-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
( पारित दिनांक- 12 जुलै,2016)
01. तक्रारकर्तीने ही तक्रार, विरुध्दपक्ष डॉक्टर विरुध्द प्रसुतीचे दरम्यान निष्काळजीपणा केल्या बद्दल ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही सप्टेंबर-2010 मध्ये विरुध्दपक्ष डॉक्टरकडे वैद्दकीय तपासणीसाठी गेली होती. विरुध्दपक्ष ही स्वतः डॉक्टर असून ती नर्सींग होम चालविते. विरुध्दपक्ष डॉक्टरने तक्रारकर्तीची वैद्दकीय तपासणी करुन ती गर्भवती असल्याचे सांगितले व तिला काही औषध लिहून दिले. तक्रारकर्तीचे म्हणण्या नुसार विरुध्दपक्ष डॉक्टर ही केवळ एम.बी.बी.एस. पदवीधारक असून तिचे जवळ गायनाकॉलाजी (Genecology) किंवा ऑबस्टेट्रिसियन (Obstetrician) ची कुठलीही पदवी नाही. दिनांक-17/03/2011 ला तक्रारकर्तीने एका मुलीला विरुध्दपक्षाच्या नर्सींग होम मध्ये जन्म दिला, त्यावेळी तिला अतिशय रक्तस्त्राव झाला परंतु विरुध्दपक्ष डॉक्टरला तो थांबविता आला नाही व रक्तदाब कमी झाल्यामुळे ती बेशुध्द झाली, त्याच दिवशी रात्री 12.00 वाजताचे दरम्यान तक्रारकर्तीला डॉ.गिल्लुरकर हॉस्पीटल मध्ये हलविले. विरुध्दपक्ष डॉक्टरचे निष्काळजीपणामुळे तक्रारकर्तीचे गर्भाशय तिच्या जननेंद्रियाचे बाहेर आले, त्यामुळे तिच्या गर्भाशयात संक्रमण पसरले, त्यावेळी तिला गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला, तेंव्हा तिला दुसरे दिवशी शासकीय वैद्दकीय रुग्णालयात भरती करण्यात आले व तिथे तिचे गर्भाशय काढण्यात आले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे व पाहिजे असलेली अर्हता डॉक्टर जवळ नसल्याने तक्रारकर्तीला तिचे गर्भाशय काढून टाकावे लागले, त्यावेळी ती केवळ 24 वर्षांची होती व दिडवर्षा पूर्वीच तिचे लग्न झाले होते. गर्भाशय काढून टाकल्यामुळे तिला आता पुढे मुल होणे शक्य नव्हते, त्यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास झाला. म्हणून या तक्रारीव्दारे तिने विरुध्दपक्ष डॉक्टर विरुध्द रुपये-5,00,000/- रकमेची नुकसान भरपाई मागितली.
03. विरुध्दपक्ष डॉक्टरला मंचाची नोटीस मिळाली असता ती हजर झाली व तिने आपले लेखी उत्तर दाखल केले. तिने तक्रारीतील सर्व आरोप नाकबुल केलत. विरुध्दपक्षाने हे कबुल केले आहे की, तक्रारकर्तीचे बाळांतपण तिचे नर्सींग होम मध्ये झाले. तक्रारकर्तीची प्रसुती ही नैसर्गिक (Normal delivery) झाली. प्रसुती झाल्या नंतर तिचा रक्तदाब कमी झाला होता म्हणून तिचेवर योग्य ते वैद्दकीय उपचार करण्यात आले. पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षाने वैद्दकीय अधिकारी म्हणून काम केले आहे व त्यादरम्यान तिने ब-याच प्रसुती केलेल्या असून तिला जवळपास 26 वर्षाचा अनुभव आहे, तसेच ती गायनाकॉलाजी (Genecology)आणि ऑबस्टेट्रिसियन (Obstetrician) संस्था, नागपूर येथे सभासद आहे, त्यामुळे तिला नर्सींग होम चालविण्याचा परवाना मिळालेला आहे. तिचे पतीने पण गायनाकॉलाजी (Genecology) आणि ऑबस्टेट्रिसियन (Obstetrician) चा कोर्स केलेला आहे व दोघानांही बाळांतपण करण्याचे संपूर्ण अद्दायावत ज्ञान व अनुभव आहे. एका डॉक्टरानीं आपल्या रुग्णाची जी काळजी घ्यावयाला हवी, ती सर्व काळजी, विरुध्दपक्ष डॉक्टरांनी तक्रारकर्तीची घेतली होती. सबब ही तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षाने केली.
