तक्रारदारातर्फे अॅड. श्री. संतोष जाधव हजर
जाबदेणारांतर्फे अॅड. श्री संजय चितळे हजर
********************************************************************
** अर्जावरील सामाईक आदेश **
पारीत दिनांकः- 31/05/2012
1] अर्जदार/जाबदेणारांनी प्रस्तुतच्या तक्रारींमध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेच्या Ord. II, Rule 3 आणि Ord. VII, Rule 10 प्रमाणे अर्ज दाखल केला आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रार क्र. पीडीएफ/154/2011, पीडीएफ/155/2011 आणि पीडीएफ/156/2011, या तिन्ही तक्रारी दाखल करण्यासाठी एकच घटना घडलेली (Identity of cause of action) आहे. त्यामुळे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या Ord. II, Rule 3 नुसार या तिन्ही तक्रारी विलीन (Merge) करुन एकत्रीत चालविण्याचे आदेश करावे. सदरच्या तिन्ही तक्रारी एकत्र केल्यानंतर मंचास प्रस्तुतच्या तक्रारी चालविण्याची आर्थिक अधिकारीता (Pecuniary Jurisdiction) रहाणार नाही, त्यामुळे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या Ord. VII, Rule 10 प्रमाणे या तिन्ही तक्रारी तक्रारदारांना योग्य त्या न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी परत करण्यात याव्यात, अशी मागणी जाबदेणार करतात.
2] सदरच्या अर्जांवर तक्रारदारांनी त्यांचे म्हणणे दाखल केले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, दिवाणी प्रक्रिया संहितेच्या सर्व तरतुदी जशाच्या तशा या तक्रारींना लागू होत नाहीत त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार मंचास अशा प्रकारच्या तक्रारी घेण्यापासून कोठेही प्रतिबंध नाही व स्वतंत्र तक्रारी दाखल करण्याच्या संपूर्ण अधिकार मंचास आहे, त्यामुळे जाबदेणारांचे अर्ज नामंजूर करण्यात यावे अशी मागणी तक्रारदार करतात.
3] मंचाने तिन्ही तक्रारी, त्यातील कागदपत्रे, जाबदेणारांचा लेखी जबाबाची पाहणी केली. जाबदेणारांनी मयत श्री सत्यप्रकाश यांच्यावर उपचार केलेले होते व तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांच्या निष्काळजीपणामुळे श्री सत्यप्रकाश यांचा मृत्यु झाला. तक्रार क्र. पीडीएफ/154/2011 मयत श्री सत्यप्रकाश यांच्या पत्नीने, त्यांचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 19,90,000/- मागण्यासाठी दाखल केलेली आहे. तक्रार क्र. पीडीएफ/155/2011 मयत श्री सत्यप्रकाश यांच्या मुलाने, वडीलांच्या मृत्युमुळे, म्हणजे श्री सत्यप्रकाश यांच्या मृत्युमुळे त्याच्या शिक्षणाचे नुकसान झालेले आहे त्यामुळे रक्कम रु. 19,90,000/- नुकसान भरपाई मिळावी याकरीता दाखल केलेली आहे. तसेच, तक्रार क्र. पीडीएफ/156/2011 मयत श्री सत्यप्रकाश यांच्या अज्ञान मुलाने, वडीलांच्या मृत्युमुळे, म्हणजे श्री सत्यप्रकाश यांच्या मृत्युमुळे वडीलांच्या मायेला पोरका झालेला आहे व त्याच्या भविष्याचे नुकसान झालेले आहे त्यामुळे रक्कम रु. 19,90,000/- नुकसान भरपाई मिळावी याकरीता दाखल केलेली आहे. मंचाच्या मते तिन्ही तक्रारीमधील तक्रारदार हे जवळचे नातेवाईक आहेत व एकाच छताखाली राहतात, त्याचप्रमाणे प्रस्तुतच्या तिन्ही तक्रारी या श्री सत्यप्रकाश यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी वैद्यकिय निष्काळजीपणा केला यासाठी दाखल केलेल्या आहेत. म्हणजे या तिन्ही तक्रारी दाखल करण्यासाठी एकच घटना (One cause of action) घडलेली आहे, तिन्ही तक्रारी एकाच घटनेवर आधारीत आहेत, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या Ord. II, Rule 3 नुसार मंच या तिन्ही तक्रारी एकत्रीत चालविण्याचे आदेश देते.
परंतु या तिन्ही तक्रारी एकत्रित केल्या तर मंचास दिवाणी प्रक्रिया संहितेच्या Ord. VII, Rule 10 प्रमाणे त्या चालविण्यासाठी आर्थिक कार्यक्षेत्र उरणार नाही. जर तिन्ही तक्रारदारांनी मिळून एकच रक्कम रु. 19,90,000/- नुकसान भरपाई मागण्यासाठी एकच तक्रार दाखल केली असती, तर मंचास ती चालविण्याचे सर्व अधिकार असते, असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ग्राहक मंचास दिवाणी प्रक्रिया संहितेच्या सर्व तरतुदी जशाच्या तशा लागू होत नाहीत. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 13(4) (i) ते (vi) मध्ये, या कलमाच्या प्रयोजनाकरीता जिल्हा मंचाला दाव्याचे काम चालविण्यासंबंधी दिवाणी व्यवहार संहिता, 1908 (Code of Civil Procedure, 1908) मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करता येईल, असे नमुद केले आहे, त्यामधील 13(4) (vi) मध्ये, “any other matter which may be prescribed” असे नमुद केले आहे, त्यामुळे मंचास Ord. II, Rule 3 व Ord. VII, Rule 10 लागू होतात, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मंच तिन्ही तक्रारदारांना प्रस्तुतच्या तक्रारी परत करुन त्यांनी योग्य त्या कोर्टामध्ये त्या दाखल कराव्यात असा आदेश देते.
वरील विवेचनावरुन मंच अर्जदार/जाबदेणारांचा अर्ज मंजूर करुन प्रस्तुतच्या तिन्ही तक्रारी या सामाईक आदेशाद्वारे बंद करते. या आदेशाची मुळ प्रत तक्रार क्र. पीडीएफ/154/2011 मध्ये लावून तक्रार क्र. पीडीएफ/155/2011 व पीडीएफ/156/2011 मध्ये या आदेशाच्या सांक्षांकित प्रति लावण्यात याव्यात.