::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-31 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) डॉ. जयेश तिमाने, विरुध्दपक्ष क्रं-2) वैद्दकीय अधिक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-3) आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांचे विरुध्द तिच्या पोटाच्या आजारा संबधी विरुध्दपक्षानीं दाखविलेल्या निष्काळजीपणा संबधाने मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचा पती हा स्टार इंडीया कंपनीत कामगार असून विमाधारक आहे आणि त्याचे कुटूंब विरुध्दपक्षाच्या राज्य कामगार विमा योजने अंतर्गत दवाखान्याचे लाभार्थी व ग्राहक आहेत. तक्रारकर्तीला मागील ब-याच वर्षा पासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता, त्यामुळे तिला विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-3 चे दवाखान्यात दिनांक-19/11/2011 रोजी भरती करण्यात आले होते, त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं-1) डॉ.जयेश तिमाने यांनी, तिची वैद्दकीय तपासणी करुन, तिला युनिट-II, वॉर्ड क्रं-4 मध्ये भरती करुन घेतले. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरला पोटातील त्रासा विषयी सविस्तर माहिती दिली होती परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तक्रारकर्तीला ह्दय व उच्च रक्तदाबाच्या औषधी गोळया देऊन औषधोपचार केला व हा उपचार दिनांक-28/11/2011 पर्यंत चालू ठेवला. दवाखान्यात भरती असताना विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तिला धंतोली, नागपूर येथील डॉ.माहुरकर यांच्या क्लिनीक मध्ये चेकअपसाठी पाठविले, त्यावेळी तेथील तिचा रिपोर्ट नॉर्मल आला होता परंतु त्यानंतरही विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तिच्या पोटातील आजाराचे निदान करुन घेण्यासाठी सोनोग्राफी करण्यास तिला सांगितले नाही आणि दिनांक-24/11/2011 ला तिला डिसचॉर्ज दिला व एक महिन्या करीता सॉरबीट्रेड, डिस्प्रीन इत्यादी औषधी गोळया देऊन एक महिन्या नंतर पुन्हा वैद्दकीय तपासणी करीता बोलाविले. तक्रारकर्तीने एक महिना औषधोपचार घेतल्या नंतर ती पुन्हा दिनांक-29/12/2011 ला विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात हजर झाली त्यावेळी तिने पोटातील त्रास अजिबात कमी झालेला नसल्याचे सांगितले तसेच सोनोग्राफी करण्यास विनंती केली परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने त्याकडे लक्ष दिले नाही व पुन्हा त्याच औषधीच्या गोळयांचे सेतन करण्यास सांगितले. अशाप्रकारे दिनांक-25/01/2012 पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तिला त्याच प्रकारचा औषधोपचार दिला परंतु त्या नंतर तिचे पोटात तिव्र त्रास सुरु झाल्याने दिनांक-27/01/2012 रोजी तिला चिरंजीवी नर्सिंग होम, नागपूर येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले, तेथील डॉक्टरांनी तिचा सोनोग्राफी रिपोर्ट घेतला आणि दिनांक-28/01/2012 ला पोटाचे लिव्हर मध्ये झालेल्या गाठी शस्त्रक्रियेव्दारे बाहेर काढल्यात व दिनांक-09/02/2012 रोजी तिला डिसचॉर्ज दिला.
अशाप्रकारे तक्रारकर्तीची मुख्य तक्रार अशी आहे की, ज्यावेळी ती दिनांक-19/11/2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात भरती झाली होती त्यावेळी तेथील विरुध्दपक्ष क्रं-1) डॉ. जयेश तिमाने यांनी तिचे पोटातील आजाराचे निदान करुन घेण्यासाठी तिची सोनोग्राफी करण्याची काळजी घेतली नाही किंवा तिला शस्त्रक्रिया विभागात किंवा शासकीय वैद्दकीय रुग्णालय, नागपूर येथे भरती करण्याची जबाबदारी पार पाडली नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तिचे पोटातील त्रासा करीता औषधोपचार न करता तिला हॉर्ट व उच्च रक्तदाबाच्या औषधीच्या गोळया दिल्यात व अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं आपल्या सेवेत कमतरताच ठेवली नाही तर तिचे पोटाचे आजारा बद्दल निष्काळजीपणा दाखविला. म्हणून तिने या तक्रारीव्दारे विरुध्दपक्षां कडून एकूण रुपये-2,30,000/- ची नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
03 विरुध्दपक्ष क्रं-1) डॉ.जयेश तिमाने याने नि.क्रं-8 वर लेखी जबाब सादर करुन हे कबुल केले की, तक्रारकर्तीला दिनांक-19/11/2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते परंतु त्यावेळी तिने तिचे पोटातील आजारा विषयी सांगितले होते ही बाब पूर्णपणे नाकबुल केली. विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने असे नमुद केले की, नोव्हेंबर, 2011 मध्ये तो स्वतःच्या लग्नासाठी सुट्टीवर होता आणि त्या काळात तो विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात कधीच हजर झालेला नव्हता, त्यामुळे तक्रारकर्ती त्याला रुग्णालयात भेटली किंवा त्याने तिचेवर औषधोपचार करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अशाप्रकारे त्याचे विरुध्द तक्रारीत केलेले सर्व आरोप व विधाने त्याने नाकबुल केलेली आहेत. त्याच्या रुग्णालयातील गैरहजेरीच्या कालावधी मध्ये डॉ.श्रीमती सोमण या कार्यरत होत्या. त्या शिवाय तक्रारकर्तीने दाखल केलेल्या रुग्णालयातील दस्तऐवजां वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीने चक्कर येण्याची व जिव घाबरण्याची तक्रार त्यावेळी केली होती, तिचा रक्तदाब हा वाढलेला उच्च होता व ई.सी.जी.रिपोर्ट मध्ये “Inferior and lateral ischemia” असल्याचे निष्पन्न झाले होते, त्यावेळी तिला शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर (Govt. Medical College, Nagpur) येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. वैद्दकीय दस्तऐवजा वरुन तिने तिच्या पोटातील आजारा संबधी तक्रार केली होती असे कुठेही दिसून येत नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खोटया स्वरुपाची आहे म्हणून खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजना रुग्णालय तर्फे वैद्दकीय अधिक्षक आणि विरुध्दपक्ष क्रं-3) आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांनी एकत्रित लेखी जबाब नि.क्रं 13 वर दाखल केला. त्यांनी लेखी जबाबात हे नाकबुल केले की, तक्रारकर्तीने तिच्या पोटाच्या आजारा बद्दल सांगितले होते परंतु त्याकडे र्दुलक्ष्य करण्यात आले होते. तिने जी काही आजारा बद्दल माहिती सांगितली होती, त्याप्रमाणे तिचेवर योग्य ते औषधोपचार करण्यात आले होते. अशाप्रकारे त्यांनी पण तक्रार नामंजूर करुन ती खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीची तक्रार तसेच विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्ष क्रं-1) ने (डॉ.जयेश तिमाने) दाखल केलेल्या लेखी जबाबातील मुद्दाचा जर विचार केला, तर प्रथमतः हे पाहावे लागेल की, तक्रारकर्तीचे तक्रारी नुसार विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरची कुठली जबाबदारी येते काय.
विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने असे नमुद केले आहे की, 2011 च्या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात तो लग्ना निमित्य सुट्टीवर होता आणि त्या काळात तो कधीही, विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात आलेला नव्हता. तक्रारकर्तीच्या म्हणण्या नुसार संपूर्ण घटना ही नोव्हेंबर आणि डिसेंबर,2011 मध्ये घडली. विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने त्याच्या हजेरी पटाची/मस्टर रोलची प्रत दाखल केली आहे, जी पाहता असे दिसून येते की, तो 01 नोव्हेंबर, 2011 ते 30 नोव्हेंबर, 2011 या कालावधीत सुट्टीवर होता, म्हणजेच तक्रारकर्तीने जे आरोप केलेले आहेत की, दिनांक-19/11/2011 ते दिनांक-28/11/2011 या काळात विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तिची वैद्दकीय तपासणी केली होती व तिचेवर औषधोपचार करुन तिला ह्दयाच्या व उच्च रक्तदाबाच्या गोळया दिल्यात आणि तिच्या पोटातील आजारा संबधी तिने सांगूनही संपूर्णतः र्दुलक्ष्य केले, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असे दिसून येते. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तक्रारकर्तीला दिनांक-23/11/2011 ला डॉ. माहुरकर यांच्या क्लिनीक मध्ये तपासणीसाठी पाठविले होते व तेथील रिपोर्ट नॉर्मल आल्या नंतर सुध्दा तिचे पोटातील आजारासाठी तिला सोनोग्राफी करण्यास सांगितले नाही व उच्च रक्तदाबा संबधी औषधीच्या गोळया देऊन तिला डिसचॉर्ज दिला, हे तिचे म्हणणे सुध्दा स्विकारार्ह वाटत नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टर डिसेंबर,2011 मध्ये विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात रुजु झाला त्यामुळे तक्रारकर्तीवर नोव्हेंबर-2011 मध्ये विरुध्दपक्ष क्रं-2) रुग्णालयात जे काही औषधोपचार करण्यात आले, त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरला जबाबदार धरता येणार नाही.
07. तक्रारकर्तीच्या वकीलांनी हे कबुल केले आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरनां वैयक्तिक क्षमतेते तक्रारीत सामील केलेले नसून, विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी म्हणून तक्रारीत सामील केलेले आहे. अशाप्रकारे तक्रारकर्ती कडून एक प्रकारे कबुली देण्यात आली आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टर हा नोव्हेंबर, 2011 मध्ये त्याचे कर्तव्यावर हजर नव्हता आणि त्यामुळे तिने त्या काळात विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरला आपली तब्येत दाखविल्याचा प्रश्नच उदभवत नाही.
08. दिनांक-19/11/2011 ला पहिल्यांदा तक्रारकर्ती विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात गेली होती आणि तिच्या म्हणण्या नुसार ती पोटातील आजारा संबधी वैद्दकीय तपासणीसाठी गेली होती. तिने विरुध्दपक्ष क्रं-2) रुग्णालयाचे डिसचॉर्ज कॉर्ड दाखल केले आहे, ते पाहिले असता असे दिसून येते की, वैद्दकीय तपासणी केल्या वर तिला “Inflated wall eschemia” असल्याचे निदान करण्यात आले होते आणि त्यामुळे तिला डॉ. माहुरकर यांच्या हॉर्ट क्लिनीक मध्ये वैद्दकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, जरी तेथील रिपोर्ट नॉर्मल होता तरी ती तेथील व्यायामाची चाचणी थकल्यामुळे पूर्ण करु शकली नव्हती. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, डॉ. माहुरकर यांचा रिपोर्ट नॉर्मल असताना सुध्दा, विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तिला तिच्या पोटाच्या आजारा विषयी सोनोग्राफी करण्यास सांगितले नाही, जर अशी सोनोग्राफी केल्या गेली असती तर तिच्या पोटातील आजाराचे वेळीच निदान होऊ शकले असते किंवा तिला शस्त्रक्रिया विभागामध्ये किंवा शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथे पाठविण्यात आले नाही.
09. तक्रारकर्ती तर्फे “Mrs. Manjeet Chawala-Versus-ESCORTS Heart Institue & Research Centre”-2014 (3) CPR-452(NC) या मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या निवाडयावर भिस्त ठेवण्यात आली. सदर निवाडया मध्ये असे नमुद केलेले आहे की, रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या वैद्दकीय उपचारा संबधी योग्य ती काळजी घेणे अपेक्षीत असते. विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने तक्रारकर्तीच्या आजाराचे चुकीचे निदान केले, ही बाब विरुध्दपक्षाचे निष्काळजीपणचा पुरावा आहे असा युक्तीवाद करण्यात आला आणि तिला तिचे पोटाचे आजारा विषयी सोनोग्राफी
करण्यास सांगितले नाही म्हणून ती विरुध्दपक्षांच्या सेवेतील कमतरता ठरते, म्हणून त्यासाठी विरुध्दपक्ष जबाबदार आहेत. यासाठी आणखी एका मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयाचा आधार तक्रारकर्ती तर्फे आधार घेण्यात आला- “ K. Ranga Rao (Dr.)-Versus-Shaikh Dadoo Saheb”-II (2014) CPJ-188 (NC)
10. विरुध्दपक्षा कडून असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारकर्तीने कधीच तिच्या पोटाच्या आजारा संबधी सांगितले नव्हते आणि म्हणून तिला सोनोग्राफी करण्यास सांगण्याचा प्रश्नच उदभवला नाही, नाही तर तिच्या पोटाच्या आजारावर वैद्दकीय उपचार न करण्याचे कुठलेही कारण विरुध्दपक्षाला नव्हते. विरुध्दपक्षाच्या या युक्तीवादात तथ्य दिसून येते कारण तक्रारकर्तीने जर तिला असलेल्या पोटाच्या आजारा संबधी सांगितले असते तर त्यावर विरुध्दपक्षाला इलाज न करण्याचे कुठलेही कारण दिसून येत नाही. उलटपक्षी दिनांक-23/01/2012 ला पहिल्यांदा तक्रारकर्तीने तिच्या पोटातील आजारा संबधी सांगितले, त्यावेळी तिला शस्त्रक्रिया विभागामध्ये जाण्याचा सल्ला पण देण्यात आला होता कारण तिला असलेल्या पोटाचा त्रास तिच्या म्हणण्या प्रमाणे बरेच वर्षां पासून होता आणि त्यासाठी शल्यचिकित्सकांचा सल्ला घेणे जरुरीचे असते परंतु ती शल्यचिकित्सकांकडे गेली नाही आणि ही बाब तिने स्वतः दाखल केलेल्या वैद्दकीय दस्तऐवजां वरुन स्पष्ट होते. तिने दाखल केलेल्या विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयातील दस्तऐवजावर हे स्पष्ट नमुद आहे की, तिला शस्त्रक्रिया विभागात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. विरुध्दपक्ष क्रं-2) व विरुध्दपक्ष क्रं-3) यांनी त्यांच्या राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या बाहयरुग्ण नोंदीच्या रजिस्टरची प्रत दाखल केलेली आहे, जी हे दर्शविते की, तक्रारकर्तीने सर्जरी, ओ.पी.डी. मध्ये कधीच भेट दिलेली नाही किंवा शल्यचिकित्सकांचा सल्ला किंवा तेथील वैद्दकीय उपचार घेतलेले नाहीत. असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्रं’1) डॉक्टरने दिलेल्या सल्ल्याचे पालन न करुन तिने स्वतःच हलगर्जीपणा दाखविलेला आहे. अशा परिस्थितीत जर तक्रारकर्ती डॉक्टरांचा सल्ला मानत नसेल, तर त्यासाठी विरुध्दपक्षानीं तिचे औषधोपचारा संबधी निष्काळजीपणा केला म्हणून त्यांना जबाबदार धरता येणार नाही.
11. तक्रारकर्तीने पुढे चिरंजीवी नर्सिंग होम, नागपूर या खाजगी रुग्णालयात स्वतःला भरती करुन घेतले, ज्या ठिकाणी तिचेवर दिनांक-30/01/2012 ला “Hydatid cyst (Liver) with APD” साठी शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु त्या दवाखान्यातील डिसचॉर्ज कॉर्ड वरुन असे दिसून येत नाही की, तिच्यावर अत्यंत तातडीने शस्त्रक्रिया करण्यची गरज होती. तिला जर पोटातील त्रास होता, तर त्यावर वैद्दकीय उपचार, ती विरुध्दपक्षाच्या राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात करु शकली असती, पण त्यासाठी तिने स्वतःहून तिचे पोटातील त्रासा बद्दल सांगावयास हवे होते परंतु स्वतः तिने दाखल केलेल्या वैद्दकीय दस्तऐवजां वरुन असे कुठेही दिसून येत नाही की, तिने नोव्हेंबर-2011 ला विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरकडे किंवा इतर कुठल्याही विरुध्दपक्षाच्या डॉक्टरांना तिचे पोटातील आजारा संबधी सांगितले होते आणि म्हणून तिच्या आजाराचे विरुध्दपक्षां तर्फे चुकीचे निदान करण्यात आले होते या तिच्या विधानाला काहीही अर्थ उरत नाही. त्या शिवाय ज्याअर्थी विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टर हा संपूर्ण नोव्हेंबर, 2011 मध्ये सुट्टीवर होता, त्याअर्थी त्याच्या गैरहजेरीत तक्रारकर्तीची कोणत्या डॉक्टरांनी वैदकीय तपासणी केली व औषधोपचार केलेत हे तक्रारकर्तीने स्पष्ट केलेले नाही परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) डॉक्टरने त्याच्या अनुपस्थितीत जे डॉक्टर विरुध्दपक्ष क्रं-2) राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात कार्यरत होते, त्यांचे नाव लेखी उत्तरात नमुद केलेले आहे आणि याची माहिती होऊन सुध्दा तक्रारकर्तीने त्या डॉक्टरांना या तक्रारीत प्रतिपक्ष म्हणून सामील केलेले नाही आणि अशाप्रकारे तिची तक्रार कायद्दा नुसार दोषपूर्ण आहे.
12. विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) तर्फे मंचा समोर युक्तीवादाचे वेळी असे सांगण्यात आले की, त्यांच्या राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालयातील सदस्यानां/विमाधारकानां खाजगी रुग्णालयातून देखील वैद्दकीय उपचार करुन घेण्याची परवानगी दिल्या जाते आणि अशा अन्य खाजगी रुग्णालयातील खर्च जर योग्य त्या बिलांसह त्यांचेकडे सादर केला तर आलेल्या वैद्दकीय खर्चाची प्रतीपुर्ती पण त्यांचे कडून होत असते. या प्रकरणात सुध्दा तक्रारकर्तीने जर तिचेवर खाजगी रुग्णालयात झालेल्या वैद्दकीय खर्चाची बिले सादर केली असती तर त्याचा विचार केल्या गेला असता परंतु तिने तसा वैद्दकीय प्रतीपूर्तीचा दावा कधीच केला नाही. यावर तक्रारकर्तीचे वतीने असे सांगण्यात आले की, या बद्दल तिला माहिती नव्हती परंतु तिचे हे म्हणणे पटण्यायोग्य वाटत नाही
कारण तिचा पती हा विरुध्दपक्ष राज्य कामगार विमा योजनेचा लाभार्थी आहे व तेथील मिळत असलेल्या सर्व सोयी-सुविधांची त्याला माहिती नसणे शक्य नाही, त्यामुळे तक्रारकर्तीने जर आलेल्या वैद्दकीय खर्चा संबधी दावा केला असता तर त्याचा विचार विरुध्दपक्षानीं केला असता व ही तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडले नसते.
13. वरील सर्व वस्तुस्थितीचा आणि दाखल वैद्दकीय दस्तऐवजांचा विचार करता मंच असा निष्कर्ष काढत आहे की, यामध्ये तक्रारकर्ती म्हणते त्या प्रमाणे विरुध्दपक्षांच्या सेवेत कुठलीही कमतरता नव्हती किंवा तिच्या आजारा संबधी चुकीचे निदान सुध्दा करण्यात आलेले नव्हते आणि म्हणून ती मागत असलेली नुकसान भरपाईची मागणी कायदेशीर व देण्यायोग्य नाही. सबब तक्रारकर्तीची विरुध्दपक्षां विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ती सौ.कमल बाबाराव कोढे यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) डॉ. जयेश मधुकर तिमाने, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोमवारी पेठ, नागपूर अधिक-02 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.