(घोषित दि. 14.02.2014 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे देवपूर येथील रहिवासी असून सध्या बुलडाणा येथे वास्तव्यास आहेत व गैरअर्जदार हे जालना येथे ‘आंबेकर हॉस्पिटल’ या नावाने खाजगी रुग्णालय चालवतात.
तक्रारदारांना दोनही डोळयांनी अंधुक दिसण्याचा त्रास सुरु झाला म्हणून त्यांनी दिनांक 31.12.2010 रोजी गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात जालना येथे जावून तपासणी केली व काचबिंदूचे निदान गैरअर्जदार यांनी केले. आवश्यक त्या तपासण्या झाल्यानंतर डाव्या डोळयाचे ऑपरेशन केले व लगेचच उजव्या डोळयाचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यानुसार तक्रारदारांच्या उजव्या डोळयाचे देखील ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन नंतर तक्रारदारांच्या उजव्या डोळयातून पाणी येवू लागले व दिसणे बंद झाले. म्हणून तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे जावून तक्रार केली. तेव्हा गैरअर्जदारांनी त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी करुन त्याचा अहवाल गैरअर्जदार यांना दाखवल्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे डॉ.लोया यांचेकडे जावून उपचार घेणेबाबत सल्ला दिला.
औरंगाबाद येथील द्ष्टी आय इन्सिटयुट, येथे तपासणी केली असता त्यांनी काही चाचण्या करुन सदर शस्त्रक्रियेमुळे उजव्या डोळयाची द्ष्टी पूर्णपणे गेली असून त्यातील पाणी काढायला सांगितले व डाव्या डोळयाच्या द्ष्टीत काही बदल होणार नाही असे सांगितले.
तक्रारदार म्हणतात की, त्यांनी गैरअर्जदार यांच्या रुग्णालयात केलेल्या दोन्ही डोळयांच्या शस्त्रक्रिया असफल झाल्या आहेत. गैरअर्जदार यांच्या चुकीच्या उपचारामुळे तक्रारदारांच्या डोळयाच्या दष्टीवर परिणाम झाला म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार म्हणतात की ते गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत व गैरअर्जदार यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेत कसूर केली आहे त्याची नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार गैरअर्जदार यांचेकडून रुपये 5,00,000/- एवढी रक्कम मागत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत डॉ.आंबेकर, दृष्टी आय इन्स्टिटयूट, रेणुका पॅथॉलॉजी लॅबोरेटरी इत्यादी दवाखान्यातील उपचार व तपासणी संबंधीची कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबानुसार गैरअर्जदार त्यांचेकडे दिनांक 30.12.2010 रोजी तपासणीसाठी आले तेव्हा त्यांच्या दोनही डोळयांना काचबिंदू (Glaucoma) झाल्याचे निष्पन्न झाले. उजव्या डोळयाने डाव्या डोळयापेक्षा जास्त दिसत होते. तक्ररदारांना सांगण्यात आले की, शस्त्रक्रिया केली तरी दृष्टीत सुधारणा होणार नाही. परंतु आहे ती परिस्थिती कायम ठेवण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक आहे. त्यानुसार तक्रारदारांना पूर्ण जाणीव देवून त्याच्या दोनही डोळयांचे ऑपरेशन करण्यात आले व त्यांना दिनांक 24.01.2011 रोजी सुट्टी देण्यात आली. दिनांक 29.01.2011 च्या प्रथम फेरतपासणीच्या वेळी तक्रारदारांचे दोनही डोळे ठीक होते व त्याची द्ष्टी शस्त्रक्रियेपूर्वी जेवढी होती तेवढी कायम होती.
दिनांक 07.02.2011 रोजी तक्रारदार अचानक डोळयातून पाणी वहायला लागल्याने दवाखान्यात आले. चौकशी केली असता तक्रारदारांनी त्यांनी दिनांक 05.02.2011 रोजी दुचाकीवरुन प्रवास केला व डोळे चोळले असे सांगितले. तक्रारदारांची परिस्थिती बघता त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यांच्या डोळयातील स्त्रावाची तपासणी करुन त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले.
दुस-या दिवशी दिनांक 08.02.2011 रोजी तक्रारदारांना सोनोग्राफी करुन घेण्यास सांगण्यात आले व त्यांना पत्र देवून औरंगाबाद येथे डॉ.लोया यांना भेटून ताबडतोब V.R.Surgery करुन घेण्यास सांगण्यात आले.
दिनांक 16.02.2011 रोजी तक्रारदारांनी येवून सांगितले की ते तपासणीसाठी जावू शकले नाहीत म्हणून त्याच्या पत्रावर तारीख बदलून त्यांना पुन्हा औरंगाबाद येथे लगेचच जाण्याबाबत बजावण्यात आले. या तक्रारदारांच्या निष्काळजीपणाने आटोक्यात आलेले Infection पुन्हा वाढले व त्यांची दृष्टी नाहीशी झाली.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट दिसते की, त्यांनी तक्रारदारांवर योग्य उपचार केलेले होते. तक्रारदारांनी केवळ गैरअर्जदार यांचेकडून पैसे उकळण्याच्या द्ष्टीने व त्यांना बदनाम करण्यासाठी ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत त्यांनी तक्रारदारांवर केलेल्या उपचारासंबंधीची सर्व कागदपत्रे तसेच तक्रारदारांची स्वाक्षरी असलेली संमतीपत्रे, सोनोग्राफी अहवाल इत्यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदारांनी नि.13 अन्वये प्रस्तुत प्रकरणात वैद्यकीय बोर्डाचा अहवाल मागवण्यासाठी अर्ज केला. त्यावर सुनावणी होवून मंचाने तो अर्ज मंजूर केला. त्यानुसार सर्व कागदपत्रे “विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद” यांचेकडे पाठवण्यात आली. त्यांनी त्यांचा अहवाल मंचासमोर दाखल केला.
तक्रारदार दिनांक 26.09.2013 पासून सातत्याने 08 तारखांना मंचासमोर गैरहजर होते. त्यामुळे तक्रार गुणवत्तेवर निकाली करण्यात येत आहे. गैरअर्जदार यांचे तर्फे अड.जे.सी.बडवे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दा निष्कर्ष
1.गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत काही कमतरता केलेली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा
मु्द्दा क्रमांक 1 व 2 साठी - तक्रारदार हे अंधुक द्ष्टीची तक्रार घेऊन गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 31.12.2010 रोजी उपचारासाठी गेले. गैरअर्जदारांनी त्यांना तपासून काचबिंदू (Glaucoma) चे निदान केले व शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. गैरअर्जदारांनी तक्रारदारांच्या डाव्या डोळयाची दिनांक 04.01.2011 रोजी व उजव्या डोळयाची दिनांक 22.01.2011 रोजी शस्त्रक्रिया केली या गोष्टी उभयपक्षी मान्य आहेत. गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रातील नि.11/2 व 11/3 नुसार तक्रारदारांनी अनुक्रमे दिनांक 04.01.2011 व 22.01.2011 या दिवशी लिहून दिलेल्या संमतीपत्रांवर “माझ्या दोनही डोळयात काचबिंदू आहे माझी नजर कमजोर झालेली आहे. ऑपरेशन करुन नजर वाढणार नाही तरी आहे ती नजर कायम राहण्याचा प्रयत्न म्हणून ऑपरेशन करायचे याची मला कल्पना दिली आहे. ऑपरेशनला माझी हरकत नाही”. असे स्पष्ट नमूद केलेले दिसते.
शस्त्रक्रिये नंतर तक्रारदार दिनांक 29.01.2011 रोजी प्रथम तपासणीसाठी आले तेव्हाही त्यांचे डोळे व्यवस्थित होते. परंतु दिनांक 07.02.2011 रोजी तक्रारदार डोळयाच्या बाहुलीला सुज व स्त्राव अशी तक्रार घेवून आले. त्यावर औषधोपचार करुन त्यांना ताबडतोब V.R.Surgeon कडे जाण्याचा सल्ला गैरअर्जदारांनी दिला ही गोष्ट नि.11/4 वरुन स्पष्ट होते. द्ष्टी आय इन्स्टिटयूटच्या कागदांवरुन (नि.5/5) असे दिसते की, त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे दिनांक 19.02.2011 रोजी प्रत्यक्षात तक्रारदार डॉ.लोया यांचेकडे गेले. यावरुन तक्रारदारांचा निष्काळजीपणा दिसतो.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्ररोग विभाग प्रमुखांच्या अहवालात (नि.17) देखील डॉ.बी.एस.खैरे यांनी तक्रारदारांचा आजार व त्यावर गैरअर्जदार यांनी केलेले उपचार यांचे सविस्तर विवेचन केले आहे त्यात ते म्हणतात की, “Glaucoma surgery was performed. Patient was alright on the first follow up. Operation was uneventful. Patient developed post operative infection after three Weeks. Post operative infections do Occur which are be yond control of Surgeon”. आणि त्यावरुन शेवटी अहवालात “There is no negligence on the part of the treating Doctor.” असा निष्कर्ष काढलेला आहे.
वरील सविस्तर विवेचनावरुन गैरअर्जदार यांनी तक्रारदारांवर चुकीचे व निष्काळजीपणाने उपचार केले व तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत काही कमतरता केलेली आहे ही गोष्ट तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत असा निष्कर्ष मंच काढत आहे.
मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.