निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार हे मुळचे वसमत जि. हिंगोली येथील रहिवाशी असून त्यांचे लग्न सन 2008 मध्ये शितल मरकुंदे रा. जांभरुन ता. अर्धापूर जि. नांदेड हिच्याशी झाला. गैरअर्जदार हे नांदेड परिसरातील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ आहेत. विवाहानंतर शितल गरोदर राहिल्याने प्रसुतीकरिता गैरअर्जदार यांचा वैदयकीय सल्ला घेत होत्या. गैरअर्जदार यांनी शितलची दिनांक 03/08/2009 रोजी तपासणी करुन ती एक महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. गैरअर्जदार यांच्या सल्ल्यानुसार शितल नेहमी उपचारासाठी गैरअर्जदार यांच्याकडे येत होती. गैरअर्जदारांनी उपचारादरम्यान दिलेली औषधी नियमितरित्या घेत होती. दिनांक 02/05/2010 रोजी शितल हिला प्रसुतीच्या वेदना होत असल्याने तिला गैरअर्जदाराच्या दवाखान्यात शरीक करण्यात आले. गैरअर्जदाराने रात्रभर शितलचे निरीक्षण करुन तिला लोवर सेक्शन सिझेरीयन सेक्शन (एल.एस.सी.एस.) करण्याचा निर्णय घेतला. दिनांक 03/05/2010 रोजी सकाळी 6.00 वाजताच्या सुमारास स्पायनल अनेस्थेशिया देउन सिझेरीयन करण्यात आले. शितलने एका मुलीस जन्म दिला. ऑपरेशन नंतर 4 ते 6 तासानंतर शितल शॉकमध्ये गेली. गैरअर्जदाराने शितलचा रक्तस्त्राव रोखण्यासाठी तिचे अॅब्डोमेन पुन्हा उघडले. सदर ऑपरेशनमध्ये गैरअर्जदाराने शितलच्या रक्तस्त्राव होणा-या जखमांतून 500 मि.ली. रक्त काढून घेतले. सदर बाब गैरअर्जदाराने त्यांच्या डिस्चार्ज कार्डामध्ये नमूद केलेली आहे. शितलला दिनांक 03/05/2010 रोजी पुन्हा तीन पिशव्या रक्त दिले. तरी देखील तिच्या रक्तातील हिमोग्लोबीचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले. अर्जदार यांनी डॉ. डी.सी. दत्ता व डॉ. सी.एस. डॉन यांचे Text Book of Gynecology and Contraception हे पुस्तक बघीतले असता त्यामध्ये खालील बाबी विशद केलेल्या आहेत.
“Intra abdominal hemorrhage is a major post operative complication in LSCS or abdominal surgeries due to major negligence on the part of the doctor. Due to post operative hemorrhagic shock patients hemoglobin falls to 6.2 gram which was 9.5 gram% before LSCS. Such anemia makes the patients immunally poor and gives the post surgical infection chance to grow.”
शितलला गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात दिनांक 10/05/2010 पर्यंत शरीक होण्याचा सल्ला दिला व दिनांक 10/05/2010 रोजी शितलला गैरअर्जदाराच्या दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. दिनांक 14/05/2010 रोजी तिला लुज मोशन्स, अॅब्डोमिनल पेन आणि फीवर विथ अर्जदार डिस्टेन्डेड अॅब्डोमेन चा त्रास होत असल्याची तक्रार केली. गैरअर्जदाराने दिनांक 14/05/2010 रोजी शितलला तपासल्यानंतर तिला सिम्प्टोमॅटीक ट्रिटमेंट दिली. त्यानंतर शितलला डॉ. काबरा हॉस्पिटल, नांदेड, येथे हलविण्यात आले. डॉ. काबरा यांनी शितलची सर्व कागदपत्रे पाहिली व शितलची तब्बेत पुन्हा रिओपनिंग ऑफ अॅब्डोमेनमुळे खालावत आहे असा निष्कर्ष काढला. डॉ. काबरा यांनी दिनांक 15/02/2010 रोजी एक्स-रे ऑफ चेस्ट आणि यु.एस.जी. अॅब्डोमेन करणेसाठी सूर्यमोहन हॉस्पिटल, नांदेड येथे पाठविले. तपासणी नंतर गैरअर्जदार हे त्यादिवशी बाहेरगावी असल्यामुळे डॉ. काबरा यांनी शितलला विठाई हॉस्पिटल, नांदेड येथे शरीक केले परंतू तेथील डॉक्टरांनी तिच्या तपासणीकडे दुर्लक्ष आणि टाळाटाळ केल्याने तिला दिनांक 16/05/2010 रोजी अश्विनी हॉस्पिटल, नांदेड येथे हलविण्यात आले. अश्विनी हॉस्पिटल नांदेड येथे शरीक केल्यानंतर तिच्या असायटीस फ्ल्यूइड आणि वाढलेले ए.डी.ए., प्रमाणासोबत इमॅशिएशन, फिवर, अॅनोरेक्झिया आणि अॅब्डोमिनल डिस्टेन्शन बाबतचा वैदयकीय इतिहास अभ्यासून तिची पुढील तपासणी अॅब्डोमिनल टयुबरकुलॉसिस विथ हायपोप्रोटेनिया म्हणजेच लो लेवल ऑफ प्रोटीन इन द ब्लडच्या दिशेने केली. तपासणीमध्ये पुन्हा हिपॅटोमेगॅली विथ असाइटीक फ्ल्युइड विथ बायलॅटेरल फ्लुरल इफ्युजन असल्याचे निष्पन्न झाले. शितलला त्रास झालेला असल्याने उच्च वैदयकीय उपचाराकरीता अश्विनी हॉस्पिटलमधून जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला व दिनांक 01/06/2010 रोजी अश्विनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. दिनांक 02/06/2010 रोजी शितलला एशियन इन्स्टिटयुट ऑफ गॅस्ट्रो-इन्ट्रोलॉजी, हैद्राबाद येथे शरीक करण्यात आले व आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर तिला एकेटी म्हणजेच अॅन्टी टुबरकुलार ट्रिटमेंट आणि टॉलेरन्स ऑफ एकेटी ट्रिटमेंट करण्याचा सल्ला दिला. एशियन इन्स्टिटयुट ऑफ गॅस्ट्रो-इन्ट्रोलॉजी, हैद्राबाद येथून दिनांक 09/06/2010 रोजी शितलला डिस्चार्ज दिला व पुढील उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल, नांदेड येथे पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला. अश्विनी हॉस्पिटल नांदेड येथे दिनांक 22/06/2010 रोजी पाठपुरावा करीत असतांना शितल एकेटी ड्रग्स प्रतिसाद देत नव्हती. त्यावेळी अश्विनी हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी शितलला पुन्हा एशियन इन्स्टिटयुट ऑफ गॅस्ट्रो-इन्ट्रोलॉजी, हैद्राबाद येथे शरीक करण्यास सांगितले. दिनांक 23/06/2010 रोजी तिला हैद्राबाद येथे शरीक केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिच्या वैदयकीय तपासण्या केल्या नंतर शितलची तब्बेत डायग्नोस्टीक लॅप्रोस्कॉपी केल्याने स्थिरावू शकते असे ठरविले. दिनांक 24/06/2010 रोजी तिला आय.सी.यु. विभागात हलविण्यात आले आणि तिच्यावर हायर अॅन्टीबायोटीक, व इतर उपचार करण्यात आले परंतू हळूहळू तिचे रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सोबत बायलॅटेरल प्ल्युरल इफ्युजन वाढत होते. ब्रेथलेसनेस रिजॉल्व सोबत प्ल्युरल ड्रेन्स होत असल्याचे पाहून तेथील डॉक्टरांनी डायग्नोस्टीक लॅप्रोस्कॉपी करण्याचा निर्णय घेतला. पण त्या परिस्थितीत आणि शितलच्या ऑपरेशनसाठीच्या असक्षमतेमुळे तेथील डॉक्टरांनी त्या दिवसात तिचे लॅप्रोस्कोपी करण्याचे नाकारले. तेव्हा शितलचे अन्न खाणे देखील बंद झाले होते. तसेच तिचे स्पर्शेद्रिये सुध्दा बदललेले होते. ती बेशुध्द होती. तिने दिनांक 26/07/2010 रोजी रात्री 11.30 वाजता शेवटचा श्वास सोडला.
शितलला दिनांक 03/05/2010 रोजी एल.एस.सी.एस. करण्यात आले आणि तिचा मृत्यु दिनांक 26/07/2010 रोजी झाला. तिच्या एल.एस.सी.एस.च्या आधी तिला कुठलेही मोठे आजार नव्हते. त्यामुळे गैरअर्जदाराने त्यांच्या दवाखान्यात शितलचे केलेले एल.एस.सी.एस. आणि रिओपनींग हेच तिची तब्बेत खालावण्याचे मुळे कारण होते त्यामुळे गैरअर्जदार यांनी तिच्यावर चुकीचा उपचार करुन अनावश्यक ऑपरेशन करुन निष्काळजीपणा केलेला आहे. गैरअर्जदाराने ऑपरेशनसाठी घेतलेली संमती पाहता ती केवळ नाममात्र होती. त्यामध्ये ऑपरेशन मधील धोके शितलला काहीही सांगितलेले नाहीत. अर्जदाराचा शितलला उपचार सुरु झाल्यापासून शेवटपर्यंत एकूण रु.18,00,000/- खर्च झाला. त्यास गैरअर्जदार हे सर्वस्वी जबाबदार आहेत. घडलेल्या सर्व प्रकाराबाबत अर्जदार यांनी दिनांक 29/10/2010 रोजी गैरअर्जदारास कायदेशीर नोटीस पाठविली. गैरअर्जदाराने सदरील नोटीसला दिनांक 03/12/2010 रोजी उत्तर दिले व झालेला प्रकार पूर्णपणे बेजबाबदारपणाने नाकारला. त्यामुळे सदरची तक्रार अर्जदाराने दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांनी वैदयकीय उपचारामध्ये केलेला निष्काजीपणा व त्यामुळे अर्जदाराच्या पत्नीचे झालेले निधन व तद्नुषंगीक वैदयकीय खर्च रु.18,00,000/- गैरअर्जदाराकडून वसूल करुन देण्याबाबतची मागणी अर्जदाराने तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
2. गैरअर्जदार 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
अर्जदाराने दाखल केलेला अर्ज पूर्णतः बेकायदेशीर, खोटया माहितीच्या आधारे केलेला आहे. गैरअर्जदार मागील 22 वर्षापासून नांदेड येथे वैदयकीय व्यवसाय करीत आहेत. गैरअर्जदार यांचे शिक्षण एम.डी. (स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ) झालेले आहे. शितल विवाहानंतर गरोदर राहिल्यानंतर दिनांक 03/08/2010 रोजी गैरअर्जदाराकडे तपासणीसाठी आल्या होत्या त्यावेळी तपासणी करुन वैदयकीय अहवाल घेण्यात आला. शितल गरोदर असतांना गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात गरजेप्रमाणे तपासणीसाठी येत होती. त्यावेळी गैरअर्जदाराने योग्यती तपासणी करुन वैदयकीय अहवाल घेवून उपचार केलेला आहे. दिनांक 03/05/2010 रोजी शितल हिला प्रसुती वेदना होत असल्याने गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात तिला शरीक करण्यात आले. त्यावेळी तपासणी करुन शितलच्या होणा-या बाळाचे ठोके कमी जास्त होत असल्यामुळे, तसेच होणा-या बाळाने शितलच्या गर्भाश्यात संडास केल्यामुळे लोवर सेगमेन्ट सिझेरीयन सेक्शन (LSCS) करण्याचा सल्ला अर्जदार व त्यांच्या कुटूंबियांना गैरअर्जदाराने दिला. त्यानुसार शितल व तिच्या नातलगांची लेखी संमती घेवून पुढील उपचार गैरअर्जदाराने केले. शितल हिने 3.2 कि.लो. वजन असणा-या बाळास जन्म दिला. गैरअर्जदार रुग्ण/शितलची वारंवार तपासणी करीत होते. शितलचे LSCS झाल्यानंतर अंदाजे 4 तासानंतर शितलची बी.पी. कमी होत होती म्हणून गैरअर्जदारांना शितलच्या पोटामध्ये रक्तस्त्राव होत असल्याची शंका आली. त्यावरुन गैरअर्जदाराने शितल व तिच्या कुटूंबियांच्या संमतीने परत शस्त्रक्रिया करुन योग्य ते उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गैरअर्जदाराने त्यांच्यासोबत भूलतज्ञ डॉक्टर अतूल, स्त्रीरोगतज्ञ डॉ. अतनुरकर यांना घेवून शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया योग्य आणि चांगल्या परिस्थितीत झाल्याने शितलची प्रकृती दैनंदिन सुधारत होती. दिनांक 10/05/2010 रोजी शितलची प्रकृती चांगली झाल्यानंतर गैरअर्जदाराने रुग्णास दवाखान्यातून घरी पाठवले. त्यावेळी शितल गैरअर्जदाराच्या दवाखान्यातून व्यवस्थीत व चांगल्यारितीने चालत गेली. त्यावेळी तिला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा आजार नव्हता. यावरुन गैरअर्जदाराने केलेले उपचार हे निष्काळजीपणाने केले असे म्हणणे खोटे आहे. दिनांक 14/05/2010 रोजी संध्याकाळी रुग्ण शितल हिला संडास व पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे पुन्हा गैरअर्जदाराकडे तपासणीसाठी आणले. त्यावेळी शितलची तपासणी केली असता तिची प्रकृती व्यवस्थीत होती, बी.पी. योग्य होती. शस्त्रक्रिया करण्यात आलेली जखम व्यवस्थीत होती. रक्तस्त्राव नव्हता व शस्त्रक्रियेबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. तरी पण रुग्ण शितल यांना रात्रीच्या वेळी वैदयकीय अधिका-याचे देखरेखीखाली राहण्यासाठी सल्ला दिला. दिनांक 15/05/2010 पासून गैरअर्जदार व त्यांचे कुटूंबीय 10 दिवसासाठी परगावी त्यांच्या नियोजित ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे जाणार असल्यामुळे शितलला डॉ. काबरा यांच्या दवाखान्यात पाठवले. डॉ. काबरा यांनी शितलला काय वैदयकीय सल्ला दिला, कोणत्या तपासण्या केल्या याबद्दल गैरअर्जदार यांना काहीही माहिती नाही. तसेच त्यानंतर शितलला विठाई हॉस्पीटल व अश्विनी हॉस्पीटल, नांदेड येथे का नेले याबद्दल गैरअर्जदार यांना काहीही माहिती नाही. दिनांक 16/05/2010 ते 01/06/2010 या कालावधीत अश्विनी हॉस्पीटल नांदेड येथे शितल अंतररुग्ण म्हणून दाखल केले असता तेथील वैदयकीय अधिका-यांनी शितलच्या केलेल्या तपासण्याबद्दल गैरअर्जदारास माहिती नाही. अर्जदाराने न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रावरुन शितल ‘पोटाचा क्षयरोग (TB)’ झाल्याबद्दलचे मत व्यक्त केलेले आहे. असे आजार रुग्णास केव्हाही होवू शकतात. त्यासाठी गैरअर्जदाराने केलेली शस्त्रक्रिया किंवा केलेला उपचार हे कारण होवू शकत नाही. दिनांक 02/06/2010 ते 09/06/2010 या कालावधीमध्ये शितलने ‘एशियन इन्स्टिटयुट ऑफ गॅस्ट्रो-इन्ट्रोलॉजी, हैद्राबाद’ येथे उपचार घेतलेले आहेत. तेथील अधिका-यांनी शितलची तपासणी व वैदयकीयह अहवाल घेवून त्यांना ‘पोटाचा क्षयरोग (TB)’ झाल्याबद्दलचे मत व्यक्त केले व त्यानुसार उपचार केले. गैरअर्जदार यांनी दि. 03/5/2010 रोजी शितलचे LSCS केल्यानंतर तिच्यावर परत शस्त्रक्रिया केल्यानंतर तिची प्रकृती चांगली झाली व तिला दिनांक 10/05/2010 रोजी घरी पाठविण्यात आले. त्यावेळी तिच्या प्रकृतीमध्ये कोणतीही गुंतागुंत किंवा दोष नव्हता. दिनांक 14/05/2010 नंतर शितलने जवळपास आडीच महिने वेगवेगळया हॉस्पीटलमध्ये व विविध वैदयकीय तज्ञांकडून घेतलेल्या उपचाराबद्दल गैरअर्जदारास काहीही माहिती नाही. त्याकाळामध्ये शितलचे नातलग कधीही गैरअर्जदाराकडे आलेले नाहीत. शितलच्या मृत्युस गैरअर्जदाराने केलेला वैदयकीय इलाज कारणीभूत होत नाही. अर्जदाराने तक्रारीमध्ये लिहिलेली कारण मिमांसा ही फक्त न्ययालयाची सहानुभूती मिळविण्यासाठी दाखवलेली आहे. गैरअर्जदार यांनी शितलवर केलेल्या वैदयकीय उपचारात निष्काळजीपणा केलेला नाही. उलट सर्व बाबींची योग्य अशी दखल घेवून रुग्ण चांगला व्हावा म्हणून केलेला उपचार आहे. गैरअर्जदाराने शितलवर केलेल्या उपचारात निष्काळजीपणा न केल्यामुळे सदरील अर्ज नामंजूर करण्यात यावा. अर्जदाराने प्रकरण दाखल केल्यानंतर न्यायालयाने केलेल्या आदेशाप्रमाणे ‘श्री गुरुगोविंदसिंगजी शासकीय रुग्णालय नांदेड’ येथील वैदयकीय अधिका-यांच्या कमेटीचा अहवाल सर्वसंबंधीत माहिती देवून मागविण्यात आला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वैदयकीय अहवाल दिनांक 27/06/2011 रोजी प्रकरणात दाखल करण्यात आला. त्या अहवालावरुन ही बाब स्पष्ट होते की, गैरअर्जदाराने शितलवर केलेल्या वैदयकीय ईलाजात निष्काळजीपणा दिसून आलेला नाही. गैरअर्जदाराने नॅशनल इंन्शुरन्स कंपनी तर्फे त्यांच्या वैदयकीय व्यवसायाबद्दलचा विमा दिनांक 28/08/2009 ते 27/02/2010 या काळात घेतलेला आहे. अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून काही देणे योग्य वाटत असल्यास ती रक्कम देण्याची जबाबदारी नॅशनल इन्शुरन्स कंपनी शाखा नांदेड यांच्यावर टाकण्यात यावी. गैरअर्जदाराचे हे म्हणणे पर्यायी म्हणून विचार ठरावा. वरील सर्व बाबींचा, कायदेशीर तरतुदीचा व वैदयकीय कमीटीच्या अहवालाचा विचार करुन अर्जदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब खालील प्रमाणे.
गैरअर्जदार क्र. 1 यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांच्या कडून पॉलिसी घेतलेली असून गैरअर्जदार क्र. 2 न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा प्रकरणाची काहीही संबंध नाही.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार यांची पत्नी शितल ही गरोदर राहिल्यानंतर गैरअर्जदार यांच्याकडे उपचार घेत असल्याचे दोन्ही बाजुंना मान्य आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या तक्रार व लेखी जबाबामध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास वेळोवेळी तपासणीसाठी बोलावून नियमितपणे उपचार दिलेले असल्याचे मान्य केलेले आहे. अर्जदार यांच्या तक्रारीवरुन शितल हीस प्रसुतीसाठी दिनांक 02/05/2010 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे शरीक करण्यात आल्यानंतर दिनांक 03/05/2010 रोजी गैरअर्जदार यांनी शितल हिच्यावर सिझेरीयन शस्त्रकिया केली. त्यानंतर 4 ते 6 तासानंतर शितल शॉकमध्ये गेली त्यामुळे गैरअर्जदाराने शितलचा रक्तस्त्राव रोकण्यासाठी तिच्यावर पुन्हा रिओपन अॅब्डोमेन अशी शस्त्रक्रिया केली व रक्तस्त्राव होणा-या जखमेतून 500 मि.ली. रक्त काढून घेतले. त्यानंतर गैरअर्जदाराने दिनांक 10/05/2010 ला शितलला डिस्चार्ज दिला. दिनांक 14/05/2010 पासून शितलला लुज मोशन्स, अॅब्डोमिनल पेन आणि ताप येणे असा त्रास सुरु झाला त्यामुळे गैरअर्जदार यांच्याकडे तपासणीसाठी शितलला नेले असता गैरअर्जदार यांनी उपचार करुन गैरअर्जदार यांना त्यांच्या पूर्वनियोजित कामामुळे बाहेरगावी जावयाचे असल्याने गैरअर्जदार यांनी शितलला डॉ. काबरा यांच्याकडे उपचारासाठी पाठवले. त्यानुसार शितलवर विविध हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले व दिनांक 26/07/2010 रोजी शितलचा मृत्यु झाला. गैरअर्जदार यांनी दिनांक 03/05/2010 रोजी शितलवर केलेल्या सिझेरीयन शस्त्रक्रियेमध्ये झालेल्या गुंतागुंतीमुळे शितलचा मृत्यु झालेला असल्याची प्रमुख तक्रार अर्जदाराची आहे. त्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या विविध उपचाराची कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत. तसेच शितलला वेगवेगळया हॉस्पीटलमध्ये केलेल्या उपचाराची सर्व कागदपत्रे अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार यांनी शितल त्यांच्या दवाखान्यात प्रसुतीसाठी भरती झाल्यानंतर गैरअर्जदाराने शितल हिची तपासणी करुन बाळाचे ठोक कमी-जास्त होत असल्याने व बाळाने शितलच्या गर्भाश्यात संडास केलेली असल्याने बाळ व शितलच्या जिवितास धोका निर्माण होवू शकत असल्याने शितलवर सिझेरीयन करण्याचा निर्णय घेतला. सदर बाब ही वैदयकीय शास्त्रनुसार योग्य आहे. शितलवर सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यानंतर शितलने 3.5 किलो वजन असलेल्या बाळास जन्म दिलेला असल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. दिनांक 03/05/2010 रोजी 9.00 वाजता शितलवर सिझेरीयन शस्त्रक्रिया करण्यात आलेली असल्याचे गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या केस पेपवरुन दिसून येते. त्यानंतर शितलचा बी.पी. कमी होत असल्याने शितलची तपासणी केली. त्यामध्ये शितलच्या पोटात रक्तस्त्राव होत असल्याने गैरअर्जदाराने भुलतज्ञ व स्त्ररोगतज्ञ यांच्या मदतीने शितलवर लगेच शस्त्रक्रिया करुन त्यामध्ये झालेल्या गुंतागुंतीचे निराकरण केलेले आहे. केस पेपर्सचे अवलोकन केले असता शितलचा बी.पी. नॉर्मल म्हणजेच 110-70 असा होत असून शितलची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून येते. दिनांक 10/05/2010 रोजी शितलची प्रकृती नॉर्मल झाल्याने गैरअर्जदाराने शितलला रुग्णालयातून सुट्टी दिलेली आहे. त्यानंतर दिनांक 14/05/2010 रोजी शितलला ताप, पोटदुखी व संडासचा त्रास होत असल्याने शितल उपचारासाठी पुन्हा गैरअर्जदार यांच्याकडे गेलेली होती परंतू गैरअर्जदार यांनी शितलवर उपचार करुन शितलला डॉ. काबरा यांच्याकडे पुढील उपचारासाठी पाठवलेले आहे. त्यानंतर शितलने विठाई हॉस्पीटल, नांदेड, अश्विनी हॉस्पीटल, नांदेड तसेच ‘एशियन इन्स्टिटयुट ऑफ गॅस्ट्रो-इन्ट्रोलॉजी, हैद्राबाद’ येथे उपचार घेतलेले आहेत. अश्विनी हॉस्पीटल, नांदेड येथे शितलवर झालेल्या उपचाराची कागदपत्रे बघीतली असता अश्विनी हॉस्पीटलमधील वैदयकीय अधिका-यांनी शितलच्या गुंतागुंतीची तपासणी करुन शितलला ‘पोटाचा क्षयरोग (TB)’ झालेला असल्याचे निदान केलेले आहे व त्यानुसार शितलवर ‘पोटाचा क्षयरोग (TB)’ चे उपचार देखील केलेले आहेत. परंतू सदरील उपचारास शितल प्रतिसाद देत नसल्याने अश्विनी हॉस्पीटल नांदेड यांनी शितलला ‘एशियन इन्स्टिटयुट ऑफ गॅस्ट्रो-इन्ट्रोलॉजी, हैद्राबाद’ येथे उपचारासाठी पाठवलेले होते. तेथील वैदयकीय अधिका-यांनी शितलची तपासणी करुन शितलला ‘पोटाचा क्षयरोग (TB)’ झालेला असल्याचे निदान केलेले आहे, ही बाब अर्जदाराने तक्रारीमध्ये नमूद केलेली आहे. शितलच्या केलेल्या तपासणीच्या अहवालावरुन शितलला बायलॅटेरल प्ल्युरल इफ्युजन झालेला असल्याचे दिसून येते. यावरुन शितलला टी.बी. असल्याचे केलेले निदान हे योग्य आहे. उपचारा दरम्यान शितलचा दिनांक 26/07/2010 रोजी मृत्यु झालेला आहे. सदर मृत्यु हा शिलला झालेल्या ‘पोटाचा क्षयरोगामुळे झालेला असल्याचे सर्व तपासण्यांच्या अहवालावरुन निदर्शनास येते.
गैरअर्जदार यांनी शितलवर फक्त सिझेरीयन शस्त्रक्रिया केलेली आहे. सदर शस्त्रक्रियेनंतर जी गुंतागुंत निर्माण झालेली होती तिचे निराकरण गैरअर्जदाराने त्वरीत केलेले आहे व रुग्णास योग्य ती काळजी गैरअर्जदाराने घेतलेली असल्याने रुग्ण योग्यरित्या स्टेबल होवून घरी गेलेला आहे. त्यानंतर 4 दिवसांनी रुग्णास पोटाच्या क्षयरोगाचा त्रास सुरु झाला. यासाठी गैरअर्जदार यांनी केलेली सिझेरीयन शस्त्रक्रिया शितलच्या मृत्युस कारणीभूत आहे असे म्हणता येणार नाही.
सदरील तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने तज्ञाचा अहवाल मागवण्यासाठी प्रस्तुत प्रकरण गुरुगोविंदसिंघजी रुग्णालय, नांदेड यांच्याकडून तज्ञाचा अहवाल मागवला. सदरील प्रकरणात पाच जणांच्या कमेटीने खालीलप्रमाणे अहवाल दिलेला आहे.
वैदयकीय अहवाल – उपलब्ध पेपर्सनुसार असे निदर्शनास येते की, रुग्ण शितल ननगेराव कोटे, वय 25 वर्षे रा. वसमत ही दिनांक 02/05/2010 रोजी बाळंतपणासाठी डॉ. शोभा तोष्णीवाल यांचे मॅटरनीटी हॉस्पिटलमध्ये भरती झाली त्यानंतर दिनांक 03/05/2010 रोजी सकाळी 6.00 वाजता नातेवाईकांना कल्पना देवून सिझेरियन करण्यात आले. तदनंतर रुग्ण शॉकमध्ये गेल्यामुळे संबंधित डॉक्टरांनी परत ऑपरेशन करुन होणारा रक्तस्त्राव थाबविला. रुग्णास दिनांक 10/05/2010 रोजी चांगल्या अवस्थेत रुग्णालयातून सुटी करण्यात आली.
दिनांक 14.05.2010 रोजी पोटात दुखणे व लुज मोशन आणि ताप याचा त्रास होत असल्यामुळे तपासणीसाठी परत डॉ.शोभा तोष्णीवाल यांचे रुग्णालयात आले व त्यांनी उपचार केला व त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णास दिनांक 15.05.2010 रोजी डॉ.काबरा यांचेकडे पुढील उपचाराकरीता नेले असता त्यांनी तपासणीनंतर विठाई हॉस्पीटल येथे भरती केले.
तदनंतर दिनांक 16.05.2010 रोजी नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णास आश्विनी हॉस्पीटल येथे भरती केले व दिनांक 01.06.2010 रोजी रुग्णास डिस्चार्ज करण्यात आले. त्यावेळी त्याचे रोगनिदान Operated L.S.C.S. with Koch’s Abdoman असे आहे व डॉक्टरांनी सुटटी करुन पुढील उपचाराकरीता हैद्राबाद येथे पाठविले.
त्यानंतर रुग्ण दिनांक 02.06.2010 ते 09.06.2010 पर्यंत एशियन इन्स्टीटयूड ऑफ गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी, सोमाजीगुडा,हैद्राबाद येथे पुढील उपचाराकरीता भरती होती. उपचारादरम्यान विविध तपासण्या झाल्यानंतर Ascities with Bilateral Pleural Effusion(? Tuberculor Etiology) म्हणून निदान झाल्यावर दिनांक 09.06.2010 रोजी T.B. औषध देऊन सुटटी करण्यात आली.
दिनांक 22.06.2010 रोजी रुग्ण आश्विनी हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी गेले असता तेथील डॉक्टरांनी सुरु उपचारास प्रतिसाद देत नसल्यामुळे रुग्णास पुढील उपचारासाठी पुन्हा एशियन इन्स्टीटयूड ऑफ गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी, सोमाजीगुडा,हैद्राबाद येथे शरीक करण्यास सांगितले. त्यानुसार दिनांक 23.06.2010 रोजी रुग्णास हैद्राबाद येथे भरती करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरु असतांना दिनांक 26.07.2010 रोजी रात्री 11.30 वाजता रुग्णाचा मृत्यु झाला.
निष्कर्ष
वरील केसचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे.
1. रुग्णाचे L.S.C.S. ही शस्त्रक्रीया ही नियमाप्रमाणे करण्यात आली.
2. शस्त्रक्रीया झाल्यानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीचा त्याच दिवशी ऑपरेशन करुन उपचार करण्यात आला.
3. त्यानंतर 07 दिवसांनी दिनांक 10.06.2010 रोजी चांगल्या अवस्थेत रुग्णाला सुटी देऊन घरी पाठविले.
4. त्यानंतर दिनांक 14.06.2010 ते दिनांक 26.07.2010 हया कालावधीत वेगवेगळया हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. या दरम्यान रुग्णाचे रोगनिदान Ascities with Bilateral Pleural Effusion(? Tuberculor Etiology) असे करण्यात आले.
या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर समितीच्या सर्व सदस्य हे एकमताने या निष्कर्षास पोहचतात की, सदर रुग्णावर L.S.C.S. ही शस्त्रक्रीया व त्यानंतर झालेली गुंतागुंत व त्यावर केलेला तात्काळ उपचार हा योग्य होता. त्याबद्दल संबंधीत डॉक्टरांचा निष्काळजीपणा दिसून येत नाही.
संबंधीत रुग्णाला नंतरच्या काळात Abdominal Tuberculosis म्हणून निदान करण्यात आले. सदर अजार सुप्तावस्थेत कुणातही राहू शकतो व नंतर तो केव्हाही Active होऊ शकतो.
डॉ. आर.जी. गुट्टे डॉ. एस. बी. मोरे डॉ. किरण खैराटकर डॉ. एस. एस. सिरसम डॉ. एस. पी. पाटील
सर्जन तथा फिजिशियन तथा नि.वै.अ. तथा स्त्रीरोग तज्ञ तथा जिल्हा शल्यचिकित्सक
सदस्य सदस्य सदस्य सदस्य अध्यक्ष
सदरील अहवालातील निष्कर्षाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी शितल हिस दिलेल्या वैदयकीय उपचारामध्ये काहीही निष्काळजीपणा केलेला असल्याचे दिसून येत नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांना शितलवर केलेल्या सिझेरीयन शस्त्रक्रियेमुळे शितलचा मृत्यु झालेला आहे याबद्दल कुठलाही पुरावा मंचासमोर दिलेला नाही. शितलचा मृत्यु हा ‘पोटाचा क्षयरोगामुळे झालेला असल्याने गैरअर्जदार हे शितलच्या मृत्युस जबाबदार नाहीत. वैदयकीय शास्त्रानुसार क्षयरोग व सिझेरीयनची शस्त्रक्रिया हे दोन्ही आजार भिन्न असून त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी शितलवर केलेल्या सिझेरीयन शस्त्रक्रियेमध्ये कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.