द्वारा- श्रीमती. स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार वर नमुद पत्तयावर रहात असून, स्वस्तीक टाईल्स या कंपनीत एरिया सेल्स मॅनेजर म्हणुन कार्यरत होते. ते कंपनीच्या कामानिमित्त प्रवास करत असतांना ता. 31/07/2013 रोजी विठ्ठलवाडी पुर्व येथील रेल्वे स्टेशनच्या नजीकच्या ठिकाणी त्यांना छोटासा अपघात होऊन त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. तक्रारदार त्यांच्या पायावर उपचार करण्यासाठी नजीकच्या सेंट्रल दवाखान्यात पोहचताच तेथील दारापाशी उभ्या असलेल्या इसमाने सामनेवाले यांचे व्हिजीटींग कार्ड तक्रारदारांना देऊन सामनेवाले यांचेकडे उपचार करुन घेण्याचा सल्ला दिला सामनेवाले यांनी देखील तक्रारदारांना संपर्क करुन सरकारी दवाखान्यात उपचार करण्याऐवजी सामनेवाले हे उत्तम सर्जन असून सामनेवाले यांचेकडुन उपचार करुन घेण्यासाठी तक्रारदारांना विश्वासात घेतले त्यानुसार तक्रारदार सामनेवाले इनचार्ज म्हणुन सांभाळत असलेल्या मातोश्री केसरबेन मोहनलाल देढीया या हॉस्पिटलमध्ये दि. 31/07/2013 रोजी दाखल झाले. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या दुखापतीबाबत अथवा केल्या जाणा-या उपचाराबाबत कोणतेही स्पष्टीकरण न देता तक्रारदार व त्यांचे भाऊ यांच्याकडुन छापील फॉर्मवर सह्या घेतल्या व रु. 25,000/- जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराच्या दुखापत झालेल्या उजव्यापायाच्या टिबियाचे एक्स-रे, ऑपरेशन करण्यापुर्वी काढण्यास सांगितले. तक्रारदारांनी तो एक्सरे काढल्यानंतर तक्रारदाराच्या उजव्या पायावर दि. 07/08/2013 रोजी शास्त्रक्रिया सामनेवाले यांनी केली. तक्रारदाराकडुन सामनेवाले यांनी दि. 11/08/2013 रोजी काही स्क्रु खरेदी केले आहेत त्याकरीता रक्कम रु.6,500/- द्यावे लागतील असे तक्रारदारांना सांगितले त्यानुसार तक्रारदारांनी ते सामनेवाले यांना अदा केले सामनेवाले यांना एकुण रु. 40,500/- अदा केल्यानंतर तक्रारदारांना दि.13/08/2013 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. सदर पावती अभिलेखात उपलब्ध आहे. तक्रारदारांना डिस्चार्ज दरम्यान देखील सदर पायात वेदना होत असल्याचे तक्रारदारांनी सामनेवाले यांना सांगितल्यावर इम्प्लांट व स्क्रु बसविल्याने त्रास होत असेल, औषधे चालू ठेवली त्यांच्या पावत्या तक्रारदारांनी तक्रारीसोबत जोडल्या आहेत. त्यानंतर देखील तक्रारदाराच्या पायाच्या वेदना कमी न झाल्याने सामनेवाले यांनी दि. 31/10/2013 रोजी तक्रारदारांना पायाचा एक्सरे घेण्यास सांगितले त्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या पायाचे पुन्हा ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले व सामनेवाले यांनी ऑगस्ट 13 मध्ये शास्त्रकीया करुन तक्रारदाराच्या उजव्या पायात लावलेले इम्प्लांट काढुन घेण्यासाठी दि. 24/09/2013 रोजी तक्रारदाराच्या उजव्या पायावर पुन्हा शस्त्रक्रीया केली त्याबाबत तक्रारदारांना रु. 5,000/- सामनेवाले यांना अदा करावे लागले त्यांच्या पावत्या, फॉर्मवरील सामनेवाले यांनी घेतलेल्या सह्या एक्स रे रिपोर्ट इत्यादी तक्रारदारांनी तक्रारीसोबत / पुराव्या दाखल जोडले आहेत.
2. सामनेवाले तक्रारदारांना सदर ऑपरेशन सक्सेसफुल झाल्याचे भासवले वेळेवर औषधे घेण्याचा व फॉलोअपचा सल्ला त्यानुसार तक्रारदारांनी सर्व गोष्टींचे पालन करुन वेळोवेळी सामनेवाले यांना फॅलोअप चार्जेसही अदा केले. परंतु तरीही तक्रारदाराच्या पायाच्या वेदना कमी होत नसल्याने तक्रारदारांनी अन्य तज्ञ डॉक्टरांशी त्यांचे चार्जेस अदा करुन त्यांचे वैद्यकिय सल्ले घेतले, तेव्हा त्यांनी तक्रारदाराच्या पायाचे सामनेवाले यांनी केलेले ऑपरेशन अयशस्वी झाल्याचे सांगून पायातील स्क्रु काढुन पुन्हा इम्पलांटिंग, प्लेटींग, बोन ग्राफटींग करण्याबाबत तक्रारदारांना सल्ला दिला व त्यासाठी तक्रारदारांना पुन्हा रु. 2,50,000/- ते रु. 3,00,000/- खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारदारांनी ही बाब सामनेवाले यांच्या निदर्शनास आणुन दिल्यावर तक्रारदारांनी मागितला नसतांना देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांना अपंगत्वाचा दाखला सवलत दाखला दिला व तक्रारदारांना त्याचा भविष्यात फायदा होईल असे सांगुन औषधे नियमित सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. परंतु पायाच्या वेदनांमुळे तक्रारदारांला उभे राहणे, चालणे अशक्य होऊ लागले व परिणामी त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागली. तक्रारदारांनी सदर तक्रार दाखल करण्यापुर्वी सामनेवाले यांना दि. 29/03/2014 रोजीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. तक्रारदार त्यांच्या कुटूंबातील एकच मिळवती व्यक्ती असल्यानले सामनेवाले यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना सदर त्रास सोसावा लागल्याचे नमुद करुन तक्रारदारांनी सामनवेाले यांचे विरुध्द सदर तक्रार दाखल करुन तक्रारीच्या प्रार्थना कलमात नमुद केल्यानुसार सामनेवाले यांचेकडुन नुकसान भरपाई / न्यायिक खर्च व इतर मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना पाठवलेली सुनावणीची नोटीस ‘unclaimed’ आल्याने त्यांना नोटीस मिळाल्याचे जाहीर करुन सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्याचा तक्रारदारांनी अर्ज दिला, व त्याबाबत सर्व्हिस ऑफिडेव्हिट दाखल केले. सामनेवाले यांचे विरुध्द दि. 29/09/2014 रोजी प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. सामनेवाले यांनी सदर आदेश रद्द करणेकामी दि. 12/02/2015 रोजी दिलेला अर्ज, उभय पक्षांची त्यावर सुनावणी घेऊन दि. 13/10/2015 रोजी मंचाने नामंजुर केला आहे. त्यानंतर तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला. सामनेवाले एकतर्फा असल्याने तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकुन प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
4. सामनेवाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश असल्याने तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करुन मंचाने तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्दाचा विचार केला-
मुद्दा क्र. 1. तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक आहेत का? होय.
मुद्दा क्र. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे तक्रारदारांनी सिध्द केले आहे का ? होय.
मुद्दा क्र. 3. तक्रारदाराची प्रस्तुत तक्रार मंजुर करण्यात येते का ? होय अंशतः मंजुर करण्यात येते.
मुद्दा क्र. 1.
1. तक्रारदार हे वर नमुद पत्तयावर रहात असुन तक्रारदारांना दि. 31/07/2013 रोजी अपघात होऊन त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने तक्रारदार सेंट्रल दवाखान्यात (सरकारी दवाखाना) गेले असता तेथील एका इसमाने तक्रारदारांना सामनेवाले यांचेबद्दल सांगून सामनेवाले उत्तम सर्जन असल्याचे सांगितले, त्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदाराशी संपर्क करुन तक्रारदारांना विश्वासात घेतले व तक्रारदार सामनेवाले इनचार्ज असलेल्या मातोश्री केसरबेन मोहनलाल देढीया ह्या खाजगी हॉस्पीटलमध्ये दि. 31/07/2013 रोजी दाखल झाले व त्यांच्या उजव्या पायावर सामनेवाले यांनी दि. 07/08/2013 रोजी शस्त्रक्रिया केली. तक्रारदाराच्या पान क्र. 13 वर जोडलेल्या Admission Form वर Doctor in charge – Mr. Vivek Malvi (MS Ortho) असा उल्लेख आहे. तसेच पान क. 18 वर जोडलेल्या दि. 12/08/2013 रोजीच्या बीलाच्या तपशिलात सर्जन चार्जेस रु. 10,000/- असे लिहिले आहे. सदर शास्त्रक्रिया डॉ. माळवी (सामनेवाले) यांनी केल्याचे व तक्रारदारांना शस्त्रक्रियेनंतर औषधोपचार सामनवाले यांनी दिल्याबाबतची कागदपत्रे तक्रारदारांनी दाखल केली आहेत त्यामध्ये सामनेवाले यांच्या खाजगी क्लिनिक (मुरबाड) मध्येही तक्रारदारावर उपचार करण्यात आल्याचे व त्याबाबतचे चार्जेस तक्रारदारांनी भरल्याचे तक्रारदारांनी नमुद केले आहे. प्रस्तुत तक्रारीत तक्रारदारांनी सदर पायावर सामनेवाले यांनी केलेल्या पहिल्या शस्त्रकीयेबाबत भरलेली रक्कम क्र.40,500/- चे बील / पावती जोडलेली आहे. अशा प्रकारे तक्रारदारांने सर्जन व त्यानंतर औषधोपचार करणारे म्हणुन सामनेवाले यांना वेळोवेळी रक्कम अदा केली असल्याने तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक आहेत.
मुद्दा क्र. 2 - सामनेवाले यांच्या वर नमुद पत्तयावरील मातोश्री केसरबेन मोहनलाल देढिया ह्या इस्पितळात तक्रारदार दि. 31/07/2013 रोजी दाखल झाले त्यानंतर त्यांच्यावर दि. 07/08/2013 रोजी वरील परिच्छेदांमध्ये नमुद केल्याप्रमाणे उजव्या पायावर (Jess External Fixator was applied with 3 screws in upper Tibia R-side) शस्त्रक्रिया सामनेवाले यांनी केली. सदर शस्त्रक्रिया करुन देखील तक्रारदाराच्या उजव्या पायाच्या वेदना कमी होत नसल्याने तक्रारदारांनी स्वखर्चाने अन्य तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यासाठी सदर पायाची तपासणी केली असता सामनेवाले यांनी केलेले ऑपरेशन योग्य प्रकारे झाले नसल्याने व तक्रारदाराच्या पायामधील (Right Tibia) स्क्रु तक्रारदाराच्या गुडघ्यामध्ये घासले जात असल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले त्याबाबत तक्रारदारांनी Fortis Hospital मध्ये केलेल्या तपासणीची कागदपत्रे /C.T.Scan चे रिपोर्ट तसेच डॉ. नरेश खन्ना (MS Ortho) (Bom) यांनी दिलेले मत (Expert Opinion) तक्रारीत सादर केले आहे. ते अभिलेखात उपलब्ध आहे. तक्रारदारांनी Fortis Hospital मध्ये सदर पायावर पुढील उपचार करण्यासाठी सामनेवाले यांना सांगितले व त्यांचा खर्च सामनेवाले यांचेकडुन मागितला ही बाब सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 24/08/2013 रोजीच्या उल्हासनगर पोलिस ठाणे मधील सादर केलेल्या जबाबात मान्य केली आहे असे असुन देखील सामनेवाले यांनी तक्रारदारावर पुढील योग्य उपचार करणे ऐवजी सामनेवाले यांनी तक्रारदारांना न विचाराता त्याना अपंगत्वाचा 40% Disability Certificate दाखला व कन्सेशन मिळणेबाबतचा दाखला दि. 12/02/2014 रोजी (सदर दाखल्याखाली सामनेवाले यांची बोर्ड मेंबर म्हणुन स्वाक्षरी केल्याचे दिसून येते) दिला. व नियमित औषधोपचार घेणेस सांगितले परंतु तक्रारदाराच्या पायावर दोन वेळा केलेली शस्त्रक्रिया कोणत्या बाबींमुळे अयशस्वी झाली त्यांचा छडा लावून तक्रारदारावर सामनवेाले यांच्या स्वखर्चाने उपचार देण्याचे सामनेवाले यांनी नाकारले. तक्रारदारांनी डॉ. नरेश खन्ना यांनी दिलेल्या (expert opinion) मध्ये डॉ. खन्ना यांनी सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या ‘Knee Joint’ मध्ये दोष निर्माण झाल्याचे नमुद करण्यात आले आहे सदर (Expert Opinion – अभिलेखात उपलब्ध आहे ) यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारावर योग्य प्रकारे शस्त्रक्रिया न केल्याने तक्रारदारांना अपंगत्व आल्याचे दिसून येते व सामनेवाले यांचेकडे तक्रारदारांनी अपंगत्वाच्या दाखल्याची मागणी केली नसतांना सामनेवाले हे सदर मेडिकल बोर्डाचे सभासद असल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना तो दिला व स्वतःच्या निष्काळजीपणा झाकण्याचा प्रयत्न केला आहे तसेच भविष्यात तक्रारदारांना सदर पायावर पुन्हा तिस-या वेळी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे स्पष्ट होते.
मुद्दा क्र. 3 सामनेवाले यांनी योग्य प्रकारे तक्रारदाराच्या उजव्या पायाचे वर उल्लेख केल्याप्रमाणे शास्त्रक्रिया यशस्वीरित्या पार न पाडल्याने तक्रारदारांना उभे रहाणे, चालणे कठिण झाले, पायातील वेदनांमुळे घराबाहेर पडता न आल्याने रु. 27,500/- प्रतिमहिना पगाराची नोकारी गमवावी लागली औषधोपचार, एक्सरे वारंवार करावयाच्या शस्त्रक्रिया इत्यादीसाठी तक्रारदारांना झालेल्या आर्थिक नुकसानास सामनेवाले जबाबदार आहेत, तसेच तक्रारदार त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असुन सदर पायावर सामनेवाले यांनी योग्यप्रकारे उपचार न केल्याने तक्रारदारांना त्यांची नोकरी गमवावी लागली यामुळे झालेल्या व पायाच्या वेदनांमुळे झालेल्या शारिरिक मानसिक नुकसान भरपाई म्हणुन सामनेवाले यांचेकडुन तक्रारदार एकुण रक्कम रु. 4,00,000/- प्रार्थना 31अ ते ड बाबत मिळण्यास पात्र आहेत.
तक्रारदार यांना सदर तक्रार वकिलाकरवी दाखल करावी लागल्याने झालेल्या न्यायिक खर्चाची भरपाई म्हणुन रु. 5,000/- (प्रार्थना कलम 31(इ)) सामनेवाले यांचेकडुन मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले यांनी वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यात करावे.
सबब, उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक- 275/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी (प्रार्थना कलम 31(अ ते ड नुसार) रक्कम रु. 4,00,000/- (रु. चार लाख फक्त) द्यावेत.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना न्यायिक खर्चापोटी भरपाई म्हणुन रक्कम रु. 5,000/- (रु. पाच हजार फक्त) आदेश पारित तारखेपासून 2 महिन्यात द्यावेत.
8. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
9. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
दिनांक – 29/08/2016.
ठिकाण – ठाणे