न्यायनिर्णय
(द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्य)
“HE WHO DOES NOT DENY, ADMITS”
सामनेवाले हे ठाणे येथील डॉक्टर आहेत. तक्रारदार हे ठाणे येथील वयोवृध्द आहेत. तक्रारदार सामनेवाले यांचे रुग्णालयात औषधोपचारार्थ दाखल झाले असतांना सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे झालेल्या शारिरीक इजेबाबत प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांचे कौटुंबिक डॉक्टरांचे सल्ल्यावरुन तक्रारदार सामनेवाले यांचे रुग्णालयात ईसीजी काढण्यास दि. 23/11/2007 रोजी गेले असता, सामनेवाले यांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते त्याचदिवशी रुग्णालयात दाखल झाले व सामनेवाले यांनी त्यांच्यावर हृदयरोगाचे उपचार सुरु केले. तक्रारदारांच्या पुढील कथनानुसार दि. 24/11/2007 रोजी रुग्णलयातील एका वॉर्ड बॉयने दुपारी तक्रारदाराच्या लघवीच्या जागेतून कॅथेटर खुपसली. त्यावर तक्रारदारांना खूप वेदना होऊ लागल्या. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव चालू झाला व लघवी होणेही बंद झाले. त्यावेळी रुग्णालयात कोणीही डॉक्टर हजर नव्हते. तक्रारदारांना असहय वेदना होत राहिल्याने तेथील डॉक्टरांनी रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते न थांबल्याने डॉ. साहा यांनी क्रिटी केअर रुग्णालयात फोन करुन तेथे दाखल होण्यास सांगितले. तक्रारदार दि. 24/11/2007 रोजीच सायंकाळी तेथे दाखल झाले. तेथील डॉक्टरांनी त्वरीत उपचार चालू करुन रक्तस्त्राव थांबविला. मात्र नैसर्गिकरित्या लघवी होणे बंद झाल्याने तक्रारदारांच्या पोटामध्ये छिद्र पाडून तेथून मुत्राशयात कॅथेटर टाकून लघवी काढणे चालू केले. तेथील डॉक्टरांनी तक्रारदारांना सांगितले की नैसर्गिक लघवी यापुढे कधीही होणार नसल्याने हीच व्यवस्था कायमस्वरुपी ठेवावी लागेल. क्रिटीकेअर रुग्णालयाचे दर तक्रारदारांना परवडण्यासारखे नसल्याने तक्रारदारांनी यानंतर डिव्हाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे चालू केले. तेथे आठवडाभर उपचार घेऊनही काही फरक न पडल्याने ते घरी परतले. त्यानंतरही पुन्हा त्रास होऊ लागल्याने तक्रारदार काही काळ कौसल्या रुग्णालयात दाखल झाले. तसेच हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांचेही उपचार घेतले. तरीसुध्दा तक्रारदारांची नैसर्गिकरित्या लघवी बंदच राहिली. सदर शारिरीक हानी ही सामनेवाले यांचे रुग्णालयातील कर्मचा-यांच्या निष्काळजीपूर्ण सेवेमुळे झाल्याने सामनेवालेविरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन शारिरीक अपंगत्वाबद्दल, औषध खर्चाबद्दल तसेच तक्रार खर्चाबद्दल रु. 5.95 लाख मिळावेत अशी मागणी केली आहे. यानंतर तक्रारदारांनी वेळोवेळी घेतलेल्या औषधोपचार खर्चाची बिले सादर करुन नुकसान भरपाई रु. 12 लाख मिळावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
सामनेवाले यांनी लेखी कैफियत दाखल करुन असे नमूद केले आहे की तक्रारदारांना हृदयरोगाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर दि. 23/11/2007 ते दि. 24/11/2007 या दरम्यान उपचार केले. दि. 24/11/2007 रोजी तक्रारदारांनी त्यांना लघवी होत नसल्याबाबत तसेच लघवीच्या जागी असहय वेदना होऊन रक्तस्त्राव होत असल्याची तक्रार केली. तक्रारदारांना होत असलेल्या वेदना व मोठया प्रमाणातील रक्तस्त्राव पाहून तक्रारदारांवर त्वरीत योग्य उपचार होण्यासाठी सोयीयुक्त अन्य रुग्णलयामध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना दि. 24/11/2007 रोजी डिसचार्ज दिला. त्यावेळी त्यांना कॅथेटर लावण्यात आले नव्हते. सबब, तक्रारदारांवर सामनेवाले यांचे रुग्णालयात योग्य व व्यवस्थित उपचार केले असल्याने या प्रकरणामध्ये त्यांचा कोणताही निष्काळजीपणा नाही. त्यामुळे तक्रार फेटाळण्यात यावी
तक्रारदार व सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांनी उपचारार्थ घेतलेल्या औषधाची देयके दाखल केली आहेत. सामनेवाले यांनी मात्र आपल्या कथनाच्यापृष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा इनडोअर पेशंट पेपर्स किंवा रेफरल नोटस् वगैरे दाखल केला नाही. उभय पक्षांना दोन वेळा संधी देऊनही तोंडी युक्तीवाद न केल्याने उपलब्ध कागदपत्रांआधारे प्रकरण निकालीसाठी ठेवण्यात आली. प्रस्तुत मंचाने तक्रारदार व सामनेवाले यांच्या प्लिडींगस् चे वाचन केले. तसेच तक्रारदारांवर करण्यात आलेली एस.पी. कॅथेटरची शस्त्रक्रिया याबाबत वैदयकीय माहितीचाही अभ्यास केला. त्यारुन प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतातः अ. तक्रारदारांच्या कथनानुसार दि. 23/11/2007 रोजी त्यांचे फॅमिली डॉक्टरांचे सल्ल्यावरुन सामनेवाले यांचेकडे ते ईसीजी काढण्यासाठी गेले असता सामनेवाले यांनी तक्रारदारांची तपासणी करुन त्यांना ‘अन्स्टेबल अंजायना वुइथ एलव्हीएफचा’ त्रास असल्याचे निदान करुन त्यांना आय.सी.यु. मध्ये भरती करण्याचा सल्ला दिला ही बाब सामनेवाले यांनी केसपेपरवर केलेल्या नोंदीवरुन स्पष्ट होते. तक्रारदार आयसीयुमध्ये उपाचार घेतांना त्यांना इंजेक्शन नॉक्सप्रील 40, इंजेक्शन निरमेट, ट्रायसेफ, एल्डरव्हिट वपेन्टोझ देण्यात आली.
ब. सामनेवाले यांचे कथनानुसार तक्रारदारांनी दि. 24/11/2007 रोजी लघवीच्या जागेतून रक्तस्त्राव होत असल्याची तक्रार डॉक्टरांकडे केली. तक्रारदारांची अवस्था विचारात घेऊन सामनेवाले यांनी डॉक्टर सुभेदार या शल्यचिकित्सकास तातडीने बोलविले. त्यांनी तक्रारदारांना हायर सेंटरना पाठविण्याचा सल्ला दिला त्यानुसार सायंकाळी 6 वाजता तक्रारदारांना डिसचार्ज दिला. सामनेवाले यांनी तक्रारदारास होत असलेल्या लघवीच्या जागेतून रक्तस्त्रावाच्या त्रासाबद्दलचा कोणत्याही कारणाचा उल्लेख आपल्या कैफियतीमध्ये अथवा शपथपत्रामध्ये केला नाही. तक्रारदार अन्सटेबल अँजायना या हृदयरोगावर औषधोपचार घेत असतांना, त्यांना लघवीच्या जागेतून कोणत्या कारणातस्तव अगदी मोठया प्रमाणात वेदनासहीत रक्तस्त्राव होत राहिला याचे कारण डॉक्टरांनी नमूद केले नसलेतरी तक्रारदाराने असे नमूद केले आहे की दि. 24/11/2007 रोजी दुपारी वॉर्डबॉयने तक्रारदारांच्या लघवीच्या जागेमध्ये कॅथेटर खुपसल्याक्षणी त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या व रक्तस्त्राव चालू झाला. मात्र याबाबीचा सामनेवाले यांनी दुरान्वयानेही उल्लेख केला नाही. याशिवाय, शल्यचिकित्सक श्री. सुभेदार यांनी तक्रारदारांची लघवीची जागा तपासणीअंती त्यांनी कोणते निष्कर्ष नोंद केले याबाबत कोणताही लिखित पुरावा नोंद नाहीच, शिवाय आपल्या प्लिडींगमध्येही याबाबतचे अभिप्राय नमूद नाहीत. त्यामुळे सामनेवाले यांचे वॉर्डबॉयने कॅथेटर लावतांना तक्रारदारांना झालेल्या इजेमुळे रक्तस्त्राव झाला हे कारण सामनेवाले लपवित आहेत असा प्रथमदर्शनी निष्कर्ष निघतो.
वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांना ‘अन्स्टेबल अंजायना’ या जीवघेण्या हृदयरोगावर औषध उपचार करण्यासाठी सामनेवाले यांनी दाखल करुन घेतले. सदर रोगावर औषधोपचार करतांना पेशंटला काही दिवस पूर्ण बेडरेस्ट व ठराविक औषधांचा पूर्ण कोर्स करावा लागतो किंवा अँजिओप्लास्टी-स्टेन्टींग करण्याचा सल्ला दिला जातो. प्रस्तुतप्रकरणात तक्रारदार दि. 23/11/2007 रोजी 1.30 वाजता सामनेवाले यांचे रुग्णालयात दाखल झाले व लगेचच दि. 24/11/2007 रोजी 6 वाजता तक्रारदारांना डिसचार्ज देण्यात आला. तक्रारदारांवरील हृदयरोगाचा उपचार अर्धवट सोडून इतक्या तातडीने त्यांना डिसचार्ज देण्यात आला यावरुन स्पष्ट होते की तक्रारदार यांच्या लघवीच्या जागेस गंभीर इजा झाली होती व त्यावर अत्यंत तातडीने उपचार करणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा, डिसचार्ज समरी किंवा रेफरल नोट सादर केली नाही.
ड. सामनेवाले यांनी दि. 24/11/2007 रोजी डिसजार्ज दिल्यानंतर, तक्रारदार क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे दिसून येते. या रुग्णालयात तक्रारदारांनी कोणते उपचार घेतले याबाबतची कागदपत्रे अभिलेखावर तक्रारदारांनी दाखल केली नाहीत. परंतु तक्रारदारांनी तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे क्रिटीकेअर रुग्णालयामध्ये तक्रारदारांच्या पोटामध्ये छिद्र पाडून त्याठिकाणी कॅथेटर बसवून लघवी काढण्यात आली. क्रिटी केअर मेडीकल स्टोअरमधून तक्रारदारांनी विकत घेतलेले सर्जरी ब्लेड, कॅथेटर व अन्य वस्तू याचा विचार केल्यास, त्यांच्यावर एस.पी. कॅथेटर बसविण्यात आल्याचे स्पष्ट होते. क्रिटी केअर रुग्णालय येथे तक्रारदार केवळ दि. 24/11/2007 ते दि. 25/11/2007 दरम्यान दाखल असल्याचे दिसून येते. यानंतर ते डिव्हाईन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाल्याचे स्पष्ट होते. क्रिटीकेअर रुग्णालयात तक्रारदाराच्या पोटामध्ये छिद्र करुन मुत्राशयात कॅथेटर का टाकावे लागले याचा विचार करण्यापूर्वी तक्रारदारास नेमका कोणता त्रास होता व त्यावर तक्रारदारावर कोणते उपचार करण्यात आले होते याबाबत कौशल्या हॉस्पिटलमधील डॉक्टर कणबूर यांनी तक्रारदारांना दिलेल्या प्रमाणपत्रातील तपशिलावरुन कल्पना येते. सदर प्रमाणपत्रानुसार तक्रारदारांना अॅटॉनिक ब्लॅडरचा त्रास असून डिसेंबर, 2007 पासून ते एसपी कॅथेटरवर होते. शिवाय त्यांच्यावर क्लॅपिंग एस पी कॅथेटर करुनही त्यांची नैसर्गिक लघवी होत नसल्याने, त्यांचेवर सिस्टोस्कोपी करण्यात आली होती.
इ. वर नमूद केल्याप्रमाणे क्रिटीकेअर रुग्णालयात एस पी कॅथेटर बसवावे लागले यांचे प्रमुख आणि एकमेव कारण म्हणजे तक्रारदारांनी नमूद केल्यानुसार सामनेवाले यांचे रुग्णलयातील वॉर्डबॉयने तक्रारदारांच्या लघवीच्या जागेमध्ये कॅथेटर खुपसल्यामुळे झालेली इजा ही बाब स्पष्ट होते. तक्रारदारांनी सदरील आरोप तक्रारीमध्ये सुस्पष्टपणे केला असतांना, सामनेवाले यांनी लेखी कैफियत, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद यामध्ये या आरोपाचा इन्कार कुठेही केला नाही. यासंदर्भात “He who does not deny admits it” या सुपरिचित Pleading च्या नियमानुसार, सामनेवाले हे तक्रारदारास झालेल्या उपरोक्त त्रासाबद्दल जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे.
ई. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी आपल्या कथनाच्या पृष्ठयर्थ खर्चाच्या देयकाव्यतिरिक्त अन्य कोणताही सुसंगत पुरावा दाखल केला नाही. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले यांचेवर केलेला आरोप खोडून काढण्यासाठी सामनेवाले यांनी शाब्दिकच नव्हेतर कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. वास्तविक पेशंटचे इनडोअर केसपेपर, डिसचार्ज समरी रेफरल नोटस् ही कागदपत्रे आपल्या कथनाच्या पृष्ठयर्थ अगदी सहजपणे ते दाखल करु शकले असते. परंतु केवळ संदिग्ध कैफियतीशिवाय त्यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी कोणताही डायरेक्ट पुरावा दिला नसला तरी तक्रारदारांना मोठया प्रमाणावर होणारा रक्तस्त्राव, असहय वेदना यांचे कोणतेही कारण न देता किंवा त्याबाबतच्या रेफरल नोटस् सादर न करता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना डिसचार्ज देऊन अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करण्याची त्यांची कृती ही निश्चितपणे निष्काळजीपणाची द्योतक आहे या निष्कर्षाप्रत मंच आला आहे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श
तक्रार क्र. 127/2008 अंशतः मान्य करण्यात येत आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारांवर औषधोपचार करतांना निष्काळजीपणा करुन सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याचे जाहिर करण्यात येते.
सामनेवाले यांनी तक्रारदारांना रु. 3 लाख नुकसान भरपाई व रु. 10,000/- तक्रार खर्च दि. 31/10/2015 पूर्वी अदा करावी. आदेशाचे पालन नमूद कालावधीमध्ये न केल्यास सदर रक्कम रु. 3,10,000/- दि. 01/11/2015 पासून आदेश पूर्ती होईपर्यंत 6% व्याजासह अदा करावी.
आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्क देण्यात याव्यात.
संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.