निकालपत्र :-(दि.01.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूचे पक्षकार तसेच वकिल अनुपस्थित आहेत. त्यामुळे हे मंच प्रस्तुतची तक्रार ही गुणावगुणावर निकाली काढत आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 हे वैद्यकिय व्यावसायिक आहेत. सामनेवाला क्र.2 हे प्रोप्रायटर आहेत व ते इचलकरंजी येथे लेथ मशिनचे वर्कशॉप चालवित आहेत. सदर वर्कशॉपमध्ये तक्रारदार हे टर्नर म्हणून काम करीत होते. दि.07.08.2005 रोजी तक्रारदार हे कामावर असताना शाफ्ट टर्निंग (कट) करताना त्यांचा उजवा हात स्लीप होवून मनगटास दुखापत झाली. त्यामुळे तक्रारदार हे दि.07.08.2005 ते दि.31.10.2006 रोजीपर्यन्त सामनेवाला क्र.1 यांचे दवाखान्यात उपचारार्थ दाखल होते. सदर कालावधीत सामनेवाला क्र.1 यांनी कारण नसताना एका पाठोपाठ एक अशी 3 ऑपरेशन्स तक्रारदार यांचे उजव्या हातावर त्यांचे इच्छेविरुध्द केली आहेत. त्यामुळे तक्रारदारांना कायमचे 40 टक्के अपंगत्व आले आहे. सदरची ऑपरेशन्स ही विनाकारण केलेली आहेत व तक्रारदारांना 40 टक्के अपंगत्व आले. याबाबत सामनेवाला क्र.1 यांनी वैद्यकिय निष्काळजीपणा केलेला आहे. सबब, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांकडून वेळोवेळी घेतलेल्या ऑपरेशनच्या खर्चाची रक्कम रुपये 50,000/- द.सा.द.शे.15 टक्के व्याजदराने परत देणेबाबत आदेश व्हावा. तसेच, शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- व कोर्ट खर्च रुपये 3,000/- वसूल होवून मिळावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत डिस्चार्ज कार्ड, निदान लॅब रिपोर्ट, रोटरी मॅनमेड यांचेकडील ब्लड रिपोर्ट, युरिन रिपोर्ट, सामनेवाला यांनी दिलेले रुपये 7,000/- चे बिल, बिल मिळालेच्या पावत्या, सामनेवाला यांनी दिलेले डिसअॅबिलिटी सर्टिफिकेट, प्रिस्क्रीप्शन्स् व बिल, औषध बिले इत्यादी व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 वैद्यकिय व्यावसायिक यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, त्यांच्याकडून कोणताही वैद्यकिय निष्काळजपणा झालेला नाही. तक्रारदारांची तक्रार खोटी असल्याने फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये त्यांच्या सेवेत त्रुटी नसल्याने तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे तसेच, तक्रारदारांची तक्रार व सामनेवाला यांचे म्हणणे यांचे अवलोकन केलेले आहे. सामनेवाला वैद्यकिय व्यावसायिक यांनी तक्रारदारांच्या उजव्या हाताच्या मनगटास अपघात झाला असताना गरज नसताना 3 वेळा शस्त्रक्रिया केल्या व सदर शस्त्रक्रिया करीत असताना सामनेवाला यांनी निष्काळजीपणा केलेला आहे किंवा कसे याबाबतचा तज्ज्ञ मताचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक, कोल्हापूर यांनी द्यावा याबाबतचे आदेश पारीत करणेत आले. सदर आदेशानुसार जिल्हा शल्या चिकित्सक यांनी तक्रारदारांचे ऑपरेशनचे संम्मतीपत्र, केसपेपर्स, एक्स-रे, रक्ताच्या चाचण्या, तक्रारदारांची तक्रार व सामनेवाला यांचे म्हणणे इत्यादीचे अवलोकन करुन दि.05.03.2010 रोजी अहवाल दिला आहे. सदरचा अहवाला खालीलप्रमाणे :- 1. पेशंटवरील झालेले उपचार त्याला दिलेली ट्रिटमेंट (उदा. अॅन्टीबायोटिक्स रक्ताच्या चाचण्या इत्यादी) पहाता जखमेमध्ये जंतू संसर्ग होवून गुंतागुंत निर्माण झाल्याचे दिसून येते. परंतु, सदरचे उपचार हे वैद्यकिय शास्त्रास अनुसरुनच होते. त्यामुळे निष्काळजीपणा झाला असे म्हणता येणार नाही. 2. अपंगत्व 40 टक्के आले आहे, परंतु ते अपंगत्व कायमचे नाही व त्यावर उपचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 3. तांत्रिक मुद्दे व वैद्यकिय शास्त्राचा गैरवापर इत्यादी आरोप तक्रारदार हा वैद्यकिय ज्ञानाविषयी अनभिज्ञ असल्याने केल्याचे दिसून येते. वरील सर्व विवेचनावरुन पेशंटच्या ऑपरेशनचे संम्मतीपत्र, केसपेपर, एक्स-रे, रक्ताच्या चाचण्या, तक्रारदाराचा अर्ज, डॉक्टरांचा अर्ज, डॉक्टरांचा जबाब इत्यादीचे अवलोकन केल्यानंतर उपचारामध्ये निष्काळजी किंवा हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत नाही. (6) उपरोक्त विवेचन व जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर यांचेकडील अस्थि शल्यचिकित्साशास्त्र विभागाकडील अहवाल यांचा विचार करता सामनेवाला क्र.1 वैद्यकिया व्यावसायिक यांनी कोणताही वैद्यकिय निष्काळजीपणा केला नसल्याचे दिसून येते. सामनेवाला क्र.2 व तक्रारदार यांचेमध्ये ग्राहक हे नाते निर्माण होत नाही. सबब, तक्रारदारांच्या तक्रारीत कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत. 3. सदरचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |