Maharashtra

Nagpur

CC/09/527

Shankarlal J. Dube - Complainant(s)

Versus

Dr. Prashant Bawankule - Opp.Party(s)

ADV.JAYESH VORA

01 Jan 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/09/527
1. Shankarlal J. DubeJabalpur (MP) ...........Appellant(s)

Versus.
1. Dr. Prashant BawankuleNagpurNagpurMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :ADV.JAYESH VORA, Advocate for Complainant
ADV.DHARMADHIKARI, Advocate for Opp.Party

Dated : 01 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 01/01/2011)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली आहे. गैरअर्जदार हे डोळयांचे शस्‍त्रवैद्य असून तक्रारकर्ता हा सेवानिवृत्‍त व्‍यक्‍ती आहे.
      तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाने कमी दिसून येत असल्‍याने त्‍यांनी जबलपुर येथील डॉ. रवि अग्रवाल यांचेकडे डिसेंबर 2008 मध्‍ये जाऊन तपासणी केली असता त्‍यांना डाव्‍या डोळयात मोतिया बिंदु झालेला असल्‍याचे निदान करुन शल्‍यक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यानुसार दि.30.12.2008 रोजी डॉ. रवि अग्रवाल यांचे रुग्‍णालयात तक्रारकर्ता भरती होऊन त्‍याच्‍या डाव्‍या डोळयावर फेको पध्‍दतीने शल्‍यक्रिया करण्‍यात आली व दि.31.12.2008 रोजी रुग्‍णालयातून सुट्टी देण्‍यात आली. यावेळेस तक्रारकर्त्‍याला डाव्‍या डोळयाने बरोबर दिसत होते. तसेच सुट्टी देतांना तक्रारकर्त्‍याला 5 दिवसांकरीता T. Gate 400, T. Nifex, cap. Dorzeal, Homide Eye drop & Zigate – D Eye drop यांचा वापर करुन पाच दिवसांनंतर तपासणीस येण्‍यास सांगितले. दुस-याच दिवशी तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयात त्रास होत असल्‍याने त्‍याने डॉ. रवि अग्रवाल यांची भेट घेतली असता त्‍यांनी तपासणी करुन Subconjuctival  injection दिले व डाव्‍या डोळयात टाकण्‍याकरीता मलम व तीन प्रकारचे ड्राप्‍स (antibiotic/steroid) दिले. याउपरही आराम न पडल्‍याने तक्रारकर्त्‍याने दि.02.01.2009 रोजी परत डॉ. रवि अग्रवाल यांचेकडे जाऊन पुन्‍हा तपासणी केली असता त्‍यांनी डोळा धुवून त्‍यात इंट्रा विकट्रल अँटीबायोटिक्‍स इंजेक्शन दिले व प्रत्‍येक तासानंतर   Vanicomycine Eye Drops दिले. तसेच गैरअर्जदाराकडे जाऊन 36 तासाच्‍या आत    (Victrotomy) ऑपरेशन करण्‍याची ताकिद दिली. 
 
तक्रारकर्ता दि.03.01.2009 रोजी डॉ. रवि अग्रवाल यांच्‍या सल्‍ल्यानुसार गैरअर्जदाराकडे आला असता गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयात त्‍याचेकडून रु.150/- रजिस्‍ट्रेशन करण्‍यात आले व गैरअर्जदाराचे कर्मचारी खन्‍ना मॅडम यांनी डोळयाची तपासणी करुन औषध लिहून दिले व डॉ. बावनकुळे 2, 3 दिवसानंतर प्रोसिजर करुन देतील असे सांगितले. तक्रारकर्त्‍याने 36 तासाच्‍या आत ऑपरेशन होणे गरजेचे आहे या सांगण्‍यावर काळजी करण्‍याचे कारण नाही असे उत्‍तर देऊन गैरअर्जदार येईपर्यंत Eyeborex व Ciplox Eye Drops टाकण्‍यास सांगितले. या दरम्‍यान तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयातील पाणी (Fluid) सँपल म्‍हणून काढण्‍यात आले व ते डॉ. संध्‍या सावजी यांचेद्वारा संचालित सु-विश्‍वास डायग्‍नोस्टिक लॅब येथे परीक्षणाकरीता पाठविण्‍यात आले. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने सदर सँपल परीक्षणकरीता नेले व त्‍याबाबत फी म्‍हणून रु.950/- अदा केले. तसेच रुग्‍णालयाने दिलेल्‍या इतर वस्‍तूंची व औषधे यांची खरेदी रु.2075/- देऊन केली व मधुमेहाची तपासणी केली. तक्रारकर्ता या उपचारा दरम्‍यान शिवम लॉजमध्‍ये मुलासह राहत होता. या दरम्‍यान डोळयात सतत डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानुसार ड्राप्‍स टाकित असतांनाही तक्रारकर्त्‍याला डोळयाचा त्रास होत होता.
 
तक्रारकर्ता दि. 04.01.2009 व दि.05.01.2009 रोजी गैरअर्जदाराकडे पुन्‍हा तपासणीकरीता गेला व डोळयात कायम त्रास असल्‍याचे निदर्शनास आणून दिले. तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयाची दि.05.01.2009 रोजी रु.500/- घेऊन सोनोग्राफी करण्‍यात आली व मधुमेह व्‍यवस्‍थापनाकरीता डॉ.पितळेद्वारे लांजेवार हॉस्पिटल येथे भरती करण्‍यात आले. दि.06.01.2009 रोजी त्‍याला सुट्टी देण्‍यात आली व त्‍याचदिवशी गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयात तक्रारकर्त्‍याला भरती करण्‍यात आले आणि तेथेच डॉ. शैलेश पितळे यांनी साखरेची चाचणी घेतली. त्‍यांनी आपल्‍या अहवालात साखरेचे प्रमाण उपाशी (fast) 140mg/dl व जेवल्‍यानंतर 240 mg/dl नमूद केले. तक्रारकर्त्‍याचे डोळयाच्‍या पाण्‍याचे सँपलचा रीपोर्ट हा बंद लिफाफ्यात गैरअर्जदाराकडे तक्रारकर्त्‍याने दिला. तसेच सदर रीपोर्ट हा तक्रारकर्त्‍याला परत न मिळाल्‍याने त्‍यात काय नमूद आहे हे तक्रारकर्त्‍यास माहित नाही. गैरअर्जदाराने रात्री 12-00 वा. तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयाची शल्‍यक्रिया केली व दि.07.01.2009 रोजी सकाळी 6-00 वा. सुट्टीही देण्‍यात आली. सोबत डिस्‍चार्ज कार्ड व औषधे लिहून दिली. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार साखरेचे प्रमाण जास्‍त असतांनाही गैरअर्जदाराने कुठल्‍याही धोक्‍याची (Risks) माहिती तक्रारकर्त्‍याला दिली नाही. सुट्टी देतांना  (Discharge) रु.15,000/- ची मागणी केली. तसेच उपचाराबाबतच्‍या फाईल्‍स व अहवाल त्‍याला सुपूर्द केले नाही. गैरअर्जदाराच्‍या सांगण्‍याप्रमाणे डोळयात औषधे टाकणे सुरु असतांनाही दृष्‍टीमध्‍ये फरक पडला नाही. दि.14.01.2009 रोजी गैरअर्जदाराने परत तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयाची तपासणी केली व थोडया दिवसात दिसणे सुरु होईल असे सांगण्‍यात आले व तसेच होमसिकनेस झाला असल्‍याने जबलपूरला जाण्‍यास सांगितले. यांनतर दि.12.02.2009 पर्यंत तक्रारकर्ता सतत 3 ते 4 वेळेस गैरअर्जदाराकडे तपासणीकरीता गेला. प्रत्‍येक वेळेस गैरअर्जदाराने डोळयात औषध टाकणे सुरु ठेवा लवकरच दिसणे सुरु होईल असे सांगितले. परंतू तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाच्‍या आतील खालचा भाग गळू लागला व त्रासही होत होता. दि.15.02.2009 रोजी गैरअर्जदार जबलपूर येथे आल्‍याने तपासणीकरीता तक्रारकर्ता त्‍यांच्‍याकडे गेला असता त्‍यांनी तपासणी केली व निदान केले नाही आणि नागपूरला येण्‍यास सांगितले. गैरअर्जदाराच्‍या सदर वर्तणुकीमुळे तक्रारकर्त्‍याला संशय आला व त्‍याने जबलपूर येथील डॉ. मिश्रा, प्रतिष्‍ठीत नेत्र चिकित्‍सक यांचे दुसरे अभिप्राय जाणून घेण्‍यास त्‍यांच्‍याकडे गेला असता त्‍यांनी गैरअर्जदारांनी दिलेली औषधे ताबडतोब बंद करण्‍यास सांगितले व सदर औषधे बंद न केल्‍यास डोळा काढावा लागेल असे सांगितले. तसेच तक्रारकर्त्‍याला भारतातील सर्वात मोठे व प्रतिष्‍ठीत रुग्‍णालय शंकर नेत्रालय, चेन्‍नई येथे जाऊन तपासणी करण्‍यात सांगितले. तसेच त्‍यांनी फक्‍त उजव्‍या डोळयाचा नंबर‍ दिला व डाव्‍या डोळयात Oflox Eye Drops दिवसात तिन वेळा टाकण्‍यास सांगितले.
 
