जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 369/2008 प्रकरण दाखल तारीख - 25/11/2008 प्रकरण निकाल तारीख – 11/08/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य नागनाथ पि.विठठलराव येरगे, वय वर्षे 58, व्यवसाय शेती, अर्जदार. रा. आचेगांव ता.देगलुर जि.नांदेड. विरुध्द. डॉ.एम.एच.पाटील, वय सज्ञान, व्यवसाय वैद्यकिय व्यवसाय, रा.मातोश्री क्लीनीक व मॅटर्नीटी होम, देगलुर ता.देगलुर जि.नांदेड. गैरअर्जदार. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.बी.हनवते. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.शिवराज पाटील निकालपञ (द्वारा-मा.श्री.बी.टी.नरवडे पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात, अर्जदार हे दि.24/04/2008 रोजी त्यांच्या डाव्या पायाच्या घोटयाजवळ खडडा् पडल्यमुळे व जखम झाल्यामुळे गैरअर्जदार यांचेकडे उपचारासाठी गेले. त्या वेळेस गैरअर्जदार यांनी अर्जदारांना तपासुन गोळया, औषधी व इंजेक्शन दिले. गैरअर्जदार व त्यांची पत्नी सौ.वर्षा पाटील व स्वतः गैरअर्जदार दोघेही मातोश्री क्लीनीक व मॅटर्नीटी होम येथे वैद्यकिय सेवा पुरवितात. गैरअर्जदार हे बी.ए.एम.एस व सी.सी.एच.सी.जी.ओ. ही वैद्यकिय पदवी धरतात. यानंतर परत अर्जदार त्यांची जखम कमी झाली असतांना गैरअर्जदार यांचेकडे गेले तेंव्हा त्यांनी पैशाच्या लालसेपोटी अर्जदार यांच्या डाव्या पायाच्या घोटयाचे विना परवानगी व अर्जदाराचे काही एक ऐकुन न घेता कुठल्याही प्रकारची पुर्व जाणीव न देता घोटयास कापुन ऑपरेशन केले त्यामुळे अर्जदाराचे कमी असलेले जखम जास्त झाली व डावा पाय अधु झाला. त्यामुळे अर्जदारांना शेतीचे कामे करणे अशक्य झाले. गैरअर्जदार यांचेकडे अर्जदार हे दि.01/07/2008 रोजी गेले असता, त्यांनी फिस म्हणुन रु.1,000/- घेतली व औषधी लिहुन दिले व अर्जदाराची जखम कमी होण्या ऐवजी जास्त झाले. या विषयी दि.05/07/2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली करण्यासाठी गेले असता, त्यांनी धमकावुन क्लीनीक मधुन हकलुन दिले. गैरअर्जदार यांनी केलेल्या चुकीच्या व निष्काळजीपणामुळे शस्पक्रियेचा खर्च रु.8,000/- औषधी खर्च रु.3,000/- असे एकुण रु.11,000/- चा भुर्दंड अर्जदारास बसला आहे ते परत मिळावे व झालेल्या त्रासापोटी रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी म्हणुन हे तक्रारअर्ज दाखल केले आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. दि.24/06/2008 रोजी अर्जदार हे त्यांच्या तक्रारीत उल्लेख केल्या प्रमाणे त्यांच्या डाव्या पायाच्या घोटयावर वेदना होत असल्यामुळे आला होता. तपासणी करुन अर्जदाराच्या जखमेतुन पु युक्त संसर्ग असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रोगनिदान करण्यासाठी डॉ. कोटगीरे यांचेकडे पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्ताची तपासणी केली असता, त्यामध्ये संसर्ग आढळले त्यानुसार योग्य औषधी, इंजेक्शन टी.टी देवुन रुग्णला घरी पाठवले. दुस-या दिवशी अर्जदार परत क्लीनीकमध्ये आला त्यावेळी प्रतिजिवीकेमुळे, गोळयामुळे जखसमेतुन पु बाहेर येत असतांना दिसले. अर्जदाराचा त्रास बघुन त्यांना सविस्तर माहीती दिली. जखम स्वच्छ करुन एक महिना पटटी करण्याबद्यल सांगितले, खर्चाची माहीती दिली. त्यानंतर रुग्णाच्या संमतीनेच त्यांची जखम पु दाबुन स्वच्छ केले औषध लावुन इंजेक्शन दिले. गैरअर्जदारांना संपुर्ण उपचाराचा खर्च म्हणुन रु.11,000/- सांगितले. परंतु अर्जदाराची गरीब परिस्थिती बघुन फक्त रु.1,000/- घेतले. गैरअर्जदाराने अर्जदाराची कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही व रु.4,000/- फिस घेतली नाही. दि.01/07/2008 ला अर्जदार हे पटटी बदलण्यसाठी आले होते. जखम भरत होते पुन्हा एकदा पटटी करुन घेऊन गेले दि.05/07/2008 रोजी अर्जदार क्लीनीकमध्ये आलाच नाही. गैरअर्जदाराने शस्त्रक्रिया केलीच नाही प चुकीचा उपचार केला नाही. अर्जदाराने जे रु.11,000/- खर्च मागीतला आहे तो खोटा आहे. अर्जदाराची जखम पुर्णपणे भरत आली होती परंतु नंतर काय झाले माहीत नाही. त्यामुळे अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात यावा, असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेली दस्तऐवज बारकाईने तपासुन वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होतो काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी आपल्या तक्रारीत त्यांच्या डाव्या पायाच्या घोटयाला जखम झाल्याचे म्हटले आहे व गैरअर्जदार यांनी ती जखम साफ करुन पटटी लावुन पाठविले होते ते दि.24/06/2008 चे प्रिस्क्रीप्शन दाखल केले आहे. जखम बरोबर होण्यासाठी अंटीबोयोटीक्स दिले आहे. गैरअर्जदारांनी म्हटल्या प्रमाणे पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर परत दि.28/06/2008 ला गैरअर्जदारांच्या सल्ल्यानुसार कोटगिरे पॅथॉलॉजीमध्ये अर्जदाराची शुगर ही तपासण्यात आलेली आहे. शुगर रिपोर्टही नॉर्मल आहे. यानंतर परत अर्जदार त्या तारखेला गैरअर्जदाराकडे गेला त्यावेळेस देखील त्यांनी 24 तारखेला काही गोळया अंटीबायोटिक्स लिहुन दिले आहे, फक्त एक गोळी बदलली आहे. या सर्व कागदपत्रावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या डाव्या पायाच्या घोटयाला ऑपरेशन केलेले दिसुन येत नाही फक्त प्राथमिक उपचार व पटटी करुन पाठवलेले आहे. जखम बरे होण्यासाठी अंटीबायोटिक्स टी.टी. चे इंजेक्शन दिले आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारअर्जात गैरअर्जदारांनी फीस म्हणुन रु.4,000/- काढुन घेतले आहे, याचा अर्थ गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या खीशातुन पैसे जबरदस्तीने काढले असा होतो, असे कुठलाही डॉक्टर करणार नाही व केलेच तर अर्जदार हे गप्प बसतील असे नाही, त्यांच्याच खाली अर्जदाराने रु.1,000/- फिस दिले असे म्हटले आहे. आता जेंव्हा रु.4,000/- फिसचा उल्लेख केलेला आहे तेंव्हा शस्त्रक्रियेसाठी म्हणुन रु.8,000/- व औषधी खर्च म्हणुन रु.3,000/- असे एकुण रु.11,000/- चा उल्लेख केलेला आहे. येथेच सुरुवातीस सांगितलेले फिस व नंतर सांगितलेल्या फिसमध्ये विरोधाभास दिसुन येतो. यात अर्जदार काही खोटे सांगत आहे, असे दिसुन येत आह. अर्जदाराने रु.3,000/- ची औषधीचा खर्च आला आहे असे म्हटलेले आहे व एकही मेडिकल बिल दाखल दाखल केलेले नाही तेंव्हा रु.3,000/- चे औषधी घेतले तेही सिध्द होत नाही. अर्जदाराने फोटो दाखल केलेले आहे ते फोटो पाहीले असता, डाव्या पायाच्या घोटयाजवळ जखम थोडीसी आहे व थोडीसी सुकलेली दिसते व ती जखम पुर्णतः दुरुस्त होऊ शकते. त्यामुळे अर्जदाराचा पाय कायमचा अधु किंवा निकामी झाले असे म्हणता येणारनाही व ते खरेही नाही. या संबंधी अर्जदाराने दि.05/08/2008 ला गैरअर्जदारांना नोटीस पाठविलेली होती. गैरअर्जदार यांनी दि.03/09/2008 रोजी उत्तरही दिलेले आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन दिलेले आहे त्यास शस्त्रक्रियेला लागणारी औषधी व साहीत्य याचा देखील कुठेही उल्लेख नाही. एकंदरीत अर्जदाराची मागणी ही योग्य वाटत नाही व गैरअर्जदार डॉक्टरने जी मलमपटटी केलेली आहे ते व्यवस्थीत केल्याचे दिसुन येत आहे. शिवाय त्यांनी अर्जदाराला शुगर आहे काय त्याची तपासणी केलेली आहे कारण जखम बरे होण्यास त्याचाही संबंध असतो म्हणुन शुगर पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणी केली त्याचा रिपोर्ट दाखल आहे. यावरुन अर्जदाराच्यास जखमेची पुर्णतः काळजी घेतलेले आहे. त्यामुळे त्यांनी सेवेत हलगर्जीपणा व सेवेत त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. गैरअर्जदार यांच्या वकीलांनी युक्तीवाद करीत असतांना 2009 सी.जे. 540 (एन.सी) ही राष्ट्रीय आयोगाने, शामसुंदर शर्मा विरुध्द अतरसिंघ आणि इतर, हा सायटेशन दाखल केलेला आहे. यात मेडिकल नेग्लीजन्सीमध्ये व खुप उपचार केला व त्यात कॅन्सर नीघाला म्हणुन जिल्हा मंचाने नुकसान भरपारई दिली होती परंतु नंतर मा.राष्ट्रीय आयोगाने ती तक्रार फेटाळुन लावली. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |