निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 11/12/2012
तक्रार नोदणी दिनांकः-27/12/2012
तक्रार निकाल दिनांकः- 13/09/2013
कालावधी 08 महिने. 17 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
लक्ष्मण सखाराम आरबाड. अर्जदार
वय 70 वर्षे. व्यवसाय.निरंक. अॅड.जी.बी.भालेराव.
रा.धर्मापुरी.ता.जि.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
मंडळ कार्यालय, जिंतूर रोड,परभणी.
2 कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.
मंडळ कार्यालय,( ग्रामीण) जिंतूर रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे अवाजवी बिल देवुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा मौजे.धर्मापुरी ता.जि. परभणी येथील रहिवासी असून त्याने गैरअर्जदाराकडून घरवापरासाठी विद्युत पुरवठा घेतला, ज्याचा ग्राहक क्रमांक 534270395362 असा आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे घर हे खुप लहान आहे, त्यामुळे विज वापर खुपच कमी होतो.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, जुलै 2012 चे 86 युनिट ऑगस्ट 2012 चे 41 युनिट, सप्टेंबर 2012 चे 40 युनिटचे बिल त्यास आले, परंतु ऑक्टोबर 2012 रोजी अर्जदारास अचानक 2987 युनिटचे 35,869/- रु.चे बिल आले. सदरचे बिल चुकीचे असलेणे अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 16/11/2012 रोजी लेखी तक्रार अर्ज दिला व सदरील 35,869/- चे बिल रद्द करावे अशी विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने त्यावर काहीही कार्यवाही केली नाही. याउलट गैरअर्जदाराने अर्जदारास जर सदरचे लाईट बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली, म्हणून अर्जदारास गैरअर्जदारा विरुध्द सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर होवून गैरअर्जदाराने अर्जदारास ऑक्टोबर 2012 चे 35,869/- चे दिलेले लाईट बील रद् करण्यात यावे व गैरअर्जदारास असा आदेश करावा की, त्याने अर्जदाराच्या मीटरची प्रत्यक्ष रिडींग घेवुन त्यास दुरुस्तीचे विज देयके देण्यात यावेत, व तसेच आता पर्यंत वापरलेल्या युनिटची सरासरी काढून व्याज न आकारता ऑक्टोबर या महिन्याचे नविन दुरुस्त बील देण्यात यावे व मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश देण्यात यावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 3 कागदपत्रांच्या यादीसह 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये ऑक्टोबर 2012 चे Disputed Bill, अर्जदाराने गैरअर्जदारास बिल दुरुस्ती बाबतचा अर्ज, सी.पी.एल. इ. कागदपत्रे दाखल केले आहेत.
गैरअर्जदारांना लेखी जबाब दाखल करणेसाठी मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, परंतु त्यांना अनेक संधी देवुनही
मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विना जबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास माहे ऑक्टोबर 2012 चे 35,869/- रुपये
(2987 युनिटचे) रिडींग न घेता बिल देवुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/1 वरील लाईट बिलावरुन सिध्द होते.गैरअर्जदाराने अर्जदारास माहे ऑक्टोबर 2012 चे बील 2987 युनिट रु. 35,869/- चे बील दिले होते हे नि.क्रमांक 4/1 वरील दाखल केलेल्या बिला वरुन सिध्द होते. सदरच्या बिलाचे निट अवलोकन केले असता असे सिध्द होते की, डिसेंबर 2011 पासून सप्टेंबर 2012 पर्यंत प्रतिमहा विजेचा वापर सरासरी 40 ते 50 युनीटच्या आसपास आहे जेंव्हा की, ऑक्टोबर 2012 ला दिलेले बिल 2987 युनीटचे आहे जे की, मंचास अयोग्य वाटते. कारण एकाच महिन्यात एवढा विजेचा वापर घरासाठी होवु शकतो हे मंचास योग्य वाटत नाही. सदरचे बील हे रिडींग न घेताच गैरअर्जदाराने अर्जदारास दिले असे दिसते, म्हणून सदरचे अर्जदाराचे म्हणणे की, सदरचे ऑक्टोबर 2012 चे बिल रद्द करावे हे मंचास योग्य वाटते.व तसेच गैरअर्जदारास संधी देवुनही आपला लेखी जबाब दाखल केला नाही, यावरुन असे दिसते की, त्यांनी तक्रार अर्ज अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास रिडींग न घेताच ऑक्टोबर 2012 चे बील देवुन सेवेत त्रुटी दिली आहे.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले ऑक्टोबर 2012 चे बील रद्द करण्यात येत आहे.
3 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराच्या मिटरचे
त्याचे समक्ष फोटोसहीत पूढील दोन महिने विज वापराचे प्रत्यक्ष रिडींग घेवुन
त्याची प्रतिमाह सरासरी काढून जे बील येते ते बील माहे ऑक्टोबर 2012 साठी
कोणताही दंड व्याज न आकारता द्यावे.
4 याखेरीज गैरअर्जदाराने अर्जदारास तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- फक्त
(अक्षरी रु. दोनहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर मा.सदस्य. मा.अध्यक्ष.