निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार हे जेष्ठ नागरीक आहेत असून वयोमानानुसार अर्जदाराने गेल्यावर्षी डाव्या डोळयाला होणा-या त्रासामुळे गैरअर्जदार यांच्याकडे तपासणी करुन फेब्रुवारी 2010 मध्ये गैरअर्जदार यांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केलेली होती. गैरअर्जदाराने शस्त्रक्रिया झाल्यावर उजव्या डोळयाच्या संभाव्य त्रासाची कल्पना दिली होती व साधारणपणे सन 2011 मध्ये त्यावरही शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते. उजव्या डोळयाने अर्जदारास कमी दिसू लागल्यानंतर दिनांक 20/09/2011 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सर्व तपासण्याकरुन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दिनांक 22/09/22011 रोजी शस्त्रक्रियेच्या आधी दर 5 मिनीटाला Eye Drops टाकायला सांगितले होते. त्यावेळेस अर्जदाराची लहान मुलगी अंजनाबाई एकनाथराव गायकवाड सोबत होती. गैरअर्जदार त्यांच्या असिस्टंटला अर्जदाराच्या डोळयात, बुबुळात इंजेक्शन देण्यास सांगितले. त्यावेळेस सदर इंजेक्शन देतांना चुकीच्या पध्दतीने व अत्यंत निष्काळजीपणाने इंजेक्शन दिल्याने अर्जदारास खूप वेदना झाल्या व डोळयाच्या खालच्या व आतल्या बाजुस जखम झाल्या सारखे जाणवले. सदर बाब अर्जदारांनी गैरअर्जदारांना दाखवली असता गैरअर्जदाराने समाधान केले. तसेच शस्त्रक्रिया योग्यत-हेने झालेली आहे आहे हेही सांगितले. शस्त्रक्रियेनंतर गैरअर्जदाराने अर्जदारास शस्त्रक्रिया झालेल्या डोळयाने दिसते का असे विचारले होते परंतू दुसरा डोळा बंद न करता विचारले असल्याने अर्जदारास नेमके सांगता आले नाही. दुस-या दिवशी गैरअर्जदारांनी अर्जदारास डिस्चार्ज दिला व व 7 दिवसानंतर पुन्हा येण्यास सांगितले. अर्जदार घरी गेल्यानंतर अर्जदाराचे डोके दुखण्यास व ऑपरेशन झालेल्या डोळयात ठणका येण्यास सुरुवात झाली. 7 दिवसांनी अर्जदाराने गैरअर्जदारास सर्व परिस्थिती सांगितली असता डोळयास जखम आहे पण ती लवकर बरी होईल असे सांगून औषध व गोळया दिल्या. त्यावेळी अर्जदार मोठी मुलगी पंचफुला मधूकर जोगदंड व जावई यांच्यासोबत सिध्दार्थनगर, पुर्णा येथे रहात होते. घरी आल्यावर दोन्ही मुली व जावई यांनी पाहिले असता अर्जदाराचा डोळा पूणपणे पांढरा पडल्याचे दिसून आले व त्या डोळयाने अर्जदारास काहीच दिसत नव्हेते. त्यामुळे डोळा निकामी झाल्याची सर्वाना शंका आली. त्यावेळी अर्जदाराला गैरअर्जदार यांच्याकडे नेले असता गैरअर्जदार यांनी तपासणी केल्यावर शंकांचे कोणतेही समाधान न करता चिखलवाडी नांदेड येथे डॉ. कहाळेकर यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखवण्यास सांगितले. त्याप्रमाणे दाखवले असता अर्जदारास ऑपरेशनच्या आधी दिलेल्या इंजेक्शनपासून हा त्रास होत आहे असे सांगून अर्जदारास उपचारासाठी हैद्राबाद येथे जा असे सांगितले. त्याच दिवशी दिनांक 04/10/2011 रोजी हैद्राबाद येथे डॉ. मुकेश तनेजा यांच्या नावे चिठ्ठी दिली. अर्जदार यांची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने पैशाची व्यवस्था झाल्याशिवाय हैद्राबाद येथे जाणे शक्य नव्हते. त्यावेळी पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री चक्रवर्ती वाघमारे अर्जदाराकडे आले असता त्यांना अर्जदाराच्या सर्व परिस्थितीची कल्पना आली व त्यावेळी त्यांनी अर्जदारास घेवून गैरअर्जदार यांच्याकडे आले असता गैरअर्जदाराने अर्जदारास तपासले व अर्जदारास बाहेर बसण्यास सांगून श्री चक्रवर्ती हे एकटेच गैरअर्जदारास भेटले. त्यावेळी गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा डोळा पूर्णपणे निकामी झालेला असल्याचे सांगितले. त्यानंतर अर्जदारास ‘गणपती नेत्रालय, जालना’ यांच्या नावे चिठ्ठी दिली. ‘गणपती नेत्रालय, जालना’ येथे दाखवले असता त्यांनी अर्जदाराचा डोळा काढावा लागेल असे सांगितले व दिनांक 09/10/2011 रोजी अर्जदारास अॅडमीट करुन अर्जदाराचा उजवा डोळा काढून टाकला व औषधोपचार करुन अर्जदारास घरी पाठवले. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या निष्काळजीपणाच्या सेवेमुळे अर्जदाराला उजवा डोळा गमवावा लागलेला आहे. गैरअर्जदार यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या असिस्टंटने अर्जदाराच्या डोळयास चुकीच्या पध्दतीने इंजेक्शन दिलेले असल्याने अर्जदाराचा डोळा निकामी होवून काढावा लागलेला आहे. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याविरुध्द तक्रार दाखल केलेली असून अर्जदारास गैरअर्जदार यांनी दिलेल्या निष्काळजीपणाच्या सेवेमुळे अर्जदारास कायमचे अपंगत्व आलेले असल्याने रक्कम रु. 2,00,000/- 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांनी दयावेत. तसेच आनावश्यक खर्चापोटी रक्कम रु. 30,000/- नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- दयावेत अशी विनंती तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
लेखी जबाबामध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील संपूर्ण कथन अमान्य केलेले आहे. अर्जदाराच्या डोळयाचे ऑपरेशन गैरअर्जदार यांनी दिनांक 21/09/2011 रोजी केलेले असून ऑपरेशन करतांना अर्जदारास कोणतीही वेदना झालेली नाही, ऑपरेशन व्यवस्थीत झालेले आहे. अर्जदारास डिस्चार्ज देण्यापूर्वी व्यवस्थीत तपासण्यात आलेले होते. त्यानंतर अर्जदारास डिस्चार्ज देण्यात आला व 5 दिवसानंतर पुन्हा येण्यास सांगितले. अर्जदार दिनांक 30/09/2011 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे आला असता अर्जदाराच्या डोळयाच्या वरच्या बाजुला जखम झाल्याचे दिसून आले. सदरची जखम ही अर्जदाराने योग्यती काळजी न घेतल्यामुळे झालेली होती. ऑपरेशनमध्ये डोळयाच्या वरील बाजूस जखमा होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. डोळयात धुळ गेल्यास, डोळयाची स्वच्छता न ठेवल्यास, हवामानातील प्रदुषणामुळे, जमिनीवर झोपल्यास व इतर ब-याच कारणामुळे जखम होण्याची शक्यता असते. डोळयाच्या वर जखम झालेली असल्याने अर्जदारास गैरअर्जदाराने त्वरीत उपचार सुरु केले व ताबडतोब हायर सेंटरला म्हणजे जे.जे. हॉस्पीटल, मुंबई किंवा एल.व्ही. प्रसाद हॉस्पीटल, हैद्राबाद येथे जाण्यास सांगितले. सदरची जखम नैसर्गीकरित्या किंवा औषधाने बरी होण्याची शक्यता कमी असते. त्यास कॉर्नियल ग्राफ्टींग (बुबुळ प्रत्यारोपन शस्त्रक्रिया) करावी लागते. जी सुविधा नांदेड येथे नसल्याने अर्जदारास हायर सेंटरला जाण्यास सांगितले. दिनांक 04/10/2011 रोजी अर्जदार ही गैरअर्जदाराकडे पुन्हा आली असता गैरअर्जदाराने तपासले असता डोळयातील जखम ही वरील बाजुने आतील बाजुस पसरण्यास सुरुवात झाली होती म्हणून अर्जदारास ताबडतोब पुन्हा हायर सेंटरकडे जा असे सांगितले व सेकंड ओपिनियनसाठी (डोळयाच्या मागच्या पडदयाचे तज्ञ) डॉ. कहाळेकर यांच्याकडे पाठवले. त्यांनी अर्जदाराची तपासणी केली व अर्जदारास बुबुळ प्रत्यार्पन करावयाची आवश्यकता असल्याचे वर्तवून डॉ. एल.व्ही. प्रसाद हॉस्पीटल, हैद्रबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. दिनांक 04/10/2011 रोजी अर्जदार ही पुन्हा गैरअर्जदाराकडे आली असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास वेळ न घलवता हायर सेंटरला जा असे सांगितले. त्यानंतर अर्जदार ही ‘गणपती नेत्रालय, जालना’ येथे गेली. जालना येथे जाईपर्यंत विलंब झाला होता. अर्जदाराच्या डोळयास झालेली जखम ही इंजेक्शनमुळे झालेली नव्हती. अर्जदाराने डोळयाची काळजी योग्यरित्या न घेतल्यामुळे सदरील जखम झालेली होती. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या वैदयकीय सेवेमध्ये कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही याउलट अर्जदार हिने हायर सेंटरला जाण्यास विलंब केलेला आहे त्यामुळे अर्जदारास डोळा गमवावा लागलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या वैदयकीय सेवेमध्ये कुठलीही त्रुटी किंवा निष्काळजीपणा केलेला नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार नामजूर करण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार यांचे वकील दिनांक 10/04/2013 रोजी प्रकरणामध्ये मंचासमोर हजर होते. त्यानंतर दिनांक. 6/5/2013, 12/06/2013, 29/7/2013, 4/9/2013, 10/10/2013, 11/10/2013, 28/10/2013, 22/11/2013, 7/1/2013, प्रकरणामध्ये गैरहजर होते. त्यानंतर दिनांक 13/2/2014, रोजीच फक्त अर्जदार यांचे वकील हजर. त्यानंतर पुन्हा दिनांक 18/3/2014, 16/4/2014, 3/5/2014, 20/6/2014, 2/7/2014, 23/7/2014, 13/8/2014, 8/9/2014, 29/9/2014, 10/11/2014, 20/11/2014, 23/12/2014, 19/1/2015, 5/2/2015, 10/2/2015 व 17/3/2015 रोजी अर्जदार व त्यांचे वकील मंचासमोर उपस्थित नाही. त्यामुळे प्रकरण उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेवर निकाली काढण्याचा निर्णय मंचाने घेतला.
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचा लेखी जबाब दाखल झाल्यानंतर दिनांक 13/02/2014 रोजी सदरील प्रकरण हे अधिष्ठता, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविदयालय, नांदेड’ यांच्याकडे कागदपत्रे पाठविण्यात येवून त्यांचा अभिप्राय घेण्यात यावा असा अर्ज दिला त्यावर गैरअर्जदार यांनी आपले म्हणणे दाखल केले. सदर अर्जावर दिनांक 29/09/2014 रोजी आदेश पारीत करण्यात आलेला असून अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात आलेला होता व दिनांक 10/11/2014 रोजी मंचासमोर प्रस्तुत प्रकरणाचे इतर दोन पार्टस उपलब्ध नसल्यामुळे अर्जदारास अभिप्राय मागवण्यासाठी तक्रारीची संपूर्ण झेरॉक्स कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर अर्जदार व त्याचे वकील मंचासमोर आलेले नाहीत तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये गैरअर्जदार यांनी निष्काळजीपणा केलेला आहे असा कुठलाही पुरावा मंचासमोर दिलेला नाही तसेच ‘गणपती नेत्रालय, जालना’ यांच्या उपचाराची कागदपत्रे बघीतली असता त्यामध्येही अर्जदाराच्या डोळयावर केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये गैरअर्जदार यांनी निष्काळजीपणा केलेला असल्याचा कुठलाही उल्लेख नाही. अर्जदार ही गैरअर्जदार यांच्याकडे डोळयास होणा-या त्रासाबद्दल उपचार घेण्यासाठी आलेली होती. वैदयकीय शास्त्रानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार हिच्या डोळयावर योग्य ते उपचार केलेले असल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. तसेच गैरअर्जदार यांच्याकडे पुढील उपचाराच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास हायर सेंटरला जाण्यास सांगितलेले होते. ही बाब अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या गैरअर्जदार यांनी दिनांक 30/09/2011 रोजीच्या Priscription वरुन दिसून येते कारण दिनांक 30/09/2011 रोजी गैरअर्जदार यांनी दिलेल्या Priscription वर Adv – VR – opn.
Pt. adv. Sclero cavneal grafting at higher center J.J. Hosp. Mumbai or LVPI Hyarabad.
Pt. not willing.
असे गैरअर्जदार यांनी लिहिलेले असून सदरील पुरावा अर्जदारानेच दाखल केलेला आहे. यावरुन अर्जदाराने गैरअर्जदार यांचा सल्ला ऐकला नाही, असे सिध्द होते.
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या सहाय्यकांने चुकीच्या पध्दतीने व निष्काळजीपणाने डोळयामध्ये इंजेक्शन दिलेले होते. याबद्दलचा कोणताही पुरावा किंवा तज्ञांचे मत (Expert Opinion) दाखल केलेले नाही. यावरुन अर्जदार ही गैरअर्जदार यांनी दिलेल्या वैदयकीय सेवेमध्ये निष्काळजीपणा केलेला आहे ही बाब पुराव्यानिशी सिध्द करु शकलेली नाही असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.