निकालपत्र :- (दि.25.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांनी स्वत: व सामनेवाला क्र.1 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला वैद्यकिय व्यावसायिक यांनी तक्रारदारांच्या उजव्या डोळयाचे मोतीबिंदूचे फेको ऑपरेशन दि.28.11.2009 रोजी केले. तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचे हॉस्पिटलमध्ये असलेल्या सेंटरमधील सामनेवाला क्र.2, श्रीमती पाटील यांनी तक्रारदारांना चष्मा बनवून दिला. त्यावेळेस चष्मा ठिक आहे असे सांगितले. परंतु, सदर चष्म्याने तक्रारदारांना आराम वाटलेला नाही. त्यामुळे सदर पाटील यांना सांगितले असता त्यांनी तक्रारदारांना डोळे तपासून घेणेस सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी हर्ष ऑप्टीकल ट्रेडर्स, कोल्हापूर यांना सदरचा चष्मा दाखविला. परंतु, सदरचा चष्मा बरोबर बनविला नसल्याचे सांगून त्यांनी सदर चष्म्याची काच बदलून दुसरी काच बसविली. तरीही तक्रारदारांना आराम वाटला नाही, म्हणून डॉ.मिलींद सबनीस (दृष्टी हॉस्पिटल, कोल्हापूर) यांचेकडे तपासणी केली. त्यावेळेस, डॉ.सबनीस यांनी सदर ऑपरेशन चुकीचे झाले आहे असे सांगितले. डॉ.सबनीस यांनी गरज वाटेल तेंव्हा आयड्रॉप्स घातलेस ठी वाटेल असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी आय ड्राप्स घातले. सामनेवाला यांच्या सहाय्यक पाटील यांनी तक्रारदारांच्या उजव्या डोळयाची कामच बनविली व सामनेवाला क्र.1 यांनी उजव्या डोळयाची तपासणी चुकीच्या पध्दतीने केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या वाचण्यावर व लिखाणावर परिणाम झाला. तसेच, आर्थिक व मानसिक त्रास झाला. सबब, सामनेवाला यांनी ऑपरेशनचे रुपये 14,000/-, प्रत्येक वेळची फी रुपये 100/- प्रमाणे रुपये 500/-, काच बदलणेसाठी रुपये 230/-, डॉ.सबनीस यांची फी रुपये 200/-, औषधे व येणे-जाणेचा खर्च रुपये 1,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तपासणी कार्ड, उजवा डोळा तपासणी कार्ड, काच व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 वैद्यकिय व्यावसायिक यांनी म्हणणे दाखल करुन तक्रारदारांनी तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदारांची तक्रार ही ऑपरेशनबाबत असलेची दिसून येत नाही व ऑपरेशन झालेनंतर चष्म्याचा नंबर नीट न झाल्याबाबत त्यांनी तक्रार नोंदविली आहे. ऑपरेशनपूर्वी त्यांचा डोळा तपासून डोळयामध्ये ऑपरेशनच्यावेळी लेन्स बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे ऑपरशेननंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या डोळयाची तपासणी करुन त्यांना चष्म्याचा नंबर बनवून दिला. हर्ष ऑप्टीकल ट्रेडर्स हे चष्मा विक्रेते असून नंबर तपासून देण्याचे त्यांना कोणतेही ज्ञान व अधिकार नाही. डॉ.मिलींद सबनीस यांच्या तपासणीतदेखील त्यांना ऑपरेशनमध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही. ऑपरेशननंतर काही कालावधीमध्ये चष्म्याचा नंबर बदलणे ही गोष्टदेखील वैद्यकिय शास्त्रात नमूद आहे. त्यामुळे तक्रारदारांनी केलेली प्रस्तुतची तक्रार पश्चातबुध्दीची व बेकायदेशीर आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळून लावणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने तक्रारदारांनी स्वत: केलेले युक्तिवाद तसेच सामनेवाला क्र.1 वैद्यकिय व्यावसायिक यांच्या वकिलांचे सविस्तर व विस्तृतपणे ऐकून घेतले. तक्रारदारांची तक्रार ही संदिग्ध स्वरुपाची दिसून येते. सामनेवाला वै द्यकिय व्यावसायिक यांनी तक्रारदारांच्या उजव्या डोळयाचे केलेले फेको ऑपरेशन चुकीच्या पध्दतीने केले असल्याचे दिसून येत नाही. प्रस्तुतची तक्रार ही सविस्तर असल्याचे दिसून येत नाही. तसेच, सामनेवाला वैद्यकिय व्यावसायिक यांचा चष्मा बनवून देणेचा व्यवसाय नाही. चष्म्याबाबत कोणताही तज्ज्ञ मताचा अहवाल प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी आणलेला नाही. वैद्यकिय निष्काळजीपणा हा गृहित धरता येत नाही, तर तो सर्वसंम्मत पुराव्यानिशी सिध्द व्हावा लागतो. उपरोक्त विवेचन विचारात घेता सामनेवाला वैद्यकिय व्यावसायिक यांचेकडून कोणताही वैद्यकिय निष्काळजीपणा झालेचे सिध्द होत नाही. सबब, आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |