नि.नं. ६६
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २३१२/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – ०५/०२/२०१०
तक्रार दाखल तारीखः – ०९/०३/२०१०
निकाल तारीखः - २१/०१/२०१२
----------------------------------------------
श्री चंद्रकांत आण्णा धारे
वय वर्षे ३४, धंदा – धान्य व्यापारी
रा.धान्य ओळ, शाळा नं.२, इचलकरंजी,
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर .... तक्रारदार
विरुध्द
१. डॉ सलिम मुसा मुल्ला
मुल्ला क्लिनिक, कुरणे गल्ली,
शिराळा, जि.सांगली
२. डॉ सौ कृष्णा नितीन जाधव
रा.शिराळा जि.सांगली
३. डॉ रहिम मुसा मुल्ला
शिराळा प्राध्यापक कॉलनी,
नशेमन बंगला, मु.पो.ता.शिराळा जि. सांगली
४. मुल्ला क्लिनिक
कुरणे गल्ली, शिराळा जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री आर.के.देसाई
जाबदार क्र.१ ते ४ तर्फेः +ìb÷. श्री बी.बी.मुजावर
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. जाबदार क्र.१ व २ डॉक्टरांनी सिझेरियन करुन तक्रारदारांच्या पत्नीचे बाळंतपण केले. सिझेरियनचे वेळी जाबदार क्र.१ व २ या डॉक्टरांकडून जो निष्काळजीपणा झाला त्यामुळे तक्रारदारांच्या पत्नीला जीव गमवावा लागला. त्यामुळे तक्रारदारांचे जे अपरिमित नुकसान झाले त्याच्या भरपाईकरिता त्यांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे –
२. तक्रारदार हे धान्य व्यापारी असून ते त्यांची पत्नी सौ पल्लवी हीचेबरोबर इचलकरंजी येथे रहात होते. दि.६/७/२००८ रोजी सौ पल्लवी हीला जाबदार क्र.१ डॉ सलीम मुसा मुल्ला यांचे शिराळा येथील दवाखान्यात (जाबदार क्र.४) बाळंतपणासाठी भरती केले. सौ पल्लवी हीचे बाळंतपण नैसर्गिकरित्या होवू शकत नव्हते. म्हणून डॉ सलीम मुल्ला व जाबदार क्र.२ डॉ सौ कृष्णा नितीन जाधव रा.शिराळा यांनी जाबदार क्र.३ डॉ रहीम मुसा मुल्ला यांचे मदतीने सौ पल्लवीचे सिझेरीन केले. तक्रारदार व सौ पल्लवीला मुलगी झाली. त्यानंतर सौ पल्लवीच्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करुन तिला दि.१४/७/२००८ रोजी डिस्चार्ज देणेत आला. सौ पल्लवीच्या बाळंतपणासाठी म्हणून जाबदारांनी तक्रारदारांकडून रक्कम रु.९,३००/- स्वीकारले असे तक्रारदारांचे कथन आहे.
तक्रारदार पुढे असेही कथन करतात की, डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसरे दिवशी म्हणजे दि. १५/७/२००८ रोजी सकाळी सौ पल्लवीचे पोट फुगून पोटात कळा येण्यास सुरुवात झाली व तिला तापही आला. म्हणून तिला पुन: त्याचदिवशी जाबदार क्र.१ डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला मलावरोध (Constipation) झाल्याकारणाने त्रास होत असल्याचे सांगून औषधे दिली.
दि.१६/७/२००८ रोजी सौ पल्लवीला डॉ सलीम मुल्ला यांनी जाबदार क्र.२ डॉ कृष्णा जाधव यांचे हॉस्पीटलमध्ये सोनोग्राफीसाठी नेले. त्यावेळी सौ पल्लवीच्या उदरात (abdomen) मध्ये “पू” (Pus) झाल्याचे आढळून आले. म्हणून जाबदार क्र.१ डॉ सलीम मुल्ला यांनी सौ पल्लवी हिला पुढील औषधोपचारासाठी स्वत:च्या गाडीतून इस्लामपूर येथील डॉ पोतदार यांचेकडे नेले. तिथे पुन: तिची सोनोग्राफी करणेत आली व त्यातही तिच्या उदरात (abdomen) मध्ये “पू” (Pus) झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉ सलीम मुल्ला यांनी स्वत:हून सौ पल्लवीला इस्लामपूर येथील डॉ चौगुले यांचे हॉस्पीटलमध्ये भरती केले. परंतु सौ पल्लवीची तब्येत चिंताजनक बनू लागल्याने तिच्या नातेवाईकांबरोबर चर्चा करुन त्याचदिवशी संध्याकाळी पुढील उपचारासाठी तिला कोल्हापूर येथील “सी.पी.आर.” हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. त्यावेळी तिचे पोट फुगलेले होते व ते दुखतही होते.
सी.पी.आर.हॉस्पीटलमध्ये “सब+ìक्यूट बॅक्टेरिअल पेरिटोनीटीस”(Sub-acute bacterial peritonitis)असे तात्पुरते (Provisional) निदान करुन त्याचदिवशी सौ पल्लवीवर पुन्हा शस्त्रक्रिया करणेत आली. या शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या उदराच्या पोकळीतून जवळ-जवळ एक लिटर घाण वासाचा पू (Pus) व १२ इंच X १२ इंच मापाचा एक सर्जिकल मॉप बाहेर काढणेत आला. याची नोंद C.P.R. हॉस्पीटलच्या ऑपरेटीव्ह नोट्स मध्ये करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर C.P.R. हॉस्पीटल मधील डॉक्टरांचे “Retained Intra Peritoneal foreign body with Peritonitis”असे सौ पल्लवीच्या आजारपणाबाबतचे अंतिम मत होते. त्यानंतर देखील पल्लवीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने व तिला व्हेंटीलेटरवर ठेवणेची आवश्यकता होती. परंतु सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये व्हेंटीलेटरची सोय नसल्याने तिला कोल्हापूर येथीलच आधार नर्सिंग होममध्ये हलविण्यात आले. परंतु तिथे तिचा मृत्यू झाला.
आणि म्हणून तक्रारदारांची जाबदार डॉ सलीम मुल्ला यांचेविरुध्द अशी जोरदार तक्रार आहे की, एकतर ते आयुर्वेदिक डॉक्टर असताना सुध्दा त्यांनी सौ पल्लवीचे सिझेरीयन केले. त्यावेळी त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच सिझेरियन नंतरही त्यांनी तिची योग्य ती काळजी घेतली नाही (Post operative and pre-operative care). अशा रितीने डॉ सलीम मुल्ला यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सौ पल्लवी हीस सदोष वैद्यकीय सेवा पुरविली आणि परिणाम स्वरुप म्हणून सौ पल्लवीचा मृत्यू झाला.
तक्रारदारांच्या कथनानुसार डॉ सलीम मुल्ला यांनी सौ पल्लवी हिची सिझेरियन नंतर सी.टी.स्कॅन किंवा सोनोग्राफी करणे आवश्यक होते. तेही त्यांनी केले नाही. सौ पल्लवीचे सिझेरीयन जाबदार क्र.१ बरोबरच जाबदार क्र.२ डॉ सौ कृष्णा नितीन जाधव व जाबदार क्र.३ डॉ रहीम मुसा मुल्ला यांनीही केले आहे. आणि म्हणून तिच्या उदर पोकळीत जो “सर्जिकल मॉप”राहिला त्या निष्काळजीपणास जाबदार क्र.२ व ३ हे देखील जबाबदार आहेत. तसेच ज्या हॉस्पीटलमध्ये सौ पल्लवचे सिझेरियन झाले ते डॉ सलीम मुल्ला यांचे हॉस्पीटल देखील सौ पल्लवीच्या मृत्यूस जबाबदार आहे.
जाबदार डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारांना त्यांचे पत्नीस व त्यांच्या मुलीस जन्मत:च तिच्या आईस मुकावे लागल्याने तक्रारदारांचे सर्वार्थाने अतोनात नुकसान झाले आहे असे तक्रारदार यांचे कथन आहे. तक्रारदारांनी जाबदार डॉक्टरांकडे निदान त्यांच्या मुलीच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. परंतु जाबदार डॉक्टरांनी त्यांना दाद दिली नाही. आणि म्हणून या नुकसान भरपाईसाठी तक्रारदारांना मयत सौ पल्लवीचे पती या नात्याने कायदेशीर वारस म्हणून स्वत:साठी व त्यांची मुलगी कु.अनुष्कासाठी सदरहू तक्रारअर्ज दाखल करावा लागलेला आहे असेही तक्रारदारांचे कथन आहे.
तक्रारअर्जात तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच सौ पल्लवीच्या मृत्यूमुळे त्यांचे व त्यांच्या मुलीचे जे नुकसान झाले तसेच त्यांना जो शारिरिक व मानसिक त्रास झाला त्याकरिता म्हणून एकूण रक्कम रु.१९,००,०००/- ची मागणी केली आहे. तर तक्रारअर्ज व अनुषंगिक खर्चापोटी म्हणून एकूण रक्कम रु.३०,०००/- ची मागणी केली आहे. तक्रारदारांनी सर्व मिळून एकूण रक्कम रु.१९,३०,०००/- ची व्याजासह मागणी प्रस्तुत प्रकरणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करुन नि.५ अन्वये एकूण २५ कागदपत्रे दाखल केली आहेत.
२. मंचाच्या नोटीसीची बजावणी जाबदार क्र.१ ते ४ यांचेवर झाल्यावर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांनी त्यांचे एकत्रित म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले. त्यांचे म्हणण्यात त्यांनी तक्रारदारांचा तक्रारअर्ज व त्यातील कथने पूर्णपणे नाकारलेली आहेत.
त्यांचे म्हणण्यानुसार त्यांनी मयत सौ पल्लवी हिचेवर पूर्णपणे मोफत उपचार केलेले आहेत. तिला केवळ औषधाचा खर्च करावा लागला होता. रक्कम रु.९,३००/- चे जे बिल तिला देणेत आले होते ते औषधाचे होते, तो सेवा मोबदला नव्हता. तिची वैद्यकीय सेवा ही पूर्णपणे मोफत होती. त्यामुळे सदरहू तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत येत नाही.
जाबदार पुढे असेही म्हणणे मांडतात की, मयत सौ पल्लवी हीच्या अज्ञान मुलीच्या पालनकर्त्यांनी तिच्या वतीने दिवाणी न्यायालयात भरपाई मिळणेसाठी स्पे.दि.मु. क्र.९२/२००९ दाखल केला असल्याने याच कारणावरुन पुन्हा दावा दाखल होवू शकत नाही. त्याचप्रमाणे तक्रारदारांचा कोल्हापूर येथील ग्राहक मंचातील तक्रारअर्जही ज्युरिस्डीक्शनच्या (Jurisdiction) च्या कारणावरुन नामंजूर झाला होता. तो तक्रारअर्ज तक्रारदारांनी जसाच्या तसा या मंचात दाखल करणे आवश्यक होते. तथापि तक्रारदारांनी तसे न केल्याने या तक्रारअर्जास “दुबार” स्वरुप आले आहे. या जाबदारांनी पुढे असेही म्हणणे मांडले आहे की, मंचास पाच लाखापर्यंतचे ज्युरिसडिक्शन आहे आणि या सर्व कारणांचा विचार करता तक्रारदारांचा तक्रारअर्ज या मंचापुढे चालणेस पात्र नाही.
जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यात मयत सौ पल्लवीने जाबदारांव्यतिरिक्त अन्य डॉक्टरांकडूनही औषधोपचार घेतल्याने त्यांनाही प्रस्तुत प्रकरणी जाबदार म्हणून सामील करणे आवश्यक असल्याचे नमूद करुन तसे न केल्याने प्रस्तुत प्रकरणी Non joinder of necessary parties या न्यायतत्वाचा बाध येत असल्याचा आक्षेप घेतला आहे. तसेच मयत सौ पल्लवी ही अल्पवयीन होती व त्यातच तिचा दोन वेळा गर्भपात झाला होता. त्यातच पुन्हा आलेल्या या अल्पवयीन मातृत्वामुळे तिची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. असे म्हणणे मांडून त्याचा संबंध तिच्या आजारपणाशी लावला आहे.
जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यात मयत सौ पल्लवी हीच्या बाळंतपणाची तारीख उलटून गेल्याबाबतचे तसेच तिचे सिझेरियन करण्यात आल्याचे तसेच डॉ जाधव, डॉ पोतदार व डॉ उमेश चौगुले यांचेकडे तिची सोनोग्राफी केल्याचे व त्यांनी तिच्या उदरपोकळीत द्रव संचय (पू) झाल्याचे तक्रारदारांचे कथन मान्य केले आहे. मात्र त्यामध्ये स्पॉंजचा तुकडा आढळल्याचे तक्रारदारांचे कथन अत्यंत जोरदारपणे अमान्य केले आहे. त्यासाठी त्यांनी सी.पी.आर.मधील केस समरीमध्ये सर्जिकल मॉप काढल्याची नोंद नसल्याचाही दाखला दिला आहे व सोनोग्राफी व एक्स-रेमध्ये स्पंज आढळला नसल्याने जाबदार हे निर्दोष असल्याचे म्हणणे मांडले आहे.
या जाबदारांच्या म्हणण्यानुसार मयत सौ पल्लवीच्या नातेवाईकांच्या हट्टापायी तिला प्रथम पेठ वडगांव येथील डॉक्टरांकडे व त्यानंतर सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले, यात नाहक वेळ वाया गेला. त्यामुळे त्या वेळात तिच्यावर परिणामकारक उपचार करता आले नाहीत. मात्र या सर्व प्रवासात जाबदार क्र.१ डॉक्टर कायम तिच्या सोबत होते व तेच स्वखर्चाने माणुसकीच्या नात्याने तिचा हा प्रवास करीत होते.
या जाबदारांनी मयत सौ पल्लवी हीच्या उदरपोकळीत एक ते दीड लिटर इतक्या मोठया प्रमाणात पू असल्याचे तक्रारदारांचे कथन अमान्य केले आहे. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार एवढया मोठया प्रमाणात पू असणारा पेशंट चालू फिरु शकत नाही, तो वेदनेने घायाळ होतो. मात्र सौ पल्लवी ही अत्यवस्थ तर नव्हतीच उलट चालत बोलत ती सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये +ìडमिट झाली. जाबदार पुढे असेही म्हणणे मांडतात की, सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये तिच्यावर ऑपरेशन करीत असताना तिला योग्य प्रमाणात ऑक्सीजन न मिळाल्याने तिच्या मेंदूस ऑक्सीजन कमी पडून तिला फीट्स आल्या. कृत्रिम ऑक्सीजनची सोय सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये नसल्याने स्वत:चे जबाबदारीवरवैद्यकीय सल्ल्याविरुध्द (A.M.A.D.) तिला आधार नर्सिंग होममध्ये नेले. त्या प्रवासा दरम्यान तिला ऑक्सीजन देण्यात तिच्या नातेवाईकांनी अत्यंत हयगय केल्यानेच तिला ऑक्सीजन मिळाला नाही व ती मयत झाली. तसेच तिला आधार नर्सिंग होममध्येही ऑक्सीजन मिळाला नाही. आणि म्हणून तिच्या मृत्यूस तिचे नातेवाईक व आधार नर्सिंग होम कारणीभूत आहेत. तसेच सी.पी.आर.मध्येही तिला ऑक्सीजन देता न आल्याने ती न्यूनता लपविण्यासाठी सी.पी.आर. हॉस्पीटलने सर्जिकल मॉप मिळाल्याची खोटी नोंद केल्याचे या जाबदारांचे म्हणणे आहे.
जाबदारांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारींना जोरदार आक्षेप घेवून, जाबदारांनी मयत सौ पल्लवी हीची अत्यंत योग्य काळजी घेतल्याचे नमूद केले आहे. तसेच तिच्या योग्य तपासणीनंतरच तिला डिस्चार्ज दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ऑपरेशन पूर्वी ऑपरेशनचे जे साहित्य व सर्जिकल मॉप घेतले होते त्याची काटेकोर मोजदाद ऑपरेशनपूर्वी व नंतरही केली होती व त्यांची संख्या जुळत होती. त्यामुळे सदरहू जाबदार यांनी मयत सौ पल्लवीस कोणतीही त्रुटीयुक्त वैद्यकीय सेवा पुरविली नव्हती आणि म्हणून तिच्या मृत्यूस जाबदारांना जबाबदार धरता येणार नाही असे स्पष्ट म्हणणे जाबदारांनी मांडलेले आहे.
तसेच जाबदार क्र.१ हे स्त्री रोग विषयक पदव्युत्तर पदवीधारक असल्याने त्यांना Drugs & Cosmetic Act 1940 Section 2 (ee) प्रमाणे व राजपत्राप्रमाणे अॅलोपॅथीक औषधे वापरण्याचा अधिकार असल्याचे कथन केले आहे.
जाबदार पुढे असेही नमूद करतात की, जाबदार क्र.३ भूलतज्ञ आहेत. ऑपरेशनशी त्यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द तक्रारदारांना नुकसान भरपाईची मागणी करता येणार नाही तसेच सौ पल्लवीची मुलगी ही प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार म्हणून सामील नाही त्यामुळे तिच्यासाठी प्रस्तुत प्रकरणी नुकसान भरपाई मागता येणार नाही.
आणि या सर्व कारणांमुळे तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर व्हावा व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा त्याचप्रमाणे रक्कम रु.१०,०००/- प्रत्येक जाबदारास मिळावेत अशी मागणी जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यात केली आहे. म्हणण्याच्या पृष्ठयर्थ जाबदार यांनी प्रतिज्ञापत्र व नि.१७ अन्वये ३ कागद दाखल केले आहेत.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदारांचे म्हणणे दाखल झाल्यानंतर तक्रारदारतर्फे प्रतिउत्तर व त्यानंतर उभय पक्षांतर्फे लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत उभय पक्षांतर्फे सन्मा.वरिष्ठ न्यायालयांचे अनेक न्यायनिवाडे व पुराव्या दाखल अनुषंगिक कागदपत्रे दाखल करण्यात आली. त्यानंतर उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकून प्रकरण निकालसाठी नेमणेत आले.
४. तक्रारअर्ज, म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यांचे साकल्याने अवलोकन करता मंचापुढे खालील मुद्दे विचारार्थ उपस्थित होतात, ते असे –
मुद्दे उत्तरे
१. सदरहू तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायद्यातील तदतुदी
अंतर्गत चालणेस पात्र आहे का ? आहे.
२. प्रस्तुत प्रकरणी रेसज्युडिकेटा या न्यायतत्वाचा बाध
येतो का ? नाही.
३. जाबदारांनी अनुचित व्यापारी प्रथेचा वापर करुन
तक्रारदारांना दूषीत सेवा पुरविली ही बाब शाबीत
होते का ? होते.
४. प्रस्तुत प्रकरणी नॉन जॉंईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज
या न्यायतत्वाचा बाध येतो का ? नाही
५. कोणता आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
मुद्दा क्र.१
प्रस्तुत प्रकरणी जाबदार डॉक्टरांनी (प्रस्तुत निकालपत्रातील विवेचनात मयत सौ पल्लवी हीचा उल्लेख “पेशंट” असा केला जाईल) पेशंट गरीब असल्याने त्याला वैद्यकीय सेवा ही पूर्णपणे मोफत दिली होती. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यातील सेवा या व्याख्येअंतर्गत ही सेवा येत नसल्याने या कायद्यांतर्गत सदरहू तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही असा आक्षेपचा मुद्दा उपस्थित केला आहे.
या आक्षेपाच्या अनुषंगे तक्रारअर्जाचे अवलोकन करता त्यात पेशंटने जाबदार डॉक्टरांना रक्कम रु. ९,३००/- अदा केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. प्रस्तुत प्रकरणी नि.२७/३ अन्वये “मुल्ला क्लिनिक”, शिराळा यांचे “केसशीट”(Case sheet) दाखल करण्यात आलेले आहे. त्यातील पान क्र.५५ च्या मागील भागावर दि.६/७/२००८ रोजी
“Rs.1500/- - Gynaecologist charges given ”
व
“Rs.900/- Anaesthetist charges given”
अशी स्पष्ट नोंद करण्यात आलेली आहे. याचे खंडन करताना जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यात, लेखी व तोंडी युक्तिवादात पेशंट कडून त्यांनी रक्कम रु.९,३००/- स्वीकारली हे मान्य केले आहे परंतु ही रक्कम औषधांच्या खर्चासाठी होती असे त्यांनी कथन केले आहे. पेशंटला जी वैद्यकीय सेवा देण्यात आली, ती पूर्णपणे मोफतच होती असेही जाबदारांनी त्यांच्या तोंडी युक्तिवादात वारंवार कथन केले.
परंतु वर नमूद करण्यात आलेल्या दाखल कागदपत्रांवरुन, म्हणण्यावरुन व जाबदारांच्या तोंडी युक्तिवादावरुन हे स्पष्ट होते की, पेशंटकडून जाबदार डॉक्टरांनी रक्कम स्विकारली होती.
या मुद्याच्या अनुषंगे मंचास आणखी एक बाब विचारात घेणे आवश्यक वाटते ती म्हणजे, शासकीय अथवा अशासकीय हॉस्पीटलमध्ये जरी गरीब पेशंटना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येत असली तरी सुध्दा ती ग्राहक संरक्षण कायद्यातील “सेवा” या व्याख्येअंतर्गत येते असा D.RAMA RAJYAM (DR.) V/S P.K.VASUDEV RAO & OTHERS III (2007) CPJ 295 (NC) या सन्मा.राष्ट्रीय आयोगाच्या व INDIAN MEOICAL ASSOCIATION V/S V.P.SHANTHA & OTHERS 1995 STPL (LE) 20731 SC या सन्मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयांमध्ये स्पष्ट उल्लेख आढळतो. त्यामुळे या न्याय निवाडाच्या आधारे जाबदार डॉक्टरांचा हा आक्षेपाचा मुद्दा पूर्णपणे तथ्यहीन ठरतो असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष निघतो व त्यास अनुसरुन मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.२
जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यात दुसरा व महत्वाचा आक्षेपचा मुद्दा उपस्थित केला आहे तो म्हणजे, पेशंटच्या मुली करीता म्हणून तिच्या पालनकर्त्यांनी दिवाणी न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला असल्याने त्याच कारणावरुन पुन्हा दावा दाखल होऊ शकत नाही व त्यानंतर त्यांचे तोंडी युक्तिवादात सातत्याने सदरहू तक्रारअर्जास Res-judicata या न्यायतत्वाचा बाध येतो असा आक्षेप उपस्थित केला आहे व त्यांच्या या म्हणण्याच्या व तोंडी युक्तिवादाच्या पुष्ठयर्थ त्यांनी नि.१७/२ अन्वये दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्याची सत्यप्रत दाखल केली आहे.
परंतु सदरहू तक्रारअर्ज हा पेशंटच्या नव-याने वारस म्हणून दाखल केला असून दिवाणी न्यायालयात पेशंटच्या मुलीची अ.पा.क. म्हणून तिच्या आजीने म्हणजेच पेशंटच्या आईने व बहिणींनी दावा दाखल केला आहे. पेशंटची मुलगी ही तिच्या वडिलांकडेच म्हणजेच तक्रारदारांकडेच राहते. तक्रारअर्ज व दाव्यातील अनुक्रमे तक्रारदार व वादी हे वेगवेगळे असल्याने सदरहू तक्रारअर्जास Res-judicata या न्यायतत्वाचा बाध येत नाही असे तक्रारदारांनी या आक्षेपाचे खंडन केलेले आहे. उभय पक्षांनी त्यांचा आक्षेप व खंडनापुष्ठयर्थ सन्मा. न्यायालयाचे न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले आहेत. त्यापैकी तक्रारदारांतर्फे दाखल करण्यात आलेल्या न्यायनिवाडयांपैकी M/S HINDUSTAN MOTORS LTD. V/S AMARDEEP SINGH WIRK & OTHERS AIR 2009 DELHI 122 हा निवाडा मंचास महत्वपूर्ण वाटतो. त्यामध्ये “Proceeding under Consumer Protection Act and in a Civil Court can simultaneously go on, even if issues involved in two proceedings are substantially similar – Remedies are independent of each other – The existence of parallel of other adjudicatory forums can not take away or exclude jurisdiction created under Consumer Protection Act – Provisions of the Act are in addition to and not in derogation of any other provision of any other law for the time being in force.” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे सन्मा.न्यायालयाच्या या न्यायनिवाडयाच्या आधारे सदरहू प्रकरणी Res judicata या न्यायतत्वाचा बाध येतो या जाबदारांच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचा मंचाचा निष्कर्ष निघतो. या निष्कर्षावर येताना दिवाणी न्यायालयातील वादी व तक्रारअर्जातील तक्रारदार हे भिन्न आहेत. तसेच पेशंटच्या मुलीलाही नुकसान भरपाई मिळणेचा अधिकार आहे. त्यामुळे ती देखील स्वतंत्रपणे दावा दाखल करु शकते. या बाबी विचारात घेण्यात आलेल्या आहेत. यासाठी D.RAMA RAJYAM (DR.) V/S P.K.VASUDEV RAO & OTHERS III (2007) CPJ 295 (NC) या सन्मा.राष्ट्रीय आयोगाच्यान्यायनिवाडयाचाही आधार घेणेत आलेला आहे. तसेच इथे आणखी एक बाब विचारात घेण्यात आली आहे ती म्हणजे दिवाणी न्यायालयातील दावा अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे देखील प्रस्तुत प्रकरणी सिव्हील प्रोसिजर कोड कलम ११ (Res-judicata) चा बाध येत नाही.
त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी या मुद्यावर जाबदारांतर्फे दाखल करण्यात आलेले सन्मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे लागू होत नाहीत असाही मंचाचा निष्कर्ष निघतो व त्यानुसार मुद्दा क्र.२ चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र.३
जाबदार क्र.१ व २ डॉक्टरांनी पेशंटचे सिझेरिन केले व त्यावेळी तिच्या उदरात “सर्जिकल मॉप”(Surgical mop)राहिला. त्यामुळे तिच्या उदरात पू झाला व त्याचा जंतूसंसर्ग मेंदूपर्यंत गेल्याने तिचा मृत्यू झाला. पेशंटचा मृत्यू हा केवळ जाबदार डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेत निष्काळजीपणा करुन दूषीत सेवा पुरविल्याने झाला असल्याचे तक्रारदारांची जाबदार डॉक्टरांविरुध्द मुख्य तक्रार आहे.
या तक्रारीच्या अनुषंगे दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता प्रस्तुत प्रकरणी प्रथम पेशंटच्या पोटात सिझेरियन करतेवेळी जाबदार डॉक्टरांकडून सर्जिकल मॉप राहीला किंवा कसे हे पाहणे आवश्यक ठरेल असे मंचास वाटते. त्यानुसार मंचाचे विवेचन खालीलप्रमाणे –
जाबदार डॉक्टरांकडून सिझेरियनच्या वेळी पेशंटच्या उदरात “सर्जिकल मॉप”(Surgical mop) राहीला या तक्रारदारांच्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ त्यांनी नि.५ च्या यादीसोबत तपास टीपण, एफ.आय.आर. यांच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. तसेच नि.६५ च्या यादीसोबत देखील फौजदारी प्रकरणातील दाखल कागदपत्रे, कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पीटल, आधार हॉस्पीटल येथील पेशंटचेकेसपेपर्स (मेडिकल केस रेकॉर्ड) यांच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. या कागदपत्रांपैकी कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पीटलच्या दि.१६/०७/०८ रोजीच्या रात्री १०.३० च्या “ऑपरेटीव्ह नोट्स” व Intra operative observations मंचास अत्यंत महत्वाच्या वाटतात. त्यामध्ये पेशंटच्या उदरात घाण वासाचा पू व साधारणपणे १२ X १२ इंचाचा “सर्जिकल मॉप” मिळाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच यातील आणखी एक अत्यंत महत्वाची नोंद म्हणजे Retained Intraperi tonieal foreign body with peritonitis ही नोंद. तसेच प्रस्तुत प्रकरणी याच हॉस्पीटलचे डॉ कौस्तुभ मेंच यांचा दाखलाही नि.६५ च्या यादीसोबत दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्येही शस्त्रक्रिये दरम्यान पेशंटच्या पोटात गर्भाशयाजवळ सर्जिकल मॉप आढळून आल्याचे व तो बाहेर काढल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
पेशंटचे सिझेरीन झाल्यानंतर तिला शारिरिक त्रास जाणवू लागल्यानंतर तिला सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर तिथे तिच्यावर जी शस्त्रक्रिया करणेत आली त्या शस्त्रक्रियेच्या वेळचे हे रिपोर्ट आहेत. सदरहू कागदपत्रे हया मूळ कागदांच्या सत्यप्रती आहे. त्यावर अविश्वास दाखविण्याचे कोणतेच कारण मंचास आढळून येत नाही.
तक्रारदारांच्या सर्जिकल मॉप सापडला या तक्रारीस जोरदार आक्षेप घेताना जाबदारांनी मुख्यत्वे करुन नि.१७/२ अन्वये दाखल “केस समरीचा” आधार घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही “केस समरी” सी.पी.आर.हॉस्पीटलमधील आहे व तिच्यातील Intraop.findings मध्ये “सर्जिकल मॉप” सापडल्याचा उल्लेख नाही. परंतु या “केस समरीचे” अवलोकन करता ती, को-या कागदावर लिहिण्यात आलेली आहे. तिच्यावर सी.पी.आर. हॉस्पीटलचे नाव नमूद नाही. तसेच “केस समरीच्या” शेवटी जी सही करण्यात आलेली आहे तिचे अवलोकन करता तिच्या खाली ती कोणाची आहे, ती कोणत्या पदावरील व्यक्तीची आहे याचा बोध होणारा शिक्काही नाही. या वस्तुस्थितीच्या आधारे तक्रारदारांनी नि.६५ अन्वये दाखल केलेल्या सी.पी.आर. हॉस्पीटलच्या ऑपरेटीव्ह नोट्स, डॉ मेंच यांचा दाखला यांचा, व जाबदारांनी दाखल केलेल्या नि.१७/२ अन्वयेच्या केस समरीचा तुलनात्मक विचार करता, दि.१६/७/०८ रोजीच्या ऑपरेटीव्ह नोटस व डॉ मेंच यांचा दाखला, मंचास, पेशंटच्या उदरात सर्जिकल मॉप आढळला या निष्कर्षावर येण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण व निर्णायक पुरावा ठरतो असे वाटते. अशा परिस्थितीत केवळ को-या कागदावर लिहीलेला मजकूर म्हणजेच सी.पी.आर.हॉस्पीटलची “केस समरी” आहे हे जाबदारांचे म्हणणे मान्य करणे व त्यातील मजकूर ग्राहय धरणे मंचास अतिशय अयोग्य वाटते. आणि या आधारे मुळातच पेशंटच्या उदरात सर्जिकल मॉप नव्हता आणि म्हणूनच सी.पी.आर.हॉस्पीटलच्या केस समरीमध्ये सर्जिकल मॉप सापडल्याचा उल्लेख नाही हे जाबदारांचे कथन पोकळ ठरते असा व पर्यायाने पेशंटच्या पोटात सर्जिकल मॉप होता हे कागदोपत्री पुराव्याच्या आधारे अत्यंत ठळकपणे शाबीत होते असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यात पेशंटचा मृत्यू त्याच्या उदरात “सर्जिकल मॉप” राहिल्याने झाला नसून तो अन्य कारणांमुळे झाला ज्या कारणांशी जाबदार यांचा काही संबंध नाही असे म्हणणे मांडले आहे. जाबदारांनी मृत्यूस कारणीभूत म्हणून खालील बाबींचा उल्लेख त्यांच्या म्हणण्यात केलेला आहे. त्या बाबी अशा –
अ. पेशंटचे लहान वयात लग्न झाल्याने तसेच तिची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिला शारिरिक दृष्टया सदरहू बाळंतपण झेपले नाही.
जाबदारांच्या या कारणाच्या अनुषंगे दाखल कागदपत्रांपैकी मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, आधार नर्सिंग होम मधील समरी तसेच फायनल ओपिनियन +ìज टू कॉज ऑफ डेथ पाहता त्यामध्ये पेशंटचे वय २२ असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजेच पेशंटचे वय व शरीर हे कायद्याने प्रसूतीसाठी पूर्णपणे सक्षम होते. तसेच सिझर करण्याच्या पूर्वी पेशंटचे शारिरिक स्वास्थ्य कसे होते याबाबत जाबदार क्र.३ डॉ रहीम मुल्ला यांचे प्रतिज्ञापत्र मंचास महत्वाचे वाटते त्यात “पेशंटपल्लवी हीची ऑपरेशनपूर्वीची सर्व ती पूर्व तपासणी मी केली. पेशंट नॉर्मल होता. ऑपरेशन योग्य असे तिचे शारिरिक स्वास्थ्य होते” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. पी.एम.रिपोर्टमध्ये “बांधा मजबूत” असा पेशंटच्या शरीरयष्टीबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे. या नोंदींची दखल घेता पेशंट शारिरिक दृष्टया सक्षम नसल्याने त्यास प्रसुती झेपली नाही हे जाबदारांचे म्हणणे मंचास मान्य करणे शक्य नाही.
ब. यानंतर जाबदारांनी पेशंटचा मृत्यू हा सी.पी.आर.हॉस्पीटल ते आधार नर्सिंग होमच्या प्रवासादरम्यान तिला ऑक्सीजन पुरविण्यात तिच्या नातेवाईकांनी हेळसांड केली आणि त्याचा परिणाम म्हणून घडून आला असेही कारण नमूद केले आहे.
परंतु इथे एक बाब लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे ती म्हणजे, दि.१६/७/०८ रोजी पेशंटचे सी.पी.आर. हॉस्पीटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले व त्यानंतर तिला आधार नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. परंतु दि.१७/७/०८ रोजी तसेच दि.१८/७/०८ रोजी पेशंटचे वेगवेगळया वेळी घेण्यात आलेले PO2 म्हणजेच प्रेशर ऑफ ऑक्सीजन हे 197.6, 202.3, 175.9, 178.8 असे होते हे प्रस्तुत प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आधार नर्सिंग होमच्या ARIERIAL BLOOD GASES मध्ये नमूद केल्याचे दिसून येते. म्हणजेच सी.पी.आर. हॉस्पीटल ते आधार नर्सिंग होम दरम्यानचा प्रवास झाल्यानंतर आधार नर्सिंग होममध्ये तिचे प्रेशर ऑफ ऑक्सीजन (PO2) हे उत्तम होते व त्यानंतर ते दि.१८/७/०८ रोजी संध्याकाळी कमी झाल्याचे दिसून येते. या वरुन या प्रवासात पेशंटला ऑक्सीजन पुरविण्यात हेळसांड झाल्याने तिचा मृत्यू झाला हा जाबदारांचा आक्षेपही तथ्यहीन ठरतो असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
मंचास इथे आणखी एका बाबीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, ती म्हणजे डॉ मुल्ला हॉस्पीटलमधील नि.२७ अन्वये दाखल करण्यात आलेले केसशीट व त्यातील पान क्र.५३ ते ६०. या पानांचे काळजीपूर्वक अवलोकन करता ते पूर्ण एकाच व्यक्तीच्या हस्ताक्षरातले असून ते एकाच वेळी लिहीण्यात आलेले आहे हे स्पष्टपणे दिसून येते. तसेच या केसशीट मधील आणखी एक अत्यंत महत्वपूर्ण बाब मंचास या निकालपत्रात अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे, दि.१६/७/०८ रोजीच डॉ सलीम मुल्ला यांनी पेशंटला आधार नर्सिंग होममध्ये +ìडमिट करेपर्यंतच्या सर्व घटना म्हणजेच भविष्यातीलही घटना लिहून ठेवल्या होत्या. याचा विचार करता एकूणच डॉ मुल्ला यांच्या केसशीटबाबत शंकास्पद परिस्थिती निर्माण होते असे मंचाचे मत पडते.
पेशंटच्या उदरात सर्जिकल मॉप नव्हता यासाठी जाबदार हे पेशंटच्या सोनोग्राफी व एक्सरे रिपोर्टचाही आधार घेतात. त्यांच्या म्हणण्यानुसार पेशंटच्या उदरात जर सर्जिकल मॉप असता तर तो सोनोग्राफी व एक्सरे मध्ये दिसणे आवश्यक होते. परंतु तो दिसलेला नाही. त्यामुळे सोनोग्राफी व एक्सरे रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख नाही. परंतु इथे एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे जाबदारांनी “आनंद हॉस्पीटलचा” एक्सरे रिपोर्ट दाखल केला आहे. आनंद हॉस्पीटल हे जाबदार क्र.२ व त्यांचे पती यांचे आहे. तक्रारदारांची मुख्य तक्रार ही जाबदार क्र.२ यांचेविरुध्दही आहे. जाबदार क्र.२ डॉ कृष्णा जाधव यांचा सिझेरीयन मध्ये डॉ सलीम मुल्ला यांचे बरोबरीने सक्रीय सहभाग होता. आणि ही बाब जाबदारांनीही नाकारलेली नाही. त्यामुळे जाबदार क्र.२ यांचेच हॉस्पीटलमध्ये एक्सरे काढून त्यांच्या पतीने म्हणजेच डॉ नितीन जाधव यांनी दिलेला जो रिपोर्ट प्रस्तुत प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. त्यावर विश्वास ठेवून त्याचा विचार करणे मंचास शक्य नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्याचप्रमाणे या रिपोर्टवरील डॉ कृष्णा जाधव व डॉ नितीन जाधव यांच्या नावाखालील पदव्यांचे अवलोकन करता ते रेडिओलॉजीस्ट असल्याचे दिसून येत नाही याचाही विचार करता या रिपोर्टबाबतही शंकास्पद परिस्थिती निर्माण होते आणि एकूणच या सर्व वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जाबदारांमार्फत जे सोनोग्राफी रिपोर्ट दाखल करण्यात आलेले आहेत, त्याबाबतही शंकेस वाव राहतो असे मंचाचे स्पष्ट मत पडते.
वर नमूद विवेचनाचा व निष्कर्षांचा विचार करता जाबदार क्र.१ व २ यांचेकडून सिझेरीयन करतेवेळी निष्काळजीपणामुळे पेशंटच्या पोटात “सर्जिकल मॉप” राहिला होता हे शाबीत झाले आहे. पेशंटचा मृत्यू हा “Shock due to septicemia” या कारणामुळे झाला असे “फायनल ओपिनियन अॅज टू कॉज ऑफ डेथ” वरुन दिसून येते. सर्जिकल मॉप पेशंटच्या उदरात राहिल्यामुळे तिच्या उदरात पू झाला व तो वाढत गेला. सी.पी.आर.हॉस्पीटलमध्ये पेशंटवर ऑपरेशन करुन जवळजवळ १ ते १/२ लिटर पू तिच्या उदरातून काढणेत आला परंतु त्याचा जंतुसंसर्ग होवून तो तिच्या मेंदूपर्यंत गेल्याने तिचा मृत्यू झाला हेही प्रस्तुत प्रकरणी दाखल वैद्यकीय कागदपत्रांवरुन दिसून येते. यावरुन प्रस्तुत प्रकरणी मंचापुढे खालील बाबी स्पष्ट होतात.
१. जाबदार डॉक्टरांकडून सिझेरीयन वेळी पेशंटच्या उदरात सर्जिकल मॉप विसरण्याचा निष्काळजीपणा झाला नसता तर तिच्या पोटात पस झाला नसता व त्यामुळे जंतूसंसर्ग होवून तो मेंदूपर्यंत जावून तिला मृत्यूस सामोरे जावे लागले नसते.
२. सिझेरियन करतेवेळी जर जाबदार डॉक्टरांनी ऑपरेशन करीता लागणा-या साहित्याची ऑपरेशन पूर्व व ऑपरेशननंतर (काऊंट) मोजदाद केली असती व त्याच्या नोंदी ठेवल्या असत्या तर ही परिस्थिती ओढावली नसती. डॉ मुल्ला यांचे केसशीट पाहता त्यात ऑपरेशनच्या साहित्याचा काऊंट घेतल्याचे दिसून येते. परंतु त्यात मॉपचा उल्लेख नाही. तर या केसशीटवरुन एकदाच काउंट घेतल्याचे दिसून येते यावरुन जाबदार क्र.१ व २ डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी लागणा-या साहित्याचा जबाबदारीने व योग्यरित्या काऊंट घेतला नव्हता हे स्पष्ट होते. म्हणजेच निष्काळजीपणा न करणे ही बाब सर्वस्वी डॉक्टरांच्या अखत्यारीत होती.
३. ऑपरेशनचे वेळी सर्जिकल मॉप उदरात राहणे यात पेशंटचा कोणताही निष्काळजीपणा नाही. (Contributory negligence)
प्रस्तुत प्रकरणाचे अवलोकन करताना निदर्शनास आलेल्या या बाबींचा विचार करता प्रस्तुत प्रकरणी “The Doctrine of Res Ipsa Liquitur” (The thing speaks for itself) हे न्यायतत्व लागू होते असा मंचाचा निष्कर्ष निघतो. मंचाच्या या निष्कर्षास “Forensic Medicine and Texicology” a book by Dr. K.S.Narayan Reddy, Tenth Edition मधील पान नं.३२ वरील मजकुराचा आधार मिळतो. आणि या आधारे प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.१ व २ डॉक्टरांचा निष्काळजीपणा शाबीत करण्यासाठी अन्य पुराव्यांची जरुरी नाही असाही मंचाचा निष्कर्ष निघतो. या निष्कर्षास तक्रारदारांमार्फत दाखल करण्यात आलेल्या याच मुद्यावरील सन्मा.वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायनिवाडयांचाही आधार मिळतो.
तक्रारदारांनी जाबदार क्र.३ व ४ यांना ही पेशंटच्या मृत्यूस जबाबदार धरुन त्यांचेविरुध्दही दाद मागितली आहे. परंतु जाबदार क्र.३ हे भूलतज्ञ आहेत व त्यांनी पेशंटला सिझेरीन वेळी भूल दिली होती याबाबत उभय पक्षात वाद नाही. भूल तज्ञाचे काम हे केवळ भूल देण्याइतपतच मर्यादीत असते. त्यांचा प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत सहभाग नसतो त्यामुळे सर्जिकल मॉप उदरात राहण्याशी जाबदार क्र.३ यांचा काहीही संबध येत नाही. तक्रारदारांची भूल देण्यात निष्काळजीपणा झाल्याने पेशंटचा मृत्यू झाला अशी तक्रार नाही. याचा विचार करता जाबदार क्र.३ डॉ रहिम मुल्ला यांना निष्काळजी व दूषित सेवेसाठी जबाबदार धरणे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब त्यांचेविरुध्द कोणतेही आदेश करणेत येत नाहीत.
त्याचप्रमाणे जाबदार क्र.४ हे चॅरिटेबल हॉस्पीटल असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जाबदार क्र.४ यांनाही प्रस्तुत प्रकरणी जबाबदार धरुन त्यांचेविरुध्द आदेश करणे मंचास योग्य वाटत नाही.
वर नमूद विवेचन व निष्कर्षावरुन प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.१ व २ डॉ सलीम मुसा मुल्ला व डॉ कृष्णा नितीन जाधव यांचेकडून सिझेरियन करतेवेळी पेशंटच्या उदरात सर्जिकल मॉप राहिला व अशा रितीने त्यांनी वैद्यकीय सेवेत अत्यंत गंभीर स्वरुपाचा निष्काळजीपणा दाखवून पेशंटला अत्यंत टोकाची दूषित वैद्यकीय सेवा पुरविली हे शाबीत होते, त्यामुळे पेशंटच्या मृत्यूस जाबदार क्र.१ व जाबदार क्र.२ हेच सर्वस्वी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार ठरतात असा मंचाचा निष्कर्ष निघतो व त्यास अनुसरुन मुद्दा क्र.३ चे उत्तर होकारार्थी देणेत येते.
प्रस्तुत प्रकरणी जाबदारांचा निष्काळजीपणा शाबीत झाल्याने जाबदारांमार्फत दाखल करण्यात आलेले सन्मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणी लागू पडत नाहीत.
मुद्दा क्र.४
पेशंटने सी.पी.आर. हॉस्पीटल व आधार नर्सिंग होम येथे उपचार घेतले व तिथे दोन्ही ठिकाणी तिची हेळसांड झाली आणि म्हणून ती मयत झाली. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी सी.पी.आर. हॉस्पीटल व आधार हॉस्पीटल यांनाही जाबदार म्हणून सामील करणे आवश्यक होते. परंतु तसे न केल्याने प्रस्तुत प्रकरणी नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या न्यायतत्वाचा बाध येतो असे जाबदारांनी म्हणणे मांडले आहे.
परंतु मुद्दा क्र.३ मधील विवेचन व निष्कर्षावरुन जाबदार क्र.१ व २ यांचा गंभीर स्वरुपाचा वैद्यकीय निष्काळजीपणा प्रस्तुत प्रकरणी शाबीत झालेला आहे. सी.पी.आर. हॉस्पीटल मध्ये ऑपरेशनचेवेळी व आधार नर्सिंग होममधील उपचारादरम्यान पेशंटची हेळसांड झाली असे कुठेही दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही व तक्रारदारांची तशी तक्रारही नाही. उलट जाबदार क्र.१ व२ यांच्या निष्काळजीपणामुळे पेशंटची प्रकृती चिंताजनक बनली होती. अशा परिस्थितीत सी.पी.आर. हॉस्पीटल मध्ये तिच्या उदरात राहिलेला सर्जिकल मॉप व उदरात तयार झालेला पू काढून टाकून जाबदार क्र.१ व २ यांनी केलेला निष्काळजीपणा निस्तरणेत आला. तसेच आधार नर्सिंग होममध्ये तिचा जीव वाचविणेचा प्रयत्न करण्यात आला परंतु दुर्दैवाने त्यांना यश आले नाही हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. अशा परिस्थितीत त्यांना जाबदार म्हणून सामील करण्याचे कोणतेच कारण मंचास आढळून येत नाही. त्यामुळे जाबदारांचा नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या न्यायतत्वाचा बाध येतो हा आक्षेपही अन्य आक्षेपांप्रमाणेच अत्यंत तकलादू व पोकळ ठरतो असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
मुद्दा क्र.५
तक्रारदारांनी पेशंटला मिळालेल्या दूषित वैद्यकीय सेवेमुळे तक्रारदारांना व त्यांच्या मुलीला जो शारिरिक व मानसिक त्रास झाला व त्यांचे जे नुकसान झाले त्याकरिता म्हणून रक्कम रु.१९,००,०००/- ची मागणी केली आहे तर तक्रारअर्ज व अनुषंगिक खर्चासाठी म्हणून एकूण रक्कम रु.३०,०००/- ची मागणी केली आहे. तक्रारदारांनी एकूण रक्कम रु.१९,३०,०००/- ची १८ टक्के व्याजासह मागणी केली आहे. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.१ व २ डॉक्टरांनी पेशंटला अत्यंत गंभीर स्वरुपाची दूषीत वैद्यकीय सेवा पुरविल्याचे शाबीत झालेले आहे. तक्रारदारांची पत्नी तरुण वयातच मयत झाल्याने तक्रारदारांच्या वैवाहिक आयुष्याचे जे नुकसान झाले याची व त्यामुळे त्यांना ज्या शारिरिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागले व भविष्यात जावे लागले याची दखल घेवून तक्रारदारांना पेशंटचे वारसदार म्हणून नुकसान भरपाई मंजूर करणे अत्यंत योग्य व न्याय्य होईल असे मंचास वाटते.
पेशंट ही अर्थाजन करीत होती असे तक्रारदारांचे कथन नाही. मृत्यूसमयी तिचे वय २२ होते त्यामुळे जी व्यक्ती अर्थार्जन करीत नाही व जी वय वर्षे २० ते २५ या वयोगटात येते तिचे महिन्याचे उत्पन्न रक्कम रु.३,०००/- इतके धरुन तिच्या एकूण वार्षिक उत्पन्नातून तिचा १/३ जीवनावश्यक खर्च वजा जाता उरलेल्या २/३ ही तिच्या कुटुंबासाठी धरुन त्या रकमेस १८ ने गुणुन जी रक्कम येईल ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून मंजूर करावी असे मार्गदर्शक निर्देश LAXMI DEVI & OTHERS V/S MOHAMMAD TABBAR & ANOTHER, CIVIL APPEAL NO.2090/2008 या व SMT SARLA VERMA & OTHERS V/S DELHI TRANSPORT CORPORATION AND ANOTHER 2009 (2) TAC 677 (S.C.) या सन्मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयात देणेत आलेले आहेत. तसेच KUNAL SHAHA (DR.) V/S SUKUMAR MUKHARJI & ORS. IV (2011) CPJ 414 (NC) या सन्मा.राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिवाडयामध्ये Multiplier method provided under Motor Vehicles Act for determination of compensation is only proper and scientific method for determination of compensation even in cases where death of patient has been occassioned due to medical negligence असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांना खालीलप्रमाणे रक्कम मंजूर करण्यात येत आहे.
दरमहा उत्पन्न रक्कम रु.३,०००/- X १२ महिने = रक्कम रु.३६,०००/- वार्षिक उत्पन्न
वार्षिक उत्पन्न रक्कम रु.३६,०००/- ÷ १/३ जीवनावश्यक खर्च = रक्कम रु.१२,०००/-
वार्षिक उत्पन्न रक्कम रु.३६,०००/- - जीवनावश्यक खर्च रक्कम रु.१२,०००/- =
रक्कम रु.२४,०००/- कुटुंबाकरिता
कुटुंबासाठीची रक्कम रु.२४,०००/- X १८ = रक्कम रु.४,३२,०००/- मंजूर रक्कम
वर नमूद हिशोबांच्या आधारे तक्रारदारांना रक्कम रु.४,३२,०००/- इतकी रक्कम मंजूर करणेत येत आहे. या रकमेवर वादास कारण घडलेपासून म्हणजेच पेशंटचे सिझेरियन ज्या दिवशी करण्यात आले, तिच्या उदरात ज्या दिवशी “सर्जिकल मॉप” राहिला त्या दिवसापासून म्हणजेच दि.६/७/०८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के व्याज मंजूर करणेत येत आहे. तक्रारदार हे इचलकरंजी जि.कोल्हापूर येथील रहिवासी असून तक्रारअर्जासाठी म्हणून त्यांना सांगली येथे यावे लागत होते याची दखल घेवून त्यांना तक्रारअर्जाच्या खर्चापोटी म्हणून रक्कम रु.१०,०००/- मंजूर करण्यात येत आहे.
तक्रारदारांनी त्यांच्या मुलीसाठीही नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु त्यांनी तिला तक्रारदार म्हणून सामील केलेले नाही. प्रत्येकवेळी तक्रारदार यांनी ती त्यांचे सोबतच राहते असे तोंडी कथनही केलेले आहे. परंतु त्यांच्या मुलीस वादी म्हणून सामील करुन पेशंटच्या आईने व बहिणींनी याच जाबदारांविरुध्द नुकसान भरपाईसाठी स्वतंत्रपणे दिवाणी दावा दाखल केला आहे. त्यात सदरहू तक्रारदार वादी म्हणून सामील नाहीत. तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी तिला तक्रारदार म्हणून का सामील केले नाही याचा बोध होत नाही. परंतु ही बाब तांत्रिक स्वरुपाची आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे तक्रारदारांचे व त्यांच्या अज्ञान मुलीचे, कु.अनुष्काचे नुकसान होवू नये म्हणून मंजूर करण्यात आलेल्या रकमेपैकी म्हणजेच रक्कम रु.४,३२,०००/- ची संपूर्ण फेड होईपर्यंत व्याजासह जी एकूण रक्कम होईल त्यापैकी निम्मी रक्कम जाबदार क्र.१ व २ यांनी तक्रारदारांची व पेशंटची मुलगी कु.अनुष्का हिचे नावावर राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये एफ.डी.मध्ये गुंतविणेची आहे व ती एफ.डी.तक्रारदारांचे ताब्यात देणेची आहे.
वर नमूद विवेचन व निष्कर्षाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहे.
सबब मंचाचा आदेश की,
आदेश
१. जाबदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारांना रक्कम रु.४,३२,०००/- (रुपये चार लाख बत्तीस हजार फक्त) दि.६/७/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के व्याजदराने अदा करावी.
२. वर नमूद कलम १ मधील मंजूर करण्यात आलेल्या रकमेपैकी ५० टक्के म्हणजेच निम्मी रक्कम जाबदार क्र.१ व २ यांनी कु.अनुष्का हिचे नावे राष्ट्रीयकृत बॅंकेत एफ.डी.मध्ये गुंतवून त्या एफ.डी.ची मूळ रिसीट तक्रारदारांच्या ताब्यात द्यावी.
३. जाबदार क्र.१ व २ यांनी तक्रारदारांना तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.६/३/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: २१/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.