नि.45 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 461/2009 नोंदणी तारीख – 29/9/2009 निकाल तारीख – 31/1/2011 निकाल कालावधी – 474 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री रामचंद्र मुकींदा गोळे 2. श्री संभाजी रामचंद्र गोळे दोघेही रा.मु.पो. करहर, ता.जावली जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री यशवंतराव वाघ) विरुध्द 1. डॉ सुभाष बी.आनंदे रा.कुडाळ, ता.जावली जि. सातारा ----- जाबदार क्र.1 (अभियोक्ता श्री सतिश पटेल) 2. डॉ एस.टी. जगताप, सानिया क्लिनिक व साई दत्त हॉस्पीटल, 78/अ, बावधन रोड, सोनगीरवाडी, वाई ता. वाई जि. सातारा 3. अपेक्स हॉस्पीटल ऍण्ड मेडीकल इन्स्टिटयूट प्रा.लि. सातारा तर्फे डॉ सुरेश जगदाळे, बॉम्बे रेस्टॉरंटजवळ, पुणे-बेंगलोर महामार्ग शेजारी, प्लॉट नं.42/क, सातारा ता.जि.सातारा ----- जाबदार क्र.2 व 3 (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार क्र. 1 यांची पत्नी व अर्जदार क्र.2 यांची आई यांना वातस्वरुपाचा आजार झालेचे वाटलेने त्या जाबदार क्र.1 यांचे दवाखान्यात दि. 27/7/2007 रोजी गेल्या. जाबदार क्र.1 यांनी त्यांना तपासून दोन्ही खुब्यात प्रत्येकी एक याप्रमाणे इंजेक्शन दिले व गोळया दिल्या. त्यानंतर एका खुब्यास इंजेक्शन दिले त्या ठिकाणी सूज आली व त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. म्हणून किसाबाई यांना जाबदार क्र.2 यांचे दवाखान्यात नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने त्यांना दुस-या हॉस्पीटलमध्ये नेण्यात यावे असे जाबदार क्र.2 यांनी सांगितले. म्हणून अर्जदार यांनी त्यांना जाबदार क्र.3 यांचे हॉस्पीटलमध्ये नेले व तेथे त्यांचेवर उपचार करण्यात आले. जाबदार क्र.1 यांनी चुकीच्या पध्दतीने इंजेक्शन दिल्याने किसाबाई यांचे दोन्ही खुब्यांना जखम झाली व तो भाग सडल्यासारखा झाला. म्हणून त्यांचेवर जाबदार क्र.3 यांचे हॉस्पीटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले. तदनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेनंतर त्यांची प्रकृती खालावत गेली व त्यांचे दि.2/10/07 रोजी निधन झाले. अशा प्रकारे जाबदार क्र.1 यांचे हलगर्जीपणामुळे किसाबाई यांचा मृत्यू झाला. म्हणून अर्जदार यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. सदरचे कामी जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 यांना मदत करणेसाठी खोटी कागदपत्रे तयार केली. किसाबाई यांचे मृत्यूमुळे अर्जदार यांचे रु.5 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. सबब जाबदार क्र.1 यांचेकडून रक्कम रु.4,50,000/- नुकसान भरपाई व्याजासह मिळावी व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांनी नि. 11 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. मयत किसाबाई या जाबदार क्र.1 यांचेकडे आलेनंतर नेमकी उपचारपध्दती काय असावी हे अनुभवाच्या निकषावर ताडून जाबदार यांनी अत्यंत विनाहानीकारक असे निरोबीयान व डायक्लो अशी इंजेक्शन्स डिस्पोझेबल सिरींज द्वारे दिली. तसेच त्यानंतर गोळयाही दिल्या. मयत किसाबाई दोन दिवसांनी पुन्हा आलेनंतर त्या प्रकृती ठणठणीत असल्याबाबत जाबदार यांना सांगून गेल्या. त्यानंतर त्या कधीही जाबदार क्र.1 यांचेकडे आल्या नाहीत. मयत किसाबाई यांनी कथीत सेप्टीकबाबत कधीही जाबदार यांचेकडे दाद मागितली नाही. सेप्टीसेमीयाची कारणे वैद्यकीय शास्त्रात नोंद करण्यात आलेली आहेत. त्यानंतर मयताचे पुतण्याने पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविलेनंतर जाबदार यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. मयत किसाबाई यांनी डॉ जगताप यांचेकडे उलटी व जुलाब या त्रासाबदृल उपचार घेतले होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुध्द डिस्चार्ज घेतला आहे. त्यानंतर डॉ रहाटे यांचे सांगण्यावरुन त्यांनी जाबदार क्र.3 यांचे हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले व नंतर त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या तपासात जाबदार यांचा काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे जाबदारविरुध्द गुन्हयाची नोंद झालेली नाही. जाबदार क्र.1 यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे अर्जदार यांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल याकामी दाखल नाही. तसेच सदरची तक्रार ही अर्जदार यांनी दोन वर्षानंतर दाखल केली आहे, त्यामुळे त्यास मुदतीचा बाध येतो. जाबदार यांनी उपचारामध्ये कोणतीही त्रुटी अगर निष्काळजीपणा केलेला नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र. 2 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. जाबदार क्र.3 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा नि.27 ला दाखल आहेत. तसेच जाबदार क्र. 2 व 3 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. याकामी अर्जदार यांचे नि.30 कडील शपथपत्र पाहिले. सबब, जाबदार क्र.2 व 3 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 4. अर्जदार व जाबदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद पाहिला तसे जाबदारतर्फे अभियोक्त्यांचा युक्तिवाद ऐकणेत आला तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 5. अर्जदार यांची तक्रार पाहता अर्जदार क्र.1 यांची पत्नी व अर्जदार क्र.2 यांच्या आई मयत किसाबाई यांना जाबदार क्र.1 डॉ आनंदे यांनी दि.27/7/2007 रोजी तब्येत दाखवणेस गेले असता दोन खुब्यांमध्ये दोन वेगवेगळी इंजेक्शन एकाच सुईने दिली त्यामुळे किसाबाई यांचे खुब्यामध्ये सूज येवून सेप्टीक झाले, गँगरीन झाले. नंतर अपेक्स हॉस्पीटल मध्ये किसाबाई यांचेवरती शस्त्रक्रिया करणेत आली परंतु दि.2/10/2007 रोजी किसाबाई यांचे निधन झाले. सबब जाबदार यांनी चुकीचे पध्दतीने उपचार केलेमुळे किसाबाई यांचे निधन झाले, किसाबाई 55 वर्षांच्या होत्या, घरातील शेतातील कामे करीत होत्या परंतु जाबदारमुळे पत्नी व आईस मुकावे लागले, सबब नुकसान भरपाई मिळावी अशी तक्रार दिसते. 6. जाबदार क्र.1 डॉ आनंदे यांनी नि.11 कडे कैफियत व नि.12 कडे शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदारचे कथनानुसार दि.27/7/2007 रोजी किसाबाई त्यांचेकडे आल्याच नव्हत्या, त्या दि.14/7/07 रोजी आल्या होत्या. त्यांना टेस्ट घेवूनच दोन डिस्पोझेबल सुईने इंजेक्शन दिले होते. किसाबाई यांना सेप्टीक झाले त्याची अनेक कारण वैद्यकीय शास्त्रास नोंद करणेत आली आहेत. उदा. साखरेची वाढ, ताप, विषारी किटक, विंचू, मधमाशी अगर अन्य विषारी दंश ही कारणे जबाबदार असू शकतात. सबब जाबदारने सेवा देणेत काही त्रुटी केली नाही असे कथन केले आहे. 7. निर्विवादीतपणे नि.46 कडे जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांचा अहवाल कामात दाखल आहे. त्यामध्ये निष्काळजीपणा दिसून येतो का ? या मे. मंचाचे प्रश्नास “स्पष्टपणे अभिप्राय देता येत नाही.” असे उत्तर मा. जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांनी नमूद केले आहे. प्रस्तुत तक्रारअर्जप्रकरणी आणखी एक महत्वाची विचारात घेण्यासारखी गंभीर बाब अशी आहे की, जाबदार क्र.3 अपेक्स हॉस्पीटल ऍण्ड मेडिकल इन्स्टिटयूट प्रा.लि. यांचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती ही डॉ सुरेश जगदाळे हे आहेत. सध्या सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक या पदावर कार्यरत असलेली व्यक्तीही डॉ सुरेश जगदाळे हेच आहेत. या मे.मंचामार्फत सदरचे प्रकरण वैद्यकीय उपचारामध्ये निष्काळजीपणा झाला आहे किंवा नाही याबाबतचा वैद्यकीय अहवाल मागविणेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत असलेले डॉ सुरेश जगदाळे यांचेकडे पाठविला असता त्यांनी निःपक्षपातीपणे व त्रयस्थ भूमिका घेणे अपेक्षित असताना त्यांनी त्यांचे अहवालामध्ये स्पष्ट मतप्रदर्शन केलेले नाही. वास्तविक पाहता ते जाबदार क्र.3 म्हणून याकामी सामील असताना त्यांनी कोणताच निष्कर्ष न देणेच योग्य ठरले असते. त्यामुळे त्यांचे वैद्यकीय अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सबब, दाखल कागदपत्रे तसेच मयत किसाबाई यांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पाहून मे. मंच खालील निष्कर्षापर्यंत पोचत आहे. 8. जाबदार डॉ आनंदे कैफियतीमध्ये मयत किसाबाई हीस निरोबियान व डायक्लो ही दोन वेगवेगळी इंजेक्शन्स टेस्ट घेवूनच दोन खुब्यात दिली असे कथन करतात. परंतु जिल्हा शल्य चिकित्सक सातारा अहवालामध्ये निरोबियान व डायक्लो या इंजेक्शनची टेस्ट घेण्याची आवश्यकता नसते असे कथन करतात. सबब जर आवश्यकताच नव्हती तर डॉ आनंदे यांनी निरोबियान व डायक्लो टेस्ट कशासाठी घेतली. तसेच डॉ आनंदे यांनी टेस्ट घेतली आहे का हे दिसून येते का ? या प्रश्नास शल्यचिकित्सक यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. सबब डॉ आनंदे यांचे कोणतेही कथन विश्वासार्ह वाटत नाही. 9. निर्विवादीतपणे नि.4/3 कडे डॉ आनंदे यांचे प्रिस्क्रीप्शन दाखल असून त्यावरती दि.14/7/07 तारीख नमूद आहे. परंतु त्यावरती किसाबाई यांचे वय – 75 वर्षे नमूद केले आहे. अर्जदार क्र.1, जे किसाबाई यांचे पती आहे, त्यांचे अर्जात वय 60 नमूद आहे तसेच किसाबाई यांचे अपेक्स हॉस्पीटलचे कागदपत्रांवरतीही 55 वय नमूद आहे, जे अर्जदारही कथन करतात. पोस्ट मार्टेम अहवालही बॉडी तपासून 55 वर्षे वय नमूद करतात (कलम नं.2). यावरुन डॉ आनंदे यांची कथने पश्चात बुध्दीची वाटतात. अर्जदार यांनी नि.32/1 कडे डॉ सतिश जगन्नाथ रहाटे यांचे शपथपत्र दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी “किसाबाई गोळे दि.3/8/2007 रोजी माझेकडे उपचारासाठी आल्या. त्यावेळेव किसाबाई यांनी डॉ आनंदे यांनी दि.27/7/2007 रोजी एकाच सुईने दोन इंजेक्शन खुब्यात दिली तेव्हापासून खुबे दुखत आहेत, वेदना होत आहेत असे सांगितले” सबब डॉ रहाटे यांनी किसाबाईंना तपासले आहे व खुब्यांना सूज आली होती, त्वचा काळसर होती, पेशंटला वेदना होत होत्या, सबब उपचार करणे अशक्य होते म्हणून अपेक्स हॉस्पीटल सातारा येथे जाणेस सांगितले. तशी चिठ्ठी दि.3/8/007 रोजी दिली असे शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. निर्विवादीतपणे दि.4/8/2007 रोजी किसाबाई अपेक्स हॉस्पीटल सातारा येथे दाखल झालेल्या दिसतात. अपेक्स हॉस्पीटल यांची कागदपत्रे नि.5 कडे दाखल आहे. त्यांचे अवलोकन करता दाखल करताना मयत किसाबाई हीचे Diagnosis चे पुढे Gangrenous, buttock area असे नमूद आहे तसेच Burning sensation, waery discharge from wound असे नमूद आहे तसेच pulse, respiration, temperature B.P. Normal दिसून येत आहे तसेच साईदत्त लॅब यांचेकडील रक्ताचे तपासणीचे नोंदी केसपेपरवती दिसतात. त्याही नॉर्मल दिसतात कारण काही सल्ला दिलेला नाही. सबब मयत किसाबाई हिला डॉ आनंदे यांनी दिलेल्या इंजेक्शनचे जागेवरतीच Burning sensation होत आहे व गँगरीन झालेले दिसत आहे व जखमेतून पस येत आहे हे दिसते. नि.5/4 कडे मयत किसाबाई हिचे पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची प्रत दाखल असून त्यामध्ये septicemia is cause of death असे मृत्यूचे कारण नमूद केले आहे. 10. निर्विवादीतपणे खुब्यामध्ये इंजेक्शन दिलेल्या जागेवरती जखमा व त्यामध्ये सेप्टीक झाले आहे व पुढे गॅगरीन झाले आहे हे अपेक्स हॉस्पीटलचे कागदपत्रांवरुन दिसून येत आहे. 11. निर्विवादीतपणे जाबदार डॉ आनंदे यांनी सेप्टीसेमिया होणेस अनेक कारणे जबाबदार असू शकतात असे कथन केले. त्यांचे मतानुसार सेप्टी सेमिया झालेस अंगावर फोड येवून सेप्टीक होते त्याची कारणे वैद्यक शास्त्रात साप, विषारी किटक, विंचू, मधमाशी यांचा दंश, साखरेची वाढ ही कारणे असू शकतात. परंतु अर्जदारचे तक्रारअर्जावरुन तसेच हॉस्पीटलचे दाखल कागदपत्रांवरुन तसेच पोस्ट मॉर्टेम अहवालावरुन किसाबाई हिचे अंगावर फोड आलेले नव्हते. खुब्यामध्येच Burning sensation व सेप्टीक झाले होते व पुढे गॅगरीन झाले आहे तसेच हॉस्पीटलचे कागदपत्रांवरुन किसाबाई हिस कोणताही विषारी दंश झालेला दिसत नाही किंवा त्यासाठी औषधोपचार दिलेला दिसत नाही तसेच गॅगरीन झालेला भाग अपेक्स हॉस्पीटलमध्ये सर्जरी करुन कापलेला आहे हे दिसते. जर किसाबाई हीस शुगर असती किंवा त्यामध्ये वाढ झाली असती तर अपेक्स हॉस्पीटलने सर्जरी केली नसती. निर्विवादीतपणे किसाबाई हीस शुगर असलेबाबतचा किंवा शुगर वाढ झाली असलेबाबतचा रक्त तपासणीचा अहवाल कामात दाखल नाही. सबब डॉ आनंदे यांचे म्हणणे ग्राहय धरणे योग्य होणार नाही या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 12. डॉ आनंदे यांनीच कैफियतीमध्ये निरोबियान व डायक्लो ही इंजेक्शन दिलेचे मान्य करतात. निर्विवादीतपणे निरोबियानसारखी इंजेक्शन दिलेनंतर डॉक्टरांनी सदर इंजेक्शन मधील औषधाची गाठ होवून सेप्टीक होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे त्यशसाठी सदर इंजेक्शन मधील औषध सगळीकडे पसरेल या पध्दतीने रुग्णाचा इंजेक्शन दिलेला भाग दाबून चोळला पाहिले त्याची हालचाल करुन घेतली पाहिजे, एवढी पोस्ट ऑपरेटीव्ह केअर इंजेक्शननंतर घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. 13. तसेच अर्जदार स्वतः तसेच तानुबाई भिलारे यांचे शपथपत्राने डॉ आनंदे यांनी एकाच सुईने दोन इंजेक्शन दिली असे कथन करतात. सबब एका सुईमुळे दोन औषधे मिक्स झालेनेही गाठ होवून सेप्टीक होणेची शक्यता नाकारता येत नाही किंवा इंजेक्शन देताना ती जागा निर्जंतूक केली नसावी. सबब इंजेक्शन देताना व नंतर रुग्णाची काळजी न घेवून डॉ आनंदे यांनी सेवेत त्रुटी केली आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 14. जाबदार क्र.2 व 3 यांनी हजर होवून मे. मंचात म्हणणे दाखल केले नाही. परंतु जाबदार क्र.2 यांचे प्रिस्क्रीप्शन नि.14/1 कडे जाबदार क्र.1 यांनी दाखल केले आहे. सदरचे प्रिस्क्रिपशन पाहता त्यांनी मयत किसाबाई यांना इंलेक्शन दिलेचे दिसून येत नाही. सबब जाबदार क्र.1 म्हणतात त्याप्रमाणे जाबदार क्र.2 यांचीसुध्दा चुक असू शकते हे म्हणणे मान्य करता येत नाही. तसेच जाबदार क्र.3 अपेक्स हॉस्पीटल यांची तपासणीबाबतची कागदपत्रे अर्जदार यांनी कामात दाखल केल्याचे दिसून येत आहेत. सदरची कागदपत्रे पाहता त्यांनी मयत किसाबाई यांचे खुब्यातील पस ड्रेन करुन काढलेला दिसून येत आहे तसेच गॅगरीनचा भाग कापलेला दिसून येत आहे. सबब त्यांचा काही निष्काळजीपणा आहे हे दिसून येत नाही असे मंचास वाटते. 15. अर्जदारने दाखल केलेली नि.35 सोबतची अपेक्स हॉस्पीटल यांचे औषधोपचाराची बिले पाहिली असता रु.50,000/- खर्च झाला आहे असे दिसून येत आहे. सबब सदर रक्कम तसेच अर्जदार क्र.1 यांना त्यांची पत्नी व अर्जदार क्र.2 त्यांना त्यांची आई यांना जाबदार क्र.1 चे निष्काळजीपणामुळे गमवावी लागली. सबब नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरुन नुकसान भरपाई रक्कम रु.,1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) तसेच मानसिक त्रास व या तक्रारीचा खर्च रु.25,000/- जाबदार क्र.1 कडून मिळणेस अर्जदार पात्र आहे असेही या मंचाचे मत आहे. 16. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज जाबदार क्र.1 विरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. अर्जदारचा तक्रारअर्ज जाबदार क्र.2 व 3 विरुध्द नामंजूर करणेत येत आहे. 3. जाबदार क्र.1 यांनी अर्जदार यांना औषधोपचाराचे खर्चाची रक्कम रु.50,000/- (रु.पन्नास हजार फक्त) व नुकसान भरपाईपोटी रु.1,00,000/- (रु.एक लाख फक्त) द्यावी. 4. जाबदार क्र.1 यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु.25,000/- (पंचवीस हजार फक्त) द्यावी. 5. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 31/1/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |