::: आ दे श :::
( पारित दिनांक : 13/07/2016 )
मा. सदस्य तथा प्रभारी अध्यक्ष श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता / अर्जदाराची मुलगी कु. संगिता जगन्नाथ भोसले, हिचे डाव्या डोळयाचा इलाज व उपचार विरुध्द पक्षाकडे माहे फेब्रुवारी-2013 पासुन सुरु होता. डाव्या डोळयानी पाहण्यास तिला त्रास होत होता, ती जि.प. शाळा, मोप येथे शिकत होती. विरुध्द पक्षानी, तक्रारकर्त्याला सुचना दिली की, त्यांचे मुलीचे डाव्या डोळयाचे ऑपरेशन करणे अत्यावश्यक आहे, न केल्यास ती एका डोळयाने अंध सुध्दा होवू शकते. त्यासाठी 15,000/- रुपये फी आकारुन विरुध्द पक्षानी, तक्रारकर्त्याचे मुलीला दिनांक 06/02/2013 रोजी त्यांचे दवाखान्यात भरती केले व दिनांक 07/02/2013 रोजी डोळयाचे ऑपरेशन करुन दिनांक 08/02/2013 रोजी सुट्टी देण्यात आली तसेच दिनांक 09/02/2013 रोजी पुन्हा तपासणी करीता बोलावण्यात आले.
तक्रारकर्ता हे आपल्या मुलीस घेवून दिनांक 08/04/2013 रोजी विरुध्द पक्षाचे दवाखान्यात आले व त्यांनी विरुध्द पक्षाला सांगीतले की, त्यांनी ऑपरेशन केलेल्या मुलीला डाव्या डोळयांनी काहीही दिसत नाही. तेंव्हा विरुध्द पक्षानी तक्रारकर्त्याच्या मुलीला डोळयात टाकण्याचे ड्रॉप्स दिले व एका महिन्यानी बालाविले. त्यानुसार तक्रारकर्ता हे आपल्या मुलीला घेवून विरुध्द पक्षाकडे दिनांक 08/05/2013, 06/06/2013, 16/06/2013, 08/08/2013, 24/04/2014, 13/05/2014 व दिनांक 12/08/2014 रोजी तपासणीस आणले. परंतु विरुध्द पक्षाने चुकीचा उपचार केल्यामुळे तक्रारकर्त्याची मुलगी 100 टक्के अंध झालेली आहे. विरुध्द पक्षाने ऑपरेशन पुर्वी, पुर्व काळजी न घेता ऑपरेशन केले आहे व पुर्व काळजी म्हणजे रक्त दाब, लघवी परीक्षण, रक्त चाचणी न केल्यामुळे त्यांनी आपले कर्तव्यात हयगय व निष्काळजीपणा केला आहे.
तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षा विरुध्द जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, वाशिम यांना दिनांक 04/09/2014 रोजी विनंती अर्ज केले होते तसेच दिनांक 16/09/2014 रोजी पोलीस स्टेशन, कनेरगाव नाका यांच्याकडे तक्रार दाखल केली, त्यांनी ती तक्रार पोलीस स्टेशन वाशिम यांच्याकडे तपास कामाकरिता पाठविली. पोलीस स्टेशन वाशिम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम यांचेमार्फत जे.जे. हॉस्पीटल मुंबई यांच्याकडे तक्रारकर्त्याची मुलगी अंध झालेल्या उपचाराच्या कारणासाठी पाठविले. वैद्यकीय अधिका-याचे पत्र दिनांक 16/09/2014 नुसार असे लक्षात आले की, तक्रारकर्त्याचे मुलीला आलेला अंधपणा हा विरुध्द पक्षाच्या निष्काळजीपणाने व हयगईने ऑपरेशन पुर्वी योग्य ती पुर्व काळजी व आवश्यक तपासणी न केल्यामुळे, झाल्याचे कळविले. त्यामुळे विरुध्द पक्ष नुकसान भरपाईस जबाबदार आहे.
तक्रारकर्ता हे हिंगोली येथील रहिवासी असल्याने त्यांनी विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार अर्ज जिल्हा ग्राहक निवारण न्याय मंच, हिंगोली येथे क्र. 46/2015 नुसार दाखल केला होता. ती तक्रार न्यायमंच, हिंगोली यांनी दिनांक 29/12/2015 रोजी निशाणी एक वर आदेश करुन, हिंगोली न्यायमंचाच्या न्यायक्षेत्रात येत नसल्यामुळे, काढून टाकण्यात आली. तक्रार अर्जास कारण दिनांक 04/09/2015 रोजी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याने नुकसान भरपाई मागीतलेल्या नोटीसला ऊत्तर दिले तेंव्हा व हिंगोली न्यायमंचाचा आदेश दिनांक 29/12/2015 हा दि. 18/01/2016 रोजी प्राप्त झाला तेंव्हा घडले आहे.
अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झाले तसेच शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. विरुध्द पक्षाने सेवा देण्यात उणीव व अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.
त्यामुळे, तक्रारकर्ते यांनी, सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, तक्रार अर्ज मंजूर करण्यात यावा व विरुध्द पक्षा कडून तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून रुपये 15,00,000/- देण्याचा आदेश व्हावा, अन्य न्याय व योग्य दाद तक्रारकर्त्याच्या हितामध्ये व्हावी अशी विनंती, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रारीसोबत, दस्तऐवज यादी निशाणी 4 प्रमाणे एकंदर 11 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जबाब –
विरुध्द पक्ष यांनी इंग्रजी भाषेत लेखी जबाब दाखल केला व नंतर मराठी भाषेत भाषांतर प्रत दाखल केली. त्यामध्ये त्यांनी थोडक्यात नमुद केले की, विरुध्द पक्ष यांनी वाशिम परीसरात 1991 पासून वैद्यकीय सेवा सुरु केली व प्रसिध्द नेत्रतज्ञ म्हणून नावलौकीक मिळविलेला आहे. जगात तशी फार दुर्मिळ असणारी व जन्मजात अंधत्व देणारी व त्यावर वैद्यकीय विश्वात काहीही इलाज नसणारी विकृती Anophthalmos and Microphthalmos ही वाशिम व निकटवर्ती प्रभागात कदाचित जगात सर्वात जास्त प्रमाणात आहे. ( जगात सर्वात जास्त एका लाखाला 13 असे दुर्दैवी लोक जन्म घेतात. वाशिम परीसरात हा आकडा सध्याच लाखामागे 24 च्या वर गेला आहे.) अशा व्याधीग्रस्तांचे नेत्र जन्मापासूनच बनलेलेच नसतात किंवा अपूर्णतः विकसीत असतात. म्हणून असे रुग्ण एक तर जन्मांध असतात किंवा पराकोटीचे दृष्टीविकलांग असून बव्हंशी लोकांना दैनंदिन जीवनावश्यक दृष्टी नसते. हया विकृतीवर काहीही इलाज नाही. तक्रारकर्त्याची मुलगी कु. संगीता हिला उजव्या डोळयाला Severe Microphthalmos होता. तिच्या त्याच डोळयातील दृष्टीपटल तिच्या अगदी लहान वयात सरकले व नंतर काचबिंदू होऊन तो डोळा खूप आधीच निकामी झाला. डॉ. दीपक बत्रांना बी स्कॅनमध्ये तिच्या हया उजव्या डोळयात चाडीच्या आकाराची रेटायन डिटॅचमेंट म्हणजेच दृष्टीपटल सरकलेलं आढळल. नंतर जेंव्हा मुंबई येथील KEM Hospital तिच्या उजव्या डोळयाचे मोतीबिंदूचे व लेंस टाकण्याचे ऑपरेशन झाले तेंव्हासूध्दा तिला उजव्या डोळयाला यत्किंचितही दृष्टी लाभ झाला नाही. डावा डोळा हा ब-यापैकी जरी विकसित झाला होता तरीही तो तिच्या सामान्य समवयस्कांइतका विकसित नव्हताच. अर्धवट विकसित हया डाव्या डोळयाने तिला फार कमी दिसत असावे म्हणूनच कदाचित तिला 2007 पासून म्हणजे इयत्ता चवथीपासून शाळा सोडावी लागली.
विरुध्द पक्षाने पुढे प्रारंभिक आक्षेपात नमूद केले की, तक्रार कालावधी मर्यादेत नाही. सदरहू तक्रारीला कोणत्याही वैद्यकीय मंडळाचं मतप्रदर्शन करणारा कोणताही दाखला लावलेला नाही. या कारणास्तव पुढील कारवाई व्यर्थ आहे आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक आज्ञांचे पालन न झाल्याच्या कारणास्तव दावा खारिज करण्यायोग्य आहे. या दाव्यात सखोल सुनावणी, पुराव्याची, उलटतपासणीची आवश्यकता आहे व वि. मंचासमोरील कारवाई ही संक्षिप्त स्वरुपाची असते व गुंतागुंतीचे वैद्यकीय प्रश्न असे संक्षिप्तपणे सोडविणे शक्य नाही. म्हणून तक्रारकर्त्याला प्रस्तुत दावा दिवाणी न्यायालयापुढे मांडण्याचे निर्देश देणे योग्य आहे जेणेकरुन दोन्हीही पक्षांना समसमान संधी प्राप्त होतील. विरुध्द पक्षाने कु. संगीताची शल्यचिकीत्सा ही कोणतीही फी न स्विकारता धर्मदाय पध्दतीने केलेली आहे. या कारणाने तक्रारकर्ती ही ग्राहक या संज्ञेत बसत नाही. तक्रारीत उधृत केल्याप्रमाणे फी आकारणीची कोणतीही पावती लावलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार खारिज करण्यायोग्य आहे. विरुध्द पक्षाने आपली व्यावसायिक जबाबदारी समजून ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनीचे पालकत्व असलेल्या अपेक्स कन्सल्टंट मर्यादित हया कंपनीची प्रोफेशनल इनडेम्निटी डॉक्टर्स पॉलिसी दरवर्षी काढलेली आहे. तक्रारकर्त्याने हया विमा कंपनीला आवश्यक व संबंधीत पक्ष म्हणून संमिलित करुन न घेतल्या कारणाने प्रस्तुत दावा खारिज करण्यायोग्य आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे कु. संगिताला विरुध्द पक्षाच्या हॉस्पीटलमध्ये सर्वप्रथम दिनांक 06/02/2013 ला आणण्यात आले होते व तिचे ऑपरेशन दिनांक 07/02/2013 ला करण्यात आले होते. म्हणून तक्रारीत म्हटल्याप्रमाणे विरुध्द पक्षाकडे तिचा इलाज दिनांक 06/02/2013 च्या आधीही जारी होता हे नाकारण्यात येत आहे. तक्रारकर्तीचा उपचार त्यांच्या गरीब परीस्थितीमुळे निशुल्क करण्यांत आला तसेच त्यांच्या नातेवाईकांना सर्व स्थिती समजावून सांगून संमतीपत्र घेण्यांत आले. त्यानंतर तक्रारकर्ती ही निष्काळजीपणे दोन महिन्यापर्यंत गैरहजर राहिली. तक्रारकर्तीला विरुध्द पक्षाने तज्ञांकडे पुढील ईलाज व उपचारासाठी रेफर केले होते. परंतु तक्रारकर्तीने त्यांना दिलेले मार्गदर्शन व ईलाजाकडे दूर्लक्ष केले. विरुध्द पक्षाने केलेल्या शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा केलेला नाही व तसे मत कोणत्याही तज्ञाने व्यक्त केलेले नाही. नंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीवर केलेली शस्त्रक्रिया, उपचारासंबंधी तसेच तद्नुषंगीक बाबीसंबंधी दिनांक 06/02/2013, 09/02/2013, 13/04/2013, 18/05/2013, 06/06/2013, 08/06/2013, 13/06/2013, 16/06/2013, 08/08/2013, 24/04/2014, 13/05/2014, 12/08/2014, 16/09/2014, 19/09/2014 चा घटनाक्रम व तपशील नमूद केला. विरुध्द पक्षाने काहीही चूकीचे केले नसतांना, तक्रारकर्त्याने पैसे उकळण्याच्या उद्देशाने व बदनाम करण्याच्या हेतूनेच विरुध्द पक्षा विरुध्द जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, वाशिम तसेच पोलीस स्टेशन येथे तक्रारी केल्यात. विरुध्द पक्षाने जर खरोखरीच सेवेमध्ये न्यूनता केली असती तर, तक्रारकर्ता आधीच मंचात तक्रार घेवून आला असता. विरुध्द पक्षाने कोणतीही हयगय, निष्काळजीपणा केलेला नाही वा दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षाच्या नावलौकीकाला धक्का पोहचविण्याच्या उद्देशाने, कोणताही सबळ पुरावा नसतांना दाखल केलेली ही खोटी तक्रार नुकसान भरपाईस पात्र ठरत नाही. विरुध्द पक्षाने वरिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निवाडयाचा आधार घेतला तसेच विरुध्द पक्ष यांनी कोणत्याही अनुचित पध्दतीचा अवलंब केलेला नाही व त्यांच्या सेवेमध्ये दोष नाही. म्हणून त्यांच्याविरुध्दची तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत यावी.
सदर जबाब, विरुध्द पक्ष यांनी, शपथेवर, सादर केला.
3) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, कागदपत्रांच्या आधारे खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला तो येणेप्रमाणे.
प्रस्तुत प्रकरणात निर्णयासाठी पुढीलप्रमाणे प्रमुख मुद्दे उपस्थित होतात.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? नकारार्थी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुलीची शस्त्रक्रिया करतांना निष्काळजीपणा करुन, तिच्या डोळयाची दृष्टी जाण्यास विरुध्द पक्ष जबाबदार आहे काय ? नकारार्थी.
- प्रकरणात काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्र. 1 - तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार ते त्यांच्या मुलीचा डाव्या डोळयाचा ईलाज विरुध्द पक्षाकडे फेब्रुवारी 2013 पासुन करीत आहे . विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सुचना दिली की, त्यांचे मुलीचे डाव्या डोळयाचे ऑपरेशन करणे अत्यावश्यक आहे, न केल्यास ती एका डोळयाने अंध सुध्दा होवू शकते. त्यासाठी 15,000/- रुपये फी आकारुन विरुध्द पक्षानी, तक्रारकर्त्याचे मुलीला दिनांक 06/02/2013 रोजी त्यांचे दवाखान्यात भरती केले व दिनांक 07/02/2013 रोजी डोळयाचे ऑपरेशन करुन दिनांक 08/02/2013 रोजी सुट्टी देण्यात आली. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याच्या मुलीला दिनांक 06/02/2013 रोजी हॉस्पीटलमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळेस त्यांच्या नातलगांनी सांगीतले होते की, ती जन्मापासूनच दृष्टीबाधीत आहे व ती फार गरीब आहे व तिचे आईवडील तिच्या ईलाजाचा खर्च करु शकत नाहीत व मोफत ईलाज करण्याबद्दल विनंती केली. विरुध्द पक्षाने एका अल्पवयीन मुलीला आलेले अंधत्व पाहून धर्मार्थ कार्य समजून काम हाती घेतले व तिची तपासणी करणे सुरु केले, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुलीची तपासणी, उपचाराबद्दल व शस्त्रक्रियेबद्दल कुठलाही मोबदला घेतला नाही. त्यामुळे ती विरुध्द पक्षाची ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाचा लेखी जबाब आल्यानंतर सुध्दा संधी उपलब्ध करुन देऊनही, तक्रारकर्त्याने सदरहू विरुध्द पक्षाने खर्चाबाबतची आकारलेली देयके, प्रकरणात दाखल केलेली नाहीत. त्यामुळे तक्रारीत म्हटल्याप्रमाणे रुपये 15,000/- देवून विरुध्द पक्षाची वैद्यकीय सेवा घेतली, ही बाब तक्रारकर्ता सिध्द करु शकला नाही. म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ‘ ग्राहक ’ या संज्ञेत बसू शकत नाही. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चा निष्कर्ष नकारार्थी आहे, असे मंचाचे मत आहे.
मुद्दा क्रमांक – 2 ः- तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुलीची शस्त्रक्रियेपूर्वी व नंतर काळजी न घेतल्यामुळे त्यांची मुलगी 100 % दृष्टीबाधीत झालेली आहे. तसेच फक्त शस्त्रक्रिया व दवाखाना खर्च उकळण्याकरिता निष्काळजीपणाने व गैरकायदेशीरपणे विरुध्द पक्षाने शस्त्रक्रिया केली. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्यांनी विरुध्द पक्षा विरुध्द जिल्हयातील अधिका-यांकडे याबाबत तक्रारी केल्या, त्या उपरांत तिला जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम यांचेमार्फत जे.जे. हॉस्पीटल, मुंबई येथे उपचाराकरिता पाठविले. त्यानंतर मिळालेल्या वैद्यकीय अधिका-यांच्या दिनांक 16/09/2014 च्या पत्रानुसार असे लक्षात आले की, त्यांच्या मुलीला अंधपणा विरुध्द पक्षाच्या निष्काळजीपणाने शस्त्रक्रिया केल्यामुळे आलेले आहे. त्यामुळे प्रार्थनेत मागीतल्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. विरुध्द पक्षाने यावर अधिकारक्षेत्र बाबत प्राथमिक आक्षेप घेतला. परंतु तक्रारकर्त्याच्या मुलीची शस्त्रक्रिया ही वि. मंचाच्या न्यायिक क्षेत्रात घडली असल्यामुळे, मंचाला ही तक्रार चालविण्याचे अधिकार आहेत. कागदपत्रांच्या अवलोकनावरुन असे दिसून येते की, विरुध्द पक्ष हे वाशिम येथे मागील 30 वर्षांपासून नेत्र तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तक्रारकर्त्याच्या मुलीची डोळयाची विकृती ही Anophthalmos and Microphthalmos या सदरात मोडणारी होती. अशा व्याधीग्रस्तांचे नेत्र जन्मापासूनच बनलेलेच नसतात किंवा अपूर्णतः विकसीत असतात. म्हणून असे रुग्ण एक तर जन्मांध असतात किंवा पराकोटीचे दृष्टीविकलांग असून बव्हंशी लोकांना दैनंदिन जीवनावश्यक दृष्टी नसते. हया विकृतीवर काहीही इलाज नाही. तक्रारकर्त्याची मुलगी कु. संगीता हिला उजव्या डोळयाला Severe Microphthalmos होता. तिच्या त्याच डोळयातील दृष्टीपटल तिच्या अगदी लहान वयात सरकले व नंतर काचबिंदू होऊन तो डोळा खूप आधीच निकामी झाला. डॉ. दीपक बत्रांना बी स्कॅनमध्ये तिच्या हया उजव्या डोळयात चाडीच्या आकाराची रेटायन डिटॅचमेंट म्हणजेच दृष्टीपटल सरकलेलं आढळल. नंतर जेंव्हा मुंबई येथील KEM Hospital तिच्या उजव्या डोळयाचे मोतीबिंदूचे व लेंस टाकण्याचे ऑपरेशन झाले तेंव्हासूध्दा तिला उजव्या डोळयाला यत्किंचितही दृष्टी लाभ झाला नाही. डावा डोळा हा ब-यापैकी जरी विकसित झाला होता तरीही तो तिच्या सामान्य समवयस्कांइतका विकसित नव्हताच. अर्धवट विकसित हया डाव्या डोळयाने तिला फार कमी दिसत होते. म्हणूनच तक्रारकर्त्याचे म्हणणे की, ऑपरेशन मुळे तिचे शैक्षणीक नुकसान झाले, हे सिध्द होत नाही. कारण तिने तिचे शिक्षण 2007 पासून म्हणजे इयत्ता चवथीपासून शाळा सोडली आहे व त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रकरणात दाखल आहे. तसेच शस्त्रक्रियेत व त्यासंबंधी होऊ शकणा-या सर्व संभाव्य धोक्याची व ते होण्याच्या शक्यतेची समजावणी दिल्यानंतर एका माहितीपूर्ण संमतीपत्रवर तक्रारकर्त्याची सही/आंगठा घेतला होता, ते संमतीपत्र विरुध्द पक्षाने प्रकरणात दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्याने जे.जे. हॉस्पीटल व के.ई.एम. हॉस्पीटल मुंबई येथे तपासणी करुन घेतल्याबाबतचे संक्षिप्त कागदपत्रे प्रकरणात दाखल केलेली नाहीत. जे एक पत्र प्रकरणात दाखल केलेले आहे, त्यावरुन विरुध्द पक्षाने निष्काळजीपणा केला याबाबत कुठलेही मत प्रदर्शीत करीत नाही. तसेच तक्रारकर्त्याने सदरहू तक्रारीसोबत कोणत्याही वैद्यकीय मंडळाचं मतप्रदर्शन करणारे कोणतेही प्रमाणपत्र दाखल केलेले नाही. या कारणास्तव मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक आज्ञांचे पालन या प्रकरणात झालेले नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे या प्रकरणात लागू पडतात, असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विश्लेषणावरुन, या प्रकरणात विरुध्द पक्षाचा शस्त्रक्रियेतील निष्काळजीपणा, सिध्द होत नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष नकारार्थी काढण्यांत आलेला आहे.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर)
सदस्या. सदस्य तथा प्रभारी अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri