::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/12/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाच्या दोषपूर्ण सेवे संदर्भात नुकसान भरपाई मिळण्या- करिता, विरुध्द पक्षांविरुध्द दाखल केली आहे.
2) सदर प्रकरणात, तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 2 यांचा लेखी जबाब, पुरावा व उभय पक्षाने दाखल केलेले दस्त, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर, उभय पक्षाचा तोंडी युक्तिवाद व विरुध्द पक्ष क्र. 2 ने दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष, कारणे देवून पारित केला तो येणेप्रमाणे.
विरुध्द पक्ष क्र. 1 यांना मंचाची नोटीस मिळुन सुध्दा ते मंचात उपस्थित न राहिल्याने, दिनांक 04/09/2017 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 विरुध्द ‘‘एकतर्फीचा आदेश ’’ मंचाने पारित केला आहे.
3) तक्रारकर्ता यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी दिनांक 14/03/2017 रोजी अकोला येथे तक्रारकर्त्याची अपॉईंटमेंट फिक्स केली होती. त्या ठिकाणी डॉ. बत्रा नसून डॉ. आशिष रुपलाल यादव हे होते. डॉ. यादव यांनी तपासणी व पुर्ण हिस्ट्री केल्यानंतर, वर्षभर औषधी घ्यावी लागेल व त्या वर्षभरामध्ये 12 वेळा हेअर लेझर ट्रिटमेंट सुध्दा देवू असे सांगीतले व त्यासाठी सर्व खर्च रुपये 12,000/- येतो. त्याप्रमाणे दिनांक 14/03/2017 रोजी स्वॅपींग मशीनव्दारे रुपये 12,000/- ऑनलाईन ट्रॉंन्सफर केले व तपासणी फी रुपये 250/- रोख दिले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी 30 दिवसांची औषधी दिली. त्याच दिवसापासून औषधी घेणे सुरु केले. परंतु दोनच दिवसानंतर सदर औषधीचा त्रास होवू लागल्यामुळे विरुध्द पक्षास फोनव्दारे संपर्क करुन सांगितले. सदर औषधीचे दुष्परिणाम जाणवत असल्यामुळे सदर औषधी ही 15 दिवसानंतर घेणे बंद केले व उर्वरीत 15 दिवसाची औषधी विरुध्द पक्ष क्र. 2 यांना परत केली व अॅडव्हान्स दिलेली रुपये 12,000/- रक्कम परत मागीतली. परंतु विरुध्द पक्षाने सदर रक्कम परत केली नाही व बिल सुध्दा दिनांक 14/06/2017 रोजी तक्रारदाराच्या ई-मेल वर पाठवले व रुपये 12,000/- परत करण्यास असमर्थता दाखविली. म्हणून दिनांक 16/06/2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. तरी विरुध्द पक्षाने नोटीसची दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर तक्रार नाईलाजास्तव मंचात दाखल करावी लागली.
4) विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्ता यांनी कोणताही व्यवहार हा मंचाच्या अधिकार क्षेत्रात केलेला नाही. त्यामुळे सदर तक्रार मंचाला चालवण्याचा अधिकार नाही. तसेच तक्रारकर्त्याला दिलेली औषधी ही होमीओपॅथीक असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम होत नाही. जर तक्रारकर्त्याला दोन दिवसात त्रास होवू लागला तर तक्रारकर्त्याने 15 दिवसापर्यंत औषधी का घेतली. औषधीमुळे तक्रारकर्त्याला त्रास झाला, याची माहिती तक्रारकर्त्याने कधीही दिलेली नाही व एका महिण्याची तारीख संपल्यानंतर संपर्क साधला असता तक्रारकर्त्याने फोनला दूर्लक्षित केले. तक्रारकर्ता यांनी स्वतः ऑनलाईन पध्दतीने डॉ. बत्रा यांचा शोध घेतला. पूर्ण नियमांची शहानिशा करुनच तक्रारकर्ता यांनी फ्रेंचाईसी मध्ये भेट दिल्यानंतर, रजिष्ट्रेशन फॉर्म भरला जातो व तो फॉर्म तक्रारकर्त्याने वाचून समजून घेवून नंतरच त्यावर सही केली. त्यानंतर तक्रारकर्त्याची सर्व हिस्ट्री घेतल्यानंतरच, त्याचे अध्ययन करुन व तक्रारकर्ता यांच्यासोबत चर्चा करुन, त्यांच्यावर शास्त्रोक्त पध्दतीने अवलंबून, उपचार सुचविण्यात आले. त्यासाठी वर्षभर औषधी घ्यावी लागेल व त्यासाठी रुपये 12,000/- खर्च आहे. हे सर्व मान्य करुन, तक्रारकर्त्याने रुपये 12,000/- जमा केले व रितसर पावती देण्यात आली. तक्रारकर्त्यास 30 दिवसाची औषधी देण्यात आली होती व औषध घेण्याची पध्दत समजावून सांगितली होती. त्याचदिवशी तक्रारकतर्याला लेजर कोंब व्दारे उपचारास सुरुवात करण्यात आली होती. तक्रारकर्ता औषधी घेवून गेल्यानंतर परत कधीच उपचारासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी विरुध्द पक्ष क्र. 2 कडे आला नाही, तो जर विरुध्द पक्षाकडे आला असता तर नक्किच औषधामध्ये बदल करुन नविन औषधी तक्रारकतर्याला दिली असती. आजही तक्रारकर्त्याला औषधी बदलून देण्यास व योग्य उपाययोजना/उपचार करण्यास विरुध्द पक्ष तयार आहे. तक्रारकर्ते यांनी जमा केलेली रक्कम परत करता येत नाही, असे अटीतच नमूद आहे व त्या फॉर्मवर तक्रारकर्त्याने सही केली आहे.
विरुध्द पक्षाने त्यांची भिस्त, त्यांनी दाखल केलेल्या पुढील न्यायनिवाडयावर ठेवली आहे.
2010 CJ (SC) 1173 ( Supreme Court of India )
Kusum Sharma & Others X Batra Hospital & Medical Research Centre And Others.
Decided On : 10 February 2010.
5) अशाप्रकारे उभय पक्षांचा युक्तिवाद एैकल्यानंतर, मंचाचे असे मत आहे की, उभय पक्षाला ही बाब मान्य आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक 14/03/2017 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 चे अकोला येथील फ्रेंचाईसी डॉक्टर विरुध्द पक्ष क्र. 2 यांच्याकडून हेअर लॉस ट्रीटमेंट व त्याबद्दलची औषधी यासाठी वर्षभराकरिता एकमुस्त रक्कम रुपये 12,000/- व तपासणी फी रुपये 250/- भरुन, एका महिन्याची औषधी घेतली होती. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा ग्राहक आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांनी सदर औषध व उपचार जरी अकोला येथे घेतले तरी, त्याबद्दलची तक्रार किंवा त्याबद्दलचे परिणाम तक्रारकर्त्याला वाशिम येथे जाणवू लागले, असे त्यांचे कथन आहे. त्यामुळे तक्रारीस अंशतः कारण वाशिम येथे घडले आहे. म्हणून वाशिम ग्राहक मंचाला सदर प्रकरण तपासण्याचा अधिकार आहे.
तक्रारकर्त्याच्या मते, सदर विरुध्द पक्षाचे औषध घेतल्यानंतर दोनच दिवसात तक्रारकर्त्याला चक्कर येणे, श्वसनासाठी त्रास होणे, भुक न लागणे, असे दुष्परिणाम जाणवू लागले व याबाबत तक्रारकर्त्याने फोनवर विरुध्द पक्ष क्र. 2 शी संपर्क साधला होता. परंतु विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सुरुवातीला असा त्रास होत असतो, असे सांगून, औषधी घेणे सुरु ठेवण्याचे सांगितले होते. यावर विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्यानी औषधाचे दुष्परिणाम दर्शविण्या करिता, कोणतेही तज्ञ मत रेकॉर्डवर दाखल नाही. परंतु सदर त्रास म्हणजे केस गळती, चक्कर येणे, श्वसनास त्रास होणे, भुक न लागणे, असे नमुद आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या स्वतःच्या त्रासाबद्दल इतरांचे तज्ञ मत मागवणे योग्य नाही, असे मंचाचे मत आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 2 जरी पुढील उपचार करण्यास तयार असले तरी, तक्रारकर्त्याला मंचाने पुढील उपचार घेण्यास, आदेश देवून बाध्य करणे हाणीकारक आहे, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने एका वर्षाच्या उपचाराकरिता विरुध्द पक्षाकडे रक्कम रुपये 12,000/- व तपासणी फी वेगळी, असे शुल्क भरले होते. परंतु तक्रारकर्त्याने सदर औषधी 15 दिवसानंतर घेणे बंद करुन, उर्वरीत दिवसाची औषधी परत केली, असे त्याचे म्हणणे आहे. या करिता विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी रेकॉर्डवर रजिष्ट्रेशन फॉर्म, ज्यावर तक्रारकर्त्याची डिक्लरेशन वर सही आहे, तो दाखल केला. त्यातील अट क्र. 2 मध्ये असे नमूद आहे.
2. I have seen the type of plan and charges thereof and agree to pay the same and I am fully aware that the charges paid by me are not refundable, adjustable or transferable.
परंतु सदर डिक्लरेशन फॉर्म हा कोरा असून त्यावर तक्रारकर्त्याची रनींग सही आहे. तसेच सदर अटीमध्ये जर रुग्णाला औषधाचे कोणते दुष्परिणाम आढळले व त्यामुळे त्याने औषध बंद केले तरी, रक्कम परत नाही, असे स्पष्ट नमूद नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाचा युक्तिवाद मंचाने स्विकारला नाही. ग्राहकाकडून पुर्ण वर्षाची औषधाची फी जमा करुन घेणे, मात्र औषधी फक्त एका एका महिण्याची देणे, हे योग्य नाही. कारण सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने पुर्ण 12 महिण्याची औषधी फी भरणा करुन औषध मात्र फक्त 15 दिवसाचे घेतले, त्यामुळे त्यापोटीची रक्कम रुपये 1,000/- कपात करुन उर्वरीत रक्कम रुपये 11,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास परत करणे, न्यायोचित ठरेल. मात्र तक्रारकर्त्याव्दारे स्वतःहून ट्रिटमेंट बंद केल्या गेली, म्हणून तक्रारकर्ता इतर नुकसान भरपाई व व्याज विरुध्द पक्षाकडून मिळण्यास पात्र नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतरही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला हे प्रकरण मंचात दाखल करावे लागले. म्हणून त्यापोटी खर्चाची रक्कम रुपये 3,000/- मिळण्यास, तक्रारकर्ता पात्र आहे.
सबब अंतिम आदेश, खालीलप्रमाणे पारित केला.
:: अंतिम आदेश ::
1. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरित्या वा वेगवेगळे रुपये 11,000/-
( अक्षरी रुपये अकरा हजार फक्त ) व प्रकरण खर्च रुपये 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) तक्रारकर्त्याला द्यावे.
3. विरुध्द पक्ष यांनी ऊपरोक्त आदेशातील क्लॉज नं. 2 ची पुर्तता, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत करावी. अन्यथा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेवर, आदेश पारित तारखेपासून तर प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंत दरसाल, दरशेकडा 9 % दराने व्याजाची जबाबदारी येईल.
4. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri