उपस्थित : तक्रारदारांतर्फे : अॅड. श्री. मलठणकर
जाबदारांतर्फे : अॅड. श्री. कोतमिरे
*****************************************************************
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती सुजाता पाटणकर
// निकालपत्र //
(1) तक्रारदारांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
तक्रारदार हे मे. कोर्टाच्या स्थळसिमेत मौजे वडापुरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील रहिवासी असून त्या ठिकाणी ते आपल्या पती व मुलांसमवेत राहतात. जाबदार हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे इंदापूर जिल्हा पुणे येथे मनिषा नर्सिंग होम या नावाचे क्लिनीक आहे. जाबदार हे स्त्री रोग तज्ञ आहेत. त्यांचेकडे प्रसुती शास्त्र, स्त्रीरोग चिकीत्सा या रोगावर सोनोग्राफी सुविधा असून त्यामध्ये जाबदार हे प्रवीण आहेत.
तक्रारदार ही जाबदार यांचेकडे उपचारासाठी येत होती. त्यावेळी जाबदार यांनी तक्रारदार ही गरोदर असल्याचे सांगितले व तिचे सोनोग्राफी करुन गर्भामध्ये जुळी मुले असल्याचे सांगितले व सदर गर्भामध्ये मुलांची वाढ योग्य रितीने होत असल्याचे सांगितले. जाबदार यांचे म्हणण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार अर्चना ही वेळोवेळी जाबदार यांचे सांगणेवरुन औषधोपचार करुन सोनोग्राफी करुन घेत असे. जाबदार यांनी गर्भातील असणा-या जुळया मुलांची वाढ व स्थिती योग्य असून तक्रारदार अर्चना हिस प्रसुतीची तारीख 2/11/2008 सांगितली. दि. 5/10/2008 रोजी तक्रारदार हिचे पोटात अचानक दुखु लागल्याने तिचे सासरे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यावेळी तक्रारदार हिस नैसर्गिकरित्या प्रसुती होऊन मुलगा झाला व गर्भात असणारे दुसरे अपत्य आडवे झाले असून त्यासाठी तक्रारदार हिचे ऑपरेशन (सिझर) करणे गरजेचे असलेबद्दल जाबदार यांनी सांगितले; तसे न झाल्यास अर्चनाच्या जिवास धोका निर्माण होईल अशी भिती दाखविली. त्यावेळी अर्चना हिचे सासरे घाबरुन जाऊन त्यांनी तिचे ऑपरेशन करण्यास सहमती दिली. त्यानंतर जाबदार यांनी तिचे ऑपरेशन केले. यानंतर तिची स्थिती अत्यंत नाजूक असून तिचेवर उपचार करण्यास असमर्थ आहे तरी येथून पेशंटला हलविण्यास सांगून जाबदार यांनी पुढील उपचार करणेस नकार दिला. त्यावेळी तक्रारदार हिचे सासरे यांना तक्रारदार हिस आश्विनी हॉस्पिटल, अकलुज येथे डॉ. एस्.के. इनामदार यांचेकडे नाईलाजाने अॅडमिट करणे भाग पडले. जाबदार यांच्या निष्काळजीपणामुळे व पेशंटची असणारी वस्तुस्थिती तक्रारदार व घरच्यांपासून लपवून ठेवल्याने तक्रारदार हिच्या जिवाशी जाबदार खेळल्यामुळे तिला तीन महिने डॉ. इनामदार यांचे हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. दरम्यानचे कालावधीमध्ये डॉ. इनामदार यांची फी व मेडिेकल चार्जेस मिळून रु.3,75,000/- मेडिकलमधील औषधे, ब्लडबँकेतील रक्त रु.1,50,000/- इतका खर्च करावा लागला. तरी आजतागायत अर्चना हिची शारीरिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे फार मोठे आर्थिक नुकसान, शारीरिक नुकसान झाल्याने तक्रारदार यांना फारमोठा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. याबाबत तक्रारदार यांनी त्यांचे सास-यांमार्फत जाबदार यांना दि.9/3/2009 रोजी वकीलांमार्फत नोटीस देऊन नुकसानभरपाईची मागणी केलेली होती. सदर नोटीसीस जाबदार यांनी खोटे उत्तर देऊन तक्रारदार यांचे झालेले नुकसानभरपाई देणेस हेतूपुरस्सर नाकारले.
तक्रारदार ही जाबदार यांची ग्राहक आहे तिला पुरविलेल्या वैद्यकीय सेवेमध्ये जाणीवपूर्वक कसुर करुन तक्रारदार हिचे शारीरिक, मानसिक व आर्थिक असे अपरिमीत नुकसान झाले आहे त्यामुळे तक्रारदार यांना प्रस्तूतचा अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. तरी तक्रारदार यांचे झालेले नुकसान व खर्चाचा तपशिल खालीलप्रमाणे :-
अ. डॉ. एम.के. इनामदार यांचे व मेडिकल बिल :- रक्कम रु. 3,75,000/-
ब. मेडिकल औषधे रक्त यांचे बिल :- रक्कम रु. 1,50,000/-
क. जाबदार याने ग्राहक सेवेत केलेली चुक :- रक्कम रु. 1,00,000/-
ड. तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांना झालेला बेहद
मानसिक त्रास : रक्कम रु. 3,00,000/-
एकूण : रक्कम रु. 9,25,000/-
अर्जास कारण तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.9/3/2009 रोजी पाठविलेल्या नोटीसीस जाबदार यांनी दि. 31/3/2009 रोजी खोटे उत्तर पाठवून नुकसानभरपाई देण्याचे नाकारले तेव्हा व तेथूनपुढे निरंतर या मे. कोर्टाचे स्थळसिमेत घडले आहे.
वरील सर्व तपशिल व तक्रार अर्जातील इतर सविस्तर तपशिल यासह परिच्छेद कलम 7 मध्ये नमुद केल्याप्रमाणे रक्कम रु.9,25,000/- तक्रारदारास देणेचा जाबदाराविरुध्द हुकुम व्हावा अशी विनंती तक्रारदार यांनी त्यांचे तक्रार अर्जात केली आहे.
तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र, शंकरराव मोहिते पाटील ब्लडबँक अकलुज यांची बिले, तक्रारदारांची औषध खरेदीची बिले, तक्रारदारांनी वकीलामार्फत जाबदार यांना पाठविलेली नोटीस रजिस्टर पोहोच पावतीसह, जाबदार यांनी तक्रारदार यांना पाठविलेले नोटीस उत्तर, तक्रारदार यांची औषधखरेदीची बिले इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी दि.4/3/2010 रोजी आश्विनी हॉस्पिटल अकलूज येथील डॉ. इनामदार यांचे डिसचार्ज समरी कार्ड निशाणी 16/1, 16/2, ट्रीटमेंट समरी निशाणी 16/3 ते 16/8 अन्वये दाखल केले आहे.
(2) जाबदार यांना मे. मंचाची नोटीस मिळाल्यानंतर हजर राहून त्यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करुन त्यांचे म्हणणे सादर केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज खोटा व चुकीचा असून या अर्जात हजर केलेली कागदपत्रे विशेषत: तक्रारदार यांची औषध खरेदीची बिले जाबदार यांना मान्य व कबुल नाही. तसेच तक्रारदार यांचे कथित नुकसान व खर्चाचा तपशिल रक्कम रु.9,25,000/- हा धादांत खोटा व चुकीचा असून तो तपशिल जाबदार यांना मान्य व कबूल नाही.
जाबदार हे एम्.डी. स्त्री रोग तज्ञ आहेत व गेले 21 वर्षांपासून इंदापूर येथे त्यांचे हॉस्पिटल असून गेले 21 वर्षांत त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या डिलीव्हरी केसेस हॅण्डल केलेल्या आहेत. त्यामुळे जाबदार यांचा नावलौकिक आहे. अर्जदार हिचा पती लक्ष्मीकांत व अर्जदार हे जाबदार यांचे नर्सिंग होममध्ये त्यांना मुल होत नव्हते म्हणून उपचार घेण्यासाठी आले होते. उपचार सुरु केल्यानंतर त्यात यश येऊन अर्जदार हिला दिवस गेले होते. त्याचे निदान दुस-या महिन्यातच केले होते. अर्जदार हिला जुळा गर्भ असल्यामुळे जाबदार यांनी अर्जदार व तिचे पती यांना सदर गर्भाची पूर्ण काळजी घेण्यास म्हणजेच सकस आहार, पुरेशी विश्रांती, वेळेवर औषध घेणे इ. बाबत माहिती दिली. जुळी मुले असल्याने रक्तदाब वाढणार आहे त्यावर औषधोपचार करणेबाबत सुचना दिल्या. तसेच गर्भाशयाचे तोंड मोठे असल्याने त्याची कल्पना देऊन गर्भाशयास टाका दिला. सातव्या महिन्यामध्ये अर्जदार यांचा रक्तदाब वाढल्यामुळे जाबदार यांनी अर्जदार हिला व तिचे पतींना बोलावून रक्तदाबाबाबत विशेष खबरदारी घेणेबाबत म्हणजेच पूर्ण विश्रांती, वेळेवर औषध घेणे, मीठ कमी करणे, त्रास झाल्यास ताबडतोब संपर्क साधणे याबाबत सुचना दिल्या होत्या. कारण गरोदरपणात रक्तदाब वाढणे ही लक्षणे गरोदर स्त्रीसाठी धोकादायक असतात व जुळा गर्भ असल्यास या आजाराची तीव्रताही जास्त असते याचीही पूर्वकल्पना अर्जदार यांना दिली होती. अर्जदार हिला रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे जाबदार हे अर्जदार हिचा रक्तदाब व इतर शारीरिक बदल तसेच गर्भाची वाढ यावर लक्ष ठेवून होते. त्यासाठी अर्जदाराचे वेळोवेळी रक्त, लघवी तपासणे, सोनोग्राफी इत्यादी गोष्टी करुन जाबदार यांनी औषधोपचार दिलेले आहेत. दि.5/10/2008 रोजी अर्जदार ही जाबदार यांचे दवाखान्यात आली असता तपासणी करुन प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. सदर तपासणीमध्ये जुळयापैकी पहिले बाळ हे गर्भाशयातच तिरके असल्यामुळे नैसर्गिक प्रसूती शक्य नसल्याने सिझेरियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जाबदार यांचे दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याने त्यांचे दवाखान्यातच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी भूलतज्ञ डॉ. के.बी. शेंडे तसेच बालरोगतज्ञ डॉ.एल.एस. कदम यांना बोलावण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर अर्जदार हिस 2.5 किलोचा मुलगा व 2..2 किलोची मुलगी झाली. डॉ.कदम यांनी दोन्ही बाळांची तपासणी करुन प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. अशात-हेने जाबदार यांनी सर्व काळजी घेऊन अर्जदार हिची प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली. अर्जदार हिचे प्रसूतीनंतर अर्जदार हिचा रक्तदाब अपेक्षेएवढा कमी झाला नसल्यामुळे जाबदार यांनी अर्जदार हिस तपासणीसाठी हृदयरोग तज्ञ डॉ. अविनाश पानबुडे यांना बोलावले, त्यावेळी डॉ. पानबुडे यांनी अर्जदार हिची तपासणी करुन सिटीस्कॅन व एम.आर.आय. करण्याची सुचना दिली. तसेच जाबदार व डॉ. पानबुडे यांनी अर्जदार हिस डॉ. इनामदार यांचेकडे सिटीस्कॅन व एम.आर.आय. ची सुविधा असल्यामुळे जाण्याचा सल्ला दिला. तसेच अर्जदार हिस अकलुज येथे अॅडमिट करण्यासाठी अॅम्ब्यूलन्स बोलावून डॉ. इनामदार व डॉ. पानबुडे यांचेशी चर्चा करुन अर्जदार हिस डॉ. इनामदार यांचेकडे स्वत: अॅडमिट केले. त्यानंतरही जाबदार हे अर्जदार यांची चौकशी करत होते. तसेच डॉ. इनामदार यांचेशी फोनवरुन संपर्क साधत होते. जुळया बाळांच्या गर्भामुळे अर्जदाराच्या वाढलेल्या रक्तदाबामुळे अर्जदाराच्या मेंदूमधील शिरांमध्ये रक्ताची गुठळी तयार झाली होती त्यामुळे अर्जदार हिला अकलूज येथे हालवून डॉ. इनामदार यांचेशी चर्चा करुन उपचार सुरु केले. जाबदार यांनी अर्जदार हिचेवर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर (सिझेरियन) तिची दोन्ही मुले सुखरुप आहेत. परंतु अर्जदार हिचे मेंदूमध्ये रक्ताची गुठळी ही जुळया बाळाच्या रक्तदाबामुळे झाली व त्यामध्ये जाबदार यांचा औषधोपचाराची कमतरता वा इतर कसलाही हात नाही. अर्जदाराचे सासरे यांनी जाबदार यांना जी नोटीस पाठविली ती नोटीस पाठविण्याचा वा प्रस्तूत अर्ज दाखल करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. कारण अर्जदाराच्या कोणत्याही तपासणीच्या वेळेस तसेच अर्जदारास अॅडमिट करताना, तिची शस्त्रक्रिया करताना अर्जदाराचे सासरे केव्हाही हजर नव्हते अथवा ते दवाखान्यात देखील केव्हाही चौकशीसाठी आले नव्हते. त्यामुळे अर्जदाराच्या सास-यांना अर्जदाराची प्रकृती, जाबदारांनी केलेले उपचार याबाबत काहीएक माहिती नाही. एवढेच नव्हेतर अर्जदाराने जाबदारांचे तिच्या सिझरिंगचे हॉस्पिटल व इतर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी याचे बील देखील अद्याप दिले नाही. जाबदार यांनी अर्जदार हिला दिलेल्या औषधोपचाराची सर्व कागदपत्रे या प्रतिज्ञापत्रासोबत दाखल केली आहेत. कथित प्रकाराच्या बाबत सदरचा खटला मुखत्यारपत्रावर कायद्याने चालविता येणार नाही. जाबदार यांनी अर्जदार हिला वैद्यकीय सेवा देण्यात कसलाही कसुर केलेला नाही. त्यामुळे अर्जदार हिचा अर्ज खर्चासह नामंजूर व्हावा असे जाबदारांनी त्यांच्या शपथपत्राच्या म्हणण्यामध्ये नमुद केले आहे. जाबदारांनी त्यांच्या लेखी म्हणण्यासोबत अर्चना गायकवाड यांची ब्रीफ केस हिस्ट्री रिपोर्ट, इनडोअर केस रेकॉर्ड दि. 5/10/2008, संमतीपत्र दि.5/10/2008, अर्जदार हिचे मनिषा नर्सिंग होम येथील दि. 5/10/2008 ते दि. 6/10/2008 रोजीचे इनडोअर केस पेपर्स, भूलतज्ञाचे रेकॉर्ड इ. कागदपत्रे त्यांच्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ दाखल केली आहेत.
(3) जाबदारांनी त्यांचे म्हणणे दाखल केल्यानंतर तक्रारदारांनी त्यांचे शपथपत्र दाखल करुन जाबदारांच्या लेखी कैफियतीतील सर्व कथने नाकारलेली आहेत.
(4) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारअर्ज, म्हणणे, दाखल कागदपत्रे व तक्रारदारांचा लेखी युक्तिवाद व इतर संबंधित कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे
(points for Consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
मुद्दाक्र . 1:- जाबदार यांनी तक्रारदार यांना वैद्यकीय
सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? ... नाही.
मुद्दाक्र . 2:- काय आदेश ? ... अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन :-
(5) सदरहू प्रकरणात सौ. अर्चना गायकवाड यांनी त्यांचे सासरे श्री. मुरलीधर विठ्ठल गायकवाड यांना त्यांचेवतीने सदरची केस चालविण्यास मुखत्यारपत्र लिहून दिलेले आहे. त्याची साक्षांकित प्रत याकामी दाखल आहे.
(6) तक्रारदार हे या मे. मंचामध्ये तक्रारदार यांना त्यांचे प्रसूतीनंतर कराव्या लागणा-या वैद्यकीय उपचारासाठीचा खर्च जाबदार यांचेकडून मिळावा अशी तक्रार घेऊन आलेले आहेत. तक्रारदार यांची जाबदार यांचे हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेली आहे. सदर प्रसूतीपूर्वी म्हणजेच गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत तक्रारदार हे वेळोवेळी जाबदार यांचे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नियमित येत होते त्या-त्या वेळी जाबदार हे तक्रारदार यांची योग्य ती तपासणी करुन औषधोपचार देत होते. तक्रारदार यांची प्रसूती जाबदार यांचे हॉस्पिटलमध्ये झालेबाबतचे केसपेपर्स जाबदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यासोबत दाखल केलेले आहेत. तक्रारदार हे जाबदार यांचेकडे गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत औषधोपचारासाठी येत होते व त्यानंतर तक्रारदार यांची प्रसूती जाबदार यांचे हॉस्पिटलमध्ये झालेली आहे ही बाब जाबदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणेव शपथपत्रामध्ये नाकारलेली नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून वैद्यकीय सेवा घेतलेली आहे ही बाब दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे, याचा विचार होता तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
(7) तक्रारदार यास जाबदार यांनी पुरविलेल्या वैद्यकीय सेवेमध्ये कसुर केल्यामुळे तक्रारदार यांचे डॉ. एम्.के. इनामदार यांचे व मेडिकल बील रु.3,75,000/- मेडिकल औषधे, रक्त यांचे बील रु.1,50,000/- जाबदार यांनी ग्राहक सेवेत केलेली चुक रु.1,00,000/- तक्रारदार व त्याचे कुटुंबियांना झालेला बेहत मानसिक त्रास यासाठी रक्कम रु.3,00,000/- असे एकूण रु.9,25,000/- नुकसानभरपाई म्हणून जाबदार यांचेकडून मिळणेसाठी अर्जदार यांनी प्रस्तूतचा अर्ज या मे. मंचामध्ये दाखल केलेला आहे. सदरच्या अर्जामधील तक्रारदार यांच्या कथनानुसार तक्रारदार ही जाबदार यांचेकडे उपचारासाठी प्रथमपासून ते प्रसूती होईपर्यंत जात होती. हीच बाब जाबदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये म्हणजेच अर्जदार ही जाबदार यांचेकडे मुल होत नव्हते म्हणून उपचारासाठी येत होती; उपचार सुरु झालेनंतर अर्जदार हिला दिवस गेलेनंतर ते प्रसूती होईपर्यंत अर्जदार ही जाबदार यांचेकडे वैद्यकीय उपचारासाठी येत होती असे नमुद केलेले आहे. जाबदार यांनी निशाणी 24 अन्वये दाखल केलेल्या ओ.पी.डी. व्हिजीट हिस्ट्रीवरुन अर्जदार ही जाबदार यांचेकडे वेळोवेळी वैद्यकीय उपचारासाठी येत होती ही बाब स्पष्ट होत आहे. जाबदार यांनी मनिषा नर्सिंग होम याचे इनडोअर केस रेकॉर्ड दि. 5/10/2008 ते दि. 6/10/2008 चे निशाणी 25 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांचेवर तक्रारदार या प्रसूतीसाठी दि. 5/10/2008 रोजी अचानक पोट दुखु लागल्याने हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर अर्जदार हिचे पतीने दिलेले संमतीपत्र निशाणी 25/1 अन्वये जाबदारांनी दाखल केले आहे. सदर संमतीपत्राचे अवलोकन केले असता अर्जदारावर उपचार करताना येणा-या संभाव्य घटनांची व दुष्परिणामांची माहिती जाबदारांनी तक्रारदार यांना दिलेली आहे व ते मान्य असल्याबाबत तक्रारदार यांचे पतीने सदर संमतीपत्रावर सही केली असल्याचे दिसून येत आहे.
(8) तक्रारदार यांनी प्रस्तूतच्या तक्रार अर्जामध्ये जाबदारांविरुध्द कलम 7 मध्ये नमुद केल्याप्रमाणे झालेल्या नुकसानीची रक्कम जाबदार यांचेकडून मिळावी अशा आशयाची विनंती त्यांच्या विनंती कलमामध्ये केलेली आहे. तक्रारदार यांच्या अर्जातील कथनानुसार जाबदार हे स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यांचेकडे प्रसूतीशास्त्र, स्त्रीरोग चिकीत्सा या रोगांवर सोनोग्राफी सुविधा असून त्यामध्ये जाबदार हे प्रवीण आहेत. तक्रारदार हे जाबदार यांचेकडे गरोदर असल्याच्या पूर्वीपासून उपचारासाठी येत होते. तक्रारदार ही गरोदर असल्याचे जाबदार यांनी तक्रारदार हिला सांगितले तसेच तिची सोनोग्राफी करुन गर्भामध्ये जुळी मुले असल्याचे सांगितले. तेव्हापासून प्रसूती होईपर्यंत तक्रारदार ही जाबदार यांचेकडे औषधोपचारासाठी येत होती. दि.5/10/2008 रोजी तक्रारदार हिचे पोटात अचानक दुखु लागल्याने तक्रारदार हिचे सासरे तक्रारदार हिस हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यावेळी तक्रारदार हीस दोन जुळी अपत्ये म्हणजेच एक मुलगा व एक मुलगी झाली. तक्रारदार हिची प्रसूती ही सिझेरियन करुन जाबदार यांनी केलेली आहे. तक्रारदार ही जाबदार यांचे हॉस्पिटलमध्ये दि.5/10/2008 रोजी प्रसूतीसाठी अडमिट झाल्यानंतर तिला दोन अपत्ये झाली. निशाणी 16/1 येथे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या आश्विनी हॉस्पिटल डिसचार्ज समरी कार्ड प्रमाणे Accelerated Ht c purperial stroke, Brain stern inforced c septicaemia, ARF या कारणासाठी तक्रारदार हिस जाबदार यांचे हॉस्पिटलमधून आश्विनी हॉस्पिटल येथे दि. 6/10/2008 रोजी हलविण्यात आल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट झालेले आहे. समरी कार्डमधील डायग्नोसिसमध्ये नमुद केलेल्या आजारावर तक्रारदार हिचेवर आश्विनी हॉस्पिटल येथे डॉ. इनामदार यांचेमार्फत उपचार झालेले आहेत. तक्रारदार ही आश्विनी हॉस्पिटल येथे दि. 6/10/2008 ते दि.9/1/2009 या कालावधीकरिता डॉ. इनामदार यांचे देखेरेखीखाली औषधोपचार घेत असल्याचे निशाणी 16/1 अन्वये दाखल केलेल्या डिसचार्ज समरी कार्डवरुन दिसून येत आहे. तक्रारदार यांना डॉ. इनामदार यांनी दिलेल्या डिसचार्ज समरी कार्डवरील डायग्नोसिसमध्ये Accelerated Ht c purperial stroke, Brain stern inforced c septicaemia, ARF असे नमुद केल्याचे दिसून येत आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या वैद्कीय सेवेतील त्रुटीमुळे किंवा जाबदार यांनी दिलेल्या चुकीच्या औषधोपचारामुळे Accelerated Ht c purperial stroke, Brain stern inforced c septicaemia, ARF अशाप्रकारचा त्रास तक्रारदार यांना झाला हे तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत. म्हणजेच तक्रारदार यांना जाबदार यांनी दिलेला औषधोपचार चुकीचा होता अगर तक्रारदार यांना औषधोपचार देण्यामध्ये जाबदार यांचेकडून निष्काळजीपणा झाला अगर कोणत्याही प्रकारे कसुर झाला हे दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेला नाही. तक्रारदार हे प्रस्तूतची तक्रार जाबदार यांचेविरुध्द त्यांनी दिलेल्या वैद्यकीय सेवेतील कमतरतेबाबत घेऊन आलेले आहेत. तक्रारदार यांना जाबदार यांचेकडून वैद्यकीय सेवा देण्यात कमतरता राहिलेली आहे असे दर्शविणारा कागदोपत्री पुरावा म्हणजेच वैद्यकीय तज्ञ व्यक्तिचा तद्नुषंगिक अहवाल, शपथपत्र अगर इतर अनुषंगिक कागदोपत्री पुरावा या अर्जाचे कामी तक्रारदार यांचेकडून दाखल केलेला नाही. याउलट दि.23/7/2010 रोजी ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांचेमार्फत डॉ. जी.जे.खडसे, - प्रा.वि.प्र. क्ष-किरणशास्त्र, डॉ.सौ.एस्.सी.पुराणिक - प्रा.वि.प्र. शरीरविकृतीशास्त्र, डॉ. सौ. के.व्ही. केळकर - प्रा.वि.प्र. बधिरीकरणशास्त्र, डॉ.डब्लू.व्ही. सांबरे - प्रा.वि.प्र.स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र - डॉ. आर.टी. बोरसे, सह.प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, वैदृयकीय अधिक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांचा तज्ञ समितीचा अहवाल याकामी दि.26/7/2010 रोजी पोस्टाने मे. मंचाच्या आदेशानुसार प्राप्त झाला आहे. सदर अहवालामध्ये :-
“ उपलब्ध कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सौ. अर्चना लक्ष्मीकांत गायकवाड यांचेवर डॉ. संजय देशमुख, यांनी मनिषा नर्सिंग होम, इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे यांनी केलेल्या रोग निदानामध्ये व औषधोपचारामध्ये काहीही प्रकारच्या त्रुटी आढळून येत नाही. तसेच सदर रुग्णांस बाळंतपणानंतर झालेली गुंतागुंत ही प्रसुती पश्चा:त होऊ शकते. याबाबत औषधोपचार करणा-या डॉक्टरांचा यात काहीही दोष नाही तसेच हीगुंतागुंत आकस्मिक होत असल्यामुळे पूर्वानुमान करता येत नाही. एकंदरीत डॉ. संजय देशमुख यांना वरील गुंतागुंतीसाठी व परिणामासाठी जबाबदार धरता येत नाही.“
असे नमुद केले आहे. सदर अहवालावर डॉ. जी.जे.खडसे, - प्रा.वि.प्र. क्ष-किरणशास्त्र, डॉ.सौ.एस्.सी.पुराणिक - प्रा.वि.प्र. शरीरविकृतीशास्त्र, डॉ. सौ. के.व्ही. केळकर - प्रा.वि.प्र. बधिरीकरणशास्त्र, डॉ.डब्लू.व्ही. सांबरे - प्रा.वि.प्र.स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र - डॉ. आर.टी. बोरसे, सह.प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, वैदृयकीय अधिक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या सहया आहेत. सदरचा अहवाल दाखल झालेनंतर तक्रारदार यांनी सदर अहवालामधील निष्कर्ष खोडून काढणारा कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा या अर्जाचे कामी त्यांचे तक्रार अर्जातील कथनाचे पृष्टयर्थ दाखल केलेला नाही. अगर जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या वैद्यकीय सेवेतील कमतरतेमुळे अर्जदार यांना पुढील औषधोपचार घ्यावा लागला, हे दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा अर्जदार यांनी या अर्जाचे कामी या मे. मंचासमोर दाखल केला नाही. त्यामुळे सदर प्रकरणी दाखल झालेला ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या अहवालाचे अवलोकन केले असता सदरचा अहवाल हा तज्ञ व्यक्तिंचा अहवाल असल्याने सदर अहवालातील निष्कर्षाच्या आधारे जाबदार यांनी तक्रारदार यांना वैद्यकीय सेवा देण्यामध्ये कोणताही कसुर केलेला नाही ही बाब सिध्द झालेली आहे. वरील सर्व विवेचनाचा आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांचेतर्फे दाखल तज्ञ व्यक्तिंचा अहवाल व जाबदार यांनी लेखी युक्तिवादासोबत दाखल केलेल्या मा. वरिष्ठ न्यायालयाच्या निकालपत्रातील निष्कर्षांचे अवलोकन केले असता जाबदार यांनी तक्रारदार यांना वैद्यकीय सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
(9) तक्रारदार सौ. अर्चना गायकवाड यांचे शपथपत्र मुळ तक्रार अर्जासोबत दाखल नसल्याचे निदर्शनास आलेवरुन तक्रारदारांच्या प्रतिनिधींना सौ. अर्चना गायकवाड यांचे शपथपत्र दाखल करणेबाबतचे निर्देश दि.13/3/2012 रोजी देण्यात आले. मे. मंचाच्या निर्देशाप्रमाणे आज म्हणजेच दि. 19/3/2012 रोजी तक्रारदारांच्या प्रतिनिधींनी तक्रारदार सौ. अर्चना गायकवाड यांचे तक्रार अर्जापृष्टयर्थ शपथपत्र दाखल केलेले आहे.
(10) वर नमुद सर्व निष्कर्ष व विवेचनाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की,
// आदेश //
1. तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत काही आदेश नाहीत.
3. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना
नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.