तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : वकील श्रीमती अनुपमा शहा हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही सांखीकी विषयाबद्दल प्रशिक्षण देणारी संस्था आहे. त्या विषयातील तज्ञ व्यक्तीस आर्थिक व्यवहाराशी निगडीत काम करणा-या संस्थेमध्ये नोकरी मिळू शकते. सा.वाले यांनी त्यांच्याकडे दिल्या जाणा-या प्रशिक्षणाचे फायदे विस्तृतपणे माहिती करुन देण्यासाठी वर्तमान पत्रात जाहीरात दिली. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, जाहीरातील मजकूरावर आकर्षीत होऊन तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे पदयुत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणेकामी ऑगस्ट 2007 मध्ये प्रवेश घेतला. तक्रारदारांनी त्याबद्दल सा.वाले यांचेकडे रु.14,400/-प्रवेश शुल्क, रु.64,800/- शैक्षणिक शुल्क, व रु.7,200/-परीक्षा शुल्क या प्रमाणे एकंदर रु.2,73,600/- जमा केले. तक्रारदार यांनी अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त केलेली होती. सा.वाले यांचेकडून सांखिकी विषयातील प्रशिक्षण प्राप्त करणे असल्याने त्यांनी पदविका प्रशिक्षण वर्गास प्रवेश घेण्याचे ठरविले व त्याप्रमाणे वरील प्रमाणे रक्कम अदा केली.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, जाहीरातील व माहिती पत्रकामध्ये दिलेल्या माहितीच्या विरुध्द सा.वाले यांचे वर्तन होते. प्रशिक्षणाकरीता योग्य त्या संखेमध्ये शिक्षकवर्ग उपलब्ध नव्हता. या उलट श्री.राजेंद्र शहा या नावाचे संचालक हेच प्रशिक्षणाचे बहुतेक वर्ग घेत असत. त्याच प्रमाणे संगणक व संगणक प्रणाली या संदर्भातील योग्य ते ज्ञान असलेला शिक्षक वर्ग उपलब्ध नव्हता. व केवळ प्रशिक्षणार्थिंना संगणकावर काम करुन स्वतः त्या बद्दलची माहिती करुन घ्यावी लागत असे.
3. तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, सा.वाली प्रशिक्षण संस्था ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ यांनी स्विकृत केलेली संस्था आहे असा जाहीरातीमध्ये उल्लेख आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये सा.वाले संस्था ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ यांनी स्विकृत केलेली संस्था नाही. व सा.वाले यांनी त्या बद्दलची खोटी माहिती दिली. या संबंधात तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, त्यांनी 9 वे प्रशिक्षण सत्र पूर्ण केल्यानंतर व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ यांचेकडे अर्ज केल्यानंतरही त्यांना पदविदान समारंभाचे निमंत्रण आले नाही व पदवी मिळाली नाही.
4. तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, सा.वाले यांनी आपल्या माहिती पत्रकाव्दारे व जाहीरातीव्दारे असे भासविले की, प्रशिक्षण पूर्ण करणा-या व्यक्तीस भविष्यामध्ये चांगली नोकरी मिळू शकेल. परंतु वस्तुतः त्यापेक्षा उलट होते व सा.वाले यांनी दिलेल्या प्रशिक्षणास जगाचे बाजारामध्ये काही किंमत नसुन तक्रारदारांना नोकरी प्राप्त होऊ शकली नाही. वस्तुतः सा.वाले ही केवळ प्रशिक्षण संस्था असून त्या बद्दलचे मुख्य संघटणेचे प्रशिक्षण पास झाल्यानंतर उमेदवारास नोकरी मिळू शकते परंतु ही बाब सा.वाले तक्रारदारांकडे लपवून ठेवली.
5. हया सर्व बाबी उघडकीस आल्यानंतर व सा.वाले यांच्या संस्थेमार्फत दिले जाणा-या प्रशिक्षणाचा फोलपणा कळून चुकल्यानंतर तक्रारदारांनी 9 वे प्रशिक्षण संत्र संपल्यानंतर सा.वाले यांचेकडील प्रवेश रद्द करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे सा.वाले यांना दिनांक 4.3.2009 रोजी प्रवेश रद्द करीत असल्याचे पत्र दिले व शुल्काचा परतावा मागीतला.
6. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे शुल्काच्या परताव्याचे संदर्भात तक्रारदारांनी अनेक वेळेस स्मरणपत्रे देवूनही सा.वाले यांनी शुल्काचा परतावा दिला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी मुंबई ग्राहक पंचायत यांच्या माध्यमातून सा.वाले यांना दिनांक 14.10.2009 रोजी नोटीस दिली व सा.वाले यांनी त्या नोटीसीस दिनांक 3.11.2009 रोजी उत्तर दिले व तक्रारदारांची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार सदर मंचाकडे दिनांक 8.2.2010 रोजी दाखल केली व त्यामध्ये सा.वाले शिक्षण संस्थेने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व तक्रारदारांना पदविका प्रशिक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला व सा.वाले यांचेकडून प्रत्येक सत्राकरीता एकत्रित जमा केलेले रु.2,73,600/- वसुल होऊन मिळावेत व त्याचप्रमाणे नुकसान भरपाई रु.12 लाख वसुल होऊन मिळावेत व तक्रारीचा खर्च मिळावा अशी दाद मागीतली.
7. सा.वाले यांनी हजर होऊन आपले कैफीयतीचे शपथपत्र संस्थेचे संचालक श्री.राजेंद्र शहा यांचे मार्फत दाखल केले. व त्यामध्ये असे कथन केले की, उमेदवार जर 12 वी पास असेल तर बी.एस.सी.सांखिकी या वर्गाकरीता व उमेदवार जर पदविधारक असेल तर एम.एस.सी. सांखिकी या वर्गाकरीता प्रवेश देण्यात येतो. व बी.एस.सी.सांखिकी या पदवी प्रशिक्षणाचा कालावधी 6 सत्रामध्ये 3 वर्षाचा असतो, ज्यास सत्र क्रमांक 1 ते 4 असे संबोधिले जाते. तर एम.एस.सी.सांखिकी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सत्र क्र.7 ते 10 म्हणजे 4 सत्राचा व 2 वर्षाचा असतो. तक्रारदारांनी सा.वाले संस्थेकडे ऑगस्ट 2007 मध्ये प्रवेश घेतला होता ही बाब सा.वाले यांनी मान्य केली. व मार्च,2009 मध्ये त्यांनी प्रवेश रद्द केला ही बाब देखील सा.वाले यांनी मान्य केली.
8. सा.वाले यांचे असे कथन आहे की, सा.वाले संस्थेस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाकडून मान्यता दिलेली असून त्याप्रमाणे शैक्षणिक वर्ग चालविले जातात. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केले आहे की, सुरवातीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाने हंगामी स्वरुपात स्विकृती दिली होती. परंतु नंतर ती कायम करण्यात आली व त्याप्रमाणे प्रशिक्षणार्थिंना गुणतक्ता व प्रमाणपत्र देण्यात येत आहेत.
9. संस्थेमध्ये दिल्या जाणा-या प्रशिक्षण दर्जाबद्दल तक्रारदारांनी जे तक्रारीत कथन केलेले आहे ते सर्व सा.वाले यांनी नाकारले व असे कथन केले की, सर्व प्रशिक्षणार्थिंना योग्य व आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. तक्रारदारांनी 3 सत्र पूर्ण केल्यानंतर अचानक प्रवेश रद्द केला व त्यानंतर ते शुल्क परतावा मागू लागले. परंतु ही मागणी अप्रमाणिकपणाची असल्याने सा.वाले यांनी ती नाकारली.
10. नोकरी व रोजगाराचे संदर्भात सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांच्या सोबत जे अन्य प्रशिक्षणार्थि होते त्यांना ती सुविधा उपलब्ध करुन दिली येवढेच नव्हेतर तक्रारदारांनासुध्दा त्या संबंधात मदत करण्याचे सा.वाले संस्थेने प्रयत्न केले. रोजगाराच्या संधी व नोकरी बद्दलची हमी सा.वाले संस्थेने दिली नव्हती व उमेदवाराचे मुलाखतीमधील नैपुण्य व त्याचा दर्जा यावर व अन्य घटक यावर उमेदवाराचे यश अवलंबून असल्याने त्या संबंधात तक्रारदारांची सा.वाले यांनी दिशाभूल केली अथवा धोका दिला या आरोपास सा.वाले यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला व या प्रकारे तक्रारदारांचे संबंधात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व प्रवेशाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
11. तक्रारदारांनी तक्रारीसोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल केली तसेच आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. व त्यासोबत काही कागदपत्रे दाखल केली. सा.वाले यांनी त्यांचे संचालक श्री.राजेंद्र शहा यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
12. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदार स्वतः व सा.वाले यांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारदारांना प्रशिक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही |
3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
13. तक्रारदारांनी तक्रारीसोबत जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत त्यामध्ये तक्रारदारांचा प्रवेश अर्जाची प्रत पृष्ट क्र.69 वर दाखल आहे. त्यावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे एम.एस.सी.सांखिकी या प्रशिक्षणाकरीता सत्र क्र.7 ते 10 करीता प्रवेश दिनांक 4.8.2007 रोजी घेतला होता. तक्रारदारांनी प्रवेश शुल्क रु.14,400/-व शैक्षणिक शुल्क रु.64,800/- (एका सत्राचे)जमा केले होते या बद्दल वाद नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडील प्रवेश दिनांक 4.3.2009 रोजी रद्द केला या बद्दलही वाद नाही. यावरुन तक्रारदार ऑगस्ट,2007 ते मार्च, 2009 चे दरम्यान सा.वाले संस्थेमध्ये एम.एस.सी.सांखिकी या विषयाचे प्रशिक्षणार्थि होते व त्यांनी 4 पैकी 3 सत्र पूर्ण केले असा निष्कर्ष काढावा लागतो.
14. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये असे कथन केले आहे की, सा.वाले प्रशिक्षण संस्थेमध्ये योग्य दर्जाचा व शैक्षणिक ज्ञान व अर्हता प्राप्त असलेला शिक्षक वर्ग उपलब्ध नव्हता व इतर 2 शिक्षक व सोबत संचालक श्री.राजेंद्र शहा हेच प्रशिक्षण देण्याचा भार सांभाळत होते. त्याच प्रमाणे सा.वाले संस्थेमध्ये उपलब्ध असलेले प्रशिक्षण व इतर सुविधेबद्दल देखील विशेषतः संगणक विषयातील प्रशिक्षण या बद्दल तक्रारदारांची तक्रार आहे. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारदारांनी सा.वाले ऑगस्ट, 2007 रोजी प्रवेश घेतला व त्यानंतर पुढील सत्र पूर्ण केले, त्या संबंधात परीक्षा दिली व त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले. परंतु त्या दरम्यान त्यांनी लेखी स्वरुपात संस्थेकडे किंवा अन्यत्र कोठेही तक्रार केलेली नाही व त्या बद्दलचा पुरावाही उपलब्ध नाही. एखादा प्रशिक्षणार्थी/विद्यार्थी दिर्घकाळ त्या संस्थेमध्ये प्रवेश घेत असेल व प्रशिक्षणाच्या दर्जा बद्दल तक्रार करीत नसेल व प्रवेश रद्द केल्यानंतर दर्जाबद्दल तक्रार करत असेल तर तो प्रशिक्षणार्थीचा/विद्यार्थ्याचा अप्रमाणिकपणा होय असा निष्कर्ष काढावा लागतो.
15. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत निशाणी ई येथे फेब्रृवारी 2008 मध्ये सत्र क्र.7 ची तक्रारदारांच्या गुणपत्रिकेची प्रत हजर केलेली आहे. त्यावरील गुणांचे नोंदीवरुन असे दिसून येते की, तक्रारदार प्रत्येक विषयामध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळऊन उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ट क्र.77 येथे सत्र क्र.8 च्या गुणपत्रिकेची प्रत हजर केलेली आहे. त्यातील गुणावरुन असे दिसते की, तक्रारदार 80 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून चारही विषयामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तक्रारदारांच्या तक्रारीच्या पृष्ट क्र.82 येथे सत्र क्र.9 म्हणजे तिसरे सत्र याच्या गुणपत्रिकेची प्रत हजर केलेली आहे. त्यातील गुणांची नोंद असे दर्शविते की, तक्रारदारांनी चांगले गुण प्राप्त केलेले होते. या बाबी असे दर्शवितात की, दिनांक 4.3.2009 पर्यत म्हणजे सा.वाले संस्थेकडील प्रवेश रद्द करेपर्यत तक्रारदार हे सा.वाले संस्थेकडे प्रशिक्षण घेत होते, परीक्षा देत होते. व तिस-या सत्राचे परीक्षेमध्ये ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले व तिसरे सत्र झाल्यानंतर परंतु चौथ्या सत्राचे पूर्वी त्यांनी प्रवेश रद्द केला व त्यानंतर सा.वाले संस्थेने त्यांना शुल्क परतावा देण्यास नकार दिला व तक्रारदारांनी सा.वाले संस्थेच्या प्रशिक्षण दर्जाबद्दल आपली तक्रार सुरु केली.
16. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्रात असे कथन केले आहे की, सा.वाले संस्थेकडे दिल्या जाणा-या प्रशिक्षणास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाने संमत्ती दिली असली तरी देखील विद्यापीठ अनुदान मंडळाने त्या प्रशिक्षणास स्विकृती दिली नसल्याने सा.वाले यांचे प्रशिक्षणास अर्थ उरत नाही. मुळातच तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाकडून प्राप्त होणा-या स्विकृतीचा उल्लेख नाही. त्यातही तक्रारदार यांनी प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी अथवा प्रवेश घेतल्यानंतर नजीकचे काळामध्ये या बद्दल तक्रार केली असती तर त्यास काही अर्थ होता. परंतू तिस-या सत्राची परीक्षा झाल्यानंतर तक्रारदार अशी तक्रार करतात की, सा.वाले संस्थेच्या प्रशिक्षणास विद्यापीठ अनुदान मंडळाची मान्यता नाही. ही पाश्चात बुध्दी ठरते व तक्रारीमध्ये त्या बद्दल स्पष्ट कथन नसल्याने किंवा तो मुद्दा उपस्थित केलेला नसल्याने तक्रारदारांना त्या मुंद्यावर आधारीत दाद मिळू शकत नाही.
17. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये जरी अन्य मुद्दे उपस्थित केलेले असलेतरी त्यांचा मुख्य मुद्दा असा आहे की, सा.वाले प्रशिक्षण संस्थेस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाची मान्यता नव्हती तरी देखील सा.वाले यांनी ही बाब लपविली व प्रशिक्षणार्थिंना प्रवेश घेण्याचे आवाहन केले व त्यांचेकडून शुल्क स्विकारले.
18. सा.वाले संस्थेने आपल्या कैफीयतीमध्ये ही बाब स्पष्टपणे नाकारली व कैफीयतीसोबत निशाणी अ येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ यांनी दिनांक 18.7.2007 रोजी सा.वाले संस्थेला दिलेली हंगामी स्विकृतीची प्रत हजर केलेली आहे. त्यानंतर तक्रारदार यांना ज्या तिनही सत्राच्या गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ, नाशिक यांनी घेतलेल्या परिक्षाचे प्रमाणे व त्या विद्यापिठाने दिलेल्या गुणाप्रमाणे जारी करण्यात आलेल्या होत्या. विद्यापिठाचे नांव गुणपत्रिकेवर स्पष्टपणे नमुद करण्यात आलेले आहे. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की, सुरवातीस हंगामी स्वरुपात देण्यात आलेली स्विकृती नंतर कायम करण्यात आली. व त्याप्रमाणे सा.वाले संस्थेने विद्यापिठाचे स्विकृतीवर आधारीत कामकाज केलेले आहे.
19. तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र.15 मध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांनी मुंबई विद्यापिठाकडून अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त केलेली होती. व त्यानंतर सा.वाले यांचेकडे दिड वर्ष प्रस्तुतचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. तरी देखील तक्रारदारांना कोठेही नोकरी मिळू शकली नाही व तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे व्यतीत केलेला प्रशिक्षणाचा कालावधी व्यर्थ ठरला असून तक्रारदार बेरोजगार आहेत. एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्यास नोकरी मिळणे अथवा न मिळणे हे त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा तसेच नशिबाचा भाग असतो. सा.वाले यांचेकडे तिन सत्र पूर्ण केल्यानंतरही तक्रारदारांना नोकरी मिळाली नाही यामध्ये सा.वाले यांचा दोष असू शकत नाही. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादासोबत तक्रारदारांच्या तक्रारीतील प्रत्येक कथनास सविस्तर उत्तर देणारी अनुसूची दाखल केलेली आहे. त्यामध्ये रकाना क्र.40 मध्ये सा.वाले यांनी असे कथन केलेले आहे की, स्मिता हांडे नावाचे विद्यार्थिनीस/प्रशिक्षणार्थिनीस 2009 मध्ये सा.वाले यांचेकडून पदविका प्रमाणपत्र प्राप्त होण्यापूर्वीच नोकरी मिळाली व त्या प्रशिक्षणार्थिने भारतातील सांखीकी संस्थेचा किंवा इग्लंड अथवा अमेरीका कुठल्याही संस्थेचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले नव्हते. या स्वरुपाची नोकरी श्रध्दा व्होरा नांवाचे दुस-या विद्यार्थिनीस प्राप्त झाली आहे. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत तक्रारदारांना पाठविलेल्या ई-मेल संदेशाची प्रत हजर केलेली आहे. त्यावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी सा.वाले संस्थेचे प्रशिक्षण तिसरे सत्र सोडल्या नंतरही सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांची नोकरी व मुलाखतीचे संदर्भात मदतच केली होती. ही बाब देखील तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाचे विरुध्द जाते.
20. तक्रारदारांच्या तक्रारीत असे कथन आहे की, सातव्या सत्राची परीक्षा दोन वेळा घेण्यात आली व पहिल्या परीक्षेचा निकाल रद्द करुन दुसरी परीक्षा घेण्यात आली व तो निकाल जाहीर करण्यात आला. त्यातही पहील्या परिक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते त्यांना फेर परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यात आले. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.40 मध्ये फेर परीक्षा घेण्यात आलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. परंतु असे कथन केले आहे की, अंतर्गत चाचणीचे गुण विद्यापिठाने निकाल जाहीर करताना विचारात घेतले नव्हते व ही चूक सा.वाले संस्थेने विद्यापिठाच्या निदर्शनास आणली व त्यानंतर विद्यापिठाचे अंतर्गत चाचणीचे गुण विचारात घेऊन पुन्हा गुण पत्रिका तंयार केली व नंतर निकाल जाहीर केला. या स्वरुपाची चूक विद्यापिठाकडून केली असेल तर त्या बद्दल दोष सा.वाले यांना देणे योग्य ठरणार नाही. त्या संदर्भात सा.वाले यांनी फसवणूक केली असा निष्कर्ष नोंदविता येत नाही.
21. तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये असे कथन आहे की, तक्रारदारांना सा.वाले यांनी असे भासविले की, सा.वाले यांचेकडे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी हे सांखिकी विषयातले तज्ञ होतील व त्यांना अन्य कुठलीही परीक्षा देण्याची किंवा प्रशिक्षण घेण्याची गरज पडणार नाही. तक्रारदारांनी या संदर्भात भारतीय सांखिकी शास्त्र संस्था (Institute of Actuaries of India) IAI या संस्थेचा संदर्भ दिलेला आहे. तक्रारदारांनी
त्या संस्थेच्या स्थापणेच्या कायद्याची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदार आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.7 मध्ये असे कथन करतात की, सा.वाले यांनी तक्रारदारांना असे सुचविले की, तक्रारदारांनी केवळ भारतीय सांखीकी प्रशिक्षण संस्था यांचे सदस्य व्हावे व त्यांच्या परीक्षा द्याव्यात. तक्रारदार पुढे असे कथन करतात की, इतर विद्यार्थ्यानी भारतीय सांखिकी संस्थेची परीक्षा दिली व ते उत्तीर्ण देखील झाले परंतु तक्रारदार होऊ शकले नाही. तक्रारदार स्वतः असे कारण पुरवितात की, सा.वाले यांनी घेतलेल्या सत्र परीक्षेतील निकालाने तक्रारदारांना गाफील ठेवले व तक्रारदार तसी तंयारी करु शकले नाहीत. तक्रारदारांचे या स्वरुपाचे कथन असे दर्शविते की, या संदर्भात सा.वाले यांची काही चूक असू शकत नाही. सा.वाले यांनी जे माहिती पत्रक व प्रसिध्दी पत्रक जारी केलेले होते त्यामध्ये संस्थेची माहिती व महत्व दिलेले होते, पण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थिंना सांखिकी विज्ञानातील उत्तम उमेदवार होऊ शकेल असे आश्वासन देण्यात आलेले आहे. परंतु माहिती पत्रकात अथवा जाहीरातीमध्ये कोठेही नोकरीचे आश्वासन नाही. अथवा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर निच्छितच नोकरी मिळेल अशी हमी देण्यात आलेली नव्हती. स्वतःच्या संस्थेची माहिती देणे अथवा गुणवर्णन करणे याव्दारे यामध्ये अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे म्हणता येणार नाही.
22. तक्रार क्रमांक 90/2010 या तक्रारीत तक्रारदारांचे कथन हे तक्रार क्रमांक 89/2010 या मधील तक्रारदारांच्या तक्रारी प्रमाणेच आहे. त्यात फरक येवढाच आहे की, तक्रार क्रमांक 89/2010 मधील तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे 3 सत्र पूर्ण केले तर प्रस्तुतच्या तक्रारीतील तक्रारदारांनी 2 सत्र पूर्ण केले. व सत्र क्र.7 व 8 व त्यानंतर सा.वाले यांची प्रशिक्षण संस्था सोडून दिली. तक्रारदारांची इतर सर्व कथने तक्रार क्रमांक 89/2010 प्रमाणेच आहेत. व सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये केलेला खुलासा देखील सारखाच आहे. त्यावरुन प्रस्तुत प्रकरणातील पुराव्याची वेगळी चर्चा करण्यात येत नाही. तथापी वर नमुद केल्याप्रमाणे दोन्ही तक्रारीतील तक्रारदार हे सा.वाले यांनी तक्रारदारांची फसवणूक केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हा आरोप सिध्द करु शकत नाही. सहाजिकच त्यामुळे तक्रारदार आपल्या तक्रारीमध्ये मागीतलेली कुठलीही दाद प्राप्त करुन घेण्यास पात्र नाही.
23. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 89/2010 व 90/2010 रद्द करण्यात येतात.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.