निकालपत्र:- (दि.06/04/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार तर्फे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला डॉक्टरांनी तक्रारदाराच्या डाव्या डोळयावर वैद्यकिय उपचारापोटी घेतलेली बिले व इतर आवश्यक कागदपत्रे मागणी करुनही न देऊन सेवेत त्रुटी केलेने दाखल करण्यात आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार हे एस. टी. महा मंडळात ड्रायव्हर या पदावर नोकरी करतात. दि.14/07/2009 रोजी तक्रारदार हे गारगोटी-कोल्हापूर मुक्काम गाडी घेऊन कोल्हापूरला आले होते. सकाळी उठून अंघोळीला जात असताना त्यांचे डाव्या डोळयास लहान पाखरु धडकले आणि त्यांचा डोळा लाल झाला. आठ-दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी डोळा पूर्ववत झाला नाही. सदर कालावधीत तक्रारदार नियमितपणे ड्रायव्हींग सेवा बजावत होते. दि.22/07/09 रोजी तक्रारदार यांनी ड्रायव्हींग सेवा बजावली. त्यानंतर दि.23/07/2009 रोजी डाव्या डोळयावर उपचार करणेसाठी ते रहाते गावावरुन मोटरसायकलने कोल्हापूरला आले आणि त्यांनी सामनेवाला यांचेशी संपर्क साधला. त्यावेळी सामनेवाला यांनी डोळा तपासून पाहिला आणि डोळयामध्ये घाण आहे आणि मी दोन मिनिटात घाण काढतो असे तक्रारदार यांना सांगितले. दोन हॉस्पिटल कर्मचारी यांना तक्रारदार यांचे हात पकडण्यास सांगून सामनेवाला यांनी सुईसदृश्य वस्तुने आणि चिमटयाने तक्रारदार यांचा डोळा टोकरण्यास सुरुवात केली. सामनेवाला उपचार करीत असताना तक्रारदार यांना भूल दिली नव्हती त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. सामनेवाला यंनी सुमारे पाच ते सात मिनिटे डोळयामध्ये सुइ्रसदृश्य वस्तुने टोच दिला त्यावेळी तक्रारदार प्रचंड वेदनामुळे आरडाओरड करीत होते. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदार यांना डोळयातील घाण काढली आहे आणि तुम्हास लवकरच बरे वाटेल असे सांगून वेदनाशामक गोळया देऊन घरी पाठवले. तक्रारदारास रात्रभर वेदना थोडया जाणवत होत्या आणि सकाळी वेदनांचे प्रमाण वाढले व नजरही अंधूक झाली म्हणून दुस-या दिवशी पुन्हा सामनेवाला यांचेकडे तक्रारदार गेले असता सामनेवाला यांनी पुन्हा औषधे देऊन घरी पाठवले आणि तीन दिवसांनी परत यावयास सांगितले. सामनेवाला यांनी उपचार सुरु केल्यापासून सुमारे सहा-सात वेदना कमी झाल्या नाहीत आणि दृष्टी कमी झाली. याबाबत तक्रारदार यांनी विचारणा केली असता सामनेवाला यांनी पंधरा दिवसात डोळा पूर्ववत होईल आणि वेदनाही संपतील असे सांगून तक्रारदार यांना डॉ.महेश दळवी तेजोयम नेत्र रुग्णालय यांचेकडे पाठवले. डॉ. महेश दळवी यांनी इंजेक्शन, गोळया आणि आय ड्रॉप देऊन दोन वेळा तक्रारदार यांचेवर उपचार केले. तथापि, त्यांचे उपचारानेही तक्रारदार यांच्या वेदना कमी झाल्या नाहीत आणि दृष्टी पूर्ववत झाली नाही. त्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारावर आठ ते दहा दिवस उपचार केले. परंतु तक्रारदार यांचे परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. सामनेवाला यांचेकडे एक महिना उपचार घेतल्यानंतर तक्रारदार यांनी दि.18/08/2009 रोजी डॉ.चंद्रशेखर शाळीग्राम यांना आपला डोळा दाखविला. त्यांनी डोळयाच्या टेस्ट घेणेस सांगितले आणि त्याप्रमाणे डॉ. अस्मिता कुलकर्णी यांचेकडे तक्रारदाराचे डोळयाचे कल्चर सेन्सिव्हीटी रिपोर्ट आणि बॅक्टेरिओलॉजिकल एक्झामिनेश घेणेत आले. सदरचे रिपोर्ट पाहून व डोळयाची तपासणी करुन डॉ. शाळीग्राम यांनी डोळयामध्ये जखम असलेचे सांगितले आणि त्यावर औषध उपचार केले. परंतु डोळयामधील जखम अगोदरच चिघळली असलेने औषधोपचारामुळे फायदा झाला नाही. त्यावेळी डॉ. शाळीग्राम यांनी डॉ. अतूल जोगळेकर यांना डोळा दाखविणेचा सल्ला दिला. डॉ. अतुल जोगळेकर यांनी केस हिस्ट्री पाहून डोळा तपासून आणि रिपोर्टस पाहून डोळयातील जखमेवर ऑपरेशन करुन टाके घालावे लागतील आणि त्यानंतर तीन महिन्यांनी डाव्या डोळयाची बाहूली बदलावी लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराचे डाव्या डोळयातील जखमेवर दि. 20/09/09 ते 22/09/09 या कालावधीत ऑपरेशन करुन टाके घालणेत आले आणि दि.09/12/09 ते 11/12/09 या कालावधीमध्ये तक्रारदार यांचे डाव्या डोळयाची बाहूली बदलणेत आली. डॉ.शाळीग्राम आणि डॉ.जोगळेकर यांनी केले उपचारामुळे तक्रारदारांच्या डोळयामध्ये झाली जखम बरी झाली. तथापि, त्यांची दृष्टी परत आली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे डोळयावर चुकीच्या पध्दतीने व निष्काळजीपणाने उपचार केलेमुळे तक्रारदारास त्यांची डाव्या डोळयाची दृष्टी गमवावी लागली. तसेच त्यांचे सदरचे कृत्यामुळे तक्रारदार यांना त्यांचे डोळयावर दोन ऑपरेशन करुन घ्यावी लागली व त्या अनुषंगाने उपचार करुन घ्यावे लागले. त्याकरिता तक्रारदारास सुमारे रक्कम रु.90,000/- इतका खर्च आला. तक्रारदार हे एस.टी. महामंडळात ड्रायव्हर या पदावर कायम नोकरीत आहेत. नियमाप्रमाणे तक्रारदारास पहिले चार महिने मेडिकल लिव्ह मिळाली. त्यानंतर डिसेंबर-2009 पासून तक्रारदार बिन पगारी रजेवर आहेत. तक्रारदारास पुन्हा सेवेमध्ये रुजू होऊन ऑफिस काम करणेची महामंडळास तयारी दर्शविली असता महामंडळाने तक्रारदारास स्थायी वैद्यकीय मंडळ शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांचा दाखला आणणेस सांगितले. त्याप्रमाणे त्यांचेकडे दाखला मागणी केला असता दि.07/07/2010 च्या पुढील सेवेसाठी अपात्र असलेबाबतचा दाखला त्यांनी दिला. त्या दाखल्याप्रमाणे तक्रारदार हे महामंडळामध्ये कोणत्याही प्रकारचे काम करु शकत नाहीत. सामनेवालांचे चुकीच्या उपचारामुळे तक्रारदारास कायम स्वरुपी सरकारी नोकरी गमवावी लागली आहे. तक्रारदार यांना तीन अल्पवयीन मुले आहेत आणि ते मागासवर्गिय असलेने त्यांचेकडे कसणेसाठी जमीन नाही. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सामनेवालांचे चुकीमुळे तक्रारदार यांचे जीवन उध्वस्त झाले आहे. त्यामुळे सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.4,00,000/-, औषधोपचाराचा खर्च रु.90,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- असे एकूण रक्कम रु.4,98,000/- व्याजासह सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांचेकडील केसपेपर कार्ड, प्रिसक्रिप्शन्स, तपासणी पावत्या, पॅथालॉजी रिपोर्ट, मेडिकल बील, डिस्चार्ज कार्ड, वकील नोटीस,पोष्टाची पावती, पोष्टाची पोच पावती, दाखला, प्रमाणपत्र, आदेश मस्टर रोल इत्यादी कागदपत्रांच्या झेरॉक्सप्रती दाखल केल्या आहेत. (5) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार वस्तुस्थिती व कायदयानुसार आणि सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्या वैद्यकीय सेवेचा विचार करता तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे. तसेच तक्रारदाराच्या false] frivolous vexatious तक्रारीमुळे सामनेवालास झालेल्या त्रासापोटी तक्रारदाराने रक्कम रु.10,000/- देणेचा आदेश व्हावा. तक्रारदाराची तक्रार कोणत्याही वैद्यकीय आधाराशिवाय केलेली आहे. तसेच तक्रारीमध्ये complicated questions of facts and law असलेने नामंजूर होणेस पात्र आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे असे सांगतात, तक्रारदार यांचे डोळयास दि.14/07/09 रोजी पाखरु धडकून जखम झालेली होती. परंतु तक्रारदार हे सामनेवालांकडे दि.23/07/09 रोजी उपचाराकरिता मोटरसायकलने कुर गावाहून कोल्हापूर येथे आले. या एकाच बाबीवरुन तक्रारदार यांचा निष्काळजीपणा दिसून येतो. सदर 10 दिवसांचे कालावधीत तक्रारदार यांनी कोणतेतरी आय ड्रॉप्स वापरले इतकीच मोघम माहिती तक्रारदाराने सामनेवाला यांना दिली. दि.23/07/09 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारास तपासले असता त्यांची डाव्या डोळयाची नजर vision C.F. 4 Mtrs. असलेचे आढळले. मात्र वैद्यकीय शास्त्राप्रमाणे प्रमाणित योग्य नजर ही 6/6 स्नेलन चार्ट प्रमाणे असते. तक्रारदार हे सामनेवालांकडे आले त्यावेळी तक्रारदार यांची नजर अंधूक झाली होती, त्यांचे डोळयास असाहय वेदना होत होत्या, डोळा लाल झाला होता, डोळा टोचत होता व डोळयास सुज आली होती. असे असतानादेखील तक्रारदार हे ड्रायव्हींग सारखे काम करीत होते. यावरुनच तक्रारदाराचा निष्काळजीपणा व बेदरकारपणा दिसून येतो. सामनेवाला यांनी तक्रारदारास तपासलेनंतर तक्रारदाराचे डाव्या डोळयामध्ये (cornea)फॉरेन बॉडी (long standing embedded organic foreign body) खोलवर रुतल्याचे दिसून आली. तसेच डोळयाच्या बुब्बुळात खोलवर जखम (stromal infiltration) व त्यामध्ये रुतून बसलेली फॉरेल बॉडी याचा विचार करता डोळयाला सूज, जखम, फॉरेन बॉडी, तसेच डोळयामध्ये फंगल इन्फेक्शन देखील झालेले होते. अशावेळी सर्वप्रथम फॉरेन बॉडी काढणे अत्यावश्यक असते. त्यामुळे जखम, संसर्ग बरा होऊ शकतो. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी स्थानिक बधिरीकरणाचे औषध डोळयात टाकून स्लीट लॅम्प मशीनच्या सहाय्याने सुईने सदरची फॉरेन बॉडी काढण्याचे उपचार केले. तदनंतर सामनेवाला यांनी डोळयावर बिटाडीन औषध, डोळयातील थेंब व मलम घालून व निर्जंतूक केलेल्या डिस्पोजेबल पॅडच्या सहाय्याने ड्रेसिंग केले व तक्रारदारास इतर योग्य औषधे लिहून दिली व तपासणीसाठी दररोज येणेची सुचना दिली. तसेच तक्रारदार यांनी पूर्ण विश्रांती घ्यावयास हवी असे सामनेवाला यांनी तक्रारदारास बजावले. तक्रारदार यांनी तक्रार अर्जातील कलम 2 मध्ये केलेली कथने खोटी आहेत. तक्रारदाराने वस्तुस्थितीचा विपर्यास केलेला आहे. तक्रारदारांना लोकल अनेस्थेशिया व 26 क्रमांकाच्या सुईने उपचार केले तसेच उपचार सुरु असताना तक्रारदारांना भूल दिली नव्हती हा मजकूर सर्वस्वी खोटा आहे. सदर उपचारामध्ये सामनेवाला यांनी auto-claved cotton & eye pads वापरलेले आहेत. तक्रारदार यांना होत असलेल्या वेदनांचा वर नमुद केले उपचाराशी संबंध नसून त्यांना झालेल्या जखमेशी व गेलेल्या काळाशी संबंध आहे. शिवाय सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्या औषधामध्ये अॅन्टी बायोटिक व पेन किलर यांचा समावेश होता. 15 ते 20 मिनिटे चालणारी मोतीबिंदू/फेको सारखी मोठी ऑपरेशन्स देखील डोळयात दोन ते तीन थेंब औषध (topical paracaine) टाकून केली जात असतात. अशा प्रकारची फॉरेन बॉडी काढण्यासाठी सुई, चिमटा ब्लेड इत्यादी शस्त्रे (needle, forceps, blade, keratome) वापरावी लागतात. सामनेवाला यांनी 23 जुलै-09 ते 26 जुलै-09 अखेर तक्रारदाराची तपासणी करुन योग्य आय ड्रॉप्सचे डोस, डोळा ड्रेसिंग करणे, औषधे से उपचार केले. परंतु तक्रारदाराचे डोळयामध्ये अपेक्षित सुधारणा न वाटल्यामुळे सामनेवाला यांनी डॉ. महेश दळवी यांचेकडे सेकंड ओपिनियनसाठी पाठविणेचे ठरवले. दि.29/07/09 रोजी तक्रारदार पुन्हा सामनेवालांकडे उपचाराकरिता आले असता त्यांचे डोळयातील लाली थोडीशी कमी आली होती. बुब्बुळाचा धुसरपणा कमी आला होता व तक्रारदार यांची दृष्टी काही प्रमाणात सुधारली होती. तदनंतर तक्रारदार हे दि.03/08/09 व 06/08/09 रोजी आले असता त्यांचे परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झालेने ब्लड-शुगर टेस्ट करुन घेतली. रिपोर्ट नॉर्मल आलेने सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.08/08/09 रोजी कॉर्निअल स्क्रेपींग करण्याचा सल्ला दिला. त्यांनतर तक्रारदार हे सामनेवालांकडे उपचाराकरिता परत केव्हाही आलेले नाहीत. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कलम 3 मधील तक्रारदारांचे म्हणणेप्रमाणे डॉ. चंद्रशेखर शाळीग्राम यांचेकडे सामनेवाला यांना कोणतीही विचारणा अथवा सुचना न देता परस्पर उपचारासाठी गेलेले दिसतात. डॉ. शाळीग्राम यांचेकडे तक्रारदाराने घेतलेले उपचार पाहता ते सामनेवाला यांनी केलेल्या उपचाराशी सुसंगत असलेचे दिसते. त्यानंतर तक्रारदार यांनी डॉ. जोगळेकर यांचेकडे उपचार घेतलेचे दिसते. सामनेवाला यांचे चुकीमुळे डॉ.जोगळेकर यांचेकडे ऑपरेशन करुन टाके घालणेत आले हा तक्रारीतील मजकूर वरील कारणामुळे चुकीचा आहे. डॉ.जोगळेकर यांनी केलेले ऑपरेशनच्या बाबतीत अशा प्रकारच्या केसीसमध्ये डोळयातील जखमेमध्ये औषधोपचाराने अपेक्षित सुधारणा न झालेस (non-healing/ indolent corneal ulcer) बुब्बुळ बदलणेची शस्त्रक्रिया (therapeutic & optical keratoplasty) दृष्टी परत येणेसाठी केली जाते. यावरुन तक्रारदाराची जखम ही पूर्ण भरुन निघालेली होती कारण जखम पूर्ण भरुन निघाली नसती तर डॉ. जोगळेकर यांना दुसरी शस्त्रक्रिया करताच आली नसती ही बाब सिध्द होते. परंतुत अशा शस्त्रक्रियेने दृष्टी परत येईलच याची कोणतीही शाश्वती नसते. तक्रार अर्जातील कलम 4 मध्ये नमुद केलेप्रमाणे तक्रारदार यांना डाव्या डोळयाची दृष्टी गमवावी लागली त्याची कारणे तक्रारदार यांचे डोळयात गेलेली फॉरेन बॉडी, तक्रारदार यांचा निष्काळजीपणा , तक्रारदारांची परस्पर निष्कारण अविश्वास दाखवून व ट्रीटमेंट अर्धवट सोडून डॉक्टर बदलण्याची वृत्ती व वैद्यकीय कॉम्प्लीकेशन्स व त्याचे परिणाम हीच आहेत. याबाबत सामनेवाला यांनी त्यांचेसेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेल्या नाहीत. तक्रारदारास रु.90हजार खर्च आलेचा मजकूर सामनेवाला यांना अमान्य आहे. तक्रारदारांना सामनेवालांकडे केवळ अंदाजे रक्कम रु.400 ते 500 इतकाच खर्च आलेला आहे. तक्रार अर्जातील कलम 5 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांचे म्हणणे असे की, सामनेवाला यांनी दिलेल्या उपचारात हलगर्जीपणा नव्हता. तक्रारदार हे चालक पदासाठी काम करणेस पात्र नसलेचे प्रमाणपत्र असले तरी कोणत्याही प्रकारचे सेवेसाठी ते असमर्थ झाले असे म्हणता येणार नाही. सामनेवालांना तक्रारदाराची कौटूंबिक व स्थावर मालमत्तेबाबत कसलीही माहिती नाही. तक्रारदाराने कलम 6 व 7 मध्ये नमुद केलेली नुकसान भरपाई देणेस सामनेवाला जबाबदार नाही. तक्रारदाराच्या वकीलांच्या नोटीसला सामनेवाला यांनी योग्य उत्तर दिलेले आहे. तक्रारीस कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदाराने खोटे, व्देषमुलक तक्रार दाखल केल्याने तक्रारदाराकडून सामनेवालांना रक्कम रु.10,000/- वसुल होऊन मिळावेत अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (7) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ तक्रारदाराचा केस पेपर दाखल केला आहे. (8) तक्रारदाराची तक्रार,दाखल कागदपत्रे,सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता खालील महत्वाचे मुद्दे उपस्थित होतात. 1. सामनेवाला यांनी सेवा त्रुटी केली आहे काय ? --- नाही. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- दि.14/07/09 रोजी तक्रारदार गारगोटी कोल्हापूर मुक्काम गाडी घेऊन कोल्हापूरला आले होते. सकाळी उठून अंघोळीला जात असताना त्यांचे डावे डोळयास लहान पाखरु थडकले व डोळा लाल झाला. आठ-दहा दिवसांचा कालावधी जाऊनही डोळा पूर्ववत झाला नाही. सदर कालावधीत नियमितपणे तक्रारदाराने ड्रायव्हींग सेवा बजावली आहे. दि.23/07/09 रोजी तक्रारदार त्यांचे राहते गावावरुन मोटरसायकलवरुन कोल्हापूरला आले. सामनेवाला डॉ. संजय घोटणे यांनी तक्रारदाराचा डोळा तपासून पाहिला व डोळयामधील घाण दोन मिनटात काढतो असे सांगून हॉस्पिटल कर्मचा-यांना तक्रारदाराचे हात पकडणेस सांगून सुईसदृश्य व अन्य चिमटयाने तक्रारदाराचा डावा डोळा टोकरणेस सुरूवात केली. सदर वेळी भूल दिली नसलेने डोळयामध्ये प्रचंड वेदना होऊ लागल्या. 5 ते 7 मिनीटे डोळयामध्ये सुईसदृश्य टोचल्यामुळे झालेल्या प्रचंड वेदनामुळे तक्रारदारा आरडाओरडा करीत होता. त्यावेळी डोळयातील घाण काढली आहे. तुम्हास लवकरच बरे वाटेल असे सांगून वेदनाशामक गोळया देऊन घरी पाठवले. तक्रारदाराचे कथनाप्रमाणे सामनेवाला डॉक्टरांनी उपचार करणेपूर्वी नजर शाबूत होती. मात्र उपचारानंतर वेदना कमी झाल्या नाहीत व दृष्टी कमी झाली. तक्रारदाराचे सदर कथनाचा विचार करता सामनेवाला डॉक्टरांनी आपले म्हणणेमध्ये तक्रारदाराचे डोळयास दि.14/07/2009 रोजी पाखरु थडकून जखम झाली होती. दि.23/07/09 रोजी तक्रारदार उपचाराकरिता कुर गावाहून कोल्हापूर येथे आले. सदर 10 दिवसांचे कालावधीमध्ये तक्रारदाराने डोळयाचे जखमेबाबत नेमके काय केले याची योग्य माहिती न देता केवळ 10 दिवसांत कोणतेतरी आय ड्रॉप्स वापरले इतकीच माहिती तक्रारदाराने दिलेचे प्रतिपादन केले आहे. तक्रारदार सामनेवालांकडे आला त्यावेळी त्याची नजर vision C.F. 4 Mtrs असलेचे आढळले. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे प्रमाणित योग्य नजर ही 6/6 स्नेलन चार्ट प्रमाणे असते. तक्रारदार आला त्याचवेळी त्याची नजर अत्यंत कमी व धुसर झालेली होती. जवळजवळ 8 ते 10 दिवस नजर अत्यंत अंधूक असतानाही तक्रारदार ड्रायव्हींग सारखे काम करीत होते. यामध्ये तक्रारदाराचा निष्काळजीपणा व बेदरकारपणा दिसून येतो. दि.23/07/09 रोजी तक्रारदाराचा डोळा लाल झाला होता. डोळा टोचत होता. दृष्टी अंधूक झाली होती. त्यास असहय वेदना होत होत्या. तसेच डोळयावर सूजदेखील होती. तक्रारदाराचे डोळयामध्ये फॉरेन बॉडी (इन्सेक्ट विंग्ज-पाखरु) खोलवर रुतल्याने बुब्बुळास खोलवर जखम झाली होती. त्यामुळे डोळयाला सुज जखम व फंगल इन्फेक्शनही झालेले होते. अशावेळी फॉरेन बॉडी काढणे अत्यावश्यक ठरते व त्याप्रमाणे फॉरेन बॉडी काढली तरी संसर्ग, जखम इत्यादी बरे होऊ शकते. सामनेवाला डॉक्टरांनी टॉपिकल पॅराकेन हे स्थानिक बधीरीकरणाचे दोन थेंब औषध टाकून फॉरेन बॉडी काढणेसाठी स्लेट लॅम्प मशीनचे सहायाने डिस्पोजेबल क्र.26 चे सुईने सदरची फॉरेन बॉडी काढणेचे उपचार केले. सदर फॉरेन बॉडी योग्यरित्या काढून टाकून बिटाडीन औषध डोळयात थेंब व मलम घालून निर्जंतूक केलेल्या पॅडचे सहायाने ड्रेसिंग केले व योग्य औषध लिहून देऊन दररोज तपासणीसाठी येणेची सुचना दिली. तसेच संपूर्ण विश्रांती घेणेबाबत बजावले. तक्रारदार व सामनेवाला डॉक्टर यांचे कथनाचा विचार करता व उपलब्ध वैद्यकीय साहित्यचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे डोळयामध्ये फॉरेन बॉडी (इन्सेक्ट विंग्ज-पाखरु) 8 ते 10 दिवसांपासून रुतून बसले होते. सदर फॉरेन बॉडी काढणेसाठीची योग्य ती वैद्यकीय प्रक्रिया सामनेवालांचे डॉक्टरांनी केलेचे दिसून येते. तक्रारदार दि.23/07/09 रोजी उपचार केलेनंतर दररोज येणेस सांगितले होते. मात्र तक्रारदार दि.24 ते 26/07/09 पर्यंत तपासणीकरिता आला होता. त्याप्रमाणे त्यांची तपासणी करुन आय ड्रॉप्सचे डोस डोळा ड्रेसिंग करणे इत्यादी औषधोपचार केलेले आहेत. मात्र औषधोपचार करुनही डोळयामध्ये अपेक्षित सुधारणा न वाटल्यामुळे डॉक्टर महेश दळवी यांचेकडे सेकंड ओपिनियनसाठी पाठवणेचे ठरवले. चौथ्याच दिवशी तक्रारदारास डॉ. दळवी यांचेकडे पाठवले. तक्रारदाराने डॉक्टर महेश दळवी यांचे केस पेपर कार्ड दाखल केलेले नाही. केवळ दोन प्रिस्क्रीप्शन दाखल केलेले आहेत. त्यामुळे तक्रारदार हे डॉक्टर दळवी यांचेकडे कधी तपासणीसाठी गेला हे स्पष्ट होत नाही. अथवा तक्रारदाराने तक्रारीत तो कधी डॉक्टर दळवी यांचेकडे हे नमुद केलेले नाही. वरील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला डॉ. संजय घोटणे यांनी वैद्यकीय शास्त्राप्रमाणे फॉरेन बॉडी काढणेची प्रक्रिया केलेली आहे. तसेच चार दिवसांत सुधारणा न आलेने त्वरीत सेकंड ओपिनियनसाठी डॉ. महेश दळवी यांचेकडे पाठवणेबाबत कार्यवाही केलेचे दिसून येते. सदर कार्यवाही ही रुग्णाच्या काळजीपोटीच केलेली आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. डॉक्टर महेश दळवी यांनी इंजेक्शन,गोळया आय ड्रॉप्स देऊन दोनवेळा तक्रारदारावर उपचार केलेचे नमुद केले आहे. तदनंतरही तक्रारदाराचे वेदना कमी झाल्या नाहीत व दृष्टी पूर्ववत न झालेने तक्रारदाराने पुन्हा सामनेवालांशी संपर्क साधला असता त्याचेवर 8 ते 10 दिवस सामनेवाला डॉक्टरांनी उपचार केलेचे नमुद केले आहे. मात्र तदनंतर उपचार केलेची बाब सामनेवाला डॉक्टरांनी आपले म्हणणेमध्ये दि.29/07/09 रोजी तक्रारदार पुनश्च उपचारासाठी आले असता डोळयातील लाली थोडीशी कमी आली होती. बुब्बुळचा धुसरपणा कमी आला होता व दृष्टी काही प्रमाणात सुधारली होती. तदंनतर तक्रारदार हे दि.03/08/09 व 06/08/09रोजी आले असता अपेक्षित सुधारणा न झालेने ब्लड शुगर टेस्ट करुन घेतली त्याचे रिपोर्ट नॉर्मल आहे. त्यावेळी दि.08/08/09 रोजी तक्रारदारांना कॉर्निअल स्क्रेपींग करणेचा सल्ला दिला. तदनंतर तक्रारदार पुन्हा कधीही सामनेवाला डॉक्टरांकडे उपचारासाठी आलेले नाहीत. तसेच सामनेवाला डॉक्टरांना कोणतीही सुचना न देता डॉक्टर चंद्रशेखर शाळीग्राम यांचेकडे परस्पर उपचारासाठी गेलेचे प्रतिपादन केले आहे. सामनेवाला यांनी दि.04/12/2010 रोजी तक्रारदाराचे डोळयावर डॉ. महेश दळवी, डॉ.शाळीग्राम डॉ. अतूल जोगळेकर यांनी केलेल्या वैद्यकीय उपचाराचे केसपेपर दाखल करणेसाठी त्यांना साक्षीसमन्सचा आदेश व्हावा अशी विनंती केली होती.त्याप्रमाणे वर नमुद डॉक्टरांनी उपचारा बाबतचे केसपेपर, अनुषंगिक कागदपत्रे, प्रिस्क्रिप्शन दाखल करणेबाबत आदेश केलेला होता. त्याप्रमाणे वैद्यकीय कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहेत.सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता डॉ.महेश दळवी यांनी दाखल केलेल्या केसपेपरचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे कॉर्निअल अल्सर बाबत नोंद केलेली आहे. तसेच त्यादृष्टीने औषधोपचार केलेले आहेत. डॉ.शाळीग्राम यांनी डोळयामध्ये सुज असलेचे तसेच कॉर्निअल फंगल अल्सर बाबत नमुद केलेले आहे व त्याअनुषंगीक दि.09/09/09 पासून उपचार केलेले आहेत. तसेच दि.20/10/2010 रोजी डॉ. शाळीग्राम यांनी मेडिकल रिपोर्ट दिलेला आहे. सदर रिपोर्टनुसार फंगल, कॉर्निअल अल्सर झालेचे नमुद केलेले आहे. दि.18/10/2010 रोजी तक्रारदाराने डॉ.शाळीग्राम यांना उपचाराची माहिती देणेबाबत विनंती पत्र दिलेले आहे. सदर मेडिकल रिपोर्टचे अवलोकन केले असता सदर रिपोर्टमध्ये डॉ.संजय घोटणे यांनी निष्काळजीपणा केला आहे असे कुठेही नमुद केलेले नाही. डॉ.जोगळेकर यांनी तक्रारदारावर दि.20/09/2009 पासून उपचार केलेले आहेत. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता डाव्या डोळयाचे शस्त्रक्रियेबाबत संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना दिलेचे नमुद असून त्याखाली तक्रारदाराची सही दिसून येते. सदर डॉ.जोगळेकर यांनी प्रथमत: डोळयातील जखम बरी करुन तदनंतर डोळयाच्या बाहूली बदलणेबाबतचे ऑपरेशन केलेले आहे. तक्रारदाराने दि.23/11/2010 रोजी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये कलम 4 मधील डॉ.शाळीग्राम,डॉ.जोगळेकर यांनी केलेल्या उपचारामुळे डोळयातील जखम बरी झाली मात्र दृष्टी परत आली नाही. सदरची दृष्टी सामनेवाला डॉक्टरांनी चुकीच्या पध्दतीने व निष्काळजीपणाने केलेल्या उपचारामुळे गमवावी लागली. यास डॉक्टरांची सेवेतील गंभीर त्रुटी कारणीभूत आहे असे प्रतिपादन केले आहे.ऋ वरील वस्तुस्थिती दाखल वैद्यकीय कागदपत्रे, वैद्यकीय साहित्य इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराचे डोळयास पाखरु थडकून जखम झालेली होती. तसेच सदर फॉरेन बॉडी 8 ते 10 दिवस तक्रारदाराचे डोळयात रुतून बसली होती. अशा अवस्थेत तक्रारदाराने ड्रायव्हींग केलेले आहे. तदंनतर डोळा टोचत असलेने सामनेवाला डॉक्टरांकडे उपचारासाठी आलेनंतर सामनेवाला यांनी वैद्यकीय शास्त्राप्रमाणे फॉरेन बॉडी काढणे व तदनंतर योग्य ते उपचार केलेले आहेत. फॉरेन बॉडी काढणेसाठी डिस्पोजल असणारे सुईने फॉरेन बॉडी काढून टाकलेली आहे व तदनंतर आय ड्रॉप्स, ड्रेसींग मलम याबाबत योग्य औषधोपचार केलेले आहेत. यामध्ये चुकीचे औषधोपचार अथवा चुकीची प्रक्रिया केलेचे निदर्शनास आलेले नाही हे Parson’s Diseases of the Eye च्या Twentieth Editionच्या पान नं.363 वरील Treatment चे अवलोकन केले असता उपचारामध्ये सामनेवाला डॉक्टरांनी चुकीची प्रक्रिया अथवा चुकीचे औषधोपचार केलेचे निदर्शनास आलेले नाही. डॉ.जोगळेकर यांनी तक्रारदाराचे बुब्बुळास झालेली जखम बरी केलेनंतर डोळयाची बाहूली बदलणेबाबतची शस्त्रक्रिया केलेली आहे. याचा विचार करता तक्रारदाराचे झालेल्या डोळयातील जखम ही फॉरेन बॉडीमुळे झाली की डॉक्टरांचे सुईने पोखरण्यामुळे झाली हे वर नमुद डॉ. दळवी, डॉ.शाळीग्राम, डॉ;जोगळेकर यांनी आपल्या वैद्यकीय कागदपत्रामध्ये कुठेही नमुद केलेले नाही. मात्र डॉ.दळवी व डॉ. शाळीग्राम यांनी कॉर्निअल फंगल अल्सर नमुद केलेले आहे. Clinical Application of Antibiotics and Anti-inflammatory drugs in Opthalmology Editor-Ashok Gare and Others च्या पान नं.281 Infection and Ulceration या वैद्यकीय साहित्याचे अवलोकन केले असता Inappropriate use of topical steroids by patient and registered medical practitioners lead to infectious keratitis especially herpetic keratitis. चा विचार करता अशाप्रकारची घटना तक्रारदाराचे बाबतीत घडलेली नाही. तसेच चुकीचे ड्रग्ज अथवा औषधे डॉक्टरांनी दिले अशीही तक्रारदाराची तक्रार नाही. तर अॅन्टीबॉडीज काढताना सुई सदृश्य वस्तुने टोकरलेने झालेल्या जखमांमुळे दृष्टी गेल्याचे तक्रारदाराने तक्रारीत प्रतिपादन केलेले आहे. याचा विचार करता वादाकरिता अशा प्रकारची जखम झाली असली तर डॉक्टर जोगळेकर यांचेकडून केलेल्या उपचारामुळे डोळयातील जखमांवर टाके घातले सदर जखम बरी झाली. मात्र शस्त्रक्रिया करुनही दृष्टी मिळाली नाही असे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता प्रस्तुत तक्रारदाराची दृष्टी ही या जखमांमुळे गेली असे म्हणता येणार नाही. याउलट डोळयामध्ये 8 ते 10 दिवस अॅन्टी बॉडीज असतानाही तक्रारदाराने ड्रायव्हींग केलेले आहे. डोळा हा शरिरातील अत्यंत नाजूक व संवेदनशील असा अवयव आहे. सदर अॅन्टीबॉडीज डोळयात खोलवर रुतल्याने डोळयात जखम झाली होती ही वस्तुस्थिती नाकरता येत नाही. यासाठी Principles and practice of Opthalmology -Second Edition- By-Daniel M. Albert and Others या दाखल केलेल्या वैद्यकीय साहित्याचे अवलोकन केले असता Delayed Wound Healing and Effects on Corneal repithelialization चा विचार करता तक्रारदाराची दृष्टी जाणेस सदर घटना ही जबाबदार आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. तक्रारदाराचे डोळयास पाखरु घडकून झालेल्या जखमेवर सामनेवालां डॉक्टरांचे बरोबरच नमुद डॉक्टरांनी उपचार करुनही तक्रारदारास दृष्टी प्राप्त झाली नाही ही दूदैवाची बाब आहे. मात्र प्रस्तुत दृष्टी ही सामनेवाला डॉ. घोटणे यांनी केलेल्या उपचारामुळे गेली असा कोणताही सबळ वैद्यकीय पुरावा मे. मंचासमोर आलेला नाही. तसेच सामनेवाला यांचे कशी चुकीची उपचारपध्दती होती अथवा त्यांनी चुकीचे औषधे दिली असे निदर्शनास आलेले नाही. वादाकरिता चुकीची उपचारपध्दतीमुळे तक्रारदाराची दृष्टी गेली त्यामुळे डोळयाची दृष्टी गेली याबाबतचा कोणताही वैद्यकीय तज्ञ मताचा पुरावा दिलेला नाही. असा पुरावा देणेची जबाबदारी तक्रारदाराची होती. त्याबाबत तक्रारदाराने कार्यवाही केलेली नाही. उलटपक्षी तक्रारदाराने व्ही किशनराव वि.निखिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व इतर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले वैद्यकीय निष्काळजीपणा बद्दलचे पूर्वाधार 2010(5)Mh.L.J.52 SC दाखल केलेला आहे. सदर पूर्वाधारातील कलम बी मधील res ipsa loquitur या तत्वाचा आधार घेतलेला आहे. याचा विचार करता प्रस्तुत पूर्वाधार सदर केससाठी तंतोतंत लागू होत नाही. कारण res ipsa loquitur या तत्वाचा विचार करता प्रथम दर्शनीच वैद्यकीय निष्काळजीपणा झालेचे निदर्शनास येत नाही. तसेच त्यासाठी वैद्यकीय तज्ञ मताचा पुरावा जरुरीचा आहे. सबब वरील वस्तुस्थितीचा विचार करता, तसेच दाखल पुरावा व वैद्यकीय साहित्याचा विचार करता सामनेवाला डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेत कोणताही निष्काळजीपणा केला नसलेबाबतचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेल्या वैद्यकीय सेवेमध्ये कोणताही निष्काळजीपणा केला नसलेने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |