निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार ही पर्यवेक्षिका या पदावर एकात्मिक बालविकास योजना ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे कार्यरत आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 5 हे डॉक्टर आहेत. अर्जदार यांना ऑगस्ट, सप्टेंबर-2008 मध्ये पाठदुखीचा खुप त्रास होऊ लागला तसेच चालतांना व इतर अवयवांमध्ये सुध्दा अतिशय त्रास होत असे त्यामुळे तिने गैरअर्जदार 1 यांच्याशी संपर्क साधला. गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास विविध प्रकारच्या वैदयकीय तपासण्या करण्यासाठी पाठविले. त्यानंतर गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास लॅमनिकरोनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. गैरअर्जदार 2 व 3 यांच्या जवळ लॅमनिकरोनी ऑपरेशन करावयाची पात्रता असल्याने गैरअर्जदार 1 यांनी त्यांच्या हॉस्पीटलमध्ये दिनांक 03/011/2008 रोजी अर्जदारावर शस्त्रक्रिया केली. अर्जदार गैरअर्जदार 1 यांच्या दवाखान्यामध्ये दि. 03/11/2008 ते 11/11/2008 या तारखेपर्यंत अंतररुग्ण म्हणून उपचार घेत होती. गैरअर्जदार यांनी रुग्णालयातून सुट्टी केल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे औषधोपचार घेवून सुचनांचे पालन केले परंतू अर्जदारास अतिशय शारीरिक त्रास होवू लागला. अर्जदारास उलटया होणे, चक्करा येणे तसेच चालण्यास किंवा उभे राहण्यास सुध्दा असमर्थता होती. अर्जदार ही शासकीय कर्मचारी आहे तिला नेहमी शासकीय दौ-यावर जावे लागते परंतू या प्रकरणाच्या शारिरीक त्रासामुळे ती तिचे कर्तव्य निभावण्यास असमर्थ ठरु लागली. त्यामुळे अर्जदार हिने गैरअर्जदार 4 यांच्याशी संपर्क साधून त्यांचा वैदयकीय सल्ला घेतला. गैरअर्जदार 4 यांनी अर्जदाराच्या विविध वैधकीय चाचण्या केल्या व गैरअर्जदार 2 व 3 यांनी चुकीचे व निष्काळजीपणाने ऑपेशन केल्यामुळे पायोजेनिक मेनन जॉयंटीस झाला असे सांगितले. अर्जदारास गैरअर्जदार 4 यांच्या रुग्णालयात ता. 19/12/2008 ते 30/12/2008 या कालावधीसाठी आंतररुग्ण म्हणून दाखल व्हावे लागले. तसेच तिला अतिशय जास्त प्रमाणात औषधी घ्यावी लागली. गैरअर्जदार 4 यांनी अर्जदारास गैरअर्जदार 5 यांच्याकडे पाठवले. गैरअर्जदार 5 यांनी अर्जदारावर पारशीयल एल-4 लॅकनिकटोनी ऑपरेशन केले. गैरअर्जदार 2 व 3 यांनी अर्जदारावर ऑपेरशन व्यवस्थित केले असते तर अर्जदारास पायोजनिक मेनन जायटीस झाले नसते व तिला पारशियल एल-4 लॅमनिकटोनी ऑपरेशन करावे लागले नसते. यावरुन गैरअर्जदार 2 व 3 यांनी अर्जदारावर ऑपरेशन करतांना अपेक्षित असलेली काळजी व कुशलता दाखविली नाही. गैरअर्जदार 1 यांनी अर्जदाराकडून वैदयकीय फिस व ऑपरेशनचा खर्च म्हणून रक्कम रु. 28,103/- घेतलेले आहेत त्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदार 1 यांची ग्राहक आहे. गैरअर्जदार 2 व 3 यांनी अर्जदारावर केलेल्या ऑपरेशनमध्ये वैदयकीय निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला आहे त्यामुळे अर्जदारास मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास झालेला आहे. त्या त्रासाबद्दल अर्जदाराने नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 4,00,000/- ची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे. गैरअर्जदार 4 व 5 हे औपचारिक पार्टीज आहेत. गैरअर्जदार 4 यांनी सांगितल्याप्रमाणे अर्जदारास गैरअर्जदार 1 यांनी चुकीचे व निष्काळजीपणाने आणि हलगर्जीपणाने ऑपरेशन केले असे नांदेड येथे लक्षात आलेले असल्याने नांदेड मंचास तक्रार चालविण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळ अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडून नुकसान भरपाई रक्कम रु. 4,00,000/- मिळवून दयावी तसेच तक्रारीचा खर्च रु.10,000/- गैरअर्जदार 1 ते 3 यांच्याकडून वसूल करुन देण्यात यावा अशी विनंती अर्जदार यांनी केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार 1 हे अॅड. मारोतीराव पुंड यांच्या मार्फत तक्रारीमध्ये हजर झाले. गैरअर्जदार 2 व 3 यांना पाठवलेली नोटीस सुचना दिली, नोटीसची मुदत संपली नोटीस परत या शे-याने परत आलेली आहे. गैरअर्जदार 4 यांनाही मंचातर्फे पाठवलेली नोटीस दि. 03/07/2012 रोजी परत आलेली आहे. गैरअर्जदार 5 यांच्या नोटीसचा अहवाल प्राप्त असतांनाही गैरअर्जदार 5 हे तक्रारीमध्ये हजर झालेले नाहीत. गैरअर्जदार 2 ते 5 यांना नोटीसची बजावणी होवूनही तक्रारीमध्ये हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा युक्तीवादाचा आदेश पारीत करण्यात आला.
4. गैरअर्जदार 1 यांनी प्रकरणात हजर होवूनही आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी पुराव्या कामी शपथप व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
5. अर्जदार यांनी दाखल केलेले गैरअर्जदार 1 नवजिवन हॉस्पीटल यांचे डिस्चार्ज कार्डावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार यांच्यावर गैरअर्जदार यांच्या हॉस्पीटलमध्ये गैरअर्जदार 2 व 3 यांनी पारशियल एल-4 लॅमनिकटोनी हे ऑपरेशन केलेले असल्याचे दिसून येते. त्यासाठी अर्जदार ही गैरअर्जदार यांच्या हॉस्पीटल मध्ये दि. 03/11/2008 ते 11/11/2008 या कालावधीमध्ये आंतररुग्ण म्हणून उपचार घेत होती. अर्जदार यांनी तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांनी केलेल्या ऑपरेशनमुळे अर्जदाराच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न होता अर्जदारास अतिशय त्रास झालेला असल्याचे नमूद केलेले आहे. त्यासाठी अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार 4 यांच्या रुग्णालयात दिनांक 19/12/2008 ते 30/12/2008 या कालावधीमध्ये उपचार घेतलेले असल्याचे परि. क्र. 5 मध्ये नमूद केलेले आहे. त्यासाठी अर्जदाराने कागदपत्र क्र. 5 दाखल केलेले आहे. कागदपत्र क्र. 5 चे अवलोकन केले असता अर्जदार ही आश्विनी हॉस्पीटल अँड रमाकांत हार्ट केअर सेंटर या हॉस्पीटलमध्ये ता. 19/12/2008 ते 30/12/2008 या कालावधीसाठी भरती असल्याचे स्पष्ट होते. अर्जदार यांनी तक्रारीमध्ये गैरअर्जदार 4 म्हणून डॉ. मनिष कत्रुवार, डॉ. कत्रुवार हॉस्पीटल नांदेड यांना पक्षकार बनवलेले आहे. यावरुन अर्जदाराच्या तक्रारीतील कथन व दाखल कागदपत्रामधून अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 4 यांच्याकडे उपचार घेतलेले असल्याचे दिसून येत नाही. अर्जदार यांनी आपल्या तक्रारीतील परिच्छेद क्र. 5 मध्ये गैरअर्जदार क्र. 4 यांनी असे सांगितले की, गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदाराचे ऑपरेशन चुकीचे केल्यामुळे अर्जदारास त्रास होत आहे. परंतू अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 4 यांच्याकडे उपचार घेतल्या संदर्भात कुठलाही कागद दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्र क्र. 5 वर आश्विनी हॉस्पीटलचे डिस्चार्ज कार्ड आहे. सदर डिस्चार्ज कार्डावर क्रिटीकल केअर फिजिशियन्स व कार्डीक अप्पर स्पेशालिटी असलेल्या डॉक्टरचे नांव नमूद आहे. परंतू त्यामध्ये गैरअर्जदार क्र. 4 डॉ. मनिष कत्रुवार यांच्या नावाचा उल्लेख नाही. अर्जदार यांच्या तक्रारीतील म्हणणे की, गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी चुकीची वैदयकीय सेवा दिली असे सांगितले हे म्हणणे मंच ग्राहय धरु शकत नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांना औपचारीक पार्टी केलेले आहे व नुकसान भरपाईची रक्कम ही गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून मागितलेली आहे परंतू गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारावर चुकीचे ऑपरेशन केले ही बाब अर्जदार कागदपत्रानिशी सिध्द करु शकली नाही, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.