( मा. सदस्या श्रीमती भारती केतकर यांनी निकाल कथन केला )
::: आ दे श प त्र :::
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ते क्रमांक 1 व 2 यांचा 20 महिने वयाचा मुलगा मोहम्मद झयान-उल-हक हा बाहय रुग्ण म्हणून दिनांक 26-06-2010 पासून प्रथमत: ओकारीने ( vomiting ) पिडीत असल्याबद्दल व दिनांक 28-06-2010 ला कातडीवर किंचीत पिवळेपणानी ( Pallor ) ग्रासित असल्याबद्दल व तदनंतर दिनांक 14-07-2010 पासून खोकला, ताप व सर्दी ( Cough, Fever, Rhinitis ) या व्याधीबद्दल विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी केलेल्या निदानानुसार त्यांचा औषधोपचार घेत होता. तक्रारकर्त्यानी चिकित्सा शुल्क ( Consultation Fee ) म्हणून प्रथमत: रु. 100/- व तदनंतर प्रत्येक वेळी रु. 50/- याप्रमाणे एकूण रु. 200/- फी म्हणून विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना दिले. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने राशीप्राप्तीची पावती तक्रारकर्त्यांना एकदाही दिलेली नाही.
फक्त सर्दी आणि खोकला अजूनपर्यंत पूर्णत: बरा झाला नसल्यामुळे, रुग्णाला बाळापूरचे स्थानिक डॉ. नदीम अहमद खान यांना रविवार दिनांक 18-07-2010 रोजी संध्याकाळी अंदाजे 8 वाजता दाखविण्यात आले. ही केस विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांची असल्यामुळे डॉ. खान यांनी डॉ. सोमानी यांचेशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. केलेल्या चर्चेनुसार डॉ. सोमानी बाहेरगावी असल्यामुळे रुग्णाला दुसरे दिवशी पाठविण्याचा सल्ला देण्यात आला असल्यामुळे डॉ. खान यांनी डॉ. सोमाणी यांचे नावे पत्र लिहून आवश्यक तो औषधोपचार करण्यात यावा असे सूचविले.
दिनांक 19-07-2010 रोजी जवळजवळ दुपारचे 12 चे दरम्यान तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 हे बालरुग्ण मो. झयान याला विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे दवाखान्यात घेऊन गेले व चिकित्सा शुल्क म्हणून रु. 2,000/- ची राशी जमा केल्यानंतर, ज्याची पावती तक्रारकर्त्याला दिल्या गेली नाही, रुग्णाला दवाखान्यात आंतर्रुग्ण म्हणून भरती करुन घेण्यात आले. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी प्रत्यक्षरित्या रुग्णाची तपासणी न करता कॅबीनमध्ये बसूनच आपल्या पॅरामेडिकल स्टाफदवारे, औषधोपचार सुरु केला.
दुपारी अंदाजे 2 वाजताचे सुमारास रुग्णाची आई ( तक्रारकर्ती क्रमांक 2 ) हिला सोमाणी हॉस्पिटलच्या छापील संमतीपत्रकाच्या मागील बाजूस, मी माझ्या पेशंटला भरती करण्यास तयार आहे. अशा आशयाच्या संमतीखाली सही करण्यास सांगितले.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी बाहेर येऊन रुग्णाची तपासणी केली व अन्य औषधोपचारासमवेत त्याला मलेरियाचे इंजेक्शन देण्याच्या सूचना पॅरामेडिकल स्टाफला देऊन दुपारी 2 वाजतापासून ॲन्टीमलेरियल ट्रिटमेंट सुरु केली. मलेरियाचे इंजेक्शन म्हणजे Larinate ( Artesunate ) असून त्याचा 20 Mg. चा डोस रुग्णाला देण्यात आला होता. येथे हेही नमूद करणे आवश्यक आहे की, सदरहू इंजेक्शन रुग्णाला दिल्याबाबतची नोंद दुपारी 2 वाजताचे ऐवजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी 4.05 वाजता केलेली आहे. लॅरिनेटचे इंजेक्शन देण्यापूर्वी रुग्ण खरोखरच मलेरियाने पिडीत आहे किंवा काय हे निश्चित करण्यापूर्वी National Drug Policy on Malaria 2010 मध्ये अनिवार्य ठरविलेल्या 1) Microscopy, 2) Rapid Diagnostic Test यापैकी कुठल्याही पध्द्तीने रोगनिश्चिती केलेली नव्हती. त्याचबरोबर रुग्णाला लॅरिनेट (आर्टीसुनेट) इंजेक्शनमुळे Drug fever, Drug rash, Bradycardia तसेच Transient First Degree Heart Block आदि Side Effects चा धोका संभवतो याची यत्किंचितही पूर्वसूचना किंवा माहिती विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने तक्रारकर्त्याला अजिबात दिलेली नव्हती.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या सल्ल्यानुसार रुग्णाला प्रथमत: विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या लेबॉरेटरी मध्ये नेण्यात येऊन तिथे अंदाजे अडीच वाजता त्याचे रक्त सॅम्पल काढण्यात आले व रिपोर्ट साठी संध्याकाळी 7 वाजता येण्याविषयी तक्रारकर्त्याला सांगण्यात आले. त्यानंतर डॉ. श्याम लालवाणी यांच्याकडे छातीचा फोटो काढण्यासाठी रुग्णाला नेण्यात आले. दुपारचे अंदाजे साडे तीन वाजता तक्रारकर्त्याला असे आढळून आले की, रुग्णाला ताप चढत असून त्याच्या अंगावर चट्टे पडायला लागले आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना रुग्णाला दाखविल्यानंतर त्याची तपासणी करुन, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडून रक्त तपासणी रिपोर्ट घेऊन येण्यास सांगितल्यावरुन तक्रारकर्ता क्रमांक 1 यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडे रु. 350/- जमा करुन, ज्याची पावती त्याला देण्यात आली नाही, रक्त तपासणी रिपोर्ट घेऊन अंदाजे 4.15 चे सुमारास सदरहू रिपोर्ट विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचेकडे सुपूर्द केला. सदरहू रक्त तपासणी रिपोर्ट साधारण असून त्यात कुठलेही Malaria Parasites आढळलेले नसल्याबद्दलचा स्पष्ट उल्लेख आहे.
रुग्ण मो. झयान याला सुयोग्य औषधोपचारासाठी ओझोन हॉस्पिटल मध्ये हलविण्याचा निर्णय विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी घेतला व तशी सूचना तक्रारकर्त्याला देऊन रुग्णाला सोमाणी हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी 5.30 दरम्यान काढून अंदाजे 5.45 वाजता ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोमाणी हॉस्पिटलपासून अत्यंत जवळच्या सर्वोपचार रुग्णालय/वैदयकीय महाविदयालयाऐवजी मो. झयानला ओझोन हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा निर्णय हा एकतर्फी व अत्यंत चुकीचा असल्याचे दिसून येते.
मो. झयानला ओझोनमध्ये भरती करुन घेतल्यानंतर संध्याकाळचे अंदाजे 6 चे सुमारास विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे ओझोन हॉस्पिटलमध्ये आले व Complicated Malaria with shock हया त्यांनी केलेल्या निदानानुसार आतापर्यंत ते देत असलेल्या औषधोपचारात कुठलाही बदल न करता त्यांच्या सल्ल्यानुसारच रुग्णाची ट्रिटमेंट चालू ठेवण्याचा आग्रहपूर्वक निर्देश त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 4 डॉ. पी.एस. पाटील यांना दिले. इतकेच नसून स्वत: जातीने रुग्णाजवळ हजर राहून आतापर्यंत ते देत असलेला औषधोपचार ज्यामध्ये Injection Larinate ( Artesunate ) च्या 25 mg. चा अतिरिक्त डोसही संमिलीत आहे. आपल्या समोर निश्चितपणे दिल्या जात आहे याची प्रत्यक्ष खातरजमाही त्यांनी करुन घेतली. त्याचवेळी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता क्रमांक 1 यांना निर्देश देऊन विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्या लॅबमध्ये ताबडतोब जाऊन रक्त तपासणीच्या अहवालाची प्रत घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्ता क्रमांक 1 यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून प्राप्त करुन घेतलेल्या रक्त तपासणी रिपोर्टची प्रत अंदाजे 6.45 वाजता ओझोन हॉस्पिटलमध्ये दिली. सदरहू रक्त तपासणी रिपोर्ट हा विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना दुपारी 4.15 वाजता दिलेल्या रिपोर्टपेक्षा भिन्न व असाधारण असून त्यात मलेरिया (Plasmodium vivax) चे Parasites आढळल्याचा उल्लेख आहे.
आवश्यक तपासणीच्या अभावी आपले व्यावसायिक नैपूण्य, दक्षता, उच्च वैदयकीय ज्ञान, वैदयकीय क्षेत्रातील पूर्वानुभव यांचा यत्किंचितही वापर न करता रुग्णाला आपणाकडे रेफर करतेवेळी विरुध्दपक्ष क्रमांक 1 दवारा केलेले Malaria with Shock हे रोग निदान बरोबर आहे किंवा नाही यांची कुठलीही शहानिशा व खातरजमा न करता विरुध्दपक्ष क्रमांक 1 दवारा सुचविलेल्या औषधोपचारात कुठलाही बदल न करता तो यथावत चालू ठेवणे ही विरुध्दपक्ष क्रमांक 3 व विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांचे दवारा प्रदत्त सेवेतील एक गंभीर त्रुटी आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 4 दवारे वैदयकीय तज्ञ समितीसमोर दिलेल्या केस समरीची प्रत संलग्न आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या आग्रही निर्देशानुसार Injection Larinate ( Artesunate ) चा 25 Mg. चा अतिरिक्त डोस रुग्णाला देण्यात आला. तत्पूर्वी दुपारी 2.00 वाजता विरुध्द पक्ष क्रमांक 1 नी याच इंजेक्शनचा 20 Mg. चा प्रथम डोस दिलेला होता. त्यामुळे अवघ्या 5 तासाच्या अवघीत रुग्णाला लॅरिनेटची एकूण 45 Mg. मात्रा कुठलीही निर्देशित टेस्ट न करता देण्यात आलेली आहे. लॅरिनेट आर्टेसुनेट इंजेक्शनच्या साईड इफेक्टचा जसे Drug fever, Cardio toxicity, Bradycardia. Nausea, Vomiting, Cardiac arrest आदिचा रुग्णावरती भयावह रितीने प्रभाव पडलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे आर्टेसुनेटच्या अत्याधिक ओव्हर डोसमुळे त्याला कदाचित Stevens Johnson Syndrome ची लागण झाली असल्याची शक्यताही पडताळून पाहणे आवश्यक होते.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्या कथित निष्काळजीपणामुळे आपल्या प्रिय मुलाच्या झालेल्या आकस्मिक व असामायिक निधनामुळे दु:खित पित्याच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी, अकोला यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. ए.सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठित पाच सदस्यीय तज्ञ समितीदवारा दिलेला अहवाल दिनांक 22-08-2011 हा विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तज्ञ समितीसमोर दिलेल्या चुकीच्या माहितीवर आधारित असल्यामुळे तो एकतर्फी त्रुटीपूर्ण व अन्यायकारक असल्याचे आढळल्यावरुन प्रकरणाची निष्पक्षपणे पुन्हा चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीचे गठन करण्याकरिता जिल्हाधिकारी, अकोला यांना तक्रारकर्त्यातर्फे दिनांक 7-3-2011 रोजी देण्यात आलेल्या प्रतिवेदनाची प्रती संलग्न आहे. वैदयकीय तज्ञ समितीसमोर विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी दिलेल्या बयानाच्या प्रती संलग्न आहेत.
सदरील विवादास्पद बाहय रुग्ण मो. रेहान, वय वर्ष 4, हा अंजनगांव सुर्जी येथील रहिवासी असल्याबद्दलची माहिती विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी कळविल्यावरुन तक्रारकर्त्यातर्फे करण्यात आलेल्या प्रदीर्घ व सखोल चौकशीत त्या विशिष्ट वयोगटातील रेहान नावाचा कणीही मुलगा अंजनगांव सुर्जी येथे राहत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विदयमान न्यायमंचाला प्रार्थना करण्यात येते की, कृपया तक्रार मंजूर करुन तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांना खाली नमूद केल्याप्रमाणे सहाय्यता प्रदान करण्यात याव्यात.
1) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 4 यांनी मो. झयानाच्या मृत्युबाबतची क्षतीपूर्ती तसेच वैदयकीय सेवेतील अक्षम्य लापरवाही, सेवेतील गंभीर त्रुटी, आदींमुळे तक्रारकर्ते आईवडील व त्यांच्या कुटूंबियांना पोचलेल्या अतीव मानसिक वेदना, शारिरीक कष्ट, गैरसोय आदिबद्दल एकत्रितपणे रु. 10,00,000/- क्षतिपूर्ती राशी खाली दर्शविल्याप्रमाणे तक्रारकर्ते क्रमांक 1 व 2 यांना देण्याबाबतचे निर्देश देण्यात यावेत.
रु. 3,00,000/- विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून
रु. 2,00,000/- विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून
रु. 3,00,000/- विरुध्दपक्ष क्रमाक 3 कडून
रु. 2,00,000/- विरुध्दपक्ष क्रमांक 4 कडून
_____________
रु. 10,00,000/-
_____________
2) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेविरुध्दच्या तक्रारीवरुन वैदयकीय तज्ञ समितीने दिलेला अहवाल दिनांक 22-08-2010 निरस्त करण्याचे निर्देश देण्यात यावेत. 3) न्यायिक खर्चाचे रु. 2,000/- तक्रारकर्त्याला देण्यात यावेत.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 26 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची मंचातर्फे नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारकर्त्याचे संपूर्ण कथन फेटाळत जवाबामध्ये असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ते म्हणून नॅशनल फोरम फॉर कन्झयुमर एज्युकेशन यांना पक्ष बनविले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तक्रारकर्ता क्रमांक 3 हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही आणि त्यांना कोणतीही दाद हया तक्रारीमध्ये तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 पक्ष असल्यावर मागण्याचे अधिकार नाही. तक्रारकर्ते विरुध्दपक्षाचे ग्राहक होत नाही.
दिनांक 19-07-2010 रोजी दुपारी 12 चे दरम्यान रुग्णाला विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे दवाखान्यात आणण्यात आले. परंतू, ही बाब स्पष्टपणे नाकबूल की, चिकित्सा शुल्क म्हणून रु. 2,000/- ची राशी जमा केल्यावर त्याची पावती तक्रारकर्त्याला दिल्या गेली नाही. प्रथम उपचार करणे जरुरीचे असल्याकारणाने आवश्यक ते उपचार रुग्णास पाहून त्वरित विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने सुरु केले आणि अशा परिस्थितीमध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे कोणतीही रक्कम जमा केली नाही व तशी कोणतीही रक्कम जमा करण्याचे विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने तक्रारकर्त्यास कळविले सुध्दा नव्हते. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने रुग्णाची तपासणी 12.15 वाजताच केली व तो रुग्ण विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या देखरेखीखाली असल्याकारणाने तक्रारकर्त्याचे म्हणणे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने मुलाला बघितले नाही किंवा तपासणी केले नाही, ही बाब पूर्णपणे असत्य असल्याकारणाने स्पष्टपणे नाकबूल आहे. त्यास जी ट्रिटमेंट व औषधोपचार दिले व त्याची परिस्थिती त्यावेळी कशी होती हया सर्व बाबी रुग्णाचे केसपेपर्स मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत.
विरुध्दपक्ष नम्रपणे नमूद करतात की, हे प्रकरण दाखल करण्याअगोदर तक्रारकर्त्याने दिलदारखान वकिलामार्फत दिनांक 13-08-2010 रोजी नोटीस विरुध्दपक्षांना पाठविली होती. तसेच इतर पत्रव्यवहार सुध्दा झाले. त्या सर्व बाबींचा विचार केल्यावर व त्याचे अवलोकन केल्यावर असे स्पष्ट दिसते की, तक्रारकर्ते प्रत्येकवेळी वेगवेगळे कथन व बाबी नमूद करुन हया विरुध्दपक्षांनी सेवा देण्यामध्ये चूक केल्याचे सांगत आहेत.
तक्रारकर्त्याचे हे म्हणणे की, सदरहू इंजेक्शन दिल्याबाबतची नोंद दुपारी 2 वाजता ऐवजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने 4.05 वाजता केली आहे, ही बाब ज्या पध्द्तीने नमूद केली आहे. ती स्पष्टपणे नाकबूल.
रुग्णाची परिस्थिती पाहून त्याचे चेस्ट चा एक्सरे करण्यास, टायफाईडची टेस्ट करण्यास, मलेरियाची टेस्ट करण्यास सांगितले. रुग्णाची परिस्थिती पाहून विरुध्दपक्ष क्रमांक 1 ला त्याच्या अनुभवाच्या आधारे व कुशलतेच्या आधारे अशी शंका आली की, रुग्णामध्ये जे लक्षण व बाबी दिसत होत्या, त्यावरुन त्यास कॉम्पलीकेटेड मलेरिया आहे.
रुग्णाची रक्त तपासणी विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे करण्यात आली. रुग्णाचे दुपारी 4 वाजेच्या सुमारास Respiratory Rate वाढले. म्हणून विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने ऑक्सीजन सुरु केले. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने ग्लुकोमिटर दवारे रुग्णाचे ब्लड ग्लुकोज तपासले असता ते फार कमी होते. रुग्णाची गंभीर होत असलेली परिस्थिती पाहून विरुध्दपक्ष क्रमांक 1 हया निष्कर्षावर आले की, रुग्णास कॉम्प्लीकेटेड मलेरिया असू शकते. सबब, क्लिनिकल डायग्नोसिसच्या आधारे त्याकरिता आवश्यक असलेले औषधोपचार विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने त्वरित सुरु केले. त्यानंतर दुपारी 4.35 वाजताच्या सुमारास विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने विरुध्दपक्ष क्रमांक 1 ला फोनदवारे रुग्णाचे रिपोर्ट कळविले. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 चे टेलिफोनवर बोलणे रुग्णास त्वरित व योग्य औषधोपचार व्हावा हया उद्देशाने करण्यात आले. हयावरुन हे स्पष्ट आहे की, दुपारी 4.35 वाजताच्या सुमारास रुग्णास Complicated malaria with shock with thrombocytopenia with anemia असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये ज्या बाबी नमूद केल्या आहेत त्या Simple Malaria च्या बाबतीत असू शकतात. परंतु, रुग्णास Complicated Malaria असल्याकारणाने त्याकरिता आवश्यक असलेली आणि ( World Health Organisation ) जागतिक आरोग्य संघटना यांनी जारी केलेल्या मलेरिया बाबतीत जे औषधोपचार करावे लागतात ते सर्व औषधोपचार रुग्णावर करण्यात आले.
हे म्हणणे स्पष्टपणे नाकबूल की, रुग्णाला ताप चढत असून त्याच्या अंगावर चट्टे पडायला लागले होते. रुग्णाच्या अंगावर असे कोणतेही चट्टे पडलेले नव्हते.
हे म्हणणे खरे आहे की, सुयोग्य औषधोपचारासाठी रुग्णास ओझोन हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी 5.30 वाजता हलविण्यात आले. हे म्हणणे ज्या पध्द्तीने नमूद केलेले आहे ते स्पष्टपणे नाकबूल की, सर्वोपचार रुग्णालय/वैदयकीय महाविदयालयाऐवजी रुग्णास ओझोन हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा निर्णय एकतर्फी व अत्यंत चुकीचा दिसून येते. ओझोन हे अद्दयावत हॉस्पिटल असून त्यामध्ये अतिदक्षता विभाग सुध्दा आहे.
पहिला डोज दिल्यानंतर दुसरा डोज 8 तासाने देण्यात येते. केस पेपर्सवर त्याबाबतीत स्पष्टपणे बी.डी. ( दिवसात दोन वेळा ) नमूद केले आहे. ओझोन हॉस्पिटलमध्ये रुग्णाची भरती झाली, त्यावेळी विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाची देखरेख करणा-यांना हे स्पष्टपणे कळविले होते की, लॅरिनेटचा पहिला डोज दुपारी 4.05 वाजता देण्यात आलेला आहे. ओझोन हॉस्पिटलचे ट्रिटमेंट पेपरचे जर अवलोकन केले तर हे स्पष्टपणे दिसून येते की, लॅरिनेटचा दुसरा डोज रुग्णास कधीही देण्यात आलेला नव्हता.
तक्रारकर्ता ज्या बाबी नमूद करीत आहे त्या Uncomplicated Malaria बाबतीत आहेत. त्या बाबी Simple Malaria च्या ट्रिटमेंट बाबतीत आहेत. प्रकरणातील मलेरिया हा Complicated Malaria होता व त्यास आवश्यक असलेला औषधोपचार, ट्रिटमेंट इत्यादी दिलेला आहे. Clinical Observation वरुन, आणि Laboratory Test वरुन सुध्दा ही बाब स्पष्ट होते की रग्णास Severe Vivax Malaria होता. Severe Vivax Malaria ला सुध्दा Severe Falciparum Malaria हयास देणारी ट्रिटमेंट व देखरेख लागते.
हे म्हणणे सुध्दा स्पष्टपणे नाकबूल की ओव्हर डोजमुळे कदाचित Stevens Johnson Syndrome ची लागण झाल्याची शक्यता पडताळून पाहणे आवश्यक होते. जेव्हा ओव्हर डोज दिलेलाच नाही तेव्हा तसे करण्याचे काणतेही कारण नव्हते. तक्रारकर्ता तज्ञ समितीचा अहवाल अस्विकारु शकत नाही. तक्रारकर्ता त्या अहवालास विदयमान मंचासमक्ष आव्हान सुध्दा देवू शकत नाही. जर तक्रारकर्त्यास त्या अहवालाबाबत काही आक्षेप किंवा म्हणणे असेल तर त्यांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही न्युनता, कमीपणा, त्रुटी इत्यादी केलेल्या नाहीत. त्यांनी त्यांच्याकडे ज्ञान, हुशारी आणि कौशल्य इत्यादीचा वापर करुन आवश्यक असलेले सर्व उपचार केले होते. विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे 1989 मध्ये एम.बी.बी.एस. पास झाले.
सन 1996 पासून विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे अकोला येथे त्यांचा वैदयकीय व्यवसाय करीत आहेत, हयावरुन हे स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ला त्यांच्या क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव आहे व ते त्यांचे अनुभव, कुशलता, कार्यक्षमता, नम्रता इत्यादीमुळे हया भागातील एक नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केलेला आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे दवाखान्याचे सर्व कार्यभार विरुध्दपक्ष क्रमांक 1 व त्यांची सुविज्ञ पत्नी डॉ. विनिता हे प्रत्यक्षरित्या पाहतात व रुग्णांना आवश्यक त्या सेवा देतात. हयांच्या व्यतिरिक्त विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे तज्ञ नर्सेस व इतर अनुभवी कर्मचारी वर्ग आहे. हयावरुन हे स्पष्ट होते की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 हयांची फक्त शैक्षणिक पात्रताच नसून त्यांच्याकडे अनुभवी व्यक्ती सुध्दा, रुग्ण सेवा देण्यास आहेत. आपल्या कार्याचा अनुभव व अशा प्रकारच्या केसेस हाताळण्याचा पुरेपूर अनुभव असल्याकारणाने व रुग्णाची परिस्थिती पाहून आवश्यक ते उपचार विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने योग्य त्या वेळेस योग्य ती काळजी घेवून दिल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 कशाहीप्रकारे जबाबदार नाहीत.
विरुध्दपक्ष क्रमांक 3 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची मंचातर्फे नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारकर्त्याचे संपूर्ण कथन फेटाळत जवाबामध्ये असे नमूद केले आहे की, या तक्रारीत विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांना संचालकाद्वारे विरुध्दपक्ष म्हणून सामील केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 3 हे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून त्यात रुग्णांची अद्दयावत यांत्रिक उपकरणाद्वारे उचित काळजी घेतल्या जाते. तसेच रुग्णांची उचित काळजी घेण्याकरिता विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे उत्कृष्ट व प्रशिक्षित कर्मचारी आहेत. विरुध्दपक्ष क्रमांक 3 व 4 हे अतिदक्षता विभागात कार्य करतात व त्यांना सदरच्या विभागात काम करण्याचा चांगला अनुभव आहे. या प्रकरणात विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी रितसर जवाब दाखल केलेला आहे. तोच जवाब विरुध्दपक्ष क्रमांक 3 चा समजण्यात यावा. कारण विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 3 तर्फेच कार्य केलेले आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 3 चे विरुध्दचे तक्रारीत असलेली सर्व प्रकारची प्रार्थना ही नाकबूल असून अमान्य आहे. म्हणून विरुध्दपक्ष क्रमांक 3 चे विरुध्दची तक्रार ही खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 4 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची मंचातर्फे नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारकर्त्याचे संपूर्ण कथन फेटाळत अधिकच्या जवाबामध्ये असे नमूद केले आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे रुग्ण हा सायंकाळी 5 वा. 45 मि. ला भरती झाला व लगेचच विरुध्दपक्ष क्रमांक 4 कडून त्याच्यावर औषधोपचार सुरु झाला. तक्रारीतील केस पेपर्सप्रमाणे रुग्णाला बघितल्यानंतर काही रक्त तपासण्या सुचविल्या गेल्या. परंतु, रुग्णाची विपरीत शारीरिक स्थितीमुळे रक्त घेता आले नाही व रक्त तपासण्या होऊ शकल्या नाहीत. रुग्ण हा विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे उचित काळजीकरिता दाखल झाला होता. कारण विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे अद्दयावत यंत्रसामुग्री असल्याने रुग्णाची काळजी निट घेता येऊ शकते. रुग्ण हा अधिकच्या औषधोपचारासाठी विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे भरती झाला नव्हता. याबाबीतीतील तक्रारीतील मजकूर हा या विरुध्दपक्षाकडून पैसे उकडण्याचे दृष्टीने चुकीचा केलेला आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 4 हे विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे आय.सी.यु. इन्चार्ज असून ते एम.डी. मेडिसीन आहेत व तसेच त्यांनी क्रिटीकल केअर मेडिसीन मध्ये पदविका घेतलेली आहे व तसेच ते ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सिस्टिम मध्ये प्रशिक्षित आहेत. तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 4 हे सीपीआर देण्यात उत्कृष्ट आहेत. विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी तक्रारकर्त्याचे रुग्णाची त्यांच्या परीने उत्कृष्ट अशी काळजी घेतलेली आहे.
रुग्णाची परिस्थिती ही तो विरुध्दपक्ष क्रमांक 3 कडे दाखल झाल्यानंतर हळूहळू घसरत गेली. सायंकाळी 7.00 वाजता डॉ. श्री. एस.एस. काळे, चिल्ड्रेन स्पेशालिस्ट, यांचेदवारा सुध्दा रुग्णाची तपासणी झाली. त्यानंतर 8 वाजता रुग्णाला ब्राडीकार्डीयाचा अटॅक आला व त्याकरिता औषधोपचार सुरु झाले. त्यानंतर 9 वा. 10 मि. नी रुग्णाला हदयविकाराचा झटका आला तेव्हा त्याला Cardiac Massage देण्यात आला व औषधोपचार देण्यात आला. 8 वा. 20 मि. नी रुग्णाला सीपीआर देण्यात आला. एवढे सगळे करुनही रुग्णाला फायदा झाला नाही व 8 वा. 30 मि. नी रुग्ण मयत झाला.
विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी रुग्णाला यथोचित उपचार देऊन त्याची सर्वतोपरी उचित काळजी घेतलेली आहे. परंतु, रुग्णाची परिस्थिती सुधारली नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 4 हे एक डॉक्टर आहेत व ते रुग्णाला त्याचे प्राण वाचविण्याकरिता व त्यांना रोग मुक्त करण्याकरिता सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नांना यश येणे हे सर्वस्वी काळावर अवलंबून असते. विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी सेवेत कोणतीही कुचराई केली, हे म्हणणे उचित होणार नाही.
या सर्व कारणावरुन विदयमान मंचाला हे लक्षात येईल की, विरुदपक्ष क्रमांक 4 यांनी रुग्णाला वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. रुग्णाला आलेला हदयविकाराचा झटका हा तक्रारीत कथन केल्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक 4 च्या कोणत्याही कृतीमुळे किंवा कोणतीही कृती न केल्यामुळे आलेला नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 4 यांनी लॅरीनेट इंजेक्शन हे रुग्णाला दिलेले नाही. कारण सदरचे इंजेक्शन देण्यात येण्याच्या वेळेअगोदरच रुग्णाचे निधन झाले. म्हणून सदरची तक्रार ही विरुध्दपक्ष क्रमांक 4 चे विरुध्द खारीज करण्यात यावी.
का र णे व नि ष्क र्ष
सदर प्रकरणात उभयपक्षांनी दाखल केलेले दस्त, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद व उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकून व सखोल अभ्यासाअंती काढलेल्या मुद्दयांचा अंतिम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
सदर प्रकरण वैदयकीय त्रुटीपूर्ण सेवेबद्दल असल्याने वैदयकीय परिभाषा व संबंधित आजाराची वैदयकीय माहिती समजून घेऊनच सदर प्रकरणात अंतिम आदेश पारित करण्यात आला. तसेच वैदयकीय सेवेतील त्रुटी संदर्भात निवाडा देतेवेळी मा. वरिष्ठ न्यायालयाने निर्देशित केलेल्या सूचनांचा तसेच आधारभूत निवाडयांचा सदर मंचाने स्वयंस्फुर्तीने आधार घेऊन निष्कर्ष काढलेला आहे.
सबब, उभयपक्षांकडून परस्परविरोधी उपस्थित मुदयांचा उहापोह करुन सदर मंचाने खालीलप्रमाणे निष्कर्ष काढले आहे.
1) विरुध्दपक्षाने सर्वप्रथम तक्रारकर्ता क्रमांक 3 ही संस्था विरुध्दपक्षाची ग्राहक नसल्याचे म्हटले आहे. कारण तक्रारकर्ता क्रमांक 3 यांनी कोणतेही सेवा शुल्क विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांना दिलेले नसल्याने व विरुध्दपक्षाने कुठलीही सेवा तक्रारकर्ता क्रमांक 3 यांना दिलेली नसल्याने, त्यांच्यात ग्राहक व सेवा देणा-याचे नाते अस्तित्वात नाही. तसेच तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 हे सदर प्रकरणात तक्रारकर्ते असतांना तक्रारकर्ता क्रमांक 3 यांना दाद मागण्याचा अधिकार नाही.
यावर मंचाचे असे मत आहे की, सदर प्रकरणातील तक्रारकर्ता क्रमांक 3 ही नोंदणीकृत ग्राहक संघटना असली तरी तिला फक्त तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांचे वतीने प्रकरण चालविण्याचे अधिकार आहेत. परंतु, सदर प्रकरणात स्वत:ला तक्रारकर्ते म्हणून समाविष्ट करुन घेऊन विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 4 यांचेकडून दाद मागण्याचा अधिकार सदर संघटनेला नसल्याने सदर संघटनेला ग्राहक नसल्याचे कारणावरुन तक्रारकर्ते म्हणून वगळण्याचे आदेश सदर मंच देत आहे.
2) संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास करतांना व प्रत्येक दस्ताचे काळजीपूर्वक अवलोकन करतांना तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 हे स्वत:च विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 4 वर केलेल्या आरोपांवर ठाम नसल्याचे मंचाच्या निदर्शनास येते.
दिनांक 19-07-2010 रोजी बालरुग्ण मो. झयान याचा मृत्यू झाल्यानंतर सर्वप्रथम ॲड. दिलदार खान यांनी तक्रारकर्ता क्रमांक 1 च्या वतीने दिनांक 13-08-2010 ला विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना नोटीस पाठवली. ( पृष्ठ क्रमांक 209 दस्त क्रमांक ब-1 ) यातील मजकुरानुसार दिनांक 18-07-2010 रोजी मो. झयान याला बाळापूर येथील डॉ. नदीम खान यांनी ताबडतोब अकोला येथे भरती करावयास सांगितले व त्यामुळे तक्रारकर्ता क्रमांक 1 यांनी सदर बालरुग्णाला विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या दवाखान्यात भरती केले. ( परिच्छेद क्रमांक 4 पृष्ठ क्रमांक 10 ) सदर मजकुराच्या अगदी विरुध्द मजकूर तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांनी सदर दाखल केलेल्या तक्रारीत आढळून येतो. रुग्णाला पूर्वी येणारा ताप पूर्णपणे बरा झाला असून फक्त सर्दी आणि खोकला पूर्णत: बरा झाला नसल्याने बाळापूरचे स्थानिक डॉ. नदीम खान यांना दिनांक 18-07-2010 रोजी दाखवले व त्यांनी सदर केस विरुध्दपक्ष क्रमांक 1 ( डॉ. सोमानी ) ची असल्याने त्यांच्याशी चर्चा केली व विरुध्दपक्ष क्रमांक 1 त्यादिवशी बाहेरगांवी असल्याने रुग्णाला दुसरे दिवशी पाठवण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्ता पुढे असेही म्हणतो की, जर बालरुग्णाची तब्येत खरेच गंभीर असती तर त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 ची वाट न पाहता दुस-या डॉक्टरांकडे भरती केले असते.
तक्रारकर्त्याने आधी पाठवलेल्या नोटीस मध्ये विरुध्दपक्ष क्रमांक 1 व डॉ. नदीम खान यांच्यातील दूरध्वनी संभाषणाचा उल्लेख केलेला नाही तसेच त्यादिवशी विरुध्दपक्ष क्रमांक 1 बाहेरगावी होते, हे म्हणणे सुध्दा दस्तांच्या आधारे तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 सिध्द् करु शकले नाही. ॲड. दिलदार खान यांच्या नोटीस मधील मजकुरानुसार सदर बाल रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने ताबडतोब अकोल्याला जाण्याचा सल्ला डॉ. नदीम खान यांनी दिला होता तर मंचासमोरच्या तक्रारीतील मजकुरावरुन बालरुग्णांची प्रकृती मुळीच गंभीर नसल्याने त्याला दुसरे दिवशी विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या दवाखान्यात भरती केले, असे दिसून येते.
3) दुसरा विरोधातील मजकूर म्हणजे ॲड. दिलदार खान यांच्या नोटीस प्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता क्रमांक 1 यांना त्यांच्या मुलाला न्युमोनिया झाल्याचे सांगितले. व न्युमोनियाचे उपचार केले. परंतु, रुग्णाच्या रक्त तपासणीच्या अहवालानुसार सदर बाल रुग्णाला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी बेजबाबदारपणे सदर बालरुग्णाला मलेरिया झाला असतानाही न्युमोनिया ची ट्रिटमेंट दिली. ( पृष्ठ क्रमांक 211- 212 परिच्छेद क्रमांक 7 ) या मजकुराच्या संपूर्ण विरुध्द मजकूर मंचासमोरील तक्रारीत आढळतो. यातील मजकुरानुसार सदर बालरुग्णात मलेरियाचे कुठलेही लक्षण दिसत नसतांना, योग्य त्या चाचण्या न करता, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी मलेरियाचा जादा डोस सदर बालरुग्णाला दिल्याने त्याची प्रकृती ढासळत जाऊन त्याचा मृत्यू झाला.
4) सदर ॲड. दिलदार खान यांच्या नोटीस मधील संपूर्ण मजकुराच्या विरुध्द मजकूर मंचासमोरील सदर तक्रारीत आढळण्याचे कारण जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या समितीने दिलेल्या अहवालात आढळते. सदर समितीतील सर्व सदस्य त्यांच्या विभागाचे प्रमुख असून अनुभवी डॉक्टर असल्याचे मंचाच्या निदर्शनास येते.
दिनांक 13-08-2010 रोजी ॲड. दिलदार खान यांनी डॉ. सोमाणी व डॉ. शालिनी हिंगे ( सदर प्रकरणातील विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 ) यांना नोटीस पाठविली. त्यानंतर दिनांक 22-08-2010 रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीने जिल्हाधिकारी अकोला यांना आपला अहवाल सादर केला. सदर अहवालानुसार मयत बालरुग्णाला मलेरियाच झाला होता व त्याला मलेरियाचे योग्य उपचार देण्यात आले होते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्याकडून रुग्णाला वैदयकीय सेवा देतांना कोणत्याच प्रकारची दिरंगाई व त्रुटी झाली नसल्याचा निष्कर्ष सदर समितीने काढला होता. त्याचबरोबर रुग्णाच्या पालकांनी रुग्णाच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात न घेतल्याने दिनांक 18-07-2010 ऐवजी दिनांक 19-07-2010 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या दवाखान्यात भरती केल्याने रुग्णाचे रोगनिदान होण्यास व आवश्यक औषधोपचार देण्यात वेळ झाला. त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर स्वरुपाची व गुंतागुंतीची झाल्याने शर्थीचे प्रयत्न करुनही रुग्णाचे प्राण वाचवता आले नाही.
सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांच्या प्रतिनिधीने त्यांच्या संघटनेमार्फत प्रकरणातील ( तक्रारकर्ता क्रमांक 3 ) विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना दिनांक 29-11-2010 रोजी पत्र पाठवले. ( पृष्ठ क्रमांक 219 दस्त क्रमांक ब-6 ) त्यातील मजकूर येणेप्रमाणे.
On Cursory glance of the Papers relating to the said case as also the report of the Expert Committee, Prima facie It appears that there exists no case of medical negligence against you.
या मजकुरानुसार सदर ग्राहक संघटनेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार सदर संघटनेच्या व तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांच्या प्रतिनिधीला विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांच्या सेवेत त्रुटी आढळली नव्हती. वरील सर्व घटनाक्रमानंतर दिनांक 11-07-2011 रोजी सदर तक्रार मंचात दाखल झाली. तब्बल 8 महिन्यानंतर सर्व प्रथम पाठवलेल्या नोटीस च्या विपरित तज्ञांच्या समितीच्या अहवालातील निष्कर्षाचा आधार घेऊन प्रथम नोटीस शी संपूर्ण विसंगत तक्रार तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत मंचात दाखल केल्याचे मंचाच्या निदर्शनास आले आहे.
5) तक्रारकर्ता त्यांच्या तक्रारीत पुढे असे म्हणतो की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने जवळ जवळ 2 वाजता दिलेल्या Inj. Larinate 20 mg. IV stat ही नोंद 4.05 वाजता केलेली आहे व लगेच 6 वाजता विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या आग्रही निर्देशानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 3 व 4 यांचेकडे Inj. Larinate ( Artesunate ) चा 25 mg. चा अतिरिक्त डोस रुग्णाला देण्यात आला. तसेच दिनांक 19-07-2010 च्या दुपारी 2 पासून ते संध्याकाळचे 5.30 वाजेपर्यंतच्या सर्व नोंदी रुग्णाच्या मृत्यूनंतर छदमीपणाने केल्याचेही तक्रारकर्त्याने म्हटले आहे.
वरील सर्व आक्षेप सिध्द् करणारे कुठलेही दस्त वा पुरावे तक्रारकर्त्याने मंचासमोर दाखल केलेले नाही. या आक्षेपावर विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे असे म्हणणे आहे की, दुपारी 4 च्या सुमारास रुग्णाला धाप लागली होती. ( Respiratory Rate वाढला ) म्हणून विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने ऑक्सीजन सुरु केले. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने ग्लुकोमिटर दवारे रुग्णाचे ब्लड ग्लुकोज तपासले असता ते फार कमी होते. रुग्णाची गंभीर होत असलेली परिस्थिती पाहून विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे रुग्णास Severe, Complicated Malaria असल्याच्या निष्कर्षाप्रत आले व Clinical Diagnosis च्या आधारे आवश्यक उपचार त्वरित सुरु केले.
तक्रारकर्त्याच्या सदर आक्षेपाच्या संबंधित दस्ताची पाहणी केली असता दिनांक 19-07-2010 रोजी 4 वाजता 20 mg. चा Larinate चा डोस दिल्याची नोंद मंचाला दिसून येते. ( पृष्ठ क्रमांक 67 दस्त क्रमांक अ-16 ) त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, ओझोन हॉस्पिटलमध्ये 6 वाजता लगेच 25 mg. चा अतिरिक्त डोस रुग्णाला देण्यात आला. परंतु, तशी कुठलीही नोंद ओझोन मधील सदर रुग्णाच्या केस पेपर वर आढळत नाही. दस्त क्रमांक अ-8 मधील पृष्ठ क्रमांक 35 वर Larinate 25 mg BD 11 अशी नोंद आढळते.
परंतु, सदर रुग्ण डॉ. सोमाणींच्या दवाखान्यातून आल्याने रुग्णाची परिस्थिती व डॉ. सोमाणी ( विरुध्दपक्ष क्रमांक 1 ) ने सुचविलेल्या व दिलेला औषधोपचार याची नोंद Case History म्हणून घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णाला 25 mg. चा अतिरिक्त जादा डोस दिला, हा तक्रारकर्त्याचा आक्षेप ग्राहय धरता येणार नाही.
6) उभयपक्षांनी मलेरिया या आजाराबद्दल माहिती देणारे साहित्य मंचात दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने आक्षेप घेतांना असे म्हटले आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या दवाखान्यात भरती केले असता रुग्णाला ताप नव्हता व तो थंडीने कुडकुडत नव्हता म्हणजे मलेरियाचे कोणतेच लक्षणे रुग्णात दिसत नव्हते.
परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या मते तक्रारकर्त्याने जी माहिती मंचासमोर आणली ती UnComplicated Malaria ची आहेत. ( दस्त क्रमांक अ-11 पृष्ठ क्रमांक 42 ) विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या मते रुग्णाच्या गंभीर अवस्थेवरुन Severe Malaria चे निदान केले गेले. त्याच्या पृठयर्थ दाखल केलेल्या दस्तातील संबंधित मजकूर येणेप्रमाणे. ( सदर दस्तांना क्रमांक पडला नाही )
- The First Symptoms of Malaria are non specific and similar to the symptoms of a minor systemic viral illness.
- A patient may progress from having minor symptoms to having severe disease within a few hours.
- The results of parasitological diagnosis should be available within a shorttime ( less than 2 hours ) of the patient presenting. If this is not possible the patient must be treated on the basis of clinical diagnosis.
- Antimalarial treatment should, therefore, be given to children with fever ( 37.5 C ) or a history of fever and no other obvious cause.
- In all suspected cases of severe Malaria a parasitological confirmation of the diagnosis of malaria is recommended. In the absence of or a delay in obtaining parasitological diagnosis, patients should be treated for severe malaria on clinical grounds.
वरील मुद्दयांशिवाय सदर साहित्यात रुग्णाची तत्कालीन परिस्थिती, त्याचे निदान, रुग्णाचे वय, वजन व त्याप्रमाणात ठरणारी औषधाची मात्रा याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
Artesunate ची मात्रा 2.4 7) सदर तक्रारीत रुग्णाच्या शरीरावर उठलेल्या लाल चटटयांची नोंद विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने घेतली नसल्याचा आक्षेप तक्रारकर्त्याने घेतला आहे. परंतु, तसा कुठलाही सकृत दर्शनी पुरावा तक्रारकर्त्याने मंचासमोर आणलेला नाही. तसेच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शवविच्छेदनाचा आग्रह तक्रारकर्त्याने धरला नाही. सदर शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्युचे कारण व रुग्णाच्या शरीरावर चट्टे असल्याचा खुलासा झाला असता. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक 3 व 4 यांनी दिलेला मृत्यू दाखला व त्यात नमूद केलेल्या कारणावर ही तक्रारकर्त्याने आक्षेप न घेता मौन बाळगल्याचे मंचाला दिसून येते. वरील सर्व घटनांचा आढावा घेता तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 हे स्वत: संभ्रमित असल्याचे व वारंवार आपले बयान/निवेदन बदलत असल्याचे मंचाच्या निदर्शनास येते.
8) तक्रारकर्ता क्रमांक 1 ने विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचे विरुध्द फौजदारी प्रकरण अकोला न्यायालयात दिनांक 17-02-2011 रोजी दाखल केले होते. त्याचा अंतिम आदेश दिनांक 19-01-2015 रोजी पारित झाला.
सदर आदेशाची प्रत मंचात दाखल केली आहे. परंतु सदर दस्ताला क्रमांक पडलेला नाही. सदर आदेशानुसार जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या समितीच्या अहवालाचा आधार घेऊन विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना दोषमुक्त केल्याचे दिसून येते.
सदर फौजदारी प्रकरण न्यायालयात सुरु असतांना न्यायालयाने दोन्ही बाजुकडील साक्षीदार, पुरावे, कागदपत्र, तसेच अनेक छोटया मुद्दयांची बारकाईने तपासणी केलीच असणार, परंतु, तेवढा सविस्तर तपास करणे, सदर मंचाच्या संक्षिप्त प्रक्रियेमुळे शक्य नाही. तरी ही या मंचासमोर दाखल असलेले दस्त व उभयपक्षांचा युक्तीवाद यांचा सारासार बुध्दीने विचार करुनच मंचाने निष्कर्ष काढले आहे.
9) सदर तज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालाच्या खरेपणाबद्दल व नि:पक्षपातीपणावर तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे व त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने जो न्यायनिवाडा दाखल केला. त्यानुसार (III (2010) CPJ (SC) Lodjsm Tsp V. nikhil Super Speciality Hospital & Anr.) Expert Evidence was not necessary to prove Medical negligience असा निष्कर्ष काढलेला दाखवला आहे. परंतु, त्या प्रकरणातील तथ्ये सदर प्रकरणाला लागू होत नाही. त्या प्रकरणात कोणत्याही तज्ञांच्या मताशिवाय व मदतीशिवाय सदर गुंतगुंतीचे प्रकरण निकाली काढण्यास मंचाने नकार दिला होता. परंतु, सदर मंचासमोरील प्रकरणात अगोदरच तज्ञाचा अहवाल दाखल केलेला असतांना सदर मंच तो अहवाल दुर्लक्षित करु शकत नाही. तसेच सदर अहवाल चुकीचा असल्याचा सिध्द् करणारा दुस-या तज्ञांचा अहवाल तक्रारकर्त्याने मंचासमोर आणलेला नाही. सदर म्हणण्याच्या पृष्ठयर्थ मंचाने स्वयंस्फुर्तीने मा. राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिवाडयाच्या आधारे घेतला आहे.
2014(4) CPR 398 (NC) PC Haridasan Hari Vs. Lourdes Hospital, represented by Director, Panchalam and Ors. यानुसार Allegation of Medical Negligence must be proved by cognet evidence. त्यामुळे तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांनी केवळ तोंडी आरोप विरुदपक्ष क्रमांक 1 ते 4 यांच्यावर केले असल्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 4 यांचा सेवा देण्यातला बेजबाबदारपणा व सेवेतील त्रुटी पुराव्यानिशी मंचासमोर सिध्द् करण्यात तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 अपयशी ठरले आहेत.
10) तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांचे म्हणण्यानुसार सदर बालरुग्णाला ( मो. झयान ) ओझोन मध्ये भरती करुन घेतल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे ओझोन मध्ये आले व Complicated Malaria with shock हया त्यांनी केलेल्या निदानानुसार आतापर्यंत ते देत असलेल्या औषधोपचारात बदल न करता त्यांच्या सल्ल्यानुसारच रुग्णाची ट्रिटमेंट चालू ठेवण्याचा आग्रह केला व स्वत: जातीने रुग्णाजवळ हजर राहून आतापर्यंत देत असलेला औषधोपचार तसेच Injection Larinate (Artisunate ) चा 25 mg. चा अतिरिक्त डोसही निश्चितपणे दिल्या जात आहे, त्याची प्रत्यक्ष खातरजमाही त्यांनी केली. यावर विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, लॅरिनेटचा 25 mg चा डोस ओझोनमध्ये दिला गेला नाही. ओझोनमध्ये भरती झाल्यावर सदर हॉस्पिटलमध्ये रुग्णाची देखरेख करणा-यांना लॅरिनेटचा पहिला डोस दुपारी 4.05 वाजता देण्यात आल्याचे स्पष्टपणे कळवले होते व रुग्णाच्या केसपेपरवर तसे नमूदही केले आहे. ( BD II दिवसात दोन वेळा ). यावर मंचाचे असे मत आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी रुग्णाला ( मो. झयान ) अधिक उपचारासाठी दुस-या दवाखान्यात ऑक्सीजन व ॲम्बुलन्स द्वारे स्वत: दाखल केल्यानंतरही ( दस्त क्रमांक अ-16 पृष्ठ क्रमांक 69 5.30 pm वाजता सदर नोंद आहे. ) विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने स्वत:ची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रमांक 3 व 4 वर ढकललेली नाही तर स्वत: जातीने हजर राहून रुग्णावर होत असलेल्या उपचारावर देखरेख ठेवली. विरुध्दपक्ष क्रमांक 1 च्या सदरच्या कृतीचा विपर्यास तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांनी केलेला दिसून येतो. यासंबंधी मंचाने स्वयंस्फूर्तीने मा. राष्ट्रीय आयोगाच्या निवाडयाचा आधार घेतला.
2014(2) CPR 340 (NC) Smt. Vidya Devi Vs. Dr. (Mrs.) Jatinder Chaddha MBBS MD (Gynae) & Anr. यानुसार Doctor who used her best professional skill & knowledge & took due care & caution to treat complainant cannot be held guilty of medical negligence
11) त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्रमांक 2 ( डॉ. शालीनी हिंगे ) यांनी दिलेल्या दोन रिपोर्टमधील तफावतीबद्दल तक्रारकर्त्याने आक्षेप घेतला व तशा रेहान नावाचा दुसरा रुग्णच अस्तित्वात नसल्याचे म्हटले आहे. सदर दोन रिपोर्टमधील तफावतीबद्दल विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी जवाबात खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे तज्ञ समिती समोर त्यांनी पुरावा व बयान दिले आहे. तसेच फौजदारी प्रकरणातही सदर मुद्दयावर झालेल्या चौकशीत विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी आपले म्हणणे मांडले. सदर तज्ञ समितीने व फौजदारी प्रकरणात न्यायालयाने विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचे म्हणणे ग्राहय धरुन त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचा खुलासा सदर मंच ग्राहय धरत आहे.
12) सदर आदेश जाहीर करतांना केवळ वैदयकीय तज्ञ समितीच्या अहवालाचा आधार न घेता तक्रारकर्त्याच्या प्रत्येक आक्षेपाचा उहापोह मंचाकडून करण्यात आला व प्रत्येक मुद्दयांचा सर्वंकष व सर्व बाजुने विचार करण्यात आला.
सबब वरील सर्व कारणांचा सारासार विचार केला असता तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याने सदर तक्रार खारीज करण्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. सबब, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 5 यांचेवरील आरोप सिध्द् न झाल्याने सबळ पुराव्याअभावी सदर तक्रार खारीज करण्याचे आदेश सदर मंच देत आहे. न्यायीक खर्चाबद्दल कुठलेही आदेश नाही. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
अं ति म आ दे श
- तक्रारकर्ता क्रमांक 3 ही विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 5 यांची ग्राहक नसल्याचे घोषित करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 5 यांचेवरील आरोप सिध्द् न झाल्याने सबळ पुराव्याअभावी सदर तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- न्यायीक खर्चाबद्दल कुठलेही आदेश नाही.
- उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.