नि. 18 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 217/2010 नोंदणी तारीख – 14/9/2010 निकाल तारीख – 18/1/2011 निकाल कालावधी – 124 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ आमिन दिलावर शेख रा.कुमठे ता.कोरेगाव जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री जे.बी.यादव) विरुध्द डॉ वरदराज के.काबरा रा.पुष्पक हॉस्पीटल, कोरेगाव ता.कोरेगाव जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री तानाजीराव पवार) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे कुमठे ता.कोरेगाव येथील कायमचे रहिवासी आहेत. दि.11/6/01 रोजी अर्जदार यांचे पोटात दुखू लागले म्हणून ते जाबदार यांचे हॉस्पीटलमध्ये गेले. जाबदार यांनी अर्जदार यांची तपासणी करुन औषधोपचारास सुरुवात केली. त्यानंतर जाबदार यांचे सल्ल्यानुसार अर्जदार यांनी रक्त व लघवीची तपासणी करुन घेतली. त्यानुसार हिमोग्लोबीनचे प्रमाण 9.2 टक्के जीएम टक्के होते. त्यानंतर जाबदार यांनी अर्जदार यांच दि.14/6/2001 रोजी अपेंडीक्सचे ऑपरेशन केले. अर्जदारचे शरीरामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असतानाही जाबदारने सदरचे ऑपरेशन केले. त्यामुळे अर्जदार यांना अशक्तपणा आला. दि.17/6/2001 रोजी जाबदार यांनी अर्जदार यांना रिमोडर कीड नावाच्या दोन गोळया दिल्या. सदरच्या गोळया देणेपूर्वी जाबदार यांनी अर्जदारचे कोणतेही मेडिकल चेकअप केले नव्हते. सदरचे गोळयांमुळे अर्जदार इतर अवयांवर कोणता परिणाम होणार नाही याचा जाबदारने अभ्यास करणे आवश्यक होते. परंतु जाबदार यांनी कोणतीही काळजी न घेता, कोणत्याही तज्ञाचा सल्ला न घेता अर्जदारवर औषधोपचार चालू ठेवले. त्यामुळे अर्जदार यांना भयंकर रिऍक्शन येवू लागली व त्याचे अंगास सर्वत्र खाज सुटू लागली. अंगावर डाग पडले व डोळयामध्ये कायमस्वरुपी दोष निर्माण झाला. परंतु अर्जदार यास मलेरिया झाला असल्याचे जाबदार यांनी खोटेच सांगितले. तथापि अर्जदार यास मलेरिया झाला नसल्याचा रिपोर्ट रक्ताची तपासणी करुन उज्वला वंडकर यांनी दिला. त्यानंतर जाबदार यांनी दि.23/6/2001 रोजी अर्जदार यांना चारुलता शहा यांचेकडे ऍडमिट केले. डॉ शहा हे डोळयाचे तज्ञ नाहीत. अर्जदारचे डोळयाची दिवसेंदिवस गंभीर स्थिती होत गेली व दृष्टी निकामी होत गेली. परंतु तरीही जाबदार व डॉ शहा यांनी नेत्ररोग तज्ञामार्फत उपचार केले नाहीत. तदनंतर ऑपरेशन केलेल्या जागेवर इनफेक्शन तयार झाले. म्हणून जाबदार यांनी त्यातील पस बाहेर काढला. जाबदार यांचे औषधोपचारामुळे अर्जदारचे जीवितास धोका निर्माण झाला. तदनंतर अर्जदारचे आईने कोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली व त्यानंतर कोर्टाच्या हुकूमावरुन अर्जदार यांना शासकीय हॉस्पीटल सातारा येथे ऍडमिट केले. त्यानंतर अर्जदार यांचेवर मुंबई, हैद्राबाद येथे उपचार करण्यात आले. दोन्ही डोळयांचे ऑपरेशन करावे लागले. त्यानंतर सन 2009 व 2010 मध्ये अर्जदार जाबदार यांचेकडे उपचारासाठी गेला असता त्यांनी त्याचेवर मामुली औषधोपचार केला. अशा प्रकारे जाबदारचे चुकीचे औषधोपचारामुळे अर्जदार यास कायमचे अंधत्व आले आहे. सबब नुकसान भरपाईपोटी रु.10 लाख, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचा खर्च मिळावा यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 10 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार यांनी अतिशय काळजीपूर्वक अर्जदारचे अपेंडिक्सचे ऑपरेशन केले. ऑपरेशन करणेपूर्वी, करतेवेळी व नंतर कसलीही हयगय सामनेवालाकडून झालेली नाही. त्यानंतर संध्याकाळी अर्जदारास ताप भरला त्यासाठी रिमोडर किडटॅब्स दिल्या. सदरचे गोळया देणेपूर्वी कोणत्याही प्रकारच्या टेस्ट करण्याची पध्दत नाही. थंडी ताप येणा-या रुग्णास मलेलियावरील औषध द्यावे असे वैद्यकीय शास्त्रामध्ये म्हटले आहे. 50 टक्के रुग्ण मलेरियाग्रस्त असले तरी त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह येतो. अर्जदार हा दि.19/6/01 रोजी बरा झाला होता. परंतु त्याचे अंगावर पुरळ उठू लागल्यामुळे त्याला डॉ चारुलता शहा यांचेकडे तपासणी करण्यास जाबदार यांनी सांगितले. त्यानंतर त्याच्या डोळयातून लालसर पाणी येवू लागले. म्हणून डॉ उमेश लाहोटी यांचेकडून अर्जदारची तपासणी करुन घेतली. त्यानंतर डॉ लाहोटी यांनी अर्जदार यास पुणे येथे जाण्यास सांगितले. परंतु तसे न करता अर्जदार यांनी डॉ महाडीक यांचे सल्ल्यानुसार व कोरेगाव न्यायालयाचे आदेशानुसार मुंबई येथे उपचार घेतले. अर्जदार यांनी डॉ लाहोटी यांचे सुचनेनुसार तातडीने उपचार केले नाहीत. यावरुन त्याचेवर उपचार करण्यात नातेवाईकांनी जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केला. त्यास जाबदार जबाबदार नाही. दि.15/2/2010 रोजी अर्जदार हा जाबदारकडे उपचारासाठी आलेलाच नव्हता. त्यासंबंधीचा मजकूर खोटा आहे. जुलै 2001 पासून पुढे जाबदार यांनी अर्जदार यांचेवर कधीही उपचार केलेले नाहीत. अर्जदार यांनी जून 2001 नंतर दोन वर्षाचे आत तक्रारअर्ज दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे अर्जदारचा अर्ज मुदतीत नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री पवार यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. तसेच याकामी जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांचा दि.10/12/2010 चा अहवाल पाहिला. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. याकामी अर्जदार व जाबदारतर्फे दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्टपणे दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे सन 2001 साली औषधोपचार घेतलेले आहेत. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, सन 2001 नंतर अर्जदार यांनी पुन्हा जाबदार यांचेकडे सन 2009 व 2010 मध्ये उपचार घेतलेले आहेत. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदार यांनी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे सन 2010 मध्ये पुन्हा अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे उपचार घेतले या अर्जदारचे कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. अशा प्रकारे अर्जदार यांनी त्यांचेवर जाबदार यांनी सन 2001 मध्ये केलेल्या औषधोपचारासंबंधी प्रस्तुतची तक्रार दाखल दि.14/9/2010 रोजी दाखल केल्याचे दिसून येते. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींप्रमाणे तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षाचे आत तक्रारअर्ज दाखल करणे आवश्यक आहे. परंतु अर्जदार यांनी सुमारे 9 वर्षानंतर तक्रारअर्ज दाखल केला आहे. सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज मुदतीत नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 6. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये असे कथन केले आहे की, जाबदार यांनी औषधोपचारामध्ये केलेल्या निष्काळजीपणामुळे अर्जदार यांना अंधत्व आले. जाबदार यांनी दिलेल्या गोळयांच्या रिऍक्शनमुळे त्यांना त्रास झाला. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदार यांनी कोणताही तज्ञ डॉक्टरांचा अहवाल अथवा शपथपत्र दाखल केलेले नाही. याउलट या मे.मंचाने मा.राज्य ग्राहकवाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार प्रस्तुत प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांचे मत मागविले. जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांचा निष्कर्ष नि.17 ला दाखल आहे. सदरचे निष्कर्षानुसार अर्जदार यांचेवरील वैद्यकीय उपचारामध्ये कोणताही निष्काळजीपणा झाल्याचे दिसून आलेले नाही. अशा प्रकारे सदरचे शासकीय रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचा निष्कर्ष पाहता जाबदार यांनी अर्जदार यांचेवर उपचार करण्यामध्ये कोणताही निष्काळजीणा केलेला नाही असे या मंचाचे मत आहे. सबब अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 18/1/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |