नि. १५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३४७/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १७/०७/२०१०
तक्रार दाखल तारीख : १९/०७/२०१०
निकाल तारीख : ३०/११/२०११
----------------------------------------------------------------
प्रदीप शिवाजी जाधव
व.व.२७, धंदा- खाजगी नोकरी
रा.खंडोबाचीवाडी, ता.पलूस जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
डॉ आर.व्ही.देशमुख
व.व.४०, धंदा- पशु वैद्यकीय
रा.माळवाडी, ता.पलूस जि.सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò: +ìb÷.श्री.सुहास कवठेकर, एस.एम.वाघमारे
जाबदार : स्वत:
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज पशुवैद्यकीय निष्काळजीपणाबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी गायी व म्हैशी सांभाळल्या आहेत. तक्रारदार यांची गाय साडेपाच महिन्याची गाभण होती. सदर गायीचे तपासणीसाठी तक्रारदार यांचे भावाने दि.१२/५/२०१० रोजी जाबदार यांना तपासणीसाठी बोलावले. जाबदार यांनी तपासणी करुन गायीचे अबॉर्शन झाले आहे, पोटात गर्भ नाही त्यामुळे वार पडणे आवश्यक आहे असे सांगितले. तक्रारदार यांच्या भावाने गायीचे अबॉर्शन वगैरे काही झाले नाही असे सांगितले. तथापि जाबदार यांनी अबॉर्शन झालेले आहे, ते पिल्लू कुत्र्याने खाल्ले असेल, वार पडण्यासाठी औषध देतो असे सांगून दोन इंजेक्शन दिली व चार गोळया गर्भाशयात ठेवून तासाभरात वार पडेल असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने गायीने पिल्लाला जन्म दिला, सदरचे पिल्लू मृत असल्याचे आढळून आले. सदरची घटना जाबदार यांच्या चुकीच्या निदानामुळे व चुकीच्या औषधोपचारामुळे घडली. त्यानंतर जाबदार यांनी नुकसान भरपाई देतो असे सांगूनही कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. तक्रारदार यांनी पोलिस स्टेशनला तक्रार देणेचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी पोलिस अधिक्षक यांचेकडे तक्रारअर्ज दिला. तसेच दि.२८/५/२०१० रोजी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, यांच्याकडे तक्रारअर्ज दिला. तक्रारदारांनी जाबदार यांना दि.२८/५/२०१० रोजी विधिज्ञांमार्फत नोटीस पाठविली. सदरची नोटीस घेत नाही असा शेरा मारुन परत आली. जाबदार यांनी दिलेल्या या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी हजर होवून नि.८ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये दि.१२/५/२०१० रोजी तक्रारदार यांचे भाऊ संदीप जाधव यांनी गायीवर उपचार करावेत असे सांगितलेने सकाळी १०.३० वा. अर्जदार यांचे घरी जावून तपासणी केली. त्यावेळी गायीची प्रकृती अशक्त व खालावलेली होती. गायीला १०६०फॅ ताप होता. गायीच्या योनीवाटे हात घालून तपासणी केली असता गायीचे वासरु मृत असलेले आढळून आले. त्यावेळी अर्जदार यांना गर्भाशयात वासरु मृत पावले असून गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे न उघडल्यामुळे वासरु हाताने ओढून काढणे शक्य नाही. गायीला भरपूर ताप आहे, तो ताप कमी होण्याकरिता मी इंजेक्शन देतो व वासरु बाहेर येणेकरिता औषध देतो ते तुम्ही गायीला पाजावे, सायंकाळी साडेपाच पर्यंत वासरु बाहेर येईल, न आल्यास बाहेर पडण्याचे इंजेक्शन द्यावे लागेल. औषध पाजल्यामुळे गायीचे मृत वासरु सायंकाळी पाच वाजता बाहेर आले. तक्रारदार यांच्या गायीवर जाबदार यांनी घरी जावून विनामूल्य उपचार केले आहेत. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.९ ला प्रतिज्ञापत्र व नि.१० च्या यादीने १ कागद दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी नि.११ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांच्या म्हणण्यातील मजकूर अमान्य केला आहे. तक्रारदार यांनी नि.१२ ला प्रतिउत्तराचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.१४ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांचे विधिज्ञ यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. जाबदार हे युक्तिवादाचे दरम्यान गैरहजर राहिले.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपत्रे, प्रतिउत्तर व लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदारतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का ? ही बाब ठरविणे गरजेचे आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे गायीवर विनामोबदला उपचार केले असे नमूद केले आहे. तथापि जाबदार यांनी नि.१० चे यादीने दाखल केलेल्या नि.१०/१ वरील केसपेपरचे अवलोकन केले असता त्यावर सेवाशुल्क रु.११/- आकारले आहेत. जाबदार हे शासकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. जाबदार यांनी रक्कम रु.११/- सेवाशुल्क आकारले आहे. तक्रारदारा यांचेकडून सेवाशुल्क घेवून तक्रारदार यांच्या गायीवर उपचार केलेले आहेत. शासकीय दवाखान्यामध्ये रक्कम स्वीकारुन उपचार केले असतील तर सदरची सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे नि:शुल्क होणार नाही. सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशन विरुध्द व्ही.पी.शांता III (1995) CPJ Page 1 या निवाडयाचे कामी सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने नोंदणीकरिता काही रक्कम स्वीकारली असेल तरी ती सेवा नि:शुल्क सेवा गृहीत धरली आहे. प्रस्तुत कामामध्ये जाबदार यांनी रक्कम रु.११/- हे नोंदणीकरिता आकारले आहेत असे कुठेही नमूद केले नाही. सदर केसपेपरवर मात्र रक्कम रु.११/- हे सेवाशुल्क म्हणून आकारले आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार यांची सेवा मोबदला देवून घेतली आहे ही बाब स्पष्ट होत असल्याने तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
६. तक्रारदार यांच्या गायीवर उपचार करणेमध्ये जाबदार यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केला आहे का ? ही बाब याठिकाणी ठरविणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये जाबदार यांनी गायीचे अबॉर्शन झाले असे सांगितल्याचे कथन केले आहे तर जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे गायीची तपासणी केली असता गायीचे वासरु गर्भाशयात मृत झाल्याचे आढळले व सदरचे मृत वासरु बाहेर येण्यासाठी व ताप कमी येण्यासाठी इंजेक्शन व औषधे दिली असे नमूद केले आहे. जाबदार यांनी गायीवर काय उपचार केले याबाबतचा केसपेपर प्रस्तुत कामी नि.१०/१ वर दाखल केला आहे. सदरचा केलेला उपचार चुकीचा आहे, देण्यात आलेली औषधे ही ताप कमी येण्यासाठी व मृत झालेले वासरु बाहेर पडण्यासाठी दिलेली नाहीत असा दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेला नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या गायीबाबत केलेले निदान चुकीचे आहे हे दर्शविण्यासाठी स्वतंत्र तज्ञ व्यक्तीचा अहवाल याकामी दाखल नाही. त्यामुळे जाबदार यांनी चुकीचे निदान केले व चुकीचे उपचार केले, उपचारात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केला ही बाब तक्रारदार यांनी पुराव्यानिशी शाबीत केली नसल्याने तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ३०/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११