(घोषित दि. 26.11.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे सेवेतील कमतरतेसाठी दाखल केली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा जालना जिल्हयातील रहिवाशी आहे. तक्रारदार अज्ञान असल्याने त्याचे वतीने पिता दत्ता जगताप यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या जबडयाचे दात पुढे आलेले असल्यामुळे तक्रारदार गैरअर्जदार यांच्या वरद दातांचा दवाखाना येथे गेले. त्यांनी दातांची तपासणी करुन तक्रारदारांना रुपये 27,000/- इतका खर्च व दीड ते दोन वर्षाच्या कालावधी लागेल असे सांगितले. त्यावेळी तपासणी फी वगळता पुढील उपचारासाठी त्यांनी आगाऊ रक्कम रुपये 2,000/- दिनांक 06.08.2011 ला भरले व उर्वरीत रक्कम टप्या-टप्याने भरायची ठरले व दिनांक 10.09.2011 रोजी तक्रारदारांना यावयास सांगितले. जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे तक्रारदार त्या दिवशी दवाखान्यात गेले नाही. दिनांक 12.11.2011 रोजी तक्रारदार व त्यांचे वडिल दवाखान्यात गेले असता गैरअर्जदारांनी रुपये 6,000/- ऐवढया पैशांची मागणी केली ते भरणे शक्य नाही असे गैरअर्जदार यांनी सांगितल्यावर उपचार करण्यास नकार दिला. तेंव्हा तक्रारदारांनी दिनांक 06.08.2011 रोजी भरलेले रुपये 2,000/- परत मागितले ते परत करण्यास देखील गैरअर्जदार यांनी नकार दिला.
दिनांक 01.12.2011 रोजी तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना कायदेशीर नोटीस पाठवली व गैरअर्जदारांनी त्यांना दिनांक 15.12.2011 रोजी उत्तर देखील दिले. तक्रारदार पुढे म्हणतात की ते वरद दातांचा दवाखाना येथेच उपचारासाठी गेले होते व तो दवाखाना गैरअर्जदार संतोष गव्हाणे यांचा आहे ते डॉ.प-हाड यांना ओळखत नाहीत.
गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्या वडिलांकडून उपचारासाठी आगाऊ रुक्कम रुपये 2,000/- घेतली व उपचार करण्यास नकार दिला. म्हणून तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांनी डॉ.समीर प-हाड गैरअर्जदार क्रमांक 2 यांना गैरअर्जदार म्हणून समाविष्ट करण्याचा व तदनुषंगाने तक्रारीत दुरुस्ती करण्याचा अर्ज मंचा समोर दाखल केला होता त्यावर मंचाने आदेश करुन दोनही अर्ज मंजूर केले. तक्रारदारांच्या दुरुस्ती अर्जात तक्रारदार म्हणतात की डॉ.प-हाड यांनी त्यांना उपचारा संबंधी कार्ड दिले आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 ने देखील उपचारात टाळाटाळ व हलगर्जीपणा केलेला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचा समोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबानुसार तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 2 डॉ.प-हाड यांचेकडे उपचारासाठी आले. प-हाड हे बुलढाणा येथील रहीवाशी असून जालना येथे येवून उपचार करतात. तक्रारदाराच्या वडिलांनी गव्हाणे यांच्या क्लीनीक मध्ये येवून डॉ.प-हाड यांचेकडे तक्रारदाराला त्यांचे उपचार कार्ड दिले व उपचार सुरु देखील केले होते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारावर उपचार केले हे दाखवणारा कोणताही पुरावा तक्रारदारांनी आणलेला नाही तक्रारदारांनी तक्रारीत लिहीलेला “तक्रारदार उपचारासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आला त्यांना रुपये 27,000/- ऐवढा खर्च सांगण्यात आला. दिनांक 06.08.2011 रोजी गैरअर्जदारांनी रुपये 2,000/- भरुन घेतले व दिनांक 12.11.2011 रोजी रुपये 6,000/- रुपये भरले तरच उपचार चालू करु असे म्हटले”. हा सर्व मजकूर बनावट व खोटा आहे. तक्रारदारांकडून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी कोणतीही रक्कम घेतलेली नाही अथवा उपचार केले नाहीत. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना खोटी नोटीस दिली आहे व खोटी तक्रार दाखल केली आहे म्हणून तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांना मंचाने तक्रारीत गैरअर्जदार क्रमांक 2 म्हणून समाविष्ट का करु नये ? अशी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती त्याचे उत्तर गैरअर्जदार 2 यांनी दिले की, तक्रारदारांनी मूळ तक्रारीत त्यांचे विरुध्द काहीही मागणी केलेली नाही. त्यामुळे त्यांना गैरअर्जदार करण्यात येवू नये.
गैरअर्जदार क्रमांक 2 म्हणून डॉ.प-हाड यांना समाविष्ट करण्याचा हुकूम झाल्यानंतर मंचाची नोटीस मिळूनही ते मंचा समोर गैरहजर राहिले म्हणून त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्यात आली. तक्रारदारांची तक्रार व गैरअर्जदार क्रमांक 1 यांचा जबाबाचा अभ्यास करुन मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दा उत्तर
1.तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी
त्यांना द्यावयाच्या सेवेत काही त्रुटी केली आहे
ही गोष्ट सिध्द केली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेश प्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी - तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.जगताप व गैरअर्जदार क्रमांक 1 चे विद्वान वकील श्री.वाघ्रळकर यांचा सविस्तर युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी लेखी युक्तीवाद ही दाखल केला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी बरोबर फक्त उपचार कार्ड व गैरअर्जदार क्रमांक 1 यांना पाठवलेली नोटीस व तिचे उत्तर एवढीच कागदपत्रे दाखल केली आहेत. वरील कार्डचे (नि.4/1) अवलोकन करता असे दिसते की ते कार्ड “Dr. Sameer Parhad”या नावाचे आहे व डॉक्टरांचे नाव म्हणून “Dr. Gavhane sir” असे लिहीले आहे. कार्डवर कोठेही वरद दातांचा दवाखाना असा उल्लेख नाही त्यावर खालील नोंद आहे.
Date & Time Provedur Payment Received Payment Balance
6/08 Sep + Iup 2000/- -----
10/09 ----- ---- -----
---------------------------------------------------------------------------------
या नोंदीवरुन असे दिसते की दिनांक 06.08.2011 रोजी तक्रारदार यांचेवर काही उपचार झालेले आहेत व त्यानंतर दिनांक 10.09.2011 रोजी तक्रारदार गेलेले नाहीत. तक्रारदार देखील त्यांच्या तक्रारीत म्हणतात की 10.09.2011 ला त्यांना बोलावले होते पण नातेवाईकाच्या मृत्यूमुळे ते एकदम 12.11.2011 ला दवाखान्यात गेले उपचार कार्डवर कोठेही डॉक्टरांचे सही नाही. उपचार कार्डावर लिहीलेल्या नोंदी शिवाय तक्रारदारांनी 2,000/- रुपये भरल्याचा काही पुरावा नाही.
थोडक्यात उपचार कार्डवरुन तक्रारदारांवर नेमके कोणी उपचार केलेले आहेत याचा उलगडा होत नाही परंतु दिनांक 06.08.2011 रोजी तक्रारदारांवर काही उपचार करण्यात आले व त्यानंतर 10/09 ला त्यांना पुन्हा बोलावण्यात आले होते ही गोष्ट त्यावरुन स्पष्ट दिसते.
दिनांक 12.11.2011 ला तक्रारदार व त्यांचे वडील गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या दवाखान्यात गेले तेव्हा त्यांनी रुपये 6,000/- द्या तरच उपचार सुरु करतो असे सांगितले ही गोष्ट सिध्द करणारा कोणताही पुरावा मंचा समोर नाही.
तक्रारदारांच्या वकीलांनी युक्तीवादाचे वेळी Indian Medical Council (Professional Conduct, Etiquette Ethics ) Regulation 2002 ची झेरॉक्स प्रत व AIR 1996 S.C.2/2011 “Poonam Verma Vs. Ashwin patel या निकालाची प्रत दाखल केली. परंतु प्रस्तुत तक्रारदार केवळ भरलेली रक्कम रुपये 2,000/- परत मागत आहेत व सेवेत कमतरता केली म्हणून नुकसान भरपाई मागत आहेत यात कोठेही वैद्यकीय निष्काळीजीपणाचा उल्लेख नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीस वरील दाखला उपयोगी पडत नाही असे मंचाचे मत आहे. Medical Ethics चा भंग झाला असे तक्रारदारांना वाटत असेल तर ते संबंधित डॉक्टरांविरुध्द Medical Council कडे तक्रार करु शकतात.
वरील सविस्तर विवेचनावरुन 1. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांवर नेमके कोणी व काय उपचार केले हे स्पष्ट होत नाही. 2. दिनांक 06.08.2011 रोजी तक्रारदारांनी रुपये 2,000/- भरल्याची केवळ उपचार कार्डावर नोंद आहे त्याची पावती मंचासमोर नाही. 3. त्यानंतर तक्रारदारांना पुन्हा दिनांक 10.09.2011 रोजी बोलावण्यात आले. परंतु ते तेंव्हा न जाता एकदम दिनांक 12.11.2011 रोजी दवाखान्यात गेले 4. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना रुपये 6,000/- मागितले याचा काहीही पुरावा मंचासमोर नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेत काही कमतरता केलेली आहे ही गोष्ट सिध्द करु शकलेले नाहीत असा निष्कर्ष मंच काढत आहे व खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बद्दल आदेश नाही.