तक्रारदार - स्वत:
जाबदारांतर्फे - अॅड.श्री. शिंदे
// निकाल //
पारीत दिनांकः- 06/05/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदार क्र. 1 यांना जुलै 2010 मध्ये लघवीला त्रास, जळजळ, आग होणे या तक्रारी सुरु होत्या म्हणून त्यांनी त्यांचे फॅमिली डॉक्टर प्रदीप शेवाळे यांना दाखविले असता, त्यांनी तक्रारदारांना रक्त व लघवीची तपासणी करुन घेण्याचा सल्ला दिला. त्या चाचण्या करुन घेतल्यानंतर, डॉ. शेवाळे यांना रिपोर्ट दाखविल्यानंतर डॉ. शेवाळे यांनी डॉ. साबळे यांच्याकडे जाण्याचा सल्ला तक्रारदारांना दिला. त्यानुसार तक्रारदार दि. 2/8/2010 रोजी डॉ. साबळे यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले असता त्यांनी सर्व तपासण्या करुन घेण्याबाबत सांगितले. त्यानुसार, आय्.व्ही.व्ही. ची तपासणी मेघनाद डिजीटल एक्स-रे, सोनोग्राफी सेंटर येथे केली. आय.व्ही.व्ही. व एक्स-रे, रिपोर्टस् घेऊन डॉ. साबळे यांना दाखविले असता, त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये थांबण्याचा व राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळेस त्यांनी तक्रारदारास त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या सुविधा आहेत, दोन्ही बाजूंचे मुतखडे काढण्यात येतील असे सांगितले. त्यासाठी रक्कम रु.24,000/- असा खर्च येईल असे सांगितले. ऑपरेशन एक किंवा दोन वेळा करावे लागेल असे सांगितल्यामुळे तक्रारदार हे दि.3/8/2010 रोजी जाबदार डॉक्टरांकडे ऑपरेशनसाठी दाखल झाले. तक्रारादार क्र. 1 यांच्यावर दि.4/8/2010, दि.7/8/2010 व दि. 10/8/2010 या तीन वेळा ऑपरेशन करावे लागले. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, एवढया तीनवेळा ऑपरेशन करुनही डॉक्टरांना पूर्णपणे मुतखडे काढण्याचे काम करता आले नाही. तक्रारदारास रक्कम रु.55,605/- दवाखान्यासाठी आणि औषधोपचारासाठी रक्कम रु.21,725.34 इतका खर्च झाला. त्यासाठी त्यांना आदिवासी विदयालयीन सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, राजगुरुनगर, ता. खेड या पतसंस्थेकडून कर्ज घ्यावे लागले. दि. 24/8/2010 रोजी डिसचार्ज मिळाल्यानंतर तक्रारदारास घरी गेल्यानंतर 10 ते 12 दिवस फारसा त्रास जाणवला नाही. त्यानंतर मात्र पुन्हा पूर्वीप्रमाणेच तक्रारदारांना त्रास सुरु झाला. त्यासाठी तक्रारदारांनी डॉ. साबळे यांचेशी संपर्क साधला असता, पुढील उपचार फॅमिली डॉक्टरकडून घ्या असा जाबदारांनी तक्रारदारांना सल्ला दिला. त्यानुसार बाहयरुग्ण म्हणून डॉ. साबळे यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्यात आले. त्यासाठी त्यांना रक्कम रु.2,137.30 एवढा खर्च आला. अशाप्रकारे बाहय रुग्ण उपचारासाठी म्हणून पाचवेळा डॉक्टरांकडे गेले, त्यासाठीही खर्च केला. इतक्या वेळेस डॉक्टरांकडे जाऊनही तक्रारदाराचा त्रास कमी झाला नाही, त्यामुळे पुन्हा दि. 27/9/2010 रोजी जाबदार डॉक्टरांकडे तक्रारदार गेले असता, त्यांनी पुन्हा एक्स-रे आणि सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यादिवशीच्या एक्स-रे रिपोर्टमध्ये पुन्हा डाव्या बाजूकडील मुत्राशयात 10 एम्.एम्. चा मुतखडा आहे असे दिसले, हा अहवाल जाबदार डॉक्टरांना दाखविला. त्यानंतर जाबदार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तक्रारदार औषधे घेत राहिले तरीही तक्रारदारास पूर्वीसारखाच त्रास होत होता. रुग्णाचा त्रास कमी होत नाही आणि डॉक्टर व्यवस्थित काळजी घेत नाहीत म्हणून तक्रारदारांनी दोन वेळेस डॉक्टरांना पत्र पाठविले व डॉक्टरांना एक समजपत्र पाठविले, तरीही काही उपयोग झाला नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, रुग्णाला होणा-या त्रासाची सुचना वारंवार डॉक्टरांना दिली तरी ऑपरेशनमधील त्रुटी दूर केल्या नाहीत, रुग्णाकडून जास्त रक्कम घेऊनही योग्य उपचार केले नाहीत, ऑपरेशनपूर्वी रुग्णाच्या डाव्या बाजूकडील मुत्राशयात 12.5 एम्.एम्. चा मुतखडा होता व दि. 27/9/2010 रोजी त्याच बाजूकडील मुत्राशयात 10 एम्.एम्.चा मुतखडा होता. त्यामुळे तक्रारदारास पूर्वीप्रमाणेच त्रास होत होता. यामुळे तक्रारदारांची फसवणूक झाली आहे म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार, अदयापपर्यंतचा खर्च रक्कम रु.1,64,068.14, तक्रारदारांना सोसाव्या लागलेल्या मानसिक व शारीरिक त्रासासाठी रक्कम रु.1,00,000/-, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात अशाप्रकारचा त्रास कोणत्याही रुग्णास होणार नाही या बाबतची तजवीज व्हावी व इतर दिलासा मागतात.
तक्रारदारांनी शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदार डॉक्टरांनी तक्रारदारांच्या तक्रारीस विरोध दर्शविला. जाबदार डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांचेविरुध्द खोटी तक्रार केलेली आहे. जाबदार डॉक्टरांनी नॅशनल इन्श्युरन्स कंपनीकडून व्यावसायिक हमीसाठी पॉलिसी घेतली आहे. जाबदारांनी तक्रारदारांचे बायलॅटरल रेनल स्टोन यांचे ऑपरेशन केले होते, त्यासाठी योग्य अॅनेस्थेशिया यांचा वापर योग्य पध्दतीने, काळजी घेऊन व त्यांच्या मदतीने मुत्राशयातील खडे काढलेले होते. दि.3/8/2010 रोजी तक्रारदारास त्यांच्या दवाखान्यामध्ये रात्री 8.30 वाजता दाखल करुन घेण्यात आले. दि.4/8/2010 रोजी जाबदार डॉक्टरांनी तक्रारदारांवर ऑपरेशन करुन सर्व स्टोन काढले. त्यानंतर त्यांना डिजे स्टेन्ट बसविण्यात आला. या ऑपरेशनला चार तास लागले. रुग्णाला ऑपरेशन करताना रक्त देण्यात आले नाही. यावेळेस डाव्या बाजूकडील स्टोन्स काढण्यात आले. हे ऑपरेशन झाल्यानंतर तीन स्टोन काढावयाचे शिल्लक राहिले. दि. 7/8/2010 रोजी जाबदार डॉक्टरांनी स्टोन्स काढले, याही वेळी रुग्णाला रक्त दयावे लागले नाही. यावेळी ऑपरेशन कालावधी चार तास पाच मिनीटे लागला. ऑपरेशनचा दुसरा टप्पा म्हणजे दि. 10/8/2010 रोजी तीन स्टोन शिल्लक होते. ते स्टोन काढण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या पतीची संमती घेण्यात आली होती आणि त्यातील दोन स्टोन्स काढण्यात आले आणि एक स्टोन शिल्लक राहिला, याची माहिती डॉक्टरांनी पेशंट आणि त्यांचे पती यांना दिली. या ऑपरेशनला 3.30 तास लागले याही वेळेस रुग्णाला रक्त दयावे लागले नाही. हे ऑपरेशन पूर्ण सफल झाले होते, पेशंट पूर्वस्थितीत आला होता. त्यानंतर पेशंटला दि.15/8/2010 रोजी डिसचार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांना डिजे स्टेन्ट काढण्यासाठी सहा आठवडयानंतर बोलावण्यात आले, डिजे स्टेन्ट काढण्यात आला. त्यावेळेस तक्रारदार आणि त्यांच्या पतीस पेशंटच्या डाव्या बाजूकडील एकच स्टोन बाकी आहे याची जाणिव त्या दोघांनाही होती. ज्यावेळेस दि. 27/9/2010 रोजी डिजे स्टेन्ट काढला, त्यावेळेस पेशंटला कशी काळजी घ्यावयाची याची माहिती सांगितली. या ऑपरेशन नंतर पेशंटची मुत्रपिंडे योग्यरितीने कार्य करत होती. जाबदारांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांनी जी रक्कम दिलेली आहे त्याच्या सर्व पावत्या तक्रारदारांना दिलेल्या आहेत. जाबदार डॉक्टरांनी सर्व सेवा ही सर्वसाधारण रोग्याला देतात त्याप्रमाणे औषधोपचार पेशंटवर केलेले आहेत, कुठलीही सेवेतील त्रुटी किंवा निष्काळजीपणा नाही. केवळ जाबदारांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांनी अशाप्रकारची तक्रार दाखल केली आहे. बाकीचे सर्व आरोप अमान्य करत जाबदारांनी मा. वरिष्ठ न्यायालयाचा निकाल उध्दृक्त केला आहे. वरील सर्व कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार रक्कम रु.10,000/- सह अमान्य करावी, अशी मागणी करतात.
जाबदारांनी शपथपत्र, मेडिकल लिटरेचर व कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. मंचाने ही तक्रार ससून हॉस्पिटल यांचेकडे अहवालासाठी पाठविली होती. त्यामध्ये तज्ञ समितीने डॉक्टरांचा कुठलाही निष्काळजीपणा नाही असा निष्कर्ष काढला आहे.
तक्रारदारांची अशी साधी तक्रार आहे की, तक्रारदार क्र. 1 यांच्या किडनीमध्ये स्टोन झाले होते आणि ते सर्व स्टोन काढून देण्याची जबाबदारी जाबदार डॉक्टरांनी घेतली होती. ऑपरेशन झाल्यानंतर डाव्या बाजूकडील किडनीमध्ये 10 एम्.एम्. चा खडा तसाच राहिलेला होता असे तक्रारदारांचे म्हणणे आहे, डॉक्टरांनी संपूर्ण खडे न काढताच तक्रारदारास घरी पाठवून दिले. त्यामुळे तक्रारदारास पुन्हा तोच त्रास सुरु झाला. तक्रारदारांनीच जाबदार डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधील डिसचार्ज कार्डच्या प्रती दाखल केल्या आहेत. दि.10/8/2010 रोजीच्या PRE-OPERATIVE ORDERS (हॉस्पिटलमधील अंतर्गत केसपेपर्स) आणि Operative Finding & Procedure यामध्ये जाबदार डॉक्टरांनी पुढीलप्रमाणे नमुद केले आहे.
“Inspite of prolonged efforts & ………. control one stone (Approx …….) could not be accessed & procedure stopped. To avoid unnecessary blood loss & prolonging the surgery (op. Time 3 ½ hrs) या finding वरुन जाबदार डॉक्टरांनी स्वत:च असे कबूल केले आहे की, त्यांनी एक खडा तसाच ठेवला आहे कारण 3.30 तासाच्या ऑपरेशनमध्ये त्यांना तो काढता आला नाही आणि काढला असता तर अनावश्यक रक्त वाया गेले असते. यावरुन जाबदार डॉक्टरांनी 3.30 तास बरीच मेहेनत केलेली दिसून येते. मंचाने जाबदार डॉक्टरांना याबद्दलची विचारणा केली असता, त्यांनी तक्रारदाराचा तो मुतखडा काढता न येणा-या जागेवर होता त्यामुळे तो काढण्यासाठी त्यांना फार प्रयत्न करावे लागले तरीही तो काढता आला नाही असे नमुद केले. काढण्याचा प्रयत्न केला तर पेशंटच्या जीवाला धोका असतो कारण जास्त ब्लिडींग होऊ शकते. त्यासाठी त्यांनी खडा सुरळीतपणे मुत्राशयातून खाली यावा व पडून जावा म्हणून Tamfil हे औषध दिले होते. या औषधाचेही डॉक्टरांनी मेडिकल लिटरेचर दाखल केले आहे. या औषधामुळे किडनी स्टोन्स खाली येऊन पडून मुत्राशयाचा मार्ग मोठा होतो. दिलेल्या मेडिकल लिटरेचरवरुन Tamfil या औषधाचे कार्य खालीलप्रमाणे आहे.
“What is the role of Tamsulosin in stone expulsion?
The rationale underlying its use is that a high concentration of alpha-ID adrenergic receptors has been recently detected in the terminal ureter. Inhibition of alpha-ID receptor stimulation should relax smooth muscle in the ureteral tract, making stone expulsion easier”.
यावरुन डॉक्टरांचा निष्काळजीपणा किंवा सेवेतील त्रुटी दिसून येत नाही आणि त्यांनी तसे स्पष्टपणे त्यांच्या Operative Finding & Procedure मध्ये नमुद केले आहे, ही बाब दडवून ठेवलेली नाही. तसेच त्याच ऑपरेशनच्या Finding मध्ये त्यांनी Procedure demonstrated to relatives on endocamera & informed regarding single residual stone अशाप्रकारचा शेरा आहे. म्हणजेच ऑपरेशन पेशंटच्या नातेवाईकास दाखविले होते तसेच एक खडा राहिला आहे हे सांगितले होते. हॉस्पिटलच्या दि.10/8/2010 रोजीच्या SUMMARY & COMMENTS Daily Clinical Notes मध्ये तक्रारदार क्र.1 –पेशंट तसेच त्यांच्या नातेवाईकास ऑपरेशन दाखविले होते. तसेच एक खडा राहिलेला आहे, गरज भासल्यास (S.O.S.) ऑपरेशन परत करावे लागेल असे त्यात नमुद केले आहे आणि ही सर्व कागदपत्रे जाबदार डॉक्टरांनी तक्रारदारास डिसचार्ज देतेवेळेस दिली होती. तरीसुध्दा तक्रारदारांनी ही तक्रार जाबदारांविरुध्द दाखल केली आहे. जाबदार डॉक्टरांचे असेही म्हणणे आहे की, तक्रारदारांनी जो खडा काढलाच नाही असे म्हंटले आहे त्यासाठी डॉक्टरांनी लघवीचा मार्ग मोठा होण्यासाठी दि.15/9/2010 रोजी Tamfil या नावाचे औषध दिले होते.दि.27/9/2010 रोजीच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये डाव्या बाजूच्या किडनीध्ये खालच्या बाजून 10 एम्.एम्.खडा दिसून आला आहे. त्यानंतर जेव्हा तक्रारदार जाबदार डॉक्टरांकडे फॉलोअपसाठी दि.18/11/2010 रोजी गेले असता IMPRESSION मध्ये 5 ते 6 एम्.एम्. चा खडा दिसून येतो असा त्यात निष्कर्ष आलेला आहे. तक्रारदार दि.27/9/2010 रोजीच्या याच सोनोग्राफी रिपोर्टवरुन जाबदार डॉक्टरांना हा खडा काढला नाही, सेवेत त्रुटी ठेवली आणि निष्काळजीपणा दाखविला असे जे म्हणतात त्यावर जाबदार डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, किडनीमध्ये खडे परत-परत तयार होत असतात (reoccurrence). जर 10 एम्.एम्. चा खडा (10 mm size, in lower ureter) खालच्या बाजूस आलेला होता म्हणजे तो पडून जाण्याच्या स्थितीत होता असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतरचा जो सोनोग्राफीचा रिपोर्ट दि.18/11/2010 रोजीचा आहे त्यामध्येही (5-6 mm lower .........) 5-6 एम्.एम्. लोअर साईडला खडा असल्याचे दिसून येते. डॉक्टरांनी जे Tamfil औषध दिले त्यामुळे 7 ते 8 खडे बाहेर पडले होते असे दिसून येते. एकदा ऑपरेशन केल्यानंतर परत – परत खडे किडनीमध्ये तयार होतात (reoccurrence) हे दाखविण्यासाठी जाबदारांनी मा. उत्तर प्रदेश राज्य आयोग II (2010) CPJ 185 Parvinder Singh (Dr.) v/s. Ved Prakash Trivedi & Anr. यामध्ये श्री. आर.के. गुप्ता अॅपेलंटच्या वकीलांनी मेडिकल टेक्स्ट जर्नल युरॉलॉजी व्हॉल्यूम 126 Nov. printed in U.S.A. दाखल केले आहे. त्यामध्ये एका वेळेस किडनीमधील खडे काढले असता परत खडे होणार नाहीत, याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. त्यामध्ये ऑपरेशन केल्यानंतर 13 वर्षांनी परत खडे झाल्याचे नमुद केले आहे. (The argument seems to be logical as the presence of a larger size of stone can block comparatively a smaller stone . In this situation the Doctor cannot be accused of having committed any kind of deficiency ………….The reoccurrence of stones in kidney is a malady and even if the stones are removed once there is no guarantee that reoccurrence will no take place…. त्यामुळे प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये जाबदार डॉक्टरांनी Finding मध्ये जे सांगितले आहे की जे खडे राहिलेले आहेत ते काढण्यासाठी गरज पडली तर पुन्हा ऑपरेशन करावे लागेल. 100% stone clearance not possible अशाप्रकारचा मा. राष्ट्रीय आयोगाचा III (2006) CPJ 1999 (NC) Sultana Ram v/s. B.K. Chawla (Dr.) & Anr. निकाल जाबदारांनी दाखल केला आहे, हा निवाडा प्रस्तुतच्या तक्रारीस लागू होतो.
तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये ऑपरेशनमधील तक्रारी दूर केल्या नाहीत फीज घेऊनसुध्दा योग्य उपचार केले नाहीत, रुग्णाचा त्रास कमी केला नाही म्हणून जाबदारांनी तक्रारदारांकडून घेतलेली फीज तक्रारदार परत मागतात आणि नुकसानभरपाई मागतात यामध्ये जाबदारांनी तीन खडयांपैकी दोन खडे काढले, एक खडा ठेवला साधारण 3.30 तासाची मोहलत घेतल्यानंतर दोन खडे काढले होते, रुग्णाच्या जिवाचा विचार करुन त्यांनी एक खडा तसाच ठेवला आहे हे ते मान्यच करतात. खडा ठेवलेला होता हे त्यांनी त्याचवेळेस तक्रारदारास सांगितले होते आणि गरज पडली तर पुन्हा ऑपरेशन करावे लागेल असेही नमुद केले होते. यासाठी मंच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या “ श्री. अच्युतराव हरिभाऊ खोडवा विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र IV 2006 CPJ Page 8 या निवाडयाचा आधार घेते. यामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने असे नमुद केले आहे की, “ पेशंटवर उपचार करताना प्रतयेक डॉक्टरांची वैद्यकीय मते आणि कौशल्ये वेगवेगळी असू शकतात. परंतु ते उपचार मेडिकल प्रोफेशनल मान्यता प्राप्त असणारे असले पाहिेजेत. डॉक्टरांनी पेशंटवर उपचार करताना त्यांचे पूर्ण कौशल्य वापरले, दक्षता घेतली आणि तरीही पेशंटचा मृत्यू झाला किंवा त्यास कायमचे अपंगत्व आले तर अशावेळी तो डॉक्टरांचा निष्काळजीपणा ठरत नाही“. यामुळे जाबदार डॉक्टरांचा कुठलाही निष्काळजीपणा किंवा सेवेतील त्रुटी दिसून येत नाही. तक्रारदार तक्रारीत असे म्हणतात की, अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम रुग्णाकडून घेऊनही योग्य उपचार केले नाहीत, जास्त रक्कम घेतली याबद्दल तक्रारदार मंचात तक्रार दाखल करु शकत नाहीत. ऑपरेशनची फी योग्य होती किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार मंचास नाही, याबद्दलचा वाद मंच सोडवू शकत नाही.
वरील सर्व विवेचनावरुन व मा. सवोच्च न्यायालयाच्या निवाडयावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1 तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2 खर्चाबद्दल काही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.