रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 45/2011
तक्रार दाखल दि. 18/06/2011
न्यायनिर्णय दि.- 01/01/2015
1. श्रीमती सुमती लक्ष्मण पवार,
2. श्री. संजय लक्ष्मण पवार,
दोघेही रा. 402, अंबिका आर्केड,
चौथा मजला, लोखंडी पाडा,
, ता. पनवेल, जि. रायगड. ..... तक्रारदार.
विरुध्द
1. तापी सहकारी पतपेढी लि.,
द्वारा डॉ. सुरेश पंडीत बोरले,
रा. चोपडा, जि. जळगांव.
2/1. डॉ. सुरेश पंडीत बोरले,
चेअरमन, तापी सहकारी पतपेढी लि.,
चोपडा, जि. जळगांव.
2/2. शाखाधिकारी,
तापी सहकारी पतपेढी लि.,शाखा पनवेल,
युनायटेड एंटरप्रायझेस शेजारी,
प्लॉट नं. 3, रोड नं. 3, नवीन पनवेल,
सेक्टर 19, जि. रायगड. ..... सामनेवाले
समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्यक्ष.
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती – तक्रारदार तर्फे अॅड. मयेकर
सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस मुदत ठेव व बचत खात्यामधील रक्कम मुदतीनंतरही व्याजासह परत न करुन कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी सामनेवालेकडे खालील कोष्टकाप्रमाणे रकमेची गुंतवणुक केली होती.
खाते क्र. | गुंतवणुक दिनांक | मुदतपूर्ती दिनांक | रक्कम रु. | व्याज दर |
एम.आय.एस. नं. 32/33 | 19/07/06 | 19/08/09 | 50,000/- | 11.50% |
एम.आय.एस. नं. 32/34 | 19/07/06 | 19/08/09 | 17,000/- | 11.50% |
एम.आय.एस. नं. 32/35 | 19/07/06 | 19/08/09 | 10,000/- | 11.50% |
एस.ए. नं. 23/182 | 19/06/08 | | 2,813/- | 4% |
| | | एकूण रक्कम रु. 79,813/- व व्याजासहित रु. 1,06,715/- | |
3. सदर मुदतबंद ठेवीवरील व्याज तक्रारदार क्र. 1 व 2 यांना नियमितपणे मिळावे यासाठी ठेवल्या होत्या. परंतु तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी सामनेवालेकडे मुदतबंद ठेवीची व बचत खात्यामधील रकमेची मागणी केली असता सामनेवाले यांनी रकमा देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदारांनी दि. 31/07/09 व दि. 08/11/10 रोजी नोटीस वजा पत्र सामनेवाले यांना पाठवून ठेवीच्या रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी नोटीसची दखल न घेतल्याने पुन्हा दि. 12/05/11 रोजी सामनेवाले क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविली असता, सामनेवाले क्र. 2 ची नोटीस दि. 13/05/11 रोजी “Left” या शे-यासह परत आली व सामनेवाले क्र. 1 यांना दि. 18/05/11 रोजी नोटीस प्राप्त झाली. तरीदेखील सामनेवाले यांनी नोटीसला कोणतेही उत्तर न दिल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारास मुदतठेव व बचतखात्यामधील रक्कम व्याजासह द्यावी या मागणीसाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. परंतु मंचाची नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले मंचासमक्ष हजर न राहिल्याने त्यांचेविरुध्द दि. 23/07/14 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व त्यांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या मुदतठेवी व बचतखात्यावरील
रकमा व्याजासह विहीत मुदतीनंतरही अदा न करुन सेवा सुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा -
5. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून मुदतठेवी व बचतखात्यावरील रक्कमा या सामनेवाले यांच्या नियमानुसार तक्रारदारांस मुदतीअंती व्याजासह देण्याची व बचत खात्यावरील रक्कम व्याजासह मागणी करताच देण्याची कायदेशीर जबाबदारी सामनेवाले यांचेवर आहे. सदर रकमेचे केवळ संरक्षक म्हणून सामनेवाले यांनी सदर रक्कम बाळगणे अभिप्रेत आहे. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांनी रकमेची मागणी करुनही रक्कम न देण्याचे कोणतेही सबळ कारण तक्रारदारांस कळविले नाही. तक्रारदारांना सदर रकमेची निकड असताना सामनेवाले यांनी सदर रक्कम तक्रारदारांना दिली नाही ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाबही सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारास त्यांनी मागणी करताच मुदतठेवीची व बचतखात्यावरील रक्कम व्याजासह देण्यास असमर्थ ठरल्याची बाब सिध्द झाल्याने पर्यायाने तक्रारदारांना ज्यावेळी रकमेची आवश्यकता होती त्यावेळेस रक्कम प्राप्त न झाल्याने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारदारास गरजेच्या वेळी सामनेवाले यांनी रक्कम अदा न केल्याने सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत ही बाब सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 45/2011 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्रमांक 1, 2/1 व 2/2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार क्र. 1 व 2 यांना मुदतठेव व बचत खात्यावरील रक्कम व्याजासह मागणी करताच न देऊन कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले 1, 2/1 व 2/2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार क्र. 1 व 2 यांना खालीलप्रमाणे मुदतठेव व बचत खात्यावरील रक्कम रु. 1,06,715/- (रु. एक लाख सहा हजार सातशे पंधरा मात्र) व्याजासह या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत परत करावी.
खाते क्र. | गुंतवणुक दिनांक | मुदतपूर्ती दिनांक | रक्कम रु. | व्याज दर |
एम.आय.एस. नं. 32/33 | 19/07/06 | 19/08/09 | 50,000/- | 11.50% |
एम.आय.एस. नं. 32/34 | 19/07/06 | 19/08/09 | 17,000/- | 11.50% |
एम.आय.एस. नं. 32/35 | 19/07/06 | 19/08/09 | 10,000/- | 11.50% |
एस.ए. नं. 23/182 | 19/06/08 | | 2,813/- | 4% |
| | | एकूण रक्कम रु. 79,813/- व व्याजासहित रु. 1,06,715/- | |
4. सामनेवाले क्रमांक 1, 2/1 व 2/2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार क्र. 1 व 2 यांना तक्रार खर्च, मानसिक त्रास व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्कम रु. 30,000/- (रु. तीस हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
5. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 01/01/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.