निकाल
(घोषित दि. 11.04.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा पाथरवाला ता.अंबड येथील रहिवाशी आहे. तक्रारदाराचे वडील रुस्तुम इस्माईल सय्यद यांना दि.14.10.2015 रोजी संडास व उलटीचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना शहागड येथील दवाखान्यात उपचाराकरता आणले. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या वडीलांना दोन दिवसाचे उपचार, करुन व गोळया दिल्या. सदर औषधी घेतली त्याच दिवशी त्या औषधीमुळे तक्रारदाराच्या वडीलाच्या जिभेला व अंगावर फोड आले, त्याच्या पोटात आग पडल्यासारखी झाल्याने त्याला परत सामनेवाला यांचेकडे नेण्यात आले, त्यावेळेस पण सामनेवाला यांनी तक्रारदार याचे वडीलावर उपचार केला. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास सुचविले की, त्याने त्याचे वडीलांना बीड येथे वैद्यकीय उपचाराकरता घेऊन जावे. त्यावेळी तक्रारदार याने सामनेवाला यास सांगितले की, त्याने चुकीचा उपचार केला असल्याने तक्रारदाराचे वडीलाची प्रकृती ढासाळली आहे व त्यास सामनेवाला जबाबदार आहे, ते ऐकून सामनेवाला यांनी तक्रारदारास सांगितले की, त्यांनी तात्काळ त्याचे वडीलास बीड येथे घेऊन जावे व तेथे विवेकानंद हॉस्पीटल येथे शरीक करावे. तेथे होणा-या खर्चाची सामनेवाला भरपाई करुन देईल. त्यानंतर तक्रारदार याने त्याचे वडीलाची परिस्थिती पाहून तात्काळ विवेकानंद हॉस्पीटल बीड येथे दि.16.10.2015 रोजी सायंकाळी शरीक केले. विवेकानंद हॉस्पीटलमध्ये शरीक केले त्यावेळी त्याचे वडीलाच्या अंगावर चुकीच्या उपचारामुळे आलेले फोड होते तसेच किडनीचा त्रास होता. सदर गोष्ट रक्त, लघवीची तपासणी केल्यानंतर मिळालेल्या अहवालाचे वाचन विवेकानंद हॉस्पीटलमध्ये केल्यावर निदर्शनास आली. या सर्व गोष्टीस सामनेवाला याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचेही निदर्शनास आले. तक्रारदाराचे वडीलाचे उपचाराच्या दरम्यान असे निष्पन्न झाले की, सामनेवाला यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे तक्रारदार यांच्या वडीलाची लघवी बंद झाली. त्यामुळेच विवेकानंद हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांनी तक्रारदारास त्याचे वडीलांना औरंगाबाद येथे पुढील उपचाराकरता हलविण्याचा सल्ला दिला. सदर सल्ल्यानुसार तक्रारदाराचे वडीलास पुढील वैद्यकीय उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना तक्रारदाराचे वडील रस्त्यातच मरण पावले. वरील सर्व कारणामुळे तक्रारदाराचे असे मत झाले आहे की, त्याचे वडीलाचे मृत्यूस सामनेवाला जबाबदार आहे. तक्रारदाराचे वडील हे शारिरिकदृष्टया तंदुरुस्त होते, ते ड्रायव्हर म्हणून काम करत होते. सामनेवाला यांनी चुकीचा वैद्यकीय उपचार दिल्यामुळे त्याचे वडीलांना अकाली जीव गमवावा लागला. ते अजून 30 वर्षे जगले असते व ड्रायव्हर म्हणून काम करु शकले असते. वडीलांच्या मृत्यूमुळे तक्रारदार याचे पैशाच्या स्वरुपात भरुन न येणारे नुकसान झाले आहे. परंतू या तक्रार अर्जाच्या कारणाकरता तो रु.10,00,000/- नुकसान भरपाई गृहीत धरत आहे. सदर रकमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली तेव्हा सामनेवाला यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. तक्रारदार याने नोटीस पाठविली परंतू सामनेवाला याने नुकसान भरपाई देण्याकरता तयारी दर्शविली नाही. त्यामुळे तक्रारदार याने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार याने वेगवेगळया मुद्याखाली एकूण रु.10,65,000/- नुकसान भरपाई सामनेवालाकडून मागितलेली आहे.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत जोडलेल्या नि.3 यादीप्रमाणे आवश्यक कागदपत्रांच्या नक्कला ग्राहक मंचाचे अवलोकनार्थ दाखल केल्या आहेत. त्यामध्ये सामनेवाला याने डॉक्टर सिददीकी यांना दि.14.10.2015 रोजी लिहीलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत दाखल आहे. त्याचप्रमाणे दि.14.10.2015 रोजी लिहीलेल्या एका औषधीच्या प्रिस्क्रीप्शनचा कागद आहे. दि.18.10.2015 रोजी तक्रारदाराच्या वडीलाचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्राची प्रत आहे. विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बीड येथील डॉक्टर तोष्णीवाल यांनी डॉक्टर भटटू यांना दिलेल्या दि.18.10.2015 रोजी लिहीलेल्या पत्राची नक्कल आहे. विवेकानंद हॉस्पीटल येथे तक्रारदाराचे वडील शरीक असताना केलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालाच्या प्रती दाखल आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदार याने सामनेवाला यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल आहे.
सामनेवाला वकीलामार्फत ग्राहक मंचासमोर हजर झाले. त्यांनी तक्रारदार याने लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. सामनेवालाचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यांनी ते सामनेवाला यांचा ग्राहक असल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे ही तक्रार खारीज करणे जरुरी आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसते की, दि.14.10.2015 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वडीलांना काही औषधी लिहून दिली व सोबत डॉ.सिददीकी यांना पत्र लिहून तक्रारदाराचे वडीलांना योग्य तो पुढील उपचार करण्याकरता सुचविले, परंतू तक्रारदाराचे वडीलांनी सामनेवाला यांनी लिहून दिलेली औषधी घेण्यापूर्वी डॉ.सिददीकी यांचा सल्ला घेतला होता अथवा नाही याचा कोणताही पुरावा जोडलेला नाही. तसेच प्रिस्क्रीप्शनवर लिहीलेली औषधी घेतली अथवा नाही याचाही पुरावा दाखल नाही. तक्रारदार याने सामनेवाला यांनी सुचविलेल्या डॉ.सिददीकी यांच्याकडे वडीलाची प्रकृती खरोखरच दाखविली या बाबतही पुरावा दाखल केला नाही. तक्रारदार यांनी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बीड मधील डॉ.तोष्णीवाल यांनी डॉक्टर भटटू धूत हॉस्पीटल औरंगाबाद यांना लिहीलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे. परंतू त्या पत्रात पेशंटच्या नावाचा उल्लेख नाही. तसेच चुकीची औषधी दिल्यामुळे तक्रारदाराचे वडील जास्त आजारी पडल्याचाही उल्लेख नाही. मृत्यू प्रमाणपत्रामध्ये ही तक्रारदाराचे वडील कशाने मयत झाले याचे कारण लिहीण्यात आलेले नाही. गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे तक्रारदाराचे वडील मयत झाले असे दाखविणारा कोणताही पुरावा अथवा तज्ञ डॉक्टरांचा अहवाल तक्रारदार याने दाखल केलेला नाही. वरील कारणास्तव तक्रारदाराचा तक्रार अर्ज खारीज करावा अशी सामनेवाला यांची विनंती आहे.
आम्ही तक्रारदाराचा तक्रार अर्ज व सामनेवाला याचे लेखी जबाबाचे वाचन केले. त्याचप्रमाणे तक्रारदार याने दाखल केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षण केले.
आमच्या मताने तक्रारदार याने त्याचे सामनेवाला विरुध्दचे प्रकरण उचित पुरावा देऊन योग्यरितीने सिध्द करणे आवश्यक आहे. परंतू तक्रारदार या प्रकरणात सामनेवाला यांचे विरुध्द ही केस सिध्द करायला पुरेसा ठरेल इतका पुरावा देऊ शकलेला नाही. तक्रारदार याने तक्रारीसोबत दि.14.10.2015 रोजी सामनेवाला याने डॉ.सिददीकी एम.डी. यांना लिहीलेल्या पत्राची नक्कल जोडली आहे. पंरतू डॉ.सिददीकी यांचेकडे तक्रारदार याच्या वडीलांना वैद्यकीय उपचाराकरता नेले अथवा नाही, याचा कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. डॉ.सिददीकी यांना लिहीलेले पत्र दि.14.10.2015 रोजीचे आहे. तक्रारीच्या पहिल्या परिच्छेदामध्ये असे स्पष्ट शब्दात लिहीण्यात आलेले आहे की, तक्रारदाराचे वडीलाना दि.14.11.2015 रोजी संडास व उलटी झाल्यामुळे उपचाराकरता सामनेवाला यांच्या शहागड येथील हॉस्पीटलमध्ये आणले. याचाच अर्थ असा की, 14 तारखेस तक्रारदार याने त्याचे वडीलाना उलटी व संडास याच तक्रारीकरता सामनेवाला यांच्या दवाखान्यात आणले परंतू त्याच दिवशी सामनेवाला यांनी तक्रारदार याचे वडीलांना डॉ.सिददीकी यांच्याकडे तपासणी आणि योग्य इलाजाकरता पाठवण्याचा सल्ला दिला. परंतू तक्रारीच्या परिच्छेद क्र.1 मध्ये मात्र असे लिहीण्यात आले आहे की, 14 तारखेस तक्रारदार याचे वडीलाना सामनेवाला यांच्या शहागड येथील दवाखान्यात उपचाराकरता आणल्यावर सामनेवाला यांनी त्यांना दवाखान्यात शरीक करुन घेतले व दोन दिवस उपचार केला. सामनेवाला याने दिलेल्या उपचारामुळे तक्रारदार याचे वडीलाच्या जिभेला फोड आले व अंगावर फोड आले, पोटात आग झाली. या सर्व कथनावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराचे वडील रुस्तूम इस्माईल दि.16.10.2015 पर्यंत सामनेवाला यांचे दवाखान्यात शरीक होते. परंतू दि.14.10.2015 चे डॉ.सिददीकी यांना लिहीलेले पत्र वाचले तर असे निष्पन्न होते की, 14 ऑक्टोबर 2015 रोजीच सामनेवाला यांनी तक्रारदार याचे वडील रुस्तूम इस्माईल यांना डॉ.सिददीकी एम.डी. यांचेकडे पाठविले. वरील सर्व परिस्थिती तक्रारदाराचे कथन संशयास्पद करत आहे.
दि.14.10.2015 रोजी सामनेवाला याने तक्रारदार याचे वडीलाना दिलेल्या औषधीचे प्रिस्क्रीप्शन तक्रारदाराने दाखल केले आहे. परंतू सदर प्रिस्क्रीप्शनमधील औषधी नक्की कोणत्या पेशंटला द्यायची आहेत त्याचे नांव लिहीलेले नाही. तसेच प्रिस्क्रीप्शन लिहीणा-या व्यक्तीने सदर प्रिस्क्रीप्शनवर स्वतःची सही केलेली नाही. वरील सर्व औषधी खरोखरच तक्रारदार यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे व सांगितलेल्या प्रमाणात रुस्तूम इस्माईल सयद यांच्याकरता विकत घेतली अथवा नाही हे दाखविण्याकरता औषधी विकत घेतल्याची पावती दाखल नाही. तसेच सदर औषधी विकत घेतल्यानंतर ती खरोखरच रुस्तूम इस्माईल याला दिली अथवा नाही याचाही बोध होत नाही.
मूळ तक्रारीच्या परिच्छेद 2 मध्ये असे लिहीले आहे की, सामनेवाला याने तक्रारदार यास सुचविले की, तक्रारदार याने त्याचे वडीलाना बीड येथे पुढील उपचाराकरता न्यावे. सदर सल्ल्यानुसार तक्रारदार याने दि.16.10.2015 रोजी सायंकाळी त्याचे वडीलाना विवेकानंद हॉस्पीटल बीड येथे नेवून शरीक केले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार दि.14.10.2015 व 15.10.2015 या दोन दिवशी तक्रारदाराच्या वडीलांनी सामनेवाला यांच्याकडे वैद्यकीय उपचार घेतला व 16 तारखेस सायंकाळी त्यांना विवेकानंद हॉस्पीटल बीड येथे पुढील उपचाराकरता दाखल करण्यात आले. दि.16.10.2015 पासून 18.10.2015 पर्यंत तक्रारदार याचे वडील जिवंत होते. दुर्दैवाने दि.18.10.2015 रोजी तक्रारदार याचे वडीलाचा मृत्यू झाला. विवेकानंद हॉस्पीटल बीड येथील डॉ.तोष्णीवाल यांनी धूत हॉस्पीटल औरंगाबाद येथील तज्ञ डॉ.भटटू यांना पत्र देऊन तक्रारदाराच्या वडीलांचे प्रकृतीबाबत कळविले व आवश्यक तो उपचार देण्याबददल विनंती केली. सदर डॉ.भटटू यांचे नावे लिहीलेल्या पत्राची प्रत तक्रारदार याने ग्राहक मंचासमोर दाखल केलेली आहे.
तक्रारीच्या परिच्छेद 1 मध्ये तक्रारदार याने असे लिहीले आहे की, त्याचे वडील रुस्तूम इस्माईल सयद यांना संडास व उलटीचा त्रास झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. परंतू दि.14.10.2015 रोजी सामनेवाला यांनी डॉ.सिददीकी यांना जे पत्र लिहीले त्यामध्ये व्हायरल फीवर व प्रकृतीची अस्वस्थता असे आजारपणाचे कारण लिहीलेले आहे. सदर पत्रामध्ये संडास व उलटी यांचा उल्लेख नाही. त्यामुळे आम्हास असे वाटते की, तक्रारदाराचे वडीलांना प्रत्यक्ष काय झाले होते हे स्पष्ट होत नाही.
प्रथमदर्शनी असे वाटते की, खरोखरच दि.14.10.2015 चे पत्र सामनेवाला यानीच लिहीले असेल तर त्या पत्रामध्ये त्यांनी तक्रारदार याचे वडीलाना उलटी व संडासचा त्रास होत असल्याबददल का लिहीले नाही. त्याचप्रमाणे दि.14.10.2015 रोजीच्या प्रिस्क्रीप्शनमध्ये जी औषधी लिहीली आहे ती खरोखरच सामनेवाला यांनी लिहून दिली आहेत हे तक्रारदार याने सिध्द करणे आवश्यक होते, परंतू तसे करण्यात आले नाही. सदर औषधी खरोखरच तक्रारदार याने विकत घेतली का व ती औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे व सांगितलेल्या प्रमाणानुसार तक्रारदार याचे वडीलांना दिली अथवा नाही या बाबतही उचित पुरावा दाखल नाही. सदर प्रिस्क्रीप्शन खरोखरच तक्रारदार याचे वडीलाचे नावे देण्यात आले होते अथवा नाही याचा खुलासा होत नाही. त्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होत नाही.
तक्रारदार याने त्याचे वडीलाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. परंतू सदर प्रमाणपत्रामध्ये तक्रारदार याच्या वडीलाचे मृत्यूचे कारण लिहीलेले नाही. जर, खरोखरच वैद्यकीय इलाजाच्या दुष्परिणामामुळे तक्रारदार याच्या वडीलाचा मृत्यू झाला असेल तर तसे कारण मृत्यूच्या प्रमाणपत्रामध्ये लिहीणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे पोलीसात तक्रार देऊन तक्रारदार याच्या वडीलाचे शवविच्छेदन करुन घेणेही आवश्यक होते, परंतू तसे केलेले दिसून येत नाही.
तक्रारदार याने दि.14.10.2015 रोजी डॉ.सिददीकी यांच्या नावे सामनेवाला यांनी लिहीलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे. त्यावरील सही डॉ.अमीरची असावी असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण सामनेवाला यांच्या वकीलपत्रावरील सही आणि लेखी जबाबावरील सही सदर प्रिस्क्रीप्शनवरील सहीशी मिळतीजुळती नाही.
ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार तक्रारदार आणि सामनेवाला यांच्यामध्ये जर ग्राहक व सेवा पुरविणारा हे नाते सिध्द झाले तरच सेवेतील त्रुटी करता सेवा पुरविणारा याना जिम्मेदार धरता येऊ शकते. या प्रकरणात सामनेवाला हा तक्रारदाराचा सेवा पुरविणारा आहे असे सिध्द झाले नाही. त्यामुळे सामनेवाला याने दिलेल्या सेवेतील त्रुटीचा प्रश्नच उदभवत नाही. अशा परिस्थितीत आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना