(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 21/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत मंचात दि.23.12.2010 रोजी विरुध्द पक्षा विरुध्द दाखल करुन मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने वैद्यकीय सेवा पुरविण्यांत हलगर्जीपणा व कसुर केल्यामुळे तसेच तक्रारकर्त्यास फी भरण्यांस उशिर झाल्याने त्याचे पत्नीचा उपचार बंद केल्याने मृत्यू झाला. त्यामुळे नुकसान भरपाईपोटी `.1,00,000/- मृत्यू दिनांकापासुन 18% व्याजाने, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी `.50,000/- मासिक 18% व्याजासह तसेच तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे.
प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. तक्रारकर्त्याची पत्नी श्रीमती वंदना विजय तभाने, दि.30.07.2010 रोजी स्टार बसमधुन उतरत असतांना पडल्याने तिचे डोक्याला किरकोळ इजा झाल्यामुळे विरुध्द पक्षांचे दवाखान्यात भरती व उपचार करण्यांत आले व तब्येतीत समाधानकारक सुधार आला होता, ती शुध्दीत आली होती, औषधापचाराला चांगला प्रतिसाद मिळत होता व ती बोलू शकत होती. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून उपचारापोटी अग्रिम रक्कम `.5,000/- जमा करण्यांस सांगितले ती तक्रारकर्त्याने जमा केली.
3. तक्रारकर्त्याचे पत्नीस दि.30.07.2010 ते 01.08.2010 पर्यंत विरुध्द पक्षाने बरोबर औषधोपचार पुरविला व श्रीमती वंदना बरी होत असल्याचे सांगितले. तसेच दवाखान्यातून औषधोपचारानंतर सुटीबाबत कळविले. दि.01.08.2010 रोजी संध्याकाळी विरुध्द पक्षाने अचानक `.40,000/- जमा करावयास सांगितले, तेव्हा तक्रारकर्ता म्हणाला की, पैशाची जुळवा जुळव करुन पैसे देतो असे म्हटले, परंतु विरुध्द पक्षाने ते न ऐकला ‘आधी पैसे जमा करा, नाही तर आम्ही औषधापचार बंद करु’, त्यावेळी तक्रारकर्त्याची वहीणी सुनंदा बंडू तभाने हजर होती. तक्रारकर्त्याने विनंती केली तरी विरुध्द पक्षाने लगेच तक्रारकर्त्याचे पत्नीचा औषधोपचार बंद केला, सलाईन वगैरे सगळेच काढून घेतले व पत्नीला दवाखान्यातून सुटी घेऊन निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याचे पत्नीची तब्येत बिघडत गेली व दुस-या दिवशी दि.02.08.2010 रोजी स. 6.45 मिनीटांनी ती मरण पावली. तक्रारकर्त्याने आरोप केला की, त्यांनी पैसे न दिल्यामुळेच औषधोपचार बंद केला, व त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे विरुध्द पक्षांनी सेवेत हलगर्जीपणा व मानवी हक्काचे उल्लंघन केलेले आहे. तकारकर्त्याने राणाप्रतापनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार टाकली परंतु कसलीही कारवाई करण्यांत आली नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एकूण 4 दस्तावेज पृ.क्र. 7 ते 41 वर दाख्ल केले आहे, त्यामधे पोलिस तक्रार, पोस्टमार्टम रिपोर्ट, विरुध्द पक्षाने दिलेले बिल, औषधोपचाराचा दैनंदीन चार्ट इत्यादींचा समावेश आहे.
4. विरुध्द पक्षाचे म्हणणे थोडक्यात खालिल प्रमाणे...
तक्रारकर्त्याने खोटया आरोपावर आधारीत सदर तक्रार दाखल केलेली आहे, व उपचाराची कागदपत्रे तक्रारीसोबत असुन त्यावरुन हे स्पष्ट होते की, दि.02.08.2010 रोजी सकाळी 6.45 पर्यंत सर्वोपचरी उपचार केले होते. पेशंटची मेंदूमधील इजा गंभीर स्वरुपाची असल्यामुळे मृत्यू झाला ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास तक्रार निराधार व बिनबुडाची असुन ती खारिज करण्यांस पात्र आहे. विरुध्द पक्षाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय आयोगाच्या निकालपत्रात वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत तक्रार असल्यास तक्रारीसोबत तज्ञ व्यक्तिंचा अहवाल सादर करावा, परंतु या तक्रारीसोबत अश्या प्रकारचा कोणताही अहवाल सादर केलेला नाही व खोटया बेजबाबदार आरोपांच्या आधारावर तक्रार केल्यामुळे सदर तक्रार दंडासह खारिज करण्यांची विनंती केली आहे.
5. तक्रारकर्त्याने दि.30.07.2010 रोजी त्याचे पत्नीस भरती करते वेळी रु.1,000/- जमा केले होते ते तज्ञ डॉक्टरांची भेट व तपासणी अहवाल याकरता दिलेले होते. तक्रारकर्त्याची पत्नी दि.30.07.2010 रोजी संध्याकाळी 5.45 चे सुमारास अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल करण्यांत आले होते, त्यावेळी पासुन दि.02.08.2010 ला सकाळी 6.45 पर्यंत तिचा जीव वाचविण्याकरीता विरुध्द पक्षाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. विरुध्द पक्षाने स्वतःचे हमीवर रु.6,158/- ची उधार औषधे मे. वसंत मेडिकल कडून मिळवून दिली व ती रक्कम सुध्दा तक्रारकर्त्याकडे थकीत आहे. तक्रारकर्त्याने उपचार व खर्चे यासाठी रक्कम अदा न करता ग्राहक म्हणून तक्रार दाखल केली व तो ग्राहक म्हणून मान्य करणे वस्तुस्थितीनुसार शक्य असल्यामुळे तक्रार खारिज करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. विरुध्द पक्षनुसार तक्रारकर्त्याचे पत्नीस बस मधून खालि पडल्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली होती व उलटयापण होत होत्या. मेंदूला इजा झाल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाल्यामुळे त्वरीत दवाखान्यात भरती करुन इलाज सुरु केले व C.T. Scan करुन घेतला तसेच मेंदू शस्त्रक्रियातज्ञ (न्यूरो सर्जन) डॉ. पटनायक, यांनी तपासणी करुन त्याचे सल्ल्याप्रमाणे औषधोपचारात वाढ करुन 2-3 दिवस औषधोपचार चालू ठेवण्याची सुचना केली व काही बिघाड नजरेस आल्यास किंवा औषधांना प्रतिसाद न मिळाल्यास बोलविण्याची सुचना केली.
6. पेशंटने विरुध्द पक्षाचे औषधोपचारास योग्य प्रकारचा प्रतिसाद दिला होता व ती शुध्दीवर आली होती. तिने चहा, जेवन सुध्दा घेतले होते व उपस्थित व्यक्तिं, डॉक्टर व हॉस्पीटलमधील कर्मचा-यांशी बोलायला लागल्या होत्या त्यामुळे दि.01.08.2010 रोजी व्ही.एन.आय.टी. चे डॉक्टर बत्रा (तक्रारकर्ता व्ही.एन.आय.टी. त नोकरीस आहे) यांचेशी चर्चाकरुन दि.01.08.2010 रोजी मेंदू चिकीत्सा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यांत आलेला होता. तक्रारकर्त्याने दि.30.07.2010 रोजी रु.5,000/- दिल्याचे खोटे असल्याचे म्हटले आहे. उपटपक्षी तक्रारकर्त्याने हॉस्पीटलची थकीत रक्कम व वसंत मेडिकलचे औषधाची रक्कम सुध्दा दिलेली नाही. दि.30.07.12010 ते 02.08.2010 पर्यंत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडे पैसे भरण्याची व जमा केल्याची कोणतीही मागणी केली नाही. दि.02.08.2010 रोजी सकाळी 6 वाजता विरुध्द पक्षाने पेशंटची तपासणी केली त्यावेळी पेशंट शुध्दीवर होता व पाणीपण पिली होती, त्यावेळी डॉक्टर कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते. पेशंटला अर्धा उठलेल्या अवस्थेत बसविण्यांत आले होते व नंतर झोपलेल्या स्थितीत बदलविण्यांत आले. काही वेळाने पेशंटच्या नातेवाईकांच्या लक्षात आले की, पेशंट हालचाल करीत नाही. त्याची सुचना विरुध्द पक्षास दिल्यानंतर विलंब न करता पेशंटला तपासणीकरता उपस्थित झाले व पेशंटचा श्वासोश्वास बंद झाला होता, हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते पण हृदयाचा अस्पष्ट ध्वनीसंकेत मिळत होता म्हणूनपेशंटला वाचविण्याकरीता व हृदयाचे स्पंदन चालू करण्याकरीता औषधोपचार व प्रक्रिया पार पाडूनही पेशंटने प्रतिसाद दिला नसल्यामुळे मृत झाल्याचे घोषीत करण्यांत आले. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन हे स्पष्ट होते की, दि.30.07.2010 ते 02.08.2010 पर्यंत सर्वोपरी उपचार करण्यांत आले व गंभीर अवस्था अचानक उद्भवल्यामुळे प्राण वाचविण्याची औषधे देण्यांत आली व पेशंटला मृत घोषीत केल्यानंतर पोलिसांकडे रिपोर्ट देण्यांत आला.
7. तक्रारकर्त्याने पेशंटला दि.30.07.2010 रोजी दाखल केल्यावर प्राथमिक उपचारानंतर साधारण किती खर्च येईल याचा लेखी अंदाज देण्याचे विनंती केली. त्यानुसार विरुध्द पक्षाने रु.40,000/- खर्च येईल असे कळविले. कारण तक्रारकर्त्यास त्याचे कार्यालयातून काही अग्रिम रक्कम घ्यावयाची होती. व इतर तक्रारकर्त्याचे आरोप हे अर्थहीन असल्यामुळे तक्रार खारिज करण्याची विनंती केली आहे. विरुध्द पक्षाने म्हटले की, पेशंटची तब्येत आकस्मीकरित्या गंभीर झाली यास ते जबाबदार नाही कारण दाखल केल्याचे दिवसापासुन मेंदूला इजा झाल्यामुळे तब्येत गंभीर स्वरुपाचीच होती. परंतु औषधोपचाराला पेशंटने प्रतिसाद दिल्यामुळे पेशंट धोक्याचे बाहेर होता व सुधारला होता असे म्हणता येत नाही. विरुध्द पक्षाने म्हटले आहे की, त्यांनी सर्वोतोपरी उपचार केलेले आहेत व त्यांचे वैद्यकीय सेवेत कुठलाही कसूर किंवा त्रुटी नाही, तसेच तक्रारकर्त्याने केलेले आरोप चुकीचे असल्यामुळे दंडासह तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केली. विरुध्द पक्षाने शपथपत्रसुध्दा मंचासमक्ष दाखल केले आहे.
8. मंचाने विरुध्द पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला तक्रारकर्ता व त्याचे वकील गैरहजर, मंचाने तक्रारीत दाखल असलेल्या सर्व कागदपत्रे व दस्तावेजांचे सुक्ष्म अवलोकन केले.
-// नि ष्क र्ष //-
9. विरुध्द पक्षाने आक्षेप घेतला आहे की, तक्रारीसोबत वैद्यकीय तज्ञाचा अहवाल सादर करणे सर्वोच्च न्यायालय व मा. राष्ट्रीय आयोगाने अनिवार्य केले आहे. ह्या विरुध्द पक्षाचे म्हणण्याशी मंच सहमत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने “V. Krishnarao –v/s- Nikhil Superspeciality Hospital”, 2010 CTJ- 868 (CP) या निकालपत्रात त्यांनी प्रत्येक वेळी आवश्यकता नाही, असे प्रमाणीत केलेले आहे व त्यामुळे विरुध्द पक्षांचा आक्षेप तथ्यहीन ठरतो.
10. विरुध्द पक्षाने आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याने त्याचे पत्नीचे उपचाराकरीता दि.30.07.2010 ते 02.08.2010 पर्यंत विरुध्द पक्षास काहीही मोबदला दिलेला नाही. उपटपक्षी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाने स्वतःचे हमीवर वसंत मेडिकल स्टोअर्स कडून रु.6,158/- ची औषधे उधारीवर घेतली, ती रक्कम व विरुध्द पक्षाचे बिलाची रक्कम रु.6,510/- तक्रारकर्त्याकडे थकीत असल्याचे म्हटले. तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, त्याने विरुध्द पक्षास रु.5,000/- दिले होते, त्यावर विरुध्द पक्षाने म्हटले की त्यांना फक्त रु.1,000/- पेशंटला भरती करते वेळी तक्रारकर्त्याने दिले. ती रक्कम तज्ञ डॉक्टरांची तपासणी फी व इतर चाचण्याकरीता खर्च झाली, या विरुध्द पक्षाचे म्हणण्यास तथ्य वाटते. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास रु.5,000/- दिले होत या म्हणण्याशी मंच सहमत नाही, कारण त्याबाबत कुठलाही पुरावा नाही व विरुध्द पक्षाचे म्हणणे तक्रारकर्त्याने शपथपत्रावर व प्रतिउत्तराव्दारे खोडून काढले नाही. विरुध्द पक्षाने म्हटले की, तक्रारकर्त्याला ग्राहक म्हणून मान्य करणे वस्तुस्थितीवरुन शक्य नसल्यामुळे तक्रार खारिज करण्याची मागणी केली. मा. सर्वोच्च न्यायालयाने IMA –v/s- V.P. Shanta, 1995 (3) CPJ, page 26, para 8, या निकालपत्रात स्पष्ट केले की, जर डॉक्टर काही रुग्णाकडून फी आकारीत असेल व काही रुग्णांकडून फी आकारीत नसेल तरी सुध्दा फी आकारणी करण्यांत न आलेला रुग्ण सुध्दा डॉक्टरांची सेवा प्राप्त केल्यामुळे ग्राहक या संज्ञेत मोडतो. विरुध्द पक्षाचे हे म्हणणे नाही की, त्यांच्या रुग्णालयात सर्वच रुग्णांचे मोफत उपचार करण्यांत येतात त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे.
11. दि.30.07.2010 रोजी तक्रारकर्त्याची पत्नी स्टारबसमधून उतरत असतांना पडल्याने तिचे डोक्याला इजा झाली म्हणून विरुध्द पक्षाचे दवाखान्यात भरती करण्यांत आले, याबाबत दोन्ही पक्षांत वाद नाही. तक्रारकर्त्याने म्हटले की, डोक्याला किरकोळ इजा झाली होती हे विरुध्द पक्षाने नाकारले व म्हटले की, पेशंटला गंभीर स्वरुपाची इजा झालेली होती. अनुक्रमे पृ. क्र.24 वरील ‘शुअरटेक हॉस्पीटल व रिर्सच सेंटर’, यांचे C T Brain च्या दि.30.07.2010 चे निदानावरुन हे स्पष्ट होते की, तिच्या डोक्याला इजा झाल्यामुळे (Small Scalp haematoma noted over the vertex etc) डोक्याचे कवटीला आतमधे रक्तस्त्राव झालेला होता व इतर निदान नमुद आहे. दि.30.07.2010 रोजी सायंकाळी 8.30 मिनीटांनी न्यूरो सर्जन, डॉ. पटनायक यांनी केलेल्या तपासणी नुसार उजव्या बाजूस Frontal Multipal Hemorrhagic Contusions इत्यादी निदान नमुद आहे. व त्यानुसार डॉ. पटनायक यांनी विरुध्द पक्षाने दिलेल्या उपचारात वाढ व सुधारणा केली व हे सुध्दा सुचविले की, जर न्युरोलॉजिकल इप्रुमेंट किंवा क्लिनीकल worsening आढळल्यास पुन्हा C T Brain करण्याचे सुचविले व त्यानुसार विरुध्द पक्षाने दि.30.07.2010 पासुन दि.02.08.2010 ला सकाळी 6.45 पर्यंत उपचार सतत सुरु ठेवले होते हे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. मध्यंतरीच्या अवधीत पेशंटची परिस्थिती सुधारली होती हे दोन्ही पक्षांनी मान्य केलेले आहे. सामान्यतः डोक्यास / मेंदूस इजा झाल्यास व आत रक्तस्त्राव झाल्यास अपघातापासुन 72 तास पर्यंत व त्यानंतर रुग्णाला डॉक्टरांचे निरीक्षणात ठेवावे लागते. त्यामुळे पेशंटची प्रकृति एकदम सुधारली होती हा तक्रारकर्त्याचा समज पूर्णतः गैरसमज होता, असे मंचाचे मत आहे. कारण मेंदूस इजा झालेल्या रुग्णास कोणत्याही वेळी त्याची प्रकृति गंभीर स्वरुपाची होऊ शकते व तीच परिस्थिती तक्रारकर्त्याचे पत्नी बाबत घडलेली आहे. तक्रारकर्त्याने पोलिस स्टेशनला दिलेल्या दि.13.08.2010 चे तक्रारीत तसेच मंचासमक्ष दाखल केलेल्या तक्रारीत हे मान्य केले की, दि.30.07.2010 ते 01.08.2010 पावेतो विरुध्द पक्षाने बरोबर औषधोपचार दिला होता. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या वैद्यकीय उपचाराचे दस्तावेजांवरुन हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्षाने औषधोपचाराकरीता डॉ. पटनायक यांचे सल्ल्यानुसार सुरु केलेला उपचार योग्य होता हे स्पष्ट होते.
12. तक्रारकर्त्याचा एकमेव आरोप आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दि.01.08.2010 रोजी संध्याकाळी नगदी `.40,000/- मागणी केली व ती न दिल्यामुळे विरुध्द पक्षाने औषधोपचार बंद केला व त्यातच तिचा दि.02.08.2010 रोजी सकाळी 6.45 ला मृत्यू झाला. तक्रारकर्त्याने अनुक्रमे पृ.क्र.19 वर दाखल केलेल्या दि.30.07.2010 च्या पत्रावर “Estimate of Medical Treatment”, बाबत इन्वव्हेस्टीगेशन औषधे, दवाखान्याचा खर्च इत्यादी करता `.40,000/- अंदाजे खर्च असे नमुद आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 01.08.2010 ला विरुध्द पक्षाचे `.40,000/- चे मागणी संदर्भात केलेले शपथपत्रावरील कथन पूर्णतः चूकीचे व खोटे आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच विरुध्द पक्षास `.40,000/- न दिल्यामुळे दि.01.08.2010 रोजी त्याचे पत्नीचा उपचार बंद केला, सलाईन वगैरे काढून घेतले हे सुध्दा तक्राराकर्त्याचे म्हणणे पुर्णतः चुकीचे व खोटे आहे, कारण तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन दि.01.08.2010 च्या संध्याकाळनंतर सुध्दा तक्रारकर्त्याचे पत्नीचे मृत्यूच्या वेळेपर्यंत विरुध्द पक्षाने सर्व आवश्यक औषधोपचार केलेले होते, हे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन पूर्णतः स्पष्ट होते.
13. विरुध्द पक्षाने आपले लेखी उत्तर दाखल केल्यानंतर तक्रारकर्त्यास दि.07.03.2011, 30.03.2011, 28.04.2011, 22.06.2011 ला शपथपत्र (प्रतिउत्तर) दाखल करण्याची तक्रारकर्त्याचे लेखी विनंती नुसार मंचाने पूरेपूर संधी दिली, तरी सुध्दा तक्रारकर्त्याने आपले शपथपत्र मंचासमक्ष दाखल केले नाही. तसेच तक्रारकर्ता व त्याचे वकील युक्तिवादाचे दरम्यान गैरहजर होते व तक्रारकर्त्याने आजाराशी संबंधीत कोणत्याही वैदयकीय तज्ञांचा अहवाल/ शपथपत्र मंचासमक्ष दाखल न केल्यामुळे विरुध्द पक्षाचे म्हणणे तक्रारकर्त्यास प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरित्या मान्य आहे असे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचे ग्राहक सेवेतील निष्काळजीपणा व त्रुटी सिध्द करण्यांस पूर्णतः अपयशी ठरले असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे.
14. वरील विवेचनावरुन हे स्पष्ट झाले की, तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार पूर्णतः गैरसमजापोटी दाखल केलेली तक्रार आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब तक्रार खारिज करणे योग्य होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करीता खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येतो.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते.
2. दोन्ही पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.