तक्रारकर्त्यातर्फे वकील :- ॲड. व्ही.व्ही. शिरसाट
विरुध्दपक्षातर्फे वकील :- ॲड. बी. के. गांधी
::: आ दे श प त्र :::
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ते हे टिटवन नवीन पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला येथील रहिवाशी आहेत व व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांच्या वरील दातांमधील समोरच्या दोन दातांमध्ये खिंड ( अंतर ) असल्यामुळे त्यांनी त्यांच्या दातांचा योग्य उपचार व्हावा म्हणून व दातांमध्ये निर्माण झालेली खिंड ( अंतर ) कमी व्हावे म्हणून अकोला येथील हेडा दाताचा दवाखाना, येथील डॉ. अंचित चचडा यांच्याकडे दातांच्या योग्य उपचारासाठी तक्रारकर्ते गेले असता, डॉ. चचडा साहेबांनी, “ त्यांना योग्य उपचार पध्द्तीद्वारे तुमचे दात चांगले होतील व कोणत्याही प्रकारची खिंड राहणार नाही व आपणास कोणतीही इजा होणार नाही, ” असा सल्ला दिला. तसेच योग्य उपचार करावा असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष यांचेशी सविस्तर चर्चा करुन ₹ 15,000/- खर्च येईल, असे विरुध्दपक्ष यांनी सांगितल्यामुळे तक्रारकर्ते यांनी ईलाज करण्याचे ठरविले. तक्रारकर्ते यांच्या दातांमध्ये निर्माण झालेले ( अंतर ) खिंड कमी होईल व दातांची योग्य प्रकारे जुळवणी होईल व कोणताही त्रास होणार नाही, या उद्देशाने त्यांनी गैरअर्जदार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दिनांक 15-05-2011 रोज सुचविल्याप्रमाणे दातांचा एक्सरे काढून घेतला व दातांचा उपचार चालू केला. त्यानंतर, गैरअर्जदार यांनी तक्रारकर्ते यांच्या दातामध्ये 6 ते 7 एम.एम. इतकी जागा झाली आहे की जिचे रुपांतर भेगी किंवा खिंडीमध्ये झाले, असे सांगितले. त्यावर उपचार व उपाय म्हणून गैरअर्जदार यांनी त्यांना खालच्या जबडयामधून उजव्या बाजुचा दात काढावा लागेल, असा सल्ला दिला व त्यामुळे इतर दात आतमध्ये येवून वरील मधोमध असलेल्या दातांमध्ये निर्माण झालेले खिंड ( अंतर ) कमी होईल, असे सांगितले.
त्यानंतर गैरअर्जदार यांच्या दवाखान्यामध्ये तक्रारकर्ते यांनी दिलेल्या माहितीवरुन व अपाईटमेंट शेडल्युडप्रमाणे दातांचा उपचार करण्यासाठी गेले व उपचार चालू केला. परंतु, जस जशे उपचार चालू झाले तसा उपचाराचा फायदा न होता, दातांमधील अंतर वाढत गेले. जेव्हा तक्रारकर्त्याच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी दिनांक 07-10-2012 पर्यंत ₹ 9,500/- एवढा खर्च त्यांनी गैरअर्जदार यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना दिला. परंतु, दातांमधील भेग वाढतच आहे व खिंड कमी होण्याऐवजी जास्त झाली आहे तसेच चेह-यामध्ये नको ते बदल होत आहे व काही कारण नसतांना खालच्या जबडयामधील उजव्या बाजुचा एक दात काढण्यात आला आहे, असे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी गैरअर्जदार यांच्याशी दवाखान्यामध्ये संपर्क केला असता तक्रारकर्ते यांना गैरअर्जदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली व पुर्वीचा ठरलेले ₹ 15,000/- हा खर्च कमी आहे व येणारा खर्च निश्चित सांगता येणार नाही, असे सांगितल्यामुळे तक्रारकर्ता यांची फसवणूक झाली, असे तक्रारकर्ते यांच्या लक्षात आले. त्यामुळे जास्तीचे पैसे मागणे व काही कारण नसतांना खालच्या जबडयामधील उजवा दात काढणे व तसेच उपचाराला जास्त कालावधी लावणे, हे सर्व हेतुपुरस्सर केले आहे व ही सर्व उपचार पध्द्ती चुकीची झाल्यावरुन हे त्यांनी मोठया प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा म्हणून केलेले आहे. ही बाब अनुचित व्यापार पध्द्ती मध्ये येत असून विरुध्दपक्ष यांनी हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक केले आहे. तक्रारकर्ते यांचेवर अयोग्य उपचार झाल्यामुळे त्यांना नाहक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व जेवण करण्यास त्रास होवून त्यांचे शारिरीक नुकसान झाले आहे. तसेच तक्रारकर्ते शिक्षक व्यवसायामध्ये शिकवणी करत असतांना त्यांना बोलण्यास त्रास होवू लागला आहे. तक्रारकर्ते यांनी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल व आर्थिक नुकसानाबद्दल गैरअर्जदार यांना माहिती दिली. सबब, तक्रारकर्त्याची प्रार्थना की, तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज मंजूर व्हावा व विरुध्दपक्षाकडून जाणीवपूर्वक व हेतूपुरस्सर घेतलेली रक्कम ₹ 9,500/- एवढी रक्कम व मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून ₹ 5,00,000/- देण्याची कृपा करावी.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 05 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्षाचा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांना तक्रारकर्त्याच्या राहण्याचे ठिकाण व नोकरीबद्दल माहिती नाही. हे म्हणणे चुकीचे आहे की, गैरअर्जदार यांनी असे सांगितले की, दातामधील खिंड राहणार नाही आणि कोणताही त्रास होणार नाही. हे म्हणणे चुकीचे आहे की, तक्रारकर्त्याने सांगितल्याप्रमाणे चुकीचा उपचार केला. हे म्हणणे चुकीचे आहे की, गैरअर्जदाराने असे कळविले की, दातांमध्ये 6 ते 7 एम.एम. एवढी खिंड आहे, खालील जबडयातून दात काढावे लागेल, असा सल्ला दिला व त्यामुळे दातातील खिंड कमी होईल असे सांगण्यात आले.
हे म्हणणे चुकीचे आहे की, दिनांक 07-10-2012 पर्यंत अर्जदारांनी ₹ 9,500/- खर्च केला व गैरअर्जदारांना ही रक्कम दिली. हे म्हणणे चुकीचे आहे की, दातांतील अंतर कमी न होता वाढतच होते व चेह-यामध्ये सुध्दा बदल दिसत होता. खालील जबडयातील उजव्या बाजूला दात काढण्यासाठी कोणतेही कारण नव्हते. हे म्हणणे चुकीचे आहे की, गैरअर्जदार यांनी सांगितले की, ₹ 15,000/- पेक्षा जास्त खर्च येईल, यांचा हिशोब देता येणार नाही.
अर्जदारांनी हे लपविले की, त्यांनी तक्रार क्रमांक 131/2013 या न्यायमंचासमोर ₹ 5,09,500/- नुकसान भरपाई मिळण्यासाठी हयाच कारणासाठी पूर्वी दाखल केली होती. ही तक्रार दिनांक 30-05-2013 रोजी दाखल केली होती. विदयमान मंचाने दिनांक 19-09-2013 रोजी आदेश पारित केला आणि अर्जदार सतत गैरहजर असल्यामुळे व 07 तारखांवर न येता कोणताही तोंडी किंवा लेखी जवाब सादर न केल्यामुळे ही तक्रार खारीज करण्यात आली आणि त्यामध्ये असे नमूद करण्यात आले की, तक्रारकर्त्याला आवश्यकता वाटल्यास तो नवीन तक्रार करु शकेल.
इथे पाहण्यासारखे आहे की, ही तक्रार दिनांक 03-04-2013 रोजी दाखल केलेली आहे आणि पूर्वीचा आदेश हा न्यायमंचाने दिनांक 19-09-2013 रोजी दिलेला आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, ही तक्रार तक्रारकर्त्याने न्यायमंचाने दिलेल्या स्वातंत्र्याखाली करण्यात आलेली आहे. अगोदरची तक्रार क्रमांक 131/2013 ही खारीज करण्यात आलेली आहे. त्यामुळे, ही तक्रार खारीज करण्यात यावी. कारण ती तक्रार न्यायमंचासमोर विचाराधीन होती.
हे कळत नाही की, एकाच व्यक्तीने दोन तक्रारी वेगवेगळे क्रमांक देऊन दाखल केल्या आहेत आणि तक्रारकर्ता दोन्ही तक्रार एकाच वेळेस चालवित होता. यावरुन स्पष्ट होते की, अर्जदाराची ही कृत्ये गैरकायदेशीर या सदरामध्ये मोडते. तो सत्य तक्रारकर्ता नाही. तक्रार दाखल करण्याचा उद्देश फक्त गैरअर्जदाराची बदनामी करुन त्यांच्याकडून पैसे मिळविण्याचा आहे.
हे आश्चर्यकारक आहे की, या तक्रारकर्त्याने तक्रार क्रमांक 44/2013 या न्यायमंचासमोर दिनांक 12-03-2013 रोजी याच कारणासाठी दाखल केली. ती तक्रार अर्जदाराने परत घेतली व त्यानुसार ती तक्रार दिनांक 04-04-2013 रोजी खारीज करण्यात आली. दुसरी तक्रार दिनांक 18-06-2013 रोजी व सध्याची चालू तक्रार दिनांक 30-04-2013 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. ही तक्रार जी दाखल केली, ती पूर्वीची तक्रार क्रमांक 44/2013 परत घेण्याअगोदरच दाखल करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींवरुन असे स्पष्ट होते की, अर्जदार यांचा दृष्ट हेतू आहे आणि एकाच कारणासाठी तीन-तीन तक्रारी दाखल करणे व त्यासंबंधी उल्लेख न करता केलेली कृत्ये गैरकायदेशीर आहे. या दृष्टीकोनातून तक्रारकर्त्याची तक्रार गुणवत्तेवर विचार न करता अर्जदाराविरुध्द दंड करुन खारीज करण्यात यावी. कारण की, त्यांनी मुख्य गोष्टी लपवून ठेवल्या व त्यामुळे कोर्टाचा अर्जदाराने अवमान केलेला आहे. अशा कृत्यामुळे विरुध्द स्वरुपाचे आदेश न्यायमंचाकडून माहिती नसल्यामुळे होऊ शकले असते.
गैरअर्जदार हे शिक्षीत व नामांकित दंतचिकीत्सक म्हणून कार्य करतात. त्यांनी उच्चशिक्षण आणि उपचाराच्या पध्द्तीचे ज्ञान प्राप्त केले आहे. ते नागपूर येथे कार्यरत आहेत आणि प्रत्येक रविवारी डॉ. हेडा डेंटल हॉस्पिटल येथे ते येत असतात व त्यांनी प्राप्त केलेल्या उच्च तंत्रज्ञानाच्या उपचार पध्द्तीने मागील 06 वर्षापासून सेवारत आहेत.
अर्जदाराचा जबडा हा पुढे सरकलेला Prognathis lower jaw आढळला व वरील जबडा सामान्य होता. वरील जबडयातील दातामध्ये मोठमोठया खिंड होत्या व खालील जबडयातील खिंड कमी अंतराच्या होत्या. वरील जबडयाशी खालील जबडा मिळविण्यासाठी गैरअर्जदार यांनी तज्ञ म्हणून खालील जबडयातील एक दात हा काढावा लागेल याची माहिती दिली. अर्जदार यांनी संमती दिल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु केले.
अर्जदार हे दिनांक 15-05-2011 रोजी सुरुवातीला आले व त्यानंतर त्यांनी नियमितपणे दिनांक 17-07-2011, 31-07-2011, 28-08-2011, 18-09-2011, 23-10-2011 आणि 27-11-2011 रोजी उपचार घेतला व उपचारामुळे प्रगती दिसत होती. अर्जदारांना खालील जबडयातील प्री मोलर दात काढण्याचा सल्ला देण्यात आला व अर्जदाराने त्यासाठी संमती दिली आणि त्यांच्या संमतीमुळे तो दात काढण्यात आला. त्यानंतर, अर्जदार यांना दिनांक 25-12-2011 ला परत उपचारासाठी येण्याकरिता सांगितल्यानंतर ही ते आले नाहीत.
त्यानंतर, दिनांक 08-01-2012 व दिनांक 06-05-2012 अर्जदारांनी नियमितपणे उपचार घेतला व म्हणून दातांच्या अलायन्मेंटमध्ये फरक जाणवू लागला. दिनांक 03-06-2012 रोजी अर्जदाराने त्याच्या चेह-याविषयी चावतांना त्रास होत असल्याचे सांगितले. परंतु, तपासणीनंतर असे स्पष्ट होते की, स्वरुपात प्रगती झाली होती आणि चावण्याचा त्रास हा तात्पुरता होतो, कारण की, क्लिप लावल्या जातात. अर्जदार यांना असे सूचित करण्यात आले की, हा त्रास निघून जाईल.
त्यानंतर दिनांक 15-08-2012 रोजी पासून अर्जदार हे नियमितपणे येऊ लागले. दिनांक 02/09/2012 रोजी अर्जदाराने सांगितले की, त्यांनी दुस-या नामाकिंत अकोल्याच्या ऑर्थोडेन्टीस्ट यांचेशी संपर्क साधला होता व त्यांनी सुध्दा याच पध्द्तीचा उपचार योग्य आहे, असे सांगितले. अर्जदार हा उपचारासंबंधी समाधानी होता. त्यामुळे, अर्जदाराने नियमितपणे उपचार घेण्यासाठी अर्जदाराला सांगितले. जे ईतर ऑर्थोडेन्टिस्ट यांनी सुध्दा मान्य केले होते.
गैरअर्जदार यांनी तज्ञांना माहिती असलेले उपचार दिले व योग्य साहित्य लावण्यात आले आणि वैदयकीय पध्द्तीनुसार चांगल्यात चांगले उपचार देण्यात आले व त्यामुळे हळुहळू प्रगती सुध्दा झालेली आहे. दातांच्या स्थितीमध्ये पुष्कळशी सुधारणा झाली आहे.
गैरअर्जदार यांनी वैदयकीय विज्ञानाला ( Medical Science ) माहित नाही, असा कोणताही उपचार केला नाही. गैरअर्जदार यांनी जे उपचार केले, त्याशिवाय, दुसरा कोणताही उपचार उपलब्ध नाही. अर्जदाराने दिनांक 24-02-2013 पासून उपचार घेणे बंद केले आणि आरोप लावणे सुरु केले. नोटीसच्या उत्तरामध्ये या सर्व गोष्टी नमूद करुन अर्जदारास कळविण्यात आल्या. परंतु, असे दिसते की, अर्जदार यांची दिशाभूल झालेली आहे आणि पैसे मिळविण्यासाठी त्यांनी अशाप्रकारे आरोप केले आहेत. यामध्ये गैरअर्जदार यांची प्रतिष्ठा व नाव कमी होईल.
तक्रार खोटया स्वरुपाची असून खारीज होण्यास पात्र आहे व गैरअर्जदारास ₹ 25,000/- खर्च मिळावा. वरील सर्व माहितीवरुन स्पष्ट होते की, तक्रार बिनबुडाची व दुष्ट हेतुने आणि इतर कारणासाठी दाखल केली आहे. त्यामुळे तक्रार खारीज करुन दंड करण्यात यावा.
का र णे व नि ष्क र्ष
या प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, सदस्य, सचिव तक्रार निवारण समिती, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, अकोला यांचा अहवाल या कागदपत्रांचे अवलोकन करुन या प्रकरणात अंतिम आदेश पारित केला. कारण तक्रारकर्ते यांना युक्तीवाद करण्यास संधी देवूनही त्यांनी युक्तीवाद केला नाही. त्यामुळे, दाखल कागदपत्रांच्या आधारे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे.
तक्रारकर्ते यांनी ही तक्रार, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून दातांच्या उपचारापोटी रक्कम ₹ 9,500/- घेऊनही उपचारात न्युनता ठेवली म्हणून विरुध्दपक्षाकडून नुकसान भरपाई मिळावी, याकरिता दाखल केली आहे. तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार प्रकरण वैदयकीय समिती सर्वोपचार रुग्णालय, अकोला यांचेकडे त्यांचे मत/अहवाल मागविण्याकरिता सर्व कागदपत्रांसह मंचाने पाठविले होते. दिनांक 14-08-2015 रोजी सदर तक्रार निवारण समिती, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, अकोला यांचा अहवाल मंचाला प्राप्त झाला. त्यानुसार, त्यांनी तक्रारकर्त्याची दंतशल्य चिकित्सामार्फत तपासणी करुन, व तक्रारकर्त्याने दाखल केलेली सर्व कागदपत्र तपासून तसेच विरुध्दपक्षाकडील उपचारासंबंधीचे दस्त समितीने तपासून असे मत दिले की, तक्रारकर्त्याच्या प्रकरणात विरुध्दपक्ष दंत तज्ञाकडून कुठलीही अनियमितता व निष्काळजीपणा आढळून आलेला नाही. सदर मताच्या विरुध्दार्थी पुरावा तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची प्रार्थना मंजूर करता येणार नाही. सबब, अंतिम आदेश पारीत केला, तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
1) तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षा विरुध्दचे आरोप सिध्द् न केल्याने,
तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2) न्यायीक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारित नाही.
3) उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.