Maharashtra

Jalna

CC/48/2013

Sau.Rukhaminibai Pralhad Dhavale - Complainant(s)

Versus

Dr.R.G.Narvade - Opp.Party(s)

D.K. Nagula

30 Jul 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/48/2013
 
1. Sau.Rukhaminibai Pralhad Dhavale
R/o.Gavali Mohalla,Old Jalna.
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr.R.G.Narvade
Medical and Resrch College of Badnapur,Tq.Badnapur.
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(घोषित दि. 30.07.2014 व्‍दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्‍यक्ष)

 

प्रस्‍तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार पोटाचा आजार व अतिरीक्‍त रक्‍तस्‍त्राव होत असल्‍याने जिल्‍हा महिला सामान्‍य रुग्‍णालय जालना येथे तपासणीसाठी गेल्‍या तेथे गैरअर्जदार हे वैद्यकीय अधिकारी म्‍हणून कार्यरत होते. तपासणी करुन गैरअर्जदारानी तक्रारदारांना सल्‍ला दिला की, अतिरिक्‍त रक्‍तस्‍त्राव होत असल्‍याने शरीरातील दोन टयुब पैकी एक टयुब शस्‍त्रक्रिया करुन बंद करण्‍याची गरज आहे. शस्‍त्रक्रिया आवश्‍यक असल्‍यामुळे तक्रारदाराच्‍या पतीने शस्‍त्रक्रियेसाठी सम्‍मती दिली. त्‍यापुर्वी त्‍यांनी एक टयुब बंद केल्‍यास पुन्‍हा संतती होईल का अशी विचारणा केली तेंव्‍हा गैरअर्जदार यांनी संतती होण्‍यास अडचण निर्माण होणार नाही असे सांगितले आहे.

दिनांक 02.10.2004 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारदारांवर शस्‍त्रक्रिया केली. तरी देखील तक्रारदारांचा त्रास कायम होता. त्रास वाढल्‍यामुळे दिनांक 19.07.2010 रोजी तक्रारदार यांनी डॉ.उढाण हॉस्‍पीटल, जालना येथे तपासणी व डॉ.सुरेश साबू यांचेकडे सोनोग्राफी व H.S.G केली तेंव्‍हा तक्रारदारांच्‍या शरीरातील दोनही टयुब बंद असल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले व त्‍यांना मोठा धक्‍का बसला.

दिनांक 02.10.2004 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्‍या शरिरातील एक टयुब बंद करण्‍यासाठी सम्‍मती घेतली. परंतू निष्‍काळजीपणाने व हलगर्जीपणाने तक्रारदारावर शस्‍त्रक्रिया करुन दोनही टयुब बंद केल्‍या. त्‍यामुळे तक्रारदार व त्‍यांचे कुटूंब यांचा वंश खंडित झाला आहे व त्‍यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.

या तक्रारी अंतर्गत ते रुपये 10,00,000/- नुकसान भरपाई मागत आहेत.

तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारी सोबत जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालयाचे डिस्‍चार्ज कार्ड, हयातनगरकर लॅबरोटरीचा अहवाल, अलनूर हॉस्‍पीटल चा दिनांक 03.08.2006 चा सोनोग्राफी अहवाल, साई डाग्‍नोस्‍टीक सेंटरचा दिनांक 25.05.2010 सोनोग्राफी अहवाल, डॉ.उढाण हॉस्‍पीटलची कागदपत्र, तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस अशी कागदपत्र दाखल केली आहेत.

गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले. त्‍यांच्‍या लेखी खुलाशा नुसार गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या सेवेसाठी कोणतेही शुल्‍क आकारलेले नाही. तसेच प्रस्‍तुत शस्‍त्रक्रिया जिल्‍हा महिला रुग्‍णालय जालना येथे करण्‍यात आली व गैरअर्जदार तेथे वैद्यकीय अधिक्षक म्‍हणून कार्यरत होते अशा परीस्थितीत रुग्‍णालय हे आवश्‍यक प्रतिपक्ष आहे. गैरअर्जदार हे स्‍त्री विषयक आजारचे तज्ञ आहेत.

दिनांक 30.09.2014 रोजी तक्रारदार गैरअर्जदारांकडे तपासणीसाठी आले तेंव्‍हा इक्‍टोपीक प्रेगनन्‍सी, बायलॅट्रल टी.ओ मास हा आजार झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. या आजारात संबंधित स्‍त्रीला गर्भाशयात गर्भधारणा न होता इतर ठिकाणी झालेली असते. त्‍यामुळे वैद्यक शास्‍त्रानुसार हा आजार गुंतागुंतीचा व तातडीने उपाय करण्‍याचा समजला जातो. त्‍यानुसार दिनांक 02.10.2004 रोजी तक्रारदारांवर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. त्‍यामुळे गैरअर्जदार यांच्‍या बरोबरच इतर डॉक्‍टरही उपस्थित होते. शस्‍त्रक्रियेच्‍या नोंदी रुग्‍णपत्रिकेवर आहेत. गैरअर्जदारांनी शस्‍त्रक्रियेच्‍यावेळी तक्रारदार व त्‍यांचे पती यांना स्‍पष्‍ट कल्‍पना दिली होती की, दोनही नळया बाधीत झालेल्‍या आहेत. त्‍यामुळे एक टयुब पूर्णपणे काढणे आवश्‍यक आहे व ओव्‍हीरियन सिस्‍ट काढणे देखील आवश्‍यक आहे. केवळ तक्रारदारांचा जीव वाचवण्‍यासाठी ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली ही बाब रुग्‍ण व नातेवाईकांना मान्‍य होती. मात्र त्‍यांनी शस्‍त्रक्रियेनंतर सुमारे दहा वर्षांनी हा वाद उकरुन काढला आहे. या केसमध्‍ये तक्रारदार चॉकलेटसिस्‍ट ऑफ दी ओव्‍हरी या प्रकारात गेलेला होता. त्‍यामुळे वरील प्रकारे तातडीची शस्‍त्रक्रिया आवश्‍यकच होती. त्‍यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या उपचारात काहीही निष्‍काळजीपणा केलेला नाही. म्‍हणून तक्रारदारांचा अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा.

तक्रारदारांनी आपल्‍या जबाबासोबत रुग्‍णपत्रिकेचा तांत्रिक तपशील इंग्रजी भाषेत दाखल केला आहे. त्‍याच प्रमाणे वैद्यकीय माहिती पत्रकातील व पुस्‍तकातील संबंधीत आजारा बाबत माहिती दाखल केली आहे.

तक्रारदारांनी डॉ.सुरेश साबू यांची साक्ष प्रस्‍तुत प्रकरणात घेतली व गैरअर्जदारांच्‍या वकीलांनी त्‍याचा उलट तपासही घेतला.

तक्रारदारांची तक्रार, गैरअर्जदारांचा जबाब व दाखल कागदपत्र यांच्‍या अभ्‍यासावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.

 

       मुद्दे                                         निष्‍कर्ष

 

1.तक्रारदारांची तक्रार मुदतबाहय म्‍हणून

  फेटाळणे योग्‍य आहे का ?                                            नाही                                                 

 

2.तक्रारदारांची तक्रार आवश्‍यक प्रतिपक्ष नाही

  म्‍हणून फेटाळणे योग्‍य आहे का ?                                      होय

 

3.गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या

  उपचारात काही कमतरता केली आहे का ?                               नाही

 

4.काय आदेश ?                                                अंतिम आदेशा नुसार   

 

 

      तक्रारदारांतर्फे विव्‍दान वकील श्रीमती डी.के.नागुला यांचा युक्‍तीवाद ऐकला. त्‍यांनी सांगितले की, तक्रारदार गैरअर्जदार यांचेकडे जिल्‍हा महिला रुग्‍णालयात उपचारासाठी गेली असता गैरअर्जदारांनी त्‍यांना त्‍यांची एक नळी बंद करावी लागेल असे सांगितले व तरी देखील त्‍यांनी संतती होऊ शकेल असेही आश्‍वासन दिले. म्‍हणून तक्रारदारांनी व त्‍यांच्‍या पतीने शस्‍त्रक्रियेसाठी सम्‍मती दिली. पण प्रत्‍यक्षात त्‍यांनी दोनही नळया (Fallopian Tube) बंद केल्‍या. त्‍यामुळे तक्रारदारांना आता संतती होऊ शकत नाही. तक्रारदारांना त्‍यांच्‍या दोनही टयुब बंद असल्‍याबाबत सन 2010 ला समजले. तक्रारदार अशिक्षीत असल्‍यामुळे व वरील गोष्‍टीचा त्‍यांना धक्‍का बसल्‍यामुळे त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार आठ महिने उशिरा दाखल केली आहे. गैरअर्जदारांनी अशा प्रकारे निष्‍काळजीपणे शस्‍त्रक्रिया करुन तक्रारदारांचे व त्‍यांच्‍या कुटूंबाचे जन्‍माचे नुकसान केले आहे त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

      गैरअर्जदार यांचेतर्फे विव्‍दान वकील श्री.एस.बी.देशपांडे यांचा युक्‍तीवाद ऐकला. त्‍यांनी सांगितले की, तक्रारदारांची वरील शस्‍त्रक्रिया सन 2004 मध्‍ये झाली होती. त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार आता मुदतीत नाही. संबंधित रुग्‍णालय शासकीय रुग्‍णालय असतांना तेथे कोणतेही शुल्‍क आकारले जात नाहीत. रुग्‍णालयाला प्रतिपक्ष केलेले नाही त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार या मुद्दयावर देखील फेटाळणे योग्‍य आहे. इक्‍टोपीक प्रेगनन्‍सी व इंटोमटेरासीस या जीवीताला धोका पोहचविणा-या बाबी असतात. रुग्‍णास त्‍यांचेकडे शॉकमध्‍ये आणले. त्‍यामुळे तातडीची शस्‍त्रक्रिया आवश्‍यक होती. शस्‍त्रक्रिये दरम्‍यान तक्रारदारांच्‍या दोनही ओव्‍हरीज मधील चॉकलेट सिस्‍ट काढून टाकावे लागले. तसेच Tubal Pregancy असल्‍यामुळे फॅलेपिन टयूब्‍ज बाधित झालेल्‍या होत्‍या त्‍यामुळे त्‍यांचेवर देखील शस्‍त्रक्रिया करुन त्‍या कापाव्‍या लागल्‍या. शस्‍त्रक्रिये बाबतची संपूर्ण माहिती देवूनच रुग्‍ण व त्‍यांचे पती यांची सम्‍मती घेण्‍यात आली. त्‍याची सविस्‍तर नोंद रुग्‍ण उपचार पत्रिकेवर केलेली आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांवर उपचार करण्‍यात कोणताही निष्‍काळजीपणा केलेला नाही. म्‍हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळण्‍यात यावी. त्‍यांनी आपल्‍या युक्‍तीवादा दरम्‍यान संबंधित आजाराची वैद्यकीय माहिती दाखल केली.

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 साठी – दाखल कागदपत्रात सन 2006 मधील तक्रारदारांच्‍या सोनोग्राफीचा अहवाल आहे. परंतू त्‍यात Tubal blockage चा उल्‍लेख केलेला नाही. दिनांक 19.07.2010 च्‍या अहवालात साई डायग्‍नोस्‍टीक सेंटर च्‍या सोनोग्राफी व H.S.G अहवालात ‘Both tubas show mid tubal Complete block’ असा उल्‍लेख दिसतो. त्‍यावरुन तक्रारदारांना जुलै 2010 मध्‍ये प्रथमच Tubal blockage बाबत समजले असे दिसते. तरी देखील एप्रिल 2013 मध्‍ये दाखल केलेली ही तक्रार सुमारे आठ महिने उशिराने दाखल केलेली दिसते. तक्रारदारांनी तक्रारी बरोबर विलंब माफीचा अर्ज देखील केला आहे. त्‍यात तक्रारदार अशिक्षीत असल्‍यामुळे व संतती होणार नाही या गोष्‍टीचा तिला धक्‍का बसल्‍यामुळे तक्रार उशीराने दाखल केल्‍याचे म्‍हटले आहे. प्रस्‍तुत विलंब माफीच्‍या अर्जावर युक्‍तीवाद होवून मूळ अर्जाबरोबर तो निकाली करावा असा आदेश मंचाने केला होता. तक्रारदारांचा अशिक्षीतपणा व त्‍यांच्‍या आजाराचे स्‍वरुप लक्षात घेता प्रस्‍तुत तक्रार केवळ विलंबाच्‍या कारणाने फेटाळून न लावला तिचे गुणवत्‍तेवर निराकरण करणे न्‍याय्य ठरेल असे मंचाला वाटते म्‍हणून मंच मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर नकारार्थी देत आहे.

मुद्दा क्रमांक 2 साठी – गैरअर्जदार यांच्‍या वकीलांनी युक्‍तीवाद केला की, तक्रारदारांकडून गैरअर्जदार यांनी कोणतीही फी स्विकारलेली नाही. गैरअर्जदार हे जिल्‍हा महिला रुग्‍णालयात कार्यरत होते. ते शासकीय रुग्‍णालय आहे त्‍यामुळे तक्रारदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक होत नाहीत. तक्रारदारांनी रुग्‍णालयात काहीही फी जमा केल्‍याचा पुरावा मंचासमोर आणलेला नाही. तसेच त्‍यांनी संबंधित रुग्‍णालयाला तक्रारीत प्रतिपक्ष केलेले नाही त्‍यामुळे संबंधित रुग्‍णालयात सर्वच रुग्‍णाना मोफत सेवा देतात अथवा काही रुग्‍णांकडून फी आकारतात या गोष्‍टीचा उलगडा होत नाही. त्‍याच प्रमाणे तक्रारदारावरील शस्‍त्रक्रिया जिल्‍हा रुग्‍णालयात झालेली होती. गैरअर्जदार यांचे बरोबरच इतर वैद्यकीय अधिकारी तेथे उपस्थित होते त्‍यांचे म्‍हणणे काय आहे ? तक्रारदारांनी नेमक्‍या कोणत्‍या शस्‍त्रक्रियेसाठी सम्‍मती दिली ? या बाबतचा उलगडा रुग्‍णालयातील रुग्‍णपत्रिका व सम्‍मती पत्र यावरुनच होऊ शकतो. वरील सर्व कारणासाठी तक्रारदारांनी जिल्‍हा महिला रुग्‍णालय यांना प्रस्‍तुत तक्रारीत प्रतिपक्ष करणे आवश्‍यक होते व “Non joinder of necessary party” म्‍हणून ही तक्रार फेटाळणे योग्‍य ठरेल असे मंचाला वाटते. म्‍हणून मंच मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहे.

मुद्दा क्रमांक 3 साठी – तक्रारदारांनी त्‍यांच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या दरम्‍यानचे Discharge card दाखल केले आहे. त्‍यावरुन तक्रारदार पोटाचा आजार व रक्‍तस्‍त्राव यासाठी जिल्‍हा महिला रुग्‍णालयात आल्‍या त्‍यांचेवर लेप्रोक्‍टोमी करण्‍यात आली, “Chocolate cyst of both ovaries’ ‘Ectopic Pregnancy’ “250 ml blood in peritoneal cavity.” होती व “bilateral To MASS” होते व त्‍यांचेवर पुढील प्रमाणे शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली असे दिसते. “left & right Cystectomy was done with left salpingectomy”.  

      अशा गुंतागंतीच्‍या व गंभीर परिस्थितीत तातडीची शस्‍त्रक्रिया करुन रुग्‍णाचा जीव वाचवणे आवश्‍यक असते. तक्रारदारांच्‍या दोनही टयुब बाधित होत्‍या व त्‍या कापणे आवश्‍यक होते. त्‍याप्रमाणे गैरअर्जदार यांनी केलेले दिसते. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या वैद्यकीय माहिती पत्रकात देखील “As soon as an acute tubal rupture is dignosed surgery should be performed immediately.” Chocolate cyst of ovaries cause bilateral To MASS & thereby hamper tubal motility & cause ectopic pregnancy”  “Salpingectory म्‍हणजे Surgical removal of fallopian tube” अशी माहिती दिलेली आहे.  

      तक्रारदारांनी डॉ.सुरेश साबू यांची साक्ष घेतली त्‍यांनी सरतपासणीत H.S.G अहवालानुसार रुक्मिणीबाईच्‍या दोनही Tubes बंद होत्‍या असे सांगितले तसेच उलट तपासात “रुक्मिणीबाई यांना ectopic pregnancy होती व त्‍यामुळे त्‍यांच्‍या tubes शस्‍त्रक्रिया करुन कापाव्‍या लागल्‍या असे त्‍यांच्‍या केसपेपर वरुन दिसते” असेही सांगितले आहे.

      वरील विवेचनावरुन रुग्‍ण गैरअर्जदार यांचेकडे जिल्‍हा महिला रुग्‍णालयात आली तेंव्‍हा त्‍यांची परिस्थिती गंभीर होती. त्‍यांचा जीव वाचवण्‍यासाठी आवश्‍यक उपाय म्‍हणून गैरअर्जदार यांनी त्‍यांचेवर शस्‍त्रक्रिया केली. संबंधित आजावरावरील प्रचलित उपचार पध्‍दतीनुसारच शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली यात गैरअर्जदार यांची सेवेतील कमतरता दिसत नाही.

      तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी केवळ एकच टयुब बंद करण्‍यासाठी सम्‍मती दिली होती व प्रत्‍यक्षात गैरअर्जदार यांनी दोनही टयु‍ब बंद केल्‍या. गैरअर्जदार म्‍हणतात की, तक्रारदारांनी संपूर्ण शस्‍त्रक्रियेच्‍या प्रक्रीयेसाठी संमती दिली होती. त्‍यांनी तक्रारदारांना दोनही टयुब बाधित आहेत यांची पूर्ण कल्‍पना दिली होती. शस्‍त्रक्रिया चालू असताना त्‍यांना तक्रारदारांच्‍या दोनही ओव्‍हरीज व दोनही फॅलोपिन टयूबज बाधित झालेल्‍या आढळल्‍या त्‍यामुळे दोनही टयुब कापाव्‍या लागल्‍या. शस्‍त्रक्रिये दरम्‍यान असे तातडीचे व आवश्‍यक निर्णय वैद्यकीय अधिका-यांना घ्‍यावेच लागतात. या बाबतची अधिक माहिती तक्रारदारांनी दिलेले संमतीपत्र, शस्‍त्रक्रिये दरम्‍यान हजर असलेले इतर वैद्यकीय अधिकारी यांच्‍या जबाबातूनच मिळू शकेल.

      तक्रारदारांनी जिल्‍हा रुग्‍णालयाला प्रतिपक्ष केले नाही अथवा रुग्‍णालयातील काही रेकॉर्ड देखील दाखल केलेले नाही. डिस्‍चार्ज कार्ड नुसार शस्‍त्रक्रियेच्‍या वेळी डॉ.कुलकर्णी, डॉ.कदम हे देखील तिथे उपस्थित होते. त्‍यांना तक्रारदारांनी प्रतिपक्ष केले नाही अथवा त्‍यांचा काही पुरावाही आणला नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांवर करावयाच्‍या शस्‍त्रक्रिये दरम्‍यान काही निष्‍काळजीपणा केला ही गोष्‍ट तक्रारदार सिध्‍द करु शकलेले नाहीत असा निष्‍कर्ष मंच काढत आहे.                     

म्‍हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.   

 

आदेश

  1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
  2. खर्चा बाबत आदेश नाही.
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER
 
[HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.