तक्रारदाराकरिता : श्रीमती श्वेता अग्रवाल, वकील
सामनेवालेकरिता : श्रीमती प्रज्ञा लादे, प्रतिनिधी वकील
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्र
तक्रारीचे संक्षिप्त स्वरूप खालीलप्रमाणेः-
सामनेवाले ही राष्ट्रीयकृत बँक आहे व तक्रारदाराच्या पतीचे बचत खाते सामनेवाले यांचेकडे आहे, ज्याचे शेवटचे पाच अंक 14437 असे आहेत. तक्रारदारांनी टाटा स्टील लि.करिता यांचे काही शेअर्स् विकत घेतले होते व तक्रारदारांना टाटा स्टील लि.हयांना त्यांचे एजंटामार्फत रक्कम रु.76,000/- अदा करावयाचे होते. तक्रारदाराचे बचत खात्यात दि.28.11.2007 रोजी रक्कम रु.39,847/- शिल्लक होते. तक्रारदारांनी त्याच दिवशी रु.36,000/- रोखीने त्या खात्यात जमा केले व तक्रारदारांच्या दुस-या खात्याचा धनादेश रु.20,000/- जमा केले. याप्रमाणे तक्रारदारांनी टाटा स्टील लि.कंपनीस देणे असलेल्या रक्कमेचा व्यवहार केला होता.
2 तक्रारदारांच्या पतीने रु.40,000/- चा व दुसरा रु.20,000/- चा असे दोन धनादेश टाटा स्टील लि.कंपनीकरिता पाठविले. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे, सामनेवाले यांनी रु.30,000/- चा धनादेश वटविला परंतु रु.40,000/- चा धनादेश वटविला नाही व तक्रारदारांस खात्यास अपुरी रक्कम आहे असे कळविले.त्यामुळे टाटा स्टील लि.कंपनीस रक्कम प्राप्त झाली नाही व तक्रारदार शेअर्सचा लाभ घेऊ शकले नाहीत व तक्रारदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे, सामनेवाले यांनी निष्काळजीपणा करुन तक्रारदारांचा धनादेश वटविला नसल्याने खात्यात पुरेशी रक्कम जमा होऊ शकली नाही व त्याबद्दलच्या सामनेवाले यांच्या कर्मचा-यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. याप्रमाणे सामनेवाले यांनी तकारदारांना त्यांच्या खात्याचे संदर्भात सोयी सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाईबद्दल रु.5,00,000/- ची मागणी केली.
3 सामनेवाले यांनी आपली कैफियत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी दि.28.11.2007 रोजी रु.36,000/- रोखीने आपले खात्यात जमा केले व रु.20,000/- चा धनादेश तक्रारदारांचे दुसरे बचत खात्यातून तक्रारदारांच्या प्रस्तुतचे बचत खाते म्हणजे 14437 यामध्ये वळती करणेकामी रु.20,000/- चा धनादेश दिला होता. परंतु त्या रु.20,000/- च्या धनादेशावरील स्वाक्षरी तक्रारदारांच्या स्वाक्षरीस मिळतीजुळती नसल्याने सामनेवाले यांच्या कर्मचा-यांनी तो धनादेश वटविला नाही व परिणामतः टाटा स्टील लि.चे एजंट यांच्या हक्कात तक्रारदारांनी जारी केलेले रु.40,000/- चा धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे वटविला नाही. याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना सोयी सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपास नकार दिला.
4 तक्रारदारांनी तक्रारीसोबत या व्यवहाराच्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे, बचत खात्याचा खाते उतारा व धनादेशाच्या प्रतीं हजर केल्या. तक्रारदारांनी प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले व सामनेवाले यांच्या कैफियतीच्या कथनास नकार दिला. सामनेवाले यांनी त्यांचे मुख्त्यारधारक यांचे शपथपत्र दाखल केले व त्या शपथपत्रांसोबत तक्रारदारांनी जो रु.20,000/- चा धनादेश आपले दुसरे खात्यातून तक्रारदारांच्या प्रस्तुतच्या खात्यात रक्कम वळती करणे कामी दिला होता त्याची प्रत हजर केली. दोन्हीं बाजूंने लेखी युक्तीवाद दाखल केला.
5 प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफियत, शपथपत्रं, कागदपत्रं यांचे वाचन केले. दोन्हीं बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीच्या निकालाकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारास दि.28.11.2007 रोजी रु.20,000/- चा धनादेश वटविण्यास विलंब करुन तक्रारदांना सोयी सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही |
2 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3 | अंतिम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारणमिमांसाः-
6 तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत तक्रारदारांचे बचत खाते क्र.14437 या खात्याचा खाते उतारा दाखल केला आहे. त्यावरील नोंदी असे दर्शवितात की, दि.28.11.2007 रोजी तक्रारदारांच्या बचत खात्यात रु.19,847/- शिल्लक होते. त्यानंतर तक्रारदारांनी दि.28.11.2007 रोजी रु.36,000/- रोखीने जमा केले व रु.300/- चा एक धनादेश दि.30.11.2007 रोजी जमा केला. याप्रमाणे, तक्रारदारांचे खात्यात रु.56,147/- जमा होती. तक्रारदारांनी टाटा स्टील लि.कंपनीकरिता रु.40,000/- चा एक धनादेश व रु.30,000/- चा दुसरा धनादेश दिला होता, त्यापैकी रु.30,000/- चा धनादेश दि.26.12.2007 रोजी सामनेवाले-बँकेने पारीत केला. परंतु रु.40,000/- चा धनादेश पारीत केला नाही. तक्रारदारांनी जो रु.20,000/- चा धनादेश, खाते क्र.14439 या खात्यामधून खाते क्र.14437 मध्ये वर्ग होणे कामी दिला होता तो धनादेश जमा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.
7 या संदर्भात सामनेवाले यांनी आपले पुराव्याचे शपथपत्रासोबत काही कागदपत्रं दाखल केली व त्यामध्ये तक्रारदारांनी दि.28.11.2007 चा रु.20,000/- चा धनादेशाची प्रत हजर केली. त्यासोबतच तक्रारदारांची नमुना स्वाक्षरीच्या कार्डाची प्रतही हजर केली. तक्रारदारांनी दिलेले दि.28.11.2007 चा धनादेश रु.20,000/- वरील स्वाक्षरी तक्रारदाराच्या स्वाक्षरीशी मिळतीजुळती नव्हती. प्रस्तुत मंचाने देखील त्या धनादेशावरील स्वाक्षरीची पाहणी केली व प्रथम दर्शनी सामनेवाले यांचे कथनामध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.28.11.2007 रोजी एक पत्र दिले होते व त्या खात्याच्या संदर्भात चर्चा करणे कामी बोलाविले होते. सामनेवाले यांनी आपले पुराव्याचे शपथपत्रात असे कथन केले की, रु.20,000/- च्या धनादेशावरील स्वाक्षरी तक्रारदारांच्या मुलाने केली होती कारण खाते क्र.14439 हे एकत्र कुटुंबाचे होते. तथापि त्यावरील स्वाक्षरी जुळत नव्हती व सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.28.11.2007 रोजी पत्र देऊन चर्चा करणे कामी बोलाविले होते ही बाब त्या पत्राच्या स्थळप्रतीवरुन दिसून येते. याप्रमाणे सामनेवाले यांना रु.20,000/- च्या धनादेशावरील स्वाक्षरीवरुन शंका असल्याने त्यांनी तक्रारदारांना चर्चा करणे कामी बोलाविले होते परंतु तक्रारदारांना ते पत्र मिळाले नाही व तक्रारदार सामनेवाले यांचेकडून खुलासा करणेकामी जाऊ शकले नाहीत.
8 सामनेवाले यांनी त्यानंतर दि.12.01.2008 रोजी रु.20,000/- चा धनादेश वटविला व ती रक्कम खात्यात जमा केली परंतु केवळ या बाबींवरुन दरम्यानच्या काळामध्ये सामनेवाले यांच्या कर्मचा-यांचा निष्काळजीपणा होता असे निष्कर्ष काढता येत नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या दि.28.11.2007 च्या रु.20,000/- च्या धनादेशावरील स्वाक्षरीबाबत शंका होती व त्यांनी तक्रारदारांना त्याबद्दल पत्र दिले होते ही बाब असे दर्शविते की, सामनेवाले यांनी जाणीवपूर्वक अथवा निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचा दि.28.11.2007 चा धनादेश वटविला नाही.
9 यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्या धनादेशाच्या संदर्भात सोयीसुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष काढणे शक्य नाही. सबब, तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई वसुल करण्यास पात्र नाहीत.
वरील विवेचनावरुन, निष्कर्षावरुन या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1 तक्रार रद्द करण्यात येते, खर्चाबद्दल आदेश नाहीत.
2 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.