आदेश
अर्जदार यांनी तक्रार दाखल करण्यास झालेला ४५ दिवसांचा विलंब माफ करून तक्रार दाखल करुन घ्यावी, अशी विनंती प्रस्तुत अर्जामध्ये केली आहे.
सामनेवाले यांच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे अर्जदार यांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर झाल्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांची प्रसूती सामनेवाले यांच्याकडे दिनांक २१.०६.२०१३ रोजी झाली. नवजात बालकास दोन्ही हात अर्धवट असून प्रत्येक हाताला तीन बोटे होते. स्पायनल काड वाकडा असल्याने मान वाकडी होती. बालकाची नियमित तपासणी दिनांक १८.१०.२०१३ पासून सातत्याने प्रतिमाह डा. विराज सिंगाडे, नागपूर यांच्याकडे सूरू आहे. तसेच डा. भारती मुन्दडा, चंद्रपूर यांच्याकडे फिजीओथेरीपी दिनांक ३०.११.२०१३ पासून सातत्याने सूरू आहे. अर्जदार यांनी विलंब माफी अर्ज क्र. ०६/२०१५ व ग्राहक तक्रार क्र. १२३/२०१५ दाखल केला होता. परंतु सदर विलंब माफी अर्ज व ग्राहक तक्रार मंचाच्या आर्थिक अधिकारक्षेत्रात येत नसल्याने अर्जदार यांनी विलंब माफी अर्ज क्र. ०६/२०१५ व ग्राहक तक्रार क्र. १२३/२०१५ दिनांक ०४.०८.२०१५ रोजी परत घेऊन पुन्हा प्रस्तुत विलंब माफी अर्ज व ग्राहक तक्रार दिनांक ११.०८.२०१५ रोजी दाखल केली आहे. अर्जदारास नवजात बालकाची शुश्रुषा करुन व कायद्याचे सखोल ज्ञान नसल्याने विहित मुदतीत तक्रार दाखल होऊ शकली नाही. सबब तक्रार दाखल करण्यास झालेला ४५ दिवसांचा विलंब माफ करून तक्रार दाखल करुन घ्यावी, अशी विनंती प्रस्तुत अर्जामध्ये केली आहे.
सामनेवाले यांनी तीव्र आक्षेप घेऊन अर्जदार यांनी विलंब माफी अर्ज क्र. ०६/२०१५ व ग्राहक तक्रार क्र. १२३/२०१५ दिनांक ०४.०८.२०१५ रोजी परत घेऊन पुन्हा प्रस्तुत विलंब माफी अर्ज व ग्राहक तक्रार दिनांक ११.०८.२०१५ रोजी दाखल केली आहे. मंचास, अर्जदारास मुभा देण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याने दिनांक ०४.०८.२०१५ रोजी पारित आदेशाप्रमाणे प्रस्तुत अर्ज न्यायोचित नाही. अर्जदाराच्या वादकथनानुसार तक्रार दाखल करण्यास कारण दिनांक ११.०२.२०१३ रोजी घडले असल्यामुळे दिनांक १०.०२.२०१५ रोजी मुदत संपली आहे. सदर मुदत दिनांक २१.०६.२०१३ रोजी बालकाचा जन्म झाला असल्याने दिनांक २१.०६.२०१५ पर्यंत राहणार नाही. प्रस्तुत अर्जामध्ये अर्जदार यांनी ४५ दिवसांचा विलंब झाल्याबाबत नमूद केले असले तरी प्रत्यक्षात ५ महिन्यांचा विलंब झाला आहे. अर्जदार यांनी तक्रारीस कारण घडलेली दिनांक अयोग्य नमूद केली असून सत्य वस्तुस्थिती सामनेवाले यांनी नमूद केली आहे. विलंब माफी अर्जामध्ये असत्य कथन केले असल्याने अर्जदाराणे स्वच्छ हाताने अर्ज दाखल केलेला नाही. वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत प्रस्तुत तक्रार असल्याने अर्जदाराने विहित कालमर्यादेत तक्रार दाखल करणे आवश्यक होते. मंचाला असलेल्या संक्षिप्त व मर्यादित अधिकारात, अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या कारणावरून व असत्य कथनावरून विलंब क्षमापित करणे न्यायोचित नाही. वैद्यकीय निष्काळजीपणाबाबतच्या तक्रारीमध्ये विलंब क्षमापित करणेसाठी अधिक योग्य व परिस्थितीजन्य पुराव्याची आवश्यकता असून त्याबाबत कोणताही पुरावा अर्जदार यांनी सादर केला नाही. उलटअर्थी अर्जदार यांनी झालेला विलंब अयोग्य नमूद करुन असत्य कथन शपथेवर केले आहे. सदर बाब अत्यंत महत्वाची असून अर्जदार यांनी केवळ ४५ दिवसांचा विलंब क्षमापित होणेस विनंती केली असून सामनेवाले यांनी नमूद केलेप्रमाणे ५ महिन्यामधून ४५ दिवस वगळता उर्वरित दिवसांचा विलंब क्षमापित होणेसाठी कोणताही अर्ज दाखल केला नाही. अर्जदार यांनी सदर अर्जामध्ये विलंबाबाबत परिस्थितीजन्य पुरावा सादर न केल्याने तसेच अर्जात नमूद कारण विलंब माफ करण्यास सबळ नसल्याने अर्ज खर्चासह अमान्य करावा. सबब सदर अर्ज व मूळ तक्रार अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
मंचाने अर्जदारास, अर्जदाराच्या विनंतीवरून नव्याने तक्रार दाखल करण्याची मुभा दिली असून सदर आदेश न्यायोचित आहेत. अर्जदार यांनी दाखल केलेल्या संदर्भित न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता, विलंब माफी अर्जामधील विलंबाचे कारण विचारात घेताना सादर केलेली कागदपत्रे व सत्यता महत्वाची आहे. प्रस्तुत अर्जदार यांनी नवजात बालकाच्या जन्मापूर्वी सामनेवाले यांच्याकडे शुश्रुषा घेतली असून प्रसुतीपूर्वीपासून सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा दिली आहे. सदर प्रत्येक दिवशी नवजात बालकाच्या प्रकृतीविषयी योग्य ती माहिती सामनेवाले यांनी अर्जदारास दिली आहे. त्याप्रमाणे अर्जदाराने त्याचे पालन केले आहे. नवजात बालकाच्या वाढीविषयी समयोचित माहिती सामनेवाले यांनी अर्जदारास दिली आहे. सदर माहितीप्रमाणे सामनेवाले तक्रारदारास सातत्याने सेवा सुविधा देत असल्याबाबत कागदोपत्री पुरावा आहे. सामनेवाले यांनी अर्जदारास नवजात बालकाच्या जन्मानंतर सातत्याने सेवा सुविधा दिली असल्याने अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कारण घडत आहे. सामनेवाले यांनी अर्जदारास ५ महिन्याचा विलंब झाला आहे असे नमूद केले असल्याने सामनेवाले यांनी अर्जदारास सेवा सुविधा दिली आहे, ही बाब स्पष्ट होते. विलंब माफ करण्यासाठी अर्जात नमूद कारण पुरेसे असल्याबाबत निष्कर्ष निघत असल्यास विलंब क्षमापित करणे न्यायोचित आहे, अशी न्यायतत्वे विषद केली आहेत.
सामनेवाले यांनी दाखल केलेल्या संदर्भित न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता, विलंब माफ करणेसाठी विहित मुदतीत तक्रार सादर न करण्याबाबतचे प्रत्येक दिवसाचे स्पष्टीकरण न्यायोचित कारणासह नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी सामनेवाले यांच्याकडून घेतलेली सेवा सुविधा नवजात बालकाच्या जन्मापुर्वी घेतलेली असून नवजात बालकाच्या जन्मानंतर अन्य तज्ञाकडून उपचार घेतलेले आहेत. अर्जदार यांना झालेला विलंब माफ करण्यासाठी कोणतेही सबळ कारण नसून अर्जदार यांनी अर्जात नमूद केलेले वाद्कथन विश्वासार्ह नाही. विलंब क्षमापित करण्यासाठी तक्रार दाखल करण्यास घडलेल्या दिवसापासून विलंब माफ करण्याबाबत अर्ज दाखल करण्याच्या दिनाकापर्यंत, प्रत्येक दिवशी घडलेल्या कारणाचा उल्लेख स्पष्टपणे नमूद करुन त्या प्रत्येक बाबीबाबत सबळ कागदोपत्री विश्वासार्ह पुरावा सादर करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक आहे, अशी न्यायतत्वे विषद केली आहेत.
ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतूदीनुसार विहित कालमर्यादेत तक्रार दाखल न केल्यास, झालेला विलंब क्षमापित करण्यासाठी निश्चित असलेले मापदंड विचारात घेणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी दिनांक ३०.११.२०१३ पासून सातत्याने नवजात बालकावर उपचार चालू असल्याबाबत प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच विलंब माफ होणेकामी नवजात बालकावर जन्मानंतर पुढील उपचार नियमितपणे सूरू असल्याबाबत वैद्यकीय कागदपत्रे दाखल केली आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने, व्ही. एन. श्रीखंडे वि. अनिता सेना फर्नांडीस (२०११) १ सुप्रीम कोर्ट केसेस ५३ या न्यायनिर्णयात, वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत तक्रारीमध्ये, विलंब क्षमापित करणेसाठी वैद्यकीय निष्काळजीपणा नेमक्या कोणत्या दिनाकास प्रथम झाला, ही बाब वस्तुनिष्ठ पुराव्यासह सिद्ध करणे आवश्यक नाही, असे न्यायतत्व विषद केले आहे. प्रस्तुत अर्जदार यांनी विलंब माफी अर्जामध्ये प्रथम वैद्यकीय निष्काळजीपणा, अर्जदार यांच्या कथनाप्रमाणे ४५ दिवसापुर्वी घडला असे नमूद केले असले तरी सामनेवाले यांनी सदर विलंब ५ महिन्यांचा आहे, असे वादकथन केले आहे. विलंब कालावधीबाबत उभयपक्षांनी वाद उपस्थित केला असल्याने मा. सर्वोच्च न्यायालयाने विषद केलेल्या न्यायतत्वानुसार वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत तक्रारीमध्ये तक्रार दाखल करण्यास नेमके कोणत्या दिवशी कारण घडले याबाबत ठोस पुरावा देण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केल्याने अर्जदार यांनी विलंब क्षमापित होणेसाठी नमूद केलेली कारणे न्यायोचित आहेत.
वैद्यकीय निष्काळजीपणा ही बाब सातत्याने घडणारी असून त्याबाबत तक्रार सादर करण्यास कारणही दररोज घडत आहे. अर्जदार यांनी विलंब क्षमापित होणेसाठी नमुद केलेली कारणे न्यायोचित असून विलंब क्षमापित करणे उचित आहे.
ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २४ अ (२) अन्वये तरतूदीनुसार अर्जदार यांनी विलंब क्षमापित करण्यास योग्य कारण नमूद केले असल्याने, अर्जदार यांनी सामनेवाले यांना प्रत्येकी रक्कम रुपये २०००/- या आदेशप्राप्तीपासून दिनाकापासून १५ दिवसात अदा करण्यासापेक्ष, अर्जदार यांचा तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापित करण्यात येतो.
विलंब माफी अर्ज मंजूर करुन निकाली काढण्यात आला.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)