श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 15 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार या 83 वर्षांच्या वयोवृध्द महिला आहेत. त्यांच्या हाताची बोटे थरथरतात अशी व्याधी होती. जाबदेणार डॉक्टरांनी दैनिक सकाळ मध्ये अर्पण हॉस्पिटल शुश्रूषा केंद्र अधिक वृध्दाश्रमची नियमितपणे जाहिरात देत होते. त्या जाहिरातीत बेडसोअर्स, अॅक्सिडेंटल, पॅरालिसिस, कॅन्सर, बेड पेशंट्स, कोमा, अपंग, मतिमंद व इतर सर्व रुग्णंसाठी [फिजिओ + प्रशिक्षण ] सोय असे नमूद केलेले होते. तक्रारदारांनी जाबदेणारांची वरील जाहिरात पाहून रुपये 23,400/- चेकने भरले व रुपये 10,000/- कॅश अॅडमिशनच्या वेळी भरले. असे एकूण रुपये 33,400/- प्रवेशाकरिता भरले. तक्रारदार दिनांक 15/10/2010 ते 30/11/2010 पर्यन्त जाबदेणार यांच्या वृध्दाश्रमात होत्या. त्या रकमेचा तपशिल खालीलप्रमाणे-
A] अॅडमिशन फी रुपये 3,000/-
B] मेडिसिन रुपये 1370/-
C] लॅबोरेटरी टेस्ट रुपये 600/-
D] अदर चार्जेस रुपये 2655/-
E] टी व्ही सेट इन्ट्राकॅथ आर एल रुपये 196/-
F] At pur 25 [6 स्ट्रीप्स] रुपये 390/-
G] एक्सरे व सोनोग्राफी रुपये 1450/-
H] अॅम्ब्युलन्स रुपये 1200/-
I] बी एस एल रुपये 350/-
J] बोर्डींग चार्जेस रुपये 13647/-
--------------
एकूण रुपये 24858/-
तक्रारदार पुढे असे म्हणतात की वृध्दाश्रमात प्रशिक्षित नर्सेस नव्हत्या. जाबदेणा-यांनी लॉजींग चार्जेस म्हणून रुपये 8000/- हे जास्तीचे घेतलेले आहेत. दही व दुधाची जास्तीची रक्कम घेतली. वृध्द लोकांसाठी दही दुधाचाच आहार असतो. परंतू त्याचे वेगळे चार्जेस जाबदेणा-यांनी आकारले. एक्सरे, सोनोग्राफी, कॅथेटर, आय व्ही सेट, मेडिसिनची रक्कम सुध्दा आकारली. या बाबतचे स्पष्टीकरण किंवा बिले दिलेली नाहीत. अॅम्ब्युलन्स चार्जेस आकारणी केली परंतू अॅम्ब्युलन्स मध्ये बसवून नुसतेच फिरवून आणले. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नेले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी दिनांक 30/11/2010 रोजी वृध्दाश्रम सोडला. जाबदेणारांकडे रक्कम मागितली असता जाबदेणारांनी फक्त रुपये 8542/- चा चेक तक्रारदारांना दिला. तोही खात्यात रक्कम नाही म्हणून परत आला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रुपये 8542/-, एक्स्ट्रा चार्जेस रुपये 5750/-, चेक अनादरीत झाला म्हणून नुकसान भरपाईपोटी रुपये 17084/-, तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- व नुकसान भरपाईपोटी रुपये 5000/- एकूण रुपये 38,376/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने दिनांक 31/10/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांची जाहिरात दाखल केली. अर्पण हॉस्पिटल शुश्रूषा केंद्र अधिक वृध्दाश्रम तसेच वेगवेगळया आजाराच्या पेंशंट्स साठी [फिजिओ + प्रशिक्षण ] ची सोय असे त्या जाहिरातीत नमूद केलेले आहे. तक्रारदारांनी जाबदेणारांना रुपये 33,400/- दिले असल्याबद्यल डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन वर लिहून दिलेले आहे. तसेच रुपये 23,400/- ची अर्पण मेडिकल अॅन्ड वेलफेअर फाऊंडेशन, अर्पण हॉस्पिटल शुश्रूषा केंद्र यांची दिनांक 15/10/2010 ची पावती पण आहे. तक्रारदार दिनांक 15/10/2010 ते 30/11/2010 पर्यन्त जाबदेणार यांच्या वृध्दाश्रमात राहिल्या. मात्र जाबदेणारांनी तक्रारदारांना फक्त रुपये 8542/- चा चेक परत केला. तोही ‘Not arrange for’ या बँकेच्या शे-यासहित परत आला. जाबदेणारांच्या दिनांक 30/11/2010 च्या डिसचार्ज कार्ड वर त्यावर डिसचार्ज कार्ड लिहीलेले नाही परंतू हिशोब लिहून दिलेला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार अदर चार्जेस या नावाखाली दुध रुपये 510/-, दही रुपये 45/-, डायपर रुपये 2100/-, सोनोग्राफी रुपये 750/-, आर एल रुपये 55/-, इन्ट्रा कॅथ रुपये 83/-, आय व्ही सेट रुपये 58/-, अॅम्ब्युलन्स चार्जेस रुपये 1200/- नमूद केलेले आहे. तक्रारदार दिनांक 15/10/2010 ते 30/11/2010 पर्यन्त जवळजवळ दीड महिना जाबदेणार यांच्या वृध्दाश्रमात राहिल्या होत्या, त्या दीड महिन्याच्या कालावधीसाठी ही आकारणी करण्यात आलेली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार हे चार्जेस जास्तीचे आहे. परंतू दीड महिन्याच्या कालावधीसाठी अॅम्ब्युलन्स चार्जेस वगळता इतर चार्जेस योग्य आहेत असे मंचाचे मत आहे. अॅम्ब्युलन्स चार्जेस बद्यल जाबदेणारांनी पावती दिलेली नाही. किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स नेली तिथे कुठली तपासणी केली याबद्यलचे प्रिस्क्रिपशन / माहिती दिलेली नाही. त्यामुळे अॅम्ब्युलन्स चार्जेस योग्य नाहीत असे मंचाचे मत आहे. इतर सोनोग्राफी, आर एल, इन्ट्रा कॅथ, आय व्ही सेट यांची आकारणी करण्यात आल्याचे दिसून येते. बोर्डींग चार्जेस मध्ये या चार्जेसचा समावेश केलेला नाही असे तक्रारदार म्हणतात. जाबदेणारांनी निरनिराळया चाचण्या केलेल्या असल्यामुळे त्यांचा बोर्डींग चार्जेस मध्ये समावेश होऊ शकत नाही. तसेच तक्रारदार हया दिनांक 30/11/2010 नंतर जाबदेणारांचा वृध्दाश्रम सोडून गेल्या त्यामुळे उर्वरित रक्कम त्यांनी जाबदेणारांकडे मागितली त्यावेळी जाबदेणारांनी फक्त रुपये 8542/-चा चेक तक्रारदारांना दिला. त्यासाठी हिशोब सुध्दा जाबदेणारांनी दिलेला आहे. त्या हिशोबामधील फक्त अॅम्ब्युलन्स चार्जेस जास्तीचे आकारलेले आहेत असे मंचाचे मत आहे. जाबदेणारांनी तक्रारदारांना दिलेला रुपये 8542/- चा चेक ‘Not arrange for’ या बँकेच्या शे-यासह परत आला. तक्रारदार हया जेष्ठ नागरिक असून जाहिरातीप्रमाणे जाबदेणार यांच्याकडे त्यांना योग्य ते उपचार फिजीओ थेरपी आणि शुश्रुषा मिळेल असे वाटले होते. परंतू जाबदेणार यांनी ती दिली नाही. ही त्यांच्या सेवेतील त्रुटी दिसून येते. त्यामुळे तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई रक्कम रुपये 2000/- मिळण्यासाठी पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच जाबदेणार यांनी तक्रारदारांना अॅम्ब्युलन्स चार्जेस पोटी रुपये 1200/-, तसेच अनादरीत धनादेशाची रक्कम रुपये 8542/- 9 टक्के व्याजासह दिनांक 3/12/2010 पासून, नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावेत असा आदेश देतो.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 8542/- 9 टक्के व्याजासह दिनांक 3/12/2010 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना अॅम्ब्युलन्स चार्जेस रुपये 1200/-, नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
[4] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.