निकालपत्र :- ( दि.16/10/2010) (व्दारा-श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.3 ते 10 हे सदर कामी वकीलांमार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. परंतु सामनेवाला क्र.1,2,व 11 ते 13 यांना संधी देऊनही त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी युक्तीवाद केला. (2) तक्रारदाराचा थोडक्यात तक्रार अशी :- यातील सामनेवाला क्र. 1 ही संस्था महाराष्ट्र सहकारी कायदयातील तरतुदीनुसार नोंदणी झालेली सहकार संस्था आहे. सामनेवाला क्र. 2 व 3 हे सामनेवाला क्र.1 संस्थेचे चेअरमन व व्हा.चेअरमन आहेत सामनेवाला क्र. 4 ते 12 हे संचालक आहेत तर सामनेवाला क्र.13 हे व्यवस्थापक आहेत यातील तक्रारदाराने सदर सामनेवाला पत संस्थेकडे दि.01/10/2002 रोजी दामदुप्पट ठेव पावती क्र. 115 व 116 अन्वये प्रत्येकी रक्कम रु.50,000/- ठेवले होते. त्याची मुदत दि.01/07/2007रोजी संपलेली असून मुदतीनंतर प्रत्येकी दामदुप्पट रक्कम रु.1,00,000/- असे एकूण रक्कम रु.2,00,000/- मिळणार होते (3) सदर मुदत बंद ठेवींच्या मुदती संपलेनंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे व्याजासह ठेव रक्कमांची वारंवार मागणी केली असता सामनेवाला यांनी त्या परत करणेस टाळाटाळ करीत आलेले आहेत. या कारणास्तव तक्रारदार यांनी दि.30/07/2008 व दि.17/08/2009 रोजी मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गारगोटी यांचेकडे तक्रार अर्ज केला होता. सदर अर्जाची दखल घेऊन त्यांनी सामनेवाला संस्थेला तक्रारदारांच्या ठेवीची रक्कम देणेबाबत कळवले होते. तरीही सामनेवाला संस्थेने तक्रारदाराच्या ठेवीची रक्कम दिलेली नाही व त्याची दखलही घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराने त्यांचे वकील श्री के.व्ही.पाटील यांचेमार्फत दि.09/02/2010 रोजी सामनेवाला यांना रजिस्टर ए.डी.ने नोटीस पाठवली परंतु सदर नोटीसचीही दखल सामनेवाला यांनी घेतलेली नाही. सबब तक्रारदारांच्या दामदुप्पट रक्कमा व्याजासह मिळाव्यात व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी असे रु.15,000/- करिता सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्टीप्रित्यर्थ दामदुप्पट ठेव पावत्यां, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गारगोटी यांना तक्रारदार यांनी केलेला अर्ज, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गारगोटी यांनी सामनेवाला यांना दिलेले पत्र, तक्रारदार यांनी वकील श्री के.व्ही.पाटील यांचे मार्फत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (5) या मंचाने सामनेवाला यांना नोटीसा पाठविल्या असता सामनेवाला क्र. 3 ते 10 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 व 13 यांना जाहीर समन्स देऊनही ते सदर कामी हजर झाले नाहीत किंवात्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केले नाही. सामनेवाला क्र.11 व 12 यांना नोटीस लागू होऊनदेखील ते कामात हजर झाले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. (6) यातील सामनेवाला क्र.3 ते 10 यांनी दिलेल्या लेखी म्हणण्यात, तक्रारदाराची तक्रारीतील सर्व कथने नाकारलेली आहेत. ते आपल्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्था ही सन-1999 मध्ये स्थापन झाली त्यावेळी प्रस्तुत सामनेवाला हे प्रमोटर सदस्य होते. ते कधीही संचालक म्हणून निवडून आलेले नाहीत. सहकार कायदयातील तरतुदीप्रमाणे सहकारी कायदा कलम 73(3) (a) अन्वये प्रसिध्द झालेले कोणतेही निवडणूकीच्या निकालाबाबतचे नोटीफिकेशन तक्रारदाराने दाखल केलेले नाही. महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 73(1A)(a) मधील तरतुदीनुसार सोसायटीची प्रोव्हीजनल कमिटी नियुक्त झालेनंतर तिचे अस्तित्व 1 वर्षानंतर संपुष्टात येते. सामनेवाला संस्थेच्या सन-1999 नंतर कोणत्याही निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे सामनेवाला संस्थेची प्रोव्हीजनल कमिटीचे अस्तित्व कायदयाने अटोमेटीकली संपुष्टात आले आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.3 ते 10 यांना पक्षकार करणेचे कारण नव्हते. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्द कोणतीही दाद मागता येणार नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर होणेस पात्र आहे. (7) सामनेवाला क्र. 3 ते 10 आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, सामनेवाला संस्थेचे ऑडीट झाले असून सदर ऑडीट रिपोर्टमध्ये सामनेवाला संस्थेची निवडणूक सन 1999 पासून झाली नसलेचे नमुद केले आहे. व सामनेवाला संस्थेच्या सर्व व्यवहारास सामनेवाला क्र. 2 व 13 जबाबदार असलेचे नमुद केले आहे. तसेच प्रस्तुत सामनेवाला हे संचालक नसलेने वैयक्तिक व संयुक्तिकपणे जबाबदार असल्याचा प्रश्नच येत नाही. तक्रार अर्जातील नमुद केलेला रक्कमेचा तपशील चुकीचा असून तक्रारदाराचे सदर रक्कम मागणीशी प्रस्तुत सामनेवाला यांचा कोणताही व कसलाही संबंध नाही. सबब तक्रारदाराकडून प्रस्तुत प्रत्येक सामनेवाला यांना रक्कम रु.10,000/- कॉम्पेसेंटरी कॉस्ट वसुल होऊन मिळावेत अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (8) सामनेवाला क्र.3 ते 10 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला संस्थेच्या ऑडीट रिपोर्टची काही पानांचे झेरॉक्स दाखल केले आहे. (9) सामनेवाला क्र.7 यांनी दि.11/10/2010 रोजी दिलेल्या अर्जात नमुद केले आहे की, सदर सामनेवाला यांचा सामनेवाला संस्थेच्या संचालक मंडळाच्या यादीमध्ये समावेश नसून नजरचुकीने प्रस्तुत सामनेवाला यांना जबाबदार धरले आहे. सोबत सहाय्य निबंधक सहकारी संस्था गारगोटी यांचे पत्र व या कार्यालयाकडील ग्राहक तक्रार क्र.46 व 47/2007 मधील निकालपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(10) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे, तसेच सामनेवाला क्र.3 ते 10 यांचे लेखी म्हणणे व तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद यांचा या मंचाने साकल्याने विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे दामदुप्पट ठेवींच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत. सदर ठेवींच्या मुदती संपलेल्या आहेत व तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वारंवार मागणी करुनही त्या सामनेवाला यांनी परत केलेल्या नाहीत असे निदर्शनास येत. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या व्याजासह ठेव रक्कमा मिळणेकरिता या मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. (11) सामनेवाला क्र. 3 व 10 यांनी आपल्या म्हणण्यात प्रस्तुत सामनेवाला हे प्रमोटर सदस्य असलेचे कथन केले आहे. परंतु प्रस्तुत सामनेवाला यांनी ते प्रमोटर सदस्य असलेबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. प्रस्तुत सामनेवाला यांनी दाखल केलेल्या ऑडीट रिपोर्टमध्ये सामनेवाला संस्थेचे संचालक मंडळ हे सामनेवाला संस्थेच्या गैरकारभारास जबाबदार नाहीत असे कुठेही म्हटलेले नाही.सबब सदर सामनेवाला हे आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. तसेच सामनेवाला क्र.7 यांनी दाखल केलेल्या अर्जासोबतची सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गारगोटी यांचे पत्रामध्ये सामनेवाला संस्थेचे संचालक मंडळाची यादी ही दि.31/03/2002 अखेरची आहे. व तक्रारदारच्या ठेवी या दि.01/10/2002 रोजी ठेवलेल्या आहेत. सबब सामनेवाला क्र.7 यांचा त्यांचे नांव कमी करणेची विनंती हे मंच फेटाळत आहे. तसेच सामनेवाला क्र.1, 2 व 11 ते 13 प्रस्तुत प्रकरणी हजर न होऊन व आपले म्हणणे दाखल न करुन सदर सामनेवाला यांना तक्रारदारांचा तक्रार अर्ज मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब सामनेवाला क्र. 1 ते 12 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.12 हे सामनेवाला संस्थेचे मॅनेजर म्हणजे सामनेवाला संस्थेचे कर्मचारी असलेने त्यांना फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या दामदुप्पट ठेव पावत्यांवरील दामदुप्पट रक्कम व्याजासह परत करण्याकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तक्रारदाराने वांरवार मागणी करुनही सामनेवाला यांनी त्यांच्या दामदुप्पट ठेवींच्या रक्कमा परत दिलेल्या नाहीत. सदर सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. सबब सामनेवाला क्र.1 ते 12 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.13 हे सामनेवाला संस्थेचे मॅनेजर म्हणजे सामनेवाला संस्थेचे कर्मचारी असलेने त्यांना फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या दामदुप्पट ठेव पावत्यांवरील दामदुप्पट रक्कम व्याजासह परत करण्याकरिता जबाबदार धरणेत यावे (13) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत दाखल केलेल्या दामदुप्पट ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदरच्या ठेव पावत्यांच्या मुदती संपलेल्या आहेत. सबब ठेव पावत्यांच्या दामदुप्पट रक्कमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत व सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.1 ते 12 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.13 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांच्या दामदुप्पट ठेव पावत्या क्र.115 व 116 वरील दामदुप्पट रक्कम रु.1,00,000/- प्रत्येकी व एकूण रक्कम रु.2,00,000/- अदा करावेत. व सदर रक्कमेवर दि. 01/07/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज दयावे. (3) सामनेवाला क्र. 1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र. 13 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |