(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. प्र. अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 31 मे, 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडे मौजा – पारशिवनी येथील नगर भुमापन क्रमांक 302 ची तात्काळ हद्द कायम मोजणीकरीता दिनांक 12.12.2013 रोजी मोजणीची रक्कम रुपये 2,000/- विरुध्दपक्ष यांचे कार्यालयात भरली. त्याअनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी प्रत्यक्षात मोक्यावर हजर असलेले शंकरराव राजेराम वंजारी यांचेसमक्ष सिमांकन करुन दिले नाही. तसेच, प्रत्यक्षात मोक्यावर येऊन नगर भुमापन क्रमांक 302 चे चुकीची मोजणी व चुकीची ‘क’ प्रत तयार केली व त्यामध्ये चुकीच्या टिपा नमूद केल्या. वास्तविक, विरुध्दपक्ष क्र.1 ने तयार केलेली ‘क’ प्रत विरुध्दपक्ष क्र.2 यांनी प्रत्यक्षात मोक्यावर येऊन सिमांकन केले नाही व चुकीची ‘क’ प्रत तयार केली.
3. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, विरुध्दपक्ष क्र.2 व विरुध्दपक्ष क्र. 3 यांचे सहकारी यांनी ‘क’ प्रतीवर स्वाक्षरी केली आहे, त्यांच्या दबावात येवून 3 ते 4 फुट जागा आतमध्ये घेऊन विरुध्दपक्ष क्र.3 ला गोटे गाडण्यास सांगितले, तेंव्हा शंकरराव राजेराम वंजारी मोक्यावर हजर होते त्यामुळे सदरची मोजणी ही तक्रारकर्त्याला मान्य नव्हती. त्यासंबंधी तक्रारकर्त्याने दिनांक 24.1.2014 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे कर्यालयात सुध्दा केली, त्यावर कोणतेही उत्तर विरुध्दपक्षाने दिले नाही. त्यामुळे दिनांक 14.1.2015 रोजी अधिक्षक भुमी अभिलेख नागपूर यांचेकडे सुध्दा अर्ज केला आहे. तक्रारकर्त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिनांक 3.3.2015 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना कायदेशिर नोटीस पाठविला, परंतु त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही. सरतेशेवटी, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करावे की, त्यांनी तक्रारकर्त्याची मौजा – पारशिवनी येथील नगर भुमापन क्रमांक 302 या जागेचे प्रत्यक्षात मोक्यावर येऊन अचुक सिमांकन करुन द्यावे.
2) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात यावे की, त्यांनी तक्रारकर्त्याला चुकीची तयार केलेली ‘क’ प्रत दुरुस्त करुन विनामुल्य द्यावी.
3) तसेच, तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- देण्याचे आदेशीत व्हावे व तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 10,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना तक्रारीला उत्तर देण्याकरीता ब-याचशा संधी देऊनही त्यांनी मुळ तक्रारीला लेखीउत्तर सादर केले नाही, करीता मंचाने दिनांक 20.1.2016 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 च्या उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा निशाणी क्र.1 वर आदेश पारीत केला.
5. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी तक्रारीला लेखीउत्तर दाखल करुन त्याने आपल्या उत्तरात असे नमूद केले की, तक्रारकर्ता नगर भुमापन क्रमांक 302 या भूखंडाचा मालक नाही व तसा पुरावा अभिलेखावर आणला नाही. भूखंड क्रमांक 302 या भूखंडाच्या उत्तरेस भुमापन क्र.298 असून भुमापन क्र.398 नसल्याचे सत्यप्रतीलिपी दिनांक 25.9.2003 वरुन दिसून येते. तसेच, तक्रारकर्त्याची तक्रार ही खोटी व दिशाभूल करणारी असल्यामुळे तक्रारकर्त्याने लावलेले आरोप की, विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांचे सहकारी यांनी ‘क’ प्रतीवर सह्या केल्या आहेत त्यांचे दबावात येऊन 3 ते 4 फुट जागा आतमध्ये घेऊन विरुध्दपक्ष क्र.3 ला गोटे गाडण्यास सांगितले. विरुध्दपक्ष क्र.3 पुढे असे नमूद करतो की, मौजा – पारशिवनी, जिल्हा – नागपुर येथील शिट क्र. 11 मधील भुमापन क्र. 303 हा पूर्वी श्रीमती कली उर्फ कलावती गिरडकर यांचे मालकीची होती. श्रीमती कली यांना संतान नसल्यामुळे त्यांनी स्वतःचे मालकीची विहीर सार्वजनिक वापराकरीता गावांतील लोकांना दान दिली होती. तसेच, श्रीमती कली यांनी तिचे जिवंतपणी भुमापन क्र.303 व त्यावरील तिचे राहाते घर पातीमाता देवस्थान यांना दान केले होते, त्यामुळे अर्जदार यांना सदर वादातील जागा वापरण्यास अडचणीचे जाऊ लागले व त्यामुळे अर्जदार यांनी पारशिवनी येथील कोर्टामध्ये दिवाणी दावा क्रमांक 07/2013 दाखल केला होता. सदर दाव्यामध्ये आम्हीं प्रतिवादी क्र.1 व 2 होतो. सदर दावा पक्षकारांचे समंतीने ‘महालोक अदालत’ मध्ये दिनांक 14.2.2015 रोजी ठेवण्यात आला होता व उभय पक्षात समझोता होऊन वाद संपुष्टात आला होता, तसेच भविष्यात वादी व प्रतिवादी कोणताही दावा करणार नाही असे ठरले होते. तरी सुध्दा, तक्रारकर्ता भुमापन क्रमांक 302, 303 यामधील जागेसंबंधी व त्यातील हद्द कायम करण्यासाठी वेळोवेळी इतर कार्यालयात जाऊन व तसेच विनाकारण दावा दाखल करुन विरुध्दपक्ष क्र.3 विरुध्द कार्यवाही करुन विरुध्दपक्ष क्र.3 ला विनाकारण त्रास देत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
6. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर 1 ते 18 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने पैसे भरल्याची पावती, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना दिलेला अर्ज, पोष्टाच्या पावत्या, ‘क’ प्रत, नकाशा, ग्रामपंचायतचे पत्र, आखीव पत्रिका, विरुध्दपक्ष यांना पाठविलेला कायदेशिर नोटीसची प्रत, व पोष्टाच्या पावत्या इत्यादी दस्ताऐवज दाखल केलेल्या आहेत. त्याबरोबर शंकरराव राजेराम वंजारी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन त्यावर दिनांक 12.1.2014 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 श्री पी.बी.निंदेकर यांनी तक्रारकर्त्याचे भुमापन क्र.302 चे व्यवस्थित मोजणी केली नाही व सिमांकन चुकीचे करुन जुन्या मोजणीचे दगडगोटे काढून 3 ते 4 फुट हलविल्याबाबत आपल्या शपथपत्रात सांगितले आहे.
7. सदर प्रकरणात मंचासमक्ष तक्रारकर्त्याचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्र.1, 2 व 3 यांचा मौखीक युक्तीवादासाठी पुकारा करण्यात आला, परंतु ते मंचात हजर झाले नाही व संधी मिळूनही मौखीक युक्तीवाद केला नाही. उभय पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून तक्रारकर्त्याला सेवेत ञुटी : होय
दिल्याचे दिसून येते काय ?
3) तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्र.3 चे ग्राहक होतात काय ? : नाही
4) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
8. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने त्याच्या स्वतःच्या मालकीची मौजा – पारशिवनी नगर भुमापन क्रमांक 302 याची मोजणी करण्याकरीता दिनांक 12.12.2013 रोजी रुपये 2,000/- मोजणी शुल्क भरुन मोजणी करीता अर्ज केला. परंतु, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचे भूखंडाची प्रत्यक्षात मोक्यावर येऊन सिमांकन केले नाही व चुकीचे सिमांकन ‘क’ प्रतवर दाखवून चुकीची ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला पुरविली, अशी तक्रार आहे.
9. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याकडून मोजणी शुल्क आकारले ही बाब तक्रारकर्त्याने दाखल पावत्यावरुन स्पष्ट होते. म्हणजेच तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चा ग्राहक आहे ही बाब स्पष्ट होते. तसेच, सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना ब-याचशा संधी देवूनही तक्रारीला उत्तर सादर केले नाही, करीता मंचाने त्यांचेविरुध्द बिनालेखी जबाबाचा आदेश दिनांक 20.1.2016 रोजी निशाणी क्र.1 वर पारीत केला. तसेच, विरुध्दपक्ष क्र.3 यांना प्रकरणात मुख्य पार्टी नसून औपचारीक प्रतिपक्ष (Formal ) आहे. तक्रारीचे स्वरुप पाहता तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र.3 यांचेमध्ये ग्राहक व सेवा पुरविणारी संस्था किंवा व्यक्ती असा दुवा जुळत नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.3 ला सदर प्रकरणातून मुक्त करण्यात येते व त्यांनी सदर प्रकरणात दाखल केलेले उत्तर हे विचारात घेता येणार नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी कोणतेही शुल्क न आकारता तक्रारकर्त्याच्या भूखंडाचे नगर भुमापन क्र.302 चे प्रत्यक्षात मोजणीकरुन अचुक सिमांकन करुन, तसेच सुधारीत ‘क’ प्रत करुन घेण्यास पात्र आहे, असे मंचाला वाटते. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याचेकडून कोणतेही शुल्क न आकारता भुमापन क्रमांक 302 याचे अचुक सिमांकन करुन ‘क’ प्रत मध्ये योग्य ती दुरुस्तीकरुन तक्रारकर्त्यास द्यावी.
(3) विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांना सदरच्या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(4) तसेच, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- द्यावे.
(5) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आदेशाची पुर्तता निकालपञाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 31/05/2017