श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 05 जानेवारी, 2017)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे.
- विरुध्द पक्ष डॉ. मिनल संजय भुरे ह्या व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचे तुमसर येथे प्रसुतीगृह व बाल रुग्णालय आहे. तक्रारकर्ती सौ. प्रतिमा व प्रदीप टेंभरेचे घर वि.प.च्या रुग्णालयास लागून आहे. तक्रारकर्ती क्र. 1 गरोदर असल्याने दि.01.06.2010 पासून वि.प.च्या रुग्णालयात तपासणी व उपचारांसाठी जात होती. तक्रारकर्ती क्र. 1 हिला सातवा महिना चालू असतांना अती रक्तस्त्राव झाल्यामुळे दि.19.09.2013 रोजी उपचारांसाठी वि.प.च्या रुग्ण्यालयात भरती केले. तक्रारकर्ती नॉर्मल डिलिव्हरीसाठी वेळ मागणी करीत असतांना वि.प.ने तक्रारकर्तीची संमती नसतांना सिजरीन करुन बाळ काढले. अपु-या दिवसांचे बाळ असल्याने वजनाने कमी होते. त्यामुळे तक्रारकर्ता क्र. 1 व 2 हे फारच घाबरले होते व बाळाचा जिव वाचविण्यासाठी अॅम्बुलन्सने नागपूर येथील रुग्णालयात नेऊन भरती केले.
तक्रारकर्ती क्र. 1 वि.प.च्या रुग्णालयात भरती होती व तिची देखभाल करण्यासाठी तिची आई सोबत होती. तक्रारकर्ती क्र. 1 वि.प.च्या रुग्णालयात 2 दिवस भरती असतांना वि.प.ने तक्रारकर्तीला कोणताही औषधोपचार केला नाही व तिची काळजी घेतली नाही. त्यामुळे तक्रारकर्ती क्र. 1 ची प्रकृती आणखी खालावली. तक्रारकर्तीच्या आईने विनवण्या केल्यावर वि.प.ने चुकीचे औषध दिले व तक्रारकर्तीचा त्रास वाढल्याने दि.21.09.2013 रोजी डॉ. संतोष कोचर यांचेकडे पाठविले. डॉ. कोचर यांनी तक्रारकर्तीची गंभीर अवस्था पाहून त्याचदिवशी डॉ. राजन बोरकर यांनी केलेल्या उपचारामुळे तिची प्रकृती सुधारली.
वि.प.कडे तक्रारकर्ती क्र. 1 भरती असतांना त्यांनी योग्य उपचार न केल्याने तक्रारकर्तीची प्रकृती फारच बिघडली व तिला डॉ. कोचर आणि डॉ. बोरकर यांचेकडे पुढील तातडीच्या उपचारांसाठी न्यावे लागले. वि.प.ने तक्रारकर्तीस मानसिक त्रास आणि धमकी दिल्यामुळे तिचा रक्तदाब वाढला व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यासाठी तक्रारकर्तीला उपचारासाठी रु.3,00,000/- खर्च करावा लागला. सदरची बाब वैद्यकीय निष्काळजीपणा आणि सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्तीने खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- वि.प.च्या निष्काळजी व सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्तीचे झालेले नुकसान रु.3,00,000/-
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.1,00,000/-
- तक्रार खर्च रु.10,000/-
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत डॉ.मिनल भुरे यांनी केलेल्या औषधोपचाराची प्रत, डॉ. राजन बोरकर यांनी केलेल्या औषधोपचाराची प्रत व डॉ. कोचन यांनी केलेल्या औषधोपचाराची प्रत इ. दस्तऐवज दाखल केले आहेत.
2. विरुध्द पक्षाने लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, 2011 मध्ये तक्रारकर्ती क्र. 1 ने कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचे Recanalization बाबतची शस्त्रक्रिया वि.प.च्या रुग्णालयात करुन घेतली होती. सदर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे 2013 साली तक्रारकर्ती गर्भवती राहिली तेव्हा गर्भारपणातील चाचण्या, तपासण्या व औषधोपचारासाठी वि.प.च्या रुग्णालयात आली आणि त्यासाठी डॉ. सौ. नम्रता पाटील यांच्याकडून आवश्यक चाचण्या करुन गर्भारपणाची निश्चित माहिती मिळविण्यांत आली.
दि.19.09.2013 रोजी गर्भारपणाच्या सातव्या महिन्यांत तक्रारकर्ती क्र. 1 ला अतिरक्तस्त्राव होऊ लागल्याने ती उपचारांसाठी वि.प.च्या रुग्णालयात भरती झाली. तिची तपासणी केली असता बाळ धोकादायक परिस्थितीत असल्याचे दिसून आल्याने व अधिक वेळ ते पोटात राहिल्यास दगावण्याची शक्यता असल्याने तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांना तयाबाबत संपूर्ण जाणिव करुन दिल्यावर त्यांनी धोका पत्करण्यापेक्षा सिझरीन करुन पोटातून बाळ सुखरुपपणे बाहेर काढण्यांत आले. बाळ अपूर्ण दिवसांचे असल्याने त्याची योग्य काळजी घेण्यासाठी नागपूरला पाठवावे लागेल याची पूर्ण कल्पना तक्रारकर्त्यांना सिझेरीन पूर्वीच दिली होती व त्याप्रमाणे त्यांनी बाळ पुढील काळजी घेण्यासाठी नागपूर येथे नेले.
तक्रारकर्ती क्र. 1 त्यानंतर वि.प.च्या रुग्णालयात राहिली हे खरे आहे परंतू वि.प.ने तिला कोणतेही औषधोपचार केले नाही, मानसिक त्रास दिला आणि धमकी दिल्यामुळे तिचा रक्तदाब वाढला आणि प्रकृती खालावली हे नाकबूल केले आहे. तसेच तक्रारकर्तीच्या आईने विनवण्या केल्यानंतर देखिल चुकीचे औषधोपचार केले आणि परिणाम स्वरुप तक्रारकर्तीची प्रकृती बिघडल्याचे नाकबूल केले आहे.
दि.21.09.2013 रोजी फिर्यादी क्र. 1 ने वि.प.ला सांगितले की, तिला घाबरल्यासारखे होत आहे. वि.प.ने तपासणी केली असता रक्तदाब कमी झाल्याचे लक्षात आले. रक्तदाब वाढविण्यासाठी औषध देऊनही 10-00 वाजेपर्यंत रक्तदाब वाढला नाही म्हणून डॉ. कोचर (एम.डी.) यांच्याकडे पुढील औषधोपचारांसाठी सुचित करण्यांत आले. तक्रारकर्ती क्र. 1 वर वि.प.ने सर्व कौशल्य पणाला लावून काळजीपूर्वक योग्य उपचार केले असून वैद्यकीय सेवेत कोणतीही चूक किंवा त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारकर्ते वि.प.च्या रुग्णालयाशेजारी राहणारे असल्याने आणि पूर्वीपासूनचे औषधोपचार घेणारे रुग्ण असल्याने दि.19.09.2013 रोजी पैशाची मागणी न करता व पैशासाठी अडवणूक न करता तातडीने सिझेरीन करुन बाळ सुखरुपरीत्या बाहेर काढले आणि बाळ बाळंतिणीच्या जिवाला असलेला धोका दूर केला आणि आवश्यकतेप्रमाणे पुढील उपचारासाठी डॉ.कोचर यांचेकडे पाठविले. त्यावेळी उपचार खर्चाची बाकी असलेली रक्कम रु.20,000/- नंतर देऊ असे तक्रारकर्ती क्र. 1 च्या आईने लिहून दिले. डॉ. कोचर यांनी तक्रारकर्तीस डॉ. बोरकर नागपूर यांचेकडे विशेष उपचारासाठी पाठविले व तेथे उपचार घेऊन तक्रारकर्तीला दि.28.09.2013 रोजी सुट्टी देण्यांत आली. त्यानंतरही तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी वि.प.ची सिझरीन व उपचार खर्चाची रक्कम न देता वि.प.ला देणे असलेली रक्कम बुडविण्याच्या दुष्ट हेतूने दि.18.12.2013 रोजी 3 महिन्यानंतर खोटे आरोप लावून नोटीस पाठविली आणि उपचार घेतल्यानंतर 1 वर्ष 10 महिन्यांनी ही खोटी तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादिने वि.प.ने मानसिक त्रास दिला आणि धमकी दिली म्हणून तिचा रक्तदाब वाढल्याचे खोटे नमूद केले आहे. प्रत्यक्षात डिलीव्हरीनंतर तिचा रक्तदाब कमी-कमी होत होता व त्यासाठीच डॉ. कोचर आणि डॉ. राजन बोरकर यांनी ही उपचार केले आहेत. डॉ. राजन बोरकर यांच्या निदानाप्रमाणे तक्रारकर्तीला हृदयरोग होता व त्यामुळेच प्रसुतीनंतर तिची प्रकृती बिघडली असून सिझेरीनमधील कोणतीही चुक किंवा चुकीचे औषधोपचार हे कारण नव्हते आणि अशी कोणतीही चूक वि.प.कडून झाली नव्हती. वि.प.ने केलेले औषधोपचार योग्य असल्याबाबत वरिष्ठ प्रसुतीतज्ञ व स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्री.धारगावे आणि डॉ. सौ. वंदना कुकडे यांनी प्रमाणपत्र दिले आहे. तसेच ज्यांच्याकडे तक्रारकर्ती क्र. 1 ने उपचार घेतलेल्या डॉ. राजन बोरकर यांनी दि.28.11.2015 रोजीच्या प्रमाणपत्राप्रमाणे तक्रारकर्तीच्या हृदयरोगाशी सिझेरीन किंवा अॅनेस्थेशियाचा कोणताही संबंध नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
सबब वि.प.ला बदनाम हेतूपूरस्सर दाखल केलेली खोटी तक्रार रु.40,000/- खर्च बसवून खारीज करावी. तसेच वि.प.ची घेणे असलेली फी रु.20,000/- देण्याचा तक्रारकर्तीस आदेश व्हावा अशी वि.प.ने विनंती केली आहे.
वि.प.ने आपल्या लेखी जवाबासोबत डॉ. सौ. कुकडे आणि डॉ. श्री. धारगावे यांचे प्रमाणपत्र, डॉ. राजन बारोकर यांचे प्रमाणपत्र, औषधोपचाराचा तपशिल, शस्त्रक्रियेस दिलेली संमतीख् जागतिक आरोग्य संघटनेचा मजकुर आणि शांताबाई गौतमने फी देण्याचे दिलेले कबुलीपत्र इ. दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
3. उभय पक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय नाही.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय नाही.
3) अंतिम आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
- का र ण मि मां सा -
5. सदर प्रकरणात वि.प.ने दि.18.12.2015 रोजी लेखी जवाब दाखल केला. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी प्रतिउत्तर तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला नाही आणि 7 जुलै 2016 पासून सतत गैरहजर राहिले. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार व त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज यांच्या आधारे सदर तक्रार निकाली काढण्यांत आली.
6. मुद्दा क्र. 1 बाबत – तक्रारकर्ती क्र. 1 सौ. प्रतिमा टेंभरे 7 महिन्याची गरोदर असतांना अति रक्तस्त्राव होऊ लागल्याने उपचारांसाठी वि.प. डॉ. मिनल भूरे यांच्या रुग्णालयात दि.19.09.2013 रोजी भरती झाली व वि.प.ने तिची तपासणी आणि औषधोपचार केले हे उभय पक्षांना मान्य आहे. तक्रारकर्तीचे म्हणणे असे कि, बाळाला धोका आहे असे सांगून वि.प.ने सिझरीनचा सल्ला दिला, तेव्हा नैसर्गिक डिलिव्हरीसाठी वेळ द्यावा म्हणून तक्रारकर्त्यांना विनंती केली परंतू वि.प.ने त्याकडे लक्ष न देता तक्रारकर्त्यांच्या संमतीशिवाय दि.20.09.2013 रोजी तक्रारकर्तीचे सिझरीन करुन बाळ बाहेर काढले.
याऊलट, वि.प.च्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद असा की, तक्रारकर्तीने 2011 साली कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे Recanalization करुन घेतल्यानंतर 2013 साली ती गरोदर राहिली व गर्भारपणातील तपासणी, चाचण्या व औषधोपचारासाठी ती वि.प.च्या रुग्णालयात येत होती. तक्रारकर्ती दि.19.09.2013 रोजी 7 महिन्यांची गरोदर असतांना अति रक्तस्त्रावाचा त्रास झाल्याने वि.प.च्या रुग्णालयात भरती झाली. तिची तपासणी केल्यावर अति रक्तस्त्रावामुळे पोटातील बाळाचे जिवितास धोका असल्याचे दिसून आल्याने बाळ व बाळंतीणीच्या हितासाठी सिझरीन करणे आवश्यक असल्याचे, तसेच बाळ अपु-या दिवसाचे जन्मास येणार असल्याने पुढील काळजी घेण्यासाठी त्यास नागपूर येथे न्यावे लागेल असे तक्रारकर्त्यांना सांगितल्यावर त्यांनी त्यासाठी संमती दिली आणि स्वेच्छेने संमतीपत्र लिहून दिले आणि त्यावर उभय तक्रारकर्त्यांनी सह्या केल्या आहेत. सदर संमतीपत्राची प्रत वि.प.ने नि.क्र. 8 यादीसोबत दस्तऐवज क्र. 7 वर दाखल केली आहे. त्यामुळे वि.प.ने तक्रारकर्त्यांच्या संमतीशिवाय सिझरीन केल्याचा आरोप निराधार खोटा आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या विरुध्द असल्याने अस्विकारार्ह्य आहे.
वि.प.ने आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून तक्रारकर्तीचे सिझरीन करुन बाळ पोटातून सुरक्षितरीत्या बाहेर काढले व तक्रारकर्ता क्र. 2 ने त्यास पुढील काळजीसाठी नागपूर येथे घेऊन गेल्यावर तक्रारकर्ती क्र. 1 वि.प.च्या रुग्णालयात भरती असतांना तिची सर्व तपासणी व औषधोपचार वि.प.ने केले आहेत. दि.21.09.2013 रोजी तक्रारकर्तीने घाबरल्यासारखे होत असल्याचे सांगितल्याने तपासणी केली असता रक्तदाब कमी झाल्याने आढळून आल्याने रक्तदाब वाढविण्यासाठी औषधोपचार केला परंतू रक्तदाब वाढला नाही म्हणून डॉ. कोचर (एम.डी.) यांच्याकडे विशेष तपासणी व उपचारांसाठी रेफर केले. तक्रारकर्तीवर केलेले औषधोपचार, चाचण्या, सिझेरीन व तिच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत नोंदी वि.प.ने रुग्णालयातील मेडीकल केस रेकॉर्डमध्ये केल्या असून त्याची प्रत दस्तऐवज क्र. 3 वर दाखल केली आहे. त्यांत तक्रारकर्तीला Hypotension (abnormally low blood pressure) चा त्रास झाला आणि तिचा रक्तदाब 90/60, 84/60, 90/60 इतका कमी झाल्याचे व उपचार करुनही तो वाढत नसल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना देऊन रुग्णास डॉ. कोचर (एम.डी.) यांच्याकडे 21.09.2013 रोजी 10.00 वा. पुढील उपचारासाठी रेफर केल्याचे नमुद आहे.
तक्रारकर्ती डॉ. कोचर यांचेकडे गेल्यावर त्यांनी केलेल्या तपासणीत देखिल तक्रारकर्तीचा रक्तदाब 90/60 आढळून आला आणि तक्रारकर्तीस Hypotension चा त्रास असल्याचे आढळून आल्याने त्यांनी तक्रारकर्तीच्या नातेवाईकांशी चर्चा करुन विशेष उपचारांसाठी नागपूरला रेफर केले. त्याबाबत डिस्चार्ज समरीची प्रत तक्रारकर्तीने दस्तऐवजांची यादी नि. 3 सोबत दाखल केली आहे.
तक्रारकर्तीस नागपूर येथे डॉ. राजन बोरकर यांच्या क्रीटीकल केअर हॉस्पिटलमध्ये दि. 21.09.2013 रोजी सायं. 5.00 वा. भरती करण्यांत आले. डॉ. राजन बोरकर यांनी केलेल्या तपासणीत आजाराचे निदान Post Partem Cardiomyopathy with shock with UTI (Treated) असे नमूद आहे. रुग्णाचा इतिहासामध्ये तक्रारकर्ती 7 महिन्यांची गर्भवती असतांना तिला अति रक्तस्त्राव झाल्याने दि.20.09.2013 रोजी सिझेरीन करण्यांत आले आणि दि.21.09.2013 रोजी Hypotension चा त्रास उद्भवल्याचे नमुद आहे. तसेच रुग्णाचा Systalic रक्तदाब 60 आणि पल्स रेट 120/min असल्याचे नमूद आहे. रुग्णावर उपचार केल्यावर तिची प्रकृती स्थिर आल्यावर दि.28.09.2013 रोजी रुग्णालयातील सुट्टी दिल्याचे नमूद आहे. तक्रारकर्तीने सदर डिसचार्ज समरी दाखल केली आहे.
यावरुन हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्तीस बाळंतपणानंतर Hypotension म्हणजे कमी रक्तदाबाचा त्रास झाला होता व त्यासाठीच वि.प. डॉ. कोचर आणि डॉ. राजन बोरकर यांनी उपचार केले होते. त्यामुळे 20 आणि 21.09.2013 रोजी तक्रारकर्ती वि.प.च्या रुग्णालयात भ्रती असतांना तिने उपचार केले नाही, चुकीचे औषधोपचार केले व मानसिक त्रास दिला आणि धमकावल्यामुळे तिचा रक्तदाब वाढला आणि तिची प्रकृती खालावल्याने डॉ. कोचर आणि डॉ. राजन बोरकर यांचेकडे उपचार घ्यावे लागले हे तक्रारकर्तीने केलेले सर्व आरोप काल्पनिक व खोटे असल्याने स्पष्ट होते.
तक्रारकर्तीला उद्भवलेला आजार वि.प.ने केलेल्या चुकीच्या औषधोपचार किंवा सिझेरीनमुळे उद्भवल्याचा कोणताही पुरावा नाही. याऊलट, तक्रारकर्तीच्या Post Partem Cardiomyopathy या आजारावर विशेष उपचार करुन तिला पूर्ण बरे करणारे डॉ. राजन बोरकर यांनी दि.22.11.2005 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात स्पष्टपणे नमुद केले आहे की, तक्रारकर्ती प्रतिमा टेंभरे हिला झालेल्या Post Partem Cardiomyopathy या आजारासाठी कारणीभूत असे कोणतेही निश्चित कारण सांगता येत नाही. सदरच्या आजाराशी रुग्णावर केलेले सिझेरीन, औषधोपचार किंवा अॅनेस्थिेशिया (obstetric Intervention) यांचा कोणताही संबंध नाही. सदर प्रमाणपत्र वि.प.ने दाखल केले आहे.
वि.प.ने Text Book of Osterrics ची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. त्यांत तक्रारकर्तीस उद्भवलेल्या Peripartum Cardiomyopathy हा आजार कधी व कां उद्भवतो याबाबत खालीलप्रमाणे नमूद आहे.
“D. Cardiomyopathies
Peripartum Cardiomyopathy : The manifestation usually appear at any time in the last month of preganancy and upto 5 months after delivery. There is no determinable cause of heart failure. The pathogenesis is unknown, may be related to-hypertension, immunological causes, nutritional defects or myocarditis. The patients are usually multiparous, young 20-35 years of age, usually in 2nd or 3rd postpartum months. They complaint of weakness, shortness of breath, cough, nocturnal dyspnea and palpitation. Examination reveals-tachycardia, arrhythmia, peripheral oedema and pulmonary rates. X-ray chest shows enlarged heart. Echocardiography shows delated chambers of the heart particularly, left ventricle.
The treatment is bed rest, digitalis, diuretics, hydralazine (after load reduction) and anticoagulant therapy. The patient presented during pregnancy should have elective delivery. If the cervix is favourable vaginal delivery is preferred, if not caesarean section. Epidural anaeshtesia is ideal. There is no contraindication of breast feeding. Mortality is high (20-50%)- due to pulmonary embolism and cerebra thrombosis. It may recur in subsequent pregnancies. “
वरीलप्रमाणे तक्रारकर्तीची प्रकृती तिला सामान्यतः 4000 ते 5000 मध्ये याप्रमाणात बाळंत होणा-या स्त्रियांना होणारा Peripartum Cardiomyopathy आजार तक्रारकर्तीस तिच्या बाळंतपणानंतर उद्भवला होता व त्यासाठी वि.प.ने बाळाचा जीव वाचविण्यासाठी केलेले सिझेरीन किंवा बाळंतपणाआधि किंवा बाळंतपणानंतर केलेले उपचार यांचा कोणताही संबंध नव्हता.
स्त्रिरोग व प्रसुतीतज्ञ म्हणून वि.प.ने सिझेरीनचा घेतलेला निर्णय व त्याबाबतची प्रक्रिया आणि तक्रारकर्तीवर केलेले औषधोपचार एका कुशल स्त्रिरोग व प्रसुतितज्ञ डॉक्टरांनी ज्याप्रकारे करणे अपेक्षित होते, त्याप्रमाणेच केले असून त्यांत कोणतीही चूक किंवा वैद्यकीय निष्काजीपणा वि.प.कडून झालेला नसल्याचे प्रमाणपत्र ज्येष्ठ व अनुभवी स्त्रिरोग व प्रसुती तज्ञ डॉ. मधुकर धारगावे आणि डॉ. वंदना कुकडे यांनी उपचाराचे व सिझेरीनचे कागदपत्र पाहून दिले आहे. सदर प्रमाणपत्र वि.प.ने दस्तऐवज क्र. 1 वर दाखल केले आहे.
दि.19.09.2013 ते 21.09.2013 पर्यंत वि.प.ने तक्रारकर्तीचे केलेले सिझेरीन व उपचार चुकीचे होते हे सिध्द करणारा कोणताही पुरावा तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला नाही. एवढेच नव्हे तर तक्रारकर्ती वि.प.च्या हॉस्पिटल शेजारी राहणारी व पूर्वीपासूनची त्यांच्याकडे उपचार घेणारी रुग्ण असल्याचे तक्रारकर्तीकडून सिझेरीन व अन्य उपचारासाठी कोणतीही अग्रीम राशी न घेता शेजारधर्म पाळून वि.प.ने उपचार केलेले असून तक्रारकर्ती व तिचे आईचे पैसे नंतर देण्याचे आश्वासन देऊन उपचार खर्चाची कोणतीही रक्कम न देता रुग्णालय 21.09.2013 पर्यंत सोडले आहे. तक्रारकर्तीची आई शांताबाई गौतम यांनी रुग्णालय सोडतांना डॉ. भुरे यांचे देणे असलेले रु.20,000/- दि.23.09.2013 रोजी देण्याचे लेखी आश्वासन दिले ते वि.प.ने दाखल केले आहे. वि.प.ने उपचार खर्चाचे रु.20,000/- मागू नये म्हणून पैसे बुडविण्याच्या हेतूने वि.प.कडून सिझेरीन किंवा उपचारात कोणतीही चूक किंवा सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार झाला नसतांना तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी संगनमताने खोटी तक्रार दाखल केली आहे.
सदर प्रकरणांत वि.प.ने 19.09.2013 ते 21.09.2013 या कालावधीत तक्रारकर्ती क्र. 1 चे केलेले सिझरीन किंवा उपचार चुकीचे होते व त्यामुळे वि.प.कडून वैद्यकीय निष्काळजीपण आणि रुग्णाच्या सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार झाल्याबाबत कोणताही पुरावा तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला नाही.
बाळंतपणानंतर तक्रारकर्तीस Peripartum Cardiomyopathy हा ह्दयाचा आजार उद्भवल्याने तिचा रक्तदाब कमी होऊन तिचा जीव घाबरा झाला व त्यावर उपचार करुनही रक्तदाब वाढला नाही म्हणून वि.प.ने कोणताही विलंब न करता विशेष उपचारासाठी तक्रारकर्ती क्र. 1 ला डॉ. राजन कोचर यांचेकडे पाठविले. त्यांनीदेखिल उपचार केले परंतू उपचारांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी डॉ. राजन बोरकर नागपूर यांचेकडे पाठविले. डॉ. राजन बोरकर यांनी Peripartum Cardiomyopathy या आजारासाठी तक्रारकर्ती क्र. 1 वर उपचार करुन तिची प्रकृती स्थिर झाल्यावर दि.28.09.2013 रोजी रुग्णालयातून सुट्टी दिली. तक्रारकर्तीवर विशेष उपचार करणा-या डॉ. राजन बोरकर यांनी दिलेल्या प्रमाणपत्रांत स्पष्टपणे नमुद आहे की, तक्रारकर्तीच्या Peripartum Cardiomyopathy या आजाराचा तिच्यावरील सिझेरीनच्या शस्त्रक्रियेशी किंवा तीला दिलेल्या अॅनेस्थेशियाशी दुरान्वये संबंध नाही. Text Book of Obsterics मध्येही स्पष्टपणे नमुद आहे की, बाळंत होणा-या 4000 ते 5000 स्त्रियांमध्ये 1 याप्रमाणांत सदर आजार उद्भवत असून त्याचे कोणतेही निश्चित कारण नाही. डॉ. मधुकर धारगावे आणि वंदन कुकडे या ज्येष्ठ व अनुभवी प्रसुती व स्त्रिरोग तज्ञांनीदेखिल वि.प.ने तक्रारकर्तीवर केलेल्या उपचारांच्या कागदपत्रांच्या अवलोकनानंतर वि.प.ने तक्रारकर्तीचे केलेले सिझरीन आणि उपचार व त्यासाठीची कार्यपध्दती योग्य असल्याचे प्रमाणपत्रांत नमुद केले आहे.
वरील सर्व उपलब्ध पुराव्यावरुन वि.प.ने तक्रारकर्ती क्र. 1 चे केलेले सिझरीन व औषधोपचार आणि त्यासाठीची कार्यपध्दती योग्य होती व त्याद्वारे वि.प.कडून तक्रारकर्तीच्या सेवेत कोणताही वैद्यकीय निष्काळजीपणा किंवा न्युनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याचे दिसून येते. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
तक्रारकर्तीने उपचार खर्चाचे रु.20,000/- दिले नाही ते देण्याचा तक्रारकर्तीस आदेश व्हावा अशी विनंती वि.प.ने केली असली तरी ग्राहक तक्रारीमध्ये वि.प.च्या हितात असा आदेश करता येत नाही. घेतलेल्या सेवेचे मुल्य तक्रारकर्तीने दिले नसल्यास ते वसुलीसाठी योग्य न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग वि.प.ला उपलब्ध आहे.
7. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.प.कडून वैद्यकीय निष्काळजीपणा किंवा सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने तक्रारकर्ता मागणी केलेली कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार खारीज करण्यांत येते.
2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सहन करावा.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
4. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.