::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 22.03.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली आहे.
तक्रारकर्त्याला फेब्रुवारी महिन्यात लघवीत जळजळ होत असल्यामुळे, त्याने डॉ. सदानंद भुसारी, अकोला यांच्याकडे स्वत:ला तपासले, त्यांनी तक्रारकर्त्यास लघवीच्या व रक्ताच्या काही तपासण्या करण्याबाबत सुचविले. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचे पॅथॉलॉजी लेबॉरेटरी मध्ये तपासणीसाठी गेला. त्यावेळी विरुध्दपक्षाचे मदतनिस यांनी तक्रारकर्त्याकडून लघवी व रक्ताचे नमुने दि. 05/01/2015 रोजी घेतले व त्यासाठी विरुध्दपक्षाचे मदतनिस यांनी तक्रारकर्त्याकडून तपासणी फी पोटी रु. 500/- घेतले व त्याची पावती क्र. 51 दिली. विरुध्दपक्ष यांनी त्याच दिवशी तक्रारकर्त्याला लघवी व रक्ताच्या तपासण्या करिता रिपोर्ट दिला. विरुध्दपक्षाच्या रिपोर्ट प्रमाणे तक्रारकर्त्याचे S.Creatinine हे 4.0 mg% दर्शविले. विरुध्दपक्षाच्या ह्या रिपोर्टनुसार तक्रारकर्त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या, असे अहवालावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तो रिपोर्ट पाहून तक्रारकर्त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्षाने दिलेला रिपोर्ट डॉ. भुसारी यांना दाखविला असता, त्यांनी तक्रारकर्त्याची तपासणी केली व विरुध्दपक्षाने दिलेल्या रिपोर्ट मध्ये विसंगती आढळल्यामुळे डॉ. भुसारी यांनी तक्रारकर्त्यास पुन्हा त्याच दिवशी दुसऱ्या डॉक्टरकडे जावून तपासण्या करण्याबाबत सुचविले, त्यानुसार दि. 05/01/2015 रोजी तक्रारकर्त्याने डॉ. राजेश काटे यांचे निदान पॅथालॉजी मध्ये पुन्हा त्या सर्व तपासण्या, ज्या तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे केल्या हेात्या, त्या पुन्हा केल्या. डॉ. राजेश काटे यांचे रिपोर्टनुसार तकारकर्त्याचे Creatinine हे 0.96 mg इतके नमुद हेाते. त्यामुळे ही बाब सिध्द झाली की विरुध्दपक्षाने पुर्णता खोटी माहीती नमुद करुन निष्काळजीपणाने आपला रिपोर्ट तक्रारकर्त्याला दिला. तक्रारकर्ता अशा परिस्थितीत गोंधळून गेल्यामुळे तो दि. 09/01/2015 रोजी अश्वीनी किडनी ॲन्ड डायलिसीस सेंटर प्रा. लि. नागपुर यांच्याकडे स्वत:ची तपासणी करण्याकरिता गेला, तेथे सुध्दा तक्रारकर्त्याचे रक्ताचे व लघवीचे नमुने घेण्यात आले व त्यांच्या रिपोर्टनुसार सुध्दा विरुध्दपक्ष यांनी दि. 05/01/2015 रोजी जो रिपोर्ट दिला होता, तो पुर्णत: चुकीचा व दोषपुर्ण होता, हे पुन्हा कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द झाले. विरुध्दपक्षाच्या हलगर्जीपणामुळे तक्रारर्त्यास व त्याचे परिवारास जबरदस्त मानसिक आघात सोसावा लागला तसेच त्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवेमध्ये न्युनता व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दि. 10/02/2015 रोजी रजि. पोस्टाने वकीलामार्फत नोटीस पाठवीली व नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु विरुध्दपक्षाने नोटीसची पुर्तता केली नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास सेवा देण्यात न्युनता दर्शवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला त्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून रु. 1,00,000/- विरुध्दपक्षाने देण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना पाठविलेल्या नोटीसचा खर्च रु. 2000/- देण्याचा आदेश व्हावा व सदर तक्रारीच्या खर्चापोटी रु. 15,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 11 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब प्रकरणात दाखल केला आहे. त्यानुसार तक्रारीतील आरोप नाकबुल करुन विरुध्दपक्षाने असे नमुद केले की, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 नुसार करण्यात आलेली ही तक्रार गैरकायदेशिर, असमर्थनीय आहे. अशी कुठल्याही प्रकारची यंत्रणा ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत उपलब्ध नाही, हे स्पष्ट केल्या जाते की, निष्णात पॅथॉलॉजी अर्थातच विरुध्दपक्षाने दिलेला अहवालाची चौकशी वैद्यकीय बोर्ड किंवा निष्णात डॉक्टरांच्या बोर्डकडून करता येईल. तक्रारकर्त्याने ही खोटी तक्रार विरुध्दपक्षाला मनस्ताप देण्यासाठी व पैसे उकळण्यासाठी, खोटे आरोप करुन केलेली आहे. विरुध्दपक्ष हा उपचार करणारा डॉक्टर नाही. विरुध्दपक्षाने कुठल्याही आजारा संदर्भातील अहवाल दिला नाही किंवा कुठलेही उपचार सुचविलेले नाही. सदर अहवालाला आव्हान देण्यात आले नाही, सदर अहवाल परिपुर्ण आहे, त्यामुळे कुठलीही चुक किंवा उणीव विरुध्दपक्षाकडून झालेली नाही. विरुध्दपक्षाने संबंधीत यंत्राला सिरम क्रिटीनीयन तपासण्यासाठी आज्ञा दिली व मशिनने क्रिटीनियन दर्शविले व नंतर लगेचच त्याची नोंद अहवालावर घेण्यात आली. अगोदरच्या रुग्णाचा नमुना मशीन मधून पुर्णपणे धुतल्या जातो आणि त्यानंतरच दुसरा नमुना तपासणीसाठी घेतला जातो. परंतु काही कारणास्तव जर अगोदरच्या नमुन्याचा शेवटचा थेंब जर यंत्रामधुन पुर्णपणे धुतल्या गेला नसेल तर मात्र काही चुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच विद्युत पुरवठ्यामध्ये काही खंड किंवा विद्युत दाब कमी जास्त झाल्यामुळे सुध्दा काही चुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रिटेनियन तपासण्यासाठी 400 मायक्रो मिली लिटर नमुना मशीनने ओढून घेणे अपेक्षित असते, एखादे वेळेस कुठल्या कारणाने मशीनने त्यापेक्षा कमी नमुना ओढला तर अशा परिस्थितीत अहवालात फरक पडू शकतो. दुसऱ्या डॉक्टरने दिलेला अहवाल चुकीचा असु शकतो. डॉ. भुसारी यांनी तक्रारकर्त्यास काही 5 दिवसांचे व काही 10 दिवसांसाठी औषधी दिली व त्यानंतर दि. 9/1/2015 चा अश्वीनी किडणी डायगोनीसीस सेंटरचा अहवाल आलेला आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतल्यामुळे क्रिटीनियनचे प्रमाण 5 दिवसांच्या अंतराने कमी होवू शकते. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास योग्य अहवाल दिलेला आहे. गंभीर उपचारांचा या अहवालाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सदर तक्रार ही निराधार असल्यामुळे दंडाच्या रकमेसह खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतीउत्तर दाखल केले व उभयपक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला व तक्रारकर्त्यातर्फे लेखी युक्तीवादही दाखल करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन करुन व उभय पक्षांनी केलला युक्तीवाद ऐकुन काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
- प्रकरणात दाखल झालेल्या दस्तांवरुन, ( दस्त क्र. 1 व 2 ) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते व ही बाब विरुध्दपक्षाने सुध्दा नाकारलेली नसल्याने तकारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्ता हा फेब्रुवारी महिन्यात लघवीत जळजळ ( Burning Mictution ) ने आजारी होता. त्यामुळे त्याने डॉ. सदानंद भुसारी यांचे कडून स्वत:ला तपासुन घेतले, तेंव्हा Urinary Track मध्ये Infection झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लघवीच्या व रक्ताच्या काही तपासण्या करण्याबाबत सुचविले. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाच्या पॅथॉलॉजी लेबॉरटरीमध्ये तपासणीसाठी गेला. त्यावेळी विरुध्दपक्षाच्या मदतनिसाने तक्रारकर्त्याकडून लघवी व रक्ताचे नमुने दि. 5/1/2015 रोजी घेतले व तपासणी फी पोटी रु. 500/- घेतले व पावती क्र. 51 दिली. विरुध्दपक्षाने त्याच दिवशी दिलेल्या रिपोर्टवरुन तक्रारकर्त्याचे S.Creatinine हे 4.0 mg% इतके असल्याचे दिसून आले. वयस्क व्यक्तीचा नॉर्मल व्हॅल्यु 0.7 – 1.4 mg% असते. विरुध्दपक्षाच्या रिपोर्टनुसार तक्रारकर्त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या, असे अहवालावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला. डॉ. भुसारी यांनी रिपोर्ट बघीतल्यावर त्यांनीही तक्रारकर्त्याची केलेली तपासणी व विरुध्दपक्षाने दिलेले रिपोर्ट ह्यामध्ये विसंगती आढळल्याने त्यांनी तक्रारकर्त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करण्याबाबत सुचविले. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याच दिवशी डॉ. राजेश काटे यांच्या पॅथॉलॉजी मध्ये त्या तपासण्या, ज्या विरुध्दपक्षाकडे केल्या होत्या, त्या पुन्हा केल्या. डॉ. काटे यांच्या बायोकेमेस्ट्री रिपोर्ट नुसार तक्रारकर्त्याचे Creatinine हे 0.96 mg इतके दिसून आले. यावरुन विरुध्दपक्षाने पुर्णत: खोटी माहीती नमुद करुन निष्काळजीपणाने आपला रिपोर्ट तक्रारकर्त्याला दिला होता.
दोन डॉक्टराचे वेगवेगळे रिपोर्ट पाहून तक्रारकर्ता गोंधळून गेला व तो दि. 9/1/2015 रोजी नागपुरला अश्वीनी किडनी ॲन्ड डायलिसीस सेंटर प्रा.लि. नागपुर, येथे स्वत:ची तपासणी करण्याकरिता गेला. तेथील रिपोर्टवरुनही विरुध्दपक्ष यांनी दि. 5/1/2015 रोजी दिलेला रिपोर्ट चुकीचा व दोषपुर्ण होता, हे कागदोपत्री सिध्द झाले. विरुध्दपक्षाच्या हलगर्जीपणामुळे तक्रारकर्त्यास व त्याच्या परिवारास जबरदस्त मानसिक आघात सोसावा लागला व आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली आहे.
- यावर विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात या तक्रारीसंबंधी प्राथमिक हरकत घेऊन आक्षेप नोंदविला. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 नुसार करण्यात आलेली तक्रार ही गैरकायदेशिर आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षावर केलेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपातील तथ्य तपासून बघण्याची यंत्रणा ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत उपलब्ध नाही. तक्रारकर्त्याने केलेल्या निष्काळजीपणाच्या आरोपाचे समर्थन जर कुठल्याही दस्तांच्या सुरुवातीलाच मिळत नसेल तर तो दावा टिकु शकत नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्दपक्षाला मनस्ताप देण्यासाठी व पैसे उकळण्यासाठी केल्याने ती खारीज करण्यात यावी. 4 mg% क्रिटेनियन असण्याचा अहवाल मिळाल्याबरोबर कुठल्याही, वैद्यकीय ज्ञान नसलेल्या व्यक्तीने अस्वस्थ होण्याचे कारण नाही. तक्रारकर्त्याने केवळ विरुध्दपक्षाविरुध्द द्वेष भावनेने खटला चालवता यावा, यासाठी पुरावा जमविण्यासाठी तो वेगवेगळया तज्ञांकडे गेला. तक्रारकर्त्याने कुठेही विरुध्दपक्षाने निष्काळजीपणा केला, हे सिध्द न केल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी मागणी विरुध्दपक्षाने केली आहे.
- विरुध्दपक्षाने डॉ. सदानंद भुसारी, ज्यांनी तक्रारकर्त्यावर उपचार केले त्यांचा या प्रकरणात विरुध्दपक्षाच्या वतीने साक्षीदार म्हणून पुरावा दिला आहे. ( पृष्ठ क्र. 98 ) सदर पुराव्यातील महत्वाचे मुद्दे असे…
3) पॅथॉलाजी मधुन पॅथॉलॉजीस्ट डॉ. जे ही रिपोर्ट देतात ते अद्यावत, कॉम्पुटराईज्ड मशिनने दर्शविलेले अहवाल असतात. कोणत्याही पॅथॉलाजीस्टने गंध घेऊन, स्पर्श करुन, नजरेने पाहून, मनाने, अंदाजाने किंवा रुग्णाकडे पाहून द्यावयाचे नसतात. मल, मुत्र, थुंकी, रक्त यांची तपासणी ही संगणकीकृत मशिननुसारच केल्या जाते. या केस संबंधीत डॉ. निर्मला रांदड यांनी 5/1/15 रोजी दिलेला अहवाल ( रिपोर्ट) हा सुध्दा मशिनने दिलेल्या अहवालानुसारच दिलेला असल्यामुळे चुकीचा मानणे योग्य होणार नाही. प्रचलित पध्दतीनुसार त्यांच्या लॅब मध्ये मशिनद्वारे तपासणी करुन, मशिनने जे आकडे दिले ते आकडे नोंदवून त्यांनी मशिनने दिलेला अहवाल रिपोर्ट मध्ये दिल्यामुळे त्यांची कोणतीही चुक अथवा त्यांचेकडून कोणताही निष्काळजीपणा कोठेही आढळत नाही.
4) कोणत्याही रुग्णाचे निदान हे पॅथॉलॉजी रिपोर्टवर अवलंबुन राहून करावयाचे नसते तर अन्य शेकडो बाबी जे तज्ञ डॉक्टर रुग्णाची तपासणी फिजीशिअन म्हणून अथवा विशेष तज्ञ डॉक्टर म्हणून करतात त्यांनी सारासार विचार करुन, रुग्णाच्या क्लिनिकल एक्झामिनेशन सोबत वेगवेगळया तपासण्या करुन रुग्णाची सद्य परिस्थिती पाहून शांतपणे, कोणतीही घाई न करता, प्रसंगी दोन तज्ञ डॉक्टरांचे मत घेऊन व कोणत्याही अंतीम निर्णयाप्रत यावे लागते. निर्णयावर अंतीम शिक्कामोर्तब, काही औषधोपचार केल्यानंतरच, औषधांचा कसा रिस्पॉन्स आहे, ते पाहून निदान ठरते. प्राथमिक स्टेज मधील केवळ एका पॅथॉलॉजी रिपोर्टवर निदान ठरत नाही.
5) पॅथॉलॉजी रिपोर्ट कितपत ग्राह्य धरावा व त्याचा कसा अर्थ लावावा, याचा वैद्यकीय सिध्दांत व प्रचलित रिवाज आहे. मेडीकल ज्युरिसप्रुडन्स प्रमाणे पॅथॉलॉजी रिपोर्टस् चा अर्थ काढायचा सिध्दांत पुढील शब्दामध्ये देता येईल.
“All reports should be interpreted after correlation with clinical and other findings by a competent medical person only”
6) निर्णय हे रुग्णाने स्वत:च्या मनाद्वारे घ्यावयाचे नसतात व स्वत:च्या मनाने आजाराचे निदानही करावयाचे नसते. क्वचित प्रसंगी निर्णय घेतांना आम्हाला सुध्दा आमच्या वरिष्ठ व्यवसाय बंधुंचा सल्ला घ्यावा लागतो. रुग्ण हा कपोलकल्पीत किंवा गैरसमज बाबींवरुन धारणा करतो व त्याला वैद्यकशास्त्र समजते असे भासवतो. रुग्णाने स्वत:च्या मनानेच निर्णय घेणे, हे वैद्यकीय शास्त्राच्या विरुध्द आहे. रुग्ण स्वत: तसा निर्णय घेऊन वागत असल्यास त्याच्या परिणामाची जबाबदारी कोणत्याही डॉक्टरवर टाकता येणार नाही. पॅथॉलॉजीस्टवर तर नक्कीच टाकता येणार नाही.
7) सेरम क्रियेटीनीन 4.00 mg चा रिपोर्ट हा संभव असतो, त्यात वावगे असे काहीच नाही. असा रिपोर्ट आला म्हणजे किडन्या निकामी झाल्या, असेच काही होत नाही. आवश्यक अन्य चाचण्या करुन, औषधोपचार करुन, औषधोपचारानंतर पेशंटचा रिस्पॉन्स व रिकव्हरी पाहून नंतरच निदान ठरते.
8) श्री चेतन रुपारेलीया अर्जदार यांचा 5/1/15 चा डॉ. सौ. निर्मला रांदड यांचेकडून जो बायोकेमेस्ट्री रिपोर्ट आला, त्यानुसार 4.00 mg सेरम क्रियेटीनीन होते. त्यानंतर मी चेतन रुपारेलीया यांचेवर औषधोपचार केला. तो औषधोपचार जो केला त्यामध्ये सेरम क्रियेटीनीन कंट्रोलमध्ये यावे, याचेही औषध होते. माझ्या औषधोपचारानंतर चेतन रुपारेलीया यांनी दि. 9/1/15 रोजी दुसऱ्या पॅथॉलॉजी मधुन जो रिपोर्ट घेतला, त्यामध्ये सेरम क्रियेटीनीन हे कमी झालेले आढळले. सेरम क्रियेटीनीन हे औषधोपचाराने कमी होणे, हे क्रमप्राप्त ठरते व त्यामुळे डॉ. निर्मला रांदड यांनी 5 जानेवारीला दिलेला रिपोर्ट हा योग्यच आहे. निष्काळजीपणाचा कोठेही प्रश्न दिसत नाही व त्यांची कोठेही एक तज्ञ म्हणून मला चुक आढळत नाही.
- त्यावर तक्रारकर्त्याने सदर साक्षीदाराचा प्रश्नावली स्वरुपात उलट तपास घेण्याची परवानगी मंचास मागीतली व मंचाने ती मंजूर केली.
विरुध्दपक्षाच्या साक्षीदाराने स्वत: मंचात हजर राहून मंचासमोर प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे लिहीली आहेत ( पृष्ठ क्र. 108 ते 114) त्यातील मुख्य प्रश्न व त्याची उत्तरे येणे प्रमाणे….
प्रश्न क्र. 7 : तुम्ही निर्मला रांदड यांचे पॅथॉलॉजीचे रिपोर्ट पाहील्यानंतर चेतन रुपारेलीया यांना तात्काळ भर्ती व्हा व ॲडव्हांस म्हणून रु. 5,000/- जमा करा, असा सल्ला दिला होता ? कारण तुम्ही चेतन रुपारेलीया यांना समजाविले होते की, क्रियेटीनीन खुप वाढले आहे व तुमची किडनी फेल होण्याकडे वाटचाल करीत आहे.
उत्तर : भरती होण्याचा सल्ला दिला व त्यांची इच्छा विचारली, ॲडव्हॉन्स मागीतला हा खोटा आरोप आहे. कारण आम्ही कधीच ॲडव्हॉन्स भरतीच्या वेळी मागत नाही. गेली 8 वर्ष कधीच ॲडव्हॉन्स मागीतला नाही.
प्रश्न क्र. 10 : तुमच्या स्वत:च्या तपासणी अहवाल ज्याचा पान क्र. 3 वर May I Advice मध्ये भर्ती होना क्या Plan ह्याच्यावर Acute Kideney Injury भरती होना क्या हे निदान तुम्ही चेतन रुपारेलीया ह्यांच्या बाबतीत डॉ. निर्मला रांदड यांच्या पॅथॉलॉजीच अहवालावरुन केले होते ? ( तुमच्या तपासणी अहवाल अभिलेखावर दस्त क्र. 5 म्हणून लावलेला आहे आवश्यकता असल्या तुम्ही बघु शकता )
उत्तर : माझे निदान मी UTI ( Urenary Track Injection ) व creatininne वाढल्यामुळे AKI ( Acute Kidney Injurry ) व May I adv- हा माझा सल्ला होता व त्यात भरती होना क्या हे पेशंटला विचारणी केली आहे, त्यावर प्रश्न 9 चे विधान खोटे ठरत आहे.
प्रश्न क्र. 12 : सेरम क्रियेटीनीन 4.0 एमजी हे ज्या रुग्णाचे असते त्या किडन्या ह्या किती टक्के कार्यरत आहेत, असे म्हणता येईल ?
उत्तर : हे पेशंटच्या (1) वय, (2) लिंग, (3) Muscle Mass वर अवलंबून असते. Documents नुसार अंदाजे किडनीची कार्यक्षमता 18 -19 टक्के असावी, जर creat 4, वय 42 व वजन 55 धरले तर.
प्रश्न क्र. 13 : रुग्णाच्या पॅथॉलाजीकल तपासण्या करण्या मागचा उद्देश ?
उत्तर : शारीरिक तपासणी वरुन काही गोष्टी समजणे अशक्य आहे, जसे Sugar Creatinine व मीठाचे प्रमाण रक्त तपासणीवरुनच समजते.
प्रश्न क्र. 14 :सेरम क्रियेटीनीन 4.00 एमजी हे ज्या रुग्णाचे असते, त्या रुग्णाला औषधोपचाराने लवकर फायदा होत नाही, त्याला काही दिवस डायलिसीस सुध्दा करावे लागते, हे म्हणणे योग्य होईल कां?
उत्तर : नाही
प्रश्न क्र. 17 : डॉ. राजेश काटे यांच्या रिपोर्ट नुसार चेतन रुपारेलीया यांचे क्रिेयेटीन हे सामान्य असल्यामुळे त्यांना क्रियेटीनीन सामान्य होण्यासाठी औषधेपचार करण्याची आवश्यकता नव्हती, हे म्हणणे खरे होईल काय ?
उत्तर : पुर्णपणे खरे नाही. दोन वेगळे रिपोर्ट असल्यास कोणता योग्य हे पाहण्यासाठी कधी कधी तिसराही करावा लागु शकतो.
प्रश्न क्र. 19 जर प्रश्न क्र. 17 चे उत्तर नाही असेल तर तुम्हाला असे म्हणावयाचे आहे काय की तुम्ही डॉ. राजेश काटे यांचा रिपोर्ट पाहील्यावर व त्या रिपोर्ट मध्ये चेतन रुपारेलीया ह्यांचे क्रियेटीनीन सामान्य असल्यावरही तुम्ही चेतन रुपारेलीया ला क्रियेटीनीन सामान्य होण्यासाठी औषधोपचार केला?
उत्तर : इलाज हा पेशंटच्या त्रासाचा होतो व रिपोर्टचा नाही. लघवीत जळजळ असल्यासाठी पेशंट आले व त्यावर उपचार करणे जरुरी वाटले व स्वच्छ मनानी ती केली. जागा कमी असल्यामुळ लिहू शकत नाही. Eg. Maleria आजार झाला तर Test Positive येते, असे नाही.
प्रश्न क्र. 21 : तुम्ही पॅथॉलॉजीस्ट म्हणून कार्य करण्यासाठी लागणारे शिक्षण घेतले आहे काय ?
उत्तर : MBBS मध्ये सर्व Basics शिकलो.
प्रश्न क्र. 22 : असे म्हटले तर योग्य होईल काय की, “पॅथॉलॉजीस्ट हे पुर्णत: मशिनच्या भरवश्यावर रिपोर्ट / अहवाल देतात त्यांचा स्वत:चे शिक्षणाचा अहवाल देण्यासाठी उपयोग करायचे काम नसते ?
उत्तर : हे म्हणणे चुक आहे.
प्रश्न क्र. 23 हे म्हणणे बरोबर होईल काय की, ज्याला पॅथॉलॉजी मध्ये वापरण्यात येणाऱ्या मशिन्स चालविता येतात तो पॅथॉलॉजीस्ट म्हणून काम करु शकतो व अहवाल स्वाक्षरी करुन देवू शकतो.
उत्तर : हे म्हणणे चुक आहे.
प्रश्न क्र. 23 ब : जर प्रश्न क्र. 23 चे उत्तर नाही असेल तर का नाही ?
उत्तर : टेस्ट हे मशिन जरी काम करीत असेल तरी “Man behind the Machine” is most important
प्रश्न क्र. 24 : मग हे म्हणणे बरोबर होईल काय की, जी कंपनी मशिन्स बनविते किंवा ज्या इंजिनियर ने ती मशिन बनविली किंवा ज्या इंजिनियरने ते सॉफ्टवेअर बनविले तो इंजिनियर पॅथॅालॉजीस्ट म्हणून काम करु शकतो व रिपोर्ट / अहवाल स्वाक्षरी करुन देवू शकतो काय ? ते कायदेशिर ठरेल काय ?
उत्तर : हे चुक आहे. मशीन बनविणाऱ्यांना मशिन चालवायचे License असेल तरच तो ती मशिन चालविण्यास योग्य व्यक्ती आहे.
प्रश्न क. 28 : कोणत्याही पॅथॉलॉजीस्टने आपले व्यक्तीगत वैद्यकीय ज्ञान, कौशल्य हयाचा वापर करुनच अहवाल द्यावा फक्त मशिनच्या भरवश्यावर राहून अहवाल देवू नये हे वैद्यक शास्त्राला धरुन आहे असे म्हणता येईल ?
उत्तर : हो
- तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत असे म्हटले आहे की, डॉ. भुसारींच्याच सांगण्यावरुन त्याने डॉ. राजेश काटे यांचे पॅथॉलॉजी मध्ये पुन्हा सर्व तपासण्या केल्या होत्या. परंतु सदर अहवालाचे निरीक्षण केल्यावर तक्रारकर्ता हा डॉ. काटेंकडे, डॉ. बिबेकर यांच्या सांगण्यावरुन गेल्याचे दिसून येते. तसेच विरुध्दपक्षाकडे केलेल्या सर्व तपासण्या, जसे S.Creatinine, S.Uric Acid, S.Sodium, S. Potassium, डॉ. काटेंकडे केल्याचे दिसून येत नाही ( दस्त.क्र. 3 )
तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तिनही पॅथॅालॉजीच्या अहवालावरुन Normal Values / Reference Range वेगवेगळया दिसून आल्या.
Sr. | Lab. Name | Normal Values / Reference Range | Sr.no.of Document |
1 | Randad Pathology Laboratory (विरुध्दपक्षाचा अहवाल ) | M 0.7 – 1.4 mg % | दस्त क्र. 1 |
2. | Nidan Pathology ( Dr. Rajesh Kate ) | M 0.6 – 1.4 mg% | दस्त क्र. 2 |
3. | Ashwini Kidney and Dialysis Centre Pvt. Ltd. | M 0.6 – 1.5 Mg/dl | दस्त क्र. 3 |
तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन विरुध्दपक्षाचा रिपोर्ट बघुन तक्रारकर्ता हा स्वत:हाच त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोहचल्याचे दिसून येते. तसेच तो उपचार घेत असलेल्या डॉ. भुसारी यांच्या सल्ल्याशिवाय व त्यांना कुठलीही माहीती न देता स्वत:च परस्पर नागपुरला जाऊन तपासण्या करुन आल्याचेही दिसून येते. विशेष बाब म्हणजे तक्रारकर्त्याने ज्यांच्याकडे व ज्यांच्या मार्फत तपासणीसाठी गेला, त्या डॉ. काटे, डॉ. भुसारी, डॉ. बिबेकर, डॉ. धनंजय उकळकर, डॉ. सुनिल ठकार, यापैकी एकाही डॉक्टरांनी विरुध्दपक्षाचा रिपोर्ट चुकीचा आहे, अथवा या रिपोर्टवरुन तक्रारकर्त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे सिध्द होते, असे कुठेही त्यांच्या अहवालात नमुद केलेले नाही. या उलट डॉ. सदानंद भुसारी यांनी विरुध्दपक्षातर्फे साक्ष देतांना व उलट तपास देतांना असे म्हटले आहे की, “ सेरम क्रियेटीनीन 4.0 mg चा रिपोर्ट आला म्हणजे किडन्या निकामी झाल्या असेच होत नाही. आवश्यक अन्य चाचण्या करुन, औषधोपचार व त्यानंतरचा पेशंटचा रिस्पॉन्स व रिकव्हरी पाहूनच नंतर निदान ठरते.”
- तक्रारकर्त्याने त्याच्या लेखी युक्तीवादात असे म्हटले आहे की, अहवालावरुन डॉ. सदानंद भुसारी हे तक्रारकर्त्याच्या किडन्या 18 – 19% कार्यक्षम असल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचले होते, परंतु तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अवलेाकन केले असता तक्रारीत सदर बाब कुठेही नमुद केलेली नसल्याने तक्रारकर्त्याचा आक्षेप ग्राह्य धरता येणार नाही.
तक्रारकर्त्याने त्याच्या युक्तीवादात असे म्हटले की, ‘ डॉ. राजेश काटे यांचे शिक्षण व अनुभव हा विरुध्दपक्षाइतकाच असल्याने, त्यांच्या रिपोर्टवरुनच विरुध्दपक्षाने खोटी माहीती देऊन निष्काळजीपणा केल्याचे सिध्द होते. त्यामुळे “समशिक्षीत व समअनुभवी डॉक्टरांच्या अहवाल तक्रारकर्त्याने दाखल केला नाही” हा विरुध्दपक्षाचा आक्षेप चुकीचा आहे व विरुध्दपक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे येथे लागु पडणार नाही.’
दाखल दस्तांचे अवलोकन केल्यावर, तक्रारकर्त्याच्या या म्हणण्यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने तीन वेळा सिरम क्रियेटीनीनची तपासणी केली. विरुध्दपक्षाकडील 5/11/2015 रोजी केलेल्या तपासणीत सिरम क्रियेटीनीनचे प्रमाण 4.00mg/dl इतके होते. डॉ. राजेश काटे यांचेकडील तपासणीत सिरम क्रियेटीनीनचे प्रमाण 0.96mg होते, तर दि. 9/1/2015 रोजी अश्वीनी किडनी अँड डायलीसीस सेंटर प्रा.लि. नागपुर यांचेकडे सदर क्रियेटीनीन प्रमाण 1.00mg/dl इतके असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ डॉ. राजेश काटे यांचा अहवाल बरोबर धरला तर नागपुर येथील पॅथॉलॉजी लॅबचा अहवालही चुकीचा मानावा लागेल. कारण त्या अहवालातही सिरम क्रियेटीनीनचे प्रमाणे डॉ. राजेश काटे यांचे कडील अहवालापेक्षा जास्त आढळून येते. तसेच डॉ. काटे कडील केलेल्या चाचण्या सिरम क्रियेटीनीनची चाचणी वगळता विरुध्दपक्षाकडील चाचण्यापेक्षा संपुर्णत: भिन्न असल्याचे मंचाला दिसून आले ( दस्त क्र. 1 ते 3 ) त्यामुळे विरुध्दपक्षाचा निष्काळजीपणा सिध्द करण्यासाठी डॉ. राजेश काटे यांचा दि. 5/1/2015 रोजीचा अहवाल पुरेसा आहे, हे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंचाला ग्राह्य धरता येणार नाही.
तक्रारकर्त्याने त्याच्या युक्तीवादात असे म्हटले आहे की, “सदर चुकीचा रिपोर्ट देण्यासाठी तपासणी मशिन जबाबदार नसून अहवाल देणारे डॉक्टरच जबाबदार आहे. कारण सदर मशिनची देखभाल योग्य न झाल्यासच मशिन चुकीचे रिपोर्ट देऊ शकते व सदर मशिनची देखभाल करण्यात विरुध्दपक्षाने निष्काळजीपणा केल्यानेच तक्रारकर्त्याला चुकीचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार डॉ. सदानंद भुसारी यांनीही प्र.क्र. 27 चे उत्तर देतांना सदर बाब कबुल केली होती. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या निष्काळजीपणा मशीनवर लोटण्याचा जो केवीलवाणा प्रयत्न केला आहे, तो कायद्याला धरुन नाही.”
परंतु दाखल दस्तांवरुन विरुध्दपक्षाला तिने चुकीचा अहवाल दिला हेच मान्य नाही.कारण विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार मशिनच्या स्क्रिनवर जे आकडे आले तेच आकडे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या अहवालात लिहीले आहे व त्या अहवालानुसारच डॉ. सदानंद भुसारी यांनी तक्रारकर्त्याला औषधोपचार दिला व त्यामुळेच नागपुरच्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये सिरम क्रियेटीनीनचे प्रमाण कमी आले. जर अहवाल चुकीचा असता तर डॉ. भुसारीचे उपचार घेतल्यावर तक्रारकर्त्याचे सिरम क्रियेटीनीनचे प्रमाण डॉ. राजेश काटे कडील 0.96mg प्रमाणापेक्षा अजुन कमी आले असते. परंतु नागपुर येथील तपासणीत सिरम क्रियेटीनीनचे प्रमाण डॉ. राजेश काटे कडील अहवालापेक्षा जास्त व विरुध्दपक्षाकडील अहवालात नमुद केल्यापेक्षा कमी आल्याचे दिसून येते. सदर मुद्यावर मंचाने.......
Supreme Court 3180
Jecob Mathew V. State of Punjab & another
In the realm of diagnosis and treatment there is ample scope for genuine difference of opinion and one man clearly is not negligent merely because his conclusion differs from that of other professional men.... The true test for establishing negligence in diagnosis or treatment on the part of a doctor is whether he has been proved to be guilty of such failure as no doctor of ordinary skill would be guilty of if acting with ordinary care...
त्याच प्रमाणे डॉ. भुसारी यांनी दिलेल्या साक्षपुराव्यात असे नमुद केले आहे की, “ पॅथॉलॉजी रिपोर्ट” कितपत ग्राह्य धरावा व त्याचा कसा अर्थ लावावा याचा वैद्यकीय सिध्दांत व प्रचलीत रिवाज आहे. मेडीकल ज्युरीसप्रुडन्स प्रमाणे पॅथॉलॉजी रिपोर्टचा अर्थ काढायचा सिध्दांत पुढील शब्दामध्ये देता येईल.
“All report should be interpreted after correlation with clinical and other findings by a competent medical person only.”
- तसेच विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात त्यांनी दिलेला अहवाल योग्यच असल्याचे नमुद करुन मशिनव्दारे रिपोर्ट केव्हा चुकीचे येऊ शकतात, याची कारणे दिली आहे. परंतु त्याकारणांपैकी एका विशिष्ट कारणामुळे विरुध्दपक्षाच्या मशिनमध्ये बिघाड होता, अथवा संबंधीत मशिनची योग्य निगा विरुध्दपक्षाने राखली नव्हती, हे तक्रारकर्ता दाखवू शकला नसल्याने ‘विरुध्दपक्षाच्या मशिनने दिलला रिपोर्ट योग्य होता व तोच रिपोर्ट विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या अहवालात बिनचुक लिहला’ हे विरुध्दपक्षाचे म्हणणे ग्राह्य धरण्यात येते वरील मुद्यावर AIR 2005 Supreme Court 3180
Jecob Mathew V. State of Punjab & another या न्यायनिवाड्यातील या प्रकरणाला लागु पडणारे तथ्य असे…
(2) Negligence in the context of medical profession necessarily calls for treatment with a difference. To infer rashness or negligence on the part of a professional, in particular a doctor, additional considerations apply. A case of occupational negligence is different from one of professional negligence. A simple lack of care, an error of judgment or an accident, is not proof of negligence on the part of a medical professional. So long as a doctor follows a practice acceptable to the medical profession of that day, he cannot be held liable for negligence merely because a better alternative course or method of treatment was also available or simply because a more skilled doctor would not have chosen to follow or resort to that practice or procedure which the accused followed. When it comes to the failure of taking precautions what has to be seen is whether those precautions were taken which the ordinary experience of men has found to be sufficient; a failure to use special or extraordinary precautions which might have prevented the particular happening cannot be the standard for judging the alleged negligence.
10) ‘पॅथॉलॉजीस्ट केवळ मशिनच्या भरवश्यावरच जर निदान करुन अहवाल देत असतील तर अहवाल देणाऱ्या व्यक्तीला विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा वैद्यकीय ज्ञान असण्याची, त्यात MD असण्याची काय आवश्यकता आहे’ असे तक्रारकर्त्याकडून व मंचाकडूनही विचारणा केल्यावर विरुध्दपक्षाने असे म्हटले आहे की, “ टेस्ट हे जरी मशिन करीत असले तरी ‘ Man behind the machine is most important’ व सदर मशीन चालविण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीलाच ती मशिन चालवून अहवाल देण्याचा अधिकार आहे व यासाठी आवश्यक त्या शिक्षणाची गरज आहे.
तक्रारकर्त्याने त्याच्या बाजुने कुठलाही न्यायनिवाडे दाखल केले नाही, परंतु विरुध्दपक्षाने वरीष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करुन वैद्यकीय क्षेत्रात “ निष्काळजीपणा” याची काय व्याख्या आहे आणि डॉक्टरांची कोणती कृती निष्काळजीपणाची होते, हे स्पष्ट केले आहे. सदर न्याय निवाड्यातील लागु पडणाऱ्या तथ्यांचा येथे उल्लेख केला आहे.
AIR 2010 SUPREME COURT 1050
Kusum Sharma and Ors. V. Batra Hospital and Medical Research Centre and Ors.
Procedure adopted by doctor performing surgery supported by expert opinion – Negligence cannot be attributed to doctor – Medical professionals are not to be unnecessarily harassed or humiliated so that they can perform their duties without fear and apprehension – Malicious prosecution against medical professors/hospitals for extracting uncalled for compensation Not maintainable.
Supreme Court 3180
Jecob Mathew V. State of Punjab & another
24. The decision of House of Lords in Maynard v. West Midlands Regional Health Authority (1985) I All ER 635 (HL) by a Bench consisting of five Law Lords has been accepted as having settled the law on the point by holding that it is to enough to show that there is a body of competent professional onion which considers that decision of the defendant professional was a wrong decision, if there also exists a body of professional opinion, equally competent, which supports the decision as reasonable in the circumstances.
Supreme Court 3180
Jecob Mathew V. State of Punjab & another
Para 49
No sensible professional would intentionally commit an act or omission which would result in loss or injury to the patient as the professional reputation of the person is at stake. A single failure may cost him dear in his career. Even in civil jurisdiction, the rule of res ipsa loquitur is not of universal application and has to be applied with extreme care and caution to the cases of professional negligence and in particular that of the doctors. Else it would be counter productive. Simply because a patient has not ravourably responded to a treatment given by a physician or a surgery has failed, the doctor can not be held liable per se by applying the doctrine of res ipsa loquitur.
He does not gain anything by acting with negligence or by omitting to do an act.
The purpose of holding a professional liable for his act or omission, if negligent, is to make the life safer and to eliminate the possibility of recurrence of negligence in future. Human body and medical science both are too complex to be easily understood. To hold in favour of existence of negligence.
11) प्रकरणात दाखल सर्व दस्तांचे काळजीपुर्वक अवलोकन मंचाने केले असता, मंचाच्या असे निदर्शनास आले की, विरुध्दपक्षाचा निष्काळजीपणा सिध्द करण्यासाठी तक्रारकर्त्याने कुठल्याही तज्ञ डॉक्टरांचा पुरावा मंचासमोर सादर केला नाही. केवळ वेगवेगळया डॉक्टरांच्या भिन्न भिन्न अहवालावरुन, विरुध्दपक्षाने चुकीचा अहवाल देऊन निष्काळजीपणा केल्याचे सिध्द होत नाही. उलट डॉ. सदानंद भुसारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विरुध्दपक्षाच्या अहवालावरुन व स्वत: केलेल्या तपासणी वरुनच तक्रारकर्त्याचा औषधेपचार केला. सदर औषधोपचार दि. 5/1/2015 ते 9/1/20156 या कालावधीत घेऊनही सदर औषधांचा त्रास तक्रारकर्त्याला झालेला नाही. यावरुन सदर औषधी तक्रारकर्त्याला लागु पडल्याचे दिसून येते. दि. 9/1/2015 रोजी “ Ashwini Kidney and Dialysis Centre Pvt. Ltd.” ( दस्त क्र.6) यांचेकडे केलेल्या तपासणीत सदर SER Creatinine हे 1.0 mg/dl इतके दिसून येते. सदर कमी झालेल्या SER Creatinine च्या प्रमाणाबद्दल डॉ. भुसारी यांनी त्यांच्या पुराव्यात असे नमुद केले आहे की, “त्यांनी तक्रारकर्त्यावर जो औषधोपचार केला होता, त्यामध्ये सेरम क्रियेटीनीन कंट्रोल मध्ये यावे, याचेही औषध होते. त्यामुळे सदर उपचार घेतल्याने दुसऱ्या पॅथॉलॉजीमधून जो रिपोर्ट घेतला, त्या मध्ये सेरम क्रियेटीनीन हे कमी झालेले आढळते. सदर सेरम क्रियेटीनीन हे औषधेपचाराने कमी झाल्याने विरुध्दपक्ष यांनी दि. 5/1/2015 ला दिलेला रिपोर्ट हा योग्यच आहे”( पृष्ठ क्र. 100, पॅरा क्र. 8 )
वरील सर्व बाबींचा विचार करुन मंच या निष्कर्षाप्रत आले आहे की, विरुध्दपक्षाने तिच्याकडे उपलब्ध असलेल्या मशीनव्दारे तक्रारकर्त्याच्या रक्त व लघवीची तपासणी करुन मशिनने दिलेले निदान नमुद करुन तक्रारकर्त्याला अहवाल दिलेला आहे. सदर मशिनव्दारे तपासणी करण्याचे ज्ञान व अनुभव तसेच शैक्षणिक अर्हता तिच्याकडे असल्याने केवळ दुसऱ्या डॉक्टरांच्या निदानापेक्षा तिचे निदान वेगळे आले म्हणून विरुध्दपक्षाने निष्काळजीपणा ( Negligence ) केला, हे सिध्द हेात नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे...
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- न्यायिक खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.