04. तक्रारकर्ती तर्फे, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरावर, प्रतीउत्तर दाखल करण्यात आले नाही. त्यानंतर तक्रारकर्ती ही ब-याच तारखां पासून गैरहजर राहत आहे. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरा नंतर तक्रारकर्तीला बरीच संधी देऊनही तिच्या तर्फे कोणीही मंचा समक्ष हजर न झाल्यामुळे आम्ही ही तक्रार निकाली काढीत आहोत. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर व लेखी युक्तीवाद तसेच प्रकरणातील दाखल दस्तऐवजा वरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
05. या प्रकरणा मध्ये वैद्दकीय तज्ञांचे मत मागविण्यात आले होते, त्याप्रमाणे इंदिरा गांधी शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील स्त्री रोग आणि प्रसुती शास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुखानीं तक्रारकर्तीच्या वैद्दकीय उपचाराच्या दस्तऐवजांची तपासणी करुन आपला लेखी अभिप्राय मंचाला कळविला होता, त्यानुसार तक्रारकर्तीच्या संबधाने विरुध्दपक्ष डॉक्टरने तिचेवर योग्य ते वैद्दकीय उपचार केले होते तसेच असापण अभिप्राय दिला होता, जर पेशंटची नैसर्गिक प्रसुती (Normal Delivery) झाली तर गर्भाशयाला इजा पोहचू शकते तसेच नैसर्गिक प्रसुती मध्ये गर्भाशयाची पिशवी उलटी सुध्दा होऊ शकते. वैद्दकीय तज्ञांचे नमुद या अहवाला अनुसार असे दिसून येत नाही की, तक्रारकर्तीची प्रसुती करण्यामध्ये विरुध्दपक्ष डॉक्टरानीं काही निष्काळजीपणा केला होता.
06. विरुध्दपक्ष डॉक्टरां कडून त्यांचे लेखी उत्तराचे समर्थनार्थ शपथपत्र पण दाखल करण्यात आले व काही मा.वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडयांचा आधार पण घेण्यात आला. तक्रारकर्तीने तक्रारीचे समर्थनार्थ कोणालाही तपासलेले नाही किंवा वैद्दकीय तज्ञांचे अहवालाला आव्हान पण दिलेले नाही. विरुध्दपक्ष डॉक्टरांनी सादर केलेल्या दस्तऐवजांवरुन हे दिसून येते की, विरुध्दपक्ष डॉक्टरांना गायनाकॉलाजी (Genecology) आणि ऑबस्टेट्रिसियन (Obstetrician) या शाखांमध्ये बराच अनुभव आहे व वैद्दकीय अधिकारी म्हणून त्यांनी ब-याच प्रसुती केलेल्या असल्याने तसे प्रमाणपत्रपण त्यांना देण्यात आलेले आहे. वैद्दकीय निष्काळजीपणाचे बाबतीत, जो पर्यंत एखाद्दा डॉक्टर आपल्या रुग्णाप्रती योग्य ती काळजी (Proper care) व योग्य त्या कुशलते (Proper skill) नुसार आपली योग्य ती जबाबदारी पार पाडीत असेल, तो पर्यंत, वैद्दकीय निष्काळजीपणाचा ठपका त्यांचेवर ठेऊ शकत नाही. ब-याच प्रकरणांमध्ये मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने हे स्पष्ट केले आहे की, जर डॉक्टरांनी वैद्दकीय शास्त्रानुसार अपेक्षीत असलेली वैद्दकीय उपचाराची पध्दती स्विकारुन त्यांचे रुग्णावर योग्य ते वैद्दकीय उपचार केले असतील तसेच त्या डॉक्टरांना त्या वैद्दकीय शास्त्राचे योग्य ते ज्ञान व अनुभव असेल, तर केवळ रुग्णावर काही प्रतीकुल परिणाम झाला किंवा त्याच्या तब्येतीत बिघाड झाला त्या कारणास्तव संबधित डॉक्टरांनी त्या रुग्णाप्रती निष्काळजीपणा केला असे म्हणता येणार नाही.
07. या प्रकरणामध्ये तक्रारकर्तीची, विरुध्दपक्ष डॉक्टरां विरुध्दची तक्रार योग्य त्या पुराव्यानिशी सिध्द करण्याची जबाबदारी होती परंतु तिने ती पार पाडली नाही. वैद्दकीय तज्ञांचा अहवाल या प्रकरणात महत्वाचा आहे व तो तक्रारकर्तीच्या तक्रारीला पुष्टी देत नाही. या सर्व कारणास्तव ही तक्रार मंजूर होण्यास पात्र नाही, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष डॉक्टरांचे विरुध्दची खारीज करण्यात
येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.