निकाल
पारीत दिनांकः- 30/11/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांच्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूंचे ऑपरेशन करायचे म्हणून तक्रारदार जाबदेणार डॉक्टरांकडे गेले. दि. 28/7/2011 तक्रारदारांच्या उजव्या डॉळ्याचे ऑपरेशन झाले, त्यावेळी त्या डोळ्यामध्ये लेन्स टाकण्यात आल्या. त्यानंतर तक्रारदारास दृष्टी आली, परंतु नंतर वेळोवेळी चष्म्याच्या काचा बदलाव्या लागल्या व त्यासाठी त्यांना अंदाजे रक्कम रु. 3,000/- खर्च करावे लागले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांना रात्री उजव्या डोळ्याने अंधुक दिसते, त्यामुळे ते रात्री कुठेही बाहेर जाऊ शकत नाहीत. तसेच समोर येणार्या वाहनांच्या लाईटमुळे उजव्या डोळ्यासमोर सप्तरंग दिसतात. याबाबत जाबदेणार डॉक़्टरांकडे विचारणा केली असता, त्यांनी बरे होईल असे सांगितले. तक्रारदारांना आजही उजव्या डोळ्यासमोर काळे डॉट दिसतात. दुसर्या डॉक्टरांनी तक्रारदारांच्या डोळ्याचे ऑपरेशन चुकीचे झाले आहे असे सांगितले, कारण उजव्या डोळ्याचे प्रेशर सारखे वाढते त्यामुळे त्यामध्ये त्यांना सतत ड्रॉप टाकावे लागतात व ते आयुष्यभर टाकावे लागतील असे नेत्रतज्ञाने सांगितले. दि. 9/8/2011 रोजी तक्रारदारांच्या डाव्या डोळ्याचे ऑपरेशन झाले, परंतु ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना अजिबात दिसले नाही व नजरही आली नाही. याची कल्पना तक्रारदारांनी वारंवार जाबदेणार डॉक्टरांना दिली, प्रत्येकवेळी जाबदेणारांनी वेगळेवेगळे ड्रॉप्स डाव्या डोळ्यात टाकण्यास सांगितले. तरीही तक्रारदारांना डाव्या डोळ्याने दिसत नाही. त्यानंतर चार महिन्यानंतर जाबदेणारांच्या सल्ल्यानुसार दि. 2/12/2011 रोजी डॉ. अर्चना तांबे यांच्याकडे दोन्ही डोळ्यांची सोनोग्राफी करुन त्याचा रिपोर्ट जाबदेणार डॉक्टरांना दाखविला असता, त्यांनी त्यावर कोणताही उपचार न करता फक्त ड्रॉप बदलून दिले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये डाव्या डोळ्यात लेन्स बसविली नाही, हे स्पष्ट झाले. ही गंभीर चुक करुनही जाबदेणार डॉक्टरांनी ती दुरुस्त करण्यासाठी कोणतीही हालचाल किंवा उपचार केले नाहीत. त्यानंतर जाबदेणारांनी दिलेल्या चिठ्ठीनुसार दि. 18/2/2012 रोजी तक्रारदार एच.व्ही.देसाई हॉस्पिटल, हडपसर येथे गेले, तेथील डॉक्टरांनी सोनोग्राफी व इतर चाचण्या करुन घेतल्या आणि डाव्या डोळ्यावर कोणतेही उपचार करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर जाबदेणारांनी तक्रारदारांना एल.व्ही.प्रसाद हॉस्पिटल. हैद्राबाद येथे जाण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी दि. 8/3/2012 रोजी समक्ष जाऊन डोळ्यांची तपासणी करुन घेतली असता, त्यांनी वेगवेगळ्या टेस्ट व सोनोग्राफी करुन रिपोर्ट दिला व येण्यास फार उशिर झाला आहे व डाव्या डोळ्यास नजर येणे शक्य नाही असे सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार डॉक्टरांनी वेळच्या वेळी कोणताही निर्णय न घेतल्याने त्यांचा डावा डोळा कायमचा निकामी झाला आहे, त्यामुळे त्यांना दोन वेळा वाहनांनी ठोकर दिली व त्यांच्या डाव्या बाजूस मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. तसेच उजव्या डोळ्याचे ऑपरेशन व्यवस्थित न केल्यामुळे त्यावर ताण येऊन तोही डोळा निकामी होऊ शकतो व त्यांना कायमचे अंधत्व येऊ शकते, असे नेत्रतज्ञानी सांगितले आहे. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 15,00,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 4,85,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 10,000/-, असे एकुण रक्कम रु. 19,95,000/- मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, नोटीस मिळूनही ते मंचामध्ये अनुपस्थित राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार डॉक्टरांनी दि. 28/7/2011 रोजी तक्रारदारांच्या उजव्या डोळ्याचे ऑपरेशन करुन त्यामध्ये लेन्स बसविली. त्यानंतर दि. 9/8/2011 रोजी तक्रारदारांच्या डाव्या डोळ्याचे ऑपरेशन केले, परंतु ऑपरेशन केल्यानंतरही त्यांना डाव्या डोळ्याने अजिबात दिसत नव्हते. त्यानंतर जाबदेणार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तक्रारदारांनी दि. 2/12/2011 रोजी डॉ. अर्चना तांबे यांच्याकडे दोन्ही डोळ्यांची सोनोग्राफी केली. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये खालीलप्रमाणे नमुद केले आहे,
“Findings :
Lens is not visualized.
There is complete retinal detachment.
No e/o vitreous pathology
Comments : Left sided retinal detachment.
No other abnormality detected.”
तक्रारदारांनी एल.व्ही.प्रसाद आय इन्स्टीट्युट, हैद्राबाद यांचेही कागदपत्रे दाखल केले आहेत. त्यामध्ये Left Eye(OS) या मथळ्याखाली Lens : NO VIEW, Anterior Vitreous : NO VIEW असे नमुद केले आहे, त्याचप्रमाणे Right Eye (OD) मध्ये Lens आहे, असे नमुद केले आहे. तक्रारदारांनी के.के. आय. इन्स्टीट्युटमधूनही उपचार घेतले होते, तेथीलही कागदपत्रे त्यांनी दाखल केलेले आहेत. तेथील डॉ. अमृता थापर यांनी दिलेले सर्टीफिकिटमध्ये खालीलप्रमाणे नमुद केले आहे,
“He gave history of undergoing Cataract Surgery with IOL
implant in Right Eye on 28/7/2011 and Left Eye on 9/8/2011,
post surgery never was no visual recovery in Left Eye.”
डॉ. अमृता थापर यांनी पुढे
“He review with us on 21/3/2012 with B scan reports wherein
the Left Eye did not show lens echoes and the retina was on.”
रुबी हॉल क्लिनिक येथील डॉक्टरांनी दि. 16/12/2011 रोजीच्या कागदपत्रामध्ये
“R .. IOL in place,…….
L… phthesis faulty PR USG RD …..
Unfortunately he will not benefit by any surgery
on left eye, in my opinion.” असे नमुद केले आहे.
या सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांच्या डाव्या डोळ्यास दृष्टी नाही, हे दिसून येते, परंतु जाबदेणार डॉक्टरांच्या चुकीच्या ऑपरेशनमुळे त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली, यासाठी तक्रारदारांनी कुठलाही पुरावा, मेडीकल लिटरेचर किंवा तज्ञाचा अहवाल दाखल केला नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार डॉक्टरांनी डाव्या डोळ्यामध्ये लेन्स टाकलीच नाही, त्यामुळे त्यांची त्या डोळ्याची दृष्टी गेली. परंतु मंचाच्या मते, पूर्वी लेन्स न टाकताच ऑपरेशन होत होते, तेव्हा डोळा निकामी होत नव्हता. तक्रारदारांनी कुठलाही पुरावा किंवा मेडीकल लिटरेचर दाखल केले नाही म्हणून मंचाने इंटरनेटवरुन “Cataract Surgery” बाबत माहिती घेतली. त्यामध्ये Cataract Surgery म्हणजे काय? त्याचे प्रकार, त्याच्या प्रोसिजर आणि कॉम्प्लिकेशन्स इ. विषयी माहिती दिलेली आहे. त्यातील “कॉम्प्लिकेशन्स” या हेडखाली खालीलप्रमाणे नमुद केले आहे,
“Retinal detachment is an uncommon complication
of cataract surgery, which may occur weeks, months
or even years later.”
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार डॉक्टरांनी त्यांना जवळ-जवळ दोन ते तीन महिने फक्त डोळ्यांचे ड्रॉप्सच टाकण्यास सांगितले. परंतु वर नमुद केलेल्या कॉम्प्लिकेशन्सनुसार “Retinal detachment” हे कॉम्प्लिकेशन समजण्याकरीता, आठवडे, महिने किंवा वर्षही लागू शकतात. तक्रारदारांनी दाखल केलेल्या के. के. आय. इन्स्टीट्युटमधील डॉक्टरांनी दिलेल्या सर्टिफिकिटमध्ये,
“LE shows vascularised opaque cornea with hypotony
(unrecordable los) U/S B scan shows Retinal detachment
with reduced Axiol length.” असे नमुद केले आहे.
यावरुन तक्रारदारांच्या डाव्या डोळ्यास “Retinal detachment” हे कॉम्प्लिकेशन होते व हे कॉम्प्लिकेशन म्हणजे वैद्यकिय निष्काळजीपणा नाही, असे मंचाचे मत आहे. यासंदर्भात मंच मा. सर्वोच्च न्यायालयाचा “श्री. अच्युतराव हरिभाऊ खोडवा विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र” IV 2006 CPJ Page 8 या निवाडयाचा आधार घेते. या निवाडयामध्ये पुढीलप्रमाणे नमूद केलेले आहे
“पेशंटवर उपचार करतांना, प्रत्येक डॉक्टरांची वैद्यकीय मते आणि कौशल्ये वेगवेगळी असू शकतात. परंतु ते उपचार मेडिकल प्रोफेशनला मान्यता प्राप्त असणारे असले पाहिजेत, डॉक्टरांनी पेशंटवर उपचार करतांना त्यांचे पुर्ण कौशल्य वापरले, दक्षता घेतली आणि तरीही पेशंटचा मृत्यू झाला किंवा त्यास कायमचे अपंगत्व आले तर अशा वेळी तो डॉक्टरांचा निष्काळजीपणा ठरत नाही. ”
वरील सर्व विवेचनावरुन आणि मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावरुन, जाबदेणार डॉक्टरांनी दिलेल्या उपचारामध्ये कोणतीही सेवेतील त्रुटी किंवा निष्काळजीपणा मंचास आढळत नाही.
5] वरील सर्व विवेचनावरुन, कागदपत्रांवरुन व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या वर नमुद केलेल्या निवाड्यावरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.