(घोषित दि. 24.02.2012 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
गैरअर्जदाराने निष्काळजीपणे उपचार केल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याचा मुलगा योगेश याच्या नाकाचे हाड वाढल्याने त्याने मुलास गैरअर्जदार डॉक्टरकडे तपासणीसाठी नेल्यानंतर गैरअर्जदाराच्या सल्याने जवळपास 1 महिना उपचार करण्यात आले व शेवटी गैरअर्जदाराने मुलाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्या नंतर दिनांक 10.02.2010 रोजी मुलाच्या नाकाच्या हाडाचे ऑपरेशन करण्यासाठी मुलाला गैरअर्जदाराच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. त्या नंतर गैरअर्जदाराने मुलाच्या नाकाचे ऑपरेशन केले. परंतू गैरअर्जदाराने ऑपरेशन करताना योग्य दक्षता घेतली नाही. म्हणून ऑपरेशन यशस्वी झाले नाही. गैरअर्जदाराने भूल न देता शस्त्रक्रिया केली आणि त्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला. त्यानंतर गैरअर्जदाराने कोणतीही आवश्यक उपाय योजना न केल्याने त्याचा मुलगा रात्री एक ते दीडच्या दरम्यान मरण पावला. गैअर्जदाराने निष्काळजीपणे उपचार केल्याने त्याचा मुलगा योगेश याचे निधन झाले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदाराकडून रुपये 10,00,000/- नुकसान भरपाई मिळावी.
गैरअर्जदाराने लेखी निवेदन दाखल केले. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या मुलाला त्याच्या दवाखान्यात दिनांक 10.02.2010 रोजी दाखल केले होते. तक्रारदाराने आगाऊ रक्कम रुपये 10,000/- जमा केले नव्हते. तक्रारदाराच्या मुलाच्या नाकाचे ऑपरेशन करण्यात आले हे कथन चुकीचे आहे. त्याच प्रमाणे त्याच्या मुलास भूल न देता शस्त्रक्रिया करण्यात आली व आवश्यक उपाय योजना वेळेवर केली नाही म्हणून योगेश मरण पावला हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या मुलाच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतू त्यास शस्त्रक्रिया गृहात नेले असता त्याला जो त्रास सुरु झाला त्यामुळे त्याची कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. मयत मुलाचे लहान वय लक्षात घेता शस्त्रक्रियेच्या कल्पनेने त्याला जबरदस्त धक्का बसल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे ताबडतोब त्याला बाहेर आणण्यात आले व त्यास तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. मयत योगेश याची निष्काळजीपणे शस्त्रक्रिया केल्याचा आरोप खोटा असून, तक्रारदाराचा मुलगा शस्त्रक्रिया करण्याआधीच झालेल्या गुंतागुंतीमुळे मरण पावला. त्यामुळे ही तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.तक्रारदार हे सिध्द् करु शकतो का की, गैरअर्जदाराने
त्याचा मुलगा योगेश याच्या नाकाची शस्त्रक्रिया
निष्काळजीपणे केल्यामुळे तो मरण पावला ? नाही
2.गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही
3.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 – तक्रारदाराच्या वतीने अड.बी.बी. गिराम यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदाराच्या वतीने अड. एस.बी.देशपांडे यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदाराने त्याचा मुलगा योगेश याच्या नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया निष्काळजीपणे केल्यामुळे त्याच्या मुलाचा मृत्यू झाला. या संदर्भात गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने तक्रारदाराच्या मुलाच्या नाकाची शस्त्रक्रिया केलीच नाही व तक्रारदाराचा मुलगा शस्त्रक्रिया करण्याआधीच घाबरल्याने त्यास जबरदस्त धक्का बसला व त्यास शस्त्रक्रिया न करता इतर उपचार करण्यात आले.
गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या नाकावर शस्त्रक्रिया केल्याचे अमान्य केल्यामुळे तक्रारदाराने त्याच्या मुलाच्या नाकाची शस्त्रक्रिया केल्याचे सिध्द् करणे आवश्यक होते. परंतू तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन त्याच्या मुलाच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सिध्द् होत नाही. तक्रारदाराने त्याच्या मुलाच्या मृत्यू नंतर ज्या डॉक्टरने शवविच्छेदन केले होते त्यांची साक्ष नोंदविलेली आहे. परंतू सदर साक्षीदार डॉ. सुदाम म्हेत्रे यांनी मयताच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती अशा प्रकारचे कोणतेही निवेदन केले नाही. त्याच प्रमाणे मयताच्या नाकात किंवा तोंडात रक्त आढळल्या बाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. साक्षीदार डॉ. सुदाम म्हेत्रे यांनी मयत योगेश याचा मृत्यू काही अनैसर्गिक कारणामुळे झाल्याचे देखील सांगितले नाही.
तक्रारदाराने सादर केलेले पुराव्यावरुन त्याचा मुलगा योगेश याचे निधन गैरअर्जदार डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे सिध्द् होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.