटर रिडींग फॉल्टी नमुद करून युनिट वापर १०२ प्रमाणे वीज देयके दिली. त्यानंतर एप्रिल २०१२ चे वीज बिल देयकात युनिट वापर ४६२९ नमूद करून रू.४९,३४०/- चे वीज बिल रद्द होवून मिळावे यासाठी तक्रारदारने दि.१६/०५/२०१२ रोजी लेखी अर्ज दिला असता सामनेवाला यांनी त्याची दखल घेतली नाही. दरम्यानचे काळातही तक्रारदारने वेळोवेळी मिटर बदलवून देण्यासाठी विनंती करूनही सामनेवाला यांनी त्याची दखल घेतलेली नाही. यावर सामनेवाला यांनी मिटर वाचनच न घेता आल्याने अॅव्हरेज बिल अदा करण्यात आले. तद्नंतर वाचन उपलब्ध होताच बिल झालेले अॅव्हरेज वाचन वजा केले व दरमहाचे रिडींग टेरिफप्रमाणे बिल दिलेले आहे व ते योग्य आहे. असा खुलासा केलेला आहे.
११. या संदर्भात तक्रारदारने दाखल केलेली वीज बिले पाहणे आवश्यक ठरते. नि.४/२ वर एप्रिल २०१२ चे बिल दाखल आहे. त्यात मागिल रिडींग ६११ आणि चालू रिडींग ५२४० दर्शवून एकूण वीज वापर ४६२९ दर्शवून बिल रू. ४८,३८०/- चे देण्यात आले आहे. तसेच नि.४/१ वर मार्च २०१२ चे बिल दाखल आहे. त्यात मागील रिडींग ६११ आणि चालू रिडींग फॉल्टी दर्शवून एकूण वीज वापर १०२ युनिट दर्शवून रू.४६०/- चे बिल देण्यात आले आहे. त्यानंतर नि.१०/१ वर मे-१२ चे बिल दाखल आहे. त्यात मागील रिडींग ५२४० आणि चालू रिंडींग फॉल्टी दर्शवून एकूण वीज वापर ८७० दर्शवून रू.५६,२१०/- चे बील देण्यात आलेले आहे.
१२. एप्रिल २०१२ चे बिल पाहता तक्रारदार यांचा मागील विजेचा सरासरी वापर पाहिला असता, तो एप्रिल २०११ ते मार्च २०१२ च्या दरम्यान १०२ युनिट असल्याचे दिसून येते व मिटर फॉल्टी असल्याचेही मार्च २०१२ चे बिलात व त्यानंतर मे २०१२ चेही बिलात नमूद आहे. असे असतांना सुध्दा सामनेवाला यांनी एप्रिल २०१२ चे बिलात चालू रिडींग ५२४० दर्शविलेले आहे. तसेच तक्रारदारने दाखल केलेले कागदपत्रे पाहता त्यांनी वारंवार सामनेवाला यांना तक्रारी अर्ज पाठवून सदर मिटर टेस्टिंग करून मिळावे किंवा बदलवून मिळावे यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचे दिसून येते. तक्रारदार यांचे सर्व तक्रारी अर्ज सामनेवाला यांना प्राप्त झाल्याबाबतचा अहवालही तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे. तसेच त्यांनी नि.२०/२३ वर दि.२१/०२/२०१३ चा मिटर तपासणी अहवाल दाखल केलेला आहे. सदर अहवालातही मिटर हे फॉल्टी असल्याचे नमूद केले आहे. अश्या परिस्थितीत सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे मिटर बदलवून देणे आवश्यक असतांनासुध्दा त्यांनी एप्रिल २०१२ चे बिलात अचानक चालू रिडींग ५२४० चे दर्शवून एकूण वीज वापर ४६२९ दर्शवून रू.४८,३८०/- चे बिल दिलेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी महावितरणकडे दि.१६/०५/२०१२ रोजी बिल दुरूस्तीसाठी अर्ज दिल्यानंतरही सदर मिटर फॉल्टी असल्याचे माहित असूनही त्यांचे बिलात दुरूस्ती करून न देवून सेवेत त्रुटी केली आहे. या मतास आम्ही आलो आहोत म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१३. मुद्दा क्र.२ – तक्रारदार यांनी सामनेवाला महावितरणाने अदा केलेले एप्रिल २०१२ चे वीज बिल देयक रद्द व्हावे. त्याऐवजी नवीन दुरूस्त वीज बिल देयक दयावे आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रू.२५,०००/- अदा करावेत आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.५,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. परंतु सामनेवाला महावितरणाने तक्रारदार यांना एप्रिल २०१२ चे बिल दुरूस्त करून त्या ऐवजी तक्रारदारास पुर्वीच्या सरासरी वीजेचा वापर १०२ प्रमाणे बिल दयावे. तसेच तक्रारदार यांनी बिलापोटी भरलेली रक्कम पुढील बिलात समायोजित करावी. तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या कृतीने मानसिक त्रास झाला व खर्चही करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रू.१,०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.५००/- द्यावेत असा आदेश करणे आम्हांस योग्य व न्यायाचे वाटते.
१४. मुद्दा क्र.३ – वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहेात.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला महावितरणने तक्रारदार यांना एप्रिल २०१२ चे बिल दुरूस्त करून त्याऐवजी पुर्वीच्या वापराच्या सरासरी वीजेचा वापर १०२ युनिट चे बिल या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत द्यावे.
३. सामनवेाला महावितरणने तक्रारदार यांनी बिलापोटी भरलेली रक्कम पुढील बिलात समायोजित करावी.
४. सामनेवाला महावितरणने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रककम रू.१०००/- व तक्रारीचा खर्च रक्कम रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसांचे आत द्यावेत.
धुळे.
दि.२८/०१/२०१४
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी) सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.