जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ७२५/२००९
तक्रार दाखल दिनांक – १०/११/२००९
तक्रार निकाली दिनांक – २८/०१/२०१४
सौ.रेखाबाई सुनिल जाधव ----- तक्रारदार.
वय २४ वर्षे,धंदा-घरकाम
रा.बुरझड,ता.जि.धुळे.
तर्फे जनरल मुख्त्यार
श्री.सुनिल रघुनाथ जाधव
रा.बुरझड,ता.जि.धुळे
विरुध्द
(१)डॉ.उज्वला जितेंद्र घुमरे ----- सामनेवाले.
वय सज्ञान,धंदा- वैद्यकीय व्यवसाय
रा.८,शाकंभरी हॉस्पीटल,देना बॅंकेजवळ,
गल्ली नं.४,खोलगल्ली,धुळे
(२)डॉ.अनिशा समिर पाटील
वय सज्ञान,धंदा- वैद्यकीय व्यवसाय
रा.४,सुयोग नगर,वाडीभोकररोड,
ममता हॉस्पीटल,देवपूर,धुळे
(३)डॉ.समिर पाटील
वय सज्ञान,धंदा- सोनोग्रॉफी तज्ज्ञ
रा.अजिंक्य डायग्नोस्टीक सेंटर,
प्रथमेश प्लाझा,वाडीभोकररोड,देवपूर,धुळे
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.एस.डी.भट)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकिल श्री.एस.आर.वाणी)
(सामनेवाले क्र.२ व ३ तर्फे – वकिल श्री.एम.सी.जैन)
------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांनी वैद्यकिय सेवेत निष्काळजीपणा केला, म्हणून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) सौ.रेखाबाई सुनिल जाधव यांनी त्यांचे जनरल मुखत्यात म्हणून त्यांचे पती श्री.सुनिल रघुनाथ जाधव यांचे तर्फ सदर तक्रार सामनेवाले यांचे विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, सामनेवाले क्र.१ व २ हे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर आहेत व सामनेवाले क्र.३ हे सोनोग्राफी तज्ज्ञ आहेत. तक्रारदार या नोव्हेंबर, डिसेंबर २००९ च्या दरम्यान गर्भवती असल्याने त्यांनी डॉ.आर.आर. सोनवणे यांच्याकडे तपासणी केली व त्यानंतर दि.०२-०१-२००९ रोजी डॉ.मिनल खलाणे यांच्याकडे सोनोग्राफी केली. त्यामध्ये तक्रारदार यांना जुळे बाळ असल्याबाबत व त्यास धोका नसल्याबाबत नॉर्मल अहवाल दिला आहे. त्यानंतर डॉ.अनिशा पाटील यांच्याकडे तक्रारदारांनी तपासणी केली व त्यांनी पुन्हा सोनोग्राफी सामनेवाले क्र.३ यांच्याकडून करुन घेतली, त्यांनी दि.०४-०३-२००९ रोजी दिलेल्या रिपोर्ट प्रमाणे तक्रारदार यास जुळे बाळ आहे व त्यांच्या गर्भाशयाचे तोंड ३ एम.एम. ने उघडलेले आहे व दोन्ही बाळांना “माईल्ड रायझोमेलीया” या नावाची व्याधी आहे असे नमूद केले आहे. त्यानंतर सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदारांना तज्ज्ञांकडे तपासणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले क्र.१ डॉ. उज्वला घुमरे यांचेकडे दि.०८-०३-२००९ रोजी तपासणी करुन घेतली व त्याच दिवशी डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तक्रारदारांना भरती करुन घेतले. डॉक्टरांनी तक्रारदार यांना त्यांच्या बाळाच्या जीवीतास धोका आहे व कोणत्याही क्षणाला तक्रारदारांना प्रसूती होऊ शकते, होणा-या बाळांच्या हाडांची वाढ व्यवस्थित राहणार नाही, बाळांची उंची साधारण बाळांच्या उंचीपेक्षा कमी राहिल असे सांगितले व तातडीने बाळंतपण करुन घेण्यास सांगितले. वास्तविक सामनेवाले क्र.१ यांनी दोन्ही सोनोग्राफी रिपोर्टमध्ये फरक होता ही बाब लक्षात घेऊन स्वत: सोनोग्राफी करुन निदान करणे आवश्यक होते. असे न करता तक्रारदार यांना घाईघाईने भरती करुन त्यांचे लवकर बाळंतपण करण्यासाठी त्यांना औषधे दिली व त्या औषधोपचारामुळे तक्रारदार हिने दि.०९-०३-२००९ रोजी दोन बाळांना जन्म दिला. त्यानंतर दोन्ही बाळांना जवाहर मेडिकल फाऊंडेशन येथे भरती करुन तपासणी केली. त्यांनी दिलेल्या अहवालावरुन दोन्ही बाळांची वाढ योग्यप्रकारे होत असल्याचे लक्षात आले. परंतु बाळ मुदतपुर्व जन्माला आल्यामुळे अतिशय अशक्त होते. त्यांची पुर्ण काळजी घेऊनही एका बाळाचा दि.१२-०५-२००९ रोजी मृत्यु झाला आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
सामनेवाले क्र.३ यांनी चुकीच्या पध्दतीने सोनोग्राफी केली. सामनेवाले क्र.२ यांनी चुकीचे उपचार केले व त्यामुळे तक्रारदारांच्या गर्भावर परिणाम झाला. सामनेवाले क्र.१ यांनी अधिक तपासणी न करता मुदतपुर्व बाळंतपण केले. अशा प्रकारे सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारांचे मुदतपुर्व बाळंतपणे झाले व त्यामुळे दोन्ही बाळ अशक्त जन्मास आले. बाळांना “रायझोमेलीया” या नावाची व्याधी नव्हती. केवळ मुदतपुर्व बाळंतपणाने त्यांना अनेक आजार जडले होते, परंतु केवळ तीनही सामनेवालेंच्या निष्काळजीपणामुळे एक बाळ दगावले व जे बाळ जिवंत आहे त्याचेवर उपचार करावे लागत आहेत. या कामी सामनेवाले क्र.१ ते ३ हे, तक्रारदारांचे वैद्यकिय खर्चाकामी, बाळ गमावल्याच्या नुकसानीकामी, मानसिक त्रासाकामी, आर्थिक नुकसानीकामी, भविष्यात मुलबाळ होण्याची शक्यता नाही त्यामुळे जो आनंद गमावला त्याकामी, असे एकूण रु.१०,००,०००/- देण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(३) तक्रारदारांनी त्यांच्या कथनाचे पृटयर्थ नि.नं.१२ वर शपथपत्र दाखल केले असून, पुराव्यासाठी नि.नं.१४ वरील यादीप्रमाणे एकूण १ ते १५ कागदपत्र छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(४) सामनेवाले क्र.२ व ३ हे प्रकरणात हजर झाले आहेत. परंतु त्यांनी त्यांचा खुलासा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द नि.नं.१ वर दि.०२-०२-२०१० रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला आहे.
(५) सामनेवाले क्र.१ यांनी त्यांची लेखी कैफियत नि.नं.२४ वर आणि शपथपत्र नि.नं.२५ वर दाखल केले आहे. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हिचे निष्काळजीपणाने बाळंतपणे केले हे म्हणणे खोटे आहे. तक्रारदार हिने डॉ.सोनवणे यांच्याकडे तपासणी केल्यानंतर निदर्शनास आल्यानंतर तक्रारदारांनी गर्भपिशवीच्या तोंडास टाके करुन घेणे आवश्यक होते, परंतु ते करुन घेतलेले नाही. तसेच डॉ.अनिशा पाटील यांनी तक्रारदारांना उदभवणा-या धोक्याची कल्पना दिलेली होती. तक्रारदार या सामनेवाले क्र.१ यांच्याकडे तपासणीस आल्या तेव्हा तपासणीअंती त्यांचे गर्भपिशवीचे तोंड उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्याच वेळी तक्रादार हिस अॅडमिट केले. तेव्हा बाळांची वाढ ही साधारण २६ ते ३० आठवडयांपर्यंत झालेली होती. त्याचवेळी तक्रारदार हिचा गर्भ वाचविण्याचा प्रयत्न करणार याची पुर्ण कल्पना तक्रारदार यांना दिली होती. तक्रारदार हिस “Duvadilan” या नावाचे इंजेक्शन देवून सुध्दा त्यांचे पोटात प्रसूती वेदनेमुळे दुखने कमी होत नव्हते व ते दुखने वाढत जावून तक्रारदार हिची दि.०९-०३-२००९ रोजी डिलेव्हरी झाली. त्याच वेळी बालरोगतज्ज्ञ डॉ.कानडे यांना बोलावून त्यांच्या सल्ल्यानुसार दोन्ही बाळांना त्याच दिवशी जवाहर फाऊंडेशन या ठिकाणी भरती करण्यात आले. डॉक्टरांकडे आलेला कोणताही रुग्ण हा उपचारासाठी येतो. त्यांच्यावर योग्य रितीने उपचार करणे व मार्गदर्शन करणे यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असतात. तक्रारदार हिने खोटे आरोप केले असून वाद विषया बाबत कोणताही पुरावा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचे मत दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांची कोणतीही खर्चाची रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत. त्यामुळे सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
(६) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, छायांकीत कागदपत्र, पुराव्याचे शपथपत्र आणि लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले क्र.१ यांचा लेखी खुलासा व शपथपत्र पाहता तसेच सामनेवाले गैरहजर असून त्यांनी युक्तिवाद केलेला नाही. तक्रारदारांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्या गर्भवती असल्याने त्यांनी सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्याकडे वैद्यकिय उपचार घेतले आणि सामनेवाले क्र.१ यांच्या दवाखान्यात उपचाराकामी दाखल होऊन बाळांना जन्म दिला आहे. या बाबत उभयपक्षात कोणताही वाद नाही. याचा विचार होता तक्रारदार या सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्या “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार या गर्भवती असल्याने त्यांनी दि.०२-०१-२००९ रोजी डॉ.मिनल खलाणे यांच्याकडे सोनोग्राफी केली. त्याचा अहवाल नि.नं.६/१ वर दाखल आहे. त्यामध्ये
IMPRESSION
DIAMNIOTIC MONOCHORIONIC TWIN PREGANCY OF MEAN GESTATIONAL AGE OF 21-22 WKS.
BOTHS FETUS ARE IN VERTEX PRESENTATION. असे नमूद आहे.
या अहवालाप्रमाणे तक्रारदार हिस दोन जुळे बालक असून दोन्ही गर्भांची पिशवी एकच आहे व दोघांची नाळ एक आहे असे दिसते. या अहवाला प्रमाणे डॉक्टरांनी तक्रारदार हिच्या गर्भाची वाढ योग्य व व्यवस्थित असेल तर, प्रसूती सुखरुप व नैसैर्गीक होईल याची सर्व कल्पना तक्रारदारांना दिली होती.
त्यानंतर तक्रारदार हिने दि.०४-०३-२००९ रोजी सामनेवाले क्र.२ डॉ.अनिशा पाटील यांच्याकडे तपासणी केली. तसेच सामनेवाले क्र.३ डॉ.समिर पाटील यांच्याकडे सोनोग्राफी केली. त्याचा अहवाल नि.नं.१८ वर दाखल आहे. या अहवालामध्ये खालील प्रमाणे नमूद केले आहे.
Mrs. REKHA JADHAV/ADC7389/04/03/2009/visit No.1
----------------------------------------------------------------------
IMPRESSION
DIAMNIOTIC MONOCHORIONIC TWIN PREGANCY :-
1) F 1 IN TRANSVERSE LIE WITH HEAD IN RIGHT FLANK & SPINE DIRECTED SUPERIORLY WITH AVG GEST AGE OF APPROX 29 WKS 0 DAYS WITH ASSOCIATED MILD POLY HYDRAMNIOS.
2) F 2 LYING TO THE RIGHT OF MOTHER IN LONGITUDINAL LIE WITH CEPHALIC PRESENTATION & SPINE DIRECTED RIGHT LATERALY WITH AVG GEST AGE OF APPROX 28 WKS 3 DAYS WITH ASSOCIATED MILD POLY HYDRAMNIOS.
GA BY LMP : ?
EDD BY CGA : 24.05.09.
FINDINGS FAVOURING SHORT CERVIX & PARTIALLY OPEN INT OS (3MM).
FETAL PROXIMAL LONG BONES OF UPPER AND LOWER EXTREMITIES OF BOTH FETLL APPEAR BORDERLINE SMALL SUGGESTIVE OF MILD RHIXOMELIA IN BOTH FETLL. I HAVE NIETHER DETECTED NOR DISCLOSED THE SEX OF THE FETUS OF PREGNANT WOMEN TO ANYBODY.
या अहवालाप्रमाणे तक्रारदार हिस एकाच गर्भात जुळे गर्भ असून दोघांची नाळ एकच असल्याचे नमूद केले आहे. त्यांना FETUS (A) आणि FETUS (B) असे बाळांचे वर्णन अहवालात नमूद केले आहे. तसेच तक्रारदार हिचे गर्भपिशवीचे तोंड हे ३ एम.एम. ने उघडलेले आहे व गर्भाशयातील पाणी थोडे जास्त प्रमाणात आहे. तसेच दोन्ही बाळांचे वय २९ व २८ आठवडयांचे आहे. दोन्ही बाळांना “माईल्ड रायझोमेलीया” व्याधी असण्याची शक्यता दर्शविलेली आहे.
या दोन्ही डॉक्टर मिनल खलाणे व डॉ.अनिशा पाटील यांनी केलेल्या सोनोग्राफी अहवालाप्रमाणे असे स्पष्ट होते की, बाळांची सर्वसाधारण वाढ व्यवस्थीत आहे परंतु आईच्या गर्भाशयातील पाण्याचे प्रमाण जास्त असून त्या पिशवीचे तोंड हे उघडले गेलेले आहे असे स्पष्ट होते. या अहवालानंतर डॉक्टरांनी तक्रारदार हिस स्त्रीरोगतज्ज्ञाकडे पाठविलेले दिसते.
(९) त्याप्रमाणे तक्रारदार हिने सामनेवाले क्र.१ यांच्याकडे तपासणी केली आहे. परंतु त्यांनी कोणतीही अधिक तपासणी न करता तक्रारदारांना घाईघाईने भरती करुन बाळंतपण लवकरात लवकर करण्याची औषधी देवून मुदतपूर्व प्रसूती केली व त्यामुळे तक्रारदार हिने अशक्त बाळास जन्म दिला असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ डॉ.घुमरे यांच्याकडे दि.०८-०३-२००९ रोजी तपासणी केली आहे. त्या तपासणीची कागदपत्रे नि.नं.६/५ वर दाखल आहेत. या कागदपत्रांप्रमाणे सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदारांची तपासणी करुन त्यांची प्रसूती बाबत परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले व त्याच दिवशी तक्रारदार हिस पुढील उपचाराकामी दवाखान्यात दाखल करुन घेतलेले दिसते. तक्रारदारांची दि.०९-०३-२००९ रोजी प्रसूती झालेली आहे. त्या बाबतची हॉस्पीटलची कागदपत्रे नि.नं.६/६ वर दाखल आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता, त्यावर तक्रारदार हिची प्रसूती ही दि.०९-०३-२००९ रोजी झाली असून, त्यांनी दोन जुळया बाळांना जन्म दिला असल्याचे नमूद आहे. तसेच Nature of Delivery यामध्ये तक्रारदारांची नैसर्गिक रित्या प्रसूती झाल्याचे नमूद असून त्यांचे ऑपरेशन करुन प्रसूती केल्याचे नमूद नाही. त्यावेळी दोन्ही बाळांचे वजन १.४ के.जी. आणि १.३ के.जी. इतके नमूद केलेले आहे. तसेच तक्रारदार हिस दवाखान्यात दाखल केले त्यावेळी तक्रारदार हिच्या गर्भपिशवीचे तोंड उघडले असून ते os 2 fingerloose , 50 % effected असे होत असल्यामुळे, अशी परिस्थिती असल्याने तक्रारदार यांचेवर डॉक्टरांनी ताबडतोब प्रसूतीकामी पुढील उपचार केले. प्रसूतीच्या वेळेस तक्रारदार हिस “Duvadilan” या नावाचे इंजेक्शन दिलेले आहे. सदर औषधोपचार करुनही तक्रारदार हिस प्रसूतीकामी होणा-या वेदना थांबल्यानसून कोणताही फरक पडलेला नाही असे नमूद केले आहे.
यावरुन असे लक्षात येते की, तक्रारदार हिने दि.०४-०३-२००९ रोजी सामनेवाले क्र.३ यांचेकडे सोनोग्राफी केली व त्यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडे तपासणी केली. तपासणीमध्ये तक्रारदार हिचे गर्भपिशवीचे तोंड उघडले असल्यामुळे सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदारास पुढील उपचारासाठी दाखल करुन घेतले. त्यावेळी तक्रारदार हिस सातवा किंवा आठवा महिना असण्याची शक्यता आहे आणि बाळांची वाढ ही २८ ते ३० आठवडयांची झालेली होती आणि तक्रारदार हिस प्रसूतीकामी पोट दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे सामनेवाले क्र.१ यांनी सदर दुखणे कमी होण्यासाठी “Duvadilan” या नावाचे इंजेक्शन दिले आहे. परंतु तक्रारदार हिस त्याबाबत कोणताही फरक पडलेला नाही. यावरुन तक्रारदार हिची सातव्या महिन्यात प्रसूतीची प्रक्रिया ही ५० टक्के पर्यंत झालेली असल्याने, अशा परिस्थितीत डॉक्टरांना कोणतेही औषधोपचार न करता केवळ प्रसूती करणेच क्रमप्राप्त झाले होते असे दिसते. अशा परिस्थितीत बाळांचे किंवा आईचे जीवीतास धोका पोहोचण्याची शक्यता अधिक असते. या सर्व बाबीचा विचार करुन सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार हिची त्वरीत प्रसूती केलेली आहे असे स्पष्ट होते. सदर प्रसूती ही डॉक्टरांनी कोणतेही ऑपरेशन करुन केलेली नसून ती नैसर्गिक पध्दतीने झालेली आहे. त्यामुळे, डॉक्टरांनी औषधे देवून मुदतपुर्व तक्रारदार हिची प्रसूती केली असे जे तक्रारदारांचे म्हणणे आहे त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.
(१०) तक्रारदार यांना दोन जुळे बाळ असल्याने त्यांचे वजन कमी होते तसेच सातव्या महिन्यात प्रसूती झाल्यामुळे बाळ अशक्त होते. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना जवाहर फाऊंडेशनमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केलेले आहे. त्या बाबतची वैद्यकिय कागदपत्रे नि.नं. ६/७ वर दाखल आहेत. या कागदपत्रांवरुन दोन्ही बाळांना दि.१०-०३-२००९ पासून ते दि.०३-०३-२००९ पर्यंत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आल्याचे दिसते. दोन्ही बाळ २० दिवस दवाखान्यात आंतररुग्ण म्हणून दाखल होते व त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले आहे. दवाखान्यात आंतररुग्ण म्हणून दाखल करतेवेळी आणि दवाखान्यातून घरी जातेवेळी त्या बाळांचे आरोग्य कसे होते याचा तपशील दर्शविणारी कोणतीही वैद्यकिय कागदपत्रे तक्रारदारांनी प्रकरणात दाखल केलेली नाहीत. दुर्दैवाने तक्रारदारांच्या एका बाळाचे दि.११-०५-२००९ रोजी निधन झाले आहे. यावरुन दोन्ही बाळांवर उपचार केल्यावर त्यांना घरी नेल्यानंतर साधारणत: दोन महिन्यानंतर एका बाळाचे दु:खद निधन झाल्याचे दिसते. परंतु दरम्यानचे दोन महिन्याचे कालावधीत सदर बाळाचे आरोग्य कसे होते या बाबत पुरावा प्रकरणात दाखल नाही. तसेच सदर बाळाचे कोणत्या कारणाने निधन झाले या बाबत निदान असणारे कोणतेही वैद्यकिय कागदपत्र तक्रारदारांनी मंचात दाखल केलेली नाहीत.
तक्रारदारांच्या दोन्ही बाळांचे क्ष-किरणाचे फोटो काढले आहेत व त्या बाबतचा अहवाल त्यांनी नि.नं.६/८ वर दाखल केलेला आहे. सदर अहवाल पाहता, बाळांचा X-RAY PELVIS CHEST AP VIEW या बाबत फोटो काढलेला आहे. यामध्ये बाळांच्या छातीचा व पाठीचा फोटो (X-RAY) काढलेला असून त्याचा अहवाल नॉर्मल दिलेला आहे. यामध्ये दोन्ही बाळांची वाढ व्यवस्थीत असल्याचे नमूद केले आहे. परंतु त्यावरुन बाळांना “रायझोमेलीया” ही व्याधी नव्हती किंवा नाही असे दिसून येत नाही. डॉक्टरांनी चुकीचे निदान केले व त्या अहवालावर आधारीत चुकीचे औषधोपचार दिले आणि त्याचा परिणाम बाळांवर झाला, असे घडल्याचे या वैद्यकिय कागदपत्रांवरुन स्पष्ट होत नाही. किंवा त्याबाबतचा कोणताही सबळ पुरावा प्रकरणात दाखल नाही. त्यामुळे या अहवालाप्रमाणे पुर्वीच्या डॉक्टरांच्या सोनोग्राफी अहवालाप्रमाणे “रायझोमेलीया” ही व्याधी होती असा चुकीचा अहवाल दिला, असे म्हणता येणार नाही.
त्यामुळे सामनेवाले क्र.२ व ३ यांनी सोनोग्राफी केली व त्यांनी चुकीचे अनुमान काढून चुकीचा निष्कर्ष दिला असे तक्रारदारांचे जे म्हणणे आहे त्यात तथ्य आढळून येत नाही. कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णाचे प्रसूती बाबत अथवा कोणत्याही व्याधी बाबत त्यांना जाणवलेले निदान करणे किंवा निष्कर्ष देणे हा वैद्यकिय निष्काळजीपणा होऊ शकत नाही. कारण डॉक्टरांनी केलेले निदान हे केवळ अनुमान असते, ते निदान केवळ रुग्णास त्याच्या आरोग्य विषयक संभाव्य परिणामांबाबत जागरुक करण्यासाठी दिलेले असते. काही प्रसंगी डॉक्टरांचे रुग्णाबाबत अनुमान चुकले असल्यास तो वैद्यकिय निष्काळजीपणा होऊ शकत नाही.
या विषयी आम्ही आदरणीय वरीष्ठ आयोगाच्या खालील नमूद न्यायनिवाडयातील मार्गदर्शक तत्वाचा आधार घेत आहोत.
IV (2011)CPJ 677 (NC)
Hemant Chopra (Dr.) & Anr. Vs Kulwinder Singh & Ors.
h : Even assuming that diagnosis was erroneous then also it could be said that there was error of judgment while giving treatment on basis of wrong diagnosis-Error could not be termed as “gross medical negligence”, in view of nature of present case and medical history of deceased
(११) तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले क्र.१ यांनी त्यांची कोणतीही अधिक तपासणी केलेली नाही. आमच्या मते तक्रारदार हिस प्रकरणातील प्रत्येक डॉक्टरांनी धोक्याची सूचना दिलेली आहे. असे असतांना तक्रारदार यांनी डॉक्टरांकडे अधीक तपासणीची मागणी केली, परंतु डॉक्टरांनी ती मागणी मान्य न करता तक्रारदार हिची मुदतपुर्व प्रसूती केली असे तक्रारदारांचे म्हणणे नाही. तक्रारदार यांना सदर सोनोग्राफी बाबत त्यावेळी काही शंका वाटली असल्यास, त्यांनी डॉक्टरांकडे पुन्हा इतरत्र सोनोग्राफी करण्याची मागणी करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी अन्य त्रयस्थ तज्ज्ञ डॉक्टरांकडून सोनोग्राफी करुन शंका निरसन करुन घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला दिसत नाही. तसेच सदर वाद विषयाबाबत कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचा पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. थोडक्यात तक्रारदारांनी स्वत:च्या व त्यांच्या बाळांच्या आरोग्याविषयी अधिक जागरुकपणे काळजी घेणे आवश्यक होते. तक्रारदार यांच्या एका बाळाचे दुर्दैवाने निधन झाले आहे ही बाब निश्चितच दु:खाची आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला हेही स्वाभाविक आहे. परंतु सदर बाबीचा भावनीक दृष्टया विचार करुन, पुराव्या अभावी सामनेवाले यांना या परिस्थितीस जबाबदार धरणे योग्य व न्यायाचे होणार नाही.
(१२) सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदारांवर औषधोपचार केले, सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांची वैद्यकिय परिस्थिती बघून दवाखान्यात दाखल करुन घेवून ताबडतोब उपचार करुन त्यांची प्रसूती केलेली आहे. परंतु तक्रारदार यांची सदर प्रसूती ही सातव्या महिन्यात झाल्यामुळे बाळांचे वजन कमी असल्याचे दिसत आहे. तसेच तक्रारदारांनी नैसर्गिक प्रसूती झाली आहे यावरुन, उपचारामध्ये सामनेवाले डॉक्टरांचा कोणताही वैद्यकिय निष्काळजीपणा दिसून येत नसल्याचे सिध्द होत आहे.
तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या वैद्यकिय सेवेत निष्काळजीपणा असल्याबाबत कोणत्याही त्रयस्थ डॉक्टरांचा तज्ज्ञ अहवाल दाखल केलेला नाही आणि त्यांची तक्रार पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही. त्यामुळे सदर तक्रार रद्द होण्यास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१३) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २८/०१/२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)