यानंतर तक्रारकर्ता चेन्‍नई येथे शंकर नेत्रालयमध्‍ये गेला व दि.30.03.2009 रोजी तपासणी केली असता तेथील तज्ञा डॉ. धनश्री रात्रा यांनी तक्रारकर्त्‍याचा डावा डोळा खराब झाल्‍याचे व त्‍यात ज्‍योती राहीलेली नसल्‍याचा (No Pl, i.e. No Photolumiscence)  अभिप्राय दिला तसेच त्‍यावर उपचार करणे शक्‍य नसल्‍याचेही कळविले. तक्रारकर्त्‍याच्‍या मते गैरअर्जदाराने आपली कमतरता लपविण्‍याच्‍या दृष्‍टीने तक्रारकर्त्‍याला उपचाराची फाईल व संबंधीत अहवाल परत केलेले नाही. भारत सरकार, श्रम व रोजगार मंत्रालय (डी.जी.ई.अँड टी) यांच्‍यातर्फे देण्‍यात येणा-या विकलांगता प्रमाणपत्रामध्‍येही तक्रारकर्त्‍याची सुक्ष्‍म तपासणी केल्‍यानंतर दि.28.04.2009 ला प्रमाणपत्र देण्‍यात आले व त्‍यात तक्रारकर्ता डाव्‍या डोळयात ज्‍योती नसल्‍याने (No Pl, i.e. No Photolumiscence) 40 टक्‍के विकलांग असल्‍याचे प्रमाणित करण्‍यात आले.
 
तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार तो सेवानिवृत्‍त असून त्‍याला गैरअर्जदाराने खोटी सांत्‍वना देत त्‍याची फसवणूक केलेली आहे. त्‍यामुळे त्‍याला शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करण्‍यास बाध्‍य केले. तक्रारकर्त्‍याला डाव्‍या डोळयात कायम जळजळ होत आहे. गैरअर्जदाराला तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयाची स्थिती बघून निष्‍णात डॉक्‍टर असल्‍याने डोळा उपचार सुरु असल्‍यापासून खराब झाल्‍याची जाणिव होती, केवळ पैसे कमविण्‍याच्‍या हेतूने हलगर्जीपणाने आपले कार्य केलेले आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने झालेल्‍या खर्चापोटी रु.44,593/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.10,00,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. आपल्‍या तक्रारीसोबत तक्रारकर्त्‍याने एकूण 21 दस्‍तऐवज दाखल केलेले असून त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने डॉ. रवि अग्रवाल यांनी दिलेले डिस्‍चार्ज कार्ड, गैरअर्जदाराने दिलेल्‍या पावती व सोनोग्राफी फिल्‍म, सु-विश्‍वास डायग्‍नोस्टिक लॅबची पावती, औषधांची पावती, एन आर पी एल यांनी दिलेला अहवाल, डॉ. मोघे यांनी दिलेला अहवाल, डॉ. पितळे यांनी दिलेला अहवाल, डॉ. पितळे यांनी दिलेली पावती, दादासाहेब लांजेवार यांनी दिलेली पावती, डॉ. पितळे यांनी दिलेला अहवाल, डॉ. पितळे यांनी दिलेली पावती, औषधांची पावती, गैरअर्जदार यांनी दिलेले डिस्‍चार्ज कार्ड, गैरअर्जदाराने दिलेली कच्‍ची पावती, डॉ. पितळे यांनी दिलेला अहवाल, औषधांची पावती, जबलपुर हॉस्पिटल, जबलपुर नोंदणीपत्र, राजेंद्र नेत्र चिकित्‍सालय यांनी दिलेला अहवाल, शंकर नेत्रालय, चेन्‍नई यांचा परिक्षण अहवाल व पावती, भारत सरकारद्वारे देण्‍यात आलेला विकलांगता प्रमाणपत्र आणि तक्रारकर्त्‍याने उपचाराकरीता केलेल्‍या खर्चाची यादी यांचा समावेश आहे.
 
2.    सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्‍यानंतर मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला. गैरअर्जदाराने सदर तक्रारीला आपले लेखी उत्‍तर दाखल केले.
3.    गैरअर्जदाराने लेखी उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्ता त्‍यांच्‍याकडे डॉ. रवि अग्रवाल यांच्‍या सल्‍ल्यानुसार दि.03.01.2009 रोजी नेत्र तपासणीकरीता आला व त्‍यावेळी डॉ. सोनाली खन्‍ना ज्‍या स्‍वतः नेत्रशल्‍य चिकीत्‍सक आहेत, त्‍यांनी डोळयाची तपासणी करुन औषध लिहून दिल्‍याची बाब मान्‍य केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदारास 2,3 दिवसानंतर कळविल्‍याबाबतचे व डॉ. रवि अग्रवाल द्वारे 36 तासाचे आत सर्जरी करणे आवश्‍यक असल्‍याची सुचना देण्‍यात आलेली बाब अमान्‍य केलेली आहे. दरम्‍यान तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयातील पाण्‍याची तपासणी डॉ. संध्‍या सावजी यांचे सु-विश्‍वास डायग्‍नोस्‍टीक लॅबमधुन परीक्षण करुन घेण्‍यास सांगितले. तसेच मधुमेहाची तपासणी करण्‍यास सांगितली. दि.04.01.2009 व 05.01.2009 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयात त्रास होत असल्‍याबाबतची त्‍याची सुचना व त्‍या डोळयाची सोनोग्राफी करण्‍यात आली. डॉ. पितळेकडून मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरीता डॉ. दादासाहेब लांजेवार हॉस्पिटल येथे भरती करण्‍यात आले आणि साखरेची चाचणी करण्‍यात आली व साखरेचे प्रमाण उपाशी (fast) 140mg/dl व जेवल्‍यानंतर 240 mg/dl असल्‍याचे मान्‍य केले आहे. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयातून काढण्‍यात आलेल्‍या पाण्‍याचा अहवाल बंद लिफाफ्यात होता व तो तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आला नाही ही बाब नाकारुन गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर अहवाल हा तक्रारकर्त्‍याच्‍या केसपेपर्ससोबत ठेवलेला होता व पोस्‍ट ऑपरेशन चिकित्‍सेकरीता त्‍याची गरज पडण्‍याची शक्‍यता होती. तक्रारकर्त्‍याची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍याची बाब मान्‍य करुन दि.07.01.2009 रोजी त्‍याला डिस्‍चार्ज कार्ड दिल्‍याचे गैरअर्जदाराने मान्‍य केले आहे. तक्रारकर्त्‍याने पक्‍के बिल व रीपोर्टस ची मागणी केली व डोळा खराब झाल्‍याची माहिती असुनही विनाकारण (Victrotomy) ऑपरेशन करण्‍यात आल्‍याचे विधान खोटे आहे. सर्जरीनंतर प्रत्‍येक दिवशी डोळा दाखविण्‍याकरीता गैरअर्जदाराने ताकिद दिली होती व नेत्र विकाराचे स्‍वरुप पाहता शस्‍त्र क्रियेपूर्वी व नंतर डोळयाचे परीक्षण (Close Monitoring) करणे अत्‍यंत आवश्‍यक होते. डोळयात वारंवार औषधे टाकल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला दिसत नव्‍हते, तसेच 14.01.2009 नंतर तपासणी करुन थोडया दिवसात दिसणे सुरु होईल व होम सिकनेसमुळे जबलपुरला परत जाण्‍याबाबत सांगितल्‍याचे विधान असत्‍य असल्‍याचे गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे. दि.28.01.2009 रोजी डाव्‍या डोळयाची सोनोग्राफी केली असता जंतुच्‍या प्रादुर्भावामुळे दृष्‍टी पटल (Retinal Detachnent) सरकल्‍याबाबतची शक्‍यता दिसून आली. परंतू डोळयात असलेल्‍या सुजेमुळे (inflamation) शस्‍त्रक्रिया करणे शक्‍य नव्‍हते. तक्रारकर्त्‍याचे दि.30.12.2008 रोजी मोतीबिंदुचे ऑपरेशन जबलपुर येथे झाले. त्‍यानंतर तक्रारकर्ता दि.03.01.2009 रोजी गैरअर्जदाराकडे आला असता त्‍याच्‍या डोळात संक्रमण (infection) झाल्‍याचे आढळून आले. डॉ. सोनाली खन्‍ना, ज्‍या उत्‍कृष्‍ट नेत्रशल्‍य चिकित्‍सक असून गैरअर्जदाराप्रमाणेच दृष्‍टीपटल विशेष तज्ञ आहे, त्‍यांना तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयात (infection–Endophthalmitias) आढळून आले व त्‍यांनी लगेच Medical Management of Endophthalmitias  सुरु केली व त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयातील पाणी (Aqueous tap)  काढून Micobiologist डॉ. संध्‍या सावजी यांचेकडे तपासणीकरीता पाठविण्‍यात आले आणि त्‍याचे वेळी डोळयाच्‍या आत Intiavitreal Antibiotic देण्‍यात आले व दोन दिवसाच्‍या   Medical trial ला प्रतिसाद न मिळाल्‍याने सर्जीकल Management म्‍हणजे Vitrectomy बद्दल सांगण्‍यात आले. परंतू तक्रारकर्त्‍याच्‍या मधुमेहामुळे साखरेचे प्रमाण वाढलेले असल्‍याने डॉ. शैलेश पितळे यांनी ऑपरेशनची परवानगी दिली नाही व रुग्‍णाचे साखरेचे प्रमाण कमी करण्‍याकरीता त्‍यांच्‍या रुग्‍णालयात भरती केले. दि.06.01.2009 डॉ. पितळे यांनी ऑपरेशनकरीता तक्रारकर्त्‍याला परवानगी दिली व संध्‍याकाळी तक्रारकर्त्‍याचे ऑपरेशन झाले. तक्रारकर्त्‍याला सात दिवसानंतर पुनर्निरीक्षणासाठी बोलाविले असता तो गैरअर्जदाराकडे नागपुरला आला नाही. त्‍यानंतर 2 आठवडयानंतर दि.28.01.2009 रोजी गैरअर्जदाराकडे आला व गैरअर्जदाराने सोनोग्राफी केली. त्‍यानंतर कधीही तक्रारकर्ता नागपूर येथे आला नाही. तसेच त्‍यांनी प्रत्‍येक वेळेस औषध डोळयात टाकणे सुरु ठेवा असे सांगितले नाही. तक्रारकर्ता 15.02.2009 नंतर कधीही गैरअर्जदारास न भेटल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील त्रासाबाबत काहीही माहिती नाही.
 
      आपल्‍या विशेष कथनात नमूद केल्‍याप्रमाणे, गैरअर्जदाराच्‍या मतानुसार त्‍यांनी शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीने तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील व्‍याधीचे स्‍वरुप पाहता डोळयातील पाणी (Aqueous tap)  काढून Micobiologist कडे तपासणी पाठविले. तक्रारकर्ता मधुमेह पीडीत असल्‍याने शर्करा/युरीया प्रमाण परीक्षण करुन व व्‍याधीचे स्‍वरुप बघून शस्‍त्रक्रिया केलेली आहे. रुग्‍णाची ऑपरेशनकरीता असलेली फिटनेस स्थिती व ऑपरेशनच्‍या सर्व परिणामाविषयी तक्रारकर्त्‍याला कल्‍पना देऊन उपचार केले आहे. त्‍यामुळे त्‍याने निष्‍काळजीपणा केला हे विधान अत्‍यंत बेजबाबदारपणाचे असल्‍याचे गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे. तकारकर्त्‍याचा डोळा व व्‍याधी अपेक्षित प्रतिसाद देत असल्‍याचे आढळून आले. परंतू तक्रारकर्त्‍याने अचानकपणे 14.01.2009 रोजी जबलपुरला परत जात असल्‍याचे सांगितल्‍यावर सात दिवसात पुनर्तपासणीकरीता येण्‍यास सांगितले. परंतू सदर कालावधीत तो आला नाही. जबलपुरला गैरअर्जदार गेले असता तेथे तक्रारकर्त्‍याला सुक्ष्‍म तपासणीकरीता नागपूर येथे बोलाविले. परंतू तक्रारकर्ता यानंतर कधीही गैरअर्जदारास भेटला नाही व त्‍याचे व्‍याधीचे स्वरुपाबाबतही कळविलेले नाही. म्‍हणून सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे.
 
4.    सदर प्रकरण मंचासमक्ष युक्‍तीवादाकरीता 22.12.2010 रोजी आले असता मंचाने उभय पक्षांच्‍या वकिलांमार्फत त्‍यांचा युक्‍तीवाद विस्‍तृतपणे ऐकला. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेले कथन, दस्‍तऐवज यांचे निरीक्षण केले असता खालील निष्‍कर्षाप्रत मंच आले.
 
 
 
-निष्‍कर्ष-
5.    तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष नि.क्र.3 मध्‍ये नमूद एकूण 21 दस्‍तऐवज ज्‍यामध्‍ये, डॉ. रवि अग्रवाल यांनी दिलेले डिस्‍चार्ज कार्ड, गैरअर्जदाराने दिलेल्‍या पावती व सोनोग्राफी फिल्‍म, सु-विश्‍वास डायग्‍नोस्टिक लॅबची पावती, औषधांची पावती, एन आर पी एल यांनी दिलेला अहवाल, डॉ. मोघे यांनी दिलेला अहवाल, डॉ. पितळे यांनी दिलेला अहवाल, डॉ. पितळे यांनी दिलेली पावती, दादासाहेब लांजेवार हॉस्‍पीटल यांनी दिलेली पावती, डॉ. पितळे यांनी दिलेला अहवाल, डॉ. पितळे यांनी दिलेली पावती, औषधांची पावती, गैरअर्जदार यांनी दिलेले डिस्‍चार्ज कार्ड, गैरअर्जदाराने दिलेली कच्‍ची पावती, डॉ. पितळे यांनी दिलेला अहवाल, औषधांची पावती, जबलपुर हॉस्पिटल, जबलपुर येथील नोंदणीपत्र, राजेंद्र नेत्र चिकित्‍सालय यांनी दिलेला अहवाल, शंकर नेत्रालय, चेन्‍नई यांचा परिक्षण अहवाल व पावती, भारत सरकारद्वारे देण्‍यात आलेला विकलांगता प्रमाणपत्र आणि तक्रारकर्त्‍याने उपचाराकरीता केलेल्‍या खर्चाची यादी यांचा समावेश आहे.
 
6.    तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराकडे उपचार घेतले होते व गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयावर उपचार करुन शस्‍त्रक्रिया केलेली आहे आणि त्‍याकरीता रु.15,000/’- रक्‍कम दिल्‍याचे दस्‍तऐवज क्र. 14 (पृष्‍ठ क्र.35) वरुन स्‍पष्‍ट होते. तसेच गैरअर्जदाराने सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍याकडे उपचार केले असून त्‍यांनी त्‍याच्‍या डोळयावर शस्‍त्रक्रिया केल्‍याची बाब मान्‍य केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा सेवाधारक ठरतो व ग्रा.सं.का.नुसार ग्राहक या संज्ञेत येत असल्‍याचे मंचाचे मत आहे.
7.    तक्रारकर्त्‍याने सर्वप्रथम त्‍याच्‍या डोळयाची तपासणी जबलपूर येथील डॉ. रवि अग्रवाल यांचेकडे केली. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाने कमी दिसत होते ही बाब तक्रारकर्त्‍याने मान्‍य केली आहे. तक्रारकर्त्‍याने डॉ. रवि अग्रवाल यांचे रुग्‍णालयात 30.12.2008 रोजी भरती होऊन त्‍याचदिवशी त्‍यांच्‍या डाव्‍या डोळयावर फेंको पध्‍दतीने मोतियाबिंदुची शल्‍यक्रिया करण्‍यात आली व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍यास 31.12.2008 रोजी रुग्‍णालयातून सुट्टी देण्‍यात आली. ही बाब तक्रारकर्त्‍याने तक्रारीत कथन केलेली आहे. तसेच त्‍यापुष्‍टयर्थ दस्‍तऐवज क्र. 1 डिस्‍चार्ज कार्ड तक्रारीसोबत दाखल केले आहे. त्‍यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयावर डॉ. रवि अग्रवाल यांनी 30.12.2008 रोजी मोतियाबिंदुची शस्‍त्रक्रिया केली व तक्रारकर्त्‍यास 5 दिवसांकरीता T. Gate 400, T. Nifex, cap. Dorzeal, Homide Eye drop & Zigate – D Eye drop वापरण्‍यास सांगितले होते. सदर औषधे तक्रारकर्त्‍याने घेतली आणि ही औषधे व Eye drop सुध्‍दा काळजीपूर्वक डोळयात टाकले असे तक्रारकर्त्‍याने नमूद केले आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍यास एका दिवसानंतर डोळयात त्रास होऊ लागला ही बाबसुध्‍दा तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केली व त्‍याकरीता डॉ. रवि अग्रवाल, जबलपूर ह्यांची भेट घेतली. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयाची तपासणी केली व Subconjuctival  injection दिले व डाव्‍या डोळयात (ज्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया झाली) टाकण्‍याकरीता तीन प्रकारचे ड्राप्‍स (antibiotic/steroid) व एक मलम दिले. यामुळे तक्रारकर्त्‍यास काहीही आराम झालेला नव्‍हता. त्‍यानंतर 02.01.2009 रोजी परत डॉ. रवि अग्रवाल ह्यांची भेट घेतली. त्‍यांनी डोळयाची तपासणी केली, डोळयात इंट्रा विकट्रल अँटीबायोटिक्‍स इंजेक्शन दिले व प्रत्‍येक तासानंतर टाकण्‍याकरीता Vanicomycine Eye Drops दिले व ताबडतोब गैरअर्जदाराकडे जाऊन ऑपरेशन करण्‍याचा सल्‍ला दिला. या बाबी तक्रारकर्त्‍याने स्‍वतः तक्रारीत नमूद केल्‍या आहेत.
 
तक्रारकर्त्‍याने डॉ. रवि अग्रवाल ह्यांची भेट घेतल्‍यानंतर व तपासणीनंतर त्‍यांनी डाव्‍या डोळयात टाकण्‍याकरीता तीन प्रकारचे ड्रॉप्‍स (antibiotic/steroid) व एक मलम दिल्‍याचे नमूद केले आहे. परंतू ते कोणते ड्रॉप्‍स व मलम होते याबाबतचा कोणताही उल्‍लेख तक्रारीत नाही व ते निदर्शनास येणारे दस्‍तऐवजही दाखल नाही.
8.    तक्रारकर्त्‍याच्‍याच कथनानुसार डॉ. रवि अग्रवाल, जबलपुर ह्यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया 30.12.2008 रोजी केल्‍यानंतर जो औषधोपचार सांगितला, तो तक्रारकर्त्‍याने काळजीपूर्वक घेतल्‍यानंतरसुध्‍दा त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाला त्रास होऊ लागला व त्‍यामुळे डॉ. रवि अग्रवाल यांनी केलेल्‍या उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळत नव्‍हता. डॉ. रवि अग्रवाल ह्यांनीच तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदाराकडे पाठविले ही बाब तक्रारकर्त्‍याने जी कथन केलेली आहे, ती गैरअर्जदारानेसुध्‍दा आपल्‍या लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली आहे. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याची प्रथम मोतियाबिंदुची शस्‍त्रक्रिया जी 30.12.2008 रोजी डॉ. रवि अग्रवाल, जबलपूर ह्यांचेमार्फत झाली, त्‍यानंतर ख-या अर्थाने तक्रारकर्त्‍यास जास्‍त त्रास जाणवू लागला व तो त्रास डॉ. रवि अग्रवाल ह्यांनी केलेल्‍या उपचारामुळे कमी झालेला नसल्‍यामुळे डॉ. रवि अग्रवाल ह्यांनी तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदाराकडे पाठविले.
 
9.    तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीत स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे की, डॉ. रवि अग्रवाल यांनी 36 तासाच्‍या आत ऑपरेशन/सर्जरी (Vitrectomy) करणे आवश्‍यक आहे असे तक्रारकर्त्‍यास सांगितले होते व ही बाब गैरअर्जदारांना तक्रारकर्त्‍याने सांगितली होती. गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरात अशी कोणतीही बाब सांगितल्‍याचे मान्‍य केले नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 1 हे डॉ. रवि अग्रवाल ह्यांचे डिस्‍चार्ज कार्ड आहे. त्‍याचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍येसुध्‍दा कुठेही 36 तासाच्‍या आत ऑपरेशन/सर्जरी (Vitrectomy) करणे आवश्‍यक आहे असे नमूद नाही. यावरुन तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केलेली बाब की, डॉ. रवि अग्रवाल ह्यांनी त्‍याला 36 तासाच्‍या आत ऑपरेशन करण्‍याकरीता सुचविले होते हेसुध्‍दा सिध्‍द होत नाही.
10    तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले आहे की, तो आपल्‍या मुलासोबत जबलपूरवरुन नागपूर येथे 03.01.2009 ला आला. गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयात गेला. ही बाबसुध्‍दा गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी उत्‍तरात मान्‍य केली. तसेच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 2 (पृष्‍ठ क्र.20-22) वरुन ही बाब स्‍पष्‍ट होते. सदर दस्‍तऐवज क्र. 2 हे गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयाची पावती असून त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याकडून रु.150/- व रु.500/- घेतल्‍या संदर्भात आहे. गैरअर्जदाराच्‍या कथनावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता दि.03.01.2009 रोजी त्‍याच्‍याकडे आल्‍यानंतर गैरअर्जदाराचे रुग्‍णालयातील डॉ. सोनाली खन्‍ना ह्यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयाची तपासणी करुन औषध दिले. डॉ. सोनाली खन्‍ना यासुध्‍दा नेत्रशल्‍य चिकित्‍सक आहे ही बाबसुध्‍दा गैरअर्जदाराने, तक्रारकर्ते यांच्‍या वकिलांनी घेतलेल्‍या उलट तपासणीत मान्‍य केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या संपूर्ण तक्रारीमध्‍ये असा आक्षेप नाही की, डॉ. सोनाली खन्‍ना या डोळा तपासण्‍याकरीता योग्‍य अशा डॉक्‍टर नाही किंवा त्‍यांच्‍याकडे कौशल्‍य (skill)  नाही. तक्रारकर्ता दि.03.01.2009 ला गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयात गेला असता डॉ. सोनाली खन्‍ना ह्यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाची तपासणी केली. तसेच Eyeborex व Ciplox Eye Drops टाकण्‍यास सांगितले व तक्रारकर्त्‍याचे डोळयातील पाणी काढून डॉ. संध्‍या सावजी यांच्‍या सु-विश्‍वास डायग्‍नोस्‍टीक लॅबमधुन परीक्षण करण्‍याकरीता तक्रारकर्त्‍यासोबत पाठविले या बाबी उभय पक्षांनी मान्‍य केल्‍या आहेत. यावरुन तक्रारकर्ता दि.03.01.2009 रोजी गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयात गेला असता तेथील तज्ञ डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचार केलेला आहे व प्राथमिक तपासणीकरीता वैद्यकीय गुणवत्‍तेच्‍या आधारे उपचार केले असल्‍याचे स्‍पष्‍ट होते व त्‍याकरीताच त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयातील पाणी काढून तपासणीकरीता डॉ. संध्‍या सावजी ह्यांच्‍याकडे पाठविले. कारण सदर डोळयामध्‍ये काय झाले आहे याचा निष्‍कर्ष काढण्‍याकरीता डोळयातील पाण्‍याची तपासणी/चाचणी होणे गरजेचे आहे व ते गैरअर्जदाराच्‍या रुग्‍ण्‍यालयातील तज्ञ डॉ. सोनाली खन्‍ना ह्यांनी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
      तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीत त्‍याने असा आक्षेप घेतला आहे की, तो गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयात गेल्‍याबरोबर त्‍याचेवर उपचार केला नाही असा त्‍यांनी केलेला आक्षेप यावरुन स्‍पष्‍ट होत नाही. तसेच कोणतीही शस्‍त्रक्रिया किंवा शल्‍यक्रिया करण्‍यापूर्वी रोगाचे निदान करणे गरजेचे आहे व ते करण्‍याकरीता गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयातील डॉ. सोनाली खन्‍ना ह्यांनी डोळयातील पाणी (Aqueous tap)  काढून तपासणीकरीता पाठविले व ही बाब उभय पक्षांना मान्‍य असल्‍यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्ता रुग्‍णालयात गेल्‍यानंतर कोणतीही काळजी घेतली नाही किंवा सेवा दिली नाही असे म्‍हणता येत नाही.
 
11.    तक्रारकर्त्‍याने तक्रारीत असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ता हा जेव्‍हा गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयात गेला, तेव्‍हा डॉ. सोनाली खन्‍ना ह्यांनी गैरअर्जदार डॉ. प्रशांत बावनकुळे हे 2, 3 दिवसांनी प्रोसीजर करुन देतील असे तक्रारकर्त्‍याला सांगितले व गैरअर्जदाराच्‍या येथील कार्यरत डॉ. सोनाली खन्‍ना यांनी स्‍वतः तक्रारकर्त्‍याच्‍या डोळयाची तपासणी केलेली आहे. या सर्व बाबी गैरअर्जदाराने अमान्‍य केल्‍या असून गैरअर्जदाराने उलट तपासणीत ही बाब मान्‍य केली आहे की, ते त्‍यावेळी कदाचित नागपूरमध्‍ये होते. तक्रारकर्त्‍याचे वकील ऍड. जयेश वोरा ह्यांनी युक्‍तीवादाचेवेळी गैरअर्जदार नागपूरमध्‍ये असतांना त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला सेवा दिली नाही किंवा त्‍यांच्‍या डोळयाची तपासणी केली नाही असे म्‍हटले आहे.
 
      डॉ. सोनाली खन्‍ना यासुध्‍दा नेत्र शल्‍य चिकित्‍सक असल्‍याचे गैरअर्जदाराच्‍या वकिलांनी युक्‍तीवादाचेवेळेस म्‍हटले आहे. सदर प्रकरणामध्‍ये जबलपूर येथील डॉ. रवि अग्रवाल ह्यांनी तक्रारकर्त्‍यांना गैरअर्जदाराकडे पाठविले होते. कारण गैरअर्जदार हे तज्ञ डॉक्‍टर आहे असा विश्‍वास डॉ. रवि अग्रवाल ह्यांना होता. अशा परिस्थितीमध्‍ये जर डॉ. प्रशांत बावनकुळे, त्‍यांनी उलट तपासणीत सांगितल्‍याप्रमाणे नागपूरमध्‍ये होते तर त्‍यांनी रुग्‍णालयात रुग्‍ण दि.03.01.2009 रोजी आल्‍यानंतर त्‍यांचे कनिष्‍ठ डॉ. सोनाली खन्‍ना ह्यांचेकडून तपासणी करुन घेऊन, सुरुवातीचे उपचार दिले हे दस्‍तऐवज व कथनावरुन स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारकर्त्‍याला न तपासताच, गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍याला का पाहिजे नाही किंवा तपासले नाही हे स्‍पष्‍ट होत नाही. याउलट गैरअर्जदार यांनी आपले तपासणी मध्‍ये प्र.क्र.10 ला उत्‍तर देतांना मला गरज वाटली नाही असे उत्‍तर दिले आहे. (Que.- Did you personally attended the pt. on 03/01/2009 ? Ans.-No, I don’t need to.) सदर बाब ही गैरअर्जदार यांची व्‍यावसायिक निष्‍काळजीपणा आहे असे दर्शविते.
 
12.   तक्रारकर्ता हा दि.03.01.2009 रोजी गैरअर्जदार ह्यांचे रुग्‍णालयात आल्‍यानंतर व सदर तक्रारकर्त्‍याला मोतियाबिंदूचा आजार असल्‍यामुळे त्‍याच्‍या शरीरात त्‍यादिवशी किती साखरेचे प्रमाण होते, या संदर्भात कोणताही दस्‍तऐवज मंचासमक्ष नाही. परंतू दि.04.01.2009 रोजी तक्रारकर्त्‍याचे Nagpur reference Pathology Laboratory & Research Institute Pvt. Ltd., Nagpur यांनी केलेल्‍या तपासणीनुसार तक्रारकर्त्‍याच्‍या शरीरात साखरेचे प्रमाण   Post Meal Blood Glucose – 443 mg/dl  असल्‍याचे दिसते. म्‍हणजेच तक्रारकर्त्‍यांना अत्‍यंत जास्‍त प्रमाणात साखरेचे प्रमाणे होते. कारण Normal Range - Upto 150 mg/dl आहे. उभय पक्षाच्‍या कथनावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याला दि.05.01.2009 रोजी डॉ. शैलेश पितळे ह्यांनी मधुमेहाचे व्‍यवस्‍थापनाकरीता दादासाहेब लांजेवार हॉस्पिटल सर्जिकल अँड मॅटर्निटी केयर येथे भरती केले. त्‍यादिवशी Post Meal Blood Sugar – 260 mg/dl होते. तीसुध्‍दा  Normal Range पेक्षा जास्‍त होते. दि.06.01.2009 ला डॉ. शैलेश पीतळे यांचे अहवालानुसार Blood Sugar (Fasting) 130 mg/dl  व Blood sugar (Post Break Fast) 240 mg/dl असल्‍याची बाब दस्‍तऐवज क्र. 10 (पृष्‍ठ क्र. 30) वरुन स्‍पष्‍ट होते. म्‍हणजेच दि.06.01.2009 साखरेचे प्रमाण कमी आहे. गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी उत्‍तरात असे नमूद केले आहे की, दि.06.01.2009 ला डॉ. पीतळे ह्यांनी शल्‍यक्रिया करण्‍याकरीता परवानगी दिली ही बाब त्‍यांनी आपल्‍या उत्‍तरातील विशेष कथनात परीच्‍छेत क्र. 16, पृष्‍ठ क्र.14 च्‍या प्रथम परिच्‍छेदात नमूद केली आहे. परंतू त्‍याबाबतचा कोणताही दस्‍तऐवज दाखल केलेला नाही. ज्‍यामध्‍ये डॉ. पितळे यांनी शल्‍यक्रिया करता येईल असा अभिप्राय दिला आहे. त्‍यामुळे गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरातील विशेष कथनात घेतलेली ही बाब मान्‍य करण्‍यायोग्‍य नाही. परंतू शस्‍त्रक्रिया केली त्‍यादिवशी दि.06.01.2009 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या शरीरात साखरेचे प्रमाण दि.04.01.2009 पेक्षा ब-याच प्रमाणात कमी होते. गैरअर्जदाराचे वकिलांनी युक्‍तीवादाचेवेळेस ही बाब नमूद केली की, तक्रारकर्त्‍याला असलेला त्रास व डॉ. संध्‍या सावजी यांचे 05.01.2009 चे डोळयातील पाणी (Aqueous tap)  चे अहवालावरुन तक्रारकर्त्‍यास Filamentous fungus होता ही बाब निश्चित झाली होती व अशा परिस्थितीत गैरअर्जदाराने बरीच काळजी घेऊन औषधोपचार केला आणि दि.06.01.2009 रोजी परत डॉ. संध्‍या सावजी ह्यांचेकडून Vitreous Tap चे परीक्षण केले. त्‍यामध्‍ये KOH Mount – Negative for Fungus असा अहवाल आहे. त्‍यामुळे शस्‍त्रक्रिया करणे गरजेचे होते व तक्रारकर्त्‍याचे साखरेचे प्रमाण कमी होण्‍याची वाट पाहणे हे धोकादायक होते. डॉ. पीतळे यांच्‍याशी चर्चा करुन शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. यामध्‍ये कुठेही गैरअर्जदारातर्फे निष्‍काळजीपणा झालेला नाही असे त्‍यांनी म्‍हटले आहे. मंचासमक्ष दाखल दस्‍तऐवजावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे वारंवार साखरेचे प्रमाणाचे परीक्षण केले आहे. तसेच त्‍याबाबतचे व्‍यवस्‍थापनाकरीता डॉ. पितळे यांचेकडे पाठविले आहे. Aqueous tap ची चाचणी घेतली आहे. यावरुन गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला Endophthalmitias झाल्‍याचा निष्‍कर्ष काढला व शस्‍त्रक्रिया केली.
13.   तक्रारकर्त्‍याला दि.07.01.2009 रोजी सकाळी 6-00 वा. डिस्‍चार्ज दिल्‍याचे म्‍हटले आहे व रुग्‍णालयातून सुट्टी दिल्‍याचे म्‍हटले आहे. सदर बाब गैरअर्जदाराने नाकारलेली आहे. तक्रारकर्त्‍याने रुग्‍णालयातून 6-00 वा. सुट्टी दिल्‍याचे कोणत्‍याही पुराव्‍यावरुन स्‍पष्‍ट होत नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदर बाब मान्‍य करण्‍यासारखी नसल्‍याचे मंचाचे मत आहे.
 
14.   तक्रारकर्त्‍याची गैरअर्जदाराने दि.06.01.2009 रोजी शस्‍त्रक्रिया  केल्‍यानंतर दि.14.01.2009 पर्यंत सतत गैरअर्जदार ह्यांच्‍याकडे तपासणीकरीता येत होता असे म्‍हटले आहे. ही बाब गैरअर्जदाराने नाकारली नाही. परंतू त्‍याने उत्‍तरात असे म्‍हटले आहे की, 14.01.2009 पर्यंत वेळोवेळी औषध टाकल्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाच्‍या दृष्‍टीत फरक पडला नाही. त्‍यांनी आपल्‍या लेखी उत्‍तरात असे नमूद केले आहे की, डोळयाचे परीक्षण (Close Monitoring)  करणे आवश्‍यक होते व त्‍याकरीता डोळा रोज पाहणे आवश्‍यक होते. जर ही बाब आवश्‍यक होती की, (Close Monitoring) परीक्षणाची गरज होती, तर गैरअर्जदाराने डिस्‍चार्ज कार्डमध्‍ये त्‍याप्रमाणे उल्‍लेख करावयास पाहिजे होता व तक्रारकर्त्‍याने रोज डोळा तपासण्‍याकरीता रुग्‍णालयात येणे गरजेचे आहे असे त्‍यात नमूद करावयास पाहिजे होते. परंतू तसे केलेले नाही. परंतू गैरअर्जदाराने दाखल केलेले नि.क्र.19 सोबतचे दस्‍तऐवज क्र. 1 हे त्‍याच्‍या रुग्‍णालयाची Flow Sheet आहे. त्‍यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता 14.01.2009 पर्यंत रुग्‍णालयात जात होता व उपचार घेत होता. यावरुन असा निष्‍कर्ष निघू शकतो की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास मौखिकपणे सदर सुचना दिल्‍या असाव्‍यात. परंतू इतकी महत्‍वाची गोष्‍ट मौखिकपणे सांगितल्‍यानंतर ती 07.01.2009 ला दिलेला डिस्‍चार्ज कार्डमध्‍ये न लिहीणे चुकीचे आहे असे मंचाचे मत आहे.
 
15.   तक्रारकर्त्‍याने पुढे असे म्‍हटले आहे की, 14.01.2009 पासून अंदाजित 12.02.2009 पर्यंत 3, 4 वेळेस नागपूरला गैरअर्जदाराकडे तपासणीकरीता आला. परंतू त्‍याबाबतचा कोणताही पूरावा त्‍यांनी दाखल केलेला नाही. त्‍यामुळे सदर कथन अमान्‍य करण्‍यात येते. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराला दि.15.02.2009 रोजी जबलपूर येथे डोळयाच्‍या त्रासाबद्दल सांगितले व गैरअर्जदाराने 15.02.2009 ला तक्रारकर्त्‍याने डोळयाची तपासणी जबलपूर येथे करुन नागपूरला येण्‍यास गैरअर्जदाराने सांगितले. परंतू त्‍याबाबतचा कोणताही पूरावा गैरअर्जदाराने किंवा तक्रारकर्त्‍याने 15.02.2009 तपासणीच्‍या वेळेस काय औषधे अथवा सूचना गैरअर्जदाराने दिल्‍या याबाबतचा कोणताही पूरावा दाखल केलेला नाही.
16.   तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याला संशय आल्‍यामुळे जबलपूर येथील प्रतिष्‍ठीत नेत्र चिकित्‍सक 19.02.2009 रोजी दुसरा अभिप्राय डॉ. मिश्रा यांचा घेतला व त्‍याने गैरअर्जदाराने दिलेली सर्व औषधे बंद करण्‍यास सांगून फक्‍त Oflox Eye Drops टाकण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍याप्रमाणे गैरअर्जदाराने दिलेल्‍या औषधामुळे त्‍याचा डोळा खराब झाला व त्‍याच्‍या डोळयाची ज्‍योत गेली. तसेच गैरअर्जदाराने चुकीची औषधे दिली. परंतू याबाबत कोणताही पूरावा नसल्‍यामुळे स्‍पष्‍ट होत नाही. त्‍याकरीता डॉ. मिश्रा यांचे औषधोपचारासंबंधी अभिप्राय किंवा गैरअर्जदाराने दिलेली औषधे चुकीची आहे याबाबतचा अभिप्राय दाखल करणे आवश्‍यक होते. त्‍यामुळे गैरअर्जदाराने दिलेल्‍या औषधामुळे तक्रारकर्त्‍याचा डोळा निकामी झाला व त्‍यातील ज्‍योत (Photolumiscence)  संपले असे म्‍हणता येणार नाही.
 
17.   तक्रारकर्त्‍याने डॉ. मिश्रा यांचे सल्‍ल्‍यानुसार शंकर नेत्रालय, चेन्‍नई येथे डोळयाची तपासणी केली असता डोळा पूर्णपणे खराब झाला व त्‍यामुळे ज्‍योत राहिली नाही व त्‍याला आता काहीही उपाय नसल्‍याचे शंकर नेत्रालयाचे म्‍हणणे आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विकलांगता प्रमाणपत्र मिळण्‍याकरीता अर्ज केला व त्‍याला 40 टक्‍के अपंगत्‍व आलेले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने असा निष्‍कर्ष काढला आहे की, गैरअर्जदाराच्‍या निष्‍काळजीपणामुळे या बाबी घडून आल्‍या.
18.   सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदाराने प्रकरण तज्ञांच्‍या अहवालाकरीता पाठविण्‍याकरीता अर्ज केला. त्‍यावर तक्रारकर्त्‍याने म्‍हणणे दाखल केले. अर्ज मंचाने मंजूर करुन तज्ञांच्‍या अहवालाकरीता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांचेकडे पाठविण्‍यात आले. त्‍यांनी खालीलप्रमाणे अहवाल नि.क्र.24 वर दाखल केलेला आहे. सदर अहवालामध्‍ये खालील मुद्दे नमूद करण्‍यात आलेले आहे.
1)    सदर रुग्‍णाला मोतीबिंदूच्‍या ऑपरेशन नंतर Endophalmitis झाल्‍याचे आढळून येते.
2)    मोतीबिंदुच्‍या ऑपरेशन नंतर काही रुग्‍णांना Endophalmitis होऊ शकतो, रुग्‍णाला मधुमेह (Diabetic) असल्‍यास असे होण्‍याची शक्‍यत जास्‍त असते.
3)    हा रुग्‍ण विरोधी पक्षाकडे आल्‍यानंतर डोळयाच्‍या आतील पाणी तपासणे, डोळयात आत Injection देणे ही आता Standard Treatment झाली आहे.
4)     Endophalmitis च्‍या उपचाराकरीता Blood, Sugar Normal असणे आवश्‍यक आहे, अन्‍यथा डोळा लवकर जास्‍त खराब होऊन दृष्‍टी/डोळा जाण्‍याची शक्‍यता असते.
5)    म्‍हणून विरोधी पक्षाने  Diabetic Control करण्‍याकरीता Blood, Sugar तपासण्‍या आणि डॉ. पितळे यांच्‍या उपचार घेण्‍याचा सल्‍ला देणे हे अतिशय योग्‍य होते.
6)     Endophalmitis ला  Intravitreal Injection  देऊन आराम न पडल्‍यास Vitrectomy ची शस्‍त्रक्रिया करावी लागते. ती कधी दृष्‍टी वाचविण्‍यास तर कधी डोळा वाचविते.
7)    औषधीने Blood, Sugar कमी करुन Vitrectomy ची शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निर्णय सर्वमान्‍य वैद्यकीय संकेतानुसार होता.
8)    अशा Endophalmitis च्‍या रुग्‍णाची दृष्‍टी/डोळा Vitrectomy Operation नंतर देखील जाण्‍याची शक्‍यता असते.
 
      सदर अहवालाचे अवलोकन केले असता, “त्‍यामध्‍ये Endophalmitis च्‍या रुग्‍णाची दृष्‍टी/डोळा VitrectomyOperation नंतर देखील जाण्‍याची शक्‍यता असते.”  असे नमूद केले आहे. सदर अहवाल हा डॉ. आनंद पांगारकर हयांनी तयार केलेला आहे व त्‍या समितीचे अध्‍यक्ष डॉ. पी.जे. डिक्‍कर हे होते. तक्रारकर्त्‍याने तज्ञ समितिचे अध्‍यक्ष डॉ. पी.जे.डिक्‍कर व डॉ. आनंद पांगारकर व गैरअर्जदार डॉ. प्रशांत बावनकुळे यांच्‍या उलट तपासणीकरीता अर्ज केला. या उलट तपासणीचे अवलोकन केले असता ही बाब प्रामुख्‍याने जाणवते की, डॉ. डिक्‍कर यांनी ही बाब नमूद केली आहे की, ते Vitrectomy करण्‍याकरीता तज्ञ नाही. ते General Ophthalmologist आहे. परंतू त्‍यांनी डॉ. पांगारकर हे Vitrectomy चे तज्ञ असल्‍याचे मान्‍य केले आहे. तक्रारकर्त्‍याने तज्ञ समितीच्‍या अहवालावर आक्षेप घेतला व म्‍हटले आहे की, तज्ञ समितीतील अध्‍यक्ष व सदस्‍य यांचे गैरअर्जदारासोबत संबंध आहे. त्‍या संदर्भात तक्रारकर्त्‍याने डॉ. आनंद पांगारकर यांना उलट तपासणीमध्‍ये प्रश्‍न क्र. 5 मध्‍ये विचारले की, Do you know Dr. Bawankule personally? – Yes. I am familier with him as a college around 15 yrs.  तसेच तक्रारकर्त्‍याने डॉ. आनंद पांगारकर यांना प्रश्‍न क्र. 6 विचारला की,  Is he a friend? – Yes He is. यावरुन गैरअर्जदार व तज्ञ अहवाल तयार करणारे डॉ. आनंद पांगारकर यांचा नजदीकचा संबंध आहे हे स्‍पष्‍ट होते. तसाच प्रश्‍न गैरअर्जदारांना विचारला असता गैरअर्जदारांनी सुध्‍दा ते Senior Professional असून त्‍यांच्‍यासोबत गैरअर्जदाराने चांगला संबंध असल्‍याचे मान्‍य केले. परंतू मंचाचे मते तज्ञ समितीचे सदस्‍यासोबत नजदिकचे संबंध किंवा जवळीकचे संबंध असल्‍यामुळे तज्ञ समितीने दिलेल्‍या अहवालाला ग्राह्य धरता येणार नाही असा तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद मंचास मान्‍य नाही. त्‍या संबंधाच्‍या आधारावर चुकीचा वैद्यकीय अहवाल दिला असे म्‍हणता येत नाही किंवा गैरअर्जदाराचा बचाव करण्‍याकरीता चुकीचा अहवाल दिला असेही म्‍हणता येणार नाही. अहवाल चुकीचा आहे हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी तक्रारकर्त्‍याची आहे व त्‍याने त्‍यादृष्‍टीने कोणताही दुसरा अहवाल दाखल केलेला नसल्‍यामुळे तज्ञ समितीचा सदर अहवालाला गैरअर्जदाराच्‍या बचावाकरीता अहवाल आहे असे म्‍हणता येत नाही असे मंचाचे मत आहे. डॉ. डिक्‍कर ह्यांनी आपल्‍या उलट तपासणीत स्‍पष्‍ट केले आहे की, उलट तपासणीच्‍या प्रश्‍न क्र. 31 चे उत्‍तर देतांना ही बाब मान्‍य केली आहे की, Control of blood sugar is must. Otherwise endophalmitis will not get cured or controlled.
 
            जर त्‍याने गैरअर्जदाराच्‍या बाजूने मत द्यावयाचे असते तर त्‍यांनी असे उत्‍तर दिले नसते. तज्ञ समितीने दाखल दस्‍तऐवजांवरुन त्‍यांचे मत दिलेले आहे व त्‍यांचे मत हे तक्रार निकाली काढण्‍यासाठी सबळ पूरावा म्‍हणून जरीही उपयोगात आणता येत नसले तरीही ते सहाय्यक ठरते असे अनेक न्‍याय निवाडयावरुन मा. राष्‍ट्रीय आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे मंच सदर अहवालाला तक्रार निकाली काढण्‍याकरीता सहाय्यक आणि तांत्रिक दृष्‍टया व वैद्यकीय शास्‍त्रानुसार योग्‍य मानते व तक्रार निकाली काढण्‍याकरीता सहय्यक दस्‍तऐवज म्‍हणून त्‍याचा वापर या प्रकरणात करण्‍यात येत आहे. कारण न्‍याय निवाडयामध्‍ये व पुरावा शास्‍त्राचा (Evidence Act) विचार केला तर तक्रारकर्त्‍याने स्‍वतःची तक्रार सिध्‍द करणे फार गरजेचे आहे. त्‍याकरीता तज्ञ समितीचे सदस्‍य व अध्‍यक्षांवर आक्षेप घेणे योग्‍य नसल्‍याचे मंचाचे मत आहे.
 
19.   सदर प्रकरणामध्‍ये युक्‍तीवाद करतांना तक्रारकर्त्‍याचे वकिल ऍड. जयेश वोरा ह्यांनी युक्‍तीवाद केला की, तक्रारकर्त्‍यांना उच्‍च रक्‍तदाबाचा आजार होता. परंतू Flow sheet चे अवलोकन केले असता त्‍यात कुठेही रक्‍तदाब मोजल्‍याचे निदर्शनास येत नाही. गैरअर्जदाराचे वकील ऍड. श्री. धर्माधिकारी यांनी रक्‍तदाब घेतले गेले व अनावधनाने त्‍याची नोंद घेतली गेली नाही असे युक्‍तीवादाचेवेळी म्‍हटले. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी, तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या दि.07.01.2009 रोजीच्‍या डिस्‍चार्ज कार्डवर आक्षेप घेत असतांना असे म्‍हटले आहे की, सदर डिस्‍चार्ज कार्डमध्‍ये Physical Fitness देणारे डॉक्‍टर म्‍हणून डॉ. शरद पेंडसे ह्यांचे नाव नमूद आहे. परंतू सदर प्रकरणात त्‍यांचे कोणतेही   Fitness Certificate दाखल नाही. यावर गैरअर्जदाराचे वकिलांनी ही बाब स्‍पष्‍ट केली आहे की, सदर बाब चुकीने त्‍यात नमूद करण्‍यात आलेली आहे. या बाबी उलट तपासणीच्‍यावेळी तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी गैरअर्जदारांना प्रश्‍न क्र.75 विचारला, त्‍यामध्‍ये त्‍यांनी डॉ. शरद पेंडसे यांचे नाव ही Clerical error आहे व चुकीने डिस्‍चार्ज कार्डमध्‍ये आल्‍याचे म्‍हटले आहे.
 
20.   सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्त्‍याने मा. राष्‍ट्रीय आयोगाचा 2007 NCJ 484 NC, H.S. Sharma Vs. Indraprastha Appollo Hosp. दाखल केलेला आहे. या प्रकरणामध्‍ये acute fungal infection झाले होते व blood sugar level ऑपरेशनपूर्वी व नंतरची नोंद घेतली नव्‍हती. तसेच ऑपरेशनपूर्वी व नंतर काळजी घेतली नव्‍हती. परंतू सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्ता गैरअर्जदाराकडे आला तेव्‍हापासून म्‍हणजे दि.03.01.2009 ते 06.01.2009 पर्यंत blood sugar level घेण्‍यात आलेली आहे व sugar management करीता डॉ. पितळे ह्यांचेकडे पाठविण्‍यात आलेले होते. त्‍यामुळे blood sugar संदर्भात काळजी घेतली नव्‍हती किंवा नोंद घेतली नव्‍हती असे म्‍हणता येणार नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला दुसरा निवाडा   2006 NCJ 620 (NC), Dr. P.K. Ghosh Vs. Pradyut Rakshit  यामध्‍येसुध्‍दा शस्‍त्रक्रिया ही blood sugar level ची चाचणी न करता शस्‍त्रक्रिया करण्‍यात आलेली होती. हे दोन्‍ही निवाडे या प्रकरणाला लागू पडत नाही. कारण उपरोक्‍त दोन्‍ही प्रकरणामध्‍ये रोग्‍याचे साखरेचे प्रमाणाचे परीक्षण केले गेले नाही व blood sugar level ची चाचणी केली नव्‍हती. सदर प्रकरणामध्‍ये blood sugar level ची चाचणी केली होती. sugar management डॉ. पितळे मार्फत केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. परंतू ज्‍यावेळी शस्‍त्रक्रिया केली त्‍यावेळी साखरेचे प्रमाण हे नॉर्मल रेंजपेक्षा जास्‍त होते. दि.06.01.2009 रोजी शस्‍त्रक्रिया झाली, त्‍यादिवशी तक्रारकर्त्‍याची Blood Sugar (Fasting) 130 mg/dl होती म्‍हणजे नॉर्मल रेंज (Normal range-100 mg/dl) पेक्षा जास्‍त होती  व Blood sugar (Post Break Fast) 240 mg/dl व (Normal range-100-140 mg/dl)  दर्शविली आहे. डॉ. डिक्‍कर ह्यांनी आपल्‍या उलट तपासणीमध्‍ये म्‍हटले आहे की, 20 टक्‍केपेक्षा कमी जास्‍त प्रमाण राहू शकतो. परंतू मंचाचे असे मत आहे की, सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदाराने काळजी घेतली आहे. परंतू Sugar level ही कमी होण्‍याकरीता जास्‍त कालावधी लागत होता. अशावेळेस जास्‍त इजा होण्‍याचा संभव असल्‍यामुळे शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यामुळे ह्याला Gross Negligence म्‍हणता येणार नाही. कारण काळजी घेतल्‍या गेली आहे.
 
तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने III (2009) CPJ 61 (SC), Malay Kumar Ganguly Vs. Sukumar Mukherjee (Dr)  या प्रकरणी दिलेला निवाडा घेतलेला आहे. यामध्‍ये Expert evidence  च्‍या संदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाने आपले मत व्‍यक्‍त केले आहे व त्‍यामध्‍ये Expert च्‍या मताबद्दल आपले मत दिलेले आहे. ते सदर प्रकरणात विचारात घेण्‍यात आलेले आहे. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला तिस-या न्‍याय निवाडयात मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने II (2009) CPJ 61 (SC), Nizam Instt. Of Sciences Vs. Prashant S. Dhanka या प्रकरणात शस्‍त्रक्रियेपूर्वी Incomplete Investigation वर आपले मत व्‍यक्‍त केले आहे. सदर प्रकरणामध्‍ये Incomplete Investigation झाले असे म्‍हणता येणार नाही. तसेच burden of proof बद्दल मत देत असतांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने, II (2009) CPJ 92 (SC), Post Graduate Institute of Medical Education & Research Vs. Jaspal Singh & ors. यामध्‍ये नमूद केले की, रुग्‍णालयाने deligence व काळजी (care) संदर्भात काहीही त्रुटी नव्‍हती हे सिध्‍द केले पाहिजे असे नमूद करण्‍यात आले. सदर प्रकरणात दस्‍तऐवजावरुन गैरअर्जदार यांनी वैद्यकीय आवश्‍यक काळजी घेतल्‍याचे स्‍पष्‍ट होते. परंतू व्‍यावसायिकदृष्‍टया घ्‍यावयाची काळजी स्‍पष्‍ट होत नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे व मा. राष्‍ट्रीय आयोगाचे इतरही निवाडे दाखल केलेले आहे. या निवाडयांचे अवलोकन केले असता सदर निवाडे या प्रकरणाशी सुसंगत नाही.
21.   गैरअर्जदाराने सर्वोच्‍च न्‍यायालयाचे Martin F. D’souza Vs. Mohd. Ishfaq, AIR 2009 Supreme Court 2049 (SC), Vinitha Ashok (Smt)   Vs. Lakshmi Hospital & ors. (2001) 8 Supreme Court Cases 731, Kusum Sharma & ors. Vs. Batra Hospital & Medical Research Centre & ors. (2010) 3 Supreme Court Cases 480  निवाडे दाखल केलेले आहेत. या निवाडयांमध्‍ये डॉक्‍टरांनी आपले कौशल्‍य (Skill) व ज्ञानाचा भरपूर उपयोग केला हे महत्‍वाचे आहे असे मत मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आहे.
      सदर प्रकरणामध्‍ये डॉक्‍टरांनी आपल्‍या ज्ञानाचा व कौशल्‍याचा भरपूर उपयोग केला आहे, कारण Endophthalmitis म्‍हणजे potentially severe intraocular inflammation which may occur as a complication of intraocular surgery or as a result of nonsurgical trauma or systemic infection असा अर्थ (Russelll W. Read)  यांनी दिलेला आहे. Endophthalmitis म्‍हणजे सर्जरीमध्‍ये किंवा नंतर तो होतो व त्‍यामध्‍ये तसेच risk factor बद्दल आपले मत दिलेले आहे.
 
 Baseline Risk Factors for Decreased Visual Acuity Outcome
Older age
Diabetes
Corneal infiltrate or ring ulcer
Posterior capsule not intact
Intraocular pressure less than 5 mm Hg or greater than 25 mm Hg
Rubeosis irides
Absent red reflex
Visual acuity of light perception, the most important risk factor, with a twofold greater risk of poor visual outcome compared with those with hand-motion or better acuity during initial evaluation
 
यावरुन अशा प्रकारच्‍या आजारामध्‍ये दृष्‍टी जाण्‍याचा संभव फार मोठया प्रमाणात असतो.
 
22.   सदर प्रकरणामध्‍ये निर्णय देत असतांना मंचासमोर प्रामुख्‍याने दोन प्रश्‍न निर्माण होतात की, वैद्यकीय निष्‍काळजीपणा व व्‍यावसायिक निष्‍काळजीपणा.
      सदर प्रकरणामध्‍ये वैद्यकीय निष्‍काळजीपणा तेवढया मोठया प्रमाणावर आढळून येत नाही. कारण तक्रारकर्त्‍याचे प्रथम ऑपरेशन हे डॉ. रवि अग्रवाल यांचेकडे जबलपूर येथे झालेले होते व तक्रारकर्ता मधुमेही होता. तक्रारकर्ता हा मधुमेहाचा रुग्‍ण आहे ही बाब माहित असतांना त्‍याठिकणी प्रथम केलेली शस्‍त्रक्रिया ही योग्‍य प्रकारे झालेली आहे किंवा नाही व त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला infection झाले व त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला Endophthalmitis हा आजार झाला आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास त्रास होऊ लागला. याकरीता फक्‍त गैरअर्जदारांना दोषी धरता येत नाही व गैरअर्जदार यांचेकडे तक्रारकर्ता आल्‍यानंतर त्‍यांनी योग्‍य त्‍या चाचण्‍या केल्‍या. रुग्‍णाचे डोळयातून पाणी aqueous tap चे परीक्षण केले व मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन केले. त्‍यामुळे वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाला असा निष्‍कर्ष काढता येत नाही. परंतू व्‍यावसायिक निष्‍काळजीपणा स्‍पष्‍टपणे दिसत आहे. कारण रुग्‍ण/तक्रारकर्ता 03.01.2009 रोजी गैरअर्जदाराकडे आला व तक्रारकर्त्‍याने जबलपूर येथील डॉ. रवि अग्रवाल ह्यांना गैरअर्जदाराकडे पाठविले. कारण गैरअर्जदार हे तज्ञ डॉक्‍टर आहेत. असे असतांना गैरअर्जदाराने 03.01.2009 पासून 05.01.2009 पर्यंत रुग्‍णाची/तक्रारकर्त्‍याची तपासणी न करणे हा व्‍यावसायिक निष्‍काळजीपणा दर्शवितो. तसेच तपासणीचे संदर्भात आपल्‍या कनिष्‍ठ डॉक्‍टरांवर अवलंबून राहून निर्णय घेतल्‍याचे दिसते. तसेच तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या डिस्‍चार्ज कार्डमध्‍येसुध्‍दा Fitness Physician डॉ. शरद पेंडसे यांचे नाव चुकीने लिहिले गेले आहे  असे म्‍हणणेसुध्‍दा व्‍यावसायिक निष्‍काळजीपणा आहे. तसेच गैरअर्जदाराने  Flow Sheet मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या रक्‍तदाबाची नोंद घेतली गेली नाही. दि.07.01.2009 च्‍या डिस्‍चार्ज कार्डमध्‍येसुध्‍दा तक्रारकर्त्‍याने ऑपरेशननंतर कोण-कोणती काळजी घेतल्‍या गेली पाहिजे याबाबतचे कोणतेही स्‍पष्‍ट उल्‍लेख नाहीत. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याची शस्‍त्रक्रिया दि.06.01.2009 ला केल्‍यानंतर त्‍याला डॉ. पितळे कडे sugar management करीता पाठविल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू तो योग्‍यप्रकारे होत आहे किंवा नाही 07.01.2009 ते 14.01.2009 पर्यंत तक्रारकर्ता त्‍याच्‍याकडे नियमितपणे डोळयाच्‍या तपासणीकरीता येत असतांना त्‍यामध्‍ये काय दोष उत्‍पन्‍न होत आहे किंवा काय त्रास होत आहे व त्‍याबाबत काय काळजी घेणे आवश्‍यक आहे किंवा कोणता सल्‍ला देणे आवश्‍यक आहे याबाबतचा कोणताही विशेष सल्‍ला लिखीत स्‍वरुपात दिल्‍याचे दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याचे वकिलांनी युक्‍तीवादाचे वेळेस consent हे को-या कागदावर घेतल्‍याचे म्‍हटले आहे. पण सदर बाब सिध्‍द झालेली नाही. परंतू सदर प्रकरणामध्‍ये व्‍यावसायिक निष्‍काळजीपणा हा प्रकर्षाने दिसत आहे. तसेच गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला जो आजार होता, त्‍या आजाराची शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतर काय होऊ शकते याबाबतचे पूर्ण कल्‍पना देणे आवश्‍यक होते. तीसुध्‍दा दिल्‍याचे कुठेही आढळून येत नाही. त्‍यामुळे सदर प्रकरण हे जरीही वैद्यकीय निष्‍काळजीपणामध्‍ये येत नसले तरीही व्‍यावसायिक निष्‍काळजीपणाचे कक्षेत येते व त्‍यामुळे व्‍यवसायामध्‍ये निष्‍काळजीपणा केल्‍यामुळे तक्रारकर्ता ज्‍या उद्देशाने गैरअर्जदाराकडे गेला होता, त्‍या आशेच्‍या भ्रमनिरास झालेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता सदरच्‍या उपचारावर केलेला खर्च रु.44,593/- मिळण्‍यास पात्र ठरतो व व्‍यावसायिक निष्‍काळजीपणामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. तक्रारकर्त्‍याला योग्‍य सल्‍ला दिलेला नाही किंवा जाणिव करुन दिलेली नाही. यामुळे झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.5,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो.
 
      सदर प्रकरणामध्‍ये उभय पक्षांचे शपथपत्रावरील कथन, दाखल दस्‍तऐवज व निवाडे यांचे अवलोकनावरुन व वरील निष्‍कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला उपचाराबाबत खर्च केलेली रक्‍कम रु.44,593/- परत द्यावी.
3)    शारिरीक व मानसिक त्रासाच्‍या क्षतिपूर्तीबाबत रु.50,000/- गैरअर्जदाराने       तक्रारकर्त्‍याला द्यावे.
4)    तक्रारीच्‍या खर्चाबद्दल रु.5,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला द्यावे.
5)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाच्‍या       आत करावे.
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT