सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 170/2011
तक्रार दाखल दि.14-12-2001.
तक्रार निकाली दि.27-08-2015.
सौ. सविता महादेव धायगुडे,
रा. व्दारा- महादेव दगडू धायगुडे,
रा. मु.सरडे, ता.फलटण, जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. डॉ. रविंद्र सहदेव सोनवणे,
रा. चिरजीवन हॉस्पिटल, 5, रिंग रोड,
फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
2. डॉ. सचिन सदाशिव गोसावी,
रा.निष्कर्ष सोनोग्राफी व डिजीटल एक्सरे,
क्लिनिक, प्लॉट नं. 18, डॉ.मगर हॉस्पिटलमागे,
रिंगरोड, लक्ष्मीनगर, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा
3. डॉ. सौ. विजया रविंद्र सोनावणे,
रा.5,रिंगरोड, ता. फलटण,जि.सातारा .... जाबदार.
तक्रारदारतर्फे –अँड.एम.डी.खटावकर.
जाबदार क्र.1 व 3 तर्फे– अँड.एम.एन.यादव.
जाबदार क्र.2 तर्फे– अँड.ए.ए.चिकणे.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार ही कराड, जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. तर जाबदार क्र. 1 ते 3 हे वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉक्टर आहेत. तक्रारदार हिला सन 2010 चे जून महिन्यामध्ये लघवीचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचेकडे औषधोपचार सुरु केले होते. तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचेकडे औषधोपचार सुरु केलेनंतर जाबदाराचे सांगण्यावरुन तक्रारदाराच्या वेगवेगळया वैद्यकीय तपासण्या केलेल्या होत्या व आहेत. प्रस्तुत वैद्यकीय तपासणीत तक्रारदाराला मूतखडा असल्याचे निदान केले होते. त्यामुळे जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराला ESWL या पध्दतीचा उपचार करणेचे सुचविले होते. त्यामुळे दि.19/6/2010 रोजी तक्रारदाराने जाबदारांकडे प्रस्तुत उपचार घेतले होते. त्याकरीता जाबदार यांनी तक्रारदाराकडून रक्कम रु.48,000/- (रुपये अठ्ठेचाळीस हजार मात्र) घेतले होते व आहेत. प्रस्तुत जाबदार नं. 1 ने उपचार केलेनंतर तक्रारदाराने जाबदाराचे सल्ल्यानुसार योग्य तो औषधोपचार घेतले होते व आहेत. तरीसुध्दा तक्रारदारचा मुतखडा विकार पूर्णतः बरा झालेला नव्हता व नाही. त्यामुळे जाबदाराचे सल्ल्यानुसार जानेवारी 2011 पर्यंत तक्रारदार हिने औषधोपचार घेतले होते व आहेत. या कालावधीत म्हणजे दि. 6/1/2011 रोजी जाबदार नं. 1 व 2 यांचेकडे USGABDOMEN AND PELVSS ही तपासणी करणेस सांगितले होते. तक्रारदाराची प्रस्तुत तपासणी जाबदार क्र. 2 यांनी केली आहे. या तपासणीत तक्रारदारास मूतखडा नसलेचा अहवाल जाबदार क्र. 2 ने दिलेला होता व आहे. प्रस्तुत अहवाल पाहून जाबदार क्र. 2 ने तक्रारदारावर औषधोपचार केले होते व आहेत. प्रस्तुत तपासणीचा खर्च तक्रारदाराने जाबदार क्र. 2 यांना दिला होता व आहे. वरील उपचार घेऊनही तक्रारदाराला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तक्रारदाराने नातेपुते येथील डॉ. निलेश थिटे यांचेकडे दि. 6/1/2011 रोजी वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांनी तक्रारदाराला मुतखडा असलेचे सांगून तसा अहवाल दिला. त्यामुळे जाबदार क्र. 1 व 2 यांनी संगनमताने तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली व त्यामुळे तक्रारदाराला शारिरीक व मानसिक त्रास होत असून तक्रारदाराला आर्थिक त्रासही सहन करावा लागलेने जाबदार क्र. 1 व 2 हे या सर्व गोष्टींना जबाबदार असून त्यांचेकडून रक्कम रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) नुकसानभरपाई मिळावी म्हणून सदरचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मे. मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/14 कडे अनुक्रमे दि.10/6/2010 ची औषधांचे प्रिसक्रीप्शन, दि.11/6/2010 रोजीचा तक्रारदाराचा तपासणी रिपोर्ट, तक्रारदाराचे संमतीपत्र, तक्रारदाराला दिले ट्रीटमेंटची ट्रीटमेंट शीट, डिस्चार्ज कार्डची झेरॉक्स प्रत, दि.19/6/10 चे बील, बीलाची पावती, दि.2/8/2010 रोजी दिले संमतीपत्राची झेरॉक्स, दि.20/11/2010 रोजी दिले औषधाचे प्रिसक्रीप्शन, दि.12/12/2010 चे औषधाचे टिपण, डॉ. सचिन गोसावी यांनी USG. ABDOMEN & PELVIS चा रिपोर्ट, डॉ. निलेश थिटे यांनी दिलेला रिपोर्ट, तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली नोटीस, दि.24/10/2011 चे उत्तर, नि. 27 चे कागदयादीसोबत डॉ. निलेश थिटे यांचे शपथपत्र, नि. 28 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
3. जाबदार क्र.1 व 3 यांनी नि.14 कडे त्यांचे म्हणणे, नि.15 व 16 कडे जाबदार क्र.1 व 3 चे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.17 चे कागदयादीसोबत नि.17/1 व नि. 17/2 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे नोटीसला जाबदार क्र. 1 व 3 ने दिलेले उत्तर, डॉ. विजय रणवरे यांचा USG Report मूळ प्रत, जाबदार क्र. 2 ने नि. 23 कडे म्हणणे, नि. 24 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 25 चे कागदयादीसोबत नि. 25/1 कडे विमापॉलीसी, नि. 31 कडे जाबदार क्र. 1 ते 3 यांनी दाखल केले म्हणणे, म्हणण्याचे अँफीडेव्हीट व ससून हॉस्पिटल, पुणे यांनी दिलेला वैद्यकीय अहवाल हाच जाबदारांचा पुरावा समजणेत यावा म्हणून दिलेली पुरसिस, नि. 32 कडे जाबदार क्र. 1 व 3 यांचा लेखी युक्तीवाद, नि.33 कडे जाबदार क्र. 2 चा लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी त्यांचे म्हणणे/कैफीयतीत तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी प्रस्तुत कामी पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
i. तक्रारदाराचा अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
ii. तक्रारदाराने तिच्यावर लघवीच्या त्रासाबाबत जाबदार क्र. 1 ने उपचार केलेचे म्हटले आहे ते पूर्णपणे चूकीचे आहे. कारण जाबदार क्र. 1 हे व्यवसायाने डॉक्टर असले तरी भूलतज्ञ आहेत. त्यामुळे ही बाब मान्य व कबूल नाही. तक्रारदारकडून जाबदार क्र. 1 यांनी उपचारासाठी रक्कम रु.48,000/- (रुपये अठ्ठेचाळीस हजार मात्र) घेतले हा मजकूर अमान्य आहे. ही बाब तक्रारदाराने पुराव्यानिशी शाबीत करणे गरजेचे आहे. तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. याकामी जाबदार डॉक्टरांचा निष्काळजीपणा आहे किंवा नाही हे तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकीत्सकांकडून/वैद्यकीय तज्ञांकडून वैद्यकीय अहवाल मागवणे आवश्यक आहे. तसेच डॉ.निलेश थिटे हा नातेपुते यांच्या वैद्यकीय तपासणी करुन प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केलेला असून डॉ. निलेश थिटे यांचा वैद्यकीय अहवाल हा प्रथमच न्यायमंचासमोर तक्रारदाराने आणलेला आहे. वस्तुतः डॉ. निलेश थिटे हे UROLOGY AND GASTROLOGY या विषयाचे तज्ञ नसलेने त्यांचा तथाकथीत अहवाल हा तक्रारदाराचे आजारपणाबाबत EXPERT OPINION म्हणता येणार नाही. त्यामुळे प्रस्तुत डॉ. थिटे यांचे वैद्यकीय अहवालावर याकामी विश्वास ठेवू नये. तक्रारदाराने तसा UROLOGY AND GASTROLOGY चे तज्ञांचा अहवाल दाखल न केलेने तक्रारदाराचा अर्ज चालणेस पात्र नाही. याऊलट जाबदार क्र. 1 व 3 हे नात्याने पती पत्नी असून जाबदार क्र. 1 हे भूलतज्ञ आहेत तर जाबदार क्र. 3 या M.S.GEN.SURGERY AND F.I.A.S. WITH UROLOGY AND GASTROLOGY च्या विशेष तज्ञ आहेत.
Iii. डॉ. संजय धुमाळ यांचे सल्ल्यावरुन जाबदाराचे चिरंजीवन हॉस्पिटलमध्ये आली होती. जाबदार क्र. 3 या Urology & Gastrology मधील तज्ञ असल्याने जाबदार क्र. 3 चा त्या बाबतीत येणा-या पेशंटवर उपचार करतात. त्याप्रमाणे तक्रारदार यांचेवर जाबदार क्र. 3 यांनीच उपचार केले त्यावेळी जाबदार क्र. 3 यांनी तक्रारदाराची तपासणी केली असता तक्रारदाराचे डाव्या मूत्रपिंडाच्या तोंडाशी मूतखडा असलेचे निदान करुन DJ Stenting व ESWL या पध्दतीचा उपचार करणेचे सुचविले. तक्रारदाराने येताना डॉ. रणवरे यांचेकडून दि. 8/5/2010 रोजी UDG अहवाल आणला होता. प्रस्तुत अहवालात तक्रारदाराचे मूत्रपिंडाच्या तोंडाशी 26 एम.एम., व खालच्या कप्प्यात 13 एम.एम. अशा आकारमानोच मूतखडे होते. प्रस्तुत डॉ. रणवरे यांचे मूळ अहवाल तक्रारदाराचे ताब्यात आहे. मात्र जाणीवपूर्वक तक्रारदाराने प्रस्तुत रिपोर्ट मे मंचात दाखल केलेला नाही. जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराला पोटदुखी संदर्भात तात्पुरत्या औषधोपचाराचा सल्ला दिला. परंतू त्याचबरोबर जाबदार क्र. 3 यांना संपर्क करणेचा सल्ला तक्रारदाराला दिला असता, दि.11/3/2010 रोजी तक्रारदार जाबदार क्र. 3 ला भेटली असता, जाबदार क्र. 3 ने प्राथमिक तपासणीवरुन तक्रारदाराला तिचे मूत्रपिंडातील खडयांबाबत उपचार करावे लागणार असलेची माहिती तक्रारदाराला दिली असता तक्रारदाराने तिच्यावर उपचार करणेस संमतीपत्र दिले. दि. 17/6/2010 रोजी तक्रारदारावर उपचार सुरु केला त्यावेळी दि.18/6/2010 रोजी तक्रारदार वर DJ stenting व ESWL ची Treatment केली व दि.19/6/2010 रोजी जाबदार क्र. 3 चे सल्ल्याने सदर हॉस्पिटलमधून तक्रारदाराला डिस्चार्ज दिला व नंतर 10 दिवसांनी पुढील तपासणीस येणेबाबत तक्रारदाराला सांगितले. परंतू तक्रारदार ही डिस्चार्ज घेऊन गेलेनंतर दि.2/8/2010 पर्यंत कोणताही वैद्यकीय Follow up न घेताच ती पुन्हा पोटदुखीची तक्रार घेवून जाबदाराकडे तपासणीसाठी आली असता असे निदर्शनास झाले की, ESWL चा उपचार पध्दतीने तक्रारदाराचे मूत्रपिंडातील मूतखडा फोडला होता त्याचे बारीक तुकडे तक्रारदाराचे मूत्रनलिकेत अडकलेले असल्याचे व DJ Stent आपोआप लघवीवाटे बाहेर पडल्याचे निदान जाबदार क्र. 3 यांनी केले व तक्रारदाराला हॉस्पिटलमध्ये दाखल होणेचा सल्ला दिला. त्यामुळे तक्रारदार ही हॉस्पिटलमध्ये अॅडमीट झाली. दिनांक 3/8/2010 रोजी तक्रारदार हिचे कमरेखाली भूल देवून जाबदार क्र. 3 यांनी दुर्बिणीव्दारे तक्रारदाराचे मूत्र मार्गातून मूत्रनलीकेत अडकलेले मूतखडे काढून मूत्रनलीकेत पुन्हा DJ Stent टाकणे गरजेचे असल्याने तक्रारदार व तिचे पतीचे कुटूंबातील व्यक्तींच्या सल्ल्याने D.J. Stent टाकणेत आली. सदर D.J. Stent ही वैद्यकशास्त्राप्रमाणे 4 ते 6 आठवडे एवढयाच कालावधीसाठी शरीरात ठेवायची असते ही बाब तक्रारदाराला जाबदार क्र. 3 ने सांगितली असतानाही तक्रारदार पुढील उपचारासाठी आक्टोंबर, 2010 पर्यंत जाबदार क्र. 3 कडे फिरकलीच नाही. त्यानंतर D.J. Stent काढणेसाठी तक्रारदार नोव्हेंबर 2010 मध्ये जाबदार क्र. 3 कडे आली. ऑगस्ट,2010 ते आक्टोंबर 2010 या कालावधीत तक्रारदाराला औषधोपचाराची गरज असतानाही तक्रारदार निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने जाबदार क्र. 3 यांचेकडे आलीच नाही. तक्रारदाराला तशी कल्पना देवूनदेखील तक्रारदाराने जाबदार क्र. 2 चा सल्ला मानला नाही. दि. 12/12/2010 रोजी तक्रारदाराची वैद्यकीय तपासणी करता ESWL केली असता डाव्या मूत्रपिंडामध्ये असणा-या खालच्या कप्प्यात 8 एम.एम. चा मूतखडा असलेचे निदर्शनास आले. तोही जाबदार क्र. 1 यांनी जाबदार क्र. 3 चे मार्गदर्शनाखाली टक्नीशन म्हणून फोडला. त्यानंतर दिनांक 6/1/2011 रोजी तक्रारदाराची पुन्हा ESWL या उपचार पध्दतीने तपासणी केलेनंतर तक्रारदार हीस जाबदार क्र. 2 यांचेकडे USG तपासणीस पाठवणेत आले. जाबदार क्र. 2 ने सोनोग्राफी करुन USG रिपोर्ट तक्रारदाराने मंचात दाखल केला आहे. दरम्यान तक्रारदाराने डॉ. निलेश थिटे यांचेकडे सोनोग्राफी केली होती मात्र त्याचा अहवाल याकामी तक्रारदाराने दाखल केला नाही. तो न्यायमंचापासून लपवून ठेवला आहे व मूळ तक्रार अर्जातदेखील त्याबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. डॉ. निलेश थिटे यांचे अहवाल त्यांनी याकामी दाखल केला आहे. त्यामधून असे दिसते की, तक्रारदाराचे मूत्रपिंडामध्ये असणा-या 3 कप्प्यांपैकी मधल्या कप्प्यात 7.2 एम.एम. चा मूतखडा असल्याचा उल्लेख आहे. परंतू ते अहवाल जाणीवपूर्वक तक्रारदाराने लपवून ठेवले आहेत मे. मंचासमोर आणलेले नाहीत. तर जाबदार क्र. 2 सोनोग्राफीचा रिपोर्ट मे मंचात दाखल आहे. परंतू त्या रिपोर्टच्या फिल्मस तक्रारदाराने जाणीवपूर्वक मंचासमोर आणलेल्या नाहीत. 7 ते 8 एम.एम. पेक्षा जास्त आकाराच्या मूतखडे ESWL उपचार पध्दतीनेच काढावे लागतात. जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचे संमतीनेच ESWL उपचार तक्रारदारावर केले आहेत. त्यांनी कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. तथापी, तक्रारदाराने जून,2010 मध्ये डॉ. रणवरे यांचेकडे केले सोनोग्राफीचा अहवाल व फिल्मस तसेच डिसेंबर,2010 मध्ये डॉ. निलेश थिटे यांचेकडे केले सोनोग्राफीचे रिपोर्टस् तक्रारदाराने याकामी हजर केलेले नाहीत. उलट विनाकारण व जाणीवपूर्वक जाबदार क्र. 1 ते 3 यांना त्रास देणेसाठी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळून लावावा व तक्रारदारकडूनच जाबदाराला नुकसानीदाखल खर्च मिळावा.
प्रस्तुत कामी जाबदार क्र. 2 ने नि. 23 कडे म्हणणे दाखल केले आहे. त्यांनीही तक्रारदाराचे अर्जातील कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदाराने विनाकारण जाबदार यांना बदनाम करणेसाठी सदरचा अर्ज मे मंचात दाखल केला आहे. जाबदार क्र. 2 ने कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही व कोणती सेवात्रुटी केली हे तक्रारदाराचे अर्जात नमूद नाही. डॉ. निलेश थिटे हे urology & Gastrology या विषयाचे तज्ञ नसलेने त्यांचा तथाकथीत अहवाल याकामी Expert opinion म्हणता येणार नाही. तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळावा व विनाकारण या जाबदाराला नाहक त्रास सहन करावा लागल्याने तक्रारदाराकडूनच जाबदाराला नुकसानभरपाई मिळावी असे म्हणणे जाबदार यांनी दाखल केले आहे.
4. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय ? होय
2. जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? नाही
3. अंतीम आदेश काय ? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
5. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार ही जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडे उपचारासाठी दाखल झाली होती व तक्रारदाराने जाबदाराकडे उपचारासाठीही रक्कम अदा केली आहे. त्याची पावती मे. मंचात नि.5/7 कडे दाखल आहे. तक्रारदाराने जाबदाराकडे उपचाराबाबत कागदपत्रे मे मंचात दाखल केली आहेत. तसेच जाबदाराने तक्रारदारावर उपचार केलेची बाब मान्य केली आहे. सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार हे सेवापुरवठादार आहेत हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे आम्ही मद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्तुत कामी तक्रारदार ही डॉ. रणवरे यांचा दि. 8/5/2010 चा USG रिपोर्ट घेऊनच जाबदार क्र. 1 व 3 यांचेकडे गेली होती. प्रस्तुत डॉ. रणवरे यांचा USG रिपोर्ट तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. सदर रिपोर्ट जाबदाराने नि. 17 चे कागदयादी सोबत नि. 17/2 कडे दाखल केला आहे. प्रस्तुत रिपोर्ट पाहता तक्रारदाराचे डाव्या किडनीमध्ये 26 एम.एम. व 13 एम.एम. चे मूतखडे असणेबाबत निदान केलेले आहे. प्रस्तुत मूतखडयांची साईन (आकारमान) मोठे असलेने ते वैद्यकशास्त्रानुसार ESWL उपचार पध्दतीने फोडून काढणे जरुरीचे असलेने जाबदार क्र. 1 व 3 यांनी तक्रारदाराचे संमतीनेच (संमतीपत्र नि. 5/8 कडे दाखल) तिच्यावर ESWL उपचार केले आहेत. परंतू सदर डॉ. रणवरे यांचेकडील USG रिपोर्टबाबत तक्रारदाराने कोणतेही कथन केलेले नाही अथवा सदर रिपोर्ट मे. मंचात दाखल केलेला नाही. तक्रारदाराने जाणीवपूर्वक सदरचा रिपोर्ट मे मंचात दाखल केला नसावा असे वाटते. तसेच तक्रारदाराने डॉ. निलेश थिटे यांचा रिपोर्ट नि. 5/12 कडे दाखल केला आहे. परंतू डॉ. निलेश थीटे हे Urology and Gastrology या विषयातील तज्ञ नसलेने त्यांचा अहवाल ग्राहय धरणे चूकीचे होईल. तरी परंतू जरी प्रस्तुत डॉ. थिटे यांचा सदरचा अहवाल वादाकरीता ग्राह्य धरला. तरीही प्रस्तुत कामी तक्रारदार यांचेवर उपचार करताना जाबदार क्र. 1 ते 3 यांनी निष्काळजीपणा केलेला आहे का ? हे तपासणेसाठी मे मंच हे वैद्यकीय तज्ञ नसलेने मा. सर्वोच्च न्यायालयाने D’sourza V/s. Mohd. Ishfaq. II (2009) SLI 20 या प्रकरणात निर्वाळा देताना वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणाचे प्रकरणी एक्सपर्ट व्यक्तीचे अहवाल मागवून घ्यावेत व त्यानंतरच अशा तक्रारी निकाली काढाव्यात असे निर्देश दिलेमुळे मे मंचाने या निर्देशानुसार प्रस्तुत कामी वैद्यकीय तज्ञांचा अहवाल मागवणेसाठी मा. जिल्हा शल्यचिकीत्सक, सातारा यांना प्रस्तुत प्रकरणातील वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करुन अहवाल सादर करणेबाबत निर्देशीत केले होते. प्रस्तुत पत्र नि.29 कडे दाखल आहे. परंतू जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी त्यांचेकडे युरॉलॉजिस्ट (संबंधीत प्रकरणाबाबत) तज्ञ व्यक्ती डॉक्टर उपलब्ध नसलेने अहवाल देऊ शकत नाही असे पत्र मे. मंचास दिले व त्यांनी प्रस्तुत बाबतीत ससून हॉस्पिटल, पुणे यांचेकडे अहवाल मागणी करणेबाबत मे. मंचास पत्राने कळविले. सबब ससून हॉस्पिटल, पुणे / मा. अधिष्ठाता, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय यांचेकडे वैद्यकीय अहवाल मागणीसाठी मे. मंचाने प्रकरणातील कागदपत्रे पाठवून अहवाल मागणी केली असता प्रस्तुत कामी सदर ससून हॉस्पिटल,पुणे यांनी तज्ञ समितीची नेमणूक करुन प्रस्तुत कामी सदर ससून हॉस्पिटल, पुणे यांनी तज्ञ समितीची नेमणूक करुन प्रस्तुत तज्ञ समीतीत पुढीलप्रमाणे तज्ञांची नेमणूक केली होती. डॉ. सौ.एम.आय.गजमिये, प्राध्यापक व विभागप्रमुख, ‘क्ष’ किरणशास्त्र विभाग, डॉ. बी.डी. कश्यपी, मानसेवी सहयोगी प्राध्यापक युरॉलॉजिस्ट, शल्यचिकीत्साशास्त्र, डॉ. व्ही.एन.दुबे, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र विभाग, या तज्ञ समितीने तक्रारदारावर जाबदार क्र. 1 ते 3 ने केले सर्व उपचारांच्या कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन व सखोल पडताळणी करुन खालीलप्रमाणे अभिप्राय दिला.
“उपलब्ध झालेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तज्ञ समितीचे असे मत झाले आहे की सदर रुग्णाच्या उपचारांमध्ये संबंधीत डॉक्टर रविंद्र सोनवणे, डॉ. सचिन गोसावी व डॉ. विजया रविंद्र सोनवणे यांचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत नाही “ प्रस्तुतचा वैद्यकीय तज्ञांचा मूळ अहवाल नि.30/ए, कडे दाखल आहे. सबब या वैद्यकीय अहवालानुसार जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारावर उपचार करताना कोणताही निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला नाही हे स्पष्ट सिध्द होत आहे. डॉ. थिटे हे युरॉलॉजी व गॅस्ट्रॉलॉजीचे तज्ञ नसल्याने त्यांचा अहवाल याकामी ग्राहय धरणे न्यायोचीत होणार नाही. सबब वरील सर्व बाबींचा विचार करता जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदारावर उपचारादरम्यान कोणताही निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब प्रस्तुत जाबदाराने तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केली नसून तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेली नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. परंतु तक्रारदाराने विनाकारण सदरचा तक्रार अर्ज जाबदारांविरुध्द मे मंचात दाखल केलेचे स्पष्ट होते. तक्रारदाराने त्यांची तक्रारीतील कथने पुराव्यानिशी शाबीत केलेली नाहीत. सबब मे मंचाने ससून हॉस्पिटल यांचे तज्ञ समितीच्या नि. 30/ए कडील वैद्यकीय अहवालाचा याकामी आधार घेतलेला आहे. सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मे मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश -
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात येतो.
2. पस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 27-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.