::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/07/2017 )
माननिय अध्यक्षा सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाविरुध्द त्यांच्या वैद्यकीय सेवे संदर्भात, नुकसान भरपाई मिळण्याकरिता दाखल केली आहे.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, दिनांक 31/07/2015 रोजी उजव्या हाताचे मनगटामध्ये दुखत असल्याने उपचारासाठी विरुध्द पक्ष यांच्या दवाखान्यात गेला. विरुध्द पक्षाने तपासणी करुन व एक्सरे काढून, तुमचे उजव्या हाताचे मनगटामध्ये फॅक्चर असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरीस बांधावे लागेल, असे सांगीतले. तक्रारकर्त्याने होकार दिला व विरुध्द पक्षाने प्लॅस्टर बांधून दिले व 15 दिवस कायम ठेवावे, असा सल्ला दिला. परंतु दुस-याच दिवशी प्लॅस्टरच्या आतील भागात भयंकर अलर्जिक रियॅक्शन आली व त्यातून पू बाहेर येवून, दूर्गंध येऊ लागला व भयंकर यातना होवू लागल्या. त्यामुळे तक्रारकर्ता लगेच विरुध्द पक्षाच्या दवाखान्यात गेला व विरुध्द पक्षाने पाहणी करुन बांधलेले प्लॅस्टर कैचीने कापून काढले व अकोला येथील डॉ. संजय सोनोने यांच्याकडे पाठवले, परंतु ते डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तक्रारकर्ता डॉ. अजयसिंग चौहान यांच्याकडे गेला. डॉ. अजयसिंग चौहान यांनी सदरची परिस्थिती ही प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे दाबून, खच्चून व भरुन बांधल्याने ( Compression of Plaster) निर्माण झाली आहे व त्यामुळे रक्तवाहिनी दबल्या ( Inflammation of Vein ) गेली आहे. त्यामुळे डॉ. चौहान यांनी अकोला येथील विठ्ठल हॉस्पीटल मध्ये भरती होण्यास सांगीतले. सदर हॉस्पीटल मध्ये दि. 03/08/2015 ते 05/08/2015 पर्यंत तक्रारकर्ता भरती होता. परंतु त्या ठिकाणी सुध्दा आजाराची गंभिरता वाढल्याने दिनांक 06/08/2015 ते 11/08/2015 या कालावधीत ओझोन हॉस्पीटलमध्ये अति दक्षता विभागात (ICU) मध्ये भरती होता. त्या ठिकाणी डॉक्टरांनी उजव्या मनगटास ( Necrotizing Fasciatis c Abscess C Sepsis ) झाल्याचे निदान केले. यावरुन असे लक्षात येते की, उजव्या मनगटामध्ये कधिही फॅक्चर नव्हते, याची जाणीव विरुध्द पक्षाला असतांना सुध्दा करकचुन प्लॅस्टर ऑफ पॅरीस बांधले व त्यामुळे हातामधून पू येणे, दूर्गंधयुक्त वास येणे यामध्ये होवून तो (Necrotizing Fasciatis c Abscess C Sepsis ) हया आजारामध्ये परीवर्तीत झाला. विरुध्द पक्ष यांच्या सदोष उपचारामुळे व निदानामुळे झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी सदर प्रकरण तक्रारकर्त्याने मंचात दाखल केले आहे.
2) विरुध्द पक्षाने निशाणी-8 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब दाखल केला. त्यानुसार तक्रारकर्ता हा दिनांक 31/07/2015 रोजी त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर मुलीने काठीने मारल्यामुळे दुखत आहे व सुज आहे, अशा तक्रारीसह आला. तक्रारकर्त्याच्या हाताचे निरीक्षण करुन एक्सरे काढला असता, कोणतेही फॅक्चर नव्हते, ( X NBA- Nobony abnormality ) नव्हती. त्यामुळे दुखणे व सुज कमी करण्यासाठी मनगटाला सपोर्ट म्हणून कच्चे प्लॅस्टर (Pop slab ) लावले व सोबत काही औषधे (Analgesic) दिली. त्यानंतर दिनांक 02/08/2015 रोजी तक्रारकर्ता दवाखान्यात आला व उजव्या हाताला काहीतरी चावल्याचे व उजव्या हाताच्या बोटावर पाण्याचे फोडे ( Blister ) आल्याचे सांगितले. त्यांनी सांगीतलेल्या केस हिस्ट्री बाबत प्रिस्क्रिप्शनच्या मागील बाजूला नोंद केली आहे व त्यांनी सांगीतल्यामुळे त्याच्या मनगटाचे कच्चे प्लॅस्टर कैचीने कापून काढले. त्यावेळी मनगटावर कोणत्याही प्रकारची जखम अथवा वळ नव्हते. म्हणजे तो ज्या दुखण्यासाठी आला होता, ते दुखणे पूर्णपणे थांबले होते. तक्रारकर्त्याने तक्रार केल्याप्रमाणे त्याच्या हाताच्या बोटावर काहीतरी चावल्यामुळे, पाण्याचे फोडे आल्यामुळे डॉक्टर या नात्याने प्रथमोपचार म्हणून Magnesium Sulphate चे Dressing केले व आधार म्हणून Crepebandage दिले, सोबत प्रतिजैविक (Anitibiotic) औषधी दिली. विरुध्द पक्ष अस्थिरोग तज्ञ असल्यामुळे सदर फोडाच्या उपचारासाठी दुस-या योग्य त्या हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. वरील सर्व बाबीचा विचार करता, तक्रारकर्त्याने आर्थिक लाभ मिळविण्यासाठी व विरुध्द पक्षाचे इभ्रतिस नुकसान पोहचविण्यासाठी, कोणताही कायदेशिर आधार नसतांना सदर तक्रार मंचात दाखल केली आहे. सदरील तक्रार नुकसान भरपाईसह खारिज करण्यांत यावी.
3) कारणे व निष्कर्ष :-
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर, विरुध्द पक्षाचा पुरावा तसेच उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमूद केला.
तक्रारकर्ते दिनांक 31/07/2015 रोजी विरुध्द पक्षाच्या दवाखान्यात आले होते व तेंव्हा त्याचेवर विरुध्द पक्षातर्फे उपचार करण्यात आले, ही बाब उभय पक्षाला मान्य आहे, त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त दिनांक 31/07/2015 रोजीचे विरुध्द पक्षाचे प्रिस्क्रीप्शन यावर नमूद असलेल्या मजकूरावरुन असा बोध होतो की, C/o Pain Rt, Wrist, h/o assault T’day – तक्रारकर्ते यांच्या उजव्या हाताच्या मनगटात दुखत होते व त्यावर assault झाला होता. याबाबत तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, ते त्या दिवशी त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटात दुखत असल्यामुळे विरुध्द पक्षाच्या दवाखान्यात गेले होते परंतु याबाबत तक्रारकर्त्याने सविस्तर जे की, विरुध्द पक्षाच्या प्रिस्क्रीप्शनवर नमूद आहे, ते हल्ल्याबाबत तक्रारीत खुलासेवार मांडलेले नाही. सदर दिनांक 31/07/2015 च्या विरुध्द पक्षाच्या हया प्रिस्क्रीप्शनवर असेही नमूद आहे की, विरुध्द पक्षाने दिनांक 31/07/2015 रोजी तक्रारकर्त्याच्या मनगटाला (Pop slab ) कच्चे प्लॅस्टर 5 दिवसांकरिता लावून दिले होते व सोबत काही औषधे लिहून दिली होती. तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, सदर प्लॅस्टर ऑफ पॅरिस बांधल्याचे दुस-याच दिवशी तक्रारकर्त्याच्या उजव्या मनगटास प्लॅस्टरचे आतील भागात भयंकर अलर्जिक रियाक्शन आली, तसेच त्यातून पु बाहेर येवून त्यापासून दूर्गंध येवू लागला व दुःखयुक्त यातना होवू लागल्या. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षाच्या दवाखान्यात गेला होता. त्यावेळेस विरुध्द पक्षाने पाहणी करुन, बांधलेले सदरचे प्लॅस्टर ऑफ पॅरिस कैचीने कापून घेतले व तक्रारकर्त्यास अकोला येथील डॉ. संजय सोनोने कडे पाठविले, परंतु ते उपलब्ध नसल्यामुळे, तक्रारकर्ते डॉ. अजयसिंग चौहान यांच्या हॉस्पीटल मध्ये गेले, त्यांनी तक्रारकर्त्यास तात्काळ अकोला येथील विठ्ठल हॉस्पीटल मध्ये भरती होण्यास सांगितले व असे सांगितले की, सदरची परिस्थिती ही विरुध्द पक्षाने प्लॅस्टर ऑफ पॅरीस दाबून, खच्चून व भरुन बांधल्याने ( Compression of Plaster) निर्माण झालेली आहे व त्यामुळे रक्तवाहिण्या दबल्या ( Inflammation of Vein ) गेल्या आहे. म्हणून विरुध्द पक्षाने निष्काळजीपणे व सदोष पध्दतीने तक्रारकर्त्याचे उजव्या मनगटाचे प्लॅस्टर ऑफ पॅरीस बांधले. डॉ. चौहान यांचे सांगण्याप्रमाणे तक्रारकर्ते हे दिनांक 03/08/2015 ते 05/08/2015 पर्यंत विठ्ठल हॉस्पीटल मध्ये भरती होते. परंतु त्यानंतरही आजाराची गंभिरता वाढल्यामुळे तक्रारकर्त्यास ओझोन हॉस्पीटल, अकोला येथे ICU मध्ये दिनांक 06/08/2015 ते 11/08/2015 पर्यंत भरती करावे लागले, तेथील तज्ञांनी उजव्या मनगटास ( Necrotizing Fasciatis c Abscess C Sepsis ) झाल्याचे निदान केले. या दरम्यान तक्रारकर्त्यास उच्च व महागडया डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागले, वेगवेगळया तपासण्या कराव्या लागल्या व आर्थिक, मानसिक, शारिरीक त्रास झाला.
यावर विरुध्द पक्षाने त्यांच्या दाखल दिनांक 31/07/2015 व 2/08/2015 रोजीच्या प्रिस्क्रीप्शनप्रमाणे युक्तिवाद केला व Pop slab करणे कसे उपयुक्त आहे, याबद्दलचा वैद्यकीय पुस्तकातील खुलासा दाखल केला.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या सर्व दस्तांवरुन असे दिसते की, तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडे दिनांक 31/07/2015 नंतर दिनांक 2/08/2015 रोजी गेले होते व दिनांक 2/08/2015 च्या प्रिस्क्रीप्शन वरील नमूद बाबी अशा आहेत की, h/o bite, C/o blister over hand. P. not co-operate refer to higher center तसेच तेंव्हा विरुध्द पक्षाने Dressing व Crepebandage केल्याचे तसेच काही औषधे लिहून दिल्याचे त्यावर नमूद आहे. तक्रारकर्ते यांचे कथन जरी असे आहे की, ते डॉ. अजयसिंग चौहान, अकोला यांचे हॉस्पीटल मध्ये गेले तरी, दाखल दस्त असे दर्शवितात की, तक्रारकर्ते हे विरुध्द पक्षाकडून नंतर दिनांक 03/08/2015 ते 05/08/2015 पर्यंत डॉ. समीर पी. देशमुख, विठ्ठल हॉस्पीटल, अकोला इथे भरती होते व सदर डिस्चार्ज कार्डवर निदान हे ‘ Cellulitis ’ असे नमूद असून बाकी कॉलम रिक्त आहेत व त्यांनी तक्रारकर्त्यास डॉ. अजयसिंग चौहान, प्रताप हॉस्पीटल, अकोला यांचेकडे refer केले होते, असे त्यावर नमूद दिसते. दिनांक 05/08/2015 चे डॉ. चौहान यांचे प्रिस्क्रीप्शनवर फक्त औषधांच्या नावाची यादी लिहलेली आहे. दाखल दस्तावरुन असे दिसते की, तक्रारकर्ते त्यानंतर दिनांक 06/08/2015 ते 11/08/2015 पर्यंत ओझोन हॉस्पीटल, अकोला इथे भरती होते, सदर डिस्चार्ज कार्डवर रोगाचे निदान Rt. Hand Necrotizing Fasciatis c Abscess C Sepsis c Alcohol withdrawal असे नमूद आहे. सदर डिस्चार्ज कार्डवर असेही नमूद आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक 13/08/2015 रोजी पुनःतपासणी व ड्रेसींगसाठी डॉ. अजयसिंग चौहान यांचेकडे जावे. दिनांक 13/08/2015 च्या डॉ. अजयसिंग चौहान यांच्या प्रिस्क्रीप्शनवर ड्रेसींग, औषधे व पुढील भेटीची तारीख या बाबी नमूद आहेत. थोडक्यात डॉ. अजयसिंग चौहान यांनी कुठेही तक्रारकर्त्याची History व मत नोंदविलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची ही परिस्थिती विरुध्द पक्षाने Pop slab / कच्चे प्लॅस्टर हे दाबून, खच्चून व भरुन बांधल्याने उद्भवली हे सिध्द होत नाही. याऊलट विरुध्द पक्षाचे दिनांक 31/07/2015 व त्यावरील मागील बाजूस दिनांक 2/08/2015 रोजीचे प्रिस्क्रीप्शन यावरुन असा निष्कर्ष निघतो की, तक्रारकर्ते विरुध्द पक्षाकडे त्याच्या मनगटावर हल्ला झाल्यामुळे ते, दुखणे व सुज ही तक्रार घेवून प्रथम दिनांक 31/07/2015 रोजी आले होते व त्यात फ्रॅक्चर नव्हते, कारण असते तर तक्रारकर्त्याने स्वतः X-ray Film मंचात दाखल करुन त्यावर मत मांडले असते. मनगटाची सुज कमी करण्यासाठी विरुध्द पक्षाने कच्चे प्लॅस्टर ( Pop slab ) लावले व Pop slab चे फायदे कसे आहेत हे दाखल वैद्यकीय पुस्तकातील खुलाशावरुन मंचाला कळाले किंवा Pop slab कसे असते याचीही कल्पना मंचाला हया खुलाशावरुन आलेली आहे. त्यानंतर तक्रारकर्ते दिनांक 2/08/2015 रोजी विरुध्द पक्षाच्या दवाखान्यात आल्याचे सदर प्रिस्क्रीप्शनवरुन कळते, सदर प्रिस्क्रीप्शन वरील नोंदीवरुन, त्या दिवशी तक्रारकर्ते यांना काहीतरी चावल्याचे व उजव्या हाताच्या बोटावर पाण्याचे फोड ( Blister ) आले होते, असे दिसते.
विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, त्यादिवशी त्याच्या मनगटाचे कच्चे प्लॅस्टर कैचीने कापून काढले, त्यावेळी मनगटावर कोणतीही जखम नव्हती व मनगटावरील सुज नष्ट झालेली होती व त्याच्या मनगटाचे दुखणे थांबले होते. विरुध्द पक्ष अस्थिरोग तज्ञ असल्याने तिथेच त्यांचा उपचार संपला. परंतु दिनांक 2/08/2015 च्या प्रिस्क्रीप्शनवर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या फोडावर Dressing व Crepebandage हे उपचार व औषधी लिहून दिल्याचे दिसून येते. तसेच तक्रारकर्ता योग्य साथ देत नसल्यामुळे त्याला वरिष्ठ सेंटर कडे जाण्याचा सल्ला विरुध्द पक्षाने दिला होता, असे दिसते.
तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर फोटोग्राफ्स दाखल केले, परंतु त्यावरुन व दाखल दस्तांवरुन, वर नमूद विष्लेशनानुसार तक्रारकर्त्याची केस ते म्हणतात तशी विरुध्द पक्षाविरुध्द सिध्द होत नाही, कारण तक्रारकर्त्याच्या मनगटावर हल्ला झाला होता, तो किती दिवस आधीचा होता, त्यामुळे हाताची ही परिस्थिती झाली का ? किंवा दिनांक 2/08/2015 रोजी, हाताला काहीतरी चावल्याचे, नमूद आहे व पाण्याचे फोडे आल्याचे नमूद आहे. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी अशा परिस्थितीत भक्कम पुरावा, तज्ञाचे मत वगैरे दस्त जोडून विरुध्द पक्षाविरुध्द केस सिध्द करावी लागत होती. मात्र सर्व दाखल दस्तांवरुन, तक्रारकर्ते यांची विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार ( beyond dought ) सिध्द होत नाही, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रार खारिज करणे क्रमप्राप्त ठरते.
सबब, अंतिम आदेश, खालीलप्रमाणे पारीत केला.
:::अं ति म आ दे श:::
1) तक्रारकर्ता यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2) न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यांत येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri