::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
(पारित दिनांक-26 एप्रिल, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे विरुध्द दोषपूर्ण सेवे संबधाने दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्या तर्फे दाखल तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष डी.टी.डी.सी.कुरियर आणि कार्गो लिमिटेड या नावाने कुरीअरचा व्यवसाय करीत असून विरुध्दपक्ष क्रं-(1) तिचे मुख्य नोंदणीकृत कार्यालय आहे तर विरुध्दपक्ष क्रं-(2) नागपूर येथील शाखा कार्यालय आहे. विरुध्दपक्ष संबधित ग्राहकांना ट्रान्सपोर्टींग संबधाने अतिजलद सेवा प्रदान करतात. विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीने प्राईम टाईम प्लस-10:30 आणि प्राईम टाईम प्लस 12:00 या योजना सुरु करुन त्याव्दारे विहित मुदतीत पार्सल पोहचविण्याची हमी घेतली आहे. विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीची संडे प्राईम टाईम प्लस ही एक योजना सुध्दा आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याचे कुटूंबातील सदस्यां करीता चेन्नई (तामीलनाडू) ते नागपूर येथे रेल्वेने दिनांक-10/06/2012 रोजी प्रवास करण्याचे ठरविले, त्या करीता तक्रारकर्त्याने रेल्वेच्या तात्काळ योजने अंतर्गत दिनांक-09.06.2012 रोजी एकूण-07 तिकिटे एकूण किंमत रुपये-7,721/- मध्ये आरक्षीत केली. सदर प्रवास हा ग्रॅन्ड ट्रंक एक्सप्रेसने जी चेन्नई येथून दिनांक-10.06.2012 रोजी सायंकाळी 07 वाजून 15 मिनिटानी सुटणार होती. रेल्वेची तिकिटे ही नागपूर येथून आरक्षीत केली होती, जी चेन्नई येथील श्री टी.सुरेश यांचे नाव आणि पत्त्यावर विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयातून दिनांक-09.06.2012 रोजी पाठविली होती, ज्याचा नोंदणी क्रं-E-70426951 असा होता. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीचे कार्यरत कर्मचा-याला कळविले होते की, पाकीटा मध्ये नियोजित दिनांक-10.06.2012 रोजीची चेन्नई ते नागपूर या रेल्वे प्रवासाची आरक्षीत तिकिटे आहेत. त्यावेळी तक्रारकर्त्याने रविवार दिनांक-10.06.2012 रोजीचे सायंकाळी 5.00 वाजे पर्यंत सदरची तिकिटे चेन्नई येथे पोहचतील काय या बाबत विचारणा केली असता विरुध्दपक्षाचे कर्मचा-याने संडे प्राईम टाईम प्लस सर्व्हीस योजने अंतर्गत तिकिटाचे पार्सल पाठविण्यास सुचित केले, त्यानुसार तक्रारकर्त्याने दिनांक-09.06.2012 रोजी मेट्रो प्राईम टाईम प्लस 12.00 योजने अंतर्गत कुरीयरने पाठवावयाच्या पार्सलची नोंदणी केली व रुपये-325/- एवढे शुल्क दिले व पावती प्राप्त केली, विरुध्दपक्षाने त्या पावतीवर ट्रेन तिकिटे असल्या बाबत लिहून दिले परंतु त्या तिकिटाची किम्मत किती आहे हे त्याने विचारले नाही.
त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक-10.06.2012 रोजीचे दुपारी त्याचे चेन्नई येथील कुटूंबातील सदस्यां कडे रेल्वे आरक्षीत तिकिटांचे पार्सल मिळाले काय अशी विचारणा केली असता त्यांनी रेल्वे तिकिटाचे पार्सल मिळाले नसल्याचे सांगितले त्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे नागपूर येथील कार्यालयात दुपारी 04.00 वाजता भेट देऊन विचारणा केली असता तेथील राकेश नावाच्या कर्मचा-याने ते चेन्नई येथे पोहचले नसून ते सायंकाळी 5..00 वाजे पर्यंत पोहचण्याची शक्यता नसल्याचे सांगितले, त्यामुळे तक्रारकर्त्याने फॅक्सव्दारे आरक्षीत रेल्वे तिकिटांच्या प्रती त्याच्या कुटूंबियातील सदस्यांना पाठविल्यात. त्याचे कुटूंबियातील सदस्यां कडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी ग्रॅन्ट ट्रंक एक्सप्रेसने दिनांक-10.06.2012 रोजी चेन्नई ते नागपूर प्रवास फॅक्स प्रिंट असलेल्या तिकिटानी सुरु केला, त्यावेळी प्रवासा मध्ये टिकीट चेकरने मूळ रेल्वे तिकिटा नसल्यामुळे एकूण रुपये-7305/- दंड ठोठावला. तक्रारकर्त्याच्या कुटूंबियांच्या सदस्यां जवळ तात्काळ योजने अंतर्गत रेल्वे प्रवासाच्या कन्फर्म रेल्वे तिकिटे असताना विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीने मूळ तिकिटांचे पार्सल पोहचते न केल्याने त्यांना दंड भरावा लागला. जेंव्हा की विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीने विहित मुदतीचे आत रेल्वे तिकिटांचे पार्सल पोहचते करण्याची हमी दिली होती. तक्रारकर्त्याने या संबधात विरुध्दपक्षाचे नागपूर कार्यालयात दिनांक-11.06.2012 रोजी पत्र दिले. तक्रारकर्त्याने आरक्षीत रेल्वे तिकिटांचे पाठविलेले पार्सल हे रविवार दिनांक-10.06.2012 चे सायंकाळी 05.00 वाजे पर्यंत न पोहचता ते दुसरे दिवशी म्हणजे सोमवारी 11 जुन, 2012 रोजी चेन्नई येथे पोहचले, विरुध्दपक्षाचे सवेतील त्रृटीमुळे तक्रारकर्त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां कायदेशीर नोटीस पाठविली परंतु त्यांनी त्यास समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून त्याने तक्रार मंचा समक्ष दाखल करुन पुढील मागण्या केल्यात-
विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रेल्वेच्या तिकिटाचे शुल्क व दंड इत्यादीची रक्कम रुपये-15026/-, विरुध्दपक्षाने पार्सलपोटी आकारलेले शुल्क रुपये-325/- नोटीस शुल्क रुपये-5000/- तसेच मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- असे मिळून एकूण रुपये-40,351/- दिनांक-11.06.2012 पासून द.सा.द.शे.15% दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे. तसेच तक्रारीचा खर्च मिळावा.
03. विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांनी एकित्रत लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल केले, त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, उभय पक्षां मधील व्यवहार हा कामठी, जिल्हा नागपूर येथील असून कुरीयरची सेवा घेण्या करीता बुक केलेले कन्साईनमेंट हे तक्रारकर्त्याने स्वतः बुक केले नव्हते. सदरचे कन्साईनमेंट क्रिष्णा यांचे नावाने बुक असून सदरची तक्रार ही राधाकिशन चंद्रप्रकाश अग्रवाल यांनी केलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक संरक्षण कायद्दातील कलम-2 (1)(d) प्रमाणे ग्राहक होत नाही. विरुध्दपक्षाकडे कन्साईनमेंट बुक करता श्री क्रिष्णा यांनी बंद लिफाफ्या मध्ये काय आहे या बाबत कोणतीही सुचना दिली नाही. तसेच चेन्नई येथे पार्सल सोडविणा-या व्यक्तीचा पत्ता अपूर्ण नमुद केलेला होता व त्यावर पिनकोड नमुद केलेला नव्हता.
विरुध्दपक्षा तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, दिनांक-10.06.2012 तक्रारकर्त्याचे कुटूंबातील सदस्य हे चेन्नई ते नागपूर रेल्वेचा प्रवास करणार होते, ते एकूण 07 प्रवासी होते या बद्दल त्यांना माहिती नाही. तसेच रेल्वे आरक्षीत तिकिटाचे मुल्य रुपये-7721/- असल्या बद्दल त्यांना माहिती नाही, तक्रारकर्त्याचे कुटूंबातील प्रवास करणा-या सदस्यांना दंड ठोठावल्या बद्दल त्यांना माहिती नाही, तक्रारकर्त्याने तक्रार ही खोटी नमुद केलेले आहे. त्यांच्या कर्मचा-याने चेन्नई येथे बंद लिफाफा पोहचता केला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द केलेले सर्व आरोप-प्रत्यारोप खोडून काढून तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत आरक्षीत ट्रेन तिकिटांच्या प्रती, विरुध्दपक्षाकडे कन्साईनमेंट बुक केल्याची पावती, कन्साईनमेंट ट्रॅकींग रिपोर्ट, रेल्वे तर्फे दंड केल्याच्या पावत्या, दिनांक-11.06.2012 रोजी विरुध्दपक्षाला दिलेले पत्र आणि पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर, दाखल दस्तऐवज आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीचे नागपूर येथील कार्यालयात नागपूर येथून चेन्नई येथे पाठविण्यासाठी एक कन्साईनमेंट बुक केले होते. सदरचे कन्साईनमेंट हे तक्रारकर्त्याच्या चेन्नई येथील कुटूंबाचे सदस्यांना वेळेवर पोहचले नाही. तक्रारकर्त्याने बंद लिफाफ्या मध्ये दिनांक-10/06/2012 रोजीच्या चेन्नई ते नागपूर प्रवासाच्या आरक्षीत रेल्वेच्या तिकिटा होत्या असे तक्रारीत नमुद केले आहे. त्या तात्काळ योजने अंतर्गत कन्फर्म प्रवासाच्या रेल्वेच्या तिकिटा तक्रारकर्त्याच्या कुटूंबातील सदस्यांना दिनांक-10.06.2012 रोजी सायंकाळी 5.00 वाजे पर्यंत पोहचवून देण्याची हमी विरुध्दपक्षा तर्फे घेण्यात आली होती आणि ट्रेन सायंकाळी 07.00 वाजताची होती परंतु त्या तिकिटा वेळेवर पोहचल्या नसल्याने त्यांना फॅक्सव्दारे पाठविलेल्या तिकिटाच्या प्रिन्टसवर प्रवास करावा लागला परंतु मूळ तिकिटा नसल्याने रेल्वेच्या टिकीट चेकरने प्रवासा दरम्यान त्यांना दंड ठोठावला. या सर्व प्रकारात तक्रारकर्त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागला.
07. विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीने आपल्या उत्तरात स्पष्टपणे नमुद केले की, तक्रारकर्त्याने संडे प्राईम टाईम सेवा त्यांचे कडून घेतल्या बद्दलचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने दिलेल्या पत्त्यावर कुरीअरचे पार्सल पोहचते केले त्यामुळे त्यांनी कोणतीही सेवेत त्रृटी ठेवली नाही.
08. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोन केले असता असे दिसून येते की, विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीची सेवा तक्रारकर्ता श्री राधाकिशन चंद्रप्रकाश अग्रवाल यांनी घेतलेली नसून कन्साईनमेंट बुक केलेल्या पावतीवर श्रीक्रिष्णा असे नाव नमुद आहे परंतु सदर मंचा समोर दाखल केलेल्या तक्रारी मध्ये तक्रारकर्त्याचे नाव राधाकिशन अग्रवाल असे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याने रेल्वे प्रवासा दरम्यान झालेल्या रुपये-7305/- एवढया दंडाची पावती दाखल केलेली आहे. रेल्वेचा प्रवास हा दिनांक-10.06.2012 रोजीचा आहे. तक्रारकर्त्याने मूळ तिकिटाची छायांकित प्रत दाखल केलेली असून त्यावरील गाडी क्रं-12615 असा दिसून येतो. तक्रारकर्त्याने तक्रारीत विरुध्दपक्षाने वेळेच्या आत कन्साईनमेंट विरुध्दपक्षाने पोहचविले नसल्याचे नमुद केले आहे. तर विरुध्दपक्ष कुरीयर कंपनीने आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याने चेन्नई येथे पॉकिट पोहचविण्या करीता जो पत्ता नमुद केलेला होता तो अपूर्ण पत्ता होता व त्यावर पिनकोड क्रमांक नमुद केलेले नव्हता. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतीउत्तरा मध्ये यावर भाष्य केलेले नाही त्यामुळे विरुध्दपक्ष कुरीयर कंपनी कडून तक्रारकर्त्याला सेवेत त्रृटी दिल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्त्याने चेन्नईला पाठविलेले पॉकीट हे विरुध्दपक्षाचे कर्मचा-याने नमुद केलेला पत्ता शोधून तक्रारकर्त्याच्या सदस्यां कडे पोहचते केले. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याचे नावातील फरक आणि अपूर्ण पत्ता या दोन
मुद्दांवर तक्रार मंजूर होण्यास पात्र नसल्याचे मंचाचे मत असून त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री राधाकिशन चंद्रप्रकाश अग्रवाल यांची, विरुध्दपक्ष डी.टी.डी.सी.कुरीअर आणि कार्गो लिमिटेड तर्फे- विरुध्दपक्ष क्रं-1) कार्यकारी संचालक बंगलोर-5600472) शाखा व्यवस्थापक, नागपूर-12 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.