निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) वीज वितरण कंपनीने चुकीचे देयक देऊन त्रुटीची सेवा दिली या आरोपावरुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून मीटर क्रमांक 9000062684 द्वारे वीज जोडणी घेतलेली होती. त्याचे सदर मिटर बंद पडल्यामुळे ते दिनांक 11/8/2008 रोजी बदलण्यात आले आणि त्या ठिकाणी नवीन मिटर क्रमांक 90000959106 हे बसविण्यात आले. जुने मीटर काढले त्यावेळी त्यामधील शेवटची रिडींग 969 अशी होती आणि त्यास त्या मीटरबद्दल वीज वितरण कंपनीने दिलेले शेवटचे देयक दिनांक 18/9/2008 हे फक्त रु 119.35 चे होते. त्यावेळी वीज वितरण कंपनीकडे त्याची काही रक्कम बाकी होती म्हणून त्या देयकाची रक्कम वजा करता वीज वितरण कंपनीकडे त्याचे रु 140/- शिल्लक होते. नवीन मिटर बसविल्यानंतर सप्टेबर 2008 मध्ये वीज वितरण कंपनीने त्यास रु 3995.83 इतक्या रकमेचे देयक दिले. सदर देयकामध्ये वीज वितरण कंपनीने मागील मिटरमधील 1000 युनीट समायोजीत करण्यात आल्याचे सांगितले. वास्तविक जुने मिटरमधील रिडींग 969 अशी होती. परंतु विज वितरण कंपनीने 1000 युनीट कशाच्या आधारे समायोजीत केले याचा खुलासा केला नाही. त्याबाबत त्याने वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली. परंतु वीज वितरण कंपनीने त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून त्याने अशी मागणी केली आहे की, वीज वितरण कंपनीने त्यास सप्टेबर 2008 मध्ये दिलेले देयक रक्कम रु 3995.83 हे रद्द करावे. तसेच पुढील कालावधीमध्ये दर्शवलेल्या व्याजाचा भुर्दंड त्याच्या कडून वसुल करु नये आणि भरणा केलेले देयक त्यास वीज वितरण कंपनीकडून परत मिळावे आणि नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांनी हे मान्य केले आहे की, तक्रारदाराचे मिटर क्रमांक 9000062684 हे ऑगष्ट 2008 मध्ये बदलून तक्रारदाराला मीटर क्रमांक 76/00959106 हे देण्यात आले होते. तक्रारदाराच्या जुन्या मीटरमधील शेवटची रिडींग 969 होती आणि तक्रारदाराला सप्टेबर 2008 मध्ये 3995.83 चे देण्यात आले होते. तक्रारदाराच्या जुन्या मिटर संदर्भातील अहवाल आल्यानंतर त्या मीटरमधील शेवटच्या रिडींगनुसार रक्कम रु 3995.83 चे देयक देण्यात आले होते. तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य नसल्यामुळे तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्हीही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला होय. सप्टेबर 2008 मध्ये दिलेले देयक रु 3853.49 चुकीचे व अयोग्य आहे काय? 2. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी होय आहे काय? 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदाराने स्वत: युक्तिवाद केला. गैरअर्जदाराच्या वतीने अड आर.टी.दुसाने यांनी युक्तिवाद केला. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला ऑगष्ट 2008 पूर्वी मिटर क्रमांक 9000062684 द्वारे वीज पुरवठा दिला होता. सदर मिटर ऑगष्ट 2008 मध्ये बदलण्यात आले त्यावेळी त्या मीटरमधील शेवटची रिडींग 969 होती ही बाब गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने मान्य केलेली असून वीज वितरण कंपनीने दाखल केलेले मिटर बदली फॉर्ममध्ये देखील तक्रारदाराच्या जुन्या मिटरमधील रिडींग 969 असल्याचे स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराचे जुने मिटर ऑगष्ट 2008 मध्ये बदलून त्याठिकाणी नवीन मिटर बसविण्यात आले . सप्टेबर 2008 मध्ये वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला नविन मिटरमधील रिडीग नुसारच देयक देणे आवश्यक होते त्यानुसार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा सप्टेबर 2008 मधील वीज वापर 96 युनीट दर्शवला परंतु वीज वितरण कंपनीने 1000 युनीट मागील मिटरमधील समायोजीत केल्याचे दर्शविले ही बाब वीज वितरण कंपनीने दाखल केलेले सीपीएल निशानी क्र वरुन दिसून येते. वीज वितरण कंपनीने जुन्या मीटरमधील 1000 युनीट समायोजीत करण्यबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. सदर 1000 युनीट कशामुळे दर्शविले याचा काही खुलासा विज वितरण कंपनीने केलेला नाही. तक्रारदाराच्या जुन्या मिटरमधील शेवटची रिडींग 969 असताना सप्टेबर 2008 मध्ये 1000 युनीट समायोजी करण्याचे काय कारण आहे याचा काहीही खुलासा वीज वितरण कंपनीने केलेला नाही आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरुन सदर 1000 युनीट कशा पध्दतीने आले याचा काहीही बोध होत नाही. अशा प्रकारे कोणताही खुलासा न करता 1000 युनीट वीज वपर दर्शवून त्याचे समायोजन करणे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरत नाही. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने सप्टेबर 2008 मध्ये 1000 युनीट निश्चितपणे चुकीच्या पध्दतीने समायोजीत केलेले आहेत आणि त्यामुळे वीज वितरण कंपनीला तक्रारदाराकडून त्या 1000 युनीट बद्दल कोणतीही रक्कम वसुल करण्याचा अधिकार नाही. म्हणून वीज वितरण कंपनीने सप्टेबर 2008 मध्ये तक्रारदाराला दिलेले 1096 युनीट वीज वापराबद्दलचे देयक त्यापैकी 1000 युनीटच्या हद्दीपर्यंत रद्द करणे योग्य ठरते. म्हणून गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला त्या 1000 युनीटच्या अनुषंगाने मागितलेली रक्कम मागणे योग्य ठरणार नाही. तसेच त्यापुढील कालावधीमध्ये वीज वितरण कंपनीने त्या 1000 युनीटच्या अनुषंगाने र्दाविलेली थकबाकी व त्यावरील व्याज देखील वीज वितरण कंपनीला मागण्याचा अधिकार नाही असे आमचे मत असून वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला निश्चितपणे चुकीचे देयक देऊन त्रुटीची सेवा दिलेली आहे. म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला (ग्राहक क्रमांक 490011510296) सप्टेबर 2008 मध्ये दिलेले रक्कम रु 3853.49 चे देयक रद्द करण्यात येते. वीज वितरण कंपनीने सप्टेबर 2008 मध्ये तक्रारदाराला केवळ 96 युनीट वीज वापराचे देयक द्यावे आणि सप्टेबर 2008 मध्ये अतिरिक्त 1000 युनीट वीज वापराबद्दल आकारलेली रक्कम त्याच्या देयकामधून वजा करुन त्या रकमेच्या अनुषंगाने पुढील कालावधीमध्ये दर्शविलेली थकबाकी व त्यावरील व्याज आणि इतर खर्च देखील हा आदेश कळाल्यापासून एक महिन्याच्या आत कमी करुन त्यास सुधारीत देयक द्यावे.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला त्रुटीची सेवा, मानसिक त्रास आणि तक्रारीच्या खर्चापोटी एकूण रु 3000/- द्यावेत किंवा सदर रक्कम त्याच्या देयकामध्ये निकाल कळाल्यापासून 1 महिन्याच्या आत समायोजीत करावी.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष युएनके
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |