(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. दिनांक 16/4/2007 रोजी तक्रारदाराच्या मांडीची नस दुखत असल्यामुळे गैरअर्जदार डॉक्टरांकडे विचारण्यासाठी गेले त्यावेळेस गैरअर्जदारांनी त्यांना त्यांच्या डाव्या मांडीवर एक इंजेक्शन दिले व कांही औषधोपचार म्हणून गोळया व मलम त्यांना घेण्यासाठी त्यांच्या लेटरपॅडवर लिहून दिले. इंजेक्शन घेऊन घरी परत आल्यानंतर थोडयाच वेळात तक्रारदारास खूप ताप आला व त्यांची डावी मांडी भयंकर दुखू लागली. त्यामुळे तक्रारदार दोन दिवसानंतर गैरअर्जदाराच्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळेस त्यांना परत डॉक्टरांनी दुस-या गोळया लिहून दिल्या व तीन दिवस घेतल्यानंतर बरे वाटेल असे हसांगितले. तक्रारदार हया गोळया घेत असले तरी दुस-या दिवशी त्यांना इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी जखम झाली व त्या ठिकाणी जंजू निर्माण झाले व ताप येऊन त्या ठिकाणी भयंकर वेदना होत होत्या. त्यानंतर तक्रारदारास श्वास घेण्यासाठी त्रास चालू झला व त्यांच्या ओठाच्या हालचाली मंद पडून त्यांना बोलण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे घाबरुन जाऊन तक्रारदाराच्या घरच्या लोकांनी तक्रारदारास दिनांक 18/4/2007 रोजी दंडे डायबेटिस अण्ड हार्ट केअर सेंटर मायानगर, सिडको, औरंगाबाद येथे त्यांना दाखल केले असता चुकीच्या औषधोपचारामुळे तक्रारदारास रिअक्शन झाली असे सांगितले. तक्रारदार दंडे हॉस्पिटलमध्ये दिनांक 18/4/2007 ते 16/5/2007 पर्यत उपचार घेत होते. त्यासाठी त्यांना जवळ जवळ रु 60,000/- इतका खर्च आला व औषधोपचार म्हणून 20 ते 25 हजर खर्च आला. तक्रारदार पुढे असे म्हणतात की, औषधोपचाराच्या कालावधीत त्यांना प्रतिमहिना रु 7,000/- खर्च येत होता व सदरच्या आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आलेला आहे. नोकरीसुध्दा गेलेली आहे. या सर्वांना गैरअर्जदारच कारणीभूत आहेत. म्हणून तक्रारदार गैरअर्जदाराकडून यासाठी म्हणून रु 3,85,000/- मागतात. तक्रारदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार हे होमिओपॅथिक डॉक्टर असून अलोपॅथी पध्दतीचा वापर करुन त्यांना उपचार दिलेला होता. त्यामुळेच तक्रारदाराचे शारीरिक , आर्थिक, मानसिक नुकसान झाले आहे. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार दिनांक 16/4/2007 रोजी रात्री सुमारे 9 ते 9.30 वाजता तक्रारदार गैरअर्जदारांच्या क्लिनीकमध्ये पाटदुखण्याच्या तक्रारीवरील उपचारासाठी आले होते. त्याच वेळेस त्यांनी गैरअर्जदार डॉक्टरांना असे सांगितले की, ते नियमीतपणे डॉ राजपूत यांच्याकडून उपचार घेतात परंतु रात्र झालेली असल्यामुळे ते डॉ राजपूत यांच्याकडे जाऊ शकत नाहीत. म्हणून तात्पूर्ती वेदना कमी करण्यासाठी तक्रारदार गैरअर्जदाराच्या क्लिनीकमध्ये आलेले होते. त्यावेळेस गैरअर्जदारानी त्यांना सकाळपर्यंत वेदना कमी होण्यासाठी वेदनाशामक औषधी दिल्या होत्या. गैरअर्जदार डॉक्टरांनी त्यांना कुठलेही इंजेक्शन दिले नव्हते. तक्रारदाराच्या तक्रारीत दिनांक 18/422007 रोजी तक्रारदार हे दंडे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे सांगतात. डिसचार्ज कार्डमध्ये हिस्ट्री सांगताना 6 ते 7 दिवस आधी त्यांनी मांडीमध्ये इंजेक्शन घेतल्याचे सांगितले. यावरुन दिनांक 16/4/2007 रोजी तक्रारदार त्यांच्याकडे आले होते त्यावेळेस त्यांना इंजेक्शन दिले नव्हते हे सिध्द होते. गैरअर्जदार हे होमियोपॅथीक डॉक्टर आहेत तसेच त्यांनी Child Health and The Certificate in Gynechology and obstetrics यांचा Intigragted Course of Certificate हा चैतन्य विद्यापीठ मुंबई येथून 3 जानेवारी 2000 रोजी पूर्ण केला. त्यामुळे त्यांना ईमर्जन्सी पेशंट आला असता त्याच्यावर उपचार करता येतो. डॉक्टरांनी त्यांना फक्त वेदनाशामक औषधी दिल्या होत्या, इंजेक्शन दिले नव्हते. वरील कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. गैरअर्जदाराने कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारानी मंचामध्ये त्यांच्या लेखी जवाबासोबत महाराष्ट्र शासनाचे राजपत्र भाग 5 ज्यामध्ये होमियोपॅथीक प्रॅक्टीसर्न्स अक्ट मध्ये सुधारणा केल्याचे राजपत्र दाखल केले आहे. त्यानुसार होमियोपॅथीक डॉक्टरांना राजपत्राच्या तिसरी अनुसूची निवडीच्या औषधांची यादी यामध्ये वेदनाहरी, आम्लरोधी आणि इतर व्रणरोधी औषधी द्रव्य ही औषधी होमियोपॅथीक डॉक्टर प्रिस्क्राईब करु शकतात असे नमूद केलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार डॉक्टरांनी तक्रारदारास दिलेले प्रिस्क्रीप्शन ज्यावरTab.Cipzox, Tab.Venikiod plus, Tab.Aciloc RD, violince gel दिले होते ते पेशंटला देण्याची शासनाकडून त्यांना परवानगी किंवा संमती मिळालेली होती हे दिसून येते.यावरुन गैरअर्जदार डॉक्टरानी तक्रारदारास दिलेले औषध देण्याचे त्यांना परवानगी होती असे दिसून येते. तक्रारदाराची दुसरी एक अशी तक्रार आहे की, त्यांच्या मांडीची नस दुखत असल्यामुळे ते गैरअर्जदाराकडे गेले होते व त्यांनी तक्रारदाराच्या डाव्या मांडीवर दिनांक 16/4/2007 रोजी इंजेक्शन दिले. इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांची मांडी भयंकर दुखू लागली . गैरअर्जदार त्यांच्या लेखी जवाबात असे म्हणतात की, तक्रारदारानी दंडे हॉस्पिटल येथे दिनांक 18/4/2007 रोजी ईलाज घेतला त्याचे डिसचार्ज कार्ड दाखल केले. त्यामध्ये हिस्ट्री लिहीताना पेशंटने सात दिवस आधी इंजेक्शन घेतल होते असे नमूद केले आहे. याचाच अर्थ तक्रारदारानी दिनांक 16/4/2007 पूर्वीच इंजेक्शन घेतले होते हे दिसून येते. म्हणजेच त्यांनी तक्रारदाराना ते इंजेक्शन दिले नव्हते हे दिसून येते. तक्रारदारानी सुध्दा गैरअर्जदारानी त्यांना इंजेक्शन दिल्याचा पुरावा मंचात दाखल केला नाही. केवळ Tab.Cipzox, Tab.Venikiod plus, Tab.Aciloc RD, violince gel या औषधचे प्रिस्क्रिप्शन दाखल केले आहे. गैरअर्जदारानी त्यांना इंजेक्शन दिले त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला, त्यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला हे पुराव्यासहीत तक्रारदाराने सिध्द केले नाही असे मंचाचे मत आहे. यापूर्वी मंचाने दिनांक 9/7/2008 च्या आदेशामध्ये केवळ गैरअर्जदार डॉक्टर हे होमियोपॅथीक डॉक्टर असुन सुध्दा त्यांनी अलोपॅथीचे औषध दिले याच कारणावरुन गैरअर्जदार डॉक्टरानी 1 लाख नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला होता. त्या आदेशामध्ये इंजेक्शन दिले म्हणून तक्रारदारास मानसिक त्रास झाल्याबद्दल गैरअर्जदार डॉक्टराना कुठेही दोषी धरलेले नव्हते. परंतु त्यानंतर गैरअर्जदार डॉक्टरानी शासनाचे परिपत्रक दाखल केले व त्यानुसार त्यांना, तक्रारदारास दिलेली औषधी देण्याची परवानगी देण्यात आल्याचे दाखवून दिलेले आहे. गैरअर्जदारानी त्यांच्या अपीलमध्ये मा. राज्य आयोगास असे मिसरिप्रेझेंटेशन केलेले दिसून येते की, तक्रारदारानी स्वत:च्या पत्त्यावर गैरअर्जदारास नोटीस पाठविली आणि ती नोटीस मंचाने योग्य ती सर्व्हिस झाली असे समजून गैरअर्जदाराच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित केला. परंतु मंचाने डॉक्टर एस बी तौर, अकल्पीत हाऊसिंग सोसायटी, हायटेक इंजिनिअरींग कॉलेज कॉर्नर, बजाज नगर, वाळुज, औरंगाबाद या पत्त्यावर नोटीस पाठविली होती ती फाईलला सुध्दा लावलेली आहे. हाच पत्ता डॉक्टर तौर यांच्या माऊली क्लिनीक प्रिस्क्रिप्शनवर नमूद केलेला आहे. म्हणजे योग्य त्या पत्त्यावर मंचाने नोटीस पाठविली होती हे दिसून येते. असे असतानाही गैरअर्जदारानी मा. राज्य आयोगामध्ये मंचाबद्दल चुकीचे विधान केलेले दिसून येते. वरील कारणावरुन व कागदपत्रावरुन मंच तक्रारदाराची तक्रार नामंजूर करीत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |