::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या )
(पारीत दिनांक– 17 फेब्रुवारी, 2018)
1. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष बिल्डर/डेव्हलपर कडून, करारानुसार भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगीक मागण्यांसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष ड्रिम सिटी लॅन्ड डेव्हलपर्स ही एक भागीदारी फर्म असून सदर फर्मचा शेतजमीनीचे अकृषक भूखंडात रुपांतरण करुन विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारकर्त्याला निवासी घराची आवश्यकता असल्याने तो भूखंडाचे शोधात होता. विरुध्दपक्षाचे दैनिक वृत्तपत्रातील जाहिराती वरुन त्याने विरुध्दपक्ष फर्मशी संपर्क साधला.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म व्दारा प्रस्तावित मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-27 सर्व्हे क्रं-46/2 मधील भूखंड क्रं-2 व क्रं-3, एकूण क्षेत्रफळ-2131.272 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-100/- प्रमाणे एकूण रुपये-4,26,254/- मध्ये विकत घेण्या बाबत दिनांक-27/12/2010 रोजी इसारपत्र केले. (या ठिकाणी नमुद करण्यात येते की, मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-2 व क्रं-3 चे इसारपत्राची प्रत अभिलेखावर दाखल करण्यात आली नाही परंतु विरुध्दपक्ष फर्म तर्फे दिनांक-03/09/2011 रोजीची तक्रारकर्त्याला देण्यात आलेल्या नोटीसच्या प्रतीवरुन असे भूखंड विकत घेण्या बाबत करार केल्याचे दिसून येते तसेच विरुध्दपक्ष फर्म तर्फे दाखल उत्तरा मध्ये सुध्दा नमुद क्षेत्रफळाचे 02 भूखंड नमुद केलेल्या किम्मतीत तक्रारकर्त्याला विक्री करण्या बाबत करार केल्याची बाब मान्य करण्यात आलेली आहे) तक्रारकर्त्याने कराराचे दिनांकास भूखंड क्रं-2 व क्रं 3 चे इसारापोटी रुपये-1,00,000/- विरुध्दपक्ष फर्मला दिलेत, उर्वरीत रक्कम रुपये-3,26,254/- मासिक किस्तीमध्ये भरावयाची होती. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने करारातील भूखंड क्रं-2 व क्रं-3 संबधाने दिनांक-27/12/2010 ते दिनांक-15/08/2012 पर्यंतचे कालावधीत एकूण रुपये-4,25,000/- एवढी रक्कम जमा केली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, या व्यतिरिक्त त्याने मौजा सावंगी, तालुका-उमरेड, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-30, शेत सर्व्हे क्रं-17/2 मधील भूखंड क्रं-01 ते 04, एकूण क्षेत्रफळ-8628.087 चौरसफूट, प्रतीचौरस फूट दर रुपये-75/- प्रमाणे एकूण किम्मत रुपये-6,47,106/- मध्ये विकत घेण्याचे इसारपत्र विरुध्दपक्ष फर्म सोबत दिनांक-27/12/2010 रोजी केले. (सदर नमुद प्रस्तावित ले-आऊट मधील भूखंड क्रं-01 ते क्रं-04 चा उल्लेख यापुढे निकालपत्रात करारातील भूखंड असा करण्यात येईल) तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला करारातील भूखंडापोटी इसारा दाखल कराराचे दिनांकास रुपये-1,00,000/- दिलेत, उर्वरीत रक्कम रुपये-5,47,106/- एकूण 12 मासिक किस्तीमध्ये भरावयाची होती, विक्रीपत्र नोंदवून देण्याची मुदत दिनांक-27/12/2012 पर्यंत निश्चीत करण्यात आली होती. तक्रारकर्त्याने सदर भूखंड क्रं-01 ते क्रं-04 पोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये दिनांक-19/12/2010 ते दिनांक-27/06/2012 पर्यंत एकूण रक्कम रुपये-4,31,565/- जमा केली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने अशाप्रकारे मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-2 व क्रं-3 पोटी रुपये-4,25,000/- तसेच मौजा सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-1 ते क्रं-4 पोटी रुपये-4,31,565/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-10,73,360/- विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केली. सदर करारान्वये करारातील नमुद भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची तारीख 27/12/2012 पर्यंत निश्चीत केलेली होती.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, उपरोक्त नमुद स्थिती असताना विरुध्दपक्ष फर्म तर्फे दिनांक-14/08/2013 रोजीची नोटीस तक्रारकर्त्याला पाठवून सुचित केले की, मौजा सावंगी, सर्व्हे क्रं-17/2, पटवारी हलका क्रं-30 संबधीचा करार हा लॅप्स झालेला असून भूखंडापोटी जमा केलेली रक्कम परत मिळणार नसल्याचे सुचित केले. त्यानंतर तक्ररकर्त्याने विरुध्दपक्षाशी वेळोवेळी संपर्क साधून तो करारातील भूखंडांचे विक्रीपत्र नोंदवून घेण्यास तयार आहे परंतु विरुध्दपक्षाने योग्य तो प्रतिसाद दिला नाही. विरुध्दपक्ष मुद्दामून र्दुहेतूने विक्रीपत्र नोंदवून देण्यास टाळाटाळ करीत असून तक्रारकर्त्याने जमा केलेल्या रकमेचा उपभोग घेत आहे. विरुध्दपक्ष फर्म तर्फे तक्रारकर्त्याला दिनांक-03/09/2011, दिनांक-10/08/2012, दिनांक-14/06/2013, दिनांक-14/08/2013 आणि रोजीच्या नोटीसेस पाठवून उर्वरीत रकमेची मागणी करण्यात आली, जेंव्हा की, तक्रारकर्त्याने करारातील भूखंडाच्या संपूर्ण किम्मती विरुध्दपक्षाला अदा केलेल्या होत्या. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला कधीही ले आऊट मंजूरी संबधाने एन.ए./टी.पी.चे दस्तऐवज पुरविले नाहीत. शेवटी त्याने विरुध्दपक्षांना रजिस्टर पोस्टाने दिनांक-03/09/2014 रोजीची नोटीस पाठवून भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची मागणी केली. सदर नोटीसला विरुध्दपक्षाने उत्तर देऊन आणखी प्रतीचौरसफूट रुपये-50/- प्रमाणे विकासशुल्क जमा करण्यास सुचित केले. अशाप्रकारे करारा प्रमाणे कोणतीही कार्यवाही न करता उलट पैसे मागणे विरुध्दपक्षाने सुरु केले अशाप्रकारे विरुध्दपक्षा तर्फे दोषपूर्ण सेवा देण्यात आल्याने त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्षाने करारा प्रमाणे मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रं-46/2 मधील भूखंड क्रं-2 व क्रं-3 आणि मौजा सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील शेत सर्व्हे क्रं-17/2 मधील भूखंड क्रं-1 ते 4 चे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देण्याचे आदेशित व्हावे.
(2) परंतु करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास करारातील भूखंडांची आजच्या बाजारभावा प्रमाणे येणारी किम्मत रक्कमा दिल्याचे दिनांकां पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे.
(3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000,00/- द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- तसेच नोटीस खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-4) यांना अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता त्यांनी ग्राहक मंचा समक्ष उपस्थित होऊन एकत्रित लेखी उत्तर सादर केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये विरुध्दपक्ष फर्म ही एक भागीदारी फर्म असल्याचे मान्य केले. तक्रारकर्त्याने मैजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रं-46/2 मधील भूखंड क्रं-2 व क्रं-3, एकूण क्षेत्रफळ 2131.272 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-100/- प्रमाणे एकूण किम्मत रुपये-4,26,254/- मध्ये विकत घेण्याचा करार दिनांक-27/12/2010 रोजी केला आणि कराराचे दिनांकास इसारा दाखल रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षांना दिले आणि उर्वरीत रक्कम रुपये-3,26,254/- मासिक किस्तीत देण्याचे ठरले असल्याची बाब विरुध्दपक्षाने मान्य केली. परंतु तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याने करारातील भूखंड क्रं-2 व क्रं-3 पोटी रुपये-4,25,000/- एवढी रक्कम जमा केली असल्याची बाब नाकबुल केली. विरुध्दपक्षाचे उत्तरा नुसार तक्रारकर्त्याने भूखंड क्रं-2 व क्रं-3 पोटी दिनांक-19/12/2010 ते दिनांक-17/06/2012 या कलावधीत रुपये-3,31,565/- एवढी रक्कम जमा केली. मात्र भूखंडाचे विक्रीपत्र हे दिनांक-27/12/2012 पर्यंत नोंदवावयाचे असल्याची बाब नाकबुल केली.
विरुध्दपक्षां तर्फे पुढे असेही नमुद करण्यात आले की, तक्रारकर्ता हा मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रं-46/2 मधील भूखंड क्रं-2 व क्रं-3 खरेदी करण्यास ईच्छुक नव्हता म्हणून विरुध्दपक्षा तर्फे सुचित करण्यात आले की, त्याने सदर भूखंडापोटी जमा केलेल्या रकमे पैकी 25% रक्कम रुपये-82,890/- ची कपात करुन उर्वरीत शिल्लक रक्कम रुपये-2,48,675/- ही मौजा सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रं-17/2 मधील भूखंड क्रं-1 ते क्रं-4 पोटी समायोजित करण्यात येईल. विरुध्दपक्षा तर्फे असेही नमुद करण्यात आले की, सर्व शर्ती व अटी या इन्स्टॉलमेंट कॉर्डवर छापील आहेत, ज्यावर उभय पक्षांच्या स्वाक्ष-या आहेत. तक्रारकर्त्या सोबत अन्य ग्राहकानीं मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रं-46/2 मधील नोंदणी केलेल्या भूखंडांचे आरक्षण रद्द केलेत, त्यामुळे विरुध्दपक्षाने मौजा कोहळा येथील जमीन तिचे मूळ मालक श्री यादवराव नामदेवराव येरखेडे आणि इतरांना परत केली. मूळ मालक श्री येरेखेडे व इतरांनी विरुध्दपक्षांचे विरुध्द विशेष दिवाणी दावा क्रं-389/2012 दाखल केला हेत, त्यावर चौथे जॉईन्ट सिव्हील जज, सिनियर डिव्हीजन, नागपूर यांनी दिनांक-18/12/2014 रोजी आदेश पारीत करुन सदर शेत जमीनीचा व्यवहार रद्द ठरविला. तक्रारकर्त्याने मूळ दिनांक-27/12/2010 रोजीचा करारनामा विरुध्दपक्षास परत केला आणि विरुध्दपक्षाने सदर करारावर लाईन ओढून करार रद्द केला.
विरुध्दपक्षां तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, मौजा सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर, सर्व्हे क्रं-17/2 मधील भूखंड क्रं-1) ते क्रं-4) एकूण क्षेत्रफळ-8628.087 चौरसफूट प्रतीचौरसफेट रुपये-75/- प्रमाणे एकूण् किम्मत रुपये-6,47,106/- मध्ये खरेदी करण्या बाबत दिनांक-27/12/2010 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी इसारपत्र केले होते. या शिवाय विक्रीपत्र नोंदणीचा खर्च, मुद्रांकशुल्क, किरकोळ खर्च तसेच विकासशुल्क प्रतीचौरसफूट रुपये-20/- या प्रमाणे रकमा तक्रारकर्त्याला द्दावयाच्य होत्या. भूखंडाचा ताबा हा दिनांक-27/12/2012 रोजी द्दावयाचा होता आणि एन.ए./टी.पी. झाल्या नंतर विक्रीपत्र नोंदवून द्दावयाचे होते.
विरुध्दपक्षां तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्त्याने मौजा सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रं-17/2 मधील भूखंड क्रं-1 ते क्रं-4 पोटी दिनांक-27/12/2010 ते दिनांक-15/08/2012 पर्यंत वेळोवेळी एकूण रुपये-4,55,000/- विरुध्दपक्षाला दिलेत, त्यामध्ये तक्रारकर्त्याने मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील भूखंडापोटी जमा केलेली परंतु भूखंड करार रद्द केल्याने कपात करुन राहणारी रक्कम रुपये-2,48,675/- जमा केल्यास एकूण जमा केलेली रक्कम ही रुपये-7,03,675/- एवढी येते. तक्रारकर्त्याला भूखंड क्रं-1) ते क्रं-4) पोटी एकूण क्षेत्रफळ-8628.087 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-75/- प्रमाणे येणारी रक्कम रुपये-6,47,106/- आणि प्रतीचौरसफूट रुपये-20/- प्रमाणे विकासशुल्काची रक्कम रुपये-1,72,561/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-8,19,667/- विरुध्दपक्षास अदा करावयाची होती. तक्रारकर्त्याने भूखंडापोटी जमा केलेली रक्कम रुपये-7,03,675/- वजा जाता अद्दापही तक्रारकर्त्याला भूखंडापोटी रुपये-1,15,992/- एवढी रक्कम विरुध्दपक्षाला द्दावयाची आहे आणि तेवढी रक्कम तक्रारकर्त्याने भूखंड क्रं 1 ते 4 चे विक्रीपत्र नोंदवून घ्यावयाचे असल्यास विरुध्दपक्षाला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मौजा सावंगी येथील भूखंड क्रं-1 ते 4 पोटी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रुपये-4,25,000/- जमा केल्याची बाब नाकारण्यात येते.तक्रारकर्त्याने संपूर्ण भूखंडापोटी एकूण रुपये-10,73,360/- जमा केल्याची बाब नाकारण्यात येते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला फक्त रुपये-7,03,675/- भूखंडापोटी दिलेत आणि मौजा कोहळा, तहसिल उमरेड येथील भूखंड रद्द केल्यामुळे तक्रारकर्त्याने जमा केलेल्या रकमेतून काही रकमेची कपात करण्यात आली.
विरुध्दपक्षां तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, मौजा सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-1) ते क्रं-4) यांचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे दिनांक-27/12/2012 पर्यंत नोंदवून द्दावयाचे होते ही बाब मान्य केली परंतु तक्रारकर्त्याने त्याला अनेक वेळा लेखी नोटीस देऊन तसेच दुरध्वनीव्छारे कळवूनही उर्वरीत रक्कम दिली नाही. तक्रारकर्त्याने विक्रीपत्रासाठी वेळोवेळी विरुध्दपक्षाशी संपर्क साधला असल्याची बाब नाकबुल केली. तसेच विरुध्दपक्ष हे करारातील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास टाळाटाळ करीत असल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. तक्रारकर्त्याने करारातील भूखंडाचीं संपूर्ण किम्मत विरुध्दपक्षाला अदा केल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विरुध्दपक्षा तर्फे गजानन रंभाड यांनी तक्रारकर्त्याची भेट घेऊन उर्वरीत रक्कम देण्यास सुचित केले परंतु तक्रारकर्त्याने त्याकडे दुर्लक्ष्य केले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक-03/09/2014 रोजीची चुकीची नोटीस दिली, त्या नोटीसला त्यांनी दिनांक-04/10/2014 रोजी उत्तर दिलेले आहे. तक्रारकर्ता हा चुकीची तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षां कडून पैसे उकळू पाहत आहे. मौजा कोहळा, तहसिल उमरेड येथील सर्व्हे क्रं-46/2 मधील भूखंड क्रं-2 व क्रं-3 चे विक्रीपत्र नोंदवून देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. परंतु विरुध्दपक्ष मौजा सावंगी, तहसिल उमरेड येथील भूखंड क्रं-1 ते 4 चे विक्रीपत्र जर तक्रारकर्त्याने उर्वरीत रक्कम रुपये-1,15,992/- विरुध्दपक्षानां अदा केल्यास नोंदवून देण्यास तयार आहेत, त्यामुळे रक्कम परत करण्याचा प्रश्न उदभवत नाही. तक्रारकर्ता हा स्वतःच थकबाकीदार असून त्याला वेळोवेळी लेखी नोटीस देऊनही त्याने उत्तर दिले नाही वा पुर्तता केली नाही. तक्रारकर्त्याला दुरध्वनी वरुन सुध्दा सुचित केलेले आहे. विरुध्दपक्ष फर्म तर्फे तक्रारकर्त्याला दिनांक-03/09/2011, दिनांक-10/08/2012, दिनांक-14/06/2013, दिनांक-14/08/2013 रोजीच्या नोटीसेस पाठवून उर्वरीत रकमेची मागणी करण्यात आली परंतु तक्रारकर्त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी, आधारहिन असल्याने ती खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षां तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये प्रामुख्याने भूखंड विक्रीचे बयानापत्र, भूखंड किस्तीच्या रकमा मिळाल्या बाबत विरुध्दपक्षा तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रती, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां रजिस्टर पोस्टाने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, नोटीस पाठविल्या बाबत रजिस्टर पोस्टाच्या पावत्या अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.तक्रारकर्त्याने प्रतीउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. विरुध्दपक्षा तर्फे मौजा कोहळा येथील शेतजमीनीचे संबधाने न्यायालयीन दस्तऐवज दाखल केलेत. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. तक्रारकर्त्या तर्फे अधिवक्ता श्रीमती स्मिता देशपांडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
07. तक्रारकर्त्याची सत्यापना वरील तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्ध भूखंड बयानापत्र/कराराची प्रत, विरुध्दपक्ष फर्म तर्फे भूखंडाच्या किस्ती मिळाल्या बाबत निर्गमित पावत्यांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
08. भूखंडाच्या रकमेच्या हिशोबा संबधाने-
या ठिकाणी भूखंडाच्या रकमांच्या हिशोबा संबधाने दोन्ही पक्षांमध्ये विवाद आहे. अभिलेखावर दाखल पावत्यांच्या प्रतीं वरुन तक्रारकर्त्याने मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-2 व क्रं-3 पोटी एकूण रक्कम रुपये-3,31,565/- एवढी रक्कम आणि मौजा सावंगा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-1 ते 4 पोटी एकूण रक्कम रुपये-4,55,000/- जमा केल्याचे दिसून येते. अशारितीने दाखल पावत्यांच्या प्रतीं वरुन तक्रारकर्त्याने मौजा कोहळा आणि सांवगा येथील भूखंडांपोटी एकूण रक्कम रुपये-7,86,565/- एवढी रक्कम विरुध्दपक्षाकडे जमा केल्याची बाब सिध्द होते.
09. या प्रकरणा मध्ये आणखी एक विवाद असा आहे की, विरुध्दपक्षाचे उत्तरा प्रमाणे तक्रारकर्ता हा मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रं-46/2 मधील भूखंड क्रं-2 व क्रं-3 खरेदी करण्यास ईच्छुक नव्हता म्हणून त्याने सदर भूखंडापोटी जमा केलेल्या रकमे रुपये-3,31,565/- पैकी 25% रक्कम रुपये-82,890/- ची कपात करुन उर्वरीत शिल्लक रक्कम रुपये-2,48,675/- ही मौजा सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्रं-17/2 मधील भूखंड क्रं-1 ते क्रं-4 पोटी समायोजित करण्यात येईल असा प्रस्ताव देण्यात आला होता व त्यास तक्रारकर्त्याने व अन्य ग्राहकांनी सुध्दा मान्यता दिली होती व तक्रारकर्त्याने मौजा कोहळा येथील भूखंड क्रं-2 व क्रं 3 चा मूळ करारनामा विरुध्दपक्षाकडे जमा केला.
10. तक्रारकर्त्या तर्फे मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-2 व क्रं-3 चे इसारपत्राची प्रत अभिलेखावर दाखल करण्यात आलेली नाही, त्यामुळे विरुध्दपक्षाचे उपरोक्त कथनात सत्यता दिसून येते. ईसारपत्रा मध्ये सुध्दा असे नमुद आहे की, सतत 03 महिने मासिक हप्ता न दिल्यास कुठलीही सुचना न देता प्लॉट रद्द करण्यात येईल व तो दुस-यांना विकण्यात येईल आणि जमा रकमेतून 25% रक्कम कपात करुन उर्वरीत रक्कम कपात करण्यात येईल. या प्रकरणात अन्य काही कारणांमुळे म्हणजे विरुध्दपक्ष फर्म आणि मूळ जमीन मालक श्री यादवराव नामदेवराव येरखेडे यांचेतील मौजा कोहळा, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील जमीनी संबधाने विवाद उत्पन्न झाल्याने जमीनीचा व्यवहार पूर्णत्वाला गेलेला नाही. या संदर्भात विरुध्दपक्षाने स्वतःच चौथे दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठस्तर, नागपूर यांचे समोर कॉम्प्रमाईस डिक्रि वरील दिनांक-18/12/2014 रोजीच्या पारीत आदेशाची प्रत दाखल केलेली आहे, त्यामुळे विरुध्दपक्षाच्यां मौजा कोहळा येथील रद्द झालेल्या जमीनीच्या व्यवहारासाठी तक्रारकर्ता याला जबाबदार धरता येणार नाही म्हणून विरुध्दपक्षाचे जे विधान की, मौजा कोहळा येथील रद्द झालेल्या भूखंडा संबधाने तक्रारकर्त्याने भूखंडापोटी जमा केलेल्या रकमेतून 25% एवढी रक्कम अटी व शर्ती नुसार कपात करावी लागेल यामध्ये अतिरिक्त ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही. उपरोक्त नमुद परिस्थितीमुळे तक्रारकर्त्याचा मौजा कोहळा येथील भूखंड करार रद्द झालेला आहे. विरुध्दपक्षाचे असेही म्हणणे आहे की, मौजा कोहळा येथील भूखंडांचे करार रद्द केल्या नंतर त्यांनी सदर करारावर लाईन ओढून तो करार रद्द केला. जर अशी परिस्थिती नसती तर तक्रारकर्त्याने मौजा कोहळा येथील भूखंडाचे कराराची प्रत नक्कीच अभिलेखावर दाखल केली असती परंतु तक्रारकर्त्या तर्फे सुध्दा रद्द कराराची प्रत अभिलेखावर दाखल करण्यात आलेली नाही.
11. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष तर्फे निर्गमित भूखंडाच्या रकमा मागणी नोटीसच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, ज्यामध्ये दिनांक-03/09/2011 दिनांक-10/08/2012, दिनांक-14/06/2013, दिनांक-14/08/2013 आणि च्या नोटीसच्या प्रतींचा समावेश आहे. परंतु या नोटीस मध्ये जी थकीत रक्कम दर्शविली आहे, ती चुकीची आणि मोठी रक्कम दर्शविलेली आहे, जेंव्हा की तक्रारकर्त्याने बहुतांश रक्कम विरुध्दपक्षाकडे त्यापूर्वीच जमा केलेली आहे, त्यामुळे चुकीच्या नोटीस प्रमाणे तक्रारकर्त्याने जास्तीच्या रकमा विरुध्दपक्षाकडे जमा करणे अभिप्रेत नाही.
12. तक्रारकर्त्याने दोन्ही मौजा कोहळा आणि मौजा सावंगी येथील भूखंडांपोटी एकूण रक्कम रुपये-7,86,565/- जमा केल्याची बाब सिध्द झालेली आहे, त्यामधून विरुध्दपक्षाचे म्हणण्या प्रमाणे 25% कपात रक्कम रुपये-82,890/- उपरोक्त नमुद कारणास्तव कपात करता येणार नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने एकूण रक्कम रुपये-7,86,565/- जमा केल्याचे ग्राहक मंचा तर्फे हिशोबात धरण्यात येते.
13. विरुध्दपक्षांचा मौजा कोहळा येथील मूळ शेतमालकाशी जमीन विक्री संबधी केलेला करार रद्द झालेला असल्याने आपोआपच तक्रारकर्त्याचा मौजा कोहळा येथील भूखंड खरेदीचा करार रद्द होणे स्वाभाविक आहे व मौजा कोहळा येथील भूखंडापोटी तक्रारकर्त्याने जमा केलेली रक्कम ही मौजा सावंगी येथील भूखंड क्रं-1 ते क्रं-4 च्या किमती मध्ये समायोजित केलेली आहे. तक्रारकर्त्याला मौजा सावंगी येथील भूखंड क्रं-1) ते क्रं-4) पोटी एकूण क्षेत्रफळ-8628.087 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-75/- प्रमाणे येणारी रक्कम रुपये-6,47,106/- आणि प्रतीचौरसफूट रुपये-20/- प्रमाणे विकासशुल्काची रक्कम रुपये-1,72,561/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-8,19,667/- विरुध्दपक्षास अदा करावयाची आहे, या प्रमाणे हिशोब केल्यास तक्रारकर्त्याने जमा केलेल्या रकमेची वजावट केली असता तक्रारकर्त्याला अद्दापही विरुध्दपक्षाला भूखंडांपोटी विकासशुल्काचे रकमेसह रुपये-33,102/- एवढी रक्कम देणे आहे, तक्रारकर्त्याने तेवढी राहिलेली शिल्लक रक्कम विरुध्दपक्षास देऊन करारातील भूखंडांचे विक्रीपत्र नोंदवून घ्यावेत.
14. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत त्याने सदर भूखंड हे त्यावर घर बांधण्यासाठी बयानापत्राव्दारे आरक्षीत केले होते. सदर भूखंड हे एकमेकास लागून असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ हे 8628.087 चौरसफूट एवढे आहे, भूखंड हे एकमेकास लागून असल्याने ते निवासी उपयोगासाठी विकत घेतले होते असा निष्कर्ष काढणे चुक होणार नाही.
15. विरुध्दपक्षा तर्फे नोटीसव्दारे चुकीच्या रकमांची मागणी करण्यात आल्यामुळे तक्रारकर्त्याचे मौजा सावंगी येथील भूखंडांचे विक्रीपत्राची नोंदणी होऊ शकलेली नाही, यामध्ये विरुध्दपक्षाची चुक प्रकर्षाने दिसून येते, विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आणि शेवटी ही तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष दाखल करावी लागली. अशापरिस्थितीत विरुध्दपक्षाने मौजा सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील करारातील भूखंड क्रं-01 क्रं-04 चे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्या कडून उर्वरीत रक्कम रुपये-33,102/- स्विकारुन त्याचे नावे नोंदवून देऊन प्रत्यक्ष्य मोक्यावर मोजमाप करुन ताबापत्र द्दावे. भूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्यासाठी येणारा नोंदणी फी व मुद्रांकशुल्काचा खर्च तक्रारकर्त्याने स्वतः सहन करावा परंतु काही कायदेशीर तांत्रिक अडचणीस्तव विरुध्दपक्षास करारातील भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम रुपये-7,86,565/- शेवटच्या रकमेचा हप्ता अदा केल्याचा दिनांक-15/08/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्यास परत करावी. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री विनायक बाळक्रिष्णाजी टिक्कस यांची तक्रार, विरुध्दपक्ष ड्रिम सिटी लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार क्रं-(1) ते (4) अनुक्रमे सर्वश्री गणेश गोखले, किसन प्रजापती, मनोज पारशिवनीकर, रोशन हेडाऊ यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
2) “विरुध्दपक्षानां” आदेशित करण्यात येते की, त्यांनी उभय पक्षांमध्ये झालेल्या दिनांक-27/12/2010 रोजीचे बयानापत्रा प्रमाणे मौज सावंगी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-30, खसरा क्रं-17/2 मधील भूखंड क्रं-01 ते क्रं-04, एकूण क्षेत्रफळ-8628.087 चौरसफूटाचे नोंदणीकृत विक्रीपत्र भूखंडांची एकूण किम्मत विकासशुल्काच्या रकमेसह रुपये- 8,19,667/- मधून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां भूखंडापोटी अदा केलेली रक्कम रुपये-7,86,565/- वजा जाता, तक्रारकर्त्याला उर्वरीत देणे असलेली रक्कम रुपये-33,102/- (अक्षरी रुपये उर्वरीत तेहतीस हजार एकशे दोन फक्त) त्याचे कडून स्विकारुन तक्रारकर्त्याचे नावे विक्रीपत्र नोंदवून देऊन प्रत्यक्ष्य मोक्यावर मोजमाप करुन ताबापत्रासह आवश्यक दस्तऐवज द्दावे. भूखंडांचे विक्रीपत्र नोंदविण्यासाठी येणारा नोंदणी फी व मुद्रांकशुल्काचा खर्च तक्रारकर्त्याने स्वतः सहन करावा.
3) परंतु उपरोक्त नमुद करारातील भूखंडांचे विक्रीपत्र काही कायदेशीर तांत्रिक कारणास्तव तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून देणे विरुध्दपक्षानां शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां अदा केलेली एकूण रक्कम रुपये- रुपये-7,86,565/- (अक्षरी रुपये सात लक्ष श्याऐंशी हजार पाचशे पासष्ठ फक्त) शेवटच्या रकमेचा हप्ता अदा केल्याचा दिनांक-15/08/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षानीं परत करावी.
4) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्यास द्दावेत.
5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष फर्म तर्फे तिचे भागीदार क्रं-1) ते क्रं-4) